बुधवार, २५ जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - 3


                 वेळ सकाळची 6 वाजताची ...  मनालीतल्या हॉटेलखाली  गाड्यांवर सामानाची बांधाबांध चालू होती ... ह्या प्रवासातील सगळ्यात कंटाळवाण  काम म्हणजे  सामान  गाड्यांवर  बांधणे ... विंचवाचं  बिऱ्हाड , दुसरं  काय  ...!! त्यातल्या त्यात पप्याच्या गाडीवरची bag  बांधणे  म्हणजे  महाकठीण ....! त्याची भली मोठी bag मागील सीट  वर दोरीने  आडवी बांधावी लागे .... त्याला बराच वेळ जात असे ... इतर bags कॅरियर वर ठेऊन इलास्टीकची जाळी ओढून  हुकांमध्ये अडकवली कि काम भागत असे ... शेवटी निघण्यासाठी गाड्या तयार झाल्या .
                 इतके दिवस चाललेली net  practice  आज संपणार होती ... आता खरी match सुरु होणार होती .... निसर्गाच्या  गुगल्या ,  बाउंसर आणि यॉर्कर विरुद्ध आम्हाला आमच्या विकेट्स टिकवून ठेवायच्या होत्या ... थोड्या वेळातच आता निसर्गाचा power play  सुरु होणार होता ... तो किती काळ चालेल  हे फक्त त्याच्याच हातात होतं . त्या power play  मध्ये सांभाळून खेळणं एवढंच  आमच्या हातात होतं ....  आम्ही रोहतांग च्या दिशेने निघालो ...


                   सकाळी निघताना एक बायकर्स चा ग्रुप आमच्या पुढे जाताना दिसला . त्यात काही फिरंगीही  होते .  त्यांनी आम्हाला ' All  The  Best  ' अशा अर्थाचे थंब  दाखवले ... आम्हीही त्यांना तशाच प्रकारचा प्रतिसाद दिला . वळणा वळणांचा चढ  सुरु झाला . रस्ता मात्र चांगला होता पण,  रुंदीला कमी . वळणांमागून वळणं  घेत जात असतांना एक चार चाकी गाडी रस्त्यावर शिर्षासन करून उभी असलेली दिसली . बहुतेक वरच्या रस्त्यावरून ती थेट खाली आलेली असावी .  पुढे रस्त्यात एक मेंढ्यांचा  मोठ्ठा कळप लागला.



                  सकाळचं  कोवळं  उन पडलं  होतं ... सूर्य देव सहस्त्र  किरणांनी  आशिर्वाद  देत होता .   रस्ता मस्त होता ... काही अंतर गेल्यावर काही बायकर्स लोक रस्त्यात ऊन खात बसलेले आम्हाला दिसले . त्यांनीही आम्हाला all the best  चा थंब दाखवला ... एकूणच खडतर प्रवासातला एक अनामिक बंधुभाव सर्वजण एकमेकांना दाखवत होते .... जसजसा रस्ता चढत आम्ही वर जात होतो तसतसे हिमाच्छादित शिखरे नजरेस पडत होती ... काही शिखरांनी  बर्फाच्या पांढऱ्या गांधी टोप्या घातल्या होत्या ..., काही शिखरांनी  बर्फाची श्वेतवर्णी शाल पांघरली होती ... , तर काहींनी  गझनी पिक्चरच्या  आमिर खान सारखी काळ्या करड्या दगड मातीत बर्फाच्या पांढऱ्या  रेघोट्यांची  हेअर स्टाईल केल्यासारखी वाटत होती. आम्ही बरेच वरपर्यंत आलो होतो ... आता बोचरी  थंडी सुरु झाली . मध्ये एक लहानसा तलाव लागला आणि त्याबाजूला एक हॉटेलही होते.



             सकाळी काहीही न खाता निघालो होतो तेव्हा हॉटेल बघितलं  कि आपोआप गाड्या तिकडे वळल्या ... तिथलं  गरमागरम ऑंम्लेट आणि चहा हे पंचपक्वानांहून गोड लागत होतं ... (  पंचपक्वानांमध्ये  नक्की कोणत्या  डिशेस  मोडतात  ह्याचा उलघडा मला अजून पर्यंत झाला नाही. )  शेजारचा निळाशार तलाव सुंदरच होता . पाणी इतकं थंड कि 2-3 सेकंदाहून जास्त वेळ पाण्यात हात बुडवू शकत नाही ... पोटपूजा झाली आणि आम्ही परत गाड्यांवर टांग टाकली . रस्त्यावरून जात असतांना आजूबाजूला काही पांढरे खडक दिसले.  त्यावर धूळ साचलेली होती ... पण काही वेळाने लक्षात आले कि हे पांढरे खडक नसून बर्फाचे ढिगारे  आहेत  ... आणि ते  वितळून त्यातून पाणी ठिबकत होतं ... खरा खुरा रस्त्यावर पडलेला बर्फ मी प्रथमच पहात होतो... इतर वेळी मी तो फक्त गोलेवाल्याच्या गाडीवरच पहिला होता. आम्ही सगळी वळणे घेऊन अगदी वरपर्यंत पोहोचलो...
( रस्ता मोकळा करताना , B R O  चे जवान )


वर चढून गेल्यावर राणी नाल्यापाशी आम्हाला बऱ्याच  गाड्या रांगेने उभ्या असलेल्या दिसल्या... आमच्या match  च्या पहिल्या ओवर मधेच निसर्गाने गुगली टाकली ...पुढचा रस्ता दरड कोसळल्याने बंद होता आणि तो मोकळा करण्याचे काम सुरु होते ... वर चढत असतानाच संदीपला दम लागल्यासारखं वाटू लागलं ...पहिली विकेट ....!!  हाय अल्टीटुड  सिकनेस ने आपलं  काम सुरु केलं .... त्यावरची गोळी घेऊन तो थोडा वेळ पडून राहिला . इकडे रस्ता मोकळा करण्याचे काम जोरात सुरु होते . बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ( B R O ) चे जवान J C B  च्या सहाय्याने रस्ता मोकळा करत होते. त्यात 1 तास गेला. रस्ता मोकळा झाला आणि आम्ही राहतांगच्या दिशेने निघालो .
( बर्फाची भिंत ....)
 
  रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र भिंती ..., त्यातून झिरपून रस्यावर येणारं चमचमणारं  पाणी ...., वर निळेशार आकाश ....,  एखाद्या वेगळ्याच प्रदेशात आल्यासारखं  वाटत होतं ... स्वर्गात आणखी वेगळं  काय असेल ....?? शेवटी एका ठिकाणी गाड्या लावल्या आणि सरळ बर्फात शिरलो . आम्ही सगळेच वेडे झालो होतो ... कोणी जोरात ओरडत होते ... कुणी निसरड्या बर्फावरून घसरत  होते ... बर्फाचे गोळे करून एकमेकांना मारत होतो ... फुल टू  धमाल केली बर्फात .... 
( मी , पप्या  आणि  पियू बर्फात धमाल करताना ... )




     त्यानंतर पुढे निघालो ... मंगळवार असल्याने तो रस्ता डागडुजीसाठी काही वेळ बंद असतो . पुढे आणखी एक व्यत्यय आला ... रस्त्यावर पडलेली दरड बाजूला काढण्याचे काम चालू होते ... त्यामुळे रस्त्यावर चिखलच चिखल झाला होता ... त्यातून ती वजनदार  गाडी काढणे म्हणजे सर्कशीत दोरीवरून गाडी चालवण्या सारखं  आहे.... जरा टायर  घसरला कि गाडी स्लीप व्हायची ... खाली चिखलाचा राडा झालेला ....कसेतरी तिथून निघालो ...  रोहतांग उतरल्यावर  एका ठिकाणी चहा घेऊन पुढे निघालो .आता बऱ्यापैकी  सपाट प्रदेश सुरु झाला . त्यामुळे पप्याची गाडी मी घेतली . थोडं अंतर जातो न जातो तोच दुसरी विकेट पडली ... पप्या ..!!
 इतका खडतर रोहतांग पास त्याने पार केला , आणि आता साध्या  रस्त्यावर त्याला चक्कर यायला लागली ... हे म्हणजे अवघड अवघड गोलंदाजी खेळून काढावी  आणि साध्या  fulltoss बॉल वर क्लीनबोल्ड व्हावं असं  झालं ....एक वेळ तर अशी आली कि तो संदीपच्या गाडीवर मागे बसूही शकत नव्हता . आम्ही एका घराजवळ गाड्या थांबवल्या . खोप्या आणि संदीप मदतीसाठी त्या घरात विचारायला गेले . आमच्या सुदैवाने घरमालक चांगला निघाला ... त्याने आम्हाला त्याच्या घरातली एक खोली उघडून दिली ... आणि आराम करायला सांगितलं ... आमच्यासाठी  बिस्किटे आणि चहा बनवला ... त्याबद्दल त्याने आमच्याकडून काहीही घेतलं  नाही ... उलट आम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या ... ' जगात अजून चांगली माणसे  आहेत म्हणून हे जग चालू आहे ' याचा प्रत्यय आला ... आम्ही आज सारचू पर्यंत जाणार होतो परंतु आजच्या आलेल्या अडचणींमुळे आम्हाला केलाँग पर्यंतच जाता येणार होतं . रस्त्यात मध्ये एका पेट्रोल पंप  वर थांबलो ... हाच तो सुप्रसिध्द तांडी चा पेट्रोल पंप ज्यानंतर 365 किमी पुढे पेट्रोल पंप नाही ... " ह्याचसाठी केला होता अट्टहास ..." सारखं  , " ह्याचसाठी आणले होते पेट्रोल कॅन.... " असंच म्हणावं  लागेल .



  आम्ही गाडीच्या टाक्या फुल करून घेतल्या ... आणि आमच्या बरोबर आणलेले पेट्रोलचे कॅनही  भरून घेतले ... पुढे केलाँगला जाईपर्यंत आमच्या सगळ्यांच्या अंगातली शक्ती निघून गेली होती ... मलाही कणकणी  आल्यासारखी वाटत होती ...संध्याकाळी 6 च्या सुमारास आम्ही केलाँग ला पोहोचलो ... थोडंसं खाल्लं ... आणि  हॉटेल मध्ये जाऊन पडलो .... मेल्यासारखे ...!!!

1 टिप्पणी:

  1. उत्तम आणि ओघवतं लिखाण .. आणि ' जगात अजून चांगली माणसे आहेत म्हणून हे जग चालू आहे ' हे अगदी खरंय. सुदैवाने(दुर्दैवाने) असे लोक(फ़क्तं) अवघड परिस्थितीतच भेटतात ज्यामुळे त्यांची किंमत कळते ..

    उत्तर द्याहटवा