बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ५

                       सुरजताल वरून पुढे बारलाच-ला चा उतार सुरु झाला आणि आमच्या गाड्यांचे अग्निबाण सुसाट सुटले . आम्ही जसे उतरलो तसे वातावरण क्षणात पालटले ...काही वेळापूर्वी आम्ही स्वप्नवत वाटणाऱ्या प्रदेशात होतो आणि आता रखरखीत वाळवंट सुरु झाले .... एखाद्या लहरी लहान मुलाप्रमाणे विधात्याने मनाला येईल तशी इथल्या प्रदेशाची निर्मिती केली आहे . मनात आलं कि टाक बर्फ ... त्याचा कंटाळा आला कि लांबच लांब रखरखीत वाळवंट .... तेही नकोसं  वाटलं  कि हिरवळीचा गालीचा ... मोठमोठ्या डोंगररांगा , आणि त्यांना चिरत जाणाऱ्या अल्लड सर्पिलाकृती नद्या ... काय काय म्हणून वर्णन करावे ...?? भूगर्भशास्त्रीय दृष्ट्याही हा प्रदेश अद्याप बाल्यावस्थेत आहे ... सतत काही न काही घडामोडी घडत असतात, उल्थापालथी होत असतात .... निसर्गशक्ती उग्र ...! आणि त्याहून उग्र माणसाची इच्छाशक्ती ...!!
       
 
 आता मातीचा रस्ता सुरु झाला ... त्यामुळे हळूहळू आणि जपून गाडी चालवत आम्ही निघालो ...  दुपार टळून गेली होती आणि सारचू  अजून २५-३० किमी लांब होतं. केलाँग मधल्या हॉटेल मालकाने सांगितल्याप्रमाणे सारचू पासून पुढे लेह बरेच लांब होते आणि ते एका दिवसात गाठणे केवळ अशक्यच ..! त्यामुळे  सारचूला राहावं लागणार होतं ... आमच्याकडे वेळही तसा बराच होता. बारलाच-ला उतरल्यानंतर सपाट प्रदेश लागला ... रखरखीत , उघड्या बोडक्या डोंगरांनी आता हिरवट रंगाची वस्त्रे परीधान करायला सुरुवात केली होती . सारचू हा उंचच उंच पर्वत रंगांमध्ये बसलेला विस्तीर्ण सपाट पठारी  प्रदेश. नजर जाईल तिथवर  पट्टीने आखल्यासारखा एकदम सरळ रस्ता , डोंगराच्या पायथ्याशी कुठेतरी गडप होताना दिसत होता ...
            


 असा ' सरळमार्गी ' रस्ता आम्ही हिमालयात शिरल्यापासून प्रथमच पाहत होतो... रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवताच्या विविध रंगछटा डोळ्यांना थंडावा आणीत होत्या ... तसं  बघायला गेलं तर सारचू ह्या ठिकाणी लोकवस्ती नाही परंतु केलाँग  ते लेह हे अंतर अतिशय जास्त आहे त्यामुळे ह्या सपाट प्रदेशात काही व्यावसायिक लोकांनी पर्यटकांना  राहण्यासाठी तंबूंची सोय केलेली होती . त्यांची रचनाही अतिशय सुंदर दिसत होती ...पांढऱ्या  , पिवळ्या , केशरी तंबूंची रांग ह्या एवढ्या विशाल प्रदेशात मुंग्यांच्या रांगेसारखी  दिसत होती  ... रस्ता अगदी सरळ असल्याने पप्याने त्याच्या चालत्या गाडीवरच्या कसरती सुरु केल्या . हात-बित  सोडून गाडीवर उभा राहून तो गाडी चालवू लागला... पप्याला आम्ही नाव ठेवलं -- गरीबांचा  जॉन अब्राहम ...!         खोप्याला मधेच एक ग्रुप फोटो काढण्याची हुक्की आली . आम्हाला मुख्य रस्त्यापासून दूर  लांबच लांब सपाट मैदानात तो घेऊन गेला .तिथे अगदी जमिनीवर झोपून वगैरे त्याने angle सेट केला ... खोप्याने  कॅमेरा इतका लांब ठेवला होता , कि टायमर लावून परत पळत पळत येत असतानाच फोटो निघाला ...त्यात आम्ही सर्व ठिपक्यांप्रमाणे दिसत होतो ... आणि खोप्या, पाठमोरा ठिपका ...!! तो फोटो पाहून नंतर आम्ही खोप्याच्या फोटोग्राफीची स्तुती करत भरपूर हसून घेतलं .... पुढे आम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं  भूरूप पाहायला  मिळालं. ते कशाचे बनले असेल... , कधी तयार झालं असेल... , कसं  तयार झालं  असेल... ह्याचा विचार करण्याऐवजी  आम्ही मंत्रमुग्ध होऊन निसर्गाचे हे फाईन आर्टचे मोडेल डोळे भरून पाहत होतो ... खरंच ,  निसर्गासारखा दुसरा आर्टीस्ट कोणीच नाही !! एखादा जादुगार आपल्या टोपीतून जसे कधी कबुतर तर कधी फुले अशा आश्चर्यकारक वस्तू काढतो तसा हा निसर्ग आमच्या पुढे कल्पनातीत दृश्यांची मालिकाच सदर करत होता ... आणि आम्हीही  जादूचे प्रयोग पहिल्यासारखे ती समोरची दृश्ये पाहून आश्चर्य चकित होत होतो ... सूर्य पश्चिमेकडे पूर्णपणे झुकला होता. आता आम्हाला निवाऱ्याची  सोय करणे गरजेचे होते ... आमच्यात फक्त खोप्याच असा होता कि त्याने लडाखचा सर्व गृहपाठ व्यवस्थित केला होता ... त्याला एक रेस्टोरंटचे नाव माहित होते - माउंटन व्हयू ! आम्ही ते शोधत निघालो. नशिबाने ते सापडले ... त्याचा मालक - ' सेंगे 'अगदीच नम्र , मवाळ आणि दिलदार माणूस ...! तो मूळचा नेपाळचा ... पण वर्षातले  उन्हाळ्याचे ३-४ महिने तो इथे असतो ... त्याने आम्हाला एक गोलाकार तंबू राहायला दिला ... तंबू म्हणजे एक प्रकारचा शामियानच होता ... आत ५-६ खाटा  होत्या आणि त्यावर गाद्या टाकल्या होत्या ... आम्हाला अचानक आम्ही कोणीतरी नवाब वगैरे असल्यासारखे वाटू लागले ...              सूर्य आता   डोंगराआड  गेला होता तरी त्याने  आपली छाप  आमच्या मागच्या डोंगरावर सोडली होती ... लोहाराच्या भात्यातल्या लोखंडासारखं ते शिखर तापून लालबुंद झालंय कि काय असं  वाटत होतं ...
सूर्याने निरोप घेतला तशी  कुठेतरी  खोल दरीत इतका वेळ लपून बसलेली थंडी आमच्या अंगावर धावून आली ... ह्या प्रदेशात कसलीच अडकाठी नसल्याने वारा अगदी पिसाळल्यासारखा वाहत होता ... आता त्या दोघांची युती झाली होती ... ती थंडी मात्र मला काही सहन होईना ... अगदी आत , हाडांपर्यंत थंडी शिरलीय असं  मला वाटलं  ... मी मधूनच आतून थरथरत होतो ... सेंगे ने जेवण लवकरच बनवलं ...फुलके , बटाट्याची भाजी , भात ...  ते स्टोव्ह वरून आमच्या ताटात पडेपर्यंत कोमट  झालं... त्याने जेवण तर छानच बनवलं होतं , पण मला ते काही जाईना ... कसंबसं ते  ga^saबत्ती लाईट डिनर  उरकून आम्ही आमच्या शामियान्यात परत आलो ... थोडा वेळ पडलो असेल , पण मला अगदीच अस्वस्थ वाटायला लागलं. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती , पण माझ्यापेक्षा तरी बरीच म्हणायची ...! इतके दिवस ज्या  हाय अल्टीट्युड सिकनेसची मी खिल्ली उडवत होतो , तो किती भयानक आहे याचा प्रत्यय मला त्या रात्री आला ... श्वास ओढावा लागत होता ... जड डोकं ... जनरली  तळपायाची ' आग 'मस्तकात  जाते , इथे माझ्या  तळपायाची ' थंडी ' मस्तकापर्यंत  गेली होती .... आठवलं कि अजून काटा  येतो अंगावर ...! बाहेर वारा तर कुणाशी तरी धावण्याची स्पर्धा लावल्यासारखा पळत होता ... त्यामुळे सबंध तंबुच धरणीकंप झाल्यासारखा थरथरत होता ...त्याचा तो सुं ss  सुं sss आवाज  हिंदी हॉरर फिल्म मधल्या वाऱ्यासारखा येत होता ....त्या रात्री जरासुद्धा झोप लागली नाही ... सगळी रात्र मी थंडीने कुडकुडत काढली ... कधी एकदाची ती सकाळ होतेय असं  वाटत होतं ... सूर्याला देव का म्हणतात ते मला त्या रात्री कळलं ...
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा