रविवार, १५ जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण - 2


                    दिल्लीला ट्रेन मधून  बाहेर पडलो आणि आम्हाला कुणीतरी भट्टीत टाकलं  कि काय असं वाटलं....टळटळीत दुपार ...डोक्यावर आग ओकणारा सूर्य .... प्रत्येकाच्या अंगावर किमान 2 मोठमोठ्या bags .  इतकी उष्णता कि काही बोलू नका ....! तिथलं  उन हे झटका आणणारं होतं . ते कमी कि काय म्हणून दुसरं  एक संकट  आमच्या समोर दत्त  म्हणून उभं  ....! आमच्या तीन गाड्यांपैकी 2 गाड्या हजरत निझामुद्दीनला आणि 1 गाडी नवी दिल्लीला उतरवण्यात आली होती.... कल्याणहून गाड्या चढवताना 3 पैकी 2 गाड्या एका ट्रेन मध्ये  आणि संदीपची गाडी दुसऱ्या ट्रेन मध्ये  चढवल्याने हा घोळ झाला होता ....रेल्वे प्रशासनाची मेहेरबानी , दुसरं  काय ...!!  दिल्लीला पियूची ताई राहते. तिच्या मिस्टरांनी आधल्या दिवशी जाऊन गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. संदीपची गाडी शोधून तिचा पास बनवून त्यावर पार्सलबाबूची सही घेऊन ठेवली होती . त्यांच्या  मदतीमुळे  आमच्या गाड्या दिल्ली स्टेशनातून लवकर बाहेर काढता आल्या. त्यांनी आमच्यासाठी  बरीच धावपळ  केली. आणि त्यांच्यामुळेच ठरलेल्या प्लानप्रमाणे आम्हाला लवकर दिल्ली सोडता आली .... 

                   वेळ दुपारी 3 वाजताची .....तरीही  सूर्याची आग काही शांत झाली  नव्हती .... तशातच भर उन्हात आम्ही  गाड्यांवर समान बांधायला सुरुवात केली.... तिन्ही गाड्यांवर सामानाची बांधाबांध करण्यात अर्धा तास गेला ....अंगावर संरक्षक कवचे चढली .... गाड्या सामान  बांधून तयार झाल्या .... रायडर्स  बसले .... गाड्यांना चाव्या लागल्या ..... किक  मारल्या गेल्या ....ब्रू sssम  ब्रू sssम  एक्सलेटरचे  आवाज झाले .... आणि  आम्ही सज्ज झालो ते आमच्या  स्वप्नवत प्रवासाला .....
                                 
                    आजच्या रात्रीपर्यंत आम्हाला  चंदिगढ पर्यंत जायचेच होते ....दिल्लीत उष्णता इतकी होती कि रस्त्यावरचे डांबर गर्मीने वितळून मऊ  झाले होते. सिग्नल ला गाडी थांबली कि गाडीच्या टायरचे ठसे रस्त्यावर उमटत होते. एक वेळ अशी आली कि शरीरातली पाण्याची पातळी अतिशय खालावली. आमचा खजिनदार पप्याने जर वेळीच पाण्याच्या बाटल्या घेतल्या नसत्या तर आमच्यातले 1-2 जण  तरी उष्माघाताचे बळी ठरले असते. कॅमल bag  हे एक नवीन प्रकरण पप्याने आणलं  होतं ... त्यात पाणी भरून गाडी चालवता चालवताही पाईप द्वारे पाणी पिता येत असे. पप्याने  उगाचच शायनिंग मारायला हे आणलंय असं  आम्ही त्याला बोलूनही दाखवलं ..." बंर , मग पाण्यासाठी माझ्याकडे येऊ नका.... " पप्यानेही आम्हाला प्रत्युत्तर दिले ....  दिल्लीतून जसजसे बाहेर पडू लागलो तसे उनही कमी होत गेले . मग सुसाट वेगात आम्ही अंतर कापायला सुरुवात केली ... हमारी गाड़ियाँ हवां  से बातें  करने लगी ....  मध्ये येणाऱ्या गाड्यांना होर्न देत , ओवरटेक करत आम्ही पुढे  चाललो होतो . संध्याकाळी पानिपत च्या 20 किलोमीटर आधी एका ढाब्यावर आम्ही  नाश्ता करायला थांबलो ... मस्त  आलू पराठे हाणले ... चहा मारला ... आणि पुढच्या प्रवासाला निघालो ...अंधार होत आला होता ... अजून चंदिगढ 70-80  किमी लांब होतं . त्यामुळे मग अंबाल्याला राहायचं  असं  ठरलं. मस्त खाऊन  पियुन झाल्यानंतर झोपायला 12 वाजले. 
--" पहाटे 3 चा गजर लावा ,  लवकर उठायचं आहे ... " असं सांगून खोप्या गेला ...
   त्र्रीईई sssss गजर तर झाला..., पण सकाळी  6 वाजता ... सगळे धडपडत उठले .  आवरा आवरी करून निघेपर्यंत 7 वाजले. 

सकाळी रस्ता सुनसान होता . मग आमचे रायडर काय ऐकतात काय...!! भन्नाट वेगात मनालीच्या दिशेने निघालो. चंदिगढ चे रस्ते अगदी मस्क्यासारखे होते. प्रत्येक चौकात गोल गार्डन ... त्यावर सुंदर landscaping केलेलं.... रस्त्याच्या दुतर्फा स्वागत करण्यास सज्ज असलेली झाडे .... सकाळचं  कोवळं  उन .... कानाशी गुजगोष्टी करणारा वारा ....मस्त वाटत होतं .  सकाळी एका तासात आम्ही 70-80 किमी आलो असू....पोटातला कावळा  नावाचा पक्षी ओरडायला लागलेला .... एका पंजाबी धाब्यावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो... खोप्याने  ' पंज  परांठे और लस्सी दा ऑर्डर ' दिया. आम्ही दिल्लीत आल्यापासून खोप्याला काय झालं होतं  कुणास ठाऊक ? त्याच्या हिंदी मध्ये पंजाबी भाषेचा काही अंश उतरल्याचे जाणवत होते....त्याची पंजाबी भाषा भलतीच सोपी होती ....हिंदी भाषेतल्या क्रियापदाला " वांगा " प्रत्यय लावला  कि झाली  पंजाबी ....!!  त्यामुळे प्रत्येक क्रियापदाला तो  प्रत्यय लावून आम्ही त्याला चिडवू लागलो ... " मेनू खाणा  खावांगा ..., गड्डी  चलवांगा ..., पानी  पिलवांगा.... " असं काहीबाही बोलून त्याला काव आणला होता .... नाष्ट्यासोबत मस्करी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो.... 

                  पप्याची गाडी मी चालवायला घेतली....बिलासपुर कडे जाणाऱ्या घाटाला सुरुवात झाली .... सळसळत्या नागिणी सारखा समोरचा रस्ता .... वातावरणातली  आल्हाददायक थंडी.... मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी .... रस्त्यांवरून गाडी चालवायला भलतीच मजा येत होती. पण थोड्या वेळाने परत पप्याकडे गाडी देऊन मी संदीपच्या गाडीवर मागे बसलो . मनालीच्या वाटेवर एके ठिकाणी चांगलाच पाउस  सुरु झाला...  बिलासपुर . सुंदरनगर ,  मंडी  , मागे टाकत आम्ही  पुढे चाललो होतो .  रस्त्याला समांतर रेषेत बियास नदी आमची साथ देत होती... अंधार पडायला आला त्यावेळी आम्ही मनालीच्या जवळ पोहोचलो.... आणि तिथे आम्हाला दिसले ते पहिले हिमाच्छादित पर्वत.... 

ते दिसल्यावर तर आमच्या  फक्त उड्या  मारायच्या बाकी राहिल्या होत्या .... हिमालयाचं  ते प्रथम दर्शन अतिशय मनोहारी होतं ... मावळतीचे किरण हिमालयाच्या शिखरांवर पडून उजळून निघाले होते .... मनालीत पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार झाला ... मग निवाऱ्यासाठी आम्ही हॉटेल दर हॉटेल फिरलो .... शेवटी कसेतरी एका हॉटेल मध्ये थकलो - भागलेलो   आम्ही बेड वर जाऊन पडलो , पुन्हा एकदा पहाटे 3 चा गजर लावून .... कानात एन्फिल्डच्या  सायलेन्सरचा आवाज अजूनही घुमत होता ....

1 टिप्पणी: