बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण .... भाग - ८


                   लेह मध्ये पोहोचायला रात्रीचे ८.३० -९ झाले ... राहण्याची व्यवस्था कुठे करावी हे ठरवण्यात बराच वेळ गेला ....एकतर भयंकर दमून आम्ही कसेबसे लेह गाठले होते ... बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर खोप्याने आधीच माहिती काढून ठेवलेल्या रेस्टहाउसचा शोध लागला ... २५० किमी च्यावर खडतर प्रवास केल्यावर अगदी कोलंबसला अमेरिकेचा शोध लागल्यानंतर होणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटींनी आनंद  आम्हाला त्या " गल्वान गेस्टहाउस " चा शोध लागल्यानंतर झाला ... हे गेस्टहाउस मुख्य शहरापासून थोडे बाहेरच्या बाजूला होते ... रात्री १० च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो तर  तिथे सर्वत्र सामसूम....!!  अंधार ....गल्वान गेस्टहाउस  म्हणजे हिंदी हॉरर  फिल्मचं  लोकेशन वाटत होतं ...त्यात आम्ही रात्री उशिरा तिथे पोहोचलो होतो त्यामुळे आपोआपच वातावरण भयपटाला साजेसं असच  झालं होतं ... पण आम्ही इतके दमलो होतो , वैतागलो होतो कि एखादा खरा भूत जरी समोर आला असता तरी आम्ही '' सुबुको आओ ... अभी जावो " असंच  काहीसं  म्हटल असतं ... रूम मध्ये गेलो मऊ उबदार रजया अंगावर घेतल्या ... आणि जगाचा तात्पुरता निरोप घेतला...
                   सकाळी ९-१० च्या सुमारास  जाग  आली... डोळे उघडल्यावर बघितलं ,  गल्वान गेस्टहाउस  च्या रूमस चांगल्या होत्या , भिंतींना निळसर रंग ....खाली मऊ  गालीचा ,  छतावर मोठ मोठे बांबू आडवे टाकलेले ... खिडक्यांना पडदे होते... सकाळी मस्त उन  पडल  होतं  त्यामुळे प्रसन्न वाटतं होतं.... बाहेर येऊन बघितलं तर रात्री जसं  वाटलं होत तसं हे गेस्टहाउस नव्हतं ...  समोर छान पैकी एक बगीचा होता ... त्यापुढे एक लहानसे शेड उभारले होते त्यात टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या ... गेस्टहाउस च्या मालकाने बाजूला लहानशी शेतीही केली होती.. कंपाउंड च्या बाजूने रांगेत उभी केल्यासारखी उंचच उंच झाडे लावली होती...


                       रात्रीच्या आणि दिवसाच्या वातावरणात जमीन आसमानाचा फरक होता .... आम्ही फ्रेश होऊन    नाष्टा केला... ओम्लेट - ब्रेड , चहा  आणि घरून आणलेल्या शंकरपाळ्यांवर  ताव मारला. लेह च्या आजूबाजूला जिथे चीनची हद्द जवळ आहे , म्हणजे पँगाँग लेक , खारदुंग ला , नुब्रा valley   अशा ठिकाणी जाण्यासाठी पास लागतो .. तो काढण्यासाठी आमच्या हॉटेलच्या मालकाला सांगितले... ते पास येईपर्यंत आम्ही लेह मध्ये जाऊन गाड्या सर्विसिंग करून घेण्यासाठी बाहेर पडलो.... आमच्या गाड्या जवळ पास १००० किमी चालल्या होत्या , त्यामुळे ऑईल बदलणे व  इतर दुरुस्तीसाठी आम्ही लेह शहरात आलो ... आणि बघतो तर काय... ? जिकडे तिकडे बुलेटच बुलेट... ' विना बुलेट लेह शहरात फिरण्यास मनाई ' असा काहीसा अलिखित नियम असावा , इतक्या प्रमाणात बुलेट दिसत होत्या ...जगात दोनच ठिकाणी  रॉयल  एन्फिल्ड  बुलेट जास्त प्रमाणात दिसू शकतात .. एक म्हणजे लेह  आणि  दुसरं ठिकाण  म्हणजे  रॉयल  एन्फिल्ड  बुलेटची  factory .... !!!  बुलेट  किती प्रकारच्या असू शकतात हे तिथेच कळेल.... आम्ही garage मध्ये गेलो तर तिथेही सगळ्या बुलेट दुरुस्तीसाठी आलेल्या.... त्या  बघून पप्याने  लेह मध्ये एक  बुलेटचं  garage  टाकूया , असा एक बिझनेसचा प्लान बोलून दाखवला ... खोप्याही त्याला तत्वतः मान्यता देणार एवढ्यात मी  जोरदार हसलो आणि तो प्लान बारगळला ., नाहीतर एका हातात पाना आणि दुसऱ्या  हातात स्क्रू ड्रायवर घेऊन खोप्या लगेच तयारच झाला असता... असो...! आज आमचा कुठेही फिरण्याचा कार्यक्रम नव्हता .. दुपारी जेवलो आणि मस्त ताणून दिली ... संध्याकाळी जवळचं  एखाद ठिकाण करावं  म्हणून आमच्या गेस्टहाउसच्या मागे असलेल्या शांतीस्तूप कडे आम्ही निघालो..... हिमाच्छादित पर्वताच्या पार्श्वभूमीवर पांढरेशुभ्र शांतीस्तूप  उठून दिसत होते ...                  शांतीस्तूप आणि त्याचं  विस्तीर्ण अंगण मावळतीच्या प्रकाशात अतिशय विलोभनीय दिसत होतं ... स्तुपावर गौतम बुद्धांच्या जीवनावरची काही प्रसंगे दर्शवली होती ....लाल , पिवळ्या, निळ्या , हिरव्या रंगाच्या पताका  फड फड करीत  त्यावर लिहिलेली  प्रार्थना ,  शांतीचा संदेश वाऱ्याबरोबर दूरपर्यंत पसरविण्याचे काम करीत होत्या .... तिथलं  बुद्धदर्शन  खरच  मनाला शांती देणारं  होतं ... नाव अगदीच सार्थ होतं ... शांतीस्तूप ...!!                    शांतीस्तूपाच्या समोरच्या डोंगरावर लांबवर लेह palace दिसत होता . काही लोक  कॅमेऱ्याची  तोंडे तिकडे वळवून दूरवर असलेल्या लेह palace ची छायाचित्रे घेण्यात मग्न दिसत होती ... आम्हीही तिथे आमचे फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेतली ... काही पर्यटक  तिबेटी लोकांचा पोशाख अंगावर चढवून स्वतः चे फोटो काढून घेत होते ... लोकांना कोणत्या गोष्टी करण्यात मजा येईल हे सांगणं कठीण आहे ....                 अंधार पडला तसे आम्ही तिथून  लेह शहर फिरण्यास निघालो... लेह फिरताना इतक्या डोंगर दऱ्या पार करून आलो आहोत असं वाटतच नव्हतं ... इथेच कुठेतरी गोव्याला आल्यासारखं  वाटत होतं... दुकाने  दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती ... आणि बाजारपेठ माणसांनी फुलून आली होती ... तिथे बऱ्याच तिबेटी वस्तू , स्वेटर्स , jackets  , शाली , खेळणी  विकण्यासाठी आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या होत्या ... तिबेटी वस्तूंच्या एका दुकानात गेलो , तिथे विविध प्रकारच्या धातूच्या वस्तू , रंगीबेरंगी खडे मांडलेले होते ...ते एकदा फिरून बघितलं  अन  मी बाहेर पडलो , आणि इतर दुकानांची विंडो शॉपिंग करू लागलो .... खोप्या आणि पियुने काहीतरी ३-४ निळ्या रंगाचे दगड विकत  घेतले ... पियुने एकदम खुशीत येऊन आम्हाला ते दगड दाखवले ....' कितीला ? ' असं विचारल्यावर तिने जी किंमत सांगितली ती ऐकून  मला पुन्हा एकदा हाय अल्टीट्युड  सिकनेस आल्यासारखं  वाटू लागलं .... खोप्याचा चेहराही सहा महिन्याच्या आजारातून उठलेल्या माणसासारखा झाला होता ... पण  बिचारा उसणं हास्य चेहऱ्यावर आणून उभा होता .... शॉपिंग तर झाली ... आता पोटपूजा ...! एका हॉटेल मध्ये गेलो .... मस्त चायनीज नुडल्स , राईस हाणला....कोल्ड्रिंक झालं ... जेवण झालं  तसं  जास्तच थंडी जाणवू लागली....  गेस्ट हाउस  वर जाऊन पडलो ... आजचा दिवस असाच लेह शहर फिरण्यात आणि शॉपिंग करण्यात घालवला  आणि ' जीवाचं लेह '  करून घेतलं...
                    संध्याकाळी शांती स्तूप ला जाताना त्याच्या पलीकडे लांब उंच असा  जगातला हाय्येस्ट मोटोरेबल रोड  खारदुंग-ला पास ( उंची १८३८० फुट ) आम्हाला दिसला होता ... आता उद्या आम्ही जगातल्या सगळ्यात उंच रस्त्यावर असणार होतो .... top  of  the  world ....!!!


२ टिप्पण्या: