बुधवार, २९ एप्रिल, २०१५

लोकल डायरी -- ११

                                                                                      
" नाव … ? "
" मॅगी "
" आडनाव …. ? "
" डिसूजा "
" वय …. ?  "
" २४ वर्षे .... आयला हे काय आहे ? काय चाल्लय ? " शरद   वैतागला.
" अरे काय यार ....  तिसऱ्या प्रश्नालाच वैतागलास ...? हे बघ माझ्याकडे प्रश्नांची  लिस्टच आहे " सावंत २० - २५ प्रश्नांची मोठी लिस्ट दाखवत म्हणाले . काल ठरल्याप्रमाणे  सगळी प्लॅनिंग झाली की शरद आपल्या प्रेमासाठी मरण पत्करणार होता . आणि त्यासाठी आम्हाला मॅगीची खडा न खडा माहिती हवी होती . त्यात ती सकाळी घरातून किती वाजता निघते ...? स्टेशनला यायला किती वेळ लागतो ...? कोणत्या बाजूने ती स्टेशन मधे येते ..?  वगैरे वगैरे बरेच प्रश्न होते . मला तर आतून गुदगुल्या झाल्यासारख्या वाटत होत्या .  आम्ही एखादं सिक्रेट मिशन वगैरे करतोय की काय ? असं वाटत होतं .
" शरद नीट व्यवस्थित उत्तरं दे ... ते तुझ्यासाठी चांगलं आहे ... " मी गंभीर चेहरा  करुन म्हणालो .
" माझ्यासाठी चांगलं आहे म्हणजे ? असं काय करणार आहात तुम्ही ...? हट , मला नाही ही फालतुगिरी करायची ...!"
" थांब शरद , एकच मिनिट थांब ... तुझं मॅगी वर खरं प्रेम आहे ? " भरतने  विचारलं . त्यावर त्याने नुसती मान हलवली
" तुला खरंच तिच्याशी लग्न करायचंय ?  " मी विचारलं
" हो ... " शरद निश्चयाने म्हणाला .
" मग आम्ही सांगतो तसं आणि फक्त तसंच कर ..."  सावंत अशा काही टोन मधे म्हणाले की शरद शांतपणे उभा राहिला . आज आमचा  सगळा ग्रुप लवकरच प्लॅटफॉर्म वर आला होता . आज शरद आम्हाला मॅगीशी ओळख करुन देणार होता ... ओळख करुन देणार म्हणजे तो लांबुनच दाखवणार होता . तसा लोकलला आणि तिलाही यायला बराच वेळ असल्यामुळे आम्ही शरदला सावंतांनी ख़ास तयार करुन  आणलेले प्रश्न विचारत होतो . जेणेकरुन  आम्हाला पुढचं प्लॅनिंग करता येईल .… काल जिग्नेसने गमतीगमतीत  ट्रेन खाली जीव देण्याच्या धमकीची आयडिया शरदला दिली आणि इथून ह्या सगळ्या महाभारताची सुरुवात झाली . सावंतांनी त्यावर विचार करुन लगेच एक योजनाही बनवली.   ते लगेच आम्हाला सांगणार नव्हते . पण  नक्की काहीतरी भन्नाट असणार !!!
"  ठीक आहे चालू दया तुमचं ..." शरद नाईलाजाने म्हणाला . आम्ही आणखी काही प्रश्न विचारले त्याची त्याने शहाण्या बाळासारखी उत्तरे दिली . आम्ही त्याची ही तोंडी परीक्षा घेत असताना अँटी व्हायरस प्लॅटफॉर्मवर आलेली मला दिसली . तिने   पूर्ण बाह्यांचा पट्टया पट्टयांचा टॉप आणि डेनिम जीन्स घातली होती.  गळ्याला रेशमी स्कार्फ गुंडाळलेला होता . तो तिच्या टॉप वर शोभून दिसत होता .  मी मुद्दामच मग तिच्याकडे पाठ करुन उभा राहिलो . आता तिच्यापासून लांब राहणेच योग्य ...!  शरदचं तिच्याशी काहीही नसलं तरी दूसरा कोणीतरी,   तिचा होणारा नवरा होताच ना ..!   चकचकित महागड्या दुकानात काचेच्या पलीकडे असलेल्या  वस्तु फक्त बघत राहाव्यात   तशी माझी अवस्था झाली होती . तिने बहुदा आमच्या ग्रुपकडे एकदा नजर टाकली असावी , कारण आमच्या प्रश्नांची उत्तरे देता देता शरदने  तिच्याकडे बघुन ओळखीचं हसल्यासारखं केलं . मी मागे वळून  न बघण्याचा केलेला निश्चय उन्हात ठेवलेल्या बर्फासारखा वितळला... आणि मी तिच्याकडे पहिलं . तिने मला हाताने ' हाय ! ' अशी नाजुक खुण केली . माझाही हात आपोआप वर झाला . नशीब त्या वेळी सावंत प्रश्न विचारण्यात आणि शरद उत्तर देण्यात दंग होता  .  तरी भरतने मला तसं करताना पहिलंच...! त्याने भुवया उडवून मला  ' काय चाल्लय ? ' अशा अर्थाचं नजरेनेच   गमतीत  खुणावलं ... मी त्याला ' काही नाही ' असं खुणावलं ... तर तो माझ्याकडे बघत मिश्किलपणे गालातल्या गालात हसला .
" अरे ती बघ , आलीच मॅगी... ! " शरद तिच्याकडे बघत म्हणाला .
" कुठंय ...? कुठंय ...? " आम्ही  सगळे एकदमच इकडे तिकडे बघू लागलो .
" येड्यासारखे करू नका रे ... शांतपणे माझ्या डाव्या बाजूला पहा . आकाशी रंगाचा टॉप आणि जीन्स घातलेली  मुलगी येतेय ना तीच मॅगी आहे. "  शरद आम्हाला दबक्या  आवाजात सांगत होता .
आम्ही  पाहिलं , तिचं नाव मॅगी का असावं ह्याचं उत्तर तिच्याकडे बघुनच आम्हाला कळलं , तिचे केस मॅगी नूडल्ससारखेच कुरळे होते . आणि ते मोकळे सोडलेले केस तिला शोभतही होते . गळ्यात सोन्याच्या क्रॉस होता . गोरी म्हणता येणार नाही पण तिचा सावळा रंग तिला शोभून दिसत होता  .  चालताना ती नाकासमोर चालत होती .    तशी  नाकी डोळी  चांगली होती ती !  एकूणच शरदला शोभेल अशीच होती . ती आमच्या बाजूने चालत गेली . आम्ही तिच्याकडे बघतोय हे तिच्या  लक्षातही आलं नसेल.
"ओके , टारगेट स्पॉटेड...!  शरद तुम्हारा  चॉईस अच्छा है ..."  नायर अंकलनी  कॉम्प्लीमेंट दिली
" बरं , आता  आपल्याला आणखी 2-3 दिवस तिचं ऑब्ज़र्वेशन करावं लागेल . त्यानंतर आपल्याला प्लॅन एक्जीक्यूट कधी करता येईल ते ठरवावं लागेल. "  सावंत म्हणाले .
" सावंत एक विचारु का ...? तुम्ही नक्की कसला प्लॅन करताय ...?  मला टेंशन यायला लागलंय ... " शरद कसंनुसं तोंड करत म्हणाला .
" काय नाय रे ... तू टेंशन घेऊ नको ...  सगळं नीट होईल... " सावंत त्याला समजावत म्हणाले . गाडीची अनाउन्समेंट ऐकायला आली , पाठोपाठ  गाडीचा हॉर्न वाजला .  लगेच गाडी प्लॅटफॉर्मला लागली सुद्धा ! आम्ही आपापल्या जागा पकडल्या . पण उल्हासनगरहुन काही लोक डाऊन करुन आल्याने मी आणि भरत उभे राहिलो , आणि बाकीच्यांना बसायला जागा दिली .  अँटी व्हायरस समोरच उभी होती . तिने नेहमीप्रमाणे कानात एअर फोन घातले आणि गाणी ऐकत उभी राहिली .  तिने एकदा माझ्याकडे पहिलं आणि स्माईल केलं . मीही तिला प्रतिसाद दिला . थोड्या वेळाने भरत माझ्या कानापाशी आला अन म्हणाला , " कोण आहे रे ती ? "  मी उडालोच !  पण जास्त काही आश्चर्य न  दाखवता , "  कोण  रे ? "असं विचारलं . त्यावर तो म्हणाला , " तीच रे मघाशी तुला हाय करत होती ती आणि आत्ता स्माईल दिलं ती  ...? " त्याच्या विचारण्यात ' कसं पकडलं ! ' असा भाव होता .  मी काहीतरी  सांगायचं म्हणून बोललो  ," अरे ती होय ... ती अशीच ओळखीची आहे ... "
" ओह ...! अशीच ओळखीची का ... बरं... बरं ..."  तरी तो माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होता . त्याला काय घ्यायचा तो अर्थ  त्याने घेतला होता . त्यामुळे मी त्याला जास्त काही समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही . मधे थोडा वेळ गेला . आणि  लेडीज कंपार्टमेंटमधून मोबाईलची रिंग वाजली . माझं सहज लक्ष गेलं तर अँटी व्हायरस इअर फोनचा माईक तिच्या ओठांजवळ  नेऊन बोलत असलेली मी पाहिली . मला अचानक भरतची आठवण झाली , तो लिप रीडिंग करण्यात पटाईत आहे हे मागे त्याने दाखवून दिलं होतं . आता मी पुढचा मागचा विचार न करता त्याला  खूण केली .
" ती समोरची मुलगी फोन वर काय बोलतेय ते सांगू शकतोस ... प्लीज ...? " मी अवघडलेल्या चेहऱ्याने त्याला विचारलं .
" अरे , अशीच ओळखीची आहे ना ... मग ... कशाला पाहिजे तुला ....?  " विजयी मुद्रेने त्याने मला टोमणा मारला
" प्लीज यार , तुला सांगतो नंतर ... प्लीज ...."
"ओके ... ओके... लेट मी कॉन्संट्रेट ...." म्हणत तो बारकाईने तिच्याकडे पाहू लागला .  ती बराच वेळ फोनवर बोलत होती . तिच्या निरीक्षणाचे काम   मी भरतवर सोपवून सावंत आणि शरदची चर्चा ऐकू लागलो .
" आपण परवाची डेट फायनल करु , काय बोलतो ...? सावंत म्हणाले .
" इतक्या लवकर ? तुम्ही ऑब्जर्वेशन की काय ते करणार होतात ना ? " मरण इतक्या जवळ म्हणजे परवावर येईल असं शरदला वाटलं नसावं .
" उद्याचा दिवस आहे त्यासाठी . आजचं  टायमिंग मी नोट केलंय . "  सावंत  हातातला पेपर दाखवत म्हणाले .
" आणि समजा परवा ती ट्रेनला आलीच नाही तर ...? " शरद आता कसल्याही शंका काढायला लागला .  मी मधेच अँटी व्हायरसकडे पहिलं , ती अजुनही फोनवरच बोलत होती . भरत इमाने इतबारे त्याचं काम करत होता.
" तुम इतना डरता कायको है ? प्यार किया तो डरना क्या ? " नायर अंकल मधेच पेटले.
" अंकल वो डरता नहीं ... जो डरता नहीं उसीको शरद भाय बोलते है !!!" जिग्नेस त्याला झाडावर चढवत होता .
" साले तेरी बजेसे ये सब हो रहा है .... फुकट में मुझको मरवाया ..." शरदने त्याच्या पाठीत एक बुक्का  मारला .
" त्याला कशाला मारतोस यार ... बरं जाऊ दे ...  तुला नको असेल तर आपण नको करुयात हे सगळं ... उगाच कुणाला दोषी नको ठरवायला ..." सावंत म्हणाले .
" बास काय सावंत , गमतीने म्हणालो मी  असं , जिग्नेस और मेरा तो ऐसेही चलता है ...क्या जिग्नेस ...? म्हणत त्याने आधीच बारीक असलेले जिग्नेसचे गाल ओढले .  सगळे हसले . मी भरतकडे पहिलं तर त्याचं निरिक्षण अजूनही चालू होतं . इतकी काय बोलत असावी ती फोनवर ?  तिच्याकडे बघुन मला कसलाच अंदाज  बांधता येईना . अखेर बोलणं झाल्यावर तिने फोन ठेवला . मी  भरतकडे  उत्तराच्या  अपेक्षेने  पाहिलं . त्याचा चेहरा गंभीर झाला होता .
" काय रे ?  " मी हळू आवाजात त्याला विचारलं . त्यावर त्याने मला कान त्याच्याकडे करायला सांगितला .
" तिचा नाद सोड , ती तिच्या मैत्रीणीशी   बोलत होती तिच्या  होणाऱ्या नवऱ्याबद्दल ...!  " एखादी दुखःद बातमी सांगावी तसा भरत मला सांगत होता .
" मला माहीत आहे , पुढे बोल ..." मी असं म्हटल्यावर त्याने अविश्वासने माझ्याकडे  पाहिलं .
" तुला माहीत आहे हे ? "
"हो .... पण ती इतका वेळ फोनवर काय बोलत होती ते सांग ना ..."
" तिच्या  होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगत होती . तो कसलंही कारण काढून तिच्याशी भांडतो ... सारखा तिच्यावर संशय घेतो , स्वतः ऑफिसच्या मुलींबरोबर ट्रेकला  , फिरायला  जातो ... आणि ती कोणाशी बोलली तरी त्याला राग येतो .  वगैरे वगैरे .... तो पूर्वी असा नव्हता . लग्न ठरल्यापासून तो तिला त्याची मालकी समजायला लागलाय ... असं बरंच काही बोलत होती "
" ओके ... " मी म्हणालो . डोक्यात तिचाच विचार होता .
" आणखी...  एक गोष्ट सांगायची राहिली ... " भरत अडखळत  म्हणाला .
" काय ? " काहीतरी अनपेक्षित ऐकायला मिळणार याचा मला अंदाज आलाच .

" तिची  एंगेजमेंटची तारीख ठरली आहे . बहुतेक पुढच्याच  आठवड्यात  २७ ला  ...! "

रविवार, २६ एप्रिल, २०१५

लोकल डायरी -- १०

       लोकल मधे दररोज लाखो लोक प्रवास करतात . प्रत्येकाची कसली ना कसली कहाणी असेल . कुणाची कहाणी सुरु  व्हायची असेल तर कुणाची सुरु असेल....त्यात एक गोष्ट मात्र नक्की की  लाखो लोकांच्या  कहाण्यांमधून एक कहाणी कमी झाली होती , ती म्हणजे माझी ... ! कालपासूनच एक प्रकारची उदासीनता आली होती . एखाद्या क्रिकेटप्रेमीला भारताची मॅच हरल्यावर येते तशी ..! लोकलच्या  प्रवासाचा  इंटरेस्टच गेल्यासारखा वाटत होता . तसा माझा काही प्रेमभंग वगैरे झालेला  नव्हता ,  पण  मनाला एक प्रकारची मरगळ आली होती. कालची अँटी व्हायरसबरोबरची माझी भेट मला आकाशात सुर्रर्रकन जाऊन फुटणाऱ्या दिवाळीतल्या रॉकेट सारखी वाटली ... केवळ क्षणिक आनंद देणारी ...!  त्यानंतर  त्या रॉकेटसारखा  मी   कुठे जाऊन पडलो ते  माझं   मला सुद्धा कळलं नाही...    मी तसाच पाय ओढत स्टेशनच्या दिशेने चाललो होतो . इतक्यात एक रिक्षा जवळजवळ मला घासुन गेली ... माझं असं टाळकं सटकलं... !!!
" अरे ए ... भो ×××    डोळे फुटले काय ? " हाताला जिथं रिक्षाचा धक्का लागला तिथं कितिसं खरचटलंय ते बघत मी त्या रिक्षावाल्याला शिव्या दिल्या . पण तो तसाच सुसाट निघुन गेला .  आपल्यामुळे कुणाला दुखापत झाली असेल हे तर त्याच्या गावीही नव्हते .  आयला , दिवसच खराब आहे आजचा ... !!  माझा दिवस आणखी खराब जाणार होता ... स्टेशनच्या जवळ पोहोचलो   आणि जिथे रिक्षा येऊन  थांबतात तिथे लांबुन पहिलं तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना ,  शरद आणि अँटी व्हायरस दोघे एका रिक्षातून उतरत होते . मला आश्चर्यचा धक्काच बसला . रिक्षातून उतरून ते दोघे एकमेकांशी थोडे हसून बोलले आणि निघुन गेले . शरद आणि अँटी व्हायरस एकत्र   ? हे कसं शक्य आहे  ?    शरद इतके दिवस जे दुःखी होता ते तिच्यामुळे ? काल अँटी व्हायरस सांगत होती की ती तिच्या होणाऱ्या  नवऱ्याबरोबर फोनवर बोलत होती ... म्हणजे तिचा होणारा नवरा शरद आहे ? ओह माय गॉड .....!!!  म्हणजे मला इतके दिवस आवडणारी मुलगी माझ्या जीवलग मित्राची होणारी बायको होती...? माझ्या डोक्यात एकदमच विचारांचं चक्रीवादळ उठलं.... त्याच बरोबर जोरात काहीतरी वाजल्याचा आवाज झाला... " अबे देख के चल ना बाबा ..." कारचा मालक माझ्यावर खेकसत हॉर्न वाजवत होता . माझ्या लक्षात आलं , मी विचारांच्या नादात रस्त्याच्या मधोमध उभा होतो . " सॉरी ... सॉरी.... " म्हणत मी  रस्त्यातून बाजूला झालो .  कसेबसे मी रेल्वेच्या ब्रिज  चढुन वर गेलो.  दोन नंबर प्लॅटफॉर्मला आमची नेहमीची ८ : २४ लागलेली होती. मला आता त्या आमच्या नेहमीच्या डब्यात जायचा धीर होईना . तिथे शरद असेल , बाजूला अँटी व्हायरस असेल ... मी शरदच्या नजरेला नजर कसा भिडवु ... ?  शरदला हे  आमचं कालचं भेटणं समजलं तर .... तर काय होईल ...?  " दोस्त दोस्त ना रहा ....प्यार प्यार ना रहा .... " शरद हे  गाणं माझ्यासाठी म्हणत असल्याचं मला दिसू लागलं .... कदाचित आमचं जोराचं भांडण होईल ... कदाचित शरद माझ्याशी बोलणंच सोडून  देईल ... कदाचित तो आमच्या नेहमीचा   डबाही  सोडून देईल...  ही गोष्ट आमच्या ग्रुपला समजेल आणि सगळेच माझ्याशी बोलणं सोडून देतील. मला वाळीत टाकतील... गद्दारचा शिक्का मारतील . माझ्या हातून महान पातक घडल्यासारखं मला वाटायला लागलं .  इतक्या  सगळया  विचारांनी  डोक्यात थैमान घातल्यामुळे माझं डोकं भणभणु लागलं.  माझ्या अंगातली शक्तिच नाहीशी झाल्यासारखी मला वाटली.  कसातरी मी माझ्या डब्यापर्यंत पोहोचलो . पण आत जायचं धाडस होईना .
" काय रे मध्या ..., आज डोअरलाच उभा राहणार आहेस काय ? " डोअरवरच्या रवीने माझी तंद्री मोडली .
" नाही रे .... जातोय ना आत ... "
"तब्येत बरी आहे ना भाई तुझी ... ? असा का दिसतोयस... " त्याने काळजीने विचारलं . मी नुसतं हूं करुन आत शिरलो . आत गेल्यावर  भरत आणि सावंतांनी  ' अरे मध्या आला ...मध्या आला ' म्हणत माझं स्वागत केलं . मला शरदकडे बघायचं धाडस होईना . मी माझी बॅग वरच्या रॅकवर ठेवली  आणि शांतपणे दोन सीट्सच्या मधे जाऊन उभा राहिलो . पलीकडे अँटी व्हायरसकडेही  बघायचा धीर मला काही झाला नाही .
" अरे मधु काय झालंय ...?  एकदम शांत शांत ... " भडकमकर मला विचारु लागले .
" काही नाही ओ ... जरा बरं वाटत नाही ... " मी म्हणालो.
" अरे बरं वाटत नाही तर उभा कशाला आहेस ...? बस ... " म्हणत शरद उठला आणि त्याने त्याची बसायची जागा मला दिली .
" अरे नको ... मी बरा आहे ... जास्त काही नाही.... " मी त्याच्या नजरेला नजर न देताच म्हणालो . अपराधीपणाची भावना मला बोचत होती . तरी त्याने माझ्या हाताला धरून बळेच मला त्याच्या जागेवर बसवलं , आणि तो माझ्या जागेवर उभा राहिला . मी खरंच नकळत शरदची जागा घेतली  होती .   शरद आज पहिल्यासारखा सर्वांशी बोलत होता . मस्करी करत होता . तो नार्मल झाला होता . मंडळींच्या गप्पा रंगल्या होत्या . मी शांतपणे मान खाली घालून त्या ऐकत होतो . बोलता बोलता सावंतांनीच विषय काढला .
" भरत , तुझा भाऊ आज नार्मलला आलाय ... प्रॉब्लेम संपला वाटतं ... ? " त्यावर सगळे जण शरदकडे भुवया उंचावून पाहू लागले .
" काय ... असे काय बघताय माझ्याकडे ... ? काही झालं नव्हतं मला ...  " शरद सरवासारव करत म्हणाला .
" आणि मधे तुझा देवदास झाला होता ते ? " भरत उलट तपासणी घेऊ लागला .
" त्याचं ...? त्याचं काही नाही...वो सब मैंने भुला दिया  । आता मी कसलाच विचार करत नाही... जाने दो , गोली मारो उसको  ..."
" जाने दो ... अच्छा हुआ ... अबी तो कुच टेंशन नय है  ना ? तो  क्या हुआ ता वो तो बताव..." नायर अंकल त्याला तसे सोडणार नव्हते .
" कुछ नहीं अंकल ..."
" अरे सांग ना आता ... इतका भाव नको खाऊ ...." भरत म्हणाला .
"  मेरी एक फ्रेंड थी ... उसको मैंने प्रपोज़ किया था ..." शरदने सांगून टाकलं .
" और वो ना बोली... यही ना … " शरदच वाक्य नायर अंकलनी पूर्ण केलं...
"  येस ,  मध्या बघ मी काय बोललो होतो तुला ... नक्कीच पोरीचा मॅटर असणार ..." सावंत माझ्या मांडीवर  थाप ठोकत म्हणाले ... त्यावर मी काय बोलणार ? मला तर ते थोड्या  वेळापूर्वीच समजलं होतं. मी नुसतं हूं करुन त्यांना प्रतिसाद दिला .
" कौन थी वो लड़की ? " नायर अंकल पोलिस नाहीतर डिटेक्टिव  हवे होते . आता उगाचच विषय वाढवत होते .  खरं सांगायचं तर त्यात ते वेगळं असं काही विचारत नव्हते .  तो तर खरा सगळ्यांच्या आवडीचा विषय होता . पण मला ह्या चर्चेत रस वाटेना . ह्या सगळ्यात  आज ना  उद्या   माझाही कुठेतरी संबंध येणार होता , जे मला नको होतं .
" अपने ही लोकल में आती है ...। लेकिन छोड़ दो ना अंकल ... वो किस्सा अब ख़तम हुआ है ...।" शरदला त्या आठवणी पुन्हा उगाळाव्याशा वाटत नव्हत्या.  मला जास्तच अस्वस्थ वाटायला लागलं .
" तुमने क्या बोला ता उसको. ? और वो क्या बोली ? "
" मैं उसको बोला की , तू मला खुप आवड़तेस ... तर ती म्हणाली आपलं पुढे काही होऊ शकत नाही. "
" पुढे काही होउ शकत नाही म्हणजे ? " भरतने विचारलं .
" म्हणजे ती आमच्याबद्दल घरी सांगू शकत नाही. "
" का ? " सावंतांनी विचारलं .
" कारण ती धर्माने  ख्रिश्चन आहे  आणि मी हिन्दू ....! " शरद असं म्हणाला आणि मी एकदम चमकलोच . शरदचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती  ख्रिश्चन आहे ? म्हणजे अँटी व्हायरस ख्रिश्चन आहे  ? हे कसं शक्य आहे ? काल मी तिच्या गळ्यात सोन्याच्या चेनसोबत गणपतीचं लॉकेट बघितलं होतं ... आणि शरद तर म्हणतोय की ती  ख्रिश्चन आहे म्हणून ... ? नक्कीच काहीतरी घोळ झालाय ...
"  कशा… वरून ती मुलगी ख्रिश्चन आहे… ? " मी अडखळत त्याला विचारलं .
" कशावरून म्हणजे ? अरे मी तिला बऱ्याच दिवसांपासून ओळखतो ... बऱ्याच वेळा रविवारी मी तिला चर्चच्या बाहेर भेटायचो..." शरदने स्पष्टीकरण दिलं . मला काहीच कळेना . काल तिच्या गळ्यात मी चुकून क्रॉसच्या ऐवजी गणपती बघितला  की काय ... ? मला आता  गरगरल्यासारखं वाटू लागलं ... माझी स्मरणशक्ति मला धोका तर देत नाही ना ...? पण आता त्याला विचारूनच टाकू म्हणून मी टेंशनमधे त्याला विचारलं ., " तू आत्ता जिच्याबरोबर रिक्षातून आलास तीच का ती मुलगी ...?
" कोण ? मी कुणाबरोबर रिक्षातून आलो ? " त्याला काही न समजल्यासारखं तो विचारु लागला .
" अरे आता येताना रे ... तू एका मुलीबरोबर रिक्षातून उतरलास ना , आणि तुम्ही काहीतरी बोलत पण  होतात ..."
" ओह... ती ...? ती नाही रे ... " त्याने पाल झटकल्यासारखं उत्तर दिलं .
" काय ? ती … , ती मुलगी नाही ...? "  हमखास नापास होणाऱ्या मुलाला तो पास झाल्याची बातमी मिळाल्यावर जसा होईल तसा  माझ्या चेहरा झाला .
" नाही रे बाबा ... तिचा काही संबंध नाही .  ती आपल्या पलिकडच्या कंपार्टमेंटमधे असते . आम्ही असंच चेहऱ्याने ओळखतो  एकमेकांना ... पण एक सेकंद... एक सेकंद.... तू का एवढा खुश झालास रे  ? " शरद माझ्यावरच घसरला .
" अरे ते सोड ...  पण नाव काय तुझ्या त्या मुलीचं ... ? " सावंतांनी मधेच प्रश्न विचारुन मला त्याच्या तावडीतून वाचवलं ... मी मनातल्या मनात त्यांचे आभार  मानले . मला आता खुप बरं वाटत होतं . पाऊस पडून गेल्यावर आभाळ जसं स्वच्छ होतं ना ,  अगदी  तसं ...! ऍटलिस्ट आता  मित्राला फसवल्याचा गिल्ट तरी राहणार नव्हता.
" मॅगी .... मॅगी नाव आहे तिचं ...!  "
" तिच्या घरच्यांचा विरोध आहे का ? "
" त्यांचं  माहित नाही . तसे ते चांगले आहेत , पण ती तिच्या घरच्यांचा फार विचार करते .   त्यांना वाईट वाटेल असं ती काही करणार नाही . "
" ह्म्म्म... म्हणजे मुलगी समजूतदार आहे ...." सावंत तर्क लढवत म्हणाले .
" पण जाउद्या हो सावंत ... झालं गेलं गंगेला मिळालं ..."
" गंगेला नाही उल्हास नदीला मिळालं ... आपल्याला तीच जवळ आहे ना ... अरे काय रे तू ...? असा लगेच हार मानतोस ?  बी अ मॅन  !!! आपण करु काहीतरी . फक्त तू हिंमत सोडु नकोस .." सावंत त्याला धीर देत म्हणाले . त्यानेही होकरार्थी मान हलवली पण त्यात निश्चय असा नव्हता. उगाच सावंतांना बरं वाटावं म्हणून तो हो म्हणाला .
" शरद टेंशन नय लेनेका ... हम लोग है ना ... तुम लडो , हम कपडे संभालते है । " नायर अंकल मजेत म्हणाले . मग सगळ्या ग्रुपचा एकदम मूड बदलला ... सगळे शरदला त्यांच्या ठेवणीतल्या नवनविन टिप्स द्यायला लागले . सगळे आपापल्या परीने त्याचे लवगुरु झाले होते .
" शरद भाय मेरे पास एक सुपब आयडिया है... बोलू क्या ..? " इतका वेळ शांत बसलेला जिग्नेस मधेच म्हणाला .
" बोल बाबा बोल ... सगळे बोलतायत ... तू तरी मागे का राहतोस ... बोल "
" वो क्या है ना शरदभाय,  तुम ना ट्रेन के नीचे जान देनेकी धमकी देदो मॅगी भाभी को ... ! वो डर के तुरंत हां बोल देगी । कैसी है आयडिया ? "  म्हणत त्याने  टाळीसाठी हात पुढे केला .
" ए च्यायला , पागल बीगल हो गया क्या तू ? दिमाग ठीक है ना तेरा ...? " शरद त्याच्यावर खेकसला .
" क्यूँ ..? क्या हुआ ? अरे ये तो सबसे  बेस्ट आयडिया है ... क्या बोलते है सावंत सर ...? "  सावंत  त्याच्याकडे बारकाईने पाहू लागले . आणि थोडा वेळ विचार करुन म्हणाले , " जिग्नेस , आज सुभे  क्या खाया था ? एकदम खत्रुड आयडिया है यार ... ओके डन  ! प्यार   के लिए   शरद अपनी जान दे देगा ... "
" ओ सावंत तुम्हीपण ? कुठे त्या येड्याच्या नादाला लागताय ?  " शरद बेफिकिरीने म्हणाला .

" नाही ... आता ठरलं म्हणजे ठरलं ....  प्रेमासाठी शरद आपल्या प्राणांची आहुती देणार ..."  सगळा ग्रुप सावंतांकडे आ वासुन पहात राहिला .  आता  एक वेगळीच कहाणी सुरु होणार होती .…

रविवार, १९ एप्रिल, २०१५

लोकल डायरी -- ९

      मी हळूच मागे वळून पहिलं तर अपेक्षेप्रमाणे  मागे अँटी व्हायरस उभी ! तिला पुन्हा तसं बघुन मला काय झालं कुणास ठाऊक !
"  हे बघा मी काही आज तुमच्याकडे पहात नव्हतो  ,  मी आमच्या ओळखीच्या एका काकुंना शोधत होतो.  तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही पण तुम्ही रोज रोज असा गैरसमज करुन घेत असाल तर तो चुकीचा आहे . " ती काही बोलायच्या आताच मी  तिला सुनावून  टाकलं .
" सॉरी ... "  ती शांतपणे म्हणाली .
" काय ? .... काय म्हणालात तुम्ही ...? " मी चुकून सॉरी ऐकलं असं मला वाटलं .
" सॉरी .... आय रिअली मीन इट .... काल मी तुम्हाला असं बोलायला नको होतं . "  ती कसंनुसं तोंड करत म्हणाली . मला काय बोलायचं ते सुचेना . मी तसाच तिच्याकडे पहात उभा राहिलो . रात्री उशिरा दारु पिऊन   घरी आल्यावर बायकोने   पंचारतीने ओवळाले तर  जसा चेहरा होईल तसा माझा त्यावेळी झाला .
"   अॅक्चुली , काल मी बोलून गेले आणि नंतर मला वाईट वाटत  राहिलं . मी उगाचच तुमच्यावर ओरडले. काल जे झालं त्यात तुमचा काही दोष नव्हता. , प्लीज आय ऍम सॉरी ... "
"  ओके ... ओके... ठीक आहे .  नो इश्शु...   ओके बाय ... " म्हणत मी तिथून काढता पाय घेतला . थोडं पुढे जातो न जातो तोच  पुन्हा मागून आवाज आला." एक्सक्यूज मी .... प्लीज जरा थांबता का ? " मी थांबलो आणि विचारलं , " काय झालं ? " तर ती मान खाली घालून तोंडावर हात ठेवून  रडायलाच लागली . ' अरे देवा  , आता काय झालं ? '  तिच्या अशा भर रस्त्यात रडण्याने मी पुरता  गोंधळून गेलो.  आमच्या आजुबाजूने माणसं येत जात होती . ते आमच्याकडे काहिशा आश्चर्याने आणि बऱ्याचशा संशयाने बघत जात होती . मला एकदम अवघडल्यासारखं झालं . तिच्याशी काही बोलता येईना  आणि तिथून निघताही येईना .
" अहो ,  काय झालं ? अचानक रडायला काय झालं ? "  मी माझ्या परीने  लांबुनच  तिला  विचारलं . पण ती काही रडायचं थांबेना.  उलट जास्तच रडायला लागली . मी आजुबाजुला पहिलं,  रस्त्यावरचे फेरीवाले आमच्याकडेच बघु लागले आणि आपापसांत  आमच्याविषयी चर्चाही  करु लागले होते .
" हे बघा , प्लीज रडू नका , माझं काही चुकलं असेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणतो . पण हे रडणं  थांबवा प्लीज . लोक आपल्याकडे संशयाने पहातायत.  काल पण ह्याच ठिकाणी तुम्ही मला ओरडत होतात . आणि आज इथेच उभं राहून  रडताय.... लोकांना खरंच वाटेल की मीच  तुमची काहीतरी छेड काढलीय... प्लीज ,  आणखी थोडा वेळ रडलात तर मी फुकटचा मार  खाईन हो ...   " मी कळवळीने म्हणालो . त्यावर ती अचानक रडायचं थांबली .
" पाणी आहे का तुमच्याकडे ... ? " डोळे पुसत पुसत तिने विचारलं
" पाणी   ?  हो , हो आहे . हे घ्या ... " मी घाईघाईने माझ्या बॅग मधली पाण्याची बॉटल काढून तिला दिली .
" थँक यु ... " म्हणत ती घटाघटा पाणी प्यायली . पाण्याचे काही थेंब तिच्या    हनुवटीवरुन खाली येत होते . त्या थेंबांचे मोत्यात रूपांतर झाल्यासारखे ते उन्हात चमकत होते . तिने अर्धी अधिक बाटली संपवली .
" आर यू ओके ?  " मी आवाजात मृदुपणा आणत म्हणालो .
" सॉरी , मला काय झालं कळालं नाही.... अचानक रडुच आलं . सॉरी , खरंच सॉरी .... "  काल तिच्या तोंडून आगिनफुलं पडत होती आणि आज सॉरी सॉरी चा जप चालला होता . ह्या पोरीचं काही खरं नाही .
" इट्स ओके .... काही प्रॉब्लेम नाही . तुम्हाला आता बरं वाटतंय ना ? "
" हो , आता बरी आहे मी .    आपण त्या इराण्याच्या हॉटेल मधे चहा घेऊया का प्लीज ... "  
"  काय ? " ती बोलत होती त्यावर माझा विश्वास बसेना ... आता एखादी सुंदर मुलगी जर  स्वतः हुन  चहा  घेऊया का असं विचारत असेल तर ,  नाही  म्हणणारा एकतर ठार वेडा तरी असेल किंवा पुरुष तरी  नसेल .....     पण मला तिची जरा शंकाच आली . काल फाड फाड बोलणारी मुलगी मला  चहा घेऊया का असं विचारत होती . ?
" चहा घेऊया प्लीज , चांगला मिळतो तिथे " ती पुन्हा  असं म्हणाली आणि मी काही बोलणार इटक्यात  तिकडे जाऊही  लागली.  मला तिच्या मागून  जाण्यावाचून काही पर्याय उरला नाही . खरं सांगायचं तर ते आमचं नेहमीचं हॉटेल होतं . आमच्या ऑफिसची ५ - ६  टाळकी नेहमी असायची तिथे !   आता ते लोक तिथे नसावेत हीच प्रार्थना करत मी तिच्या  मागोमाग हॉटेल मधे शिरलो . नशिब कोणी नव्हतं .
" तिथे बसूयात " तिने बोटांनी  भिंती शेजारचं गोल टेबल दाखवलं . मी मानेनेच होकार दिला . नेहमी ऑफिस मधल्या लोकांबरोबर येणारा आज एका   मुलीबरोबर आलेला पाहून काऊंटरवरच्या शेटने सुद्धा चष्म्याच्या  कोपऱ्यातुन पाहिलेलं मला जाणवलं . मला एकदम परग्रहावर आल्यासारखं वाटायला लागलं .  आमची नेहमीची ऑर्डर घेणाऱ्या हॉटेलच्या  पोऱ्याने सुद्धा माझ्याकडे पाहून  भुवया उंचावल्या.  आणि नेहमी वैतागलेल्या सुरात विचारणाऱ्या  पोऱ्याने सुद्धा  आज  अगदी अदबीत विचारले  ,  " काय आणु साहेब ... ? "  
" बन मस्का आणि चहा .... " ती आणि मी एकत्रच म्हणालो . मग एकदमच एकमेकांकडे  बघून आश्चर्याने हसलो .
" आमचं सुद्धा हे नेहमीचं हॉटेल आहे . " मी माहिती पुरवली
" अय्या हो का ...  मी आणि माझी मैत्रीण येतो कधी कधी   इथे , मावा केक  फार छान मिळतात ... "
" हो ... खरंच ... मस्त हॉटेल आहे हे  "  मी विचार करत होतो ज्यावेळी आमच्या ऑफिसच्या मित्रांना कळेल की मी एका  सुंदर मुलीबरोबर इथे बन मस्का आणि चहा घ्यायला आलोय तेव्हा ते तर माझा जीवच घेतील .  मी असा विचार करत असताना ती काहीतरी बोलली  असावी .
" हॅलो , तुमचं लक्ष कुठे आहे ... मी काहीतरी बोलतेय तुमच्याशी.... . "
" ओह... सॉरी , मी जरा दुसऱ्याच विचारात होतो . काय म्हणत होतात तुम्ही  ?"
" काही नाही.... तुमचा माझ्यावरचा राग अजुन गेलेला दिसत नाही... .  अॅक्चुली   मी एका प्रॉब्लेम मधे होते .  मी तुमच्यावर रागाच्या भरात ओरडले. ... मला प्लीज समजून घ्या ..प्लीज ..
" एका अटीवर... तुम्ही हे  सारखं प्लीज प्लीज म्हणनं सोडून दया . आता मलाच कसंतरी होतंय...  ठीक आहे होतात चुका माणसाच्या हातून !  त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही . मी समजू शकतो . मला खरंच काही वाटलं नाही ... यु  डोंट वरी .... . "  सुंदर मुलींचे  शंभर गुन्हे सुद्धा माफ असतात . आणि तिचा तर आत्ताशी पहिलाच गुन्हा झालेला होता .   
" हा तुमच्या मोठेपणा आहे . का कुणास ठाऊक पण मला तुमच्याशी  बोलून  बरं वाटतंय ...  " ती म्हणाली . आज ही पोरगी आपल्याला हरबऱ्याच्या झाडावर चढवल्या शिवाय राहणार नाही . ती बोलत असताना वेटर बन मस्का आणि चहा घेऊन आला . तिने पहिला घास तोंडात टाकला
"हम्म्म.... हेवन ... "  त्याचा स्वाद घेत ती खाऊ लागली.  मी विचार केला ,  ती हीच मुलगी होती जी काल  माझ्यावर चिडली होती ...,  मघाशी लहान मुलीसारखी रडत होती....  आणि आता एकदम बिनधास्तपणे माझ्याबरोबर बन मस्का आणि चहा घेत होती ..... अनबिलीव्हेबल ...!
" एक विचारु का ?  तुम्हाला राग येणार नाही ना ? "  कॅरममधे क्वीन काढल्यावर कव्हर काढताना   जशी    बाळगावी लागते तशा सावधगिरीने मी तिला विचारलं .
" बोला ना ... "

" काल सहज माझं लक्ष तुमच्याकडे गेलं  ,  तुम्ही फोन वर बोलताना  रडत   होतात …   खरं तर ही तुमची खाजगी बाब आहे ... पण माणुसकी म्हणून मी तुम्हाला विचारतोय ... तुम्हाला  सांगायचं नसेल  तर  तसा काही फोर्स नाही ..." मी अडखळत तिला विचारलं . त्यावर ती एकदम गंभीर झाली . तिच्या हातातला बन पावाचा तुकडा तसाच हातात राहिला . एकूणच प्रकरण गंभीर दिसत होतं . तिने थोडा पॉज घेतला आणि सुरुवात केली ,"   मी माझ्या होणाऱ्या   नवऱ्याशी बोलत होते.... आमचं भांडण झालंय …  " तिचे हे शब्द आकाशातून पडणाऱ्या मुसळधार पावसासारखे  माझ्या अंगावर कोसळले . इतके दिवस आपण जिला पहात होतो, जी आपल्याला मनोमन आवडली होती  , तिचं एका दुसऱ्याच  माणसाबरोबर लग्न होणार आहे हे  ऐकल्यावर  नैराश्येचे ढग आणखीनच  माझ्या मनात  दाटून आले . गर्दीने खच्चुन भरलेल्या   बसमधे  आपण बसलेल्या सिटवर रिझर्वेशन असलेला माणूस आल्यावर जसं वाटतं तसं मला त्यावेळी वाटलं  .  ती पुढे बरंच काही सांगू लागली .  पण माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं . "  कॉलेज ..... प्रेम..... विरोध ..... हेकेखोर .... वैताग ...."  हे असे काही शब्द माझ्या कानावर पडले . पण माझ्या लेखी त्यांना आता काही किंमत नव्हती .

रविवार, १२ एप्रिल, २०१५

लोकल डायरी - ८


http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html    ---    लोकल डायरी -१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html         ---    लोकल डायरी -  २
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html         ---    लोकल डायरी -  ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html     ---    लोकल डायरी -  ४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html   ---    लोकल डायरी -  ५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html          ---    लोकल डायरी -  ६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    ---    लोकल डायरी - ७

                     लोकल डायरी  -  ८
                 आज डब्यात येऊन  पहातो तो  शरद सगळ्यात आधी  हजर ! हे कसं काय घडलं ? आमच्या सगळ्यांच्या तोंडून  आश्चर्योद्गार बाहेर पडले .
" काय मध्या, भरत कसे आहात ? भडकमकर  , सावंत काय  चाल्लय ? नायर अंकल मजमे ना ?" आल्या आल्या त्याने सगळ्यांची  नेहमीप्रमाणे चौकशी केली . आम्ही तर डोळे विस्फारुन पाहू लागलो .  शरद आमच्याशी आपणहुन बोलत होता .  नेहमी सारखा नाही पण बोलत होता हे महत्वाचं  ! गेले सात आठ दिवस तर तो असा वागत होता की आम्हा कोणाला तो ओळखतही  नसावा .  पण आता तो  जरा  नॉर्मल झाल्यासारखा   वाटत होता . हे एक बरं  झालं ….
" आज सूर्य कुठून उगवला ? भरत,  अरे खिडकीबाहेर बघ रे जरा " सावंत मिश्किल चेहर्याने म्हणाले .
" पूर्वे कडूनच उगवलाय सावंत .... सॉरी यार ..!   मी  गेले सात आठ दिवस जे  वागलोय त्याबद्दल ..."  शरद सगळ्यांकडे पहात म्हणाला .
" वो  जाने दो  , लेकीन ये बताव हुआ क्या था ?"
" कुछ नहीं अंकल , ऐसेही .... "
"  नाही  ,  असंच काही नाही , आम्ही तुला असा कधीच बघितला नाही . ", मी म्हणालो आणि त्यावर सगळ्यांनी माना  डोलावल्या.
" अरे बाबा , सांगितलं ना ... काहीही नाही "  शरद थोड्याश्या वैतागाने म्हणाला .
" ठीक आहे  नसेल सांगायचं तर नको सांगुस....   तू आता पहिल्यासारखा नाय राह्यला... " भरत मान हलवत  म्हणाला
" भरत , तुला काय समजायचं ते समज ..."  ह्या त्याच्या वाक्यावरून  आता हा विषय बंद करावा असंच त्याला  सांगायचं होतं .
" अरे यार शरद ,  बघ तू परत चिडायला लागलास."
" नाय रे मध्या , पण त्याच त्याच  गोष्टीचा विचार करायचा  मला  आता कंटाळा आलाय. " शरद असं म्हणाला आणि मग आम्ही त्याला जास्त काही विचारलं नाही . शरदला आम्ही खुप वर्षांपासून ओळखतो, त्याच्या मनात काही रहात नाही . जे असेल ते बोलणारा माणूस आहे तो ! , पण ह्या वेळी नक्कीच काहीतरी  वेगळं झालं असलं पाहिजे . तो आज ना उद्या आम्हाला नक्की सांगणार काय झालं होतं ते ! सध्या त्याला थोडा वेळ हवा असणार ... आम्ही   सगळे जण  आपल्या  नेहमीच्या गप्पांमधे रंगुन गेलो . भडकमकरांचा नागोबा झाला होता . जिग्नेस आणि भरत  मोबाईलवर कोणती तरी पायरेटेड फिल्म बघत होते . शरद वॉट्स अप वर काहीतरी मेसेज  टाईप करत होता . थोडा टेन्शन मधेही वाटत होता . इकडे तिकडे बघता बघता , मी  पलीकडे सहज नजर टाकली तर समोर अँटी व्हायरस उभी होती , नेहमीप्रमाणे कानात इअर फोन घालून ! तिची आणि माझी एकदा नजरानजर झाली . मी त्याच क्षणात माझी नजर दुसरीकडे वळवली,  कालच्या प्रसंगावरून तर मी ठरवलच होतं की आता परत अशी चूक करायची नाही . मला  खरं तर तिचा राग यायला हवा होता . पण कालच्या प्रसंगामुळे मला दुःख अधिक झालं होतं . वाईट जास्त  वाटत होतं .  माझी काहीही चूक नसताना ,  अँटीव्हायरसने  माझ्याबाबतीत   गैरसमज करुन घेतला होता  . पण तिला इतका राग यावा असं मी काहीच केलं नव्हतं . कालपासून माझ्या डोक्यात तोच विषय घोळत होता . तिचा कसला तरी मोठा प्रॉब्लेम झाला असावा , म्हणून ती रडत होती . एखादी सुंदर मुलगी रडत असेल तर कुणाचं लक्ष जाणार नाही ?  ती का रडत असावी ? ह्या एकाच विचाराने मी तिच्याकडे पहात होतो . पण त्यात इतकं चिडण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही . विचार करता करता  हळूहळू मला तिच्या कालच्या वागण्याचा राग यायला लागला .   मग  मी व्हिडिओ कोच कडे पाठ करुन उभा राहिलो.
आज भरपूर गर्दी होती लोकलला , त्यामुळे  विठ्ठलवाडीलाच गाडी  फुल्ल झाली . तरी आणखी लोक आत चढायचा प्रयत्न करत होते " चलो भाय .... जरा आगे चलो , "  " धक्का मारो जरा ..." , " अरे लोग पीछे लटक रहे है !","चला आत चला " असल्या आरोळ्या ऐकायला  यायला लागल्या . गर्दीमुळे  आमच्या जागेत नेहमीपेक्षा जास्त लोक  घुसले.  अचानक सावंत उभे राहिले  आणि त्यांनी भरतला बसायला जागा दिली . तो नको नको म्हणत असतांना त्यांनी त्याला बळेच बसवलं . आणि ते माझ्या बाजूला उभे राहिले . थोडा वेळ गेला आणि ते  मला म्हणाले ,  "कान इकडे कर ...."  मी त्यांच्या जवळ कान नेला .  त्यांनी जे माझ्या कानात सांगितलं ते ऐकून तर मी जवळ जवळ ओरडलोच !  मी ओरडल्यामुळे सगळे आमच्याकडे बघू लागले .
" काय रे ? काय झालं ओरडायला ? " भरत विचारत होता .
" काय नाय  , काय नाय  ... असंच ! "
" झोपेत बडबडतोयस काय ? " भडकमकरही  त्यांच्या साखर झोपेतून जागे होत मला विचारु लागले .  त्यावर   मी काहीच न बोलता शांत  राहिलो . सावंत सुद्धा आपला ह्याच्या ओरडण्याशी काही संबंध नाही असे भासवुन   इकडे तिकडे   पाहू लागले .  सगळ शांत झाल्यावर मी त्यांना हळूच विचारलं , " खरं का ?"   त्यावर ते नुसतेच हसले. मला समजेना काय बोलायचं ते .!  सावंत असे कसे काय वागू शकतात तेही ह्या वयात ?   सावंत काल त्यांच्या जुन्या मैत्रिणीला , शकुंतला  जोशींना भेटले आणि  एका कॅफे मधे जाऊन दोघांनी कॉफी सुद्धा घेतली होती .
" चैत्र महीना सुरु आहे का हो सावंत ?"  मी त्यांना विचारलं .
" नाही रे ... म्हणजे मला काही माहित नाही ... पण तू असं का विचारतोयस ? "  सावंतांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होतं .
"   चैत्रात   जुन्या झाडांना नविन पालवी फूटते ना म्हणून विचारलं " मी  गमती दार चेहरा करुन म्हणालो . आधी ते सावंतांना कळलं नाही नंतर कळाल्यावर त्यांनी मजेने माझ्या पाठीत गुद्दा घातला . आम्ही दोघेही हसु लागलो .
" काय बोलणं झालं मग ? " मी त्यांना विचारलं .
" काही नाही . असंच  इकडचं तिकडचं ! शाळेतल्या आठवणी निघाल्या ...  बाकीचे कोण कुठे असतात वगैरे विचारलं ...थोडक्यात जुने मित्र भेटल्यावर जे बोलणं होतं तेच झालं ... "
" पण हे मधेच अचानक  कसं काय ? "
" अचानक असं काही नाही , सहजच परवा ती भेटली  नव्हती का ? काल तिचं आमच्या ऑफिसच्या भागात  काहीतरी काम होतं तर तिने फोन केला , मग लंचच्या वेळी भेटलो तिला ...   "
" कसं वाटलं मग भेटून ?  आ …. आं…. " मी  त्यांना कोपरखळी मारत विचारू लागलो  .  मला तर त्यांची मोठी गंमतच वाटत होती .
"  मस्त , मी आणि ती अजूनही शाळेत  आहोत असं वाटलं . काळ थांबल्यासारखा वाटला .  मधली इतकी वर्षे गायब झाल्यासारखी वाटली .  भारी वाटलं एकदम !   "  सावंत स्वप्नात असल्यासारखे बोलत होते. मी पलीकडे शकुंतला काकू कुठे दिसतात का ते पाहू लागलो . बघता बघता माझी नजर पुन्हा  अँटी व्हायरसवर पडली . त्याचवेळी तिनेही माझ्याकडे पहिलं . ' अरे देवा ... ! '  कोणतं तरी महान पाप माझ्या हातून घडल्यासारखं मला वाटलं .
" ती आली नाही आज . बाहेर जाणार होती  कुठेतरी असं काल म्हणाली .  "  सावंतांच्या बोलण्याने मी भानावर आलो .
" अरे वा ... बरीच माहिती आहे . .... " मी गमतीने म्हणालो . त्यावर ते मस्तपैकी  हसले . मग मी सावंतांची मस्करी करत राहिलो . सावंतपण खिलाडु वृत्तीने घेत होते . घाटकोपर गेलं   आणि शरद - भरत दोघेही एकत्र  जायला निघाले .  शरदची गाडी हळूहळू रुळावर येत असल्याची ही  खुण होती.  आज ना उद्या तो आम्हाला  सगळं सांगणार होता .  नायर अंकल दादरला उतरले . सावंत , भडकमकर आणि जिग्नेस सी एस टी ला उतरणार होते . भडकमकरांची  दुसरी झोप झाली होती . ते आळोखे पिळोखे देत उठत होते .   मी सावंतांचा निरोप घेऊन भायखळ्याला उतरलो . डोक्यात सावंतांचाच विचार घोळत होता .  सावंत पुन्हा प्रेमात बिमात पडले नसावेत ना … ?     थोडा पुढे जातो न जातो तोच माझ्या मागून  आवाज आला . ...
" हॅलो.... ओ मिस्टर ... "

आवाज  ओळखीचा वाटला , ओळखीचा कसला , कालच ऐकलेला !  मानेवर  कुणीतरी बर्फाचा खडा ठेवल्यासारखं वाटलं  !