रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ९


                   आज सकाळी उठल्यापासूनच मनात धाकधुक सुरु झाली.... आता आम्ही जगातल्या हाय्येस्ट मोटोरेबल रोडवर जाणार होतो... खारदुंग-ला पास ! लेह पासून फक्त ५० किमी लांब .... आणि तिकडे जायचा रस्ताही लेह शहरातून दिसत होता .... आम्ही एकदमच १८३८० फुटांवर जाणार होतो .... भीती अशासाठी होती कि , टांगलांग - ला हे  खारदुंग-ला पास पेक्षा उंचीने कमी होतं , त्या तिथे माझी ही  हालत  झाली ,  इथे आता तर त्यापेक्षाही अधिक उंचीवर जायचे होते ... त्यामुळे मी तिथे जाईन  तर दुचाकीवर ... पण येताना मात्र चार चाकीवर येईन कि  चार खांद्यांवर ...?? ही भीती मनात घर करून बसली ... इतकी कि मी मेडीकल मध्ये जाऊन ऑक्सिजनचा एक छोटा सिलिंडर पण विकत घेतला ..., उगाच रिस्क कशाला घ्या...!  आम्ही निघणार तेवढ्यात खोप्याचं  लक्ष त्याच्या बुलेटच्या मागच्या टायरकडे गेलं .... त्याचा तो टायर  आणि मागील मडगार्ड घासून  टायरची झीज सुरु झालीय असं  लक्षात आलं ... हि  खरंच चिंतेची बाब होती... असाच जर  टायर  घासत राहिला  तर तो फुटण्याचा संभव होता ... आणि मुख्य म्हणजे त्यावरील सामानामुळे आणि वजनामुळे तर तो नक्कीच फुटला असता ... आता काहीही करून garage  गाठणं भाग होतं. आम्ही शहराच्या बाहेर एका garage मध्ये गेलो ... तिथे बाकीचे लोकही आपापल्या बुलेट दुरुस्त करून घेण्यासाठी आले होते ... गाड्यांच्या रांगा  लागल्या होत्या , मग थांबणं तर आलंच ... आम्ही वर  खारदुंग-ला च्या दिशेने बघितलं ... वर खूप काळे ढग  जमा झाले होते ...  तिथे जोरदार पाउस आणि हिमवृष्टी होणार अशी चिन्हे दिसत होती ... आमच्या हॉटेलचा मालक निघताना म्हणाला होता कि तिथलं  वातावरण सारखं  बदलत असतं ... सकाळी तर तसं काही  दिसत नव्हतं ... आणि आता  वर जोरदार हिमवृष्टी होतेय हे बघून तर आम्ही ' आता काही खरं  नाही ! ' असेच चेहरे केले ... 
         इकडे garage  वाल्याने आमची गाडी हातात घेतली... तो त्याच्या कामात भलताच  तरबेज होता ... गाडीला बघता क्षणीच त्याने काय प्रॉब्लेम  आहे ते सांगितलं ... मागच्या टायरमध्ये लोखंडी रॉड  टाकून मडगार्ड वर उचलून घेतलं... मी , पप्या  आणि संदीप तिथे असलेल्या दुसऱ्या  बुलेट बघत बसलो... २-३ तास त्यातच गेले , काम झालं , आम्ही निघालो . तोपर्यंत खारदुंग-ला पास वर हिमवृष्टी होऊन गेली होती ... आमचं  नशीब चांगलं म्हणून खोप्याची गाडी garage  ला घेऊन जायला लागली नाहीतर आम्ही त्या हिमवृष्टीत नेमके सापडलो असतो ... खारदुंग-ला ला  जाताना रस्ता मात्र चांगला होता . असाच रस्ता असेल तर मग बरं  आहे असा विचार करत असतानाच एकदम दगड मातीचा रस्ता सुरु झाला ... काही अंदाज बांधू लागलो कि निसर्ग त्याचे झाकून ठेवलेले पत्ते आमच्यासमोर उलघडत असे ... unpredictable ...!!! जसजसे वर जाऊ तसतसे रस्त्याची परिस्थिती बिघडत होती ... खरं सांगायचं  तर त्या ठिकाणी रस्ता तयार करणं हेच जिकिरीचं  काम आहे ... खडक असा तो कुठे नाहीच... नुसती ठिसूळ माती ... वळणावळणाचे U टर्न घेत आम्ही वर चढू लागलो.... बाजूची ठिसूळ माती घसरून खालच्या रस्त्यावर पडत होती ... आम्ही मध्यापर्यंत आलो... इथून पुढे रस्त्यावर बर्फाच्या राशी पडलेल्या दिसू लागल्या ... त्यांतून झिरपणाऱ्या  पाण्यामुळे आणि ठिसूळ मातीमुळे रस्त्यात बऱ्याच ठिकाणी चिखलाचा राडा झाला होता ....






   संदीपची  आणि खोप्याची गाडी व्यवस्थित होती , पण पप्याची गाडी सारखी मागे मागेच राहत होती... आम्ही एका ठिकाणी थांबून त्याची वाट पाहू लागलो... त्याची गाडी प्रॉब्लेम  द्यायला लागली ... थोड अंतर गेलं  कि गरम होऊन बंद पडत होती ... पप्या अगदी मेटाकुटीला आला होता ... रस्त्यात कुणाच्यातरी  २ यामाहा FZ  गाड्या बंद पडलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या आम्ही मागे पहिल्या होत्या  ... आणि दुर्दैवाने पप्याची गाडी यामाहा FZ च होती.... आम्ही खारदुंग-ला वर पोहोचलो तरी पप्या  अजून  कसा आला नाही म्हणून  आम्ही पुन्हा खाली यायला निघालो तर महाशय हळूहळू येत असलेले दिसले... तो केवळ पप्या  होता म्हणून वरपर्यंत त्याची यामाहा गाडी घेऊन येऊ शकला ... मानलं साल्याला  ...! 

                            
    

               
                    ' खारदुंग-ला वर १० मिनिटांच्या वर थांबू देत नाहीत ' , ' सगळ्यात उंच ठिकाणचा रस्ता असल्याने श्वास घायला फार त्रास होतो ' , वगैरे वगैरे अशी मौलिक माहिती आधीच  सांगून खोप्याने माझं  उरलं  सुरलं धैर्यही संपवलं  होतं ... वर कोणीच नसेल असा कयास बांधून माथ्यावर पोहोचलो आणि बघतो तर काय ...?? वर माणसांची जत्राच भरल्यासारखी वाटत होती .... लहान लहान मुले बर्फात खेळत होती... बरीच वयस्कर माणसेही तिथे आम्हाला दिसली... जगातला सगळ्यात उंच cafeteria ही  तिथे होता . आता बोला....!! आणि इतक्या उंचीवर श्वासाचा ही  काही त्रास जाणवत नव्हता .... पुन्हा पोपट ...!!  घाबरून विकत घेतलेला ऑक्सिजनचा सिलिंडर वाया गेला... ! पण वरचं  वातावरण फारच आल्हाददायक होतं ...  सर्वत्र बर्फाच्या पांढऱ्या राशी ... मस्त उन पडल होतं ... आणि त्याचं   परावर्तन होऊन डोळ्यांसमोर प्रारणं  चमकत होती... आम्ही सर्वांनी खारदुंग - ला लिहिलेल्या पाटी  समोर उभं  राहून फोटो काढून घेतले ... 
              

                          खर तर आम्ही पुढे नुब्रा vally  लाही जाणार होतो पण ते आणखी १०० किमी पुढे होते आणि आधीच निघायला उशीर झाल्याने आमचा नाईलाज झाला... खारदुंग - ला पर्यंत जाऊन आम्ही पुन्हा माघारी फिरलो... परतीच्या वाटेवर पप्या  कुठे गायब झाला काही कळलं  नाही , तो आम्हाला डायरेक्ट जेवणाच्या हॉटेलवर भेटला... जेवण झाल्यावर आम्हाला भलताच कंटाळा आला... खोप्या आणि पियू म्हणत होते कि थिकसे मॉनेस्ट्री बघायला जाऊया , पण आम्हाला जाम  वैताग आला होता , मी संदीप आणि पप्या रूम वर जाऊन पडलो ... खोप्या आणि पियुचा उत्साह खरच हेवा वाटण्याजोगा होता ... ते दोघे गेले ती मॉनेस्ट्री बघायला ... ! पण नंतर त्या मॉनेस्ट्रीचे फोटो बघितले आणि तिथे न जाऊन आम्ही बरंच  काही मिस केलं  असं  वाटू लागलं ... संध्याकाळी संदीप ने त्याची  गाडी garage  मध्ये नेली ,  गाडीचे शॉकअब्सोर्बेर खराब झाले होते , ते बदलले ...  पप्याच्या गाडीचेही  काम निघाल्याने आम्ही दोघे दुसऱ्या  garage  मध्ये गेलो... तिथे एक जण  आम्हाला भेटला , तोही तिथे त्याची बाईक दुरुस्त करायला आला होता .  त्याने कथन केलेले अनुभव ऐकले आणि आम्ही सर्दच झालो... रोहतांग मध्ये एका ओढ्यात पडून त्याचे पाकीट , इतर महत्वाची कार्डे , कागदपत्रे वाहून गेली ...., पँगाँग लेक वरून येताना शैतान नाल्यात स्वतः वाहून जाता जाता वाचला , खारदुंग ला मध्ये गाडीवरून धडपडला , गाडी बंद पडली ... आणि १० किमी च्या वर अंतर गाडी ढकलत घेऊन आला .... हे ऐकल्यावर मात्र आम्ही आतापर्यंत झालेल्या प्रवासात चांगलेच सुदैवी ठरलेले होतो असं  वाटू लागलं.... एव्हढं  सगळं  त्या माणसाबाबत घडलं  पण त्याच्या चेहऱ्यावर थकव्याचा किंवा नैराश्येचा लवलेशही नव्हता ... उलट ते आम्हाला सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज दिसत होतं .... युद्ध जिंकून आलेल्या  सैनिकाला  त्याच्या जखमांची काहीच पर्वा  नसते ....  खरंच  , हा प्रदेशच असा आहे कि तिथे माणसाचा कस लागतो ... एकाच वेळी  स्वर्गासम सृष्टीसौंदर्याची प्रचीती येते  आणि त्याचवेळी नरकयातनाही  भोगाव्या लागतात...  आणि आम्ही त्याचा  ' याची देही याची डोळा ' अनुभव घेत होतो ...

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण .... भाग - ८


                   लेह मध्ये पोहोचायला रात्रीचे ८.३० -९ झाले ... राहण्याची व्यवस्था कुठे करावी हे ठरवण्यात बराच वेळ गेला ....एकतर भयंकर दमून आम्ही कसेबसे लेह गाठले होते ... बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर खोप्याने आधीच माहिती काढून ठेवलेल्या रेस्टहाउसचा शोध लागला ... २५० किमी च्यावर खडतर प्रवास केल्यावर अगदी कोलंबसला अमेरिकेचा शोध लागल्यानंतर होणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटींनी आनंद  आम्हाला त्या " गल्वान गेस्टहाउस " चा शोध लागल्यानंतर झाला ... हे गेस्टहाउस मुख्य शहरापासून थोडे बाहेरच्या बाजूला होते ... रात्री १० च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो तर  तिथे सर्वत्र सामसूम....!!  अंधार ....गल्वान गेस्टहाउस  म्हणजे हिंदी हॉरर  फिल्मचं  लोकेशन वाटत होतं ...त्यात आम्ही रात्री उशिरा तिथे पोहोचलो होतो त्यामुळे आपोआपच वातावरण भयपटाला साजेसं असच  झालं होतं ... पण आम्ही इतके दमलो होतो , वैतागलो होतो कि एखादा खरा भूत जरी समोर आला असता तरी आम्ही '' सुबुको आओ ... अभी जावो " असंच  काहीसं  म्हटल असतं ... रूम मध्ये गेलो मऊ उबदार रजया अंगावर घेतल्या ... आणि जगाचा तात्पुरता निरोप घेतला...
                   सकाळी ९-१० च्या सुमारास  जाग  आली... डोळे उघडल्यावर बघितलं ,  गल्वान गेस्टहाउस  च्या रूमस चांगल्या होत्या , भिंतींना निळसर रंग ....खाली मऊ  गालीचा ,  छतावर मोठ मोठे बांबू आडवे टाकलेले ... खिडक्यांना पडदे होते... सकाळी मस्त उन  पडल  होतं  त्यामुळे प्रसन्न वाटतं होतं.... बाहेर येऊन बघितलं तर रात्री जसं  वाटलं होत तसं हे गेस्टहाउस नव्हतं ...  समोर छान पैकी एक बगीचा होता ... त्यापुढे एक लहानसे शेड उभारले होते त्यात टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या ... गेस्टहाउस च्या मालकाने बाजूला लहानशी शेतीही केली होती.. कंपाउंड च्या बाजूने रांगेत उभी केल्यासारखी उंचच उंच झाडे लावली होती...


                       रात्रीच्या आणि दिवसाच्या वातावरणात जमीन आसमानाचा फरक होता .... आम्ही फ्रेश होऊन    नाष्टा केला... ओम्लेट - ब्रेड , चहा  आणि घरून आणलेल्या शंकरपाळ्यांवर  ताव मारला. लेह च्या आजूबाजूला जिथे चीनची हद्द जवळ आहे , म्हणजे पँगाँग लेक , खारदुंग ला , नुब्रा valley   अशा ठिकाणी जाण्यासाठी पास लागतो .. तो काढण्यासाठी आमच्या हॉटेलच्या मालकाला सांगितले... ते पास येईपर्यंत आम्ही लेह मध्ये जाऊन गाड्या सर्विसिंग करून घेण्यासाठी बाहेर पडलो.... आमच्या गाड्या जवळ पास १००० किमी चालल्या होत्या , त्यामुळे ऑईल बदलणे व  इतर दुरुस्तीसाठी आम्ही लेह शहरात आलो ... आणि बघतो तर काय... ? जिकडे तिकडे बुलेटच बुलेट... ' विना बुलेट लेह शहरात फिरण्यास मनाई ' असा काहीसा अलिखित नियम असावा , इतक्या प्रमाणात बुलेट दिसत होत्या ...जगात दोनच ठिकाणी  रॉयल  एन्फिल्ड  बुलेट जास्त प्रमाणात दिसू शकतात .. एक म्हणजे लेह  आणि  दुसरं ठिकाण  म्हणजे  रॉयल  एन्फिल्ड  बुलेटची  factory .... !!!  बुलेट  किती प्रकारच्या असू शकतात हे तिथेच कळेल.... आम्ही garage मध्ये गेलो तर तिथेही सगळ्या बुलेट दुरुस्तीसाठी आलेल्या.... त्या  बघून पप्याने  लेह मध्ये एक  बुलेटचं  garage  टाकूया , असा एक बिझनेसचा प्लान बोलून दाखवला ... खोप्याही त्याला तत्वतः मान्यता देणार एवढ्यात मी  जोरदार हसलो आणि तो प्लान बारगळला ., नाहीतर एका हातात पाना आणि दुसऱ्या  हातात स्क्रू ड्रायवर घेऊन खोप्या लगेच तयारच झाला असता... असो...! आज आमचा कुठेही फिरण्याचा कार्यक्रम नव्हता .. दुपारी जेवलो आणि मस्त ताणून दिली ... संध्याकाळी जवळचं  एखाद ठिकाण करावं  म्हणून आमच्या गेस्टहाउसच्या मागे असलेल्या शांतीस्तूप कडे आम्ही निघालो..... हिमाच्छादित पर्वताच्या पार्श्वभूमीवर पांढरेशुभ्र शांतीस्तूप  उठून दिसत होते ...



                  शांतीस्तूप आणि त्याचं  विस्तीर्ण अंगण मावळतीच्या प्रकाशात अतिशय विलोभनीय दिसत होतं ... स्तुपावर गौतम बुद्धांच्या जीवनावरची काही प्रसंगे दर्शवली होती ....लाल , पिवळ्या, निळ्या , हिरव्या रंगाच्या पताका  फड फड करीत  त्यावर लिहिलेली  प्रार्थना ,  शांतीचा संदेश वाऱ्याबरोबर दूरपर्यंत पसरविण्याचे काम करीत होत्या .... तिथलं  बुद्धदर्शन  खरच  मनाला शांती देणारं  होतं ... नाव अगदीच सार्थ होतं ... शांतीस्तूप ...!!



                    शांतीस्तूपाच्या समोरच्या डोंगरावर लांबवर लेह palace दिसत होता . काही लोक  कॅमेऱ्याची  तोंडे तिकडे वळवून दूरवर असलेल्या लेह palace ची छायाचित्रे घेण्यात मग्न दिसत होती ... आम्हीही तिथे आमचे फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेतली ... काही पर्यटक  तिबेटी लोकांचा पोशाख अंगावर चढवून स्वतः चे फोटो काढून घेत होते ... लोकांना कोणत्या गोष्टी करण्यात मजा येईल हे सांगणं कठीण आहे ....



                 अंधार पडला तसे आम्ही तिथून  लेह शहर फिरण्यास निघालो... लेह फिरताना इतक्या डोंगर दऱ्या पार करून आलो आहोत असं वाटतच नव्हतं ... इथेच कुठेतरी गोव्याला आल्यासारखं  वाटत होतं... दुकाने  दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती ... आणि बाजारपेठ माणसांनी फुलून आली होती ... तिथे बऱ्याच तिबेटी वस्तू , स्वेटर्स , jackets  , शाली , खेळणी  विकण्यासाठी आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या होत्या ... तिबेटी वस्तूंच्या एका दुकानात गेलो , तिथे विविध प्रकारच्या धातूच्या वस्तू , रंगीबेरंगी खडे मांडलेले होते ...ते एकदा फिरून बघितलं  अन  मी बाहेर पडलो , आणि इतर दुकानांची विंडो शॉपिंग करू लागलो .... खोप्या आणि पियुने काहीतरी ३-४ निळ्या रंगाचे दगड विकत  घेतले ... पियुने एकदम खुशीत येऊन आम्हाला ते दगड दाखवले ....' कितीला ? ' असं विचारल्यावर तिने जी किंमत सांगितली ती ऐकून  मला पुन्हा एकदा हाय अल्टीट्युड  सिकनेस आल्यासारखं  वाटू लागलं .... खोप्याचा चेहराही सहा महिन्याच्या आजारातून उठलेल्या माणसासारखा झाला होता ... पण  बिचारा उसणं हास्य चेहऱ्यावर आणून उभा होता .... शॉपिंग तर झाली ... आता पोटपूजा ...! एका हॉटेल मध्ये गेलो .... मस्त चायनीज नुडल्स , राईस हाणला....कोल्ड्रिंक झालं ... जेवण झालं  तसं  जास्तच थंडी जाणवू लागली....  गेस्ट हाउस  वर जाऊन पडलो ... आजचा दिवस असाच लेह शहर फिरण्यात आणि शॉपिंग करण्यात घालवला  आणि ' जीवाचं लेह '  करून घेतलं...
                    संध्याकाळी शांती स्तूप ला जाताना त्याच्या पलीकडे लांब उंच असा  जगातला हाय्येस्ट मोटोरेबल रोड  खारदुंग-ला पास ( उंची १८३८० फुट ) आम्हाला दिसला होता ... आता उद्या आम्ही जगातल्या सगळ्यात उंच रस्त्यावर असणार होतो .... top  of  the  world ....!!!


सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ७

     
                          आईशप्पथ ....!!  जाम दम लागतोय ... माझं  काही खरं  नाही...
                           
                          अरे यार कधी संपणार हा रस्ता ....??
                             
                          ओ  माय  गॉड ....

                          सरजी ,   थोडा पाणी मिलेगा ...??

                          आयचा घो ... ते बघ  पुढे रस्ता बंद आहे ... गाड्यांची रांग लागलीय...

                          पुढे ब्लास्टिंग करणार आहेत.... ७ ब्लास्ट आहेत ... एक - दीड तास लागणार....आपण                                                                   अडकलो  .... आता वाट ...!!!  

                                                               ... टांगलांग- ला....  ( उंची  १७५८२ फुट ...)                                                                                                                 
                                                    ( एकही फोटो नाही.... )
       
                                                                           @
                                                                           @
                                                                           @

                    साला एखादा दिवसच खराब असतो... इतका खराब ,  कि आपण पुढचे दिवस बघायला जिवंत राहू कि नाही याची शंका येते... अजूनही तो दिवस आठवला कि श्वास जड झाल्या सारखं  वाटतं ...
  माणसाच्या आयुष्यातला चांगला काळ  जसा झरकन सरतो तसा तो मख्खन रस्ता लगेच संपला .. आणि सुरु झाला तो तुकड्या तुकड्यातला रस्ता ... म्हणजे १०० -१५० मीटर रस्ता आणि मध्ये बारीक माती ...!  इतकी  कि त्यात गाडीचे टायर  रुतून बसत ...  बॉर्डर रोड   ऑर्गनायझेशन च्या  जवानांनी मोठ्या  कष्टाने  हा रस्ता तयार करायला घेतला आहे ... आणि काही  ठिकाणी जवान स्वतः उभे होते . उन्हातान्हाची परवा न करता गाड्यांना ते रस्ता दाखवत होते जेणेकरून गाड्या मातीत अडकू नयेत... धन्य ते जवान ! एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ते सहज फिरायला म्हणून येणाऱ्या पर्यटकांसाठी आपलं  कर्तव्य बजावत होते. असंच अर्ध  अंतर पार केल्यानंतर आम्हांला कळलं  कि आम्ही  ' मोरे प्लेन ' ( morey plains ) मधून जात आहोत. नजर जाईल तिथवर सपाट समतल प्रदेश ...
                खरं  तर ह्या मोरे प्लेन मध्ये शिरण्याआधी पासूनच मला पुन्हा त्रास व्हायला लागला...  लडाखला निघालेल्या पाच जणांपैकी मी सगळ्यात ' कमजोर कडी ' होतो ... खोप्या , संदीप , पप्या हे तर इतक्या अवघड रस्त्यांवरून बाईक चालवत होते , मानलं  त्यांच्या एकाग्रतेला....आणि चिकाटीला ...!   पियू एक मुलगी असूनही इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही  बाईक राईड  एन्जॉय  करत होती ... मला ह्या सगळ्यांच्या मनोधैर्याचा हेवा वाटू लागला...
                   मोरे प्लेन मधून जात असताना एका ठिकाणी मला इतकं  अस्वस्थ वाटू लागलं  कि मी बाईक वरून खाली पडतो कि काय अशी शंका यायला लागली ....एके ठिकाणी थांबलो , रोड ची कामे करणाऱ्या माणसांसाठी तात्पुरते तंबू उभारले होते , तिथे संदीप आणि खोप्या आसरा मिळतो का ते पाहायला गेले , त्या कामगारांनीही  मोठ्या अगत्याने आम्हाला त्यांच्या तंबू मध्ये आराम करण्यास सांगितले ... त्यांचा तो तंबू म्हणजे दुसरी भट्टीच होती ... पण तिथे थोडा वेळ आडवा झालो , खोप्याने मला कापराच्या २-३ वड्या दिल्या त्या हुंगल्याने जरा बरं  वाटलं ... त्या तशाच रुमालात बांधून मी नाकासमोर तो रुमाल बांधला... थोड्या वेळाने  बरं वाटू लागलं ... खोप्याचा हा उपाय खरच चांगला होता ....आता जास्त वेळ थांबून चालणार नव्हतं .... अजून बरंच अंतर आम्हाला पार करायचं  होतं ... तिथून निघणं   अतिशय जीवावर आलं  होतं ...सपाट रस्ता काही केल्या संपत नव्हता , त्यात रस्त्याचं  काम चालू असल्याने गाडी चालवायला फार त्रास होत होता ... अनेक वेळा त्या मातीच्या रस्त्यावरून आमच्या गाड्या घसरत होत्या , पुढे  चाललेल्या गाडीचा धुरळा  मागे उडत होता ,  त्यामुळे पुढच काहीच नीट  दिसत नव्हतं , गाडी हळू चालवली तर मातीत रुतत होती आणि फास्ट चालवली तर मातीवरून घसरत होती , त्यामुळे गाडी चालवावी तरी कशी ....? असा प्रश्न आमच्या रायडर्स पुढे होता ...एक वेळ तर अशी आली कि रस्ताच नव्हता , नुसती बारीक माती ...' तुम्हाला  कुठून जायचंय तिथून जा....' अशीच मुभा जणू निसर्गाने दिलेली ...!!!
                     थोड्या वेळाने आम्ही एका डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो , आमच्या समोरून आर्मी चा कॉन्वोय येत होता ... ५०-६०  आर्मी च्या गाड्या ....आम्ही बाजूला थांबलो ... मी आणि संदीप ने त्यातल्या जवानांना salute  केला .. त्यांनी त्याचा  स्वीकार करून आम्हालाही  salute  केला ... केवढा तरी अभिमान वाटला आम्हाला ...!!  त्यांच्यातल्या एका जवानाने गाडीची नंबर प्लेट बघितली आणि   " जय महाराष्ट्र..."  केलं ... फक्त दोनच शब्द....! हजारो किलोमीटरच्या अंतराचं अवडंबर एका झटक्यात गळून पडलं ... आणि आम्ही महाराष्ट्रातच आहोत कि काय असा क्षणभर भास झाला .... जाता जाता त्यांनी   " मुंबईचे का...?? " असं  विचारलं. आम्हीही त्यांना उत्साहात होकार दिला... ते ट्रक पास होईपर्यंत आम्ही थांबलो... पुढे निघालो तशी चढण सुरु झाली ... एका मागोमाग एक वळणे , खडबडीत रस्ता , अंगातला अणु -रेणू थडथडत होता., त्यात श्वास घ्यायला त्रास ... बेकार हालत  झाली होती ... टांगलांग -ला पास ...!! रस्त्याची एक खासियत होती , एक वळण घेतलं  कि समोर लांबच लांब चढणीचा रस्ता दिसायचा... त्या शेवटच्या टोकावर पोहोचून  वळण घेतलं  कि समोर पुन्हा तसाच लांबच लांब रस्ता....असं  किमान ७-८ वेळा झालं  असेल....टेप  रेकॉर्डर मधली कसेट अडकली कि कसा तोच तोच आवाज येतो तसाच विधात्याच्या टेप  रेकॉर्डर मधली कसेट अडकली कि काय असं वाटू लागलं ... वळण घेतलं  कि तेच तेच दृश्य समोर ...!! असा वैताग आला ... कधी संपेल हा रस्ता ?? सगळेच  बेजार झालो ... त्यात आमच्याकडचे पाणीही संपले ... कसेबसे वर पोहोचलो... वर  वारा  तर वेड लागल्यासारखा सुसाट सुटला होता ...   तहानेने सगळेच कासावीस झाले होते . एक आर्मीची जिप्सी गाडी उभी होती ... त्यांना खोप्या ने थोडं  पाणी मिळेल का म्हणून विचारलं ... त्यांच्याकडेही फारच थोडं  पाणी शिल्लक होतं . तरीही त्यांनी आम्हाला त्यातलं  पाणी प्यायला दिलं... औदार्य म्हणतात ते ह्याला !!  त्या तिथे इतकं  अस्वस्थ वाटत होतं  कि ' टांगलांग - ला ' लिहिलेल्या त्या पाटीसमोर उभं राहून फोटो काढण्याची इच्छाही कोणाला झाली नाही ... टांगलांग - ला मध्ये आमचा जीव टांगणीला लागला होता ... लवकरात लवकर तिथून निघावं  म्हणून आम्ही लगेच गाड्यांवर टांगा  टाकल्या ... पुढचं  एक वळण घेतो न घेतो तोच समोर जे दृश्य दिसलं  त्याने तर माझा होता नव्हता तो धीरही सुटला ... समोर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या ...  आता जिथे श्वास घेणंही जड जात होतं  तिथे आम्हाला नाईलाजाने थांबावं  लागणार होतं ...गाड्या रस्त्याच्या बाजूला लावल्या , मी तर रस्त्यावर सरळ आडवाच झालो... एक प्रकारची ग्लानी आणि अस्वस्थता मला जाणवत होती... पप्या  संदीप , खोप्या आणि पियू सुद्धा रस्त्यावर बसले ... मी डोळे मिटून पडून राहिलो... अर्धवट ग्लानीमध्ये काही काही वाक्ये ऐकायला येत होती ...
-- " पुढे ब्लास्टिंग करणार आहेत.... ७ ब्लास्ट आहेत ... एक - दीड तास लागणार....आपण                                                                   अडकलो  .... आता वाट ...!!!  "
-- " रस्ता रुंद करण्याच काम चालू आहे ...."
-- " अरे तो बघ , बिडी ने सुरुंगाची वात  पेटवतोय.... "

                                                 ...... टिक  टिक  ... टिक  टिक

                           ध s  डाम ....  ध s  डाम ......  ध s  डाम  
               एका पाठोपाठ किती ब्लास्ट झाले मला समजलं  नाही ... पण प्रत्येक धमाक्यानंतर मी आडवा पडलो होतो ती जमीन धरणीकंप झाल्यासारखी हादरत होती... हे असले धमाके ह्या हिमालयाला काही नवीन नाहीत... मग ते विधायक असोत कि विघातक ... त्याने ते सारे सहन केले  ,  अजूनही करतोय ... आणि आणखी किती काळ  सहन करावे लागतील , देव जाणे ...!  त्या धमाक्याने मी भानावर आलो... खोप्याने मला दिलेली कापराची वडी  नाकाला लावली ... बरं  वाटलं . खरंच , हा उपाय नक्कीच काम करत होता ... त्यावेळी  खोप्याने मला तो प्रथमोपचार दिला नसता तर मी नक्कीच मेलो असतो... आमच्याकडे पाणी नसल्याने खोप्याने  आजूबाजूचा बर्फ बाटलीत टाकून ते वितळवून पाणी तयार करण्याचा एक  अयशस्वी प्रयत्न केला... आमचं  बोलणं ऐकून तिथे पाण्याचा tanker  घेऊन जाणारा एक माणूस जवळ आला .. तो बुलढाण्याचा होता त्याने लांबवर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीतून थोड पाणी आम्हाला दिलं . ती गाडी आमच्यापासून फारतर ५० फुट लांब असेल , पण तिथून ते पाणी घेऊन येताना पप्या अगदी मेटाकुटीला  आला . तो जवळ आला , पाण्याची बाटली दिली आणि गाडीवर ओणवाच झाला ... तिथलं  वातावरणच असं  भयानक होतं ... थोड्या वेळाने रस्ता मोकळा झाला , आणि आम्ही निघालो ... रस्त्यावर पाणी आणि चिखलाचा राडा झालेला ... कसेबसे  त्या रस्त्यावरून  आम्ही निघालो ...काही अतिउत्साही रायडर्स आमच्या बरोबर होते ... इतक्या खराब रस्त्यांवर ते कशीही गाडी चालवत होते , एक जण तर रस्त्याला अगदी दरीच्या बाजूने जाता जाता अचानक गपकन खालीच गेला  ... अति आत्मविश्वास ... म्हणजे ज्याला नेहमीच्या भाषेत , ' शानपना ' म्हणतो तो नडला ... पण नशीब चांगलं  म्हणून ते जास्त खाली घसरले नाहीत ...'  पुढच्यास ठेस मागचा शहाणा  ' ह्या म्हणीच्या शब्दशः अर्थाने आम्ही हळूहळू गाडी चालवत टांगलांग - ला  उतरलो ...संध्याकाळी  ६ च्या सुमारास  खाली रुम्त्से नावाच्या  गावात  पोहोचलो ...अतिशय टुमदार गाव होतं  ते ...!! तिथे बसून थोडा श्रम परीहार केला... चहा  नाश्ता घेतला... सगळे इतके थकले  होते कि पुन्हा गाड्यांवर बसू वाटत नव्हतं... लेह अजूनही ६० - ७० किलोमीटर लांब होतं ... पुढे उप्शी या ठिकाणी थांबावं  कि डायरेक्ट लेह गाठावं अशी द्विधा मनस्थिती सगळ्यांची झाली ... कारण सगळेच जाम दमले होते ...
                         शेवटी गाड्यांवर बसलो ... पुढचा रस्ता अगदीच मक्खन होता ... आणि आम्ही  लेहला जायचा निर्णय घेतला ....  मध्ये पप्याला बरं वाटत नसल्याने त्याने गाडी माझ्याकडे दिली ...  मला एक  चांगलं  वाटलं  कि लेह मध्ये जाताना मी स्वतः गाडी चालवत होतो...  गया  , उप्शी , करू , थिकसे , शे  अशी गावे पार करीत आम्ही लेह कडे मार्गक्रमण करु लागलो  ... लेह कडे जाताना रस्त्यात एक लहानसे वादळ झाले...अंधार पडला ....  झाडे आपली पाने आमच्यावर बरसवीत होती ... मायथोलोजिकल  सिरीयल मध्ये आनंदाच्या प्रसंगी जसे स्वर्गातून फुलांचा वर्षाव केला जातो तसंच काहिसं आम्ही लेह मध्ये पोहोचताना झालं ... फरक इतकाच होता कि इथे फुलांच्या ऐवजी झाडांची वाळलेली पाने आणि  धूळ  होती... पण काही का असेना तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता ...
                          इतका भयानक , खडतर प्रवास.... एक लहानसा अपघात .... टांगलांग - ला मध्ये झालेल्या मरणप्राय यातना.... हे सर्व पार करून आम्ही अखेर आमच्या 'मंजिल ' ला पोहोचलो होतो ... पण नंतर थोडा विचार केला , आणि लक्षात आलं  कि लेह तरी आपली ' मंजिल  ' कुठे आहे ...??

                             ये तो ऐसा सफ़र है जहां  रास्ते ही मंजिल है ....।


गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

दुचाकी लडाखायण... भाग - ६

                    सर्र्रर्र्रर्र .... धाsss ड....! --"  आह्ह...!!  माझा पाय ... माझा पाय..sss   " फरपटत जाणाऱ्या  गाडीखाली माझा डावा पाय सापडला होता .... डोक्यावरचं  हेल्मेट एखाद्या फुटबॉल सारखं  टप्पे खात तीनताड लांब उडलं .... डावा खांदा प्रथम दाणकन जमिनीवर आपटला , नंतर घसपटत  गेला .... गॉगल  उडून कुठे पडला , देवाला  ठाउक  ....
                                                                           
                                                                                @
                                                                                @
                                                                                @


              सारचूच्या त्या तुफानी रात्रीनंतर सकाळी उठल्यानंतरही  माझं डोकं काही उतरलं  नव्हतं ...मला अजूनही अस्वस्थच वाटत होतं. थोडं चाललं तरी दम लागत होता ... हे सगळं   त्या हाय अल्टीट्युड सिकनेस मुळे घडत होतं . आम्ही अजूनही १३००० फुटांवर होतो ...बाहेर थंडीही मजबूत होती... रात्री गाड्यांवरचं सामान  आम्ही काही काढलं  नसल्याने सकाळी पुन्हा ते  बांधायचा १ तास वाचला ... " तुम लोग आठ घंठा में लेह पहुंच जायगा ..."  सेंगे आम्हाला सांगत होता ... २५० किमी च्या वर अंतर पार करून  आज अंधार पडायच्या आत कसल्याही परिस्थितीत लेह गाठायचंच  होतं  , कारण आम्ही आमच्या वेळापत्रकानुसार १ दिवस उशिरा चाललो होतो ... सेंगे चा निरोप घेऊन  सकाळी लवकरच निघालो ... आता आम्हाला सामना करायचा होता तो भयानक अशा २१ गाटा लूप्स चा ...!  २१  गाटा लूप्स हे असं  एक प्रकरण होतं  कि जे पार केल्यानंतर आम्ही आहे त्या उंचीपेक्षा २००० फुट  आणखी वर जाणार होतो ... हा विचार करून तर आधीच हाय अल्टीट्युड सिकनेस ने माझे पाय लटपटत  होते , ते आता थरथरायला लागले ... हे म्हणजे ' आधीच उंचावर त्यात चढलो उंटावर ' अशी गत झाली... हि नवीन म्हण मी अगदी परिस्थितीला धरून तयार केली आहे . वाचकांनी हि म्हण ' आधीच झालं  थोडं  अन व्याह्याने धाडलं घोडं ' किंवा ' दुष्काळात तेरावा महिना ' अशा अर्थाने घ्यावी ... तर , सांगायचा मुद्दा असा कि परिस्थिती भलतीच बिकट होती ...
                      २१  गाटा लूप्स सुरु झाले . विशेष म्हणजे  मैलाचा दगड अंतराबरोबर त्या ठिकाणाची उंचीही दाखवत होता ... १३७८० फुट .... वर नजर जाईल तिथवर वळणेच वळणे दिसत होती....



                      एकामागून एक वळण घेत आम्ही मध्यापर्यंत येऊन पोहोचलो ... संदीप प्रत्येक वळण मोजत होता ... हा वरचा फोटो १३ कि १४ व्या वळणावर पोहोचल्यावर घेतला आहे ... सगळी  गाटा लूप्स एका फोटोत येणं केवळ अशक्यच ...!!  एखादा जहरी नाग वेटोळे घालून सकाळचं कोवळं  उन खात पडलेला असावा तसा तो खालचा रस्ता दिसत होता ... अगदी वरपर्यंत गेलो . मैलाचा दगड उंची दाखवत होता  १५३०२ फुट ... पण  माझी  भीती निरर्थक ठरली... पाण्याविना जसा मासा तडफडेल तसा मी ऑक्सिजनविना तडफडेन असं  वाटलं  होतं  , परंतु जास्त काही फरक जाणवला नाही...हीच तर खासियत आहे इथल्या निसर्गाची ...! आपण ज्याची अपेक्षा करतो ते कधीच घडत नाही...आम्ही आता डोंगरमाथ्यावरून घाटाने फिरू लागलो ... पुढे एक  सुंदरशी नैसर्गिक रित्या तयार झालेली कमान दिसली ....


                   
                थोडं पुढे जातो न जातो तोच  रेशन दुकानासमोरच्या रांगेसारखी गाड्यांची रांग  लागलेली ... आम्ही जवळपास दर दिवशी असच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रस्त्यात अडकत होतो... आत्ताचे कारण होते , पुढच्या ट्रक मध्ये झालेला बिघाड ...! तो ट्रक इतर लोकांनी धक्का मारून बाजूला केला ... आम्ही पुन्हा सुसाट निघालो.... वातावरण छान होतं ... रस्ता चांगला होता .... गाड्यांचा वेगही बऱ्यापैकी  होता .... आणि एका वळणानंतर  अचानक ... , समोर एक मोठी बर्फाची राशी भर रस्त्यात पडलेली आहे असं दिसलं ... संदीप ने बहुदा अचानक पुढचा ब्रेक लावला ... काही कळायच्या आत गाडी अनकंट्रोल झाली , आणि सर्र्रर्र्रर्र .... धाsss ड....!  --"  आह्ह...!!  माझा पाय ... माझा पाय...sss  " फरपटत जाणाऱ्या  गाडीखाली माझा डावा पाय सापडला होता .... डोक्यावरचं  हेल्मेट एखाद्या फुटबॉल सारखं  टप्पे खात तीनताड लांब उडलं .... डावा खांदा प्रथम दाणकन जमिनीवर आपटला , नंतर घसपटत  गेला .... गॉगल  उडून कुठे पडला , देवाला  ठाउक .... संदीप आणि मी  काही फुट अंतर गाडीसोबत फरपटत गेलो ... कसाबसा उठून संदीप ने क्षणाचाही  विलंब न लावता माझ्या डाव्या पायावर पडलेली गाडी उचलली ...  खोप्याही त्याची गाडी थांबवून आमच्याकडे  पळत आला ... त्याने प्रथम मला रस्त्यातून बाजूला घेतलं . माझा डावा  गुडघा भलताच दुखावला होता ... काही क्षण तर मला वाटलं  कि माझ्या गुडघ्याची वाटी सरकली .... पाय हलवायची मला भीती वाटू लागली... परंतु थोड्या वेळाने धीर करून मी पाय गुडघ्यात वाकवला .... पाय ठीक होता पण दुखत होता ... धन्यवाद त्या नी- गार्ड  चे....!! नाही तर माझा पाय नक्कीच गेला असता ... थोडा वेळ मी तसाच सुन्न होऊन पडलो होतो... घरापासून जवळपास १८०० किमी लांब , असा प्रदेश कि जिथे दूर दूरपर्यंत  माणसं बघायलाही  मिळत नाहीत , अत्यंत प्रतिकूल असा निसर्ग , जर मला इथे काही झालं  तर ....?? हा विचार डोक्यात आला आणि मी ताडकन उठून बसलो ... आधी चालता येतंय का ते बघावं म्हणून मी हळूहळू उभा राहिलो ... दुखावलेल्या गुडघ्यातून बारीक बारीक कळा  येत होत्या ... कुठेही फ्राक्चर वगैरे नव्हतं .... आता जीवात जीव आला ... थोडं पाणी प्यायलो ... बरं वाटलं ... पुन्हा गाड्यांवर टांगा टाकल्या आणि आम्ही पुढे ' पांग ' च्या दिशेत निघालो... पुढचा रस्ता इतका भयानक होता कि विचारू नका ... ! उगाच बाकीच्या गाड्या जातायत म्हणून आम्ही जात होतो . एकतर आधीच आपटल्याने अंग जाम दुखत होतं , त्यात हा खडकाळ रस्ता आणि डोक्यावर तळपता सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यासारखा वाटत होता ... सकाळी कोवळं  वाटणारं  उन आता चांगलंच भाजून काढत होतं ... सगळेच त्या रस्त्याला वैतागले होते पण पांग चा तो रस्ता काही संपत नव्हता ....पांग ने अक्षरशः ' पांग' फेडले    होते . तिथे पोहोचल्यावर एक तंबू वजा हॉटेलात शिरलो ... छोटासा ब्रेक घ्यायचा म्हणून गेलो आणि  सगळे आडवेच  झालो ...


             
पडल्या पडल्या अशी काही गाढ झोप लागली कि विचारू नका...! खोप्याने  उठवलं तेव्हा कुठे आहे तेच कळेना... मग डाव्या गुडघ्यातून कळ  आली तेव्हा पांग मध्ये असल्याचा साक्षात्कार झाला... एखाद्या सासुरवाशीणीला माहेरचं घर सोडताना जसं   वाटेल तसं  काहीसं  आम्हाला पांग चा तो तंबू सोडताना वाटत होतं ... आम्ही  निघालो.. पुढे एक घाट लागला... तसा हा सगळा प्रदेशच घाटाचा...! वर पोहोचलो आणि हे मागे लिहिलेलं  वाक्य खोटं  ठरावं इतका सपाट आणि सरळ रस्ता ...इतका सरळ कि डोळे झाकून गाडी चालवावी ...एकदम मख्खन ...!



                   असं  वाटत होतं  कि असाच रस्ता असावा शेवटपर्यंत.... पण मनासारखं घडेल तर ते लडाख कसलं ...!! ये तो सिर्फ ट्रेलर था ... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त....!!

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ५

                       सुरजताल वरून पुढे बारलाच-ला चा उतार सुरु झाला आणि आमच्या गाड्यांचे अग्निबाण सुसाट सुटले . आम्ही जसे उतरलो तसे वातावरण क्षणात पालटले ...काही वेळापूर्वी आम्ही स्वप्नवत वाटणाऱ्या प्रदेशात होतो आणि आता रखरखीत वाळवंट सुरु झाले .... एखाद्या लहरी लहान मुलाप्रमाणे विधात्याने मनाला येईल तशी इथल्या प्रदेशाची निर्मिती केली आहे . मनात आलं कि टाक बर्फ ... त्याचा कंटाळा आला कि लांबच लांब रखरखीत वाळवंट .... तेही नकोसं  वाटलं  कि हिरवळीचा गालीचा ... मोठमोठ्या डोंगररांगा , आणि त्यांना चिरत जाणाऱ्या अल्लड सर्पिलाकृती नद्या ... काय काय म्हणून वर्णन करावे ...?? भूगर्भशास्त्रीय दृष्ट्याही हा प्रदेश अद्याप बाल्यावस्थेत आहे ... सतत काही न काही घडामोडी घडत असतात, उल्थापालथी होत असतात .... निसर्गशक्ती उग्र ...! आणि त्याहून उग्र माणसाची इच्छाशक्ती ...!!
       
 
 आता मातीचा रस्ता सुरु झाला ... त्यामुळे हळूहळू आणि जपून गाडी चालवत आम्ही निघालो ...  दुपार टळून गेली होती आणि सारचू  अजून २५-३० किमी लांब होतं. केलाँग मधल्या हॉटेल मालकाने सांगितल्याप्रमाणे सारचू पासून पुढे लेह बरेच लांब होते आणि ते एका दिवसात गाठणे केवळ अशक्यच ..! त्यामुळे  सारचूला राहावं लागणार होतं ... आमच्याकडे वेळही तसा बराच होता. बारलाच-ला उतरल्यानंतर सपाट प्रदेश लागला ... रखरखीत , उघड्या बोडक्या डोंगरांनी आता हिरवट रंगाची वस्त्रे परीधान करायला सुरुवात केली होती . सारचू हा उंचच उंच पर्वत रंगांमध्ये बसलेला विस्तीर्ण सपाट पठारी  प्रदेश. नजर जाईल तिथवर  पट्टीने आखल्यासारखा एकदम सरळ रस्ता , डोंगराच्या पायथ्याशी कुठेतरी गडप होताना दिसत होता ...
            


 असा ' सरळमार्गी ' रस्ता आम्ही हिमालयात शिरल्यापासून प्रथमच पाहत होतो... रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवताच्या विविध रंगछटा डोळ्यांना थंडावा आणीत होत्या ... तसं  बघायला गेलं तर सारचू ह्या ठिकाणी लोकवस्ती नाही परंतु केलाँग  ते लेह हे अंतर अतिशय जास्त आहे त्यामुळे ह्या सपाट प्रदेशात काही व्यावसायिक लोकांनी पर्यटकांना  राहण्यासाठी तंबूंची सोय केलेली होती . त्यांची रचनाही अतिशय सुंदर दिसत होती ...पांढऱ्या  , पिवळ्या , केशरी तंबूंची रांग ह्या एवढ्या विशाल प्रदेशात मुंग्यांच्या रांगेसारखी  दिसत होती  ... रस्ता अगदी सरळ असल्याने पप्याने त्याच्या चालत्या गाडीवरच्या कसरती सुरु केल्या . हात-बित  सोडून गाडीवर उभा राहून तो गाडी चालवू लागला... पप्याला आम्ही नाव ठेवलं -- गरीबांचा  जॉन अब्राहम ...!



         खोप्याला मधेच एक ग्रुप फोटो काढण्याची हुक्की आली . आम्हाला मुख्य रस्त्यापासून दूर  लांबच लांब सपाट मैदानात तो घेऊन गेला .तिथे अगदी जमिनीवर झोपून वगैरे त्याने angle सेट केला ... खोप्याने  कॅमेरा इतका लांब ठेवला होता , कि टायमर लावून परत पळत पळत येत असतानाच फोटो निघाला ...त्यात आम्ही सर्व ठिपक्यांप्रमाणे दिसत होतो ... आणि खोप्या, पाठमोरा ठिपका ...!! तो फोटो पाहून नंतर आम्ही खोप्याच्या फोटोग्राफीची स्तुती करत भरपूर हसून घेतलं .... पुढे आम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं  भूरूप पाहायला  मिळालं. ते कशाचे बनले असेल... , कधी तयार झालं असेल... , कसं  तयार झालं  असेल... ह्याचा विचार करण्याऐवजी  आम्ही मंत्रमुग्ध होऊन निसर्गाचे हे फाईन आर्टचे मोडेल डोळे भरून पाहत होतो ... खरंच ,  निसर्गासारखा दुसरा आर्टीस्ट कोणीच नाही !! एखादा जादुगार आपल्या टोपीतून जसे कधी कबुतर तर कधी फुले अशा आश्चर्यकारक वस्तू काढतो तसा हा निसर्ग आमच्या पुढे कल्पनातीत दृश्यांची मालिकाच सदर करत होता ... आणि आम्हीही  जादूचे प्रयोग पहिल्यासारखे ती समोरची दृश्ये पाहून आश्चर्य चकित होत होतो ...



 सूर्य पश्चिमेकडे पूर्णपणे झुकला होता. आता आम्हाला निवाऱ्याची  सोय करणे गरजेचे होते ... आमच्यात फक्त खोप्याच असा होता कि त्याने लडाखचा सर्व गृहपाठ व्यवस्थित केला होता ... त्याला एक रेस्टोरंटचे नाव माहित होते - माउंटन व्हयू ! आम्ही ते शोधत निघालो. नशिबाने ते सापडले ... त्याचा मालक - ' सेंगे 'अगदीच नम्र , मवाळ आणि दिलदार माणूस ...! तो मूळचा नेपाळचा ... पण वर्षातले  उन्हाळ्याचे ३-४ महिने तो इथे असतो ... त्याने आम्हाला एक गोलाकार तंबू राहायला दिला ... तंबू म्हणजे एक प्रकारचा शामियानच होता ... आत ५-६ खाटा  होत्या आणि त्यावर गाद्या टाकल्या होत्या ... आम्हाला अचानक आम्ही कोणीतरी नवाब वगैरे असल्यासारखे वाटू लागले ...



              सूर्य आता   डोंगराआड  गेला होता तरी त्याने  आपली छाप  आमच्या मागच्या डोंगरावर सोडली होती ... लोहाराच्या भात्यातल्या लोखंडासारखं ते शिखर तापून लालबुंद झालंय कि काय असं  वाटत होतं ...
सूर्याने निरोप घेतला तशी  कुठेतरी  खोल दरीत इतका वेळ लपून बसलेली थंडी आमच्या अंगावर धावून आली ... ह्या प्रदेशात कसलीच अडकाठी नसल्याने वारा अगदी पिसाळल्यासारखा वाहत होता ... आता त्या दोघांची युती झाली होती ... ती थंडी मात्र मला काही सहन होईना ... अगदी आत , हाडांपर्यंत थंडी शिरलीय असं  मला वाटलं  ... मी मधूनच आतून थरथरत होतो ...



 सेंगे ने जेवण लवकरच बनवलं ...फुलके , बटाट्याची भाजी , भात ...  ते स्टोव्ह वरून आमच्या ताटात पडेपर्यंत कोमट  झालं... त्याने जेवण तर छानच बनवलं होतं , पण मला ते काही जाईना ... कसंबसं ते  ga^saबत्ती लाईट डिनर  उरकून आम्ही आमच्या शामियान्यात परत आलो ... थोडा वेळ पडलो असेल , पण मला अगदीच अस्वस्थ वाटायला लागलं. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती , पण माझ्यापेक्षा तरी बरीच म्हणायची ...! इतके दिवस ज्या  हाय अल्टीट्युड सिकनेसची मी खिल्ली उडवत होतो , तो किती भयानक आहे याचा प्रत्यय मला त्या रात्री आला ... श्वास ओढावा लागत होता ... जड डोकं ... जनरली  तळपायाची ' आग 'मस्तकात  जाते , इथे माझ्या  तळपायाची ' थंडी ' मस्तकापर्यंत  गेली होती .... आठवलं कि अजून काटा  येतो अंगावर ...! बाहेर वारा तर कुणाशी तरी धावण्याची स्पर्धा लावल्यासारखा पळत होता ... त्यामुळे सबंध तंबुच धरणीकंप झाल्यासारखा थरथरत होता ...त्याचा तो सुं ss  सुं sss आवाज  हिंदी हॉरर फिल्म मधल्या वाऱ्यासारखा येत होता ....त्या रात्री जरासुद्धा झोप लागली नाही ... सगळी रात्र मी थंडीने कुडकुडत काढली ... कधी एकदाची ती सकाळ होतेय असं  वाटत होतं ... सूर्याला देव का म्हणतात ते मला त्या रात्री कळलं ...
        

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण .... भाग - ४

                          दरवाज्यावरच्या बेल ने मला जाग आली ... पप्या आणि संदीप अजगरासारखे पडले होते . त्यांच्यावर त्या  सतत वाजणाऱ्या बेल चा काही परिणाम झाला नाही....  ' कोण तडमडायला आलंय ?'  असा विचार करून मीच  दार उघडलं  तर समोर खोप्या ...!! हातात कॅमेऱ्याचं नळकांड घेऊन ...
-- " अरे बाहेर बघ ते समोरचे डोंगर कसले भारी  दिसतायत .... "  तो हे बोलत असताना थंड हवेचा एक झोत आत आला .. मला एकदम शीरशिरीच भरली ...
-- " हो का.....?? " म्हणून कुडकुडत मी समोर पहिलं  पण डोळ्यांवरच्या झोपेमुळे असेल किंवा डोक्यावरच्या माकड टोपीमुळे असेल मला ते निट दिसलेच नाहीत....
ह्या खोप्याचं  आणि पियूचं  तर मला राहून राहून आश्चर्य  वाटत होतं ... काल संध्याकाळी सुद्धा आमच्या तिघांचेही  टांगे पलटी  झाले होते , तिथे ह्या दोघांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता.... मला त्यांच्या ह्या उत्साहाचा हेवा वाटला .... सकाळचे 7 वाजले होते ... तब्बल 13 तासांच्या झोपेनंतर आम्ही इहलोकात परत आलो होतो ... मी नीट  बघितलं  तर सूर्याच्या किरणांमुळे समोरच्या  पर्वताचे शिखर  उजळून निघाले होते... फारच मनोहारी दृश्य होतं  ते...! असं  वाटत होतं  कि समोरच्या पर्वताला कुणीतरी रुपेरी  मुकुट घातलाय ...


             
                  आम्ही सकाळच्या 8 वाजेपर्यंत तयार होऊन समोरच्या हॉटेलात  नाष्टा  करायला गेलो .... ऑम्लेट , चहा आणि मोमोज ... हे मोमोज म्हणजे आपल्याकडच्या  उकडीचे मोदका सारखा प्रकार ...पण त्यात मिक्स भाजी असते ... चवीला अतिशय सुंदर ... आमच्या हॉटेलचा मालक  पॉंल म्हणजे एकदम भारी माणूस होता ...बोलायला इतका मवाळ कि काही बोलू नका .... त्याच्या होटेलचं  नाव होतं .... यार्कीड . त्याला ह्या नावाचा अर्थ विचारला तर म्हणाला , " प्रसिध्द सहलीचे ठिकाण "... खरंच , हॉटेल लहान होतं  पण छान होतं. आटोपशीर खोल्या , सुंदर रंगसंगती ,लाकडी खिडक्या आणि त्याला शोभून दिसतील असे रंगीबेरंगी  पडदे ... एकदम प्रसन्न  वाटत होतं ....

                         
                               नाष्टा  वगैरे झाला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो ... पुढचा रस्ता अगदीच मक्खन होता ... सुसाट वेगात आम्ही अंतर कापायला सुरुवात केली ... मी संदीपच्या गाडीवर मागे बसलो होतो ...मला मात्र  वळण आल कि  भीती वाटत होती ... एखादं वळण  आलं  कि संदीप गाडी अशी काही झुकवी  कि मागे बसणाऱ्या माझी चांगलीच तंतरत असे... पण संदीप , खोप्या , पप्या म्हणजे पट्टीचे रायडर ... कोणत्याही प्रकारचा रस्ता असू देत , किंवा नसू देत , तिघेही व्यवस्थित गाडी चालवत ..... त्यांच्यात मी म्हणजे अगदीच कच्चा लिंबू ...!  अगदीच कोणाला गरज लागली तर मी गाडी चालवणार होतो ....मध्ये थोडा वेळ तशी मी गाडी चालवलीही होती....  मागे बसल्याने मला विशेष असं  काही काम नव्हतं ... क्रिकेट मध्ये 12 व्या खेळाडूला  असतं ना तसं ....!!  त्यामुळे एखादा चांगला सीन आला कि फोटो काढणे ...,  पाण्याची बाटली सांभाळणे ...,  handicam  ने शुटिंग  करणे ..., असली कामे माझ्याकडे  होती .... आम्ही काही अंतर पार करून पुढे जीस्पा च्या दिशेने निघालो . मध्ये एक मोठी हिमनदी पलीकडच्या डोंगरावर दिसत होती .तिचे नाव होते  ' लेडी ऑफ केलाँग ...!' पर्वत शिखरापासून ते पायथ्यापर्यंत सिंहकटीलाही लाजवील अशी कमनीय  ' लेडी ऑफ केलाँग ' काळ्याकभिन्न पर्वताच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होती . जिस्पाला  पोहोचेपर्यंत दुपार झाली , तेव्हा काहीतरी खाऊन  पुढे जावं म्हणून तिथे असलेल्या एका हॉटेलकडे गाड्या वळवल्या . पुन्हा तेच ... ऑम्लेट , चहा , ब्रेड बटर ...!!  ते खाऊन  आम्ही हॉटेलच्या मागच्या भागात गेलो . मागे एक उंच  ' काळापहाड '  हाताची घडी घालून गंभीरपणे  उभा  होता.  एक  सुंदर झरा आपल्याच धुंदीत खळाळत  चालला होता. दुपार झाली होती तरी उन कोवळ  होत. त्या कोवळ्या उन्हामुळे झऱ्याचं नितळ  पाणी चमचमत होतं ....हिरव्यागार गवताचा गालीचा पसरलेला... मग आम्ही आमचे फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेतली... त्या समोरच्या काळा  पहाडाकडे बघून खोप्या म्हणाला ," किती विशाल पर्वत आहे नाही हा .....??"  मी वरपर्यंत बघितल , " हो रे ... , हा असाच आपल्या अंगावर पडला तर ...?? " माझ्या ह्या वाक्यावर खोप्याने असं काही तोंड केलं कि विचारू नका ...समोरचा एक पर्वत त्याची ' हर फिक्र धूंए में ' उडवत असलेला दिसत होता ...


                       
                          तिथून  निघायच्या तयारीत असताना आम्हाला एक मराठी कुटुंब भेटलं ....डोंबिवलीचं ...  इतक्या लांबच्या  प्रदेशात मराठी माणूस भेटणं म्हणजे मुंबईत रिकामा प्लॉट मिळण्यासारखं आहे ...! त्यांनी आमची चौकशी वगैरे केली , चौकशीपेक्षा ते आश्चर्याच जास्त व्यक्त करत होते ... जणूकाही आम्ही  चंद्रावरूनच आलोत असे ते आमच्याकडे बघत होते . आमच्यात एक मुलगीही आहे हे पाहून तर ते आणखी थक्क झाले . ते कुटुंबही पुढे सारचू कडे जाणार होते ... त्यांचा निरोप घेऊन आम्ही  निघालो ... पुढे एक मोठ्ठा पाण्याचा ओहोळ रस्याला आडवा जात होता ... तो बघून तर संदीपने एक मोठ्या विभक्तीची शिवीच हासडली , कारण वर बर्फाचे मोठे मोठे ढिगारे होते आणि त्यातून लपत-छपत  हा  वितळणाऱ्या पाण्याचा भला मोठा ओहोळ आमच्या मार्गात आडवा  आला होता ... आधीच ती जड बुलेट ,  त्यावर वजनदार समान , खोल ओहोळ , त्याचं धमन्या गोठवणारं थंड पाणी - कितीही प्रयत्न केला तरी पाण्यात पाय ठेवावाच लागणार होता ...मी खाली उतरलो आणि ओहोळाच्या मध्ये एक मोठा दगड होता त्यावर पाय ठेऊन पलीकडे उडी मारली तरीही माझा एक पाय पाण्यात पडला .थंड पाणी बुटामध्ये शिरल्यावर शिरशिरीच भरली . पप्याने मात्र सराईत पणे  तंगड्या वर करून गाडी सुसाट  पाण्यात घातली आणि एक थेंबही अंगावर न घेता पलीकडे आला सुद्धा ...! त्याच्या मागे संदीप होता . त्याला आधीच पाणी आणि चिखलाची allergy !!  त्याने गाडी पाण्यात घातली पण मध्ये आल्यावर समतोल साधता न आल्याने पाय पाण्यात ठेवावेच लागले ... त्याच्या दोन्ही बुटांमध्ये बर्फाच थंडगार पाणी शिरलं .बाहेर येऊन पुन्हा विभक्ती वाल्या शिव्या देत त्याने  बुटांमधलं पाणी काढलं ... खोप्याने गाडी व्यवस्थित पाण्यातून काढली . त्याने जरी पाण्यातून व्यवस्थित गाडी काढली असली तरी हा तुफानी फोटो मात्र मी काढला आहे .....



... पुढे निघालो तर डांबरी रस्ता संपून आता पांढऱ्या  मातीचा रखरखीत  रस्ता सुरु झाला अन  आम्ही सगळे धुमकेतू झालो,  धुराळ्याची शेपटी मिरवीत आमच्या गाड्या सुसाट सुटल्या  ...
                            बारलाच- ला ही  खिंड आता आमच्यात  आणि सारचू मध्ये होती ... तिथे आम्ही पुन्हा एकदा बर्फाळ रस्त्यांवरून जाणार होतो . वळणा वळणांचा रस्ता सुरु होण्यापूर्वी आम्ही एका छोट्याश्या धाब्यावर maggi खाल्ली ...तिथे आम्हाला आणखी एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला ... तिथल्या कावळ्यांना पिवळ्या रंगाचे  पाय आणि लाल रंगाची चोच होती ....कावळ्या सारख्या कुरूप पक्षालादेखील त्यामुळे सौंदर्य प्राप्त झाले होते . हि सगळी जादू इथल्या निसर्गाची ....!! जिथे पाहावं  तिथे  रंगांची  उधळण करताना निसर्गाने अजिबात हात आखडता घेतला नव्हता ....निर्मिकाने अगदी फुरसतीने इथल्या साऱ्याच  प्रदेशाची रंगसंगती अगदी योग्य साधली होती . हा प्रदेशाच इतका फसवा  आहे की  अगदी पहिल्यांदा कॅमेरा धरणाऱ्यालाही  आपण जणूकाही प्रोफेशनल फोटोग्राफर आहोत कि काय असा भ्रम व्हावा इतके सुंदर फोटो येतात . कुठेही कॅमेरा फिरवा , क्लिक करा , फोटो अप्रतिम येणारच....!!! त्यामुळे मी काढलेले फोटो ' कडक ' का आले हे सुज्ञांस सांगणे नलगे ....!




         
                 पुढे बारलाच- ला चे चढण सुरु झाले . जसजसे वर जाऊ तसतसे मग बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र राशी दिसू लागल्या ...नागमोडी  डांबरी रस्ता , बर्फाच्या पांढऱ्या ताशीव भिंती , वर आकाशाची निळी नितळाई ....अहाहा ...!!  काय सांगू ?? विचार केला तरी अजून अंगावर काटा  येतो . असा  रस्ता साक्षात मृत्यूकडे जाणारा असेल तरी 'जाणारा' अगदी आनंदात जाईल .... आम्ही  वरपर्यंत आलो आणि आमच्या डोळ्यांचं पारणंच फिटलं .... समोर निळंशार हिमानी सरोवर दोन पर्वत शिखरांच्या कुशीत बसलेलं होतं - सूरजताल ...सभोवतालचं वातावरण तर इतकं  भारावलेलं , मंतरलेलं कि आम्हाला त्यावेळी काय बोलावं तेच कळत नव्हतं . स्वर्गात आणखी वेगळं  असं  काय असणार ...???  त्यात दुधावरच्या सायीसारखे हिमनग सुरजताल मध्ये तरंगत होते . ते दृश्य केवळ अद्भूतच..., divine....!! जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर तो केवळ सुरजताल ...!






   आम्ही गाड्यांवरून खाली उतरलो ... समोरचं  दैवी दृश्य मंत्रमुग्ध करणारं  होतं ... डोळ्यांत ते साठवून घेत असताना अचानक श्वास जड वाटू लागला , पाय भरून आले , दम लागू लागला ,... हाय अल्टीट्युड सिकनेस म्हणजे काय ते मला तिथे कळलं ... आम्ही लगेच तिथून निघण्याचा निर्णय घेतला ... निघावस वाटत तर नव्हतंच ,  जास्त वेळ ह्या स्वर्गात थांबलो असतो तर खरंच ' स्वर्गात ' जायची वेळ आली असती ... पण काहीही म्हणा , सूरजताल ..... साला , सू  डीव्हाईन छे ....!!!


बुधवार, २५ जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - 3


                 वेळ सकाळची 6 वाजताची ...  मनालीतल्या हॉटेलखाली  गाड्यांवर सामानाची बांधाबांध चालू होती ... ह्या प्रवासातील सगळ्यात कंटाळवाण  काम म्हणजे  सामान  गाड्यांवर  बांधणे ... विंचवाचं  बिऱ्हाड , दुसरं  काय  ...!! त्यातल्या त्यात पप्याच्या गाडीवरची bag  बांधणे  म्हणजे  महाकठीण ....! त्याची भली मोठी bag मागील सीट  वर दोरीने  आडवी बांधावी लागे .... त्याला बराच वेळ जात असे ... इतर bags कॅरियर वर ठेऊन इलास्टीकची जाळी ओढून  हुकांमध्ये अडकवली कि काम भागत असे ... शेवटी निघण्यासाठी गाड्या तयार झाल्या .
                 इतके दिवस चाललेली net  practice  आज संपणार होती ... आता खरी match सुरु होणार होती .... निसर्गाच्या  गुगल्या ,  बाउंसर आणि यॉर्कर विरुद्ध आम्हाला आमच्या विकेट्स टिकवून ठेवायच्या होत्या ... थोड्या वेळातच आता निसर्गाचा power play  सुरु होणार होता ... तो किती काळ चालेल  हे फक्त त्याच्याच हातात होतं . त्या power play  मध्ये सांभाळून खेळणं एवढंच  आमच्या हातात होतं ....  आम्ही रोहतांग च्या दिशेने निघालो ...


                   सकाळी निघताना एक बायकर्स चा ग्रुप आमच्या पुढे जाताना दिसला . त्यात काही फिरंगीही  होते .  त्यांनी आम्हाला ' All  The  Best  ' अशा अर्थाचे थंब  दाखवले ... आम्हीही त्यांना तशाच प्रकारचा प्रतिसाद दिला . वळणा वळणांचा चढ  सुरु झाला . रस्ता मात्र चांगला होता पण,  रुंदीला कमी . वळणांमागून वळणं  घेत जात असतांना एक चार चाकी गाडी रस्त्यावर शिर्षासन करून उभी असलेली दिसली . बहुतेक वरच्या रस्त्यावरून ती थेट खाली आलेली असावी .  पुढे रस्त्यात एक मेंढ्यांचा  मोठ्ठा कळप लागला.



                  सकाळचं  कोवळं  उन पडलं  होतं ... सूर्य देव सहस्त्र  किरणांनी  आशिर्वाद  देत होता .   रस्ता मस्त होता ... काही अंतर गेल्यावर काही बायकर्स लोक रस्त्यात ऊन खात बसलेले आम्हाला दिसले . त्यांनीही आम्हाला all the best  चा थंब दाखवला ... एकूणच खडतर प्रवासातला एक अनामिक बंधुभाव सर्वजण एकमेकांना दाखवत होते .... जसजसा रस्ता चढत आम्ही वर जात होतो तसतसे हिमाच्छादित शिखरे नजरेस पडत होती ... काही शिखरांनी  बर्फाच्या पांढऱ्या गांधी टोप्या घातल्या होत्या ..., काही शिखरांनी  बर्फाची श्वेतवर्णी शाल पांघरली होती ... , तर काहींनी  गझनी पिक्चरच्या  आमिर खान सारखी काळ्या करड्या दगड मातीत बर्फाच्या पांढऱ्या  रेघोट्यांची  हेअर स्टाईल केल्यासारखी वाटत होती. आम्ही बरेच वरपर्यंत आलो होतो ... आता बोचरी  थंडी सुरु झाली . मध्ये एक लहानसा तलाव लागला आणि त्याबाजूला एक हॉटेलही होते.



             सकाळी काहीही न खाता निघालो होतो तेव्हा हॉटेल बघितलं  कि आपोआप गाड्या तिकडे वळल्या ... तिथलं  गरमागरम ऑंम्लेट आणि चहा हे पंचपक्वानांहून गोड लागत होतं ... (  पंचपक्वानांमध्ये  नक्की कोणत्या  डिशेस  मोडतात  ह्याचा उलघडा मला अजून पर्यंत झाला नाही. )  शेजारचा निळाशार तलाव सुंदरच होता . पाणी इतकं थंड कि 2-3 सेकंदाहून जास्त वेळ पाण्यात हात बुडवू शकत नाही ... पोटपूजा झाली आणि आम्ही परत गाड्यांवर टांग टाकली . रस्त्यावरून जात असतांना आजूबाजूला काही पांढरे खडक दिसले.  त्यावर धूळ साचलेली होती ... पण काही वेळाने लक्षात आले कि हे पांढरे खडक नसून बर्फाचे ढिगारे  आहेत  ... आणि ते  वितळून त्यातून पाणी ठिबकत होतं ... खरा खुरा रस्त्यावर पडलेला बर्फ मी प्रथमच पहात होतो... इतर वेळी मी तो फक्त गोलेवाल्याच्या गाडीवरच पहिला होता. आम्ही सगळी वळणे घेऊन अगदी वरपर्यंत पोहोचलो...
( रस्ता मोकळा करताना , B R O  चे जवान )


वर चढून गेल्यावर राणी नाल्यापाशी आम्हाला बऱ्याच  गाड्या रांगेने उभ्या असलेल्या दिसल्या... आमच्या match  च्या पहिल्या ओवर मधेच निसर्गाने गुगली टाकली ...पुढचा रस्ता दरड कोसळल्याने बंद होता आणि तो मोकळा करण्याचे काम सुरु होते ... वर चढत असतानाच संदीपला दम लागल्यासारखं वाटू लागलं ...पहिली विकेट ....!!  हाय अल्टीटुड  सिकनेस ने आपलं  काम सुरु केलं .... त्यावरची गोळी घेऊन तो थोडा वेळ पडून राहिला . इकडे रस्ता मोकळा करण्याचे काम जोरात सुरु होते . बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ( B R O ) चे जवान J C B  च्या सहाय्याने रस्ता मोकळा करत होते. त्यात 1 तास गेला. रस्ता मोकळा झाला आणि आम्ही राहतांगच्या दिशेने निघालो .
( बर्फाची भिंत ....)
 
  रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र भिंती ..., त्यातून झिरपून रस्यावर येणारं चमचमणारं  पाणी ...., वर निळेशार आकाश ....,  एखाद्या वेगळ्याच प्रदेशात आल्यासारखं  वाटत होतं ... स्वर्गात आणखी वेगळं  काय असेल ....?? शेवटी एका ठिकाणी गाड्या लावल्या आणि सरळ बर्फात शिरलो . आम्ही सगळेच वेडे झालो होतो ... कोणी जोरात ओरडत होते ... कुणी निसरड्या बर्फावरून घसरत  होते ... बर्फाचे गोळे करून एकमेकांना मारत होतो ... फुल टू  धमाल केली बर्फात .... 
( मी , पप्या  आणि  पियू बर्फात धमाल करताना ... )




     त्यानंतर पुढे निघालो ... मंगळवार असल्याने तो रस्ता डागडुजीसाठी काही वेळ बंद असतो . पुढे आणखी एक व्यत्यय आला ... रस्त्यावर पडलेली दरड बाजूला काढण्याचे काम चालू होते ... त्यामुळे रस्त्यावर चिखलच चिखल झाला होता ... त्यातून ती वजनदार  गाडी काढणे म्हणजे सर्कशीत दोरीवरून गाडी चालवण्या सारखं  आहे.... जरा टायर  घसरला कि गाडी स्लीप व्हायची ... खाली चिखलाचा राडा झालेला ....कसेतरी तिथून निघालो ...  रोहतांग उतरल्यावर  एका ठिकाणी चहा घेऊन पुढे निघालो .आता बऱ्यापैकी  सपाट प्रदेश सुरु झाला . त्यामुळे पप्याची गाडी मी घेतली . थोडं अंतर जातो न जातो तोच दुसरी विकेट पडली ... पप्या ..!!
 इतका खडतर रोहतांग पास त्याने पार केला , आणि आता साध्या  रस्त्यावर त्याला चक्कर यायला लागली ... हे म्हणजे अवघड अवघड गोलंदाजी खेळून काढावी  आणि साध्या  fulltoss बॉल वर क्लीनबोल्ड व्हावं असं  झालं ....एक वेळ तर अशी आली कि तो संदीपच्या गाडीवर मागे बसूही शकत नव्हता . आम्ही एका घराजवळ गाड्या थांबवल्या . खोप्या आणि संदीप मदतीसाठी त्या घरात विचारायला गेले . आमच्या सुदैवाने घरमालक चांगला निघाला ... त्याने आम्हाला त्याच्या घरातली एक खोली उघडून दिली ... आणि आराम करायला सांगितलं ... आमच्यासाठी  बिस्किटे आणि चहा बनवला ... त्याबद्दल त्याने आमच्याकडून काहीही घेतलं  नाही ... उलट आम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या ... ' जगात अजून चांगली माणसे  आहेत म्हणून हे जग चालू आहे ' याचा प्रत्यय आला ... आम्ही आज सारचू पर्यंत जाणार होतो परंतु आजच्या आलेल्या अडचणींमुळे आम्हाला केलाँग पर्यंतच जाता येणार होतं . रस्त्यात मध्ये एका पेट्रोल पंप  वर थांबलो ... हाच तो सुप्रसिध्द तांडी चा पेट्रोल पंप ज्यानंतर 365 किमी पुढे पेट्रोल पंप नाही ... " ह्याचसाठी केला होता अट्टहास ..." सारखं  , " ह्याचसाठी आणले होते पेट्रोल कॅन.... " असंच म्हणावं  लागेल .



  आम्ही गाडीच्या टाक्या फुल करून घेतल्या ... आणि आमच्या बरोबर आणलेले पेट्रोलचे कॅनही  भरून घेतले ... पुढे केलाँगला जाईपर्यंत आमच्या सगळ्यांच्या अंगातली शक्ती निघून गेली होती ... मलाही कणकणी  आल्यासारखी वाटत होती ...संध्याकाळी 6 च्या सुमारास आम्ही केलाँग ला पोहोचलो ... थोडंसं खाल्लं ... आणि  हॉटेल मध्ये जाऊन पडलो .... मेल्यासारखे ...!!!