मंगळवार, १० जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण

                तब्बल एका वर्षापासून  ठरत असलेला  आमचा लडाखचा  बेत  सत्यात उतरत होता ... दुपारच्या ट्रेनने आम्ही दिल्लीला रवाना होणार होतो .  सुरुवातीला  लडाखला जायला उत्सुक असणाऱ्या 9 जणांपैकी आम्ही फक्त 5 जण ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस मध्ये चढलो होतो.   पाच जण  म्हणजे -- संदीप , खोप्या , पियू  ( खोप्याची बायको ), पप्या   आणि मी....  ट्रेन च्या 3 tier AC  ची थंडगार हवा पुढे येणाऱ्या थंडीच्या लाटेची झलक दाखवत होती . गाडीचा भोंगा वाजला .हलकासा झटका देऊन संथगतीने गाडी सुरु झाली.... कदाचित पुढच्या प्रवासात बरेच मोठे झटके येणार असंच काहीसं ती सुचवीत असावी . गाडीने वेग घेतला , आणि सुरु झाला तो स्वप्नांच्या प्रदेशातला प्रवास .....  सामान- सुमान नीट लावून झाल्यानंतर निवांत बसलो , आणि मला मागच्या 3-4 महिन्यांच्या घटना आठवायला लागल्या....
-- " लडाखला ....??? आणि  बाईक वर ....??? " घरच्यांचा असा प्रश्न आला कि मी कुठेतरी चंद्रावरच चाललोय ... पण लडाखला जाण्यासाठी चंद्रावर  जाण्याइतकीच पूर्वतयारी करावी लागते , याचा प्रत्यय आम्हाला नंतर आलाच...! आता जर बाईक वर जायचं  म्हणजे गाड्याही तशाच दणकट हव्यात . त्याबाबतीत रॉयल एन्फिल्ड  ला तोड नाही ....खोप्या आणि  संदीप ने नव्या कोऱ्या एन्फिल्ड लडाखला जाण्यासाठी विकत घेतल्या. त्यांच्या त्या अजस्त्र गाड्यांसमोर माझी होंडा शाईन म्हणजे हिंदकेसरी समोर काडीपैलवान ...!!! तरीही ती लडाखचे रस्ते चढू शकेल असं  काही जणांचं म्हणणं .... , तर काही जण ,  ' ती दिल्ली ते मनाली  गेली तरी नशीब... ' असं  म्हणू लागले ...
-- " काही नाही रे , एक जण  तर बजाज चेतक घेऊन लडाखला गेला होता " असं  म्हणून खोप्या अधून मधून मला धीर देत होता. खरं सांगायच तर मला माझी बाईक घेऊनच लडाखला जायचं  होतं  पण , ऐनवेळी आमच्यातल्या 4 जणांनी  यशस्वी माघार घेतल्याने ' फुकट पेट्रोलचा खर्च कशाला ? 'म्हणून मग 3 बाईक घेतल्या . तिसरी गाडी म्हणजे पप्याची यामाहा FZ ... पाच जणांमध्ये तीन गाड्या हे योग्य समीकरण होत . आता 15 दिवसांचा प्रवास म्हणजे भरपूर सामान  आलंच .... अन ते बाईक वरून न्यायचं म्हणजे त्यासाठी विशिष्ठ कॅरियर्स लागणार होती. ती लडाख  कॅरियर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. खोप्या आणि संदीप ने ती कुठूनतरी मागवली आणि गाड्यांना बसवून घेतली ....त्यात 2 बाजूंना 2 मोठ्या  bags  मागे 1 लहान bag  आणि मुख्य म्हणजे पेट्रोलचे 2 कॅन  ठेवण्यासाठी जागा होती... अशी ती बहुपयोगी कॅरियर्स गाडीला लावून फिरले कि लोक माना वळवून वळवून पहायचे... एक- दोन जणांनी तर ''लडाख  का ..??" असेही विचारले . लोकांनी गाड्यांकडे कुतूहलाने बघितलं किंवा विचारपूस केली कि खोप्याला जीवनाचं  सार्थक झाल्यासारखंच  वाटायचं.... तिन्ही गाड्यांची सर्विसिंग करून घेतली होती ... आणि गाड्या आम्ही निघायच्या 2-3 दिवस आधीच  ट्रेनने दिल्लीला पाठवल्या होत्या .
               गाड्यांची अशी सजावट झाल्यानंतर वैयक्तिक खरेदीला सुरुवात केली... मुख्य म्हणजे तिथल्या थंडीसाठी थर्मलस , jackets , झीपर्स ,  हातमोजे , दरोडेखोर चेहरा दिसू नये म्हणून डोक्यावर  घालतात तसला   बालाक्लेवा   , नवीन स्पोर्ट्स शूज ,  नि- गार्ड , एल्बो गार्ड , हेल्मेट ह्यांची खरेदी झाली.... हे सगळं एकदम  अंगावर चढवल्यावर मी कोणीतरी महाभारतातलं पात्र  किंवा   अंतराळवीर वाटतोय असं  घरच्यांचं मत पडलं ....
तिथे लागणारी सगळ्या प्रकारची औषधे , गोळ्या,  मलमे  हि  खोप्या आणि पियूने आधीच खरेदी करून ठेवली  होती  . त्यात एक ' हाय अल्टीट्युड सिकनेस ' साठीची गोळी होती... ह्या अशा प्रकारचा सिकनेसही  असू शकतो आणि त्यावर गोळ्या असतात हे ऐकून तर मला मोठी गम्मतच  वाटली....हाय अल्टीट्युड सिकनेसचा  असा काय मोठा त्रास होणार होता....??  पण त्यावेळी मला कुठे माहित होतं  कि , त्या गोळ्यांची  जास्त गरज मलाच लागणार होती ....
              लडाखला जायचा रस्ता , कोणत्या दिवशी कुठपर्यंत जायचं.... , कुठे राहायचं ...., याचा सगळा प्लाsss न खोप्याने तयार केला होता ...आणि तो आम्हाला वेळोवेळी ते  इ-मेल हि करायचा , पण आम्हाला आमच्या दिनचर्येतून ते पाहायला वेळच नव्हता ... प्रवासाची तारीख जवळ येत असताना काही जाणकारांकडून आम्हाला असं कळलं  कि आम्ही उलट्या दिशेने लेह ला जाणार होतो ....बाईक वरून जाणारे जम्मू मार्गे लेह ला जातात आणि मनालीला उतरतात  , पण आम्ही दिल्ली -  मनाली  वरून लेह ला चढणार होतो. 
 -- " अरे 21 गाटा  लुपस चढण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या  कशात नाही ..." असं  खोप्या म्हणाल्यामुळे आम्हालाही स्फुरण चढलं  होतं ...... इतकी सगळी तयारी , प्लान झाल्यानंतर सामानाच्या ब्यागांचा डोंगर सांभाळत  आम्ही राजधानी एक्स्पेस मध्ये चढलो होतो ....
              राजधानी एक्स्पेस मधली सरबराई काय वर्णावी....?? आल्या आल्या अर्ध्या तासातच आम्हाला snacks आले , मग चहा , मग 2 तासांनी टोमाटो  सूप , मग 1 तासाने जेवण , मग आईस्क्रीम ....आगगाडीच्या डब्यांसारखी लाईनच.... रात्री मस्त ताणून दिली , सकाळी उठलो तेव्हा मथुरा स्टेशन वर गाडी उभी होती .... आता आणखी  2-3 तासात दिल्ली ....! तिथे  आमच्या गाड्या आमची वाट पाहत होत्या ....  
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
             

३ टिप्पण्या: