गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात अक्षरशः फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं . ट्रेनमधून उतरल्यानंतर नेहमीचा कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने ज्याने मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे ! तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते . ३१० डबल-डेकर आहे , मुंबईत धावणाऱ्या फार कमी डबल डेकर बस पैकी एक आणि तितकीच गर्दीने भरलेली !
मी लांबूनच पाहतो , नागाच्या वेटोळ्यासारखी लांबच लांब रांग मला दिसते . याचा अर्थ , चार ३१० गेल्या नंतर आपल्याला पाचवी गाडी मिळणार ! ही गर्दी साली पाचवीलाच पुजलीय असं वाटायला लागतं . ही रांग इतकी वाढलेली असते की आपल्याला आज बस मिळणार आहे की नाही अशीही एक शंका मनात येऊन जाते .
बसमध्ये चढण्यासाठी इतर कुठल्याही बसला लागत नसतील अशा तीन वेगवेगळ्या रांगा ३१० ला लागतात . ह्या तिन्ही रांगांच्या ढंगा वेगळ्या आहेत . एक मुख्य रांग , जी केवळ बसणाऱ्यांची असते , ह्या रांगेतील लोक सावकारासारखे वाटतात मला , त्यांच्याच नादात निवांत चालणार , बस मध्ये चढण्याची त्यांना बिलकुल घाई नाही . बसणाऱ्यांचं भागलं की स्टँडिंग वाली दुसरी रांग आहे . ही रांग पहिल्या रांगेच्या अगदी उलट ! ह्यांना कधी एकदा गाडीत चढतोय असं होतं . तिकीट चेकर नसला की , पहिल्या रांगेचे लोक बसमध्ये चढत असतानाही स्टँडिंग लाईन वाले चढायचा प्रयत्न करतात आणि मग बाकीच्यांच्या शिव्या खातात . ह्या दोन रांगाव्यतिरिक्त तिसरी रांग तिकीटचेकरच्या मागे उभी आहे . वास्तविक पाहता तिला रांग म्हणणेच चुकीचे आहे . त्या तिकीट चेकरच्या मागे बसमध्ये लटकत जाणाऱ्या लोकांचा घोळका असतो . एकवेळ स्टँडिंग वाल्या लोकांना बसायला मिळेल , पण ह्या तिसऱ्या रांगेच्या लोकांना कधीच बसायला मिळत नाही .
३१० नंबरची बस मला एकूणच जीवनविषयक सूत्र सांगताना दिसते . म्हणजे बघा , कुर्ल्याच्या गर्दीवाल्या , आणि बारीक रस्त्यांवरून हळूहळू जाताना तिचं बालपण सरत जातं , त्यानंतर बीकेसीमध्ये शिरल्यानंतर ती तारुण्यात येते एमटीएनएल पासून ते कलानगर पर्यंत तारुण्याच्या जोशात ती सुसाट पळत असते मग बांद्रा स्टेशन जसे जवळ येईल तसतसे वार्धक्याकडे झुकल्यासारखी तिची चाल पुन्हा मंदावते.
" ३१० ची लाईन का ? " मी रांगेतल्या शेवटच्या माणसाला जाऊन विचारतो . कारण रांग वेटोळे घेऊन घेऊन खूप लांबलचक झालेली आहे . पण समोरच्याचं लक्ष नाही. " ३१० का लाईन है क्या ? "
" हां भाई . तिन्सो दसही है " त्याचा सूर वैतागलेला . मी त्याच्या मागे उभा राहतो . आता मी रांगेतला शेवटचा माणूस आहे . माझ्या पुढे अंदाजे पावणे दोनशे तरी माणसे रांगेत आहेत . बाजूला नुसताच उभा असलेला रिक्षावाला माझ्याकडे दयेने पाहतोय की काय असं मला वाटून जातं . त्याचवेळी कोणीतरी माझ्या मागे येऊन उभं राहतं .
" ३१० का लाईन है क्या ? " मागून आवाज . आता मी लक्ष देत नाही . " ३१० ची लाईन आहे का ? " त्याचा मराठीत प्रश्न .
" हो तीनशे दहाचीच लाईन आहे . " मी त्याला उत्तर देतो . ह्या वेळेत एक ३१० येऊन समोर उभी राहते . रांगेतले किती लोक चढले वगैरे गोष्टी मला काही लांबून दिसत नाहीत . रांग जशी पुढे सरकेल तसा मी सरकत जातो . एक ३१० येऊन गेली तरी रांग काही फारशी पुढे सरकलेली दिसत नाही. मी सहज मागे पाहतो , थोड्याच वेळात माझ्या मागे तेवढेच लोक उभे असलेले मला दिसतात . मला थोडंसं हायसं की काय म्हणतात ते वाटतं .
घरातून वेळेवर निघालं , नेहमीची ट्रेन पकडली , ट्रेन्स वेळेवर असल्या , बसची फ्रिक्वेन्सी ठीक असली आणि स्टेशन ते बस स्टॉपपर्यंत चालण्यासाठी साधारण जेवढा वेळ लागतो तेवढा जुळला तर ३१० च्या रांगेत नेहमीचेच चेहरे पुढे मागे उभे असलेले दिसतात . त्यात रेकलेल्या म्हशीसारखा आवाज असलेला भैया , मेंदी लावल्याने दाढी लाल झालेला म्हातारा , एक प्रेमी युगल , बघावं तेव्हा फोनवर चिकटलेली जाडी मुलगी , असे काही ठराविक चेहरे रांगेत मला जवळपास रोजच दिसतात . मला सगळ्यात जास्त गंमत वाटते ती त्या प्रेमी युगलाची . कितीही गर्दी असो , ऊन असो , पाऊस असो त्यांना काही फरक पडत नाही . लोक बेस्ट च्या नावाने बोंबाबोंब करतायत , गर्दीत एकमेकांवर डाफरतायत , उशीर होत असल्यामुळे चिडचिड करतायत , अशा भयंकर अनरोमँटिक ठिकाणी ते प्रेमी युगल प्रेमाच्या गोष्टी करत आपल्याच नादात गुंग आहे . बाकी दुनिया फाट्यावर !
" अरे ए बाबा , मधे कुठे घुसतो ? लाईन मागे आहे . " पुढचा कोणीतरी ओरडतो . घुसखोरी करणारा खजील होऊन रांगेच्या शेवटाकडे जाऊ लागतो .
" काय सालं एकही गाडी नाही ? सगळ्या ३१३ आणि ३३२ भेंचो . .... बघा , बघा ... गेली ३१३ , च्यायला तिकडं कुणी नाही तरी तिकडं गाड्या सोडतायत ... मारलं पायजे साल्यांना... लोकांची काय फिकीरच नाय ह्यांना .... काय ऊन आहे भेंss चो .... " मागच्याची अविरत बडबड चालू आहे . बस नको पण बडबड आवर अशी माझी अवस्था . चौथी बस तुडुंब भरून गेली आणि आता येणारी पाचवी बस मला मिळेल अशी आशा वाटू लागते . आणखी पंधरा मिनिटे उन्हात भाजून निघाल्यानंतर लांबून ३१० येताना दिसते . तुकाराम महाराजांना पुष्पक विमान दिसल्यावर झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद मला ३१० पाहिल्यावर होतो .
आली आली बाबा एकदाची ....
चलो , भाई चलो
ए , ए sss बिचमे किधर घुसता है ? ओ मास्तर तुम्ही लक्ष द्या जरा ...
चलो भाई , चलो जलदी , इसके बाद गाडी नही आयेगा ... जलदी चलो
थांबा .... थांबा .....
चढा .... चढा ..... लवकर ....
असे चित्र विचित्र आवाज रांगेतल्या माणसांचे येतात . काही लोक अगदी विमानात बसायच्या ऐटीत चढत आहेत . काही घाई नाही . त्याचा फायदा स्टँडिंगच्या लायनीत बसच्या दाराला धरून उभे राहणारे काही लोक घेतात . सुमडीत आत शिरतात . ते बघून मग मुख्य रांगेतले लोक धरणीकंप झाल्यासारखे जिवाच्या आकांताने ओरडतात. पण नुसतं ओरडण्यापलीकडे फारसं काही होत नाही . घुसखोरी करून आत चढलेला वरच्या मजल्यावर पोहोचला सुद्धा ! गाडीत चढण्यासाठी लोक घाई करतात . त्या लोंढ्याबरोबर मीही आत जातो . पुराचं पाणी गावात शिरावं तशी बसमध्ये माणसं शिरतात . आत शिरल्यावर मला नेहमी पडणारा प्रश्न , खाली बसू की वरच्या मजल्यावर जाऊ …? ते ठरेपर्यंत मागून सात - आठ लोक माझ्यापुढे निघून गेलेले असतात आणि मला विंडो सीट न मिळाल्याचं दुःख करत कुठेतरी बसावं लागतं . बस मधली काचेची खिडकी एक नमुना आहे . ती एका हाताने वर करू शकेल असा महामानव अजून जन्माला यायचाय . ती कधीच नीट वर जात नाही . वर करायचा प्रयत्न केला तर एक बाजूच वर जाते , एक खाली राहते , मग एखाद्या हट्टी मुलासारखी ती खिडकी मधेच अडकून बसते . वर एक विचित्र आकाराचं हुक असतं , तिथपर्यंत कसं बसं आपण त्या खिडकीला नेलं तरी त्या विचित्र हुकात काही ती स्वतःला अडकवून घेत नाही . त्यात दोन हात किंवा कधी कधी तीन हात ( शेजारच्याचा एक हात ) लागल्याशिवाय ती वर जात नाही . श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर वगैरे उचलला असेल , त्याला म्हणावं एका हाताने ती खिडकीची काच वर करून दाखव . मुंबईत नवखा आलेला एखादा भैया लेडीज सीट वर बसतो आणि मग त्याचा ध्रुवबाळ होतो . तोंड वाकडं करीत वरच्या दांड्याला लटकत उभं राहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही . बस गर्दीने तुडुंब भरली की कंडक्टर डबल बेल मारतो आणि आपली गाडी सुरू ... कंडक्टर ह्या माणसाचं मला कौतुक वाटतं . जिथं पाय ठेवायला जागा नसते त्या बस मधून सराईतपणे जो चालतो तो कंडक्टर ! " तिकीट ... तिकीट बोला, तिकीट " करत बसमध्ये त्याचा मुक्त विहार सुरू असतो . तो प्रवाश्यांवर अक्षरशः सत्ता गाजवत असतो , " चला पुढे चला , डबल लाईन करा .... " अशा ओर्डरी अधून मधून सोडत तिकिटे फाडत फिरत असतो .
बस मध्ये अफाट गर्दी आहे . फेवीकॉल ने चिकटवल्यासारखे सगळे एकमेकांना चिकटलेत. जरा धक्का लागला की एकमेकांवर डाफरतायत .... ड्रायवर ने मधेच जोरात ब्रेक लावला की मागचा पुढच्याच्या अंगावर जातोय , ट्रॅफिक मधून बस मुंगीच्या पावलांनी पुढे जातेय . घामाने सगळेच डबडबलेत , बसच्या इंजिनाच्या एकसुरी आवाजाने काही बसलेले प्रवासी पेंगायला लागलेत . त्यांचे भार बाजूच्या प्रवाशांवर पडतायत . काही लोक तो भार चुकवतायत तर काही , कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे गाणं म्हणत अंग चोरून बसलेत . बस रांगत रांगत एमटीएनएल पाशी येते आणि आता ती बिकेसी च्या प्रशस्त रस्त्यांवरून सुसाट धावू लागते . थंडगार वारा चेहऱ्यावर आल्याने आणि काही प्रवासी उतरून गेल्याने बाकीचे प्रवासी थोडे सुखावलेत . पण इथेही म्हणावं तसं सुख नाही . दोन दोन मिनिटाला गाडी सिग्नलवर थांबते आहे . रिक्षा , इतर दुचाकी , चारचाकी गाड्या आमच्या ३१० ला वाकुल्या दाखवून भुर्रर्रकन पुढे निघून जातायत . पण ड्रायवरला कुणाचं काही घेणं देणं नाही . तो त्याच्याच नादात , आणि बसच्या ताकदीप्रमाणे बस चालवतोय . रस्ते प्रशस्त असल्याने आता आपली गाडी सुसाट धावेल असं वाटतं पण गाडीच्या वेगात फार काही फरक पडत नाही. ट्रॅफिक कमी असल्याने बस फक्त न थांबता चालते तेवढंच काय ते !
" चला डायमंड , ... चला सिटी बँक वाले ..... " कंडक्टर ओरडतो .
पण आय सी आय सी आय बँकेचा स्टॉप येतो ... तेव्हा फक्त " आय सी आय " एवढंच ओरडतो . गर्दीने खच्चून भरलेली बस भारत नगर स्टॉप येईपर्यंत रिकामी होत जाते . माझा स्टॉप आरबीआय अर्ध्या पाऊण तासाने येतो . तो आला की मी उतरतो . डबल बेल मारून बस तिच्या पुढच्या प्रवासाला निघते .
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7