गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

चंद्रकला




चावडीजवळच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसात सगळे जमले होते . एरवी कधीही न येणारे मेंबरही आज न चुकता हजर झाले होते . रात्रीचे नऊ वाजत आले तरी कुणी जाईना . प्रश्नच तसा उभा राहिला होता. अशा प्रकारचा प्रसंग गावावर कधी येईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं . सगळे जण एका विचित्र तणावाखाली बसले होते . कोणाच्याही तोंडातून एक चकार शब्द निघत नव्हता . थोडंसं खाकरून पाटलांनी  विचारलं , " आरं असं किती वेळ बसून ऱ्हायचं ? बोला की काहीतरी . "
" पाटील , एकच मार्ग हाय ... समूळ नाश ! " कोणीतरी म्हणालं . त्यावर पुन्हा सर्व सदस्यांमध्ये गडबड सुरू झाली .
" हे बघा , आपापसात बोलू नका , हा प्रसंगच इतका विचित्र आहे  ... अशी वेळ आपल्या गावावर पहिल्यांदाच आलिया ... तवा सगळ्यांनी विचार करून काय करायचं ते ठरवा " ग्रामपंचायतीचे एक जुने सदस्य म्हणाले .
" बरं दुसरा पर्याय हाय का आपल्यासमोर ? " पाटलांनी विचारलं . तेव्हा कोणीच काही बोलेना . " ठीक आहे , मग कोण करील हे काम ? " त्यांनी विचारल्यावर  लोक  एकमेकांकडे  बघू लागले . कोणीच पुढं येईना  . इतक्यात खांद्यावर घोंगडी घेतलेला रघुजी रामोशी पुढं आला आणि म्हणाला , " पाटील , मी करतु हे काम . पन दाम बी तसंच मिळालं पायजेल  "
" दाम तू मागशील ते ... काय मंडळी ? " पाटील म्हणाले त्यावर सगळ्यांनी त्यांना दुजोरा दिला आणि सुटकेचा निश्वास टाकला . पाटलांनी  रघुजीची पाठ थोपटली . " जा , काम फत्ते करून या " रघुजी आणि त्याचे साथीदार कामाला निघालेही . चंद्रकलेचा  चेहरा पाटलांच्या डोळ्यांसमोर आला . आज गावकऱ्यांच्या आणि सगळ्या गावाच्या  हितासाठी  चंद्रकलेचा  मुडदा पडणार  होता .
               वरच्या आळीत कोपऱ्यावर एका पडक्या वाड्यात चार खणाच्या पडवीवजा घरात  चंद्रकला राहात होती . मध्यम वयाची , सावळीशी , कपाळावर बंद्या रुपयाएवढं कुंकू लावलेली  चंद्रकला त्या घरात  एकटीच राहायची . मुलबाळ नव्हतं आणि तिचा नवरा काही वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता . गावच्या  पाटलांना  सांगून चौकीवर नवरा हरवल्याची तक्रारही नोंदवली होती , पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही . आता  तिचं ह्या जगात  कोणीच उरलं नव्हतं .  अगदी मितभाषी , आपण भलं आणि आपलं काम भलं . इतर बायका दुपारची कामं झाली की एकमेकींच्या घरी जाऊन  गप्पा टप्पा मारायच्या , पण चंद्रकला मात्र कुणाकडेच जात नसे . शेजारीपाजारी संबंधही अगदी मोजकेच ! गरजेपुरते . चंद्रकला कुणाच्या अध्यात  ना मध्यात ...  दिवस दिवस ती कोणाच्या नजरेलाही पडायची नाही . एखादी अडगळीत पडलेली निर्जीव वस्तू जशी असते तसं तिच्या आयुष्य झालं होतं . तिच्या अशा समाजापासून अलिप्त राहण्यामुळे , तिच्या भोवती एकप्रकारचं गुढतेचं वलय निर्माण झालं होतं . आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं ते त्या बेंदुराच्या सणाच्या दिवशी !
                   त्या दिवशी गावात बेंदूराचा सण होता . गावकऱ्यांनी आपापले बैल झुल वगैरे टाकून , शिंगांना रंगकाम आणि  गोंडे लावुन सजवले होते . सर्वत्र चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण होतं . आता थोड्याच वेळात मिरवणूक निघणार होती . ढोल ताशे वाजायला लागले , सर्व ग्रामस्थ आपापले बैल घेऊन रांगेने उभे राहिले . कुणीतरी फटाक्यांची मोठी लड लावली आणि पहिल्या रांगेतले दोन बैल बिथरले . इतके की ते उधळले , मालकाच्या हातातलं दावं निसटलं  आणि  ते सैरावैरा धावत सुटले . सगळीकडे एकच गोंधळ उडाला . जो तो आपापला जीव मुठीत धरून पळू लागला . पण एक लहान मुलगा नेमका भर रस्त्यात उभा होता .उधळलेले बैल त्याच्या रोखाने येत होते . एकदम गंभीर परिस्थती निर्माण झाली. उधळलेले बैल आता कोणत्याही क्षणी त्या लहान मुलाला चिरडणार होते . लोक एकदम ओरडले . बायकांनी  डोळे झाकून घेतले . त्या मुलाची आई तर चक्कर येऊन खालीच पडली .पण इतक्यात एक चमत्कार व्हावा तसं झालं . एक हात त्या मुलाच्या जवळ आला आणि  त्या हाताने मुलाला मागे खेचलं . मुलगा थोडक्यात बचावला आणि बैंल उधळत पुढे निघून गेले . त्या मुलाला वाचवणारा हात चंद्रकलेचा होता . आता वर वर पाहता ही घटना साधी सरळ सोपी दिसते . वाचतानाही काही लक्षात येत नाही पण , हा प्रसंग प्रत्यक्ष बघणाऱ्या  काही चाणाक्ष  गावकऱ्यांच्या एक गोष्ट बरोब्बर ध्यानात आली होती ती ही की चंद्रकला आणि त्या मुलांमध्ये  वीस ते पंचवीस फुटांचं अंतर होतं . आणि तिने जागचं न हालता मुलाला वाचवलं होतं . हे कसं शक्य आहे ? चंद्रकलेचा हात वीस फूट लांबला होता  आणि तिने मुलाला वाचवलं होतं . त्यानंतर तिथं एक क्षणही न थांबता चंद्रकला निघून गेली आणि ज्याच्या त्याच्या तोंडी हीच चर्चा , की हे झालंच कसं ?
                  त्यानंतर मात्र सगळ्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली . जो तो त्या दिवशी जे घडलं त्याबाबत  दबक्या आवाजात बोलू लागला. चंद्रकलेबाबत अनेक वावड्या उठायला लागल्या. कोणी म्हणायचं चंद्रकला मध्यरात्री स्मशानात जाताना दिसली होती . कोणी म्हणे चंद्रकला आरशात दिसत नाही , तिच्या घरी आरसाच नाही . तिला चेहरा बघायचा झाला तर ती रांजणातल्या पाण्यात बघते . कोणी म्हणे तिनेच आपल्या नवऱ्याला मारून टाकलंय आणि  त्याचं प्रेत वाड्याच्या मागच्या आडात टाकून दिलं .... कोणी म्हणे  चंद्राच्या कलेनुसार तिचा चेहरा बदलत जातो , अमावास्येला ती दिसत नाही , वगैरे वगैरे .... ह्यातलं किती खरं आणि कितो खोटं हे त्याचं त्यालाच ठाऊक , पण तिच्याविषयी आणि तिच्या वागण्याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता हे मात्र नक्की ! लोक तिच्या वाड्याच्या आजूबाजूला फिरकेनासे झाले . लहान मुलांच्या आयासुद्धा आपलं पोरगं तिच्या वाड्याच्या जवळ जाणार नाही ह्याची काळजी घेऊ लागल्या होत्या. दिवसेंदिवस तिच्याबद्दलच्या चित्रविचित्र गोष्टींमध्ये वाढच होत चालली होती . अमावस्या , पौर्णिमेला रात्री लोक  घराबाहेर पडेनासे झाले .  गावात एक विचित्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली . ह्यावर तोडगा काढण्यासाठीच आज  ग्रामपंचायतीची मिटिंग घेण्यात आली होती . ही भुताटकी गावात नकोच ! असंच प्रत्येकाचं मत पडलं होतं .
               बरीच रात्र झाली  तरी कामगिरीवर गेलेली मंडळी परत आली नव्हती .
 " आरं , किती वेळ झाला रं ? " पाटलांनी न राहवून विचारलं .
" साडे अकरा  झालेत पाटील . आपले गडी अजून कसं येईनात ? " ग्रामपंचायतीचे सदस्य गावडेंनी विचारलं .
" तेच मलाबी कळना ... काय इपरित तर झालं नसंल ? " पाटलांनी शंका काढली . त्यावर सगळेच घाबरले. लोकांमध्ये चुळबुळ सूरु झाली . " तसं काय व्हायचं नाही म्हना .... आपलं काम फत्ते होईल " पाटलांनी सावरून घेतलं .
" पाटील , एखाद्याला  धाडता का वरच्या आळीला  ? काय चालू हाय ते तरी कळल  " कोणीतरी  शक्कल काढली .
" ए गपे ... तिथं काम चालू आसंल , त्यात कशाला अडथळा ?  जरा कळ काडा ... " परस्पर कोणीतरी त्याला झापुन टाकलं .
" नको , नको .... थोडं थांबू .... " पाटलांनाही हे पटलं . ते बोलत असतानाच , अंगावर घोंगडी घेतलेली चार माणसं ग्रामपंचायतींमध्ये शिरली . त्यांना बघून पाटील जागचे उठले . तशी सगळीच बाकीची मंडळी उठून उभी राहिली . सर्वांच्या नजरेत एकच प्रश्न होता त्यावर रघुजी म्हणाला, " पाटील , काम फत्ते ! " आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला . पाटलांनी खुर्चीत अंग टाकलं . बाकीच्या लोकांनी देवाचे आभार मानले . त्यानंतर सगळी पांगापांग झाली . पाटील एकटेच त्यांच्या खुर्चीत बसून विचार करीत राहिले .  आपण केलं ते योग्य की अयोग्य ?  तिला गावातून काढून टाका असं काही जण म्हणाले . पण कोणत्या कारणासाठी काढायचं ? आणि हे असं समजल्यावर ती काय करील सांगता येत नव्हतं . गावात चंद्रकलेसारखी एखादी जिवंत हडळ चारचौघात बिनदिक्कतपणे कशी काय राहू शकते ? तिला कोणतीही संधी न देता तिचा काटा काढणं गरजेचं होऊन  बसलं . पण तसं बघायला गेलं तर , चंद्रकलेचा तसा गावाला कसलाच त्रास नव्हता . ती बिचारी एकटी शांतपणे राहत होती .  आपण भलं आणि आपलं काम भलं . तरीही आपण तिला मारून टाकली . कदाचित ती एखादी साधी बाई असेल ,  निरुपद्रवी ... तिचा नवरा गायब झाला  तेव्हा आपण तिला मदत केली होती , त्या बदल्यात आपण तिच्याकडे जे मागितलं त्यावर तिने एवढं चिडायला नको होतं . ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं , पण ही बया निघाली मोठी पतिव्रता ! ह्या पाटलाच्या मुस्काडीत मारली त्या भवानीनं ! बरं झालं ,  काट्यानं काटा निघाला . पाटील खुर्चीतून उठू लागले , पण का कुणास ठाऊक त्यांचे खांदे एकदम जड वाटू लागले . कसेबसे ते उठले ,आणि  समोरच्या आरशात सहज त्यांचं लक्ष  गेलं . त्यांच्या मानगुटीवर  चंद्रकला बसली  असल्याचं त्यांना दिसलं आणि त्यांच्या छातीत जोरात कळ येऊन ते धाडकन खाली कोसळले .   

https://marathi.pratilipi.com/story/yko1u38sskes?utm_source=android&utm_campaign=content_share

 समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा