Friday, September 14, 2018

३१०

                                     
                                   
   

               गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात  अक्षरशः  फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं .  ट्रेनमधून  उतरल्यानंतर नेहमीचा  कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने  ज्याने  मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे  !   तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी  आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे  वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते . ३१०  डबल-डेकर आहे , मुंबईत धावणाऱ्या फार कमी डबल डेकर बस पैकी एक आणि तितकीच गर्दीने भरलेली !
          मी लांबूनच पाहतो , नागाच्या वेटोळ्यासारखी लांबच लांब रांग मला दिसते . याचा अर्थ , चार ३१० गेल्या नंतर आपल्याला पाचवी गाडी मिळणार ! ही गर्दी साली पाचवीलाच पुजलीय असं वाटायला लागतं . ही रांग इतकी वाढलेली असते  की आपल्याला आज बस मिळणार आहे की नाही अशीही एक शंका मनात येऊन जाते . 
             बसमध्ये चढण्यासाठी इतर कुठल्याही बसला लागत नसतील अशा तीन वेगवेगळ्या रांगा ३१० ला लागतात . ह्या तिन्ही रांगांच्या ढंगा वेगळ्या आहेत .  एक मुख्य रांग , जी केवळ बसणाऱ्यांची असते , ह्या रांगेतील लोक सावकारासारखे वाटतात मला , त्यांच्याच नादात निवांत चालणार , बस मध्ये चढण्याची त्यांना बिलकुल घाई नाही .  बसणाऱ्यांचं भागलं की स्टँडिंग वाली दुसरी  रांग आहे . ही रांग पहिल्या रांगेच्या अगदी उलट ! ह्यांना कधी एकदा गाडीत चढतोय असं होतं . तिकीट चेकर नसला की , पहिल्या रांगेचे लोक बसमध्ये चढत असतानाही स्टँडिंग लाईन वाले चढायचा प्रयत्न करतात आणि मग बाकीच्यांच्या शिव्या खातात . ह्या दोन रांगाव्यतिरिक्त तिसरी रांग तिकीटचेकरच्या मागे उभी आहे . वास्तविक पाहता तिला रांग म्हणणेच चुकीचे आहे . त्या तिकीट चेकरच्या मागे बसमध्ये  लटकत जाणाऱ्या लोकांचा घोळका असतो . एकवेळ स्टँडिंग वाल्या लोकांना बसायला मिळेल , पण ह्या तिसऱ्या रांगेच्या लोकांना कधीच बसायला मिळत नाही .
 ३१० नंबरची बस मला एकूणच जीवनविषयक सूत्र सांगताना दिसते . म्हणजे बघा , कुर्ल्याच्या गर्दीवाल्या , आणि बारीक रस्त्यांवरून  हळूहळू जाताना तिचं बालपण सरत जातं ,  त्यानंतर बीकेसीमध्ये शिरल्यानंतर ती तारुण्यात येते  एमटीएनएल पासून ते कलानगर पर्यंत तारुण्याच्या जोशात ती  सुसाट पळत असते मग बांद्रा स्टेशन जसे जवळ येईल तसतसे  वार्धक्याकडे झुकल्यासारखी  तिची चाल पुन्हा मंदावते.
" ३१० ची लाईन का ? "   मी रांगेतल्या शेवटच्या माणसाला जाऊन विचारतो . कारण रांग वेटोळे घेऊन घेऊन खूप लांबलचक झालेली आहे . पण समोरच्याचं लक्ष नाही. " ३१० का लाईन है क्या ? "
" हां भाई . तिन्सो दसही है " त्याचा सूर वैतागलेला . मी त्याच्या मागे उभा राहतो . आता मी रांगेतला शेवटचा माणूस आहे . माझ्या पुढे अंदाजे पावणे दोनशे तरी माणसे रांगेत आहेत . बाजूला नुसताच उभा असलेला रिक्षावाला माझ्याकडे दयेने पाहतोय की काय असं मला वाटून जातं . त्याचवेळी कोणीतरी माझ्या मागे येऊन उभं राहतं .
" ३१० का लाईन है क्या ? " मागून आवाज . आता मी लक्ष देत नाही . " ३१० ची लाईन आहे का ? " त्याचा मराठीत प्रश्न .
" हो तीनशे दहाचीच लाईन आहे . " मी त्याला उत्तर देतो . ह्या वेळेत एक ३१० येऊन समोर उभी राहते . रांगेतले  किती लोक चढले वगैरे गोष्टी मला काही लांबून दिसत नाहीत .  रांग जशी पुढे सरकेल तसा मी  सरकत जातो . एक ३१० येऊन  गेली तरी रांग काही फारशी पुढे सरकलेली दिसत नाही. मी सहज मागे पाहतो ,  थोड्याच वेळात माझ्या मागे तेवढेच लोक उभे असलेले  मला दिसतात . मला थोडंसं हायसं  की काय म्हणतात ते वाटतं .
                 घरातून वेळेवर निघालं , नेहमीची ट्रेन पकडली , ट्रेन्स वेळेवर असल्या , बसची फ्रिक्वेन्सी ठीक असली  आणि स्टेशन ते बस स्टॉपपर्यंत चालण्यासाठी साधारण जेवढा वेळ लागतो तेवढा जुळला तर ३१० च्या रांगेत नेहमीचेच चेहरे पुढे मागे उभे असलेले दिसतात . त्यात  रेकलेल्या म्हशीसारखा आवाज असलेला भैया ,  मेंदी लावल्याने दाढी लाल झालेला म्हातारा , एक प्रेमी युगल , बघावं तेव्हा फोनवर चिकटलेली  जाडी मुलगी , असे काही ठराविक चेहरे रांगेत मला जवळपास रोजच दिसतात . मला सगळ्यात जास्त गंमत वाटते ती त्या प्रेमी युगलाची . कितीही गर्दी असो , ऊन असो , पाऊस असो त्यांना काही फरक पडत नाही . लोक  बेस्ट च्या नावाने बोंबाबोंब करतायत  , गर्दीत एकमेकांवर डाफरतायत , उशीर होत असल्यामुळे चिडचिड करतायत , अशा भयंकर  अनरोमँटिक ठिकाणी  ते प्रेमी युगल प्रेमाच्या गोष्टी करत आपल्याच नादात गुंग आहे  . बाकी दुनिया फाट्यावर !
" अरे ए बाबा , मधे कुठे घुसतो ? लाईन मागे आहे . " पुढचा कोणीतरी ओरडतो . घुसखोरी करणारा खजील होऊन रांगेच्या शेवटाकडे जाऊ लागतो .
" काय सालं एकही गाडी नाही ?  सगळ्या ३१३ आणि ३३२ भेंचो . ....  बघा , बघा ... गेली  ३१३ , च्यायला तिकडं कुणी नाही तरी तिकडं गाड्या सोडतायत ... मारलं पायजे साल्यांना... लोकांची काय फिकीरच नाय ह्यांना ....  काय ऊन आहे भेंss चो .... " मागच्याची अविरत बडबड चालू आहे . बस नको पण बडबड आवर अशी माझी अवस्था .  चौथी बस तुडुंब भरून गेली आणि  आता येणारी पाचवी बस मला  मिळेल अशी आशा वाटू लागते . आणखी पंधरा मिनिटे उन्हात भाजून निघाल्यानंतर  लांबून ३१० येताना दिसते . तुकाराम महाराजांना  पुष्पक विमान दिसल्यावर झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद मला ३१० पाहिल्यावर होतो .
आली आली बाबा एकदाची ....
चलो , भाई चलो
ए , ए sss बिचमे किधर घुसता है ? ओ मास्तर तुम्ही लक्ष द्या जरा ...
चलो भाई , चलो जलदी , इसके बाद गाडी नही आयेगा ...  जलदी चलो
थांबा .... थांबा .....
चढा .... चढा ..... लवकर ....
असे चित्र विचित्र आवाज रांगेतल्या माणसांचे येतात . काही लोक अगदी विमानात बसायच्या ऐटीत चढत आहेत .  काही घाई नाही .  त्याचा फायदा स्टँडिंगच्या लायनीत बसच्या  दाराला धरून उभे राहणारे काही लोक घेतात . सुमडीत आत शिरतात . ते बघून  मग मुख्य रांगेतले लोक धरणीकंप झाल्यासारखे  जिवाच्या आकांताने ओरडतात.  पण नुसतं ओरडण्यापलीकडे फारसं काही होत नाही . घुसखोरी करून आत चढलेला वरच्या मजल्यावर पोहोचला सुद्धा !  गाडीत चढण्यासाठी लोक घाई करतात . त्या लोंढ्याबरोबर मीही आत जातो . पुराचं पाणी गावात शिरावं तशी बसमध्ये माणसं शिरतात .  आत शिरल्यावर  मला नेहमी पडणारा प्रश्न , खाली बसू की वरच्या मजल्यावर जाऊ …? ते ठरेपर्यंत मागून सात - आठ लोक माझ्यापुढे निघून गेलेले असतात  आणि मला विंडो सीट न मिळाल्याचं दुःख करत कुठेतरी  बसावं लागतं . बस मधली काचेची खिडकी एक नमुना आहे . ती एका हाताने  वर करू शकेल असा महामानव अजून जन्माला यायचाय . ती  कधीच नीट वर जात नाही . वर करायचा प्रयत्न केला तर एक बाजूच वर जाते , एक खाली राहते , मग एखाद्या  हट्टी  मुलासारखी ती खिडकी मधेच अडकून बसते . वर एक विचित्र आकाराचं हुक असतं , तिथपर्यंत कसं बसं आपण त्या खिडकीला नेलं तरी त्या विचित्र हुकात काही ती स्वतःला अडकवून घेत नाही .  त्यात  दोन हात किंवा कधी कधी तीन हात ( शेजारच्याचा एक हात ) लागल्याशिवाय ती वर जात नाही . श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर वगैरे  उचलला असेल , त्याला म्हणावं एका हाताने ती खिडकीची काच वर करून दाखव .  मुंबईत नवखा आलेला एखादा भैया लेडीज सीट वर बसतो आणि मग त्याचा  ध्रुवबाळ होतो . तोंड वाकडं करीत वरच्या दांड्याला लटकत उभं राहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही .  बस गर्दीने तुडुंब भरली की कंडक्टर डबल बेल मारतो आणि आपली गाडी सुरू ...  कंडक्टर ह्या माणसाचं मला कौतुक वाटतं . जिथं पाय ठेवायला जागा नसते त्या बस मधून सराईतपणे जो चालतो तो कंडक्टर !  " तिकीट ... तिकीट बोला,  तिकीट " करत बसमध्ये त्याचा मुक्त विहार सुरू असतो .  तो प्रवाश्यांवर अक्षरशः सत्ता गाजवत असतो , " चला पुढे चला , डबल लाईन करा .... " अशा ओर्डरी अधून मधून सोडत तिकिटे फाडत फिरत असतो .
बस मध्ये अफाट गर्दी आहे . फेवीकॉल ने चिकटवल्यासारखे सगळे एकमेकांना चिकटलेत. जरा धक्का लागला की एकमेकांवर डाफरतायत .... ड्रायवर ने मधेच जोरात ब्रेक लावला की मागचा पुढच्याच्या अंगावर जातोय , ट्रॅफिक मधून बस मुंगीच्या पावलांनी पुढे जातेय . घामाने सगळेच डबडबलेत , बसच्या इंजिनाच्या एकसुरी आवाजाने काही बसलेले प्रवासी पेंगायला लागलेत . त्यांचे भार  बाजूच्या प्रवाशांवर पडतायत . काही लोक तो भार चुकवतायत तर काही , कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे गाणं म्हणत अंग चोरून बसलेत . बस रांगत रांगत एमटीएनएल पाशी येते  आणि आता ती बिकेसी च्या प्रशस्त रस्त्यांवरून सुसाट धावू लागते . थंडगार वारा चेहऱ्यावर आल्याने आणि काही प्रवासी उतरून गेल्याने बाकीचे प्रवासी थोडे सुखावलेत . पण इथेही म्हणावं तसं सुख नाही . दोन दोन मिनिटाला गाडी सिग्नलवर थांबते आहे . रिक्षा , इतर दुचाकी , चारचाकी गाड्या आमच्या ३१० ला वाकुल्या दाखवून भुर्रर्रकन पुढे निघून  जातायत . पण ड्रायवरला कुणाचं काही घेणं देणं नाही . तो त्याच्याच नादात , आणि बसच्या ताकदीप्रमाणे बस चालवतोय . रस्ते प्रशस्त असल्याने आता आपली गाडी सुसाट धावेल असं वाटतं पण गाडीच्या वेगात फार काही फरक पडत नाही.  ट्रॅफिक कमी असल्याने बस फक्त न थांबता चालते तेवढंच काय ते !
" चला डायमंड , ... चला सिटी बँक वाले ..... "  कंडक्टर ओरडतो .
पण  आय सी आय सी आय बँकेचा स्टॉप येतो ... तेव्हा फक्त " आय सी आय " एवढंच ओरडतो .  गर्दीने खच्चून भरलेली बस भारत नगर स्टॉप येईपर्यंत रिकामी होत जाते . माझा स्टॉप आरबीआय अर्ध्या पाऊण तासाने येतो  . तो आला की मी उतरतो . डबल बेल मारून बस तिच्या पुढच्या प्रवासाला निघते . 

Wednesday, August 8, 2018

एटीएम

                                                                                   
                   मनीष लोकल मधून उतरला . कसाबसा स्टेशन मधून बाहेर पडला . आज लोकलला भरपूर गर्दी होती ,  बसायला बिलकुल जागा मिळाली नाही . उभं राहून राहून पाय दुखू लागले होते .रिक्षाने जाऊया का ? हा विचार त्याच्या मनात आला आणि रिक्षा स्टँडच्या बाजूला असलेली भली मोठी रांग बघून त्याने तो झटकून टाकला. त्याचं घर स्टेशनपासून  तसं काही लांब नव्हतं , रोज तो चालतच घरी  जायचा , पण आज कंटाळा आल्याने त्याने रिक्षाने जायचा विचार केला होता . चला लेफ्ट - राईट करा .... मनात म्हणत तो पाय ओढत चालू लागला .
" अरे मनीष , ए मनीष .... " मागून कुणीतरी हाक मारतंय असं त्याला वाटलं . त्याने मागे वळून पाहिलं तर त्यांच्या सोसायटीतले  पेडगावकर काका लगबगीने त्याच्याकडेच येत  असलेले त्याला दिसले .
' ओह शीट ! घरी जाईपर्यंत आता हा म्हातारा पकवणार ! ' मनातल्या मनात विचार करेपर्यंत ते त्याच्यापर्यंत पोहोचले देखील !
" अरे , काका  तुम्ही ? काय म्हणताय ? " चेहऱ्यावरचे भाव बदलत मनीषने त्यांना विचारलं .
" केव्हाचा हाक मारतोय ? लक्ष कुठे आहे तुझं ? "
" मी जरा दुसऱ्याच विचारात होतो , तुम्ही काय म्हणत होतात …? "
" जरा काम होतं .... "
" माझ्याकडे ? " मनिषला थोडं आश्चर्यच वाटलं .
" तसं  काही खास नाही रे .... तुमच्यासारख्या तरुण पिढीच्या तर हातचा मळ आहे "
" बोला ना "
" अरे , मला एटीएम मधून पैसे काढायचेत .... मी कधी काढले नाहीत . आणि शेवटी ते पैशांचं काम ! मला जरा भीतीच वाटते रे , काही चुकलं वगैरे तर पैसे जायचे ...आमच्या ऑफिसमधल्या सोनवणेचे असेच पैसे गेले ....  " ते पुढे बरंच  काहीतरी बडबडत राहिले असते पण मनिषला ते काही काही ऐकण्यात रस वाटत नव्हता , " एटीएम कार्ड आहे का तुमच्याकडे ? " त्याने त्यांना मध्येच थांबवत विचारलं .
" अं ... कार्ड ना .... आहे ना " म्हणत ते पाकिटाच्या आत चोरकप्प्यात ठेवलेलं एटीएम कार्ड काढू लागले .
" आणि पिन माहीत आहे का ? नाहीतर पैसे काढता येणार नाहीत "  पिन माहीत नसेल तर बरं होईल , वेळ वाचेल असा एक स्वार्थी विचार मनीषच्या मनात येऊन गेला .  पण काही उपयोग झाला नाही ,  पेडगावकर काका तयारीनिशीच आलेले होते . नाईलाजाने मनीष एटीएम शोधू लागला . पेडगावकर काकांच्या चेहऱ्यावर जत्रेला निघालेल्या लहान मुलाचा आनंद दिसत होता . एक एटीएम बंद  होतं , दुसरी कडे जाऊन पाहिलं तर त्या एटीएम मधली कॅश संपली होती . मनीष वैतागला . ," काका , आज बहुतेक तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत असं दिसतंय . "
" अरे राजा  , असं नको म्हणुस रे ... गरज आहे रे जराशी ... त्या आमराई  रोडला मी बघितलं आहे एक एटीएम . तिकडे जाऊया .... प्लिज...  ते बंद असलं तर कॅन्सल करू  " पेडगावकरांनी असा चेहरा केला की मनिषला त्यांना नकार द्यावासा  वाटेना . त्याने काहीही न म्हणता पावले आमराई रोडकडे वळवली . मुख्य रस्त्यापासून आतल्या एका जुन्या इमारतीमध्ये  एटीएम असू शकेल याची  मनिषला कल्पना नव्हती . तसं ते बरंच जुनं दिसत होतं . त्यावर ते कोणत्या बँकेचं आहे ह्याचा बोर्ड दिसत नव्हता , पण मनीषला त्याचं काही देणं घेणं नव्हतं  . एकदाचे पैसे काढून दिले की , आपण मोकळे ! त्याने पेडगावकर काकांचे  कार्ड एटीएम मध्ये टाकलं . काकांनी सांगितलेला पिन टाकला  आणि पैसे काढले . एटीएम मधून आलेली  कॅश आणि स्लिप त्यांच्या हातात दिली .
" बॅलन्स किती राहिलाय रे ? " कागदी स्लिप निरखत त्यांनी  विचारलं .
" तिथे लिहिली असेल ना .... " मनीष थोड्याशा बेफिकीरीनेच म्हणाला , पण पेडगावकर काकांच्या डोळ्यांना  बॅलन्स काही दिसत नव्हता . " द्या इकडे " म्हणत त्याने ती स्लिप घेतली . " हे बघा , 14,400/- रुपये बॅलन्स आहेत . दिसले ? "
" हां .... बरं , बरं ... थँक्स बरं का मनीष ... आणि हा खाली आकडा कसला रे ?  खाली ठळकपणे छापलेला .... ? "
" कुठे आहे ? " म्हणत पुन्हा  त्याने ती स्लिप घेतली . स्लीपच्या उजव्या कोपऱ्यात खाली 2 हा ठळक आकडा प्रिंट झाला होता . त्याचा अर्थ मनिषलाही कळेना ... त्याने थोडा विचार करून पाहिला पण व्यर्थ ! आधीच त्याला कंटाळा आला होता .
" काका , तुमचे पैसे आणि बॅलन्स बरोबर आहे ना ? जाऊद्या ना मग ... चुकून प्रिंट झालं असेल " म्हणत त्याने  ती स्लिप पुन्हा पेडगावकर काकांच्या हातात दिली . " काका , मी जाऊ का , उशीर झालाय बराच "
" बरं , बरं ... जा ,  जा .... आणि थँक्स बरं का " काका म्हणाले . मागे न बघता मनीष तडक घरी गेला .
                      त्यानंतर दोनच दिवसांनी एक विचित्र बातमी  मनीषच्या कानावर आली . पेडगावकर काका हे जग सोडून गेले होते .
" अगं , परवाच मला रात्री भेटले , मी त्यांना एटीएम मधून पैसे काढून दिले होते .... अगदी व्यवस्थित होते त्यावेळी . मग कसं काय झालं असेल ? " मनीष आश्चर्याने त्याच्या बायकोला , सायलीला म्हणाला .
" हो का ? तब्येत तर चांगली ठणठणीत होती .... मधेच काय झालं कुणास ठाऊक ! " तिलाही नवल वाटत होतं.
                पेडगावकर काकांच्या जाण्याने  सगळी सोसायटी हळहळत होती . त्यांच्या रिटायरमेंटला केवळ एक दीड वर्ष उरलं असेल . तसे स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ होते .  सोसायटीच्या प्रत्येक कामात त्यांचा  सक्रिय सहभाग असायचा . परवा आपण थोडे वैतागलोच त्यांच्यावर ! छे ! चांगलं नाही वागलो आपण त्यांच्यासोबत .... मनिषला राहून राहून वाईट वाटू लागलं . त्याचं कामात लक्ष लागेना . बिचारे  ! पेडगावकर काका , त्यांना तर साधं एटीएम मधून पैसेही काढता येत नव्हते . आणि आपण पैसे काढून दिल्यावर त्यांना बरं वाटलं होतं . त्यांना स्लीपही नीट वाचता येत नव्हती .आपणच त्यांना बॅलन्स वाचून दाखवला . आणि ..... अचानक झटका बसावा तसं त्याला झालं . पेडगावकर काकांच्या त्या स्लिपमध्ये उजव्या बाजूला खाली 2 हा आकडा प्रिंट झाला होता , आणि दोन दिवसातच ते वारले . ह्याचा काही परस्पर संबंध असावा का ? छे ! आपण काहींच्या काही विचार करू लागलोत .... त्याने पुन्हा कामात डोकं घातलं पण त्याचं लक्षच लागेना . सारखा तो स्लीपवरचा 2 आकडा डोळ्यासमोर दिसत होता .  घरी आल्यावर जेवता जेवता त्याने परवाचा घडलेला प्रसंग सायलीला सांगितला . त्यावर ती जोरजोरात हसू लागली .
" आर यु आउट ऑफ युअर माईंड  ? असं कसं असू शकेल ...? "
" बिलिव्ह मी ,  तसंच झालं . त्या स्लीपवर 2 हा आकडा प्रिंट केला होता . मी माझ्या डोळ्यांनी पहिला , आणि नंतर दोन दिवसातच काका वारले . "
" मनीष , तुझं डोकं फिरलंय .  त्या सस्पेन्स स्टोरीज  जरा कमी वाचत  जा .... कसलाही संबंध कुठेही जोडतोयस .... " सायली त्याला म्हणाली .
" अगं ते एटीएम मी पूर्वी कधी पाहिलंही नव्हतं . त्यांनीच मला ते दाखवलं होतं ... "
" मग काय झालं ?  तुला आपल्या सिटीतली  सगळी एटीएम्स माहीत आहेत का ? "
" तसं नाही गं , पण मला जरा ते एटीएम विचित्रच वाटलं "
" हल ... काहीही .... भात वाढू का ?  "
" नको , अगं खरंच ! आणि त्या एटीएमवर कोणत्याच बँकेचा बोर्ड नव्हता "
" अंधारात नीट दिसलं नसेल तुला . "
" मला सांग ,  आमराई रोडला त्या जुन्या इमारतीत कुठून आलं एटीएम ? "
" असेल रे , आपल्याला काय माहीत ? का रे ? भाजी आवडली नाही का  ? "
" नको . भूकच मेलीय माझी " मनीष तसाच ताटावरून उठला आणि  गॅलरीत जाऊन खालच्या गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पहात  बसला .  त्याच्या डोक्यातून त्या विचित्र एटीएमचा विचार जाईना . नक्कीच  गूढ असं काहीतरी त्या एटीएम मध्ये होतं असं त्याला आता प्रकर्षाने जाणवू लागलं . पेडगावकर काकांच्या एटीएमच्या स्लिपवर 2 हा आकडा आणि त्याचं दोनच दिवसात मरण ह्याचा काय  अर्थ घ्यायचा ? त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं . कदाचित हा योगायोगही असू शकेल .... त्याचं दुसरं मन त्याला सांगू लागलं . त्याने डोक्यातून तो विचार काढून टाकला आणि मागे वळला तर गॅलरीच्या दारात सायली उभी होती .
" अजून त्याच विचारात आहेस ?  चल,   त्या एटीएमला जाऊ .मलाही बघायचंय काय आहे तो प्रकार " सायली म्हणाली .
 " सोड , मी आत्ताच तो विचार डोक्यातून काढून टाकलाय "
" पण मला पैसे काढायचेत . खरंच ! "
" आता कुठे जाणार ? रात्रीचे 11 वाजतायत "
" चल ना , प्लिज , असंही उद्या संडे आहे . आणि आपण आईस्क्रीम पण खाऊ . मला इच्छा झालीय "
" ठीक आहे . चल " नाईलाजाने मनीष तयार झाला . दोघे आमराई रोडवरच्या जुन्या इमारतीच्या एटीएमपाशी आले . सायलीने तिची पर्स उघडली आणि एटीएम कार्ड काढलं . मशीनमध्ये टाकुन तिने एक हजार रुपये काढले . बॅलन्स दाखवणारी स्लिप बाहेर आली . मनिषने ती बघितली त्या स्लीपच्या खाली उजव्या बाजूला ठळक अक्षरात काही आकडे लिहिले होते .
" 10863 . हे बघ असंच पडवळकर काकांच्या स्लिप वर 2 हा आकडा होता . "
" म्हणजे तुला म्हणायचंय की मी आणखी 10863  दिवस  जगणार आहे ?  रब्बीश ! " असं म्हणून सायली गंमतीने हसू लागली .
" हसू नकोस , कदाचित असेलही तसं ... " मनीष गंभीर चेहऱ्याने म्हणाला .
" अरे मनीष , तुझ्या लक्षात येतंय का ? हा नंबर म्हणजे कदाचित स्लिप नंबर असू शकतो  किंवा बँकेचा कसला तरी कोड नंबर  असेल .... "
" मला नाही तसं वाटत " मनीषचा आवाज आणखी खोल गेल्यासारखा वाटला .
" मी काय म्हणते , तू तुझं कार्ड टाकून  बॅलन्स चेक कर .... बघू काय येतंय ते ! " तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते .
" काय येईल असं तुला वाटतं ? "  मनीषने  पाकिटातून त्याचं एटीएम कार्ड काढत गंभीरपणे विचारलं .
" आय एम डॅम शुअर की माझ्या स्लिप नंबर च्या पुढचा नंबर येईल . 10864 . बघ .... आय बेट ! "
" आणि वेगळाच नंबर आला तर ? "
" तसं काही होणार नाही , आणि मी सांगितलेला  नंबर आला तर तू मला आईस्क्रीम द्यायचंस " सायली म्हणाली .
होकारार्थी मान हलवत मनीषने मशीन मध्ये कार्ड  सरकवलं . बॅलन्स चेक केला . काही क्षणातच  बॅलन्सची स्लिप बाहेर आली . त्याने ती हातात घेऊन पाहिली आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला .
" मनीष ! अरे काय झालं तुला ? " सायली किंचाळली . मनीषचं शरीर थंड पडलं होतं .  तिने त्याच्या हातातली स्लिप पहिली त्यावर उजव्या कोपऱ्यात खाली  0 आकडा प्रिंट होऊन आला होता .
                                                 
                                                                                    समाप्त 

Wednesday, October 4, 2017

मेडिक्लेम


दारावरची बेल वाजली . अदितीने दार उघडले तर समोर संजय ...
" ओ , हाय संजय .... कसा आहेस आणि किती दिवसांनी येतोयस ? " अदिती खुशीत येऊन म्हणाली .
" अरे ,हो यार , थोडा बिझी होतो . तू कशी आहेस ? आणि  मंदार साहेब आहेत का घरी  ? " संजयनेही त्याच उत्साहात विचारपूस केली  .
" हो , आहे ना ... म्हणजे तू मला भेटायला आला नाहीस तर ! " तिने लटक्या रागात विचारलं .
" तुम्हालाही  भेटणारच की बाईसाहेब ! " इतक्यात मंदार बाहेर आला , " अरे , यार मंदार , वाचव बाबा तुझ्या बायकोच्या तावडीतून .... "
" ये , ये मित्रा .... " म्हणत मंदारने हसत  त्याचं स्वागत केलं . " आज कसं काय येणं केलंस ? आणि बऱ्याच दिवसांनी आलास ! "
" बघ ना ... किती दिवसांनी उगवलाय हा .... मला वाटतं वर्ष तरी झालं असेल .... " अदिती म्हणाली .
" सॉरी .... सॉरी ....  अरे बाबा , कामं असतात .... काय करणार ? पापी पेट के लिये करना पडता है ... " म्हणत तो सोफ्यावर बसला . अदितीने त्याला पाणी दिलं आणि  चहा करण्यासाठी  ती स्वयंपाकघरात  गेली . मंदार , संजय आणि अदिती हे तिघे कॉलेजपासूनचे मित्र ... पुढे मंदार आणि अदिती एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रीतसर प्रेमविवाह केला . त्यात संजयने त्यांना खूप मदत केली होती . कॉलेज संपलं , मग जो तो आपापल्या कामात व्यस्त झाला . तरी संजय अधून मधून त्यांच्याकडे येत राहिला . त्याला कारण म्हणजे त्याचा विम्याचा व्यवसाय . संजय इन्शुरन्स एजंट होता . बोलण्यात पटाईत आणि आपलं म्हणणं समोरच्याच्या गळी  उतरविण्याचं  कसब अंगी  असल्याने  काही वर्षातच त्याने ह्या व्यवसायात चांगला जम बसवला . वर्षाला त्याचं कमिशन आणि इंसेंटिव्ह काही लाखात जात होतं . तो एक यशस्वी इन्श्युरन्स एजंट म्हणून ओळखला जात होता .  आताही त्याचं काम होतं म्हणून तो मंदारकडे आला होता . पाण्याचा ग्लास समोरच्या  टीपॉयवर ठेवत त्याने लगेच आपल्या बॅगेतून एक फोल्डर काढला .
" तुमची मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू करायची आहे ... पुढच्या आठवड्यात संपतेय तुमची पॉलिसी .... " म्हणत संजयने  त्याच्या फोल्डरमधून काही फॉर्म्स काढले ." ह्या फॉर्मवर तुझ्या सह्या करून दे "
" कुठली पॉलिसी ... ओह ! मेडिक्लेम का ? " म्हणत मंदारने थोड्या नाखुषीनेच ते पेपर्स घेतले .
" हो , फॅमिली कव्हर आहे . तुमच्या दोघांसाठी .... आणि तुझा चेक सुद्धा दे ... उद्या भरून टाकतो लगेच .... "
मंदार बराच वेळ त्या फॉर्म्सकडे पाहात राहिला . त्याला असा विचारात पडलेला पाहून संजयनेच त्याला विचारलं  , “ काय रे ? काय झालं ? करतोयस ना सही ? ”
“ मी काय म्हणतोय संजय , ही पॉलिसी रिन्यू करणं गरजेचं आहे का ? आत्तापर्यंत कितीतरी वेळा मी  ती रिन्यू केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही . आम्हाला त्याची काहीच गरज लागली नाही . शिवाय तो  मेडिक्लेम वापरला नाही तर पैसे तसेच वाया जातात .  आमच्या दोघांच्याही प्रकृती अगदी ठणठणीत आहेत , तेव्हा मला असं वाटत  की ह्यावेळी तुझ्या  त्या मेडिक्लेमचं राहू दे  .... ” म्हणत त्याने तो फॉर्म तसाच टीपॉयवर ठेवला . संजयला ह्या सगळ्या प्रकारांची चांगलीच माहिती होती . विमा किंवा मेडिक्लेमच्या  बाबतीत सर्वसाधारण लोकांचा असाच कल  असतो , आणि ते ह्यात  पैसे टाकायला थोडे नाखुषच असतात . संजयला ट्रेनिंगमध्ये हेच शिकवलं गेलं होतं . विमा किंवा  मेडिक्लेममध्ये पैसे भरून थेट काहीही मिळत नाही , त्यामुळे विमा विकणं हि सगळ्यात अवघड गोष्ट आहे , ह्याची जाणीव संजयला होतीच .  एखादा दुसरा क्लायंट असता तर त्याने वेगळ्या पद्धतीने त्याला समजावलं असतं , पण मंदार तर त्याचाच मित्र होता.  तो सरळ  साध्या  भाषेत त्याला समजावून सांगू लागला . , “  वेडा  बिडा  आहेस काय … आजच्या घडीला मेडिक्लेम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रा !  कधी काय होईल सांगता येत नाही , आणि तुझी पॉलिसी तशी जुनी आहे त्यामुळे बाकीचे बेनिफिट्ससुद्धा वाढतील ... त्यात कॅशलेसची सुद्धा फॅसिलिटी आहे , त्यामुळे पॉलिसी बंद  करायचा विचार मनातून काढून टाक ... मी तुला सांगतो , ह्याचा तुम्हाला पुढे  नक्कीच फायदा होईल ... ”
" अरे ,  कसला फायदा घेऊन बसलास  ? वर्षाला  तीस पस्तीस हजार  प्रीमियम असाच जातोय ... त्याचा काहीच उपयोग नाही ... त्याचे काहीच रिटर्न्स मिळत नाहीत ... माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की पैसा  सत्कारणी लागला पाहिजे . तो  असा वाया जाता कामा नये .... "
" वाया कसा म्हणतोस तू  ? उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली तर तुला तुझ्या  खिशातून एक पै सुद्धा खर्च करावी लागणार नाही ... सगळं काही ह्या पॉलिसीतुन जाईल . असं होऊ नये , टचवूड !  पण समजा काही प्रसंग आलाच तर ही पॉलिसीच  तुझ्या  कामाला येईल .... "  इतक्यात अदिती  चहा घेऊन आली  . " अदिती , यार  तु तरी समजावून सांग तुझ्या नवऱ्याला …  , मेडिक्लेम खरंच खूप महत्त्वाचा आहे . " संजयने  अदितीला  आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला . कारण त्याला माहित होतं कि अदितीने हट्ट केला तर मंदारला नाईलाजाने पॉलिसी रिन्यू  करावी लागेलच …!  ही  युक्ती तो बऱ्याच ठिकाणी वापरायचा … घरातल्या कर्त्या पुरुषाने जर पॉलिसीत पैसे गुंतवायला नकार दिला किंवा टाळाटाळ केली तर तो घरातल्या बाईमाणसाला आपल्या मदतीला घ्यायचा . त्यांना समजेल अशा भाषेत पॉलिसीचं महत्व पटवून द्यायचा. मग त्या बायकाच त्याचं काम सोप्पं करून टाकायच्या .
"  अरे मंदार  , असं काय करतोय  ? तो  एवढं म्हणतो  तर घे  की ती पॉलिसी . "
" अदिती  , तुला काही कळत नाही , या आधी आपण भरपूर पैसे ह्या पॉलिसीत घातलेत , आपल्याला एक रुपयाचाही फायदा झाला नाही .... मग कशाला आपले पैसे वाया घालवायचे ? " मंदारच्या बोलण्यात तुसडेपणाची झाक दिसत होती .
" अरे मित्रा  , पैसे वाया जाणार नाहीत , कधी न कधी तरी उपयोगी येतीलच . या आधी कदाचित तुम्हाला गरज लागली नसेल पण पुढे लागणार नाही असं कसं म्हणता येईल ? " संजय  आपल्या परीने किल्ला लढवत होता
" मी काय म्हणते ,  आता ह्या वर्षासाठी रिन्यू करूया  पॉलिसी , पुढचं पुढच्या वर्षी बघू .... " अदिती .
" आणि ह्या वेळी प्रीमियमसुद्धा थोडा कमी केला आहे कंपनीने , त्यामुळे तुला पैसे कमी भरावे लागणार आहेत . " संजय
" प्लिज , मंदार मी  सांगते म्हणून घे  पॉलिसी , माझ्यासाठी ..... "  
दोन विरुद्ध एक असा मंदारचा पराभव झाला आणि नाईलाजाने त्याला पॉलिसी रिन्यू करायचं मान्य करावं लागलं.
" मी जिथे फुल्या केल्या आहेत तिथे सह्या कर  . " पडत्या फळाची आज्ञा समजून संजयने  लगेच त्याच्यासमोर   फॉर्म समोर धरला . नाखुषीनेच मंदारने त्यावर सह्या केल्या . संजयला चेक मिळाला आणि आता तो निर्धास्त झाला . त्या तिघांच्या आवांतर गप्पा सुरु झाल्या . संजय आणि अदिती दिलखुलासपणे गप्पा मारत होते, पण मंदार मात्र पैसे वाया गेल्याचं दुःख मनात असल्यामुळे गप्पांमध्ये तितकासा भाग घेत नव्हता . संजयच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही.
" अदिती , तुझा नवरा काही बदलला नाही , कॉलेजमध्ये होता तसाच आहे अजून  .... " संजयने गंमतीने टोमणा मारला . अदितीला हसू आलं .
" हो ,  अरे परवा तर गंमतच झाली , मी आणि मंदार स्टेशनवरून रिक्षाने घरी आलो . तर मीटरनुसार ४० रुपये झाले . त्या रिक्षावल्याकडे सुट्टे नव्हते आणि आमच्याकडे  फक्त पन्नासची  नोट होती . मंदार त्याला म्हणाला , पुढच्या चौकापर्यंत चल . तो रिक्षावाला आम्हाला  घेऊन गेला . मंदार म्हणाला परत यु टर्न घे . तसा त्याने यु टर्न घेतला , असं करत आम्ही पुन्हा आमच्या घराजवळ उतरलो , रिक्षाचं भाडं बरोब्बर पन्नास रुपये झालं होतं ....त्याच्या हातात ५० रुपये ठेवले ,  मग आम्ही खाली उतरलो . ” अदिती हसत हसत सांगत होती.
“ धन्य आहेस बाबा … तुला सांगतो अदिती , आमची कधी पार्टी असली आणि काही अन्न  उरलं तर तो पॅक करून घ्यायचा ” संजय गमतीने म्हणाला . मग मंदारच्या अशा वागण्याचे गमतीदार प्रसंग अदिती आणि संजय एकमेकांना सांगू लागले . दोघे त्याची टिंगल करीत  असल्यामुळे आधी  मंदार फुगून बसला , मग त्यालाच त्याच्या असल्या वागण्याची  गंमत  वाटून तोही त्यांच्या हसण्यात सामील झाला .
गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कुणालाच कळलं  नाही . अदितीने संजयला जेवणासाठी थांबवून घेतलं . तो नको नको म्हणत होता पण अदिती काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती . मग मंदारही गमतीने म्हणाला , “ मला नको असताना तो मेडिक्लेम माझ्या माथी मारलास ना … भोग आता आपल्या कर्माची फळं … ” आधी त्याच्या बोलण्याचा रोख कुणाला कळला  नाही , मग संजय अचानक स्फोट झाल्यासारखा जोरजोरात हसू लागला . मंदारही  त्या हास्यात सामील झाला .  अदिती चांगलीच चिडली …
मधे  दोन आठवडे  निघून गेले  आणि एके दिवशी संजयला मंदारचा फोन आला . त्याचा  सूर अत्यंत रडवेला झाला होता .
“ काय झालं मंदार  ?  आणि इतका घाबरलेला का आहेस  ? ” पलीकडून संजयने विचारलं .
“ अरे , अदितीचा ऍक्सिडंट झालाय … तिला आताच सिटी हॉस्पिटलला आणलंय … तू प्लिज इथे येशील  का ?  … मला काहीच सुचत नाही … ”
संजय लगेच तिथे पोहोचला देखील … आल्या आल्या त्याने विचारलं , “ कसा काय झाला ऍक्सिडंट ? ”
“ आज सकाळी ती बाथरूममध्ये घसरून पडली , खूप जोरात पडली ,  तिला उठता येईना … मलाही काही सुचेना तेव्हा लगेच रिक्षा करून इथे घेऊन आलो . डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढलाय , म्हणाले कमरेच्या हाडाचं  ऑपरेशन करावं  लागणार आहे …  ”
“ अरे  बापरे ! … आता कुठे आहे ती ? ”
“ तिला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं आहे … काय होऊन बसलं यार … ” असं म्हणून मंदार  रडायलाच लागला . संजय त्याला धीर देत होता . पण त्यालाही मनातून अदितीची काळजी वाटत होती  . ऑपरेशन मोठं होतं . कंबरेचं  हाड तुटल्याने ते रिप्लेस करावं लागलं . साडेचार पाच लाख खर्च आला , परंतु सुदैवाने संजयने आग्रहाने  काढून घेतलेल्या मेडिक्लेम पॉलिसीमुळे मंदारला त्याच्या खिशातून एकही रुपया भरावा लागला नाही . त्याने संजयचे खूप आभार मानले . त्या प्रसंगातून सावरायला अदितीला सहा महिने घालवावे लागले . आता ती हळू हळू चालूही लागली होती . वर्षभरात ती पूर्वीसारखी हिंडू फिरु लागली . असाच एकेदिवशी संजय पुन्हा मंदार आणि अदितीच्या घरी आला .
" मंदार , आपल्याला संजयचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत ... त्याच्याच  आग्रहामुळे आपण मेडिक्लेम काढला आणि आपला पाच लाखांचा खर्च वाचला . संजय , खरच मनापासून आभार ... थँक्स  यार ...  " अदिती  कृतज्ञता व्यक्त करू लागली .
" हो , खरंच .... थँक्स यार संजय…  इतका मोठा खर्च मी कसा काय केला असता … देव जाणे !  "  मंदार  म्हणाला .
" इट्स ओके ...  पण आताही मी त्याच कामासाठी आलोय . तुमच्या त्याच मेडिक्लेमच्या पॉलिसीचे रिन्यूएशन आहे . काय मग मंदार साहेब , आता पॉलिसी रिन्यू करायची की नाही ? " तो मंदारकडे  पहात गंमतीने म्हणाला .
" सॉरी यार संजय .... आता काय बोलणार मी .... ? आण  तुझे ते फॉर्म्स ... कुठे सह्या करायच्यात ते बोल ... "

संजयने त्याचा फॉर्म भरून घेतला . प्रीमियमचा  चेक घेऊन तो जायला  निघाला पण पुन्हा अदितीने त्याला तसं जाऊ दिलं नाही .तिने आग्रहाने त्याला जेवणासाठी थांबवून घेतलं .  तिघांनी जेवण केलं . भरपूर गप्पा मारल्या . प्रसन्न मनाने संजय त्यांच्या घरून निघाला . रात्रही खूप झाली होती . मंदार आणि अदिती  बेडवर आडवे झाले . थोड्याच वेळात अदितीला गाढ झोप लागली   पण मंदार जागाच होता . त्याने एकदा अदीतीकडे पाहिलं . वर्षभर तिला फारच त्रास झाला होता .  त्याला झोप लागेना . तो उठून हॉलमध्ये आला .  सिगारेट पेटवली आणि धुरांची वलये हवेत सोडत  निवांत आरामखुर्चीवर बसला . अचानक  त्याच्या मनात अदिती आणि संजयचा विचार आला  . कॉलेजमध्ये त्याचं आणि अदितीचं जुळायच्या अगोदर ते दोघे खूप चांगले मित्र होते  …       ‘ हे दोघे नुसते  मित्र होते कि त्यापेक्षा  आणखी काही ? अदिती कधी कधी त्याच्याशी खूपच लगट करते …  तिच्याच  आग्रहामुळेच आपण ती मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केली . नाहीतर आपण ती पॉलिसी रिन्यू करणार नव्हतोच …  अदितीला  खूपच त्रास झाला . त्या मेडिक्लेममुळे आधी भरलेले सगळेच पैसे वसूल झाले . पण आता ह्यावर्षी  भरलेल्या पैशांचं काय ? तेही वसूल व्हायला हवेतच !  बिचारी अदिती , आणखी  किती त्रास सहन करेल , कुणास ठाऊक … !   सिगारेटच्या धुरांची वलये हळूहळू मोठा आकार घेऊ लागली .

Wednesday, April 26, 2017

अमृतातेहि पैजा जिंके ...

                                                         
                            ऑफिसातल्या टेबलसमोर मुकेश डोकं धरून बसला होता. त्याला काही सुचत नव्हतं .  गेले सहा महिने त्याने नुसत्या विचारात घालवले होते , पण जसजसा जास्त विचार करी तसतसा तो आणखीन गोंधळात पडत होता .  लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेच असूनही  त्याचा निर्णय झाला नव्हता .  त्याच्या ह्या निर्णयावर पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या . निर्णय जर चुकला तर सर्व खापर त्याच्या डोक्यावर फुटणार होतं , आणि जवळपास तशीच परिस्थिती निर्माण झाली होती . आयुष्यात कधीतरी अशी वेळ येतेच ज्यात घेतलेले निर्णय पुढची दिशा ठरवतात , ती वेळच खुप महत्वाची असते . मुकेश सध्या विचित्र परिस्थितीत अडकला होता . कालच मित्रांबरोबर झालेला  संवाद.... संवाद कसला  , वादच !   त्याला आठवला .  
" मुलगा तीन वर्षांचा झाला तरी अजून स्कुलमध्ये टाकला नाही ? माझी मुलगी तर अडीच वर्षांची असतानाच मी प्ले ग्रुपला टाकली ... हाऊ कॅन यु बी सो केअरलेस मुक्या ? "
" मुलाच्या भविष्याचा काही विचार आहे का नाही तुला ? "
" इतका आळशीपणा बरा नाही रे ... स्वतः तर आळशी आहेस आणि  मुलाला पण तसल्याच सवयी लावतोस ? "
मित्रांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे मुकेशला काही बोलताच आलं नव्हतं . मुलाच्या शाळेच्या  बाबतीत  आपण थोडा  उशीरच केला असा विचार  मनात येऊन  त्याला आता अपराधी वाटू लागलं .  त्याला तसं कारणही होतं . गेले सहा महिने तो त्याच विचारात होता . त्याने काहीतरी मनाशी  ठरवलं होतं  , पण आजूबाजूची परिस्थिती अशी होती की त्याला निर्णय घ्यायला वेळ लागत होता . तरी मोठ्या धीराने त्याने आपल्या मनातला विचार मित्रांसमोर बोलून दाखवण्याचा निश्चय केला . आपला निर्णय जर ह्यांना सांगितला तर  आत्ता ते जेवढं बोलतायत त्याच्या दुप्पट बोलणी  खावी लागणार ह्याची त्याला खात्री झाली होती .
" मी  मुलाला मराठी शाळेत पाठवायचा विचार करतोय  " मुकेश म्हणाला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे   त्याच्या मूर्खपणाचे वर्णन करणारे बॉम्बगोळे त्याच्यावर येऊन आदळलेच !
" तुला अक्कल आहे का रे ? मराठी शाळेत ? "
" मराठी शाळांची अवस्था काय झालीय म्हायतेय का तुला .... ? "
" जगाच्या कॉम्पिटिशनमधे  तुझा पोरगा कसा टिकेल रे ? "
" मुक्या , मला माहित आहे तुला मराठीचा लय पुळका आहे ते , पण तुझ्या पोराचं कशाला नुकसान करतोय ? "
" इंग्लिश मस्ट झालंय रे आजकाल .... त्याला ऑप्शन  नाही "
नाही म्हटलं तरी मित्रांच्या ह्या हल्ल्यापुढे तो एकटा असा किती टिकणार होता ? सगळ्यांनीच  त्यांची मुलं इंग्लिश मिडीयममधे  घातली होती आणि  ज्यांची लहान होती , किंवा ह्या दुनियेत अद्याप  आलेली नव्हती  , ती सुद्धा इंग्लिश मिडीयममधेच जाणार होती . काहींनी तर मुलांच्या शिक्षणाचं इतकं टेंशन घेतलं होतं की , मूल जन्माला यायच्या आधीच त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची  तयारी करून ठेवली होती . प्रवाहाचं म्हणणं होतं की , इंग्लिश मिडीयमच मुलांच्या शिक्षणासाठी योग्य आहे आणि त्या प्रवाहाच्या उलट जायचं म्हणजे विरोध होणार हे तर निश्चित होतंच. मुकेशला कुठेतरी मनातून असं वाटत होतं की  आपल्या मातृभाषेतून,  म्हणजे मराठीतून मुलाने शिक्षण घ्यावं. परंतु त्याच्या ह्या विचारांना प्रथम  सुरुंग लागला तो त्याच्या स्वतः च्या घरातूनच !
" माझ्या बहिणीची मुलं कॉन्व्हेंटमध्ये जातात , आणि आपला मुलगा त्या थर्डक्लास मराठी शाळेत टाकला तर काय किंमत राहील आपली ?  त्या मुलांसारखा  फाड फाड इंग्लिश कधी बोलायला शिकेल तो ? " इति अर्धांगिनी .  
" त्या इंग्लिश मिडीयमची मुलं पोएम का काय म्हणतात ते ऐकायला  फार गोड वाटतं बाई ... " इति मातोश्री .
" इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध ! ते पचायला सोपं नाही , तेव्हा त्याचं शिक्षण इंग्लिश मिडीयममधूनच  व्हायला पाहिजे " इति पिताश्री .
               बायकोने जाऊन इंग्लिश मिडीयमच्या शाळांचे फॉर्मसुद्धा आणून ठेवले होते . काय करावं त्याला सुचेना . तशा त्याने जवळच्या दोन तीन मराठी शाळा पाहून ठेवल्या होत्या , परंतु त्यांची स्थिती पानगळ झालेल्या झाडांसारखी झाली होती . एकेका वर्गात दहा - पंधराच मुलं ! तुकड्या वगैरे भानगड इतिहासजमा झाली होती. तुकड्यांचेच  तुकडे झाले होते . त्यात शाळेत म्हणाव्या तशा सोयी सुविधा नव्हत्या . त्यामुळे खालसा झालेल्या संस्थानाची व्हावी तशी मराठी शाळांची अवस्था झाली होती. वास्तविक मुकेश मराठी शाळेत शिकलेला , त्याची बायकोही मराठी शाळेची विद्यार्थिनी , त्यांच्या काळी इंग्लिश मिडीयमच्या शाळा फार नव्हत्या  आणि तशी काही गरजही  वाटत नव्हती  पण आता मात्र  गेल्या काही वर्षात  मशागत न केलेल्या शेतात तण उगवावं तशा इंग्लिश मिडीयमच्या शाळा उभ्या राहिल्या होत्या . मराठी शाळांची स्थिती भिकेला लागलेल्या सावकारासारखी  झाली होती . कारण कोणतेच सुजाण आईबाप आपल्या मुलाला मराठी शाळेत पाठवायचं धाडस करत नव्हते . मुलं नाही म्हणून शाळांची दयनीय अवस्था आणि  शाळांच्या सुमार स्थितीमुळे मुलं येत नव्हती अशा दुष्टचक्रात मराठी शाळा अडकलेल्या .... नाही म्हणायला काही मराठी शाळा चांगल्या होत्या , पण आता सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं त्यांच्या बाबतीत होत होतं .  मुलासाठी मराठी शाळेत प्रवेश घेण्याची खूप इच्छा असूनही मुकेशपुढे हे प्रश्न उभे राहिले होते . त्यात पुन्हा मुलगा मोठा झाल्यावर समजा तो स्पर्धेत मागे पडला तर तोच आपल्याला विचारील की त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत का घातला नाही ? तो आपल्यालाच दोष देईल ...  त्यावेळी आपण त्याला काय उत्तर देणार ?  काय करावं ? त्याचं डोकंच चालणं बंद झालं होतं. कामात लक्ष लागेना . काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ... कोणीतरी  योग्य दिशा दाखवायला हवी … देवा ! काय करू काहीच कळत नाही …  विचारात असतानाच ,  अचानक टेबलावर पडणाऱ्या प्रखर प्रकाशाने त्याने वर पाहिलं , तर त्याचे डोळेच दिपून गेले . समोर एक तेजस्वी तरुण उभा होता , अंगावर भगवी वस्त्रे परिधान केली होती . मानेपर्यंत रुळणारे , मागे फिरवलेले काळेभोर  केस . , गळ्यात रुद्राक्षांच्या माळा  , कपाळावर अष्टगंध आणि डोळ्यांत अलौकिक तेज . समोर कोणीतरी दिव्य व्यक्ती उभी असल्याचं त्याने पाहिलं. आधी तर त्याला कळेना कि हा काय प्रकार आहे ? मग त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली .  त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना , समोर साक्षात ज्ञानेश्वर माऊली उभे होते .
" माऊली तुम्ही ? " त्याने आश्चर्याने विचारलं .
" होय "  चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणत माऊली म्हणाले .
"मी ... मला ....  मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना ... " समोरचं तेजस्वी रूप बघून मुकेश पुरता गोंधळून गेला .
" बऱ्याच दिवसांपासून तू चिंतेत आहेस ... म्हणून म्हटलं तुला भेटावं "
" माऊली , तुम्ही मला भेटायला आलात ? हे तर माझं परमभाग्यच ! पण मला अजूनही विश्वास बसेना ... " मुकेशने  आजूबाजूला पाहिलं , त्याला सगळ्यांना सांगावंसं वाटत होतं कि साक्षात ज्ञानेश्वर माउली त्याच्या समोर उभे आहेत , पण जो तो आपापल्या कामात मग्न होता. कुणाचंच  त्याच्याकडे लक्ष नव्हतं.
" तुझ्याशिवाय मला कोणीही पाहू शकत नाही . त्यामुळे तू बाकीच्यांना काही सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस .  सध्या तू ज्या विचारात गुंतलेला  आहेस त्यात तुला मदत करावीशी वाटली म्हणून मी आलोय "
" बरं झालं माउली तुम्ही आलात.  आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा ... मला काहीच सुचत नाही "
“ त्यात न सुचण्यासारखं काय आहे ?  चल , आपण जरा एक फेरफटका मारून येऊ ... "
" चालेल ....  पण कुठे माऊली ?"
" आपण काही ठिकाणी जाणार आहोत . कदाचित त्यामुळे तुला निर्णय घ्यायला मदत होईल ... "
" ठीक आहे , मी लगेच तयार होतो . ” म्हणत त्याने ड्रॉवरमधून एक कागद काढला आणि  त्यावर काहीतरी लिहू लागला .
" काय लिहितोयस ? "
" अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा अर्ज…  " मुकेश  म्हणाला, त्यावर माऊली प्रसन्न हसले  अन म्हणाले , " त्याची काही गरज नाही .... आपण सूक्ष्मदेहाने जाऊन लगेच परतणार  आहोत "
" ज्ञानेश्वर माऊली , मी धन्य झालो .... अशाही माझ्या सी एल संपतच आल्या होत्या ... "
" डोळे मिट ...." माऊली म्हणाले.  मुकेशने आपले दोन्ही डोळे बंद केले आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या कानांवर पुन्हा  शब्द पडले , " डोळे उघड " त्याने डोळे उघडले . ते एका इंग्लिश मिडीयमच्या शाळेत आले होते .
" माऊली हे आपण कुठे आलोय ? कोणती शाळा आहे ही ? "
" ते तितकंसं महत्वाचं नाही . आता आपण ह्या शाळेतल्या समोरच्या त्या  वर्गात जाणार आहोत . फक्त  एक काळजी घ्यायची ,  कसलाही आवाज करायचा नाही . जे समोर घडत आहे ते फक्त पाहायचं , समजलं ? " मुकेशने लहान मुलासारखी  मान डोलावली .  
दोघे सूक्ष्मदेहाने समोरच्या वर्गात गेले . तो चौथीचा वर्ग होता .  वर्गात टीचर शिकवत होत्या , अर्थातच इंग्लिशमधे ! माउलींनी खूण  करताच खिडकीशेजारच्या  बाकावर बसलेल्या एका मुलाकडे मुकेशचं लक्ष गेलं . तो मुलगा  मख्ख चेहऱ्याने शिकवणाऱ्या टीचरकडे पहात होता . त्याला काहीच समजत नव्हतं . टीचरने त्यालाच एक प्रश्न विचारला , पण त्याला काहीच न समजल्यासारखा पाहु लागला . टीचर त्याला ओरडली . ती भाषा त्याला समजत नव्हती पण टिचरच्या हावभावावरून ती आपल्याला ओरडतेय हे त्याच्या लक्षात आलं. तो आणखीन अस्वस्थ झाला . आजूबाजूची मुलं त्याच्याकडे बघून हसु लागली  .  काय करावे हे न सुचून त्याच्या त्याचा चेहरा मलूल पडला . मुकेशला त्या लहान मुलाची दया आली . टीचर काय बोलतायत तेच त्याला कळत नव्हतं . शेवटी चिडून टीचरने त्याला खाली बसायला लावलं . तो बेंचवर  डोकं ठेऊन हुंदके देऊ लागला . मुकेशला खूप वाईट वाटलं . माऊली त्याला बाहेर घेऊन आले .
" तुला काय समजलं मुकेश ? " माउलींनी विचारलं .
" त्या मुलाला काहीच कळत नव्हतं . इंग्रजीत बोललेलं त्याला समजतच नव्हतं  बहुतेक ... "
" अगदी बरोबर ! मुलाच्या घरात मराठी भाषा बोलली जाते , आणि शाळेत इंग्रजी भाषा , त्यामुळे त्या मुलाचा गोंधळ उडालेला आहे. दोन्ही भाषांची मिसळ झाली आहे त्याच्या डोक्यात … शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नाचं त्याला आकलन झालं नाही त्यामुळे उत्तर काय देणार ? अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच त्याचा उरलासुरला आत्मविश्वासही  नाहीसा होईल . ”
“ मला त्या मुलाची दया आली . वाटलं, त्याच्या जागी माझाच मुलगा आहे . ”
“ साहजिकच आहे . सर्वच नाही पण  बऱ्याच मुलांची  अशी अवस्था  होत असेल . खरं तर प्रत्येक मूल  हे बुद्धिमान असतं , पण जरा त्याच्या कलानं  घेतलं पाहिजे . त्याला समजेल अशा भाषेत त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे . त्याला त्याच्या मातृभाषेत सांगितलेलं लवकर समजतं . बऱ्याच पालकांना ह्याची जाणीव नसते . मूल  शाळेत अभ्यास करत नाही म्हणून त्याच्यावर पुन्हा अभ्यासाची जबरदस्ती केली जाते . पण जर त्याला भाषाच समजली नाही तर ते बिचारं मूल तरी काय करील ? ”
“ माउली , खरं आहे अगदी तुमचं … मुलाला समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे . आणि मातृभाषेशिवाय त्याला जवळची दुसरी भाषा कोणती नसेल …  ”
“ बरोब्बर !  चल , आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी जायचंय . डोळे मिट ” माउली म्हणाले
              दोघे एका कुठल्याशा  चाळीत आले.  सूक्ष्मदेहाने समोरच्या घरात गेले . घर मध्यमवर्गीय माणसाचं होतं . बेताचं सामान , गरजेपुरती भांडी स्वयंपाक घरात होती . भिंतींचे पोपडे निघालेले , वर पत्रा उन्हाने तापला , त्यामुळे आत खुपच उष्णता जाणवत होती . एक मध्यमवयीन माणूस त्या घरात आला . तो त्या घराचा कर्तापुरुष असावा , कारण त्या घरातल्या गृहिणीने लगेच उठून त्याला पाणी दिले आणि विचारले , " आज लवकर कसे काय आलात ? " त्यावर तो माणूस काहीच बोलला नाही . त्याच्या चेहऱ्यावरून नवरा कसल्यातरी चिंतेत आहे हे त्या गृहिणीला समजलं . तिने काळजीने  पुन्हा विचारलं . पण तो सांगायचं टाळत  होता . शेवटी त्या गृहिणीने शपथ घातली तेव्हा त्याचा नाईलाज झाला .  
" माझा जॉब गेलाय . दोन महिन्यांची नोटीस मिळालीय ऑफिसमधून…  " म्हणत त्याने एक कागद तिच्यासमोर धरला . पायाखालची वाळू सरकावी तसं काहीतरी त्या गृहिणीला वाटलं . त्या धक्क्यातून  सावरल्यावर तिच्या मनात  पहिला विचार आला तो त्यांच्या मुलांचा ! त्यांना दोन मुलं होती , मोठी मुलगी आठवीत आणि लहान मुलगा पाचवीत . आपल्याला मिळालं नाही पण, मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून दोघांना  महागड्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत घातलं होतं . आधीच त्यांच्या भरमसाठ फिया भरून त्या माणसाचं कंबरडं मोडलं होतं ,  त्यात आता त्याची नोकरी गेली होती . दुष्काळात तेरावा महिना !
“ आता काय करायचं ? मुलांच्या शिक्षणाचं कसं  होईल ? ” गृहिणीने काळजीने विचारलं .
“ तू काळजी करू नको , मी करीन काहीतरी … एक दोन ठिकाणी सांगून ठेवलंय … बघू काय होतं ते ”
“ आपलं काही नाही हो , पण पोरांच्या शाळेचा काही प्रॉब्लेम व्हायला नको ”
“ तू नको काळजी करू … मी तसं काही होऊ देणार नाही ”
“ आपल्याला आता खूप काटकसर करावी लागणार … पुढच्या महिन्यात दोघांचे मिळून सव्वा लाख फी भरायचीय  … काहीच सुचत नाही आता … ” तिने  डोक्याला हात लावला .
माउलींनी खूण  केली आणि दोघे त्या घराबाहेर आले .
“ खरंच माउली , शिक्षणाचा नुसता बाजार झालाय … मध्यमवर्गीयांच्या मुलांनी तर शिकावं कि नाही हाच प्रश्न पडलाय … ” मुकेश म्हणाला .
“ महाग म्हणजे चांगलं,  असं प्रत्येकवेळी असेलच असं नाही .  अरे , मध्यमवर्गीयच काय पण चांगली आर्थिक परिस्थिती असलेले लोकही पोरांच्या  फियांच्या भाराने वाकलेत … त्या मानाने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये फी कमी आहे आणि मुलांना विषयाचं   आकलन चांगलं होतं . ”
“ माउली , आकलन होतं म्हणजे नेमकं काय ? ”
“ त्यासाठी आपण आणखी एका ठिकाणी जातोय . डोळे मिट ”
दोघे एका मराठी माध्यमाच्या शाळेच्या आवारात आले . माउली मुकेशला घेऊन त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये  गेले . तिथे आधीच एक पालक आपल्या मुलाला घेऊन आले होते . त्यांचा संवाद चालू होता .
“ पण तुम्हाला असं का करावंसं वाटलं ? ” मुख्याध्यापकांनी मुलाच्या वडिलांना विचारलं .
“ सर  , खरंच माझी चूक झाली . शेजारच्याचा   मुलगा  कॉन्व्हेंटमधे  जातो  म्हणून मी पण ह्याला त्याच शाळेत टाकला . पहिल्यांदा बरं वाटलं . त्या इंग्लिश कविता , पोएम म्हणायचा , वन टू  टेन म्हणायचा  , मस्त वाटायचं … वाटायचं आपलं पोरगं किती हुशार झालं इंग्लिश मीडियमच्या शाळेत जाऊन … पण माझा गैरसमज होता तो … आता त्याला शाळेत काय शिकवतात ते कळतच  नाही आणि  पोराचा अभ्यास घ्यायला आम्हाला वेळ नाही . त्याची क्लासटीचर म्हणाली कि ह्याला सांगितलेलं काही समजत  नाही . मग मला वाटलं कि आता त्याला मराठी शाळेतच टाकू . त्याचं ह्या वर्षी ऍडमिशन होईल ना ? प्लिज सर काहीतरी करा … पण ह्याला शाळेत घ्या . खूप उपकार होतील … ”
“ नशीब तुम्हाला लवकर समजलं . अहो , मुलांचं शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतच होणं गरजेचं आहे . त्याच भाषेत मुलांना विषयाचं आकलन नीट होतं . कारण मुलं त्यांच्या मातृभाषेतच विचार करतात . शिक्षणाची  तीच भाषा असली तर विषय त्यांना लगेच समजतो …  ”
“ मला तुमचं म्हणणं पटलंय सर . कितीही पैसे लागले तरी चालतील , पण त्याला तुमच्या  मराठी शाळेत घ्या  ”
“ पैशांचा प्रश्न नाहीच ! आपली फी काही जास्त नाहीच , पण तुमचा निर्णय पक्का झालाय ना ? ” मुख्याध्यापकांनी विचारलं .
“ हो … हो … सर ! एकदम पक्का !  ”
त्यांचं बोलणं संपलं आणि मग मुकेश आणि ज्ञानेश्वर माउली हळूच त्यांच्या ऑफिसबाहेर आले .
“ माउली , आता मला कळतंय तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय ते …  ”मुकेश म्हणाला .
“ शिकण्याची भाषा जर तुमच्या मातृभाषेव्यतिरिक्त असेल तर बऱ्याच वेळा  मुलांना शाळेत शिकवलेलं समजत नाही , त्यामुळे मग पालक क्लास लावतात . हे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखं आहे . क्लासमधे तर मुलांना काही समजो न समजो , थेट उत्तरं पाठ करायला सांगतात. आणि नुसतं पाठांतर चांगलं असून उपयोग नाही , तर संकल्पना समजणं  महत्वाचं “
“ तुमचं म्हणणं मला पटतंय . पण एक शंका आहे … समजा माझा मुलगा मी मराठी शाळेत पाठवला , आणि उद्या  तो ह्या स्पर्धेच्या जगात मागे पडला तर ? तर तो मलाच दोष देईल … ”
“ इंग्रजी भाषा ही  अन्य भाषेसारखी एक भाषा आहे. तिचा बाऊ करता काम नये ,  ती शिकलीच पाहिजे , पण त्यासाठी तुमचा पाया महत्वाचा ! आणि तो मातृभाषेतुन शिकल्यानेच मजबूत होणार आहे . असे कितीतरी लोक आहेत जे मातृभाषेतून ,  मराठीतून शिकले आणि पुढे मोठे झाले … आणि असे कितीतरी लोक आहेत जे इंग्रजी भाषेतून शिकतात आणि त्यांचं पुढे काहीही होत नाही . म्हणजे माझा म्हणायचं उद्देश हा कि यशस्वी होणं हे ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे … मातृभाषेत घेतलेल्या शिक्षणातून मुलाचा पाया मजबूत होतो,  त्याचा  त्याला पुढे जाण्यास उपयोगच होतो .  ”
” पण इंग्लिश बोलणाऱ्याची  एक वेगळीच छाप पडते … त्यात मराठी माध्यमाची मुलं कुठेतरी मागे पडतात . “
“ आपल्याकडे ज्याला इंग्रजी चांगलं बोलता  येतं तो सर्वात बुद्धिमान ! असा एक समज आहे  जो अतिशय चुकीचा आहे . सरावाने मराठी शाळेत शिकलेली मुलंही चांगलं इंग्रजी बोलतात .  त्यामुळे तू हा विचार मनातून काढून टाक . चल , आता आपण एका क्लासमध्येच जाऊ . तुला प्रत्यक्षच पाहायला मिळेल . " माऊली म्हणाले .
दोघे एका इंग्लिश मिडीयमच्या क्लासमध्ये पोहोचले . त्यात शिकवणारी टीचर मुलांना रकाने च्या रकाने पाठ करायला सांगत होती . मुलांना आपण काय वाचतोय , कशासाठी वाचतोय , काहीही समजत नव्हतं . फक्त टीचरने ह्या प्रश्नासाठी हा पॅरेग्राफ पाठ करायला सांगितला , तो करून टाकायचा ,  एवढंच ध्येय त्यांच्या समोर होतं .  ती मुलं पुढे मागे डुलत पाठांतरात गढून गेली होती . त्यात दोन नववीतली मुलं केमिस्ट्रीचं  पुस्तक उघडून बसली होती . थोड्या वेळाने  टीचर त्यांच्या जवळ आली आणि त्या दोघांना त्यांनी पाठ केलेला उतारा म्हणून दाखवायला सांगितला . दोघांनीही थोडं फार अडखळत तो उतारा बोलून दाखवला . खाण्याच्या सोड्याबाबत परिच्छेद  होता .   त्यातल्या एकाने दुसऱ्याला तो वाचत असलेल्या वाक्याचा अर्थ विचारला . वाक्य होतं baking soda is  used to lighten  bread . आता ह्या वाक्याचा दुसऱ्या मुलाने जो अर्थ सांगितला तो ऐकून तर मुकेशला चक्कर येईल कि काय असं वाटू लागलं  . तो मुलगा  दुसऱ्याला  म्हणाला ,         ‘ बेकिंग सोडा युज केल्यावर ब्रेड मधून लाईट येतो . ‘
“ माउली , आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला . मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवलं तर त्यांना विषयाचं आकलन होतं . विषय समजायला सोपा जातो . जास्त  कष्ट घ्यावे लागत नाहीत . आणि त्यामुळे त्यांचं बालपण मुक्तपणे त्यांना जगता  येतं . खरंच माउली , मी इतके दिवस उगाचच वाया घालवले . आता मात्र ठरलं ! अगदी पक्कं  ठरलं … माझा मुलगा मराठी शाळेत जाणार … ”
“ मुकेश , तू घेतलेल्या निर्णयामुळे मला आनंदच झाला पण  आजही माझ्या मनात एक रुखरुख लागून राहिली आहे … सर्वसामान्य लोकांना भगवत्गीता  समजावी म्हणून मी तिचं ज्या  मराठीत भाषांतर केलं , ज्या मराठी भाषेला ९०० वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे , ती आपली मातृभाषा कमकुवत कशी असेल ? त्यावेळी जशी संस्कृत होती तशीच आज इंग्रजी भाषा झाली आहे . माझ्या मराठीला नेहमी दुय्यम दर्जा का ? मराठी हि अन्य कुठल्याही भाषेपेक्षा कमी नक्कीच नाही. तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा अभिमान नसेल तर काय उपयोग ?  ”
“ नाही माउली , तसं बिलकुल नाही …  आम्हाला मराठीचा अभिमान आहे .
‘ मराठी आहे , मराठीच राहणार ,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार ’
अशा प्रकारचे मेसेज आम्ही व्हॉट्स अपवर पाठवत असतो … ” मुकेश गर्वाने म्हणाला त्यावर माउली दिलखुलास हसले .
“ बरं ते जाऊ दे ,  मराठीचा आभिमान तर हवाच ! त्याचबरोबर इंग्रजीसारखी जगाची भाषाही शिकायला हवी . पण आपला पाया मात्र मातृभाषेशिवाय पक्का होणार नाही हेही तितकेच खरे ! मुकेश , तुझा निर्णय ऐकून मला आनंद झाला . मला आता  निघायला हवं …
माझ्या मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
माउलींच्या रसाळ वाणीने मुकेशचे डोळे आपोआप मिटले गेले . त्याने डोळे उघडले तेव्हा तो ऑफिसच्या टेबलापाशी होता . आजूबाजूला माउली कुठेच दिसत नव्हते . परंतु माउलींनी त्याला दिशा दाखवली होती . आता कोणीही काहीही म्हणाले तरी  तो त्याच दिशेने जाणार होता . त्याचा निर्णय आता पक्का झाला होता ….

Saturday, February 13, 2016

बांद्रा वेस्ट .... एक थरारक ई बुक

बांद्रा वेस्ट .... एक थरारक ई बुकआपल्याला कळवण्यास अतिशय आनंद होतोय कि मी लिहिलेलं ई  बुक  " बांद्रा  वेस्ट " हे पुण्याच्या सृजन ड्रीम्स प्रा. लि . या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं  आहे .
ही  कथा आहे रॉड्रिकची … एक आळशी आणि निष्काळजी तरुणाची …. ही  कादंबरी आपल्याला www.bookhungama.com  ह्या साईट वर वाचायला मिळेल

खाली दिलेल्या लिंक वरून आपण हे पुस्तक download  करू शकता …

ई बुक download करण्याची पद्धत ...

(बऱ्याच जणांना माहित असेल तरीही ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी )
1. खाली दिलेल्या लिंक वरुन साईट वर जाता येईल
2. त्याव्यतिरिक्त purchase मधे जाऊन search मधे bandra west टाईप केल्यास पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसेल
3. त्यानंतर add to cart येथे click करावे
4. Registration करावे . नंतर login id व password तयार करुन login करावे
5. Proceed to Check out करावे
6. आपल्याला जो पर्याय योग्य वाटेल तेथून 30 रु. Pay करावे . (Credit card , Debit card , Net banking wallets)
7. ई बुक download करावे .
8. मोबाईल वर वाचण्यासाठी play store वरुन book hungama चा app download करावा .
9. त्यात login करावे 
 10. ई बुक download करावे आणि त्याचा आस्वाद घ्यावा ....

हि लिंक वापरा  :-

http://www.bookhungama.com/index.php/bandrawest.htmlSunday, November 1, 2015

लोकल डायरी -- ३०

 http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
 http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post_18.html लोकल डायरी -- २३
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post.html लोकल डायरी -- २४
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post_12.html लोकल डायरी -- २५
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post.html लोकल डायरी --२६
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post_13.html लोकल डायरी -२७    
                                                
                   लोकल डायरी --  ३०
Hi....
Aaj aahes ka train la ?  ( आज सकाळी सकाळी व्हॉट्स ऍप पाहिलं तर अँटी व्हायरस चा मेसेज !) मला जरा आश्चर्यच वाटलं  आणि गंमतही ...
                                                      Ho ... aahe .... whats d matter ?
Nahi .... sahaj....     ( तिचा रिप्लाय आला . )   जेव्हा एखादी मुलगी ‘ काही नाही  सहज ’ असं  म्हणते तेव्हा नक्कीच काहीतरी वेगळं असतं , असं शरद म्हणायचा .  म्हणजे अँटी व्हायरसच्या मनात काहीतरी चालू आहे आणि तिला ते आपल्याला  सांगायचं असेल ... कदाचित तिच्या आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत तर नसेल ?   दोन शक्यता आहेत ... जर त्यातली आपल्याला हवी असलेली शक्यता नसली तर ? तर काय करणार ?  जाऊ दे ... आधी आपण वेळेवर  तरी जाऊ ... आणि बोलता आलं तर बोलुही तिच्याशी … असा विचार करुन मी घाई घाईने निघालो . प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तर आमची लोकल आधीच येऊन विश्रांती घेत उभी होती . मी लगबगीने निघालो . बरीच गर्दी होती. उतरणारे लोक आणि चढणारे लोक ह्यांची मिसळ झाली .  लोक आपापल्या वेगात पुढे चालले होते .  त्यामुळे वेगाने पुढेही जाता येत नव्हते . त्यात माझ्यापुढे एक मुलगी कानाला मोबाईल लावून तिच्याच धुंदीत हळूहळू पुढे चालली होती . अरे देवा ! ही तीच मुलगी आहे जिला विना मोबाईल मी कधी पाहिलंच नव्हतं . प्लॅटफॉर्मवर सकाळी सकाळी बरेच ओळखीचे चेहरे दिसतात . त्यात ही  मुलगी सुद्धा होती . ती नेहमी फोनवरच बोलत असते . बघावं तेव्हा फोन कानाशी ! बहुतेक फोन घेऊनच जन्माला आली असावी . कसंतरी वाट काढत मी तिच्या पुढे  निघालो . तेवढ्यात लोकलने हॉर्न दिला . आणि मला अक्षरशः धावत गाड़ी पकडायला लागली .
" अरे मला वाटलं आज तू काय येत नाही ..." सावंत म्हणाले .
" जाम गर्दी वाढलीय हो आज काल गाडीला .... " मी दम खात म्हणालो .
" बस ... बस ..." म्हणत शरदने मला बसायला त्याची जागा देऊ केली पण मी त्याला उठु दिले नाही . आता बसलो तर अँटी व्हायरस कशी दिसेल ? मी तिलाच शोधत असताना माझा फोनचा मेसेज टोन वाजला . (  १००  वर्षे आयुष्य ! तिचाच मेसेज )
" mazi train miss zali ..." अरे देवा !  म्हणजे आज भेटणार नाही तर ती ...! मला एकदम निराश झाल्यासारखं वाटलं . ज्या  उमेदित मी लोकलमधे चढलो तीच  संपल्यासारखं मला वाटलं .  फुग्यातुन हवा निघुन गेल्यावर होते तशी माझी अवस्था झाली .
                                                 Oh .... ok...  निराशेने  मी टाईप केलं .
Mi magchya train ne yete ... utaralyavar  thambshil ka thoda vel pls.
तिचा मेसेज आला पाठोपाठ .... ती मला भायखळ्याला थांबायला सांगत होती . नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल . पुन्हा नवी उमेद आली ... फुग्यात हवा भरली गेली ...
                                                  Ok .... aaplya nehmichya Restaurant  madhe thambto.
Ok ... gr8
काय असेल तिच्या मनात ? मी मागचे २-३  दिवस आठवून पाहिले . ती आनंदी दिसत होती . म्हणजे सगळं चांगलं झालं असेल . तिचं आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं  पॅच अप झालं की काय ? आणि हेच कदाचित सांगण्यासाठी तिने मला बोलावलं असेल . मन चिंति ते वैरी न चिंती म्हणतात ते खोटं नाही .... जाऊ दे ! इथे नुसता विचार करुन आपलं डोकं खराब करण्यापेक्षा दुसरं काहीतरी करु ... मी दुसरं काय करावं ह्याचा पर्याय शोधत असताना जिग्नेस दिसला . तो कोणतीतरी नविन फिल्म मोबाईलवर बघत होता .
" नया  फ़िल्म है जिग्नेस ? "
" हां ... देखोगे क्या ? "
मी होकार दिल्यावर त्याने कानातला एक इयरफोन माझ्याकडे दिला आणि आम्ही फ़िल्म बघु लागलो . त्यात हिरोईन हिरोला सोडून जाते असा एक सीन होता . तो बघुन  जिग्नेस  थोडा अस्वस्थ झाला . मला कळत होतं की त्याच्या मनात काय चालू आहे ते ... पण काय करणार ? त्याने त्याच्या कानातला इयरफोन काढून माझ्याकडे दिला .
" तुम देखो ... मुझे मूड नहीं ...."
" क्या हुआ यार ... ? देख ना ...."
" नहीं ... देखो तुम ..." म्हणत त्याने मोबाईलसुद्धा माझ्याकडे दिला . आता काय बोलणार ?
" जिग्नेस ... यार मुझे पता है ... तू क्या सोच रहा है । " त्यावर त्याने माझ्याकडे फक्त पाहिले . मी त्याला डोळ्यांनी दिलासा दिला . " तू टेंशन मत ले ... सब ठीक हो जायेगा ...." त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हणालो .
" नहीं... मैंने तो टेंशन लेना भी छोड़ दिया । " तो उसणं अवसान आणून म्हणाला .
" अच्छा है । तो फिर अब आगे क्या ? "
" आगे तो  सब क्लिअर है ।   मैंने उसे पूछा  की अगर उसे मुझसे शादी नहीं करनी थी तो बोल देती ... उसपर वो बोली की उसके पिताजीने उसे कसम दी थी ... इसीलिए वो शादीके लिए राजी हो गयी ... लेकिन वो अभीभी  अपने पेहेले दोस्त से मिलती है । मैंने उसे बोला ,  तुम्हे डिवोस चाहिए तो बोल दो ... में देने के लिए तैयार हूँ ... "  जिग्नेस असं म्हणाला आणि मला एकदम त्याची दया आली .
" फिर ...? "
" फिर क्या ... अभी कुछही दिनों में  मै उसे डिवोस देदूंगा ...।" तो अगदी सहज म्हणावं तसं बोलला . आता त्यावर आणखी काय बोलावं ते मला सुचेना .
" यार जिग्नेस ... " मी  काही बोलायच्या आत त्याने मला थांबवलं . आणि माझ्या हातातून त्याचा मोबाईल घेऊन अर्धवट राहिलेली फ़िल्म बघायला लागला . मग मीही त्याला जास्त काही बोललो नाही . भायखळा कधी येईल याची वाट बघत बसलो . उतरल्यावर मी थेट आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमधे गेलो . मला एकटा आलेलं पाहुन काउंटरवरच्या मालकाने चष्म्याच्या वरुन एकदा माझ्याकडे  पाहिलेलं मला जाणवलं. आमच्या नेहमीच्या टेबलवर बसलो आणि तिला मेसेज केला. रेस्टॉरंटच्या  त्या  नेहमीच्या  वेटरनेही भुवया उंचावून एकदा माझ्याकडे पाहिलं . 'आज एकटा कसा काय ? ' असंच तो मनातल्या मनात विचार करीत असेल . मला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही . ती सोसाट्याच्या वाऱ्यासारखी आली  आणि समोर बसली . घाईघाईत आल्याने तिला दम लागला होता बहुतेक !  
hi ... ती म्हणाली .   मी वेटरला पाणी आणण्याची खुण केली , तो लगेच हजर झाला .
" हां ... बोल , काय झालं  ? " माझ्या मनातली उत्सुकता लपवत मी म्हणालो .
" फाइनली , ईट्स ओवर ..." ती म्हणाली . तेवढ्यात वेटर आमची नेहमीची ऑर्डर न सांगताच घेऊन आला . आता ‘ ईट्स ओवर ’ ह्या शब्दांचा अर्थ काय घ्यायचा ?
" म्हणजे ? काय झालं ? "
" म्हणजे सगळं संपलं ..."
" काय संपलं ? " ती कोडयात बोलत होती . मला काही समजेना . माझी उत्सुकता इथे शिगेला पोहोचली होती .
" अरे मी  मागे तुला बोलले नव्हते का ? की मी पुण्याला गेले होते ... मी अनिकेतच्या आईला भेटले . त्यांना माझ्याबद्दल आणि अनिकेतबद्दल सांगितलं . त्या तशा समजूतदार आहेत . अनिकेत जर्मनीहुन येईपर्यंत  त्यांनी मला पुन्हा एकदा विचार करुन उत्तर द्यायला सांगितलं .  " असं म्हणून तिने बन मस्क्याचा एक तुकडा तोडून तोंडात टाकला . आणि त्यामागे चहाचा घोट ....
" मग .... ? "
" काल रात्री अनिकेतचा फोन आला होता . त्याने माझी माफ़ी मागितली . "  ती गमतीदार गोष्ट सांगावी तशी म्हणाली .    माफ़ी मागितली ? अरे देवा ! म्हणजे संपलं सगळं ... म्हणजे ह्यांचं पॅच अप झालं तर ...!
" हो का ... अरे वा..."  हे म्हणताना मला किती दुःख होत होतं हे तिला काय समजणार ?
" त्याची एक  कलीग आहे  ,  अंजली नावाची .... ती सुद्धा त्याच्याबरोबर जर्मनीला गेली होती . त्या दोघांनी एकमेकंबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे ... मला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू ..! " ती असं म्हणाली आणि माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना .
" काय ?  म्हणजे त्याने लग्न मोडलं ? " मी  परत खात्री केली ...
"  येस ... नाउ आय ऍम फ्री बर्ड ....  आता कसली काळजी नाही ... व्हॉट अ रिलीफ ...! "  ती आरामात मागे खुर्चीला टेकत म्हणाली . तिच्या ह्या  वागण्याचा अर्थच समजेना .
" म्हणजे तुला पण नव्हतं करायचं का लग्न ? " मी मुख्य प्रश्नाला हात घातला .
" तसं नाही रे ... मलाही तो आवडायचा ... पण  नंतर नंतर तो जास्तच डोक्यात जायला  लागला . मला  बंधनं  घालायला लागला . हे नको करु.... , त्याच्याशी नको बोलू ...,   नको झाली मला ती बंधनं ...  आणि ती अंजलीसुद्धा अगदी वेळेवर आली ... आणि माझी सुटका झाली . आता अगदी मस्त वाटतंय ... बंधमुक्त ... आझाद ... ! " ती मस्तपैकी चहाचे घोट घेत म्हणाली .
" मग आता ...? " मी विचारलं . तेवढ्यात तिचा फोन वाजला  ," हॅलो , अग आले आले ... ट्रेन लेट होती ना म्हणून थोडा लेट झाला ... ओके आलेच मी ५  मिंटात .... "  तिने फोन बंद केला आणि लगेच उठली ...
" सॉरी मधु ... मला उशीर होतोय ... मी जाते ... नंतर बोलते ... अजुन खुप बोलायचं आहे तुझ्याशी ... "  म्हणत ती निघुन जाऊ लागली . मीही तिच्या पाठोपाठ उठलो . बिल दिलं आणि बाहेर आलो . ती लगबगीने निघाली होती . अचानक मला कसली तरी जाणीव झाली . अँटी व्हायरसचं लग्न मोडलं होतं आणि तरी ती आनंदात होती . ह्याचा अर्थ काय ?  कदाचित तिला दूसरा कोणीतरी आवडत असला पाहिजे ... तिला जर मी आवडत असतो तर तिने तसं सांगितलं असतं … ‘ चला मधुकरराव ... चला ... ऑफिस वाट बघतंय  ... ’  असं म्हणून मी मागे वळलो . माझ्या बाजूला फुटपाथवर बसलेल्या एक फूलवाल्याकड़े माझे सहज  लक्ष गेले . तोसुद्धा माझ्याकडे बघत होता . मी तसाच पुढे गेलो …  थोडं पुढे जातो न जातो तोच  अंगात एकदम शिरशिरी भरली ... हाच तो ... ! येस ... हाच .... ! मागे वळून पाहिलं तर तो  माझ्याकडेच बघत होता . मी घाईघाईत त्याच्याकडे गेलो . मी जवळ येत असलेला पाहुन तो उठून उभा राहिला ... मी त्याला काही  विचारणार तेवढ्यात त्याने दोन्ही  हात आडवे पसरले . मान वर केली आणि डोळे मिटून तो जोरात ओरडला ... " स्टॉप ...! "
तो असं ओरडला आणि मी दचकुन आजुबाजुला पाहिलं .  आजुबाजुला सगळं काही थांबलं होतं.   बाजूने जाणारी टॅक्सी अचानक ब्रेक लागल्यासारखी थांबली . डाव्या हाताला दोन माणसे चालली होती त्यांच्यातल्या एकाचा उजवा पाय हवेत आणि दुसऱ्याचा डावा पाय हवेत तसाच ! उजवकडे  एका दुकानातून एक  आजोबा कबूतरांना दाणे टाकत होते ते दाणेही  तसेच हवेत ....! रस्त्याने चालणारे लोक पुतळ्यासारखे आहे तिथेच उभे राहिले ,  वर पाहिलं , पक्षी सुद्धा हवेत चिकटवल्यासारखे ...! घड्याळाचा सेकंदकाटा सुद्धा थांबलेला ...!  अक्षरशः काळ थांबला होता . हे ... हे ... काय आहे ? मला भास तर होत नाही ना ? मी समोरच्या त्या फुलवाल्याकडे बघितलं . तो थेट माझ्याकडेच बघत होता . माझी उडालेली भंबेरी पाहुन तो प्रसन्न हसला . मला आता त्या समोरच्या माणसाची भिती वाटायला लागली . तो माझ्या जवळ येऊ लागला .... आणि मी भीतीने मागे मागे जाऊ लागलो  
" क ... कोण आहेस तू ? "
" अरे मधु , घाबरु नकोस ... मी काही करणार नाही तुला ..."
" तू ... तुला माझं नाव कसं माहीत ? "
" हा एकदम फालतू प्रश्न झाला राव ... आता तू हे बघतोयस की मी स्वतः काळ थांबवला आहे , तर मला तुझं नाव माहीत नसेल का ? "
" म्हणजे  ? ... कोण आहेस तू ? " मी अजूनही जाम घाबरलो होतो .
" रिलॅक्स ... माझ्यावर विश्वास ठेव ... मी तुला काही करणार नाही .... ये ... बस इथे ... " त्याने   माझ्या हाताला धरुन मला फुटपाथवरच्या एका कठड्यावर बसवलं . " आता ओके ना ? " त्यावर मी मानेनेच होकार दिला . आजुबाजुला पाहिलं , सगळं अजुन जिथल्या तिथे होतं .
" यार  मधु , तू मला जाम त्रास दिलास ... त्यामुळे मला हे असं सगळं करायला लागलं . " तो माझ्याकडे बघत म्हणाला .
" मी ...? अहो ... मी काय त्रास दिला तुम्हाला ? मी तर ओळखतसुद्धा  नाही हो तुम्हाला ...." काळ थांबवणारी समोरची  ही व्यक्ति नक्कीच शक्तीशाली असणार  ह्यात तिळमात्र शंका न उरल्याने मी घाबरत त्याला म्हणालो  .
" तू ओळखत नाहीस ? तू या पूर्वीही मला पाहिलं आहेस … आणि आताही तू जेव्हा  मला पाहिलंस तेव्हा तुझ्या मनात हेच विचार आले . हो कि नाही ?  " तो माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला .
" हो ... बहुतेक ... ! " आता काय बोलणार ?
" नीट  आठव ,  तुझा मित्र शरद , ट्रेनखाली जीव द्यायला निघाला होता ...."
" येस ... येस ... त्याला वाचवणारा तरुण अगदी तुमच्यासारखाच दिसत होता … "
" माझ्यासारखा नाही ... मीच होतो ... आणि नंतर तू तुझ्या अँटी व्हायरस सोबत हायवेवर पावसात भिजत टपरीवर चहा पीत होतास  तेव्हासुद्धा  बाईक वरुन मीच गेलो ... आठवलं ? "
" हो ... हो ... बरोबर ...!   आठवलं  … पण तुम्ही आहात तरी कोण ? "  एखाद्या गूढ व्यक्तिप्रमाणे तो माझ्या समोर उभा होता . पण त्याच्या वागण्यावरुन आणि हसऱ्या  चेहऱ्यावरून  तो आपल्याला काही करणार नाही याची मनाला खात्री पटली आणि मी थोडा निर्धास्त झालो .
" मी कोण ? ...काय वाटतं तुला ? "
" तुम्ही सामान्य माणूस नाही हे मात्र नक्की ....! " मी दिलेल्या उत्तरावर तो चांगलाच खुष झाला .
" हूं ... बरोबर आहे तुझं .... मी सामान्य नाही … तसाच मी इथलाही  नाही ,  मी वर असतो , " असं  म्हणून त्याने वर आकाशाकड़े बोट दाखवले .
" काय ? वर ? म्हणजे ? "
" वर म्हणजे स्वर्ग ... मदनदेवांच्या अख्त्यारीत  एक नवीन डिपार्टमेंट सुरु झालंय ... त्यात माझी न्यू रिक्रूटमेंट आहे . " असं म्हणून त्याने त्याचं सोन्याचं लकाकणारं  आयकार्ड काढून माझ्यासमोर धरलं . माझ्या डोक्यात मुंग्या फिरतायत असं वाटायला लागलं . समोरचा माणूस अगदी नेहमीच्या व्यवहारीक  गोष्टी सांगत होता पण त्याचबरोबर त्याच्याकडे अद्वितीय शक्तिही होती .
" मला काहीही समजत नाही .... तुम्ही काय बोलताय ते ..." मी आदरपूर्वक समोरच्या व्यक्तीला म्हणालो.
" बरं ऐक आता .... तुला थोडक्यात सांगतो ....  मागे, काही वर्षापूर्वी  एकदा मदनदेवांनी पृथ्वीवर एक सर्वे केला ... त्यात त्यांना असं दिसून आलं की इथल्या लोकांमधे प्रेमाची भावना संपत चालली आहे .  माणसं  स्वार्थी होत चालली आहेत . खरं प्रेम तर ह्या जगात क्वचितच पाहायला मिळतं . त्यांच्या सर्वेनुसार त्याचं परसेंटेज ०.१ % पेक्षाही कमी झालं आहे … तो अहवाल त्यांनी इंद्रदेवांना सादर केला .  त्यामुळे मग  इंद्रदेवांच्या अध्यक्षतेखाली  एक समिती नेमली आणि त्या समितीमधे असं ठरलं की मदनदेवांच्या  अख्त्यारीत आणखी एक डिपार्टमेंट सुरु करायचे आणि त्यात नंतर माझी LRO म्हणून  नेमणूक झाली . "
" LRO म्हणजे ? " मी मधेच विचारलं .
" लव रिलेशनशीप ऑफिसर ! तू मला प्रेमदूत सुद्धा  म्हणू शकतोस ...  तर माझं काम आहे की खऱ्या प्रेमाचा शोध घेणे , त्यांना मदत करणे आणि प्रेमाचा प्रसार करणे . पण ही सगळी कामे अप्रत्यक्षपणे करायची असा नियम होता . पण तुमच्या ग्रुपच्या  शरदला वाचवण्याच्या नादात माझ्याकडून तो नियम मोडला गेला  आणि  मला का. दा. नो.  मिळाली .... कारणे दाखवा नोटिस !
" अरे बाप रे …!  हा प्रकार तुमच्याकड़े पण आहे का ? "
" मग काय ? पण नंतर मी मदनदेवांना  पटवून दिलं की त्याचं प्रेम खरं होतं आणि त्याला वाचवणं गरजेचं होतं त्यामुळे मी त्या परिस्थितित जे योग्य वाटलं ते केलं ... आणि शेवटी त्यांना पटलं ते ... ”
“ अरे बाप रे … भयंकर आहे हे  ! तरीच त्यानंतर तुम्हाला शोधूनही तुम्ही आम्हाला सापडला नाहीत … ” मी म्हणालो .
“ हो … बरोबर आहे . जिथे खरं प्रेम असतं  तिथे मी असतो … आता तुमच्या सावंतांचच उदाहरण घे … ”
"  देवा ,  म्हणजे सावंतांच्या घरी त्यांच्या बायकोला समजवायला जो तरुण गेला होता , तेसुद्धा तुम्हीच होतात  … ? "
" अगदी बरोबर ...!  पण ही गोष्ट आता फ़क्त तुलाच माहित आहे ... आणखी कुणाला बोलू नकोस बाबा ... नाहीतर प्रॉब्लेम होईल ..."
" नाही ... मी नाही सांगणार ... पण देवा ,  तुम्ही म्हणता कि खरं  प्रेम जिथे आहे तिथे तुम्ही असता .  तर आमच्या ग्रुपचा  जिग्नेस , त्याची तर खुप मोठी शोकांतिका आहे . तो  त्याच्या बायकोला घटस्फोट देणार आहे ...  त्याचं तिच्यावर खरं प्रेम होतं ... पण  मग असं का व्हावं ..."
" त्याचं प्रेम होतं  पण तिचं त्याच्यावर खरं प्रेम नव्हतं ... आणि प्रेम असं  बळजबरीने नाही मिळवता येत ... "
" मग आता जिग्नेसचं काय होईल ? "
" जिग्नेससाठी मी एक उपाय केलाय ... आणि तुला ती मुलगी माहीत आहे ... आजच तुला ती दिसली सुद्धा होती ....
" काय ? म्हणजे अँटी व्हायरस … ? " माझ्या हृदयाचा ठोका चुकला .
" अरे नाय रे बाबा …  आज सकाळी लोकलला चढण्याच्या अगोदर तुला जी फोनवाली मुलगी दिसली ना ... जी नेहमी फोनला चिकटुन असते ती ...! "
" ओह ... म्हणजे ती फोनवाली मुलगी आणि जिग्नेसचं जुळेल ? वॉव ... ! "
" होय ,  पण तू त्याला आधीच काही  सांगू नकोस ...."
" नाही देवा ... ते दोघे प्रेमात पडत असताना बघणे म्हणजे मला मोठी ट्रीटच असेल .... मी फ़क्त त्याची गंमत बघेन ...." जिग्नेसचं भविष्य समजल्याने मला मोठी गंमत वाटत होती .
" आणि देवा , भरत राहिला ... त्याचं काय ? "
" त्याचं काही नाही ... जी मुलगी त्याने बघितली आहे तीच त्याला आवडते आणि  तिच्याशीच त्याचं लग्न होईल "
“ अरे वा … छानच !   ”  आमच्या ग्रुपच्या सर्वांचं मला कळाल होतं  पण माझं  काय होईल ? माझं  तर अँटी व्हायरसवर खरंच खुप प्रेम आहे . पण हे देवांना कसं  विचारणार ? मी  असा विचार करत असतानाच देव म्हणाला ,  " हेच ... तू मला जाम त्रास दिलास ,  त्यासाठीच मला हे सगळं करावं लागलं बाबा ... तुला ती आवडते तर बोलून का नाही टाकलंस ?  तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे तुला समजावण्यासाठी  मला हे काळ थांबवणं भाग पडलं . ”  देवाने  माझ्या मनातलं  बरोब्बर ओळखलं होत  आणि मला त्याचं आश्चर्य वाटल्याने मी आ वासून त्यांच्याकडे बघू लागलो .
“ अरे , बघतोस काय असा , आता ह्या माझ्या  कृत्यामुळे माझं तर इन्क्रीमेंट जाईल की काय असं मला वाटतंय ... पण ठीक आहे ,  आता तर नियम मोडायची सवयच झाली आहे  ... ”
" सॉरी देवा ....माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला .  पण देवा , तुम्ही मला हायवेवर सुद्धा दिसला होतात ... ते कशासाठी ?  "
"  तेच तर ना रे ... मला असं वाटलं होतं की तू काहीतरी करशील ... पण कसलं काय ?  तिची इच्छा होती कि तू तिला प्रपोज करावंस …  तू तिथेही काही केलं  नाहीस … पण मला तुझ्या नजरेची आणि स्मरणशक्तीची दाद द्याविशी वाटते . तू मला मात्र  नेमकं ओळखलंस ... त्यामुळे मी तुला भेटण्याचा निर्णय घेतला .... आणि असंही मी सगळीकडे असतोच …!   तुम्ही फक्त  तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवायला हवेत ...  "
" आता पुढे काय देवा ? मला ती आवडते ...पण  तिला मी आवडत असेन का ? "
" ओह  नो …!   कसं समजावु तुला आता ? अरे मित्रा , तुझ्यासाठी काळ थांबवलाय मी ...! आणखी काय पाहिजे तुला ...?  जा आणि विचार तिला .... अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते  ... हे घे ... " म्हणत त्यांनी माझ्या हातात एक लहानसा फुलांचा बुके  दिला . त्यातली फूलं अगदी ताजी आणि टवटवीत होती . " ऑल द बेस्ट ... जा लवकर … सगळं  सांगायला लागतं बाबा तुला … ! "  देव मला म्हणाला आणि तो  पुन्हा आडवे हात पसरुन वर बघुन ओरडला " मूव्ह  ...." आणि त्यासरशी सर्व जग पुन्हा होतं तसं झालं . टॅक्सी रस्त्याने धावु लागली , माणसं चालू लागली , पक्षी उडु लागले ,  घड्याळाचा सेकंद काटा टक टक करत पुढे जायला लागला . मी पुन्हा देवाकडे पाहिलं , तो मला घाई करायला सांगत होता ... मी वळलो , आणि  अँटी व्हायरस  चालली होती त्या दिशेला धावत सुटलो . अँटी व्हायरस लगबगीने तिच्या ऑफिसच्या दिशेने निघाली होती . मी धावत जाऊन तिच्या समोर उभा राहिलो . ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली .
" मधु , तू इथे ? आणि एवढा धावत का आलायस ? "
" मला तू खुप आवड़तेस ... " असं म्हणून मी माझ्या हातातला फुलांचा नाजुकसा बुके  तिच्या समोर धरला ... ती थोड़ा वेळ माझ्याकडे आश्चर्याने पहात राहिली ... " तुझं हे बिनधास्त वागणं मला खुप आवडतं .  मी माझं सगळं आयुष्य तुझ्याबरोबर ह्या लोकलच्या प्रवासात घालवायला तयार आहे  आणि तुझ्याबरोबर  जन्मभर बन मस्का आणि चहा घ्यायलाही तयार आहे ... प्लीज हो म्हण …  "  तिने थरथरत्या हातांनी  माझ्या हातातला तो फुलांचा गुच्छ घेतला . तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला ... भानावर येत तिने तो घेतला ... " हॅलो ,  हो , हो...  आलेच ... सॉरी आलेच ..." तिने फोन ठेवला ... आणि चिडून मला म्हणाली , " तुला आजचाच मुहूर्त मिळाला का  ? मला उशीर होतोय ... हां घे तुझा बुके ..." म्हणत तिने खोट्या रागात माझ्याकडे बुके फेकला आणि पुढे जाऊ लागली ... पण एकदा मागे वळून ती म्हणाली , " मधु ... उद्या नेहमीच्या लोकलला भेट ... आणि ऐक ,   मलाही तुझ्याबरोबर बन मस्का आणि चहा घ्यायचाय ...  आयुष्यभर ...! "

-------- समाप्त  -----            
                       

माझ्या बांद्रा वेस्ट ह्या पुस्तकासाठीची लिंक खाली दिली आहे … फक्त एका टिचकीची गरज आहे… :) :) :)