शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

सिझन २- लोकल डायरी ६


सिझन २- लोकल डायरी ६ 

" मधू , जरा लवकर येशील का ? " सकाळी सकाळीच शरदचा फोन ! त्यावेळी मी झोपेत होतो . सकाळचे साडे सहा वाजले होते . 
" का रे ? काय झालं ? " अर्धवट झोपेत मी  त्याला विचारलं . 
" तसं काही सिरीयस नाही , पण लवकर ये जरा , पंधरा मिनिटे आधी ... " पलीकडून शरद म्हणाला .
" ओके , ओके ... मी आवरतो लवकर . चल बाय ... " म्हणत मी फोन ठेवला  आणि थेट बाथरूममध्ये शिरलो . पटापट सगळं आवरलं आणि स्टेशनला आलो , तर शरद माझ्याही आधी येऊन उभा राहिला होता . 
" काय रे ? काय प्रॉब्लेम ? " मी त्याला घाईघाईत विचारलं . 
" आपल्या भरतचा एक छोटासा प्रॉब्लेम झालाय रे .... "
" काय झालं आता ? लग्नाशी रिलेटेड नाही ना ? " मी त्याला विचारलं त्यावर त्याने फक्त होकारार्थी मान हलवली . " च्यायला , आता काय झालं ? "
" आपल्या ना ग्रुपची ना साली शांती करून घेतली पाहिजे .  प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहेच  बेन स्टोक्स ! " शरद वैतागून म्हणाला . 
" काय झालं सांग ना आता ... " शरद मुद्द्यावर पटकन येत नाही . दुसरंच काहीतरी बडबडत बसतो . 
" अरे , दोन दिवसांपूर्वी भरतच्या मोबाईल वर एका अन्नोन नंबरवरून फोन आला , समोरचा म्हणाला की सुनीताचा नाद सोड म्हणून ... " 
" सुनीता  ? कोण सुनीता  ? " 
" अरे .... सुनीता  म्हणजे आपली होणारी भाभी  .... भरतची होणारी बायको ! "
" ओके ओके .... पण कोण होता तो हरामखोर ? " 
" काय माहीत नाही रे .... असाच फोन केला आला होता साला ... भरतला काल विचारलं तर त्याने पण मोघम सांगितलं रे ... मला वाटतं तू एकदा विचारून बघ " शरद म्हणाला . 
" ठीक आहे . आज आला की बोलतो . " हळूहळू एकेक मेम्बर येत होते . भरतही आला . त्याने सगळ्यांशी हाय हॅलो केलं , पण चेहऱ्यावर काहीसा तणाव असल्याचं स्पष्ट दिसत होतं . ' मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी .... ' गाडीची अनाऊन्समेंट होत होती . मागोमाग लोकलचा  हॉर्न ऐकू आला . शरद - भरत पुढे निघून गेले . लोकलमध्ये आम्ही आमच्या जागेवर बसलो . जिग्नेस डाऊन करून आला नव्हता . बहुतेक तो येणार नसेल पण  मी खिडकीतून बघितलं तर मागून येणाऱ्या कर्जतला  लोकलमधून  तो उतरताना दिसला . तो प्लॅटफॉर्म नंबर एक वरून दोन वर धावत  येत असतानाच अचानक थांबला आणि हात जोडून पुतळ्यासारखा  उभा राहिला . मला कळेना हा असं का वागतोय ते ? पण लगेच लक्षात आलं की ती फोनवाली भांडणारी  मुलगी कानाला फोन लावून त्याच्या बाजूने जात असलेली दिसली . तिने जिग्नेसकडे पाहिलं . जिग्नेसने हात जोडून तिला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला . ती विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहात गेली . पण जाताना तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू असल्याचं मला दिसलं . ती गेल्यावर जिग्नेस घाईघाईत लोकलमध्ये चढला. 
" जिग्नेस , आज भी लेट आया तू ? " मी मुद्दाम त्याला छेडलं . 
"अरे यार मधू भाय , आजकाल सुभे आँख ही नहीं खुलती । लेट हो राहा हूँ रोज । " जिग्नेस आताही झोपेतून उठून आल्यासारखा वाटत होता ... 
" तेरे लिये एक शेर अर्ज करता हूँ , इर्शाद बोला ना यार .... " शरद म्हणाला  मग सर्व जण झोपेतून जागे झाल्यासारखे इर्शाद ... इर्शाद करायला लागले . 
 मुद्दतों के बाद हमे निंद आई है ।
मुद्दतों  के बाद हमे निंद आई है ... 
वरना इस इश्क ने  तो खामखां जगाए रखा था ।  "  शरदच्या ह्या शायरीवर  सर्वांनी वाह वा करत  त्याला दाद दिली . 
" यार शरद भाय , तुम तो शायर निकले ! " जिग्नेस पण खुश झाला . 
" अरे नहीं यार , जसं सुचलं तसं बोलून गेलो . " शरद ने मला खुणावलं . मी जिग्नेसला बसायला माझी जागा देऊन उभा राहिलो . भरत आता शरद आणि माझ्या मध्ये उभा होता . लोकलने कल्याण सोडलं आणि गुपचे बाकीचे लोक आपापल्या उद्योगाला लागले . आता भरतशी बोलण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. 
" काय भरत ; सध्या काय चालू आहे ? " मी सुरुवात केली . 
" काही नाही ... नेहमीचंच " तो मोघम म्हणाला . 
" लग्नाचं कुठपर्यंत आलंय ? कधी ठरवलंय ? " मी बिनधास्त विचारलं जणू काही मला काही माहीत नाही . त्यावर त्याने दोन सेकंद  माझ्याकडे  बघितलं  , कदाचित त्याला खात्री करून घ्यायची असेल की मी मुद्दाम चिडवण्याच्या हेतूने तर त्याला विचारत नाही ना .... मी चेहरा अगदी सरळ ठेवला . 
" चालू आहे तयारी ... "   तो म्हणाला पण त्यात उत्साह दिसत नव्हता . 
" भरत , त्याला माहित आहे . " शरद असं म्हणाला आणि अचानक भरतच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले . तो रागात त्याला काही बोलणार इतक्यात मी त्याला अडवलं , " भरत , आम्ही तुझी मस्करी करीत नाही . आम्हाला खरंच काय झालं ते जाणून घ्यायचंय  . कदाचित आमची तुला मदत होईल . " त्यावर तो शांत झाला . पण  काही बोलेना . कदाचित हा विचित्र असा पर्सनल प्रॉब्लेम आम्हाला कसा सांगावा ह्याचा तो विचार करीत असावा . पण थोड्या वेळाने तो बोलू लागला . 
" साला एक फालतूगिरी झालीय रे . तुला  कसं सांगू ते कळत नाही . " तो वैतागला होता . , " दोन - तीन दिवसांपूर्वी माझ्या मोबाईलवर एक फोन आला . मला म्हणाला सुनीताचा  , म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचा नाद सोड . मी त्याला बोललो , की तू कोण बोलतोय म्हणून ? तर बोलला तुझ्या होणाऱ्या  बायकोचा बॉयफ्रेंड .! सालं असं डोकं फिरलं .... त्याला चार शिव्या घातल्या आणि परत फोन करू नको अशी धमकी दिली . " 
" मग ? पुढे काय झालं ? " मी विचारलं . 
" ते झालं रे , पण डोक्यात किडा शिरला ना .... विचार करून डोकं फिरायची पाळी आली . सालं जिग्नेसचं झालं तसं होतंय की काय , असा विचार करून टेन्शन वाढायला लागलंय.  " भरत वैतागून म्हणाला . 
"  त्यानंतर परत कधी आला होता फोन ? " 
" नाही ना ... एकदाच आला पण डोक्याची मंडई करून गेला . मी परत फोन करून बघितला , पण साला स्विच ऑफ यायला लागलाय . आज सकाळी परत ट्राय केला पण स्विच ऑफच येतोय .  " 
" मग तू सुनीता  भाभीला विचारायचं ना डायरेक्ट . मी असतो ना तुझ्या जागी तर डायरेक्ट काय  ते बोललो असतो " शरद म्हणाला .
" असं कसं डायरेक्ट  विचारणार ? तुझी गोष्ट वेगळी आहे , तू मॅगी भाभीला ओळखत होतास आधीपासून.  माझं अरेंज मॅरेज आहे यार . मला तर काहीच माहिती नाही तिच्याविषयी . आणि एका परक्या मुलीला असं कसं थेट विचारणार ? त्यात साला हा फोनवाला कोण  उपटला मधेच ! " 
" असं कसं बोलतोय रे हा ? " शरद माझ्याकडे बघत म्हणाला , " मला सांग , अरेंज मॅरेज असलं म्हणून काय झालं …? तुला जे काही आहे ते क्लीअर करायला पाहिजे की नाही ?  " 
" भरत , यार मला वाटतं शरद बरोबर बोलतोय .  जिग्नेसची गोष्ट वेगळी होती . त्याला काहीच माहिती नव्हतं . पण आता तुला जर माहीत आहे की असं कोणीतरी आहे  जो  तुझ्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलतोय तर तू तिला थेट विचारायला हवंस . " मी म्हणालो , त्यावर तो विचारात पडला . 
" तसं तुमचं बरोबर वाटतंय मला ... पण तरीही कसं विचारायचं ह्या विचाराने डोकं फिरून गेलंय यार ! " 
" अरे , तुला सांगतो ना , तो चू कोणीतरी असाच असेल , त्याला फक्त काड्या घालायच्या असतील . नाहीतर फोन बंद ठेवला नसता त्याने ... डर पिक्चरचा शारुख , काय  बोलतो  मध्या ? " शरद म्हणाला . 
" पॉईंट आहे ! हा असाच कोणीतरी असेल बहुतेक , म्हणून बोलतो की तू सुनीता भाभीला एकदा सरळ काय ते विचारून टाक " मी म्हणालो . भरत आणखीनच विचारात पडला . 
" माझ्याकडे एक आयडिया आहे  ,  त्या मुलाचा पत्ता काढून ठोकू साल्याला ... काय बोलतो ?  "  शरद उत्साहात म्हणाला . त्याला हे असले उद्योग करण्यात जाम रस असतो . तशा त्याच्या बऱ्याच ओळखीही आहेत . तो सहज ही कामे करू शकतो आणि त्यातून सही सलामत बाहेरही पडू शकतो . पण मला काही हा मार्ग योग्य वाटत नव्हता .  जर सरळ मार्गाने कामे होत असतील तर वाकड्यात कशाला शिरा ? 
" ते काही करायची गरज नाही रे ... आणि  मी तर बोलतो फक्त सुनीता भाभीला  थेट काय ते विचार . " मी म्हणालो .
" थेट विचारू ?  पण कसं विचारणार ? " भरत गोंधळून गेला . 
" कसं विचारणार म्हणजे ? लगेच फोन लाव आणि डायरेक्ट विचार "  शरद म्हणाला. 
" आत्ता ? " 
" मग काय मुहूर्त काढतो का काय ? " शरद त्याच्यावर खेकसला . मीही त्याला दुजोरा दिला . मला शंभर टक्के गॅरंटी होती की असं काही नसणार ... कारण प्रेमदूताने भरतबाबत हेच भाकीत केलं होतं की ,  तो ज्या मुलीला बघायला गेला आहे तिच्याबरोबरच त्याचं लग्न होईल , त्यामुळे मी  बिनधास्तपणे त्याला तिला फोन करायला सांगितला .  भरतने बॉम्ब काढावा तसा खिशातून मोबाईल काढला आणि सुनीता भाभीचा नंबर डायल केला . पलीकडून रिंग वाजली . ती ऐकून भरतच्या चेहऱ्यावरचा तणाव एकशे ऐंशी पटींनी वाढला . पलीकडून फोन उचलला आणि भरत बोलू लागला .सुरुवातीला नेहमीचं  कसं काय ? वगैरे बोलून झाल्यावर  भरत मुख्य मुद्द्यावर आला . त्याने त्याला आलेल्या फोनबद्दल विचारलं . पलीकडून सुनीता भाभी बोलत होती , शरद आणि मी  भरतच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखत होतो .  थोड्या वेळाने त्याने फोन ठेवला आणि खिशातला रुमाल काढून कपाळावर जमा झालेला घाम पुसला .  
" काय रे ? काय म्हणाली भाभी ? सगळं ओक्के ना ? " शरदने  घाईघाईने विचारलं जणूकाही त्याचे कान त्यासाठीच आतुर  झाले होते.  त्यावर भरत काहीच म्हणाला नाही .मीही विचारून पाहिलं , तरी काही बोलेना . एकटक कुठेतरी शून्यात बघत बसला . 
" ए बाबा , काय झालं ते तरी सांग ना ... असा काय बघतोय ? " शरद ला राहवलं नाही . 
" ज्याची भीती होती तेच झालं . " भरत अतीव नैराश्याने म्हणाला . 
" भरत , भाभी काय म्हणाली ? प्लिज सांग " मीही आता टेन्शनमध्ये आलो . 
" ती म्हणाली , तुम्हाला त्याचा फोन कसा काय आला ? मी तुम्हाला सांगणारच होते ... हे असं फोनवर नाही सांगता येणार प्रत्यक्ष भेटून सांगते . " 
आता आपापल्या खिशातून रुमाल काढून घाम पुसायची  पाळी शरद आणि माझ्यावर आली . 

-- क्रमशः 

1 टिप्पणी: