मी हळूच मागे वळून पहिलं तर अपेक्षेप्रमाणे मागे अँटी व्हायरस उभी ! तिला पुन्हा तसं बघुन मला काय झालं कुणास ठाऊक !
" हे बघा मी काही आज तुमच्याकडे पहात नव्हतो , मी आमच्या ओळखीच्या एका काकुंना शोधत होतो. तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही पण तुम्ही रोज रोज असा गैरसमज करुन घेत असाल तर तो चुकीचा आहे . " ती काही बोलायच्या आताच मी तिला सुनावून टाकलं .
" सॉरी ... " ती शांतपणे म्हणाली .
" काय ? .... काय म्हणालात तुम्ही ...? " मी चुकून सॉरी ऐकलं असं मला वाटलं .
" सॉरी .... आय रिअली मीन इट .... काल मी तुम्हाला असं बोलायला नको होतं . " ती कसंनुसं तोंड करत म्हणाली . मला काय बोलायचं ते सुचेना . मी तसाच तिच्याकडे पहात उभा राहिलो . रात्री उशिरा दारु पिऊन घरी आल्यावर बायकोने पंचारतीने ओवळाले तर जसा चेहरा होईल तसा माझा त्यावेळी झाला .
" अॅक्चुली , काल मी बोलून गेले आणि नंतर मला वाईट वाटत राहिलं . मी उगाचच तुमच्यावर ओरडले. काल जे झालं त्यात तुमचा काही दोष नव्हता. , प्लीज आय ऍम सॉरी ... "
" ओके ... ओके... ठीक आहे . नो इश्शु... ओके बाय ... " म्हणत मी तिथून काढता पाय घेतला . थोडं पुढे जातो न जातो तोच पुन्हा मागून आवाज आला." एक्सक्यूज मी .... प्लीज जरा थांबता का ? " मी थांबलो आणि विचारलं , " काय झालं ? " तर ती मान खाली घालून तोंडावर हात ठेवून रडायलाच लागली . ' अरे देवा , आता काय झालं ? ' तिच्या अशा भर रस्त्यात रडण्याने मी पुरता गोंधळून गेलो. आमच्या आजुबाजूने माणसं येत जात होती . ते आमच्याकडे काहिशा आश्चर्याने आणि बऱ्याचशा संशयाने बघत जात होती . मला एकदम अवघडल्यासारखं झालं . तिच्याशी काही बोलता येईना आणि तिथून निघताही येईना .
" अहो , काय झालं ? अचानक रडायला काय झालं ? " मी माझ्या परीने लांबुनच तिला विचारलं . पण ती काही रडायचं थांबेना. उलट जास्तच रडायला लागली . मी आजुबाजुला पहिलं, रस्त्यावरचे फेरीवाले आमच्याकडेच बघु लागले आणि आपापसांत आमच्याविषयी चर्चाही करु लागले होते .
" हे बघा , प्लीज रडू नका , माझं काही चुकलं असेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणतो . पण हे रडणं थांबवा प्लीज . लोक आपल्याकडे संशयाने पहातायत. काल पण ह्याच ठिकाणी तुम्ही मला ओरडत होतात . आणि आज इथेच उभं राहून रडताय.... लोकांना खरंच वाटेल की मीच तुमची काहीतरी छेड काढलीय... प्लीज , आणखी थोडा वेळ रडलात तर मी फुकटचा मार खाईन हो ... " मी कळवळीने म्हणालो . त्यावर ती अचानक रडायचं थांबली .
" पाणी आहे का तुमच्याकडे ... ? " डोळे पुसत पुसत तिने विचारलं
" पाणी ? हो , हो आहे . हे घ्या ... " मी घाईघाईने माझ्या बॅग मधली पाण्याची बॉटल काढून तिला दिली .
" थँक यु ... " म्हणत ती घटाघटा पाणी प्यायली . पाण्याचे काही थेंब तिच्या हनुवटीवरुन खाली येत होते . त्या थेंबांचे मोत्यात रूपांतर झाल्यासारखे ते उन्हात चमकत होते . तिने अर्धी अधिक बाटली संपवली .
" आर यू ओके ? " मी आवाजात मृदुपणा आणत म्हणालो .
" सॉरी , मला काय झालं कळालं नाही.... अचानक रडुच आलं . सॉरी , खरंच सॉरी .... " काल तिच्या तोंडून आगिनफुलं पडत होती आणि आज सॉरी सॉरी चा जप चालला होता . ह्या पोरीचं काही खरं नाही .
" इट्स ओके .... काही प्रॉब्लेम नाही . तुम्हाला आता बरं वाटतंय ना ? "
" हो , आता बरी आहे मी . आपण त्या इराण्याच्या हॉटेल मधे चहा घेऊया का प्लीज ... "
" काय ? " ती बोलत होती त्यावर माझा विश्वास बसेना ... आता एखादी सुंदर मुलगी जर स्वतः हुन चहा घेऊया का असं विचारत असेल तर , नाही म्हणणारा एकतर ठार वेडा तरी असेल किंवा पुरुष तरी नसेल ..... पण मला तिची जरा शंकाच आली . काल फाड फाड बोलणारी मुलगी मला चहा घेऊया का असं विचारत होती . ?
" चहा घेऊया प्लीज , चांगला मिळतो तिथे " ती पुन्हा असं म्हणाली आणि मी काही बोलणार इटक्यात तिकडे जाऊही लागली. मला तिच्या मागून जाण्यावाचून काही पर्याय उरला नाही . खरं सांगायचं तर ते आमचं नेहमीचं हॉटेल होतं . आमच्या ऑफिसची ५ - ६ टाळकी नेहमी असायची तिथे ! आता ते लोक तिथे नसावेत हीच प्रार्थना करत मी तिच्या मागोमाग हॉटेल मधे शिरलो . नशिब कोणी नव्हतं .
" तिथे बसूयात " तिने बोटांनी भिंती शेजारचं गोल टेबल दाखवलं . मी मानेनेच होकार दिला . नेहमी ऑफिस मधल्या लोकांबरोबर येणारा आज एका मुलीबरोबर आलेला पाहून काऊंटरवरच्या शेटने सुद्धा चष्म्याच्या कोपऱ्यातुन पाहिलेलं मला जाणवलं . मला एकदम परग्रहावर आल्यासारखं वाटायला लागलं . आमची नेहमीची ऑर्डर घेणाऱ्या हॉटेलच्या पोऱ्याने सुद्धा माझ्याकडे पाहून भुवया उंचावल्या. आणि नेहमी वैतागलेल्या सुरात विचारणाऱ्या पोऱ्याने सुद्धा आज अगदी अदबीत विचारले , " काय आणु साहेब ... ? "
" बन मस्का आणि चहा .... " ती आणि मी एकत्रच म्हणालो . मग एकदमच एकमेकांकडे बघून आश्चर्याने हसलो .
" आमचं सुद्धा हे नेहमीचं हॉटेल आहे . " मी माहिती पुरवली
" अय्या हो का ... मी आणि माझी मैत्रीण येतो कधी कधी इथे , मावा केक फार छान मिळतात ... "
" हो ... खरंच ... मस्त हॉटेल आहे हे " मी विचार करत होतो ज्यावेळी आमच्या ऑफिसच्या मित्रांना कळेल की मी एका सुंदर मुलीबरोबर इथे बन मस्का आणि चहा घ्यायला आलोय तेव्हा ते तर माझा जीवच घेतील . मी असा विचार करत असताना ती काहीतरी बोलली असावी .
" हॅलो , तुमचं लक्ष कुठे आहे ... मी काहीतरी बोलतेय तुमच्याशी.... . "
" ओह... सॉरी , मी जरा दुसऱ्याच विचारात होतो . काय म्हणत होतात तुम्ही ?"
" काही नाही.... तुमचा माझ्यावरचा राग अजुन गेलेला दिसत नाही... . अॅक्चुली मी एका प्रॉब्लेम मधे होते . मी तुमच्यावर रागाच्या भरात ओरडले. ... मला प्लीज समजून घ्या ..प्लीज ..
" एका अटीवर... तुम्ही हे सारखं प्लीज प्लीज म्हणनं सोडून दया . आता मलाच कसंतरी होतंय... ठीक आहे होतात चुका माणसाच्या हातून ! त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही . मी समजू शकतो . मला खरंच काही वाटलं नाही ... यु डोंट वरी .... . " सुंदर मुलींचे शंभर गुन्हे सुद्धा माफ असतात . आणि तिचा तर आत्ताशी पहिलाच गुन्हा झालेला होता .
" हा तुमच्या मोठेपणा आहे . का कुणास ठाऊक पण मला तुमच्याशी बोलून बरं वाटतंय ... " ती म्हणाली . आज ही पोरगी आपल्याला हरबऱ्याच्या झाडावर चढवल्या शिवाय राहणार नाही . ती बोलत असताना वेटर बन मस्का आणि चहा घेऊन आला . तिने पहिला घास तोंडात टाकला
"हम्म्म.... हेवन ... " त्याचा स्वाद घेत ती खाऊ लागली. मी विचार केला , ती हीच मुलगी होती जी काल माझ्यावर चिडली होती ..., मघाशी लहान मुलीसारखी रडत होती.... आणि आता एकदम बिनधास्तपणे माझ्याबरोबर बन मस्का आणि चहा घेत होती ..... अनबिलीव्हेबल ...!
" एक विचारु का ? तुम्हाला राग येणार नाही ना ? " कॅरममधे क्वीन काढल्यावर कव्हर काढताना जशी बाळगावी लागते तशा सावधगिरीने मी तिला विचारलं .
" बोला ना ... "
" काल सहज माझं लक्ष तुमच्याकडे गेलं , तुम्ही फोन वर बोलताना रडत होतात … खरं तर ही तुमची खाजगी बाब आहे ... पण माणुसकी म्हणून मी तुम्हाला विचारतोय ... तुम्हाला सांगायचं नसेल तर तसा काही फोर्स नाही ..." मी अडखळत तिला विचारलं . त्यावर ती एकदम गंभीर झाली . तिच्या हातातला बन पावाचा तुकडा तसाच हातात राहिला . एकूणच प्रकरण गंभीर दिसत होतं . तिने थोडा पॉज घेतला आणि सुरुवात केली ," मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत होते.... आमचं भांडण झालंय … " तिचे हे शब्द आकाशातून पडणाऱ्या मुसळधार पावसासारखे माझ्या अंगावर कोसळले . इतके दिवस आपण जिला पहात होतो, जी आपल्याला मनोमन आवडली होती , तिचं एका दुसऱ्याच माणसाबरोबर लग्न होणार आहे हे ऐकल्यावर नैराश्येचे ढग आणखीनच माझ्या मनात दाटून आले . गर्दीने खच्चुन भरलेल्या बसमधे आपण बसलेल्या सिटवर रिझर्वेशन असलेला माणूस आल्यावर जसं वाटतं तसं मला त्यावेळी वाटलं . ती पुढे बरंच काही सांगू लागली . पण माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं . " कॉलेज ..... प्रेम..... विरोध ..... हेकेखोर .... वैताग ...." हे असे काही शब्द माझ्या कानावर पडले . पण माझ्या लेखी त्यांना आता काही किंमत नव्हती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा