सिझन २ - लोकल डायरी ७
आज सकाळपासून नुसता गोंधळच चालू आहे की काय असं वाटत होतं , नव्हे कालपासूनच ! काल भरतने आमच्या सांगण्यानुसार सुनीता भाभीला फोन केला आणि चांगलाच गोंधळ झाला . असं कसं होईल ? प्रेमदूताचं भाकीत खोटं कसं ठरेल ? पुढच्या आठवड्यात तो तिला भेटायला जाणार होता . खरं तर तो जाणारच नव्हता ., म्हणाला मी लग्न मोडतो म्हणून ! कसंबसं त्याला समजावलं तेव्हा कुठे तो तयार झाला . सकाळपासून त्याचाच विचार डोक्यात होता . विचारांच्या गोंधळात आईने डबा तयार करून टेबलावर ठेवला होता तो घाईघाईत घ्यायचाच विसरलो . रस्त्यावर पण गाड्यांचा नुसता कलकलाट चालू होता . स्टेशनलगतच्या रस्त्यावर सकाळी सकाळी दोन गाड्या एकमेकांना घासल्या आणि दोन्ही वाहनचालक एकमेकांवर शब्दांचे बाण सोडत भर रस्त्यात एकमेकांसमोर उभे ठाकले, आणि जणू काही त्यांना चिअर करायला त्यांच्या मागच्या बाजुला अडकलेल्या गाड्या न थांबता , सतत पॅ .... पॅ .... हॉर्न वाजवत होत्या. बालवाडीच्या शाळेच्या पहिल्या दिवशी जसं सगळीच मुलं एकदम रडून गोंगाट करतात तसं काहीसं त्या रस्त्यावर मला वाटू लागलं . गर्दी झालेल्या गाड्यांच्या मधून कशीबशी वाट काढत मी स्टेशनवर पोहोचलो तेव्हा गाडी आधीच प्लॅटफॉर्मला लागली होती . मी चालत येत असताना ती जिग्नेसशी भांडणारी फोनवाली मुलगी माझ्या समोरच घाईघाईने चालली होती . तिच्या कानाला फोन चिकटलेलाच होता आणि ती कुणाशी तर बोलत होती . मी सहज तिचं बोलणं ऐकलं तर ती पलीकडच्या तिच्या मैत्रिणीला सांगत होती की , " वो चष्मेवाला लडका मेरेको क्युट लागता है । और उसका चेहरा देखतेही उसे छेडने का मन करता है । " अरे वा ! म्हणजे प्रगती आहे तर ! जिग्नेस मात्र तिच्यावर चिडला असेल . त्याला विनाकारण सॉरी म्हणावं लागल्यामुळे ... पण त्याच्याही वागण्यात थोडासा फरक मला जाणवला होता . तो आजकाल आमची गाडी डाऊन करायची सोडून त्या नंतरची येणारी कर्जत लोकल पकडून मागे येत असे . त्याला खरंच उशीर होतो की तो ठरवून असं करतो हे मात्र माहीत नाही . ह्याचा शोध घ्यावा लागेल . मी आमच्या डब्यात शिरलो . डोअरवरच्या रवीशी शेकहँड केलं आणि आत आलो . सगळ्यांशी नमस्कार चमत्कार झाले आणि आज आश्चर्य म्हणजे अवंती लवकर आली होती . नेहमी ती गाडी सुटण्याच्या वेळेत धावत पळत येते . आमचेही सगळे मेम्बर आले होते फक्त जिग्नेस सोडून . हा पठ्ठ्या आजही कर्जत गाडीने येईल की काय ? असा विचार करीत असता , तसंच झालं . तो पलीकडच्या कर्जत लोकलमधून उतरून आमच्या लोकलकडे येत होता आणि येताना इकडे तिकडे बघत होता , जणूकाही तो कुणाला तरी शोधत असावा . हा नक्कीच त्या फोनवाल्या मुलीला शोधत असणार , पण आज त्याची निराशा झालेली दिसली. त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं . मला त्याची गंमत वाटली . पण त्याचबरोबर एक शंका मनात आली , की जिग्नेसबाबत प्रेमदूताने सांगितलेलं सगळं तसंच घडत होतं . पण भरतच्या बाबतीत असं का व्हावं ? पुढच्या आठवड्यात तो तिला भेटणार जाणार आहे . बघू काय होतंय ते .... मी आमच्या ग्रुपवरून एक नजर टाकली , काहीतरी कमी होती . सावंत ! ते काल , परवा सुद्धा लोकलला आले नव्हते ., आणि आजही आले नाहीत .
" शरद , सावंत आले नाहीत का ? " मी विचारलं .
" हो रे , दोन तीन दिवस दिसले नाहीत . थांब फोन करतो ." म्हणत त्याने फोन लावला देखील . " फोन स्विच ऑफ येतोय रे ... तू लावून बघ " मी फोन लावला तरी तेच . मला थोडी काळजी वाटली , कारण सावंत त्यांचा फोन कधीच बंद ठेवत नसत . बाकी कुणाला विचारून फायदा नाही , कारण कुणालाच माहीत नसणार.
लोकल आज वेळेत निघाली , पण आज नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती . खास करून पलीकडे लेडीज डब्यात ! आज सुरुवातीपासूनच लेडीज डब्यात गोंधळ चालू होता . तसा रोज असतो , पण आज जरा जास्तच होता . आमची लोकल कल्याणपर्यंत आली आणि आणखी गर्दी वाढली . कल्याणला एक जाडी मुलगी आजूबाजूच्या बायकांना रेटत आत शिरली . ती आल्यानंतर तर लेडीज डब्यात गदारोळ माजला . ढकला ढकली , बोंबाबोंब , चिडाचीड एकदमच !
" आयला , आज जास्तच गर्दी झालीय रे ? " शरद पलीकडे नजर टाकत म्हणाला .
" त्या जाड्या मुलींमुळे तर जास्तच चेंगराचेंगरी झालीय . " मी म्हणालो .
" त्या जाडीमुळे तिच्या समोरची तर चेंबली गेलीय फुल्ल ! गुदमरून मरेल बहुतेक ! " शरद गमतीत म्हणाला , त्या जाड्या मुलीला काही फरक पडत नव्हता . ती निवांत समोरच्या बाईवर आपला भार टाकून उभी होती . तिच्या समोरच्या बाईने चुळबुळ करायचे काही निष्फळ प्रयत्न केले पण तिला काही हालता येईना .
" उपर पकड ना ... पुरा मेरे आंग पर आ रही है । " त्या बाईंनी हिंदी - मराठीची मिसळ करून मागच्या जाड्या मुलीला टोकलं . पण ती जराही हलली नाही . " कसली जाडी आहे ही .... जराही हलत नाही " त्या बाई वैतागून म्हणाल्या .
" ओ हॅलो , आय एम नॉट इटिंग युअर फादर्स फूड ....हाऊ डेअर यु टू कॉल मी जाडी .... " त्या जाड्या मुलीने ' तुझ्या बापाचं खात नाही ' चा केलेला स्वैर अनुवाद मात्र सगळ्यांना आवडला . आमच्या डब्यात लहानसा हशा पिकला . मग मात्र त्या बाईची आणि त्या जाड्या मुलीची चांगलीच जुंपली . आमचा चांगला टाईमपास झाला . असं काहीतरी भांडणं , मारामाऱ्या , शिवीगाळ , दोन चार दिवसातून होतंच असतात . अवंतीही एअरफोन काढून त्यांचं भांडण बघत बसली. आज तिने पांढऱ्या रंगाचा सलवार आणि कुर्ता घातला होता , आणि त्यावर रंगीबेरंगी ओढणी . मस्त दिसत होती ती आज . मी तिच्याकडे बघत असतानाच कदाचित काहीतरी झालं असावं तिने थेट माझ्याकडे पाहिलं . टेलिपॅथी म्हणतात ती हीच काय ? तिचे डोळे मिश्किलपणे चमकले . भायखळा आलं आणि आम्ही दोघे आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो.
" आज काय गोंधळ चालू होता तुमच्या डब्यात ? " चहाचा घट घेता घेता मी विचारलं .
" हो ना , चांगलीच भांडणं सुरू होती . त्या जाड्या मुलींमुळे सगळं झालं ." अवंती म्हणाली .
" तिचा डायलॉग पण भारीच होता .... आमच्याकडे सगळे हसत होते "
" आमच्याकडे नेहमीच असा गोंधळ असतो . तुला सांगते , जेन्ट्स डब्यात एकवेळ जागा मिळेल पण आमच्या डब्यात ? नो वे .... "
" तुझी झालेत का अशी भांडणं कधी ? " मी गमतीत विचारलं .
" मुळात मला भांडायला आवडत नाही ... पण कोणी जर मुद्दाम करत असेल तर मी त्याला उत्तर दिल्याशिवाय राहात नाही " म्हणत तिने बन पावाचा तुकडा मोडला .
" वा ! आणि माझ्याशी भांडलीस ते ? मी तर काहीच केलं नव्हतं .... "
" मी भांडले ? कधी रे ? "
" आपली सुरुवात भांडणाने झाली होती हे विसरलीस की काय तू ? "
" ओह ... ते होय ... ते मी वेगळ्या टेन्शनमध्ये होते ... आणि तू माझ्याकडे बघत होतास ... मला वाटलं हा कोण मवाली माझ्याकडे एकटक बघतोय ? मला राग आला म्हणून बोलले . " तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव दाटले होते .
" मवाली ? मी मवाली …? काय यार तुझं चाललंय ? " ती खुदुखुदु हसत होती . मी असं म्हणत असतानाच तिचा फोन वाजला .
" एक मिनिट ... एक मिनिट ... ऑफिसचा फोन आहे " म्हणत तिने फोन घेतला , " हां , बोल तेजु ? हा .... हा ... काय ? मग आता ? ..... आणि सर ?.... अरे वा ! .... ठीक आहे ... ठीक आहे .... चाल बाय ... "
" काय ग ? काय झालं ? " तिचा खुललेला चेहरा पाहून मी विचारलं .
" अरे , काही नाही . आज आम्हाला बाहेर एका साईटवर जायचं होतं ते कॅन्सल झालं . आणि आमचे सर दुसऱ्या एका कामासाठी बाहेर गेलेत , त्यामुळे आज मला सुट्टी ! " ती ओरडत म्हणाली .
" अरे वा ! मजा आहे ! मग आता तू काय परत जाणार घरी ? "
" हो ... आता ऑफिसला सुद्धा कोणी नाही ... पण घरी जाऊन पण बोअर होईन ... आयडिया ! आपण दोघे जाऊया फिरायला कुठेतरी ? " तिचे डोळे चमकले .
" काय ? आपण दोघे ? बाईसाहेब , तुम्हाला सुट्टी असली तरी मला मात्र नाही ... आमचा बॉस आमची आतुरतेने वाट पाहत असेल "
" ए काय यार ... चाल ना ... प्लिज ... आपण कुठे बाहेर पण गेलो नाही , मस्त मारिन ड्राइव्हला जाऊ , एखादा पिक्चर टाकू ... काय बोलतो ? चल ना ... " ती एकदम हट्टाला पेटली .
" तू बरी आहेस ना ? मला ऑफिसला जायचंय ... खूप काम पडलंय ... " मी तिला टाळत म्हणालो .
" बास काय ... एका दिवसाने असा काय फरक पडणार आहे ... आणि डोन्ट टेल मी की तुला ऑफिसचं काम करायला फार आवडतं ... "
" तसं तुझं म्हणणं बरोबर आहे .... " मी विचारात पडलो. समोर एका बाजूला अवंतीसारखी सुंदर मुलगी बाहेर फिरायला चल म्हणतेय आणि दुसऱ्या बाजूला बॉसचे वटारलेले डोळे दिसत होते . अर्थात ऑफिसला जायची माझीही इच्छा नव्हतीच ! तशी कोणाची असते ?
" बघ , समजा तू आजारी पडला असतास तर काय ऑफिसला आला असतास का ? तुझ्या बॉसला सांग की तू आजारी आहेस . आणि असंही उद्या सुट्टी आहेच ... फोर्थ सॅटर्डे " तिने तोडगा काढला . एखादा मुद्दा गळी उतरवण्यात तिचा हात कोणी धरू शकत नाही आणि मलाही हा सुंदर स्रीहट्ट मोडवेना .
" थांब .... मला आधी फोन करू दे .... मग बघू " मी म्हणालो तशी ती आनंदाने किंचाळली ." अरे , जरा एक मिनिटं तर थांब ... फोन तरी करू दे ... " म्हणत मी थोडा बाजूला जाऊन आमच्या बॉसला फोन लावला . अगदी बारीक आवाजात बॉसला बरं नसल्याचं सांगितलं . मला वाटलं तो खेकसेल माझ्यावर , पण आश्चर्य म्हणजे आमचा बॉस काहीच म्हणाला नाही , वरून काळजी घे म्हणाला . हा धक्का तर मला सहनच होईना . त्याच तंद्रीत मी पुन्हा आमच्या टेबलपाशी आलो आणि तसाच बसलो .
" काय रे ? काय झालं ? चिडले का तुझे बॉस ? " अवंतीने काळजीत विचारलं .
" नाही गं ... उलट म्हणाला काळजी घे ! " मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो .
" काय ? येस ! अरे पण तू असा का चेहरा करून बसलायस ... चल उठ ! "म्हणत ती मला खेचूनच घेऊन गेली . मग मी पण ठरवलं , आज जीवाची मुंबई करूनच टाकू ! आम्ही लोकल पकडली आणि थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं . फोर्टच्या रस्त्यावरून मन मानेल तिकडे फिरू लागलो . सध्या मेट्रोची कामे चालू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फुटपाथवरून दुसरे पर्यायी मार्ग काढले होते . फोर्टमधल्या फुटपाथवरच्या फेरीवाल्यांच्या विक्रीसाठी मांडलेल्या वस्तू , पुस्तके , कपडे बघत आम्ही भटकत राहिलो. फोर्टमधल्या बिल्डिंग्स बघत फिरणे ही सुद्धा एक मजा आहे . काही काही तर हेरिटेज बिल्डिंग्स जीर्णावस्थेत असून देखील दिमाखात उभ्या होत्या आणि तितक्याच देखण्या दिसत होत्या . एक वेगळीच फिलिंग येते ह्या भागात फिरताना , जी शब्दात मांडणे कठीण आहे . हुतात्मा चौकाजवळ आल्यावर आम्हाला तहान आणि भूक दोन्ही लागली . मग बाजूच्या सँडविचवाल्याकडे जाऊन चीज टोस्ट सँडविच आणि त्यालाच लागून असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावर जाऊन उसाचा जम्बो ग्लास रिचवला तेव्हा कुठे बरं वाटलं. बाजूलाच जहांगीर आर्ट गॅलरी होती. फोर्टमध्ये जाऊन जहांगीर आर्ट गॅलरीत गेलं नाही तर पाप लागतं. जहांगीरची सगळी दालनं बघत निवांत बाहेर आलो . गेट वे ला डुलत डुलत चालत जाईपर्यंत दुपार उलटून गेली होती .
संध्याकाळ होत आली तेव्हा आम्ही मरीन ड्राईव्हवर चालत निघालो . समुद्राचा खारा वारा अंगावर घेत मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर आलो . समोर अथांग सागर पसरला होता . त्याच्या लाटा किनाऱ्यावर येऊन धडाका मारण्याचं काम अविरतपणे करत होत्या . मरीन ड्राईव्हवरचे किनाऱ्यावरचे ते सिमेंट काँक्रीटचे विशिष्ट त्रिकोणी दगड आपापल्या परीने त्या लाटांचे घाव झेलत त्यांना थोपवून धरताना दिसत होते . दूरवर समुद्रपक्षांचे थवे उडताना दिसत होते . त्या कठड्यावर बसून मला असं वाटलं की आम्ही दोन वेगवेगळ्या जगांच्या सीमारेषेवर बसलोय . माझ्या समोर अथकपणे घुसळणारा समुद्र... आणि माझ्यामागे अथकपणे चालणारी मुंबई ! दोघांनाही अंत नाही. समुद्रावर आल्यावर हे असेच काहीबाही विचार येत असतात. मी अवंतीकडे पाहिलं. ती दूरवर समुद्राकडे बघत होती . तिचे केस वाऱ्याबरोबर भुरूभुरू उडत होते . उडणाऱ्या बटा सावरण्यात तिचे दोन्ही हात गुंतले होते .
" मला समुद्र खुप आवडतो ... " ती समोरची नजर न हटवता म्हणाली . " इथं आलं ना की मस्त वाटतं . जगाच्या शेवटच्या टोकावर आपण आहोत असं वाटतं . " मला तिची गंमत वाटली . माझ्याही मनात असलेच काहीतरी विचार येत होते . समोर सूर्य अस्ताला जात होता . त्याचे लालबुंद प्रतिबिंब समोरच्या समुद्रावर पडले होते . आकाशही त्याच लाल केशरी रंगाने न्हाऊन निघाल्यासारखे वाटत होते .
" मस्त दिसतोय ना सूर्य ? " मी म्हणालो . त्यावर तिने हम्म करून प्रतिसाद दिला . मी एकवार आजूबाजूला नजर टाकली . आमच्या आजूबाजूला बरेच कपल्स बसले होते . जो तो आपल्या विश्वात मग्न होता . ह्या प्रचंड आणि अखंड चाललेल्या कोलाहलात प्रत्येक जण काही सुखाचे क्षण वेचण्यासाठी जणू आतुर झाला होता . माझा हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला . एक वेगळीच जाणीव झाली , एकाच वेळी दोघांनाही . आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत पाहिलं . इतक्यात एक मुजोर केसांची बट तिच्या चेहऱ्यावर आली . ती स्वतः ती बट दूर करणार इतक्यात मीच ती दूर केली. आम्ही दोघे एकमेकांकडे ओढले गेलो . ओठांवर ओठ टेकले आणि त्या प्रचंड कोलाहलात आम्ही दोघेही हरवून गेलो .
--- क्रमशः
पुढचा भाग (भाग 8) pls
उत्तर द्याहटवा