बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ५

                       सुरजताल वरून पुढे बारलाच-ला चा उतार सुरु झाला आणि आमच्या गाड्यांचे अग्निबाण सुसाट सुटले . आम्ही जसे उतरलो तसे वातावरण क्षणात पालटले ...काही वेळापूर्वी आम्ही स्वप्नवत वाटणाऱ्या प्रदेशात होतो आणि आता रखरखीत वाळवंट सुरु झाले .... एखाद्या लहरी लहान मुलाप्रमाणे विधात्याने मनाला येईल तशी इथल्या प्रदेशाची निर्मिती केली आहे . मनात आलं कि टाक बर्फ ... त्याचा कंटाळा आला कि लांबच लांब रखरखीत वाळवंट .... तेही नकोसं  वाटलं  कि हिरवळीचा गालीचा ... मोठमोठ्या डोंगररांगा , आणि त्यांना चिरत जाणाऱ्या अल्लड सर्पिलाकृती नद्या ... काय काय म्हणून वर्णन करावे ...?? भूगर्भशास्त्रीय दृष्ट्याही हा प्रदेश अद्याप बाल्यावस्थेत आहे ... सतत काही न काही घडामोडी घडत असतात, उल्थापालथी होत असतात .... निसर्गशक्ती उग्र ...! आणि त्याहून उग्र माणसाची इच्छाशक्ती ...!!
       
 
 आता मातीचा रस्ता सुरु झाला ... त्यामुळे हळूहळू आणि जपून गाडी चालवत आम्ही निघालो ...  दुपार टळून गेली होती आणि सारचू  अजून २५-३० किमी लांब होतं. केलाँग मधल्या हॉटेल मालकाने सांगितल्याप्रमाणे सारचू पासून पुढे लेह बरेच लांब होते आणि ते एका दिवसात गाठणे केवळ अशक्यच ..! त्यामुळे  सारचूला राहावं लागणार होतं ... आमच्याकडे वेळही तसा बराच होता. बारलाच-ला उतरल्यानंतर सपाट प्रदेश लागला ... रखरखीत , उघड्या बोडक्या डोंगरांनी आता हिरवट रंगाची वस्त्रे परीधान करायला सुरुवात केली होती . सारचू हा उंचच उंच पर्वत रंगांमध्ये बसलेला विस्तीर्ण सपाट पठारी  प्रदेश. नजर जाईल तिथवर  पट्टीने आखल्यासारखा एकदम सरळ रस्ता , डोंगराच्या पायथ्याशी कुठेतरी गडप होताना दिसत होता ...
            


 असा ' सरळमार्गी ' रस्ता आम्ही हिमालयात शिरल्यापासून प्रथमच पाहत होतो... रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवताच्या विविध रंगछटा डोळ्यांना थंडावा आणीत होत्या ... तसं  बघायला गेलं तर सारचू ह्या ठिकाणी लोकवस्ती नाही परंतु केलाँग  ते लेह हे अंतर अतिशय जास्त आहे त्यामुळे ह्या सपाट प्रदेशात काही व्यावसायिक लोकांनी पर्यटकांना  राहण्यासाठी तंबूंची सोय केलेली होती . त्यांची रचनाही अतिशय सुंदर दिसत होती ...पांढऱ्या  , पिवळ्या , केशरी तंबूंची रांग ह्या एवढ्या विशाल प्रदेशात मुंग्यांच्या रांगेसारखी  दिसत होती  ... रस्ता अगदी सरळ असल्याने पप्याने त्याच्या चालत्या गाडीवरच्या कसरती सुरु केल्या . हात-बित  सोडून गाडीवर उभा राहून तो गाडी चालवू लागला... पप्याला आम्ही नाव ठेवलं -- गरीबांचा  जॉन अब्राहम ...!         खोप्याला मधेच एक ग्रुप फोटो काढण्याची हुक्की आली . आम्हाला मुख्य रस्त्यापासून दूर  लांबच लांब सपाट मैदानात तो घेऊन गेला .तिथे अगदी जमिनीवर झोपून वगैरे त्याने angle सेट केला ... खोप्याने  कॅमेरा इतका लांब ठेवला होता , कि टायमर लावून परत पळत पळत येत असतानाच फोटो निघाला ...त्यात आम्ही सर्व ठिपक्यांप्रमाणे दिसत होतो ... आणि खोप्या, पाठमोरा ठिपका ...!! तो फोटो पाहून नंतर आम्ही खोप्याच्या फोटोग्राफीची स्तुती करत भरपूर हसून घेतलं .... पुढे आम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं  भूरूप पाहायला  मिळालं. ते कशाचे बनले असेल... , कधी तयार झालं असेल... , कसं  तयार झालं  असेल... ह्याचा विचार करण्याऐवजी  आम्ही मंत्रमुग्ध होऊन निसर्गाचे हे फाईन आर्टचे मोडेल डोळे भरून पाहत होतो ... खरंच ,  निसर्गासारखा दुसरा आर्टीस्ट कोणीच नाही !! एखादा जादुगार आपल्या टोपीतून जसे कधी कबुतर तर कधी फुले अशा आश्चर्यकारक वस्तू काढतो तसा हा निसर्ग आमच्या पुढे कल्पनातीत दृश्यांची मालिकाच सदर करत होता ... आणि आम्हीही  जादूचे प्रयोग पहिल्यासारखे ती समोरची दृश्ये पाहून आश्चर्य चकित होत होतो ... सूर्य पश्चिमेकडे पूर्णपणे झुकला होता. आता आम्हाला निवाऱ्याची  सोय करणे गरजेचे होते ... आमच्यात फक्त खोप्याच असा होता कि त्याने लडाखचा सर्व गृहपाठ व्यवस्थित केला होता ... त्याला एक रेस्टोरंटचे नाव माहित होते - माउंटन व्हयू ! आम्ही ते शोधत निघालो. नशिबाने ते सापडले ... त्याचा मालक - ' सेंगे 'अगदीच नम्र , मवाळ आणि दिलदार माणूस ...! तो मूळचा नेपाळचा ... पण वर्षातले  उन्हाळ्याचे ३-४ महिने तो इथे असतो ... त्याने आम्हाला एक गोलाकार तंबू राहायला दिला ... तंबू म्हणजे एक प्रकारचा शामियानच होता ... आत ५-६ खाटा  होत्या आणि त्यावर गाद्या टाकल्या होत्या ... आम्हाला अचानक आम्ही कोणीतरी नवाब वगैरे असल्यासारखे वाटू लागले ...              सूर्य आता   डोंगराआड  गेला होता तरी त्याने  आपली छाप  आमच्या मागच्या डोंगरावर सोडली होती ... लोहाराच्या भात्यातल्या लोखंडासारखं ते शिखर तापून लालबुंद झालंय कि काय असं  वाटत होतं ...
सूर्याने निरोप घेतला तशी  कुठेतरी  खोल दरीत इतका वेळ लपून बसलेली थंडी आमच्या अंगावर धावून आली ... ह्या प्रदेशात कसलीच अडकाठी नसल्याने वारा अगदी पिसाळल्यासारखा वाहत होता ... आता त्या दोघांची युती झाली होती ... ती थंडी मात्र मला काही सहन होईना ... अगदी आत , हाडांपर्यंत थंडी शिरलीय असं  मला वाटलं  ... मी मधूनच आतून थरथरत होतो ... सेंगे ने जेवण लवकरच बनवलं ...फुलके , बटाट्याची भाजी , भात ...  ते स्टोव्ह वरून आमच्या ताटात पडेपर्यंत कोमट  झालं... त्याने जेवण तर छानच बनवलं होतं , पण मला ते काही जाईना ... कसंबसं ते  ga^saबत्ती लाईट डिनर  उरकून आम्ही आमच्या शामियान्यात परत आलो ... थोडा वेळ पडलो असेल , पण मला अगदीच अस्वस्थ वाटायला लागलं. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती , पण माझ्यापेक्षा तरी बरीच म्हणायची ...! इतके दिवस ज्या  हाय अल्टीट्युड सिकनेसची मी खिल्ली उडवत होतो , तो किती भयानक आहे याचा प्रत्यय मला त्या रात्री आला ... श्वास ओढावा लागत होता ... जड डोकं ... जनरली  तळपायाची ' आग 'मस्तकात  जाते , इथे माझ्या  तळपायाची ' थंडी ' मस्तकापर्यंत  गेली होती .... आठवलं कि अजून काटा  येतो अंगावर ...! बाहेर वारा तर कुणाशी तरी धावण्याची स्पर्धा लावल्यासारखा पळत होता ... त्यामुळे सबंध तंबुच धरणीकंप झाल्यासारखा थरथरत होता ...त्याचा तो सुं ss  सुं sss आवाज  हिंदी हॉरर फिल्म मधल्या वाऱ्यासारखा येत होता ....त्या रात्री जरासुद्धा झोप लागली नाही ... सगळी रात्र मी थंडीने कुडकुडत काढली ... कधी एकदाची ती सकाळ होतेय असं  वाटत होतं ... सूर्याला देव का म्हणतात ते मला त्या रात्री कळलं ...
        

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण .... भाग - ४

                          दरवाज्यावरच्या बेल ने मला जाग आली ... पप्या आणि संदीप अजगरासारखे पडले होते . त्यांच्यावर त्या  सतत वाजणाऱ्या बेल चा काही परिणाम झाला नाही....  ' कोण तडमडायला आलंय ?'  असा विचार करून मीच  दार उघडलं  तर समोर खोप्या ...!! हातात कॅमेऱ्याचं नळकांड घेऊन ...
-- " अरे बाहेर बघ ते समोरचे डोंगर कसले भारी  दिसतायत .... "  तो हे बोलत असताना थंड हवेचा एक झोत आत आला .. मला एकदम शीरशिरीच भरली ...
-- " हो का.....?? " म्हणून कुडकुडत मी समोर पहिलं  पण डोळ्यांवरच्या झोपेमुळे असेल किंवा डोक्यावरच्या माकड टोपीमुळे असेल मला ते निट दिसलेच नाहीत....
ह्या खोप्याचं  आणि पियूचं  तर मला राहून राहून आश्चर्य  वाटत होतं ... काल संध्याकाळी सुद्धा आमच्या तिघांचेही  टांगे पलटी  झाले होते , तिथे ह्या दोघांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता.... मला त्यांच्या ह्या उत्साहाचा हेवा वाटला .... सकाळचे 7 वाजले होते ... तब्बल 13 तासांच्या झोपेनंतर आम्ही इहलोकात परत आलो होतो ... मी नीट  बघितलं  तर सूर्याच्या किरणांमुळे समोरच्या  पर्वताचे शिखर  उजळून निघाले होते... फारच मनोहारी दृश्य होतं  ते...! असं  वाटत होतं  कि समोरच्या पर्वताला कुणीतरी रुपेरी  मुकुट घातलाय ...


             
                  आम्ही सकाळच्या 8 वाजेपर्यंत तयार होऊन समोरच्या हॉटेलात  नाष्टा  करायला गेलो .... ऑम्लेट , चहा आणि मोमोज ... हे मोमोज म्हणजे आपल्याकडच्या  उकडीचे मोदका सारखा प्रकार ...पण त्यात मिक्स भाजी असते ... चवीला अतिशय सुंदर ... आमच्या हॉटेलचा मालक  पॉंल म्हणजे एकदम भारी माणूस होता ...बोलायला इतका मवाळ कि काही बोलू नका .... त्याच्या होटेलचं  नाव होतं .... यार्कीड . त्याला ह्या नावाचा अर्थ विचारला तर म्हणाला , " प्रसिध्द सहलीचे ठिकाण "... खरंच , हॉटेल लहान होतं  पण छान होतं. आटोपशीर खोल्या , सुंदर रंगसंगती ,लाकडी खिडक्या आणि त्याला शोभून दिसतील असे रंगीबेरंगी  पडदे ... एकदम प्रसन्न  वाटत होतं ....

                         
                               नाष्टा  वगैरे झाला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो ... पुढचा रस्ता अगदीच मक्खन होता ... सुसाट वेगात आम्ही अंतर कापायला सुरुवात केली ... मी संदीपच्या गाडीवर मागे बसलो होतो ...मला मात्र  वळण आल कि  भीती वाटत होती ... एखादं वळण  आलं  कि संदीप गाडी अशी काही झुकवी  कि मागे बसणाऱ्या माझी चांगलीच तंतरत असे... पण संदीप , खोप्या , पप्या म्हणजे पट्टीचे रायडर ... कोणत्याही प्रकारचा रस्ता असू देत , किंवा नसू देत , तिघेही व्यवस्थित गाडी चालवत ..... त्यांच्यात मी म्हणजे अगदीच कच्चा लिंबू ...!  अगदीच कोणाला गरज लागली तर मी गाडी चालवणार होतो ....मध्ये थोडा वेळ तशी मी गाडी चालवलीही होती....  मागे बसल्याने मला विशेष असं  काही काम नव्हतं ... क्रिकेट मध्ये 12 व्या खेळाडूला  असतं ना तसं ....!!  त्यामुळे एखादा चांगला सीन आला कि फोटो काढणे ...,  पाण्याची बाटली सांभाळणे ...,  handicam  ने शुटिंग  करणे ..., असली कामे माझ्याकडे  होती .... आम्ही काही अंतर पार करून पुढे जीस्पा च्या दिशेने निघालो . मध्ये एक मोठी हिमनदी पलीकडच्या डोंगरावर दिसत होती .तिचे नाव होते  ' लेडी ऑफ केलाँग ...!' पर्वत शिखरापासून ते पायथ्यापर्यंत सिंहकटीलाही लाजवील अशी कमनीय  ' लेडी ऑफ केलाँग ' काळ्याकभिन्न पर्वताच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होती . जिस्पाला  पोहोचेपर्यंत दुपार झाली , तेव्हा काहीतरी खाऊन  पुढे जावं म्हणून तिथे असलेल्या एका हॉटेलकडे गाड्या वळवल्या . पुन्हा तेच ... ऑम्लेट , चहा , ब्रेड बटर ...!!  ते खाऊन  आम्ही हॉटेलच्या मागच्या भागात गेलो . मागे एक उंच  ' काळापहाड '  हाताची घडी घालून गंभीरपणे  उभा  होता.  एक  सुंदर झरा आपल्याच धुंदीत खळाळत  चालला होता. दुपार झाली होती तरी उन कोवळ  होत. त्या कोवळ्या उन्हामुळे झऱ्याचं नितळ  पाणी चमचमत होतं ....हिरव्यागार गवताचा गालीचा पसरलेला... मग आम्ही आमचे फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेतली... त्या समोरच्या काळा  पहाडाकडे बघून खोप्या म्हणाला ," किती विशाल पर्वत आहे नाही हा .....??"  मी वरपर्यंत बघितल , " हो रे ... , हा असाच आपल्या अंगावर पडला तर ...?? " माझ्या ह्या वाक्यावर खोप्याने असं काही तोंड केलं कि विचारू नका ...समोरचा एक पर्वत त्याची ' हर फिक्र धूंए में ' उडवत असलेला दिसत होता ...


                       
                          तिथून  निघायच्या तयारीत असताना आम्हाला एक मराठी कुटुंब भेटलं ....डोंबिवलीचं ...  इतक्या लांबच्या  प्रदेशात मराठी माणूस भेटणं म्हणजे मुंबईत रिकामा प्लॉट मिळण्यासारखं आहे ...! त्यांनी आमची चौकशी वगैरे केली , चौकशीपेक्षा ते आश्चर्याच जास्त व्यक्त करत होते ... जणूकाही आम्ही  चंद्रावरूनच आलोत असे ते आमच्याकडे बघत होते . आमच्यात एक मुलगीही आहे हे पाहून तर ते आणखी थक्क झाले . ते कुटुंबही पुढे सारचू कडे जाणार होते ... त्यांचा निरोप घेऊन आम्ही  निघालो ... पुढे एक मोठ्ठा पाण्याचा ओहोळ रस्याला आडवा जात होता ... तो बघून तर संदीपने एक मोठ्या विभक्तीची शिवीच हासडली , कारण वर बर्फाचे मोठे मोठे ढिगारे होते आणि त्यातून लपत-छपत  हा  वितळणाऱ्या पाण्याचा भला मोठा ओहोळ आमच्या मार्गात आडवा  आला होता ... आधीच ती जड बुलेट ,  त्यावर वजनदार समान , खोल ओहोळ , त्याचं धमन्या गोठवणारं थंड पाणी - कितीही प्रयत्न केला तरी पाण्यात पाय ठेवावाच लागणार होता ...मी खाली उतरलो आणि ओहोळाच्या मध्ये एक मोठा दगड होता त्यावर पाय ठेऊन पलीकडे उडी मारली तरीही माझा एक पाय पाण्यात पडला .थंड पाणी बुटामध्ये शिरल्यावर शिरशिरीच भरली . पप्याने मात्र सराईत पणे  तंगड्या वर करून गाडी सुसाट  पाण्यात घातली आणि एक थेंबही अंगावर न घेता पलीकडे आला सुद्धा ...! त्याच्या मागे संदीप होता . त्याला आधीच पाणी आणि चिखलाची allergy !!  त्याने गाडी पाण्यात घातली पण मध्ये आल्यावर समतोल साधता न आल्याने पाय पाण्यात ठेवावेच लागले ... त्याच्या दोन्ही बुटांमध्ये बर्फाच थंडगार पाणी शिरलं .बाहेर येऊन पुन्हा विभक्ती वाल्या शिव्या देत त्याने  बुटांमधलं पाणी काढलं ... खोप्याने गाडी व्यवस्थित पाण्यातून काढली . त्याने जरी पाण्यातून व्यवस्थित गाडी काढली असली तरी हा तुफानी फोटो मात्र मी काढला आहे ........ पुढे निघालो तर डांबरी रस्ता संपून आता पांढऱ्या  मातीचा रखरखीत  रस्ता सुरु झाला अन  आम्ही सगळे धुमकेतू झालो,  धुराळ्याची शेपटी मिरवीत आमच्या गाड्या सुसाट सुटल्या  ...
                            बारलाच- ला ही  खिंड आता आमच्यात  आणि सारचू मध्ये होती ... तिथे आम्ही पुन्हा एकदा बर्फाळ रस्त्यांवरून जाणार होतो . वळणा वळणांचा रस्ता सुरु होण्यापूर्वी आम्ही एका छोट्याश्या धाब्यावर maggi खाल्ली ...तिथे आम्हाला आणखी एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला ... तिथल्या कावळ्यांना पिवळ्या रंगाचे  पाय आणि लाल रंगाची चोच होती ....कावळ्या सारख्या कुरूप पक्षालादेखील त्यामुळे सौंदर्य प्राप्त झाले होते . हि सगळी जादू इथल्या निसर्गाची ....!! जिथे पाहावं  तिथे  रंगांची  उधळण करताना निसर्गाने अजिबात हात आखडता घेतला नव्हता ....निर्मिकाने अगदी फुरसतीने इथल्या साऱ्याच  प्रदेशाची रंगसंगती अगदी योग्य साधली होती . हा प्रदेशाच इतका फसवा  आहे की  अगदी पहिल्यांदा कॅमेरा धरणाऱ्यालाही  आपण जणूकाही प्रोफेशनल फोटोग्राफर आहोत कि काय असा भ्रम व्हावा इतके सुंदर फोटो येतात . कुठेही कॅमेरा फिरवा , क्लिक करा , फोटो अप्रतिम येणारच....!!! त्यामुळे मी काढलेले फोटो ' कडक ' का आले हे सुज्ञांस सांगणे नलगे ....!
         
                 पुढे बारलाच- ला चे चढण सुरु झाले . जसजसे वर जाऊ तसतसे मग बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र राशी दिसू लागल्या ...नागमोडी  डांबरी रस्ता , बर्फाच्या पांढऱ्या ताशीव भिंती , वर आकाशाची निळी नितळाई ....अहाहा ...!!  काय सांगू ?? विचार केला तरी अजून अंगावर काटा  येतो . असा  रस्ता साक्षात मृत्यूकडे जाणारा असेल तरी 'जाणारा' अगदी आनंदात जाईल .... आम्ही  वरपर्यंत आलो आणि आमच्या डोळ्यांचं पारणंच फिटलं .... समोर निळंशार हिमानी सरोवर दोन पर्वत शिखरांच्या कुशीत बसलेलं होतं - सूरजताल ...सभोवतालचं वातावरण तर इतकं  भारावलेलं , मंतरलेलं कि आम्हाला त्यावेळी काय बोलावं तेच कळत नव्हतं . स्वर्गात आणखी वेगळं  असं  काय असणार ...???  त्यात दुधावरच्या सायीसारखे हिमनग सुरजताल मध्ये तरंगत होते . ते दृश्य केवळ अद्भूतच..., divine....!! जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर तो केवळ सुरजताल ...!


   आम्ही गाड्यांवरून खाली उतरलो ... समोरचं  दैवी दृश्य मंत्रमुग्ध करणारं  होतं ... डोळ्यांत ते साठवून घेत असताना अचानक श्वास जड वाटू लागला , पाय भरून आले , दम लागू लागला ,... हाय अल्टीट्युड सिकनेस म्हणजे काय ते मला तिथे कळलं ... आम्ही लगेच तिथून निघण्याचा निर्णय घेतला ... निघावस वाटत तर नव्हतंच ,  जास्त वेळ ह्या स्वर्गात थांबलो असतो तर खरंच ' स्वर्गात ' जायची वेळ आली असती ... पण काहीही म्हणा , सूरजताल ..... साला , सू  डीव्हाईन छे ....!!!