गुरुवार, २ जानेवारी, २०२०

सिझन २ - लोकल डायरी ८

https://milindmahangade.blogspot.com/2019/10/blog-post_24.html  सिझन २ -लोकल डायरी १
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html  सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html  सिझन २ - लोकल डायरी ३
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_27.html  सिझन २-लोकल डायरी ४
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post.html  सिझन २ - लोकल डायरी ५
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_6.html   सिझन २ - लोकल डायरी ६
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_27.html  सिझन २ - लोकल डायरी ७


सिझन २ - लोकल डायरी ८ 


आज महिन्याचा चौथा शनिवार होता , शरदची पार्टी होती आज . मला सुट्टी होती , तशी मला जाग सकाळी सहा वाजताच आली पण, मी मस्त आठ - साडे आठपर्यंत लोळत पडलो होतो . माणसाचं मन एक विचित्र गोष्ट आहे . जेव्हा ऑफिस असतं तेव्हा झोप इतकी येते की काही विचारू नका , आणि सुट्टीच्या दिवशी काहीही न करता सकाळी सहा वाजताच टक्क जाग ! एक वेगळाच उत्साह असतो सुट्टीच्या दिवशी सकाळी ... आणि तसंही कालच्या अवंतीच्या भेटीमुळे तर मला रात्री झोप आलीच नाही . आम्ही मस्त भटकलो दिवसभर .... जीवाची मुंबई करणे म्हणजे काय ते आम्ही काल केलं होतं , खऱ्या अर्थाने ! एक प्रकारची धुंदी चढली होती ती अजूनही उतरली नव्हती . ती उत्कटता या पूर्वी मी कधीच अनुभवली नव्हती . छे , पण आता दोन दिवस ती काही दिसणार नाही . आयुष्यात पहिल्यांदाच मला सुट्ट्यांचा कंटाळा आला होता . तरी बरं आज संध्याकाळी शरदच्या जुन्या घरी त्याची बॅचलर्स पार्टी होती . त्यामुळे आमची लोकलची सगळी मंडळी भेटणार होती . मी संध्याकाळ व्हायची वाट बघत बसलो . सुट्टीच्या दिवशी सोफ्यावर पडून टीव्ही बघण्यात जो आनंद असतो तो अगदी इंद्राच्या सिंहासनावर बसण्यात सुद्धा नसेल . टीव्ही बघता बघता मला कधी झोप लागली कळलंच नाही . 

दुपारी अर्धवट झोपेत असताना माझा फोन वाजला . आधी तर वाटलं की स्वप्नात टीव्ही मधलंच काहीतरी वाजतंय . मग लक्षात आलं तसा फोन बघितला तर सावंतांचा फोन . माझी झोपच उडाली . 

" हॅलो , बोला सावंत ... अहो , आहात कुठे ? दोन तीन दिवस झाले लोकलला आला नाहीत . आणि फोन पण स्विच ऑफ होता तुमचा .... " मी घाईघाईत म्हणालो . 

" अरे , हो ... जरा बिझी होतो . मला सांग ... शरदची पार्टी किती वाजता आहे ? " पलीकडून त्यांनी विचारलं . 

" संध्याकाळी सात नंतर चालू होणार , त्याच्या जुन्या घरी . रात्रभर आहे पार्टी. तुम्ही आहात ना ? " 

" हो , मी येणार आहे , पण जरा उशिरा येईन ... " सावंत म्हणाले . 

" का हो ? काही काम आहे का ? काही प्रॉब्लेम ? " मला जरा शंका आली . 

" नाही रे ... मी येतो , दहा वाजेपर्यंत ... ओक्के ... चल बाय " म्हणत त्यांनी फोन कट केला . मला त्यांच्याशी बोलायचं होतं . काहीतरी आहे जे ते त्यांनी सांगितलं नाही असं मला एकूणच त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं . पण सावंत काही असेल तर कधीतरी सांगतीलच . मग मी शरदला फोन केला . तो गडबडीत होता. पार्टीची तयारी करण्यात गुंतला होता . मी त्याला काही मदत करू का म्हणून विचारलं तर नको म्हणाला . बॅचलर्स पार्टी द्यायची म्हणून शरद खुशीत दिसत होता. 

मी संध्याकाळी साडे सात वाजता आमच्या पार्टीच्या ठिकाणी पोहोचलो . एका जुन्या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर शरदचं जुनं घर होतं . सध्या तिथे कोणीच राहत नसल्याने घर झाडून घेऊन त्यावर बसण्याची वगैरे व्यवस्था शरदने केली होती . घर बंद असल्याने एक विचित्रसा कोंदट वास येतो , पण तसं काही वाटत नव्हतं , शरदने फवारलेल्या रूम फ्रेशनरमुळे मस्त प्रसन्न वाटत होतं . मोबाईलला स्पीकर लावून किशोरची गाणी लावली होती . प्रखर ट्युबलाईट न लावता हॉल मध्ये छताला मधोमध असलेलं झुंबर लावलं होतं. त्यातून मस्तसा अंधुक आणि पिवळसर प्रकाश पाझरत होता .

" यार शरद , काय माहोल केलाय .... एक नंबर ! " हे सर्व बघूनच मी खुश झालो होतो . त्यावर तो गालातल्या गालात हसला . 

आमचे एकेक मेम्बर हळूहळू जमा होऊ लागले . शरद अगदी यजमानाच्या थाटात सगळ्यांचं स्वागत करत होता. आणि लग्नात जसं वेलकम ड्रिंक देतात तसं ज्याला जसा हवा तसा रमचा पेग किंवा बिअर देत होता . आमच्यात भडकमकर , नायर अंकल आणि सावंत हेच रम पिणारे , बाकीचे आम्ही बिअरवाले ... त्यात नायर अंकल शनिवार असल्यामुळे लगेच पिणार नव्हते . रात्रीचे बारा वाजल्यानंतर त्यांचं सेशन सुरू होणार होतं , तोपर्यंत बाकीच्या किती लोकांचे टांगे पलटी व्हायचे देव जाणे .... सर्वजण जमले , भरत , आधी नाही म्हणणारा जिग्नेससुद्धा वेळेवर आला होता . आणि तो थोडा खुश सुद्धा दिसत होता . आता फक्त सावंत राहिले होते . ते उशिरा येणार असल्याचं मी सगळ्यांना सांगितलं . मग सगळ्यांनी आपापले ग्लास , आणि बिअरचे टिन वर उचलले ... नायर अंकलही थंप्स अपचा ग्लास उंच करून म्हणाले ., " अपना शरद का बॅचलर्स पार्टी है , इसिलीये सबको चिअर्स " करून सर्वांनी चिअर्स केलं . आणि ग्लास तोंडाला लावले . बिअरचा तो पहिला घोट ! थंडगार गोळा घशाखाली गेल्यासारखा वाटला . चखण्यासाठी व्हेज मध्ये शेव , चना डाळ , चकली , पापड , आणि नॉनव्हेज मध्ये चिकन बंजारा कबाब , लॉलीपॉप , चिकन चिली ... असं बरंच काही होतं. सगळे गोल बसले . मधोमध सगळे खाण्याचे पदार्थ ठेवलेले होते . ज्याला जे हवं ते खा ... हळूहळू आमची पार्टी आता रंगात येऊ लागली . 

" वा ! आत्ता कुठे मजा आला .... " भडकमकर म्हणाले . वेलकम पेग प्यायल्यानंतर जो तो आपापली ग्लास भरून घेऊ लागला . जिग्नेसचा पहिला बिअरचा टिन सगळ्यात आधी संपला . त्याने लगेच दुसरा टिन फोडला सुद्धा ! 

" अरे , मधु एक माणूस फक्त खायला येणार होता ना ? आता तर टिन वर टिन फोडायला लागलाय ... " शरदने टोमणा मारला . तो टोमणा आपल्याला मारलाय हे त्या महाशयांच्या ध्यानीही नव्हतं . तो आपला चिकन लॉलीपॉप मधला मोठा लॉलीपॉप कोणता ते शोधत होता . 

" जाऊ दे रे ... आत्ताशी कुठे नॉर्मल झालाय ... " मी त्याला म्हणालो . त्यावर शरदने कोपरापासून हात जोडले . माझा पहिला टिन संपत आला होता आणि हलकी हलकी किकही बसू लागली होती . नायर अंकल चकली आणि ग्रीन चटणी खात बसले होते . भडकमकरांनी त्यांच्यासाठी पेग बनवला पण त्यांनी नकार दिला आणि घड्याळ दाखवलं . भरत मात्र हळूहळू आपली बिअर पीत होता . त्या फोन प्रकरणामुळे तोही थोडासा चिंतेत होता . थोडा वेळ गप्पा गोष्टी करण्यात गेला अन दारावरची बेल वाजली. मी घड्याळात बघितलं साडे नऊ वाजले होते. ह्या वेळी कोण असेल ? 

" सावंत आले बहुतेक .... " म्हणत शरद दार उघडण्यासाठी उठला . खरोखरच सावंत होते . मला त्यांना बघून खूप आनंद झाला . ते दिसल्यावर सर्व जण एकत्रित ओरडले . ही मंडळीना थोडी थोडी चढल्याची खूण होती . जो तो जाऊन सावंतांना मिठ्या मारू लागला . तेही समजूतदारपणे सगळ्यांना आलिंगन देऊ लागले . शरदने लगेच त्यांच्यासाठी रमचा छानसा पेग बनवला . आणि त्यांच्या हातात दिला . मग परत सगळे त्यांना चिअर्स करायला लागले . 

" तुम्ही उशिरा का आलात ? काही काम होतं का ? " मी त्यांना बाजूला घेत विचारलं .

" हो , थोडं काम होतं ... बाकी सगळे हवेत दिसतायत ... " ते बाकीच्यांकडे बघत म्हणाले . 

" भडकमकारांचे तीन चार पेग झालेत , जिग्नेसचा तिसरा टिन चालू आहे ... शरद भरत आपले त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने पितायत . तुम्हीच उशिरा आलात ... " मी म्हणालो . 

" हो रे ... आणि आता थोड्या वेळाने परत जायचं आहे ? अर्जंट काम आहे " सावंत हळू आवाजात म्हणाले . 

" काय ? म्हणजे तुम्ही रात्री राहणार नाही ? काय सावंत ? एकतर उशिरा आलात ... आणि आता लगेच निघताय ? " मी म्हणालो .

" जरा हळू बोल ... मला जावंच लागेल ... तुला नंतर सांगेन ... आता इथे नको " ते दबक्या आवाजात म्हणाले . मग आम्ही सगळे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत निवांत पीत बसलो . माझा दुसरा टिन संपला होता . आणि मस्त हलकं हलकं वाटत होतं. किंचित आळसावल्यासारखं वाटत होतं , आणि त्या विचित्र परिस्थितीत आतून हसूही येत होतं . 

" अरे शरद , आपले घावणे आणि भेजा फ्राय कुठे आहेत ? विसरला काय ? " भडकमकरांनी विचारलं , दारुड्या लोकांचा जसा बोलण्याचा टोन असतो तसा त्यांचा झाला होता . 

" बास काय , असा कसा विसरेन ? म्हणत त्याने डब्यात भरून आणलेले घावणे काढले आणि भेजा फ्रायचं पॅकेट उघडलं. सर्वांनी आपापले ग्लास बाजूला ठेवले आणि त्यावर ताव मारला . मन तृप्त होईपर्यंत घावणे आणि भेजा फ्राय खाल्ला ... 

" वा ! आत्ता कुठे मजा आला .... " भडकमकर म्हणाले . त्यांचं हे पालुपदच झालं होतं . दर दहा - पंधरा मिनिटांनी ते हे वाक्य उच्चारायचे आणि ग्लास रिकामा करायचे . भरत मात्र शांत बसून होता . त्याचा पहिला टिन सुद्धा अजून संपला नव्हता . 

" काय भरतभाई ? काय झालं ? " मी त्याला विचारलं . त्यावर त्याने काही नाही अशी मान डोलावली .

" त्याला टेन्शन आलंय बहुतेक ... सोड यार ... काही होणार नाही . भरत , तू उगाच टेन्शन घेतोय . " शरद म्हणाला . त्यावर त्याने नुसती मान डोलावली . प्यायच्या बाबतीत जिग्नेसही मागे नव्हता . तो मजेत दिसत होता . मला त्याची गंमत करायची इच्छा झाली .

" जिग्नेस , आजकल तू खुश दिख राहा है । क्या बात है ? " मी विचारलं त्यावर तारवटलेले डोळ्यांनी बघत तो फक्त खुदकन हसला आणि बिअरचा टिन तोंडाला लावला .

" हा रे ! ... क्या बात है बे ? " शरदही त्याला विचारू लागला . 

" त्या फोनवाल्या मुलीशी भांडण झाल्यापासून त्याच्या वागण्यात फरक पडलाय " सावंत म्हणाले . त्यावरही तो काहीही न बोलता नुसता हसला . मग आम्ही सगळे त्याला चिडवू लागलो . आरडाओरडा खूप व्हायला लागला तसा शरदने आम्हाला शु sss शु sss करून शांत केलं . 

" आणि मधुचं पण काय चालू आहे आम्हाला माहीत आहे ... " शरदच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव दाटले होते . हे माझ्यावर कसे घसरले ? कसाऱ्याला जाणारी लोकल एकदम कर्जतला कशी काय निघाली . 

" मधूका ? मधूका क्या चालू है ? " नायर अंकलनी चणा डाळ तोंडात टाकीत आश्चर्याने विचारलं .

" अरे अंकल , पक्का छुपा रुस्तम है ... " शरद म्हणाला त्यावर सगळेजण माझ्याकडे अविश्वासाने पाहू लागले . त्या एकाच सेकंदात मी ठरवलं की हीच वेळ आहे ह्या सगळ्यांना खरं सांगायची ... तसंही सर्वजण नशेत आहेत . आणि मीही थोडा हाय आहेच ! 

" थांबा ... " मी धडपडत उभा राहिलो ." मी तुम्हाला सांगणारच होतो . आपल्या लोकलला एक मुलगी येते , अवंती तिचं नाव . मला ती आवडायची आणि मी तिला प्रपोज केलं ... ती हो म्हणाली . मी ठरवलं आहे की तिच्याशीच लग्न करायचं ... " त्यावर सगळ्यांनी आरडाओरडा करीत एकदम टाळ्या वाजवल्या . सावंत हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते . 

" ये हुई ना बात ! चलो फिर अवंती भाभी को फोन लागाया जाय ... " इतका वेळ शांत बसलेला जिग्नेस बोलून बसला आणि आमच्या मंडळींनी तो धागा पकडला .सगळे माझ्या मागे लागले की तिला फोन कर म्हणून .... हे काहीतरी वेगळंच घडत होतं. आता रात्रीचे बारा वाजत आलेत आणि ह्यावेळी तिला फोन करायचा म्हणजे ? मला एकदम भीती वाटली . ह्या सगळ्या बेवड्यांचं काही खरं नाही ... प्यायलानंतर काहीही करतील . पण सावंतांनी परस्पर त्यांना झापलं , नायर अंकलही नको म्हणाले आणि मी वाचलो . थोड्या वेळाने बारा वाजले आणि नायर अंकल त्यांचा रमचा पेग घेऊन तयार झाले .मग पुन्हा सगळ्यांनी त्यांना चिअर्स केलं आणि पुन्हा कार्यक्रम सुरू ... मी माझा तिसरा टिन संपवत आणला होता . मला मस्त तरंगल्यासारखं वाटत होतं . मी मस्तपैकी अंग सैल सोडून आणि पाय पसरून बसलो . आमची बाकीची मंडळी आपापले ग्लास रिचवत , चखणा खात गप्पा मारत होती. मी मोबाईलवरची किशोरची गाणी ऐकू लागलो . इतका वेळ ती चालू होती पण माझं लक्ष गेलं नाही . आता शांतपणे ऐकू लागलो . गोलमाल फिल्म मधलं , " आनेवाला पल जाने वाला है । " लागलं . हात मागे डोक्याशी धरून उशीला रेलून मागे बसलो आणि डोळे मिटून ते गाणं ऐकू लागलो . मस्त वाटत होतं. धुंद वातावरण , मित्रांची सोबत , बिअर आणि किशोरची गाणी ! परफेक्ट कॉम्बिनेशन . मी डोळे मिटून गाणी ऐकत असताना गोल गोल फिरत एका अंधाऱ्या पोकळीत पडतोय की काय असं वाटलं आणि लगेच डोळे उघडले . तसे मी दोन टिनच्या वर पीत नाही. पण आज तीन झाले . त्यामुळे आजूबाजूची सारी दुनिया माझ्याभोवती फिरतेय की काय असं वाटत होतं . अचानक मला कुठून तरी ओकण्याचे आवाज यायला लागले . अरे देवा ! माझे कान वाजायला लागलेत की काय ? मी डोळे उघडले आणि बघतोय तर शरद जिग्नेसला बाथरूम मधून धरून घेऊन येत होता . म्हणजे जिग्नेसचा ' वकार युनूस ' झाला होता तर ! मी आजूबाजूला पाहिलं तर बरेच जण धारातीर्थी पडले होते . भडकमकर , जिग्नेस आडवे झाले होते . नायर अंकलही त्यांचे लिमिटेड तीन पेग पिऊन शांतपणे खुर्चीत विसावले होते . शरद , भरत त्यांची शेवटची लढाई लढत होते . सावंत मात्र कुठे दिसत नव्हते . ते कदाचित निघून गेले असतील . का ते त्यांनी सांगितलं नाही . पण काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय ते जाणार नाहीत . विचार करता करता अचानक मला अवंतीची आठवण झाली .... खुप प्रकर्षाने . वाटलं तिला आता फोन करावा . पण रात्रीचे दीड वाजले होते . अचानक माझी बोटे व्हॉट्सऍप कडे वळली आणि काही कळायच्या आत तिला love you चा मेसेज गेला सुद्धा . वाटलं परत काही प्रॉब्लेम झाला तर ? तेवढ्यात माझ्यातली बिअर म्हणाली , हॅट , होऊन जाऊ दे काय व्हायचंय ते ! तिच्या आज्जूडी बिज्जूडीला बघून घेऊ . आपण नाय घाबरत बेन स्टोक्स ! थोड्या वेळाने माझ्या फोनचा मेसेज टोन वाजला , मी पाहिलं तर अवंतीचा मेसेज होता Love you tooooo ...😘

-- क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा