गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

दुचाकी लडाखायण... भाग - ६

                    सर्र्रर्र्रर्र .... धाsss ड....! --"  आह्ह...!!  माझा पाय ... माझा पाय..sss   " फरपटत जाणाऱ्या  गाडीखाली माझा डावा पाय सापडला होता .... डोक्यावरचं  हेल्मेट एखाद्या फुटबॉल सारखं  टप्पे खात तीनताड लांब उडलं .... डावा खांदा प्रथम दाणकन जमिनीवर आपटला , नंतर घसपटत  गेला .... गॉगल  उडून कुठे पडला , देवाला  ठाउक  ....
                                                                           
                                                                                @
                                                                                @
                                                                                @


              सारचूच्या त्या तुफानी रात्रीनंतर सकाळी उठल्यानंतरही  माझं डोकं काही उतरलं  नव्हतं ...मला अजूनही अस्वस्थच वाटत होतं. थोडं चाललं तरी दम लागत होता ... हे सगळं   त्या हाय अल्टीट्युड सिकनेस मुळे घडत होतं . आम्ही अजूनही १३००० फुटांवर होतो ...बाहेर थंडीही मजबूत होती... रात्री गाड्यांवरचं सामान  आम्ही काही काढलं  नसल्याने सकाळी पुन्हा ते  बांधायचा १ तास वाचला ... " तुम लोग आठ घंठा में लेह पहुंच जायगा ..."  सेंगे आम्हाला सांगत होता ... २५० किमी च्या वर अंतर पार करून  आज अंधार पडायच्या आत कसल्याही परिस्थितीत लेह गाठायचंच  होतं  , कारण आम्ही आमच्या वेळापत्रकानुसार १ दिवस उशिरा चाललो होतो ... सेंगे चा निरोप घेऊन  सकाळी लवकरच निघालो ... आता आम्हाला सामना करायचा होता तो भयानक अशा २१ गाटा लूप्स चा ...!  २१  गाटा लूप्स हे असं  एक प्रकरण होतं  कि जे पार केल्यानंतर आम्ही आहे त्या उंचीपेक्षा २००० फुट  आणखी वर जाणार होतो ... हा विचार करून तर आधीच हाय अल्टीट्युड सिकनेस ने माझे पाय लटपटत  होते , ते आता थरथरायला लागले ... हे म्हणजे ' आधीच उंचावर त्यात चढलो उंटावर ' अशी गत झाली... हि नवीन म्हण मी अगदी परिस्थितीला धरून तयार केली आहे . वाचकांनी हि म्हण ' आधीच झालं  थोडं  अन व्याह्याने धाडलं घोडं ' किंवा ' दुष्काळात तेरावा महिना ' अशा अर्थाने घ्यावी ... तर , सांगायचा मुद्दा असा कि परिस्थिती भलतीच बिकट होती ...
                      २१  गाटा लूप्स सुरु झाले . विशेष म्हणजे  मैलाचा दगड अंतराबरोबर त्या ठिकाणाची उंचीही दाखवत होता ... १३७८० फुट .... वर नजर जाईल तिथवर वळणेच वळणे दिसत होती....



                      एकामागून एक वळण घेत आम्ही मध्यापर्यंत येऊन पोहोचलो ... संदीप प्रत्येक वळण मोजत होता ... हा वरचा फोटो १३ कि १४ व्या वळणावर पोहोचल्यावर घेतला आहे ... सगळी  गाटा लूप्स एका फोटोत येणं केवळ अशक्यच ...!!  एखादा जहरी नाग वेटोळे घालून सकाळचं कोवळं  उन खात पडलेला असावा तसा तो खालचा रस्ता दिसत होता ... अगदी वरपर्यंत गेलो . मैलाचा दगड उंची दाखवत होता  १५३०२ फुट ... पण  माझी  भीती निरर्थक ठरली... पाण्याविना जसा मासा तडफडेल तसा मी ऑक्सिजनविना तडफडेन असं  वाटलं  होतं  , परंतु जास्त काही फरक जाणवला नाही...हीच तर खासियत आहे इथल्या निसर्गाची ...! आपण ज्याची अपेक्षा करतो ते कधीच घडत नाही...आम्ही आता डोंगरमाथ्यावरून घाटाने फिरू लागलो ... पुढे एक  सुंदरशी नैसर्गिक रित्या तयार झालेली कमान दिसली ....


                   
                थोडं पुढे जातो न जातो तोच  रेशन दुकानासमोरच्या रांगेसारखी गाड्यांची रांग  लागलेली ... आम्ही जवळपास दर दिवशी असच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रस्त्यात अडकत होतो... आत्ताचे कारण होते , पुढच्या ट्रक मध्ये झालेला बिघाड ...! तो ट्रक इतर लोकांनी धक्का मारून बाजूला केला ... आम्ही पुन्हा सुसाट निघालो.... वातावरण छान होतं ... रस्ता चांगला होता .... गाड्यांचा वेगही बऱ्यापैकी  होता .... आणि एका वळणानंतर  अचानक ... , समोर एक मोठी बर्फाची राशी भर रस्त्यात पडलेली आहे असं दिसलं ... संदीप ने बहुदा अचानक पुढचा ब्रेक लावला ... काही कळायच्या आत गाडी अनकंट्रोल झाली , आणि सर्र्रर्र्रर्र .... धाsss ड....!  --"  आह्ह...!!  माझा पाय ... माझा पाय...sss  " फरपटत जाणाऱ्या  गाडीखाली माझा डावा पाय सापडला होता .... डोक्यावरचं  हेल्मेट एखाद्या फुटबॉल सारखं  टप्पे खात तीनताड लांब उडलं .... डावा खांदा प्रथम दाणकन जमिनीवर आपटला , नंतर घसपटत  गेला .... गॉगल  उडून कुठे पडला , देवाला  ठाउक .... संदीप आणि मी  काही फुट अंतर गाडीसोबत फरपटत गेलो ... कसाबसा उठून संदीप ने क्षणाचाही  विलंब न लावता माझ्या डाव्या पायावर पडलेली गाडी उचलली ...  खोप्याही त्याची गाडी थांबवून आमच्याकडे  पळत आला ... त्याने प्रथम मला रस्त्यातून बाजूला घेतलं . माझा डावा  गुडघा भलताच दुखावला होता ... काही क्षण तर मला वाटलं  कि माझ्या गुडघ्याची वाटी सरकली .... पाय हलवायची मला भीती वाटू लागली... परंतु थोड्या वेळाने धीर करून मी पाय गुडघ्यात वाकवला .... पाय ठीक होता पण दुखत होता ... धन्यवाद त्या नी- गार्ड  चे....!! नाही तर माझा पाय नक्कीच गेला असता ... थोडा वेळ मी तसाच सुन्न होऊन पडलो होतो... घरापासून जवळपास १८०० किमी लांब , असा प्रदेश कि जिथे दूर दूरपर्यंत  माणसं बघायलाही  मिळत नाहीत , अत्यंत प्रतिकूल असा निसर्ग , जर मला इथे काही झालं  तर ....?? हा विचार डोक्यात आला आणि मी ताडकन उठून बसलो ... आधी चालता येतंय का ते बघावं म्हणून मी हळूहळू उभा राहिलो ... दुखावलेल्या गुडघ्यातून बारीक बारीक कळा  येत होत्या ... कुठेही फ्राक्चर वगैरे नव्हतं .... आता जीवात जीव आला ... थोडं पाणी प्यायलो ... बरं वाटलं ... पुन्हा गाड्यांवर टांगा टाकल्या आणि आम्ही पुढे ' पांग ' च्या दिशेत निघालो... पुढचा रस्ता इतका भयानक होता कि विचारू नका ... ! उगाच बाकीच्या गाड्या जातायत म्हणून आम्ही जात होतो . एकतर आधीच आपटल्याने अंग जाम दुखत होतं , त्यात हा खडकाळ रस्ता आणि डोक्यावर तळपता सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यासारखा वाटत होता ... सकाळी कोवळं  वाटणारं  उन आता चांगलंच भाजून काढत होतं ... सगळेच त्या रस्त्याला वैतागले होते पण पांग चा तो रस्ता काही संपत नव्हता ....पांग ने अक्षरशः ' पांग' फेडले    होते . तिथे पोहोचल्यावर एक तंबू वजा हॉटेलात शिरलो ... छोटासा ब्रेक घ्यायचा म्हणून गेलो आणि  सगळे आडवेच  झालो ...


             
पडल्या पडल्या अशी काही गाढ झोप लागली कि विचारू नका...! खोप्याने  उठवलं तेव्हा कुठे आहे तेच कळेना... मग डाव्या गुडघ्यातून कळ  आली तेव्हा पांग मध्ये असल्याचा साक्षात्कार झाला... एखाद्या सासुरवाशीणीला माहेरचं घर सोडताना जसं   वाटेल तसं  काहीसं  आम्हाला पांग चा तो तंबू सोडताना वाटत होतं ... आम्ही  निघालो.. पुढे एक घाट लागला... तसा हा सगळा प्रदेशच घाटाचा...! वर पोहोचलो आणि हे मागे लिहिलेलं  वाक्य खोटं  ठरावं इतका सपाट आणि सरळ रस्ता ...इतका सरळ कि डोळे झाकून गाडी चालवावी ...एकदम मख्खन ...!



                   असं  वाटत होतं  कि असाच रस्ता असावा शेवटपर्यंत.... पण मनासारखं घडेल तर ते लडाख कसलं ...!! ये तो सिर्फ ट्रेलर था ... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त....!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा