रविवार, १५ जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण - 2


                    दिल्लीला ट्रेन मधून  बाहेर पडलो आणि आम्हाला कुणीतरी भट्टीत टाकलं  कि काय असं वाटलं....टळटळीत दुपार ...डोक्यावर आग ओकणारा सूर्य .... प्रत्येकाच्या अंगावर किमान 2 मोठमोठ्या bags .  इतकी उष्णता कि काही बोलू नका ....! तिथलं  उन हे झटका आणणारं होतं . ते कमी कि काय म्हणून दुसरं  एक संकट  आमच्या समोर दत्त  म्हणून उभं  ....! आमच्या तीन गाड्यांपैकी 2 गाड्या हजरत निझामुद्दीनला आणि 1 गाडी नवी दिल्लीला उतरवण्यात आली होती.... कल्याणहून गाड्या चढवताना 3 पैकी 2 गाड्या एका ट्रेन मध्ये  आणि संदीपची गाडी दुसऱ्या ट्रेन मध्ये  चढवल्याने हा घोळ झाला होता ....रेल्वे प्रशासनाची मेहेरबानी , दुसरं  काय ...!!  दिल्लीला पियूची ताई राहते. तिच्या मिस्टरांनी आधल्या दिवशी जाऊन गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. संदीपची गाडी शोधून तिचा पास बनवून त्यावर पार्सलबाबूची सही घेऊन ठेवली होती . त्यांच्या  मदतीमुळे  आमच्या गाड्या दिल्ली स्टेशनातून लवकर बाहेर काढता आल्या. त्यांनी आमच्यासाठी  बरीच धावपळ  केली. आणि त्यांच्यामुळेच ठरलेल्या प्लानप्रमाणे आम्हाला लवकर दिल्ली सोडता आली .... 

                   वेळ दुपारी 3 वाजताची .....तरीही  सूर्याची आग काही शांत झाली  नव्हती .... तशातच भर उन्हात आम्ही  गाड्यांवर समान बांधायला सुरुवात केली.... तिन्ही गाड्यांवर सामानाची बांधाबांध करण्यात अर्धा तास गेला ....अंगावर संरक्षक कवचे चढली .... गाड्या सामान  बांधून तयार झाल्या .... रायडर्स  बसले .... गाड्यांना चाव्या लागल्या ..... किक  मारल्या गेल्या ....ब्रू sssम  ब्रू sssम  एक्सलेटरचे  आवाज झाले .... आणि  आम्ही सज्ज झालो ते आमच्या  स्वप्नवत प्रवासाला .....
                                 
                    आजच्या रात्रीपर्यंत आम्हाला  चंदिगढ पर्यंत जायचेच होते ....दिल्लीत उष्णता इतकी होती कि रस्त्यावरचे डांबर गर्मीने वितळून मऊ  झाले होते. सिग्नल ला गाडी थांबली कि गाडीच्या टायरचे ठसे रस्त्यावर उमटत होते. एक वेळ अशी आली कि शरीरातली पाण्याची पातळी अतिशय खालावली. आमचा खजिनदार पप्याने जर वेळीच पाण्याच्या बाटल्या घेतल्या नसत्या तर आमच्यातले 1-2 जण  तरी उष्माघाताचे बळी ठरले असते. कॅमल bag  हे एक नवीन प्रकरण पप्याने आणलं  होतं ... त्यात पाणी भरून गाडी चालवता चालवताही पाईप द्वारे पाणी पिता येत असे. पप्याने  उगाचच शायनिंग मारायला हे आणलंय असं  आम्ही त्याला बोलूनही दाखवलं ..." बंर , मग पाण्यासाठी माझ्याकडे येऊ नका.... " पप्यानेही आम्हाला प्रत्युत्तर दिले ....  दिल्लीतून जसजसे बाहेर पडू लागलो तसे उनही कमी होत गेले . मग सुसाट वेगात आम्ही अंतर कापायला सुरुवात केली ... हमारी गाड़ियाँ हवां  से बातें  करने लगी ....  मध्ये येणाऱ्या गाड्यांना होर्न देत , ओवरटेक करत आम्ही पुढे  चाललो होतो . संध्याकाळी पानिपत च्या 20 किलोमीटर आधी एका ढाब्यावर आम्ही  नाश्ता करायला थांबलो ... मस्त  आलू पराठे हाणले ... चहा मारला ... आणि पुढच्या प्रवासाला निघालो ...अंधार होत आला होता ... अजून चंदिगढ 70-80  किमी लांब होतं . त्यामुळे मग अंबाल्याला राहायचं  असं  ठरलं. मस्त खाऊन  पियुन झाल्यानंतर झोपायला 12 वाजले. 
--" पहाटे 3 चा गजर लावा ,  लवकर उठायचं आहे ... " असं सांगून खोप्या गेला ...
   त्र्रीईई sssss गजर तर झाला..., पण सकाळी  6 वाजता ... सगळे धडपडत उठले .  आवरा आवरी करून निघेपर्यंत 7 वाजले. 

सकाळी रस्ता सुनसान होता . मग आमचे रायडर काय ऐकतात काय...!! भन्नाट वेगात मनालीच्या दिशेने निघालो. चंदिगढ चे रस्ते अगदी मस्क्यासारखे होते. प्रत्येक चौकात गोल गार्डन ... त्यावर सुंदर landscaping केलेलं.... रस्त्याच्या दुतर्फा स्वागत करण्यास सज्ज असलेली झाडे .... सकाळचं  कोवळं  उन .... कानाशी गुजगोष्टी करणारा वारा ....मस्त वाटत होतं .  सकाळी एका तासात आम्ही 70-80 किमी आलो असू....पोटातला कावळा  नावाचा पक्षी ओरडायला लागलेला .... एका पंजाबी धाब्यावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो... खोप्याने  ' पंज  परांठे और लस्सी दा ऑर्डर ' दिया. आम्ही दिल्लीत आल्यापासून खोप्याला काय झालं होतं  कुणास ठाऊक ? त्याच्या हिंदी मध्ये पंजाबी भाषेचा काही अंश उतरल्याचे जाणवत होते....त्याची पंजाबी भाषा भलतीच सोपी होती ....हिंदी भाषेतल्या क्रियापदाला " वांगा " प्रत्यय लावला  कि झाली  पंजाबी ....!!  त्यामुळे प्रत्येक क्रियापदाला तो  प्रत्यय लावून आम्ही त्याला चिडवू लागलो ... " मेनू खाणा  खावांगा ..., गड्डी  चलवांगा ..., पानी  पिलवांगा.... " असं काहीबाही बोलून त्याला काव आणला होता .... नाष्ट्यासोबत मस्करी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो.... 

                  पप्याची गाडी मी चालवायला घेतली....बिलासपुर कडे जाणाऱ्या घाटाला सुरुवात झाली .... सळसळत्या नागिणी सारखा समोरचा रस्ता .... वातावरणातली  आल्हाददायक थंडी.... मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी .... रस्त्यांवरून गाडी चालवायला भलतीच मजा येत होती. पण थोड्या वेळाने परत पप्याकडे गाडी देऊन मी संदीपच्या गाडीवर मागे बसलो . मनालीच्या वाटेवर एके ठिकाणी चांगलाच पाउस  सुरु झाला...  बिलासपुर . सुंदरनगर ,  मंडी  , मागे टाकत आम्ही  पुढे चाललो होतो .  रस्त्याला समांतर रेषेत बियास नदी आमची साथ देत होती... अंधार पडायला आला त्यावेळी आम्ही मनालीच्या जवळ पोहोचलो.... आणि तिथे आम्हाला दिसले ते पहिले हिमाच्छादित पर्वत.... 

ते दिसल्यावर तर आमच्या  फक्त उड्या  मारायच्या बाकी राहिल्या होत्या .... हिमालयाचं  ते प्रथम दर्शन अतिशय मनोहारी होतं ... मावळतीचे किरण हिमालयाच्या शिखरांवर पडून उजळून निघाले होते .... मनालीत पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार झाला ... मग निवाऱ्यासाठी आम्ही हॉटेल दर हॉटेल फिरलो .... शेवटी कसेतरी एका हॉटेल मध्ये थकलो - भागलेलो   आम्ही बेड वर जाऊन पडलो , पुन्हा एकदा पहाटे 3 चा गजर लावून .... कानात एन्फिल्डच्या  सायलेन्सरचा आवाज अजूनही घुमत होता ....

मंगळवार, १० जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण

                तब्बल एका वर्षापासून  ठरत असलेला  आमचा लडाखचा  बेत  सत्यात उतरत होता ... दुपारच्या ट्रेनने आम्ही दिल्लीला रवाना होणार होतो .  सुरुवातीला  लडाखला जायला उत्सुक असणाऱ्या 9 जणांपैकी आम्ही फक्त 5 जण ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस मध्ये चढलो होतो.   पाच जण  म्हणजे -- संदीप , खोप्या , पियू  ( खोप्याची बायको ), पप्या   आणि मी....  ट्रेन च्या 3 tier AC  ची थंडगार हवा पुढे येणाऱ्या थंडीच्या लाटेची झलक दाखवत होती . गाडीचा भोंगा वाजला .हलकासा झटका देऊन संथगतीने गाडी सुरु झाली.... कदाचित पुढच्या प्रवासात बरेच मोठे झटके येणार असंच काहीसं ती सुचवीत असावी . गाडीने वेग घेतला , आणि सुरु झाला तो स्वप्नांच्या प्रदेशातला प्रवास .....  सामान- सुमान नीट लावून झाल्यानंतर निवांत बसलो , आणि मला मागच्या 3-4 महिन्यांच्या घटना आठवायला लागल्या....




-- " लडाखला ....??? आणि  बाईक वर ....??? " घरच्यांचा असा प्रश्न आला कि मी कुठेतरी चंद्रावरच चाललोय ... पण लडाखला जाण्यासाठी चंद्रावर  जाण्याइतकीच पूर्वतयारी करावी लागते , याचा प्रत्यय आम्हाला नंतर आलाच...! आता जर बाईक वर जायचं  म्हणजे गाड्याही तशाच दणकट हव्यात . त्याबाबतीत रॉयल एन्फिल्ड  ला तोड नाही ....खोप्या आणि  संदीप ने नव्या कोऱ्या एन्फिल्ड लडाखला जाण्यासाठी विकत घेतल्या. त्यांच्या त्या अजस्त्र गाड्यांसमोर माझी होंडा शाईन म्हणजे हिंदकेसरी समोर काडीपैलवान ...!!! तरीही ती लडाखचे रस्ते चढू शकेल असं  काही जणांचं म्हणणं .... , तर काही जण ,  ' ती दिल्ली ते मनाली  गेली तरी नशीब... ' असं  म्हणू लागले ...
-- " काही नाही रे , एक जण  तर बजाज चेतक घेऊन लडाखला गेला होता " असं  म्हणून खोप्या अधून मधून मला धीर देत होता. खरं सांगायच तर मला माझी बाईक घेऊनच लडाखला जायचं  होतं  पण , ऐनवेळी आमच्यातल्या 4 जणांनी  यशस्वी माघार घेतल्याने ' फुकट पेट्रोलचा खर्च कशाला ? 'म्हणून मग 3 बाईक घेतल्या . तिसरी गाडी म्हणजे पप्याची यामाहा FZ ... पाच जणांमध्ये तीन गाड्या हे योग्य समीकरण होत . आता 15 दिवसांचा प्रवास म्हणजे भरपूर सामान  आलंच .... अन ते बाईक वरून न्यायचं म्हणजे त्यासाठी विशिष्ठ कॅरियर्स लागणार होती. ती लडाख  कॅरियर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. खोप्या आणि संदीप ने ती कुठूनतरी मागवली आणि गाड्यांना बसवून घेतली ....त्यात 2 बाजूंना 2 मोठ्या  bags  मागे 1 लहान bag  आणि मुख्य म्हणजे पेट्रोलचे 2 कॅन  ठेवण्यासाठी जागा होती... अशी ती बहुपयोगी कॅरियर्स गाडीला लावून फिरले कि लोक माना वळवून वळवून पहायचे... एक- दोन जणांनी तर ''लडाख  का ..??" असेही विचारले . लोकांनी गाड्यांकडे कुतूहलाने बघितलं किंवा विचारपूस केली कि खोप्याला जीवनाचं  सार्थक झाल्यासारखंच  वाटायचं.... तिन्ही गाड्यांची सर्विसिंग करून घेतली होती ... आणि गाड्या आम्ही निघायच्या 2-3 दिवस आधीच  ट्रेनने दिल्लीला पाठवल्या होत्या .
               गाड्यांची अशी सजावट झाल्यानंतर वैयक्तिक खरेदीला सुरुवात केली... मुख्य म्हणजे तिथल्या थंडीसाठी थर्मलस , jackets , झीपर्स ,  हातमोजे , दरोडेखोर चेहरा दिसू नये म्हणून डोक्यावर  घालतात तसला   बालाक्लेवा   , नवीन स्पोर्ट्स शूज ,  नि- गार्ड , एल्बो गार्ड , हेल्मेट ह्यांची खरेदी झाली.... हे सगळं एकदम  अंगावर चढवल्यावर मी कोणीतरी महाभारतातलं पात्र  किंवा   अंतराळवीर वाटतोय असं  घरच्यांचं मत पडलं ....
तिथे लागणारी सगळ्या प्रकारची औषधे , गोळ्या,  मलमे  हि  खोप्या आणि पियूने आधीच खरेदी करून ठेवली  होती  . त्यात एक ' हाय अल्टीट्युड सिकनेस ' साठीची गोळी होती... ह्या अशा प्रकारचा सिकनेसही  असू शकतो आणि त्यावर गोळ्या असतात हे ऐकून तर मला मोठी गम्मतच  वाटली....हाय अल्टीट्युड सिकनेसचा  असा काय मोठा त्रास होणार होता....??  पण त्यावेळी मला कुठे माहित होतं  कि , त्या गोळ्यांची  जास्त गरज मलाच लागणार होती ....
              लडाखला जायचा रस्ता , कोणत्या दिवशी कुठपर्यंत जायचं.... , कुठे राहायचं ...., याचा सगळा प्लाsss न खोप्याने तयार केला होता ...आणि तो आम्हाला वेळोवेळी ते  इ-मेल हि करायचा , पण आम्हाला आमच्या दिनचर्येतून ते पाहायला वेळच नव्हता ... प्रवासाची तारीख जवळ येत असताना काही जाणकारांकडून आम्हाला असं कळलं  कि आम्ही उलट्या दिशेने लेह ला जाणार होतो ....बाईक वरून जाणारे जम्मू मार्गे लेह ला जातात आणि मनालीला उतरतात  , पण आम्ही दिल्ली -  मनाली  वरून लेह ला चढणार होतो. 
 -- " अरे 21 गाटा  लुपस चढण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या  कशात नाही ..." असं  खोप्या म्हणाल्यामुळे आम्हालाही स्फुरण चढलं  होतं ...... इतकी सगळी तयारी , प्लान झाल्यानंतर सामानाच्या ब्यागांचा डोंगर सांभाळत  आम्ही राजधानी एक्स्पेस मध्ये चढलो होतो ....
              राजधानी एक्स्पेस मधली सरबराई काय वर्णावी....?? आल्या आल्या अर्ध्या तासातच आम्हाला snacks आले , मग चहा , मग 2 तासांनी टोमाटो  सूप , मग 1 तासाने जेवण , मग आईस्क्रीम ....आगगाडीच्या डब्यांसारखी लाईनच.... रात्री मस्त ताणून दिली , सकाळी उठलो तेव्हा मथुरा स्टेशन वर गाडी उभी होती .... आता आणखी  2-3 तासात दिल्ली ....! तिथे  आमच्या गाड्या आमची वाट पाहत होत्या ....  




माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
             

सोमवार, ७ मे, २०१२

...... मी एकटा ......




उधाणलेला समुद्र 
रोरावता वारा
लाटांचे तांडव चाले 
अन प्रतिकूल आसमंत सारा 

दिशांचे ढळले तारे 
घोंघावती वडवानल रौद्र 
उदरी  तयास घेण्या  
आसुसला हा समुद्र 

कडाडली विद्युल्लता
लख्खं प्रकाश चोहीकडे 
पाठोपाठ  ऐकू येती 
नभांचे चौघडे 

विरत चालला हा 
दिपगृहाचा प्रकाश  
अंधारून आले 
निळेभोर आकाश

नाव  डळमळे 
शीडही तुटले
आप्तेष्ट म्हणविती असे
तेही मागे हटले

उरले  न काही
ह्या वैराण आयुष्यात
आता मी एकटाच
आता मी एकटाच...... 
  




शनिवार, २४ मार्च, २०१२

.... आर्ट एग्झिबिशन ......


-- " मला यायला उशीर  तर झाला नाही ना...? " मी घाबरत घाबरत नान्याला विचारलं... त्याने माझ्याकडे तुच्छतेचा कि काय म्हणतात तसा कटाक्ष टाकला. त्याची छोटीशी वेणी घातलेली दाढीही रागाने  नकारार्थी हलल्याचा मला भास झाला .
-- " तुला किती वाजता यायला सांगितल होतं ?? "
-- " ३ वाजता..."
-- " आणि आता किती वाजलेत....??" माझ्यापुढे हातातलं  घड्याळ नाचवीत त्याने विचारलं .
-- " साडेतीन ..." मी अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो.
-- " तुला वेळेचे महत्व नसेल , पण मला आहे ." नान्या माझ्यावर चांगलाच डाफरला. काय करणार...?? मला उशीर तर झालाच होता. चूक माझीच होती. त्यामुळे मी आपला गप्प राहिलो.  एरवी जर नान्या मला असं काही बोलला असता तर मी पहिला त्याच्या पाठीत  एक गुद्दाच घातला असता... नान्या.-- माझा लहानपणा पासूनचा मित्र ...! आम्हा दोघांनाही चित्रकलेत पहिल्यापासून रस होता . परंतु  फरक इतकाच होता कि तो चांगली चित्र काढायचा आणि  मी माझ्या चित्रकलेतून लोकांच्या कल्पनाशक्तीला चालना द्यायचो. बऱ्याचदा मी काढलेलं चित्र नक्की कशाचं आहे ह्यावर अनेकांमध्ये मतभेद व्हायचे , पैजा लागायच्या , हे चित्र कसलं आहे त्याच्यावरून....!! असंच  एकदा मी फुटबॉल खेळणाऱ्या दोन मुलांचं  चित्र काढलं होतं , ते आमच्या  ड्रोइंगच्या मास्तरांना  दाखवलं... चित्र बघितल्यावर मास्तरांना काय झालं कुणास ठाऊक ?  ते भलतेच भडकले , आणि मला बेदम मारलं... मी काढलेल्या चित्रातील वळणांवरून  आमच्या मास्तरांना ते  अश्लील चित्र  काढल्यासारखं वाटलं अन त्यामुळे मला फटके पडले हे मला नंतर कळलं ....  पण ते  तितकंसं महत्वाच नाही ... तो भाग सोडला तरी मला लहान असताना  कुणी विचारलं कि तुला मोठेपणी कोण व्हायचं आहे तर मी चित्रकार व्हायचं , असंच सांगायचो ....पण नंतर  मी चित्रकलेचा नाद सोडला आणि घासून गुळगुळीत झालेल्या  वहिवाटीवरून  वाटचाल सुरु केली.  नान्याने मात्र त्यातच  करियर केलं. आणि आता तो चांगला  आर्टीस्ट  झालाय ... त्याने  केलेलं  काम बघून मलाही मी पूर्वी मारत असलेल्या रेघोट्यान्बद्दल  उमाळा यायचा...   आज नान्याने बोलावलं होतं ते,  तो पूर्वी शिकत असलेल्या आर्ट कॉलेज मधलं लागलेलं प्रदर्शन पाहायला... आणि ते पाहण्यासाठी जातानाच मला अर्धा तास उशीर झाल्याने नान्या माझ्यावर चांगलाच उखडला होता.
-- " जाऊ दे ना बाबा, आता जीव घेतोस का माझा...? " मी त्याला म्हणालो... तोही दिलखुलास पणे हसला.  आम्ही आत गेलो. ते कॉलेज म्हणजे नान्याचं अभयारण्य होतं. तो तिथल्या प्रत्येकाला ओळखत होता आणि त्याला प्रत्येकजण...! सरांपासून ते शिपायापर्यंत ...! कॉलेजच्या कॅन्टीनवाल्याने  आम्ही घेतलेल्या  २ फुल चहाचे , फक्त २ कटिंग प्रमाणे पैसे घेतले ह्यावरून  नान्याच्या कॉलेजमधल्या प्रसिद्धीची एक झलक मला बघायला मिळाली . कॅम्पस मधलं एक कुत्रंही त्याच्याकडे येऊन लाडात त्याला चाटत असलेलं बघून तर मी ' चाटच ' पडलो. आम्ही चालत जात असताना  दर दोन पावलांगणिक त्याला कुणी न कुणी ओळखीचा  भेटत होता आणि तोही मोठ्या उत्साहाने त्यांच्याशी बोलत होता .अशीच मजल दर मजल करीत आम्ही शेवटी आत गेलो .   आत गेल्यावर मात्र मी स्वतःला हरवून गेलो .  रेखीव चित्रे.... मुक्तपणे केलेली रंगांची उधळण ..., नवीन नवीन प्रकारच्या जाहिरातींसाठी केलेली कॅम्पेन्स...... , अफलातून आईडियाज......,  लक्षवेधी मॉडेल्स..... , मन गुंगवून टाकणारी फोटोग्राफी......,  जाहिरातीची  निरनिराळी  स्लोगन्स बघून तर मला तिथे शिकणाऱ्या मुलांचा हेवा वाटू लागला.
-- " नान्या , हे बघ , मस्त आहे रे ...!!" एका सुंदर नर्तिकेच्या स्केचकडे बघत मी नान्याला म्हणालो .
-- " हे काही तितकंसं खास नाही..." नान्या बेफिकीरीने म्हणाला .
-- " हे मॉडेल  मस्त आहे ना...?." एका मिनी थिएटरच्या मॉडेलकडे बघत मी म्हणालो .
-- " छे .... त्यात काही दम नाही.... " नान्याला त्यातही  विशेष असं काही दिसेना .... मला जे चांगलं वाटत होतं , त्यात नान्याला  काही तथ्य वाटत नव्हत.  आणि मला जे कळत नव्हतं त्या चित्रासमोर ,  मॉडेलसमोर  उभा राहून नान्या त्याचं बारीक निरीक्षण करत होता . मी त्याला विचारलं तर म्हणाला , कि हि नवीन  कल्पना आहे म्हणून... मला मात्र त्यात काही कळत नव्हत.. असाच नान्या एका स्टुलासमोर उभा राहिला.... त्या स्टुलावर एक घमेलं ठेवलेलं , त्यात एक बादली , आणि बादलीत एक मग ठेवलेला.... नान्या त्या स्टुलाकडे एकटक पाहत होता.  मधेच मान तिरकी करून , लांब जाऊन वगैरे  बघत होता . एखाद्या डिटेक्टिव सारखा .... मला कळेना त्या स्टुलावर ठेवलेल्या  त्या घमेल्यात , आणि बादलीत एवढं काय बघण्यासारखं  आहे ??
-- " नान्या .... नान्या ... हे काय बघतोयस ? काय आहे त्यात....?? " मी शेवटी न राहून त्याला विचारलं..
-- " शु ssss  , " करून त्याने मला गप्प केलं . आणि  आणखी ५ मिनिट त्या स्टुलावर ठेवलेल्या मॉडेलकडे एकटक पाहत बसला.
-- " मला सांगशील का आता...??"  मला वैताग आला होता.
-- " हे काय आहे ते  तुला कळलं नाही...?? " असं म्हणू त्याने माझ्या अल्पमतीची खिल्ली उडवली .
-- " आयला ,  काय आहे त्या घमेल्यात आणि बादलीत...?? " माझ्या ह्या बोलण्यावर ' किती अज्ञानी माणूस ' अशा अर्थाने त्याने माझ्याकडे बघितलं. आणि म्हणाला , -- " अरे हि एक नवीन संकल्पना आहे ... , बघ...,  असा विचार कर , कि हे घमेलं म्हणजे आकाशगंगा आहे , त्यात असलेली बादली म्हणजे आपली पृथ्वी , आणि त्यात हा मग म्हणजे माणूस....!!"  एखादं विश्वाचं कोडं सोडवल्याच्या आविर्भावात नान्या माझ्याकडे बघू लागला. मला तिरमिरी येईल कि काय असं वाटू लागलं.... घमेलं म्हणजे  आकाशगंगा , आणि बादली म्हणजे  पृथ्वी  हे माझ्या  सामान्य बुद्धीला काही केल्या पटेना ....  इतक्यात एक सफाई कामगार तिथे आला आणि " ए  तुक्या , हे तुझं घमेलं न बादली घे ... झाडांना पाणी टाक भायेरच्या ...." असं म्हणून  त्याने आमच्या दोघांसमोर स्टुलावर ठेवलेली ती 'आकाशगंगा आणि पृथ्वी ' सहजपणे उचलली .. आणि त्याच्या बरोबर आलेल्या तुक्याच्या हातात दिली.  मी नान्याकडे बघितलं. , तर तो  पुढचं चित्र बघायला आधीच सटकला होता .      -- अरे , ती आकाशगंगा  आणि पृथ्वी  तो सफाई कामगार घेऊन गेला कि रे....!! " मी मिश्किलपणे त्याला एक टोमणा मारला.
-- " होतं असं कधी कधी .... पण ती कन्सेप्ट बरोबर होती ..." नान्या म्हणजे अशक्य आहे अगदी... !  हे म्हणजे ' गिरा तो भी टांग उपर ' असं झालं....नंतर आम्ही पुढे गेलो . नान्या एखाद्या परीक्षकासारखा हात मागे बांधून इकडे तिकडे  बघत चालला होता . ' आमच्या काळात  कसे विविध प्रकारचे ,  कल्पक बुद्धीचे लोक होते आणि आता अगदीच सुमार प्रतीची पोरं आहेत , ' ' मला कॉलेजला असताना प्रत्येक वर्षी बक्षीस मिळाले होते'  वगैरे वगैरे नान्या चालता चालता मौलिक माहिती देत होता . मी ," हो का , अरे वा " करत त्याच्या मागून फिरत होतो. आम्ही प्रदर्शन बघून बाहेर आलो तोच एखादा जंगलातून किंवा वेड्याच्या इस्पितळातून पळून आलेला वाटावा अशा  एका  त्याच कॉलेजच्या विद्यार्थ्याने नान्यावर झडप घातली..
-- " नानू , कधी आलास...?? बघितलस का प्रदर्शन...?" तो विचारात होता.
-- " हम्म .... पण आपल्यावेळ्ची  मजा नाही " नान्याने तोंड वाकडं करून उत्तर दिलं.
-- " तुझ्यासाठी हे प्रदर्शन पाहणं  म्हणजे फक्त १० मिनिटांचे  काम .... काय नान्या...?? " समोरच्या त्या मित्राने नान्याची स्तुती केली कि खिल्ली उडवली ह्या संभ्रमात मी असतानाच नान्या ओरडला , " अरे तो बघ , अनुराग ..." आम्ही सगळ्यांनी तिकडे पाहिलं तर एक मनुष्यप्राणी आम्हाला येताना दिसला . त्याला मनुष्यप्राणी म्हणण्याचं कारण म्हणजे त्याचा भयानक असा अवतार ...! वाढलेली दाढी ... पिंजारलेले केस ....डोळ्यांवर जाड फ्रेमचा चष्मा ....अंगात सर्वत्र  ' ओम नमः शिवाय ' लिहिलेला शोर्ट कुडता ... असल ध्यान बघून तर मला त्याच्या जवळही जाऊ वाटत नव्हते ...नान्या मात्र गाईपासून ताटातूट झालेलं  वासरू तिला  पाहिल्यावर ज्याप्रमाणे हंबरत , बागडत जाईल तसा  पळत त्याच्याकडे गेला . मला कळेना कि एखाद्या वेड्यासदृश दिसणाऱ्या माणसाशी नान्या इतक्या सलगीने कसा काय वागतोय ? तो झिपऱ्या बोलत असताना नान्या श्रीकृष्णाच्या तोंडून गीता ऐकणाऱ्या पार्थासारखा अतीव भक्तिभावाने ऐकत होता . थोड्या वेळाने तो त्याच्याशी बोलून परत आला.
--" कोण होता रे तो  ..?? " मी नान्याला विचारलं...
-- " अरे तुला माहितीये  का  ? बाप माणूस आहे .... ad  world चा अनभिज्ञ सम्राट ....!! " नान्याने मोठ्या कौतुकाने त्याचा परिचय करून दिला ,तोही चुकीच्या शब्दात....!!
-- " तुला , अनभिषिक्त  सम्राट म्हणायचं का ? " मी दुरुस्ती केली .
-- " तेच ते रे ..." नान्या काहीही ऐकायच्या पलीकडे गेला होता .
-- " त्याने  असा अवतार का केलाय रे  ??   " मी त्याला विचारलं
-- "  अरे , आर्टीस्ट लोक असेच असतात.... सामान्य माणसापेक्षा ते वेगळा विचार करतात ....  तो फाईन आर्टला  होता , आमच्याच कॉलेज मध्ये...... त्याची फोटोग्राफी जो बघेल तो वेडाच होतो...   " नान्यावरही  त्याच्या  फोटोग्राफिचा काहीसा  परिणाम झालेला दिसत  होता... थोड्याफार फरकाने नान्याही त्या झिपऱ्याच्या  जमातीतला  वाटत होता... बोलता बोलता  नान्याने खिशातून एक बिडीचं बंडल काढलं , आणि त्यातली एक बिडी शिलगावली ... हि त्याची एक नवीन तर्हा ...... सामान्य माणसे सिगारेट  वगैरे पितात .... पण आर्टीस्ट लोक बिडी पितात .... वेगळा विचार .... दुसरं काय...??   नंतर तो बराच वेळ मला फाईन आर्ट , Advertaising ,  फोटोग्राफी बद्दल  सांगत होता जे माझ्या डोक्यावरून गेलं .
 " नान्या , मला भूक लागलीय ..." माझे हे शब्द ऐकल्यावर ' पालथ्या घड्यावर पाणी ' असा चेहरा करून त्याने मला शेजारच्या इराण्याच्या हॉटेलात नेलं . तिथे नान्याच्या पैशाने  मावा केक आणि भरपूर चहा ढोसला तेव्हा मला वाटलं कि दिवस सत्कारणी लागला....



शनिवार, २८ जानेवारी, २०१२

ए .... वेटर...!!

                


                    संध्याकाळ झाली कि मंग्याची लगबग सुरु होत असे.... त्याची ड्युटी संध्याकाळच्या ७  पासून ते रात्री १-१;३० वाजेपर्यंत ....मग सुट्टी ....!  दिवसभर तो  मोकळाच... आरामात लोळत पडणे , पाहिजे तिकडे भटकणे..., चकाट्या पिटणे...., हे त्याचं दिवसाचं  काम..... मग परत संध्याकाळी सुरु ...!! पूर्वीच्या,  पहाटे उठून दुधाच्या पिशव्या  आणि पेपरची लाईन टाकण्यापेक्षा हे काम १०० पटीने बरं असं मंग्याला वाटे .....सकाळी लवकर उठायचा कंटाळा हे त्या मागचं मूळ कारण...! बारमध्ये लोक येण्याचा काळ म्हणजे संध्याकाळ पासूनचा, म्हणजे अंधार पडला कि लोक यायचे ...  मंद प्रकाश .... सिगारेट - दारूचा मिश्र वास ....क्वचित एखाद्या जुन्या गाण्याची सुरावळ....  गिर्हाईकांचा  गोंधळ ... आणि मंग्या व इतर वेटर्स ची लगबग हे  करिश्मा   बारमधल रात्रीचं नेहमीचं दृश्य ....
                    संध्याकाळी सात वाजता बार मध्ये पोहोचल्यानंतर वेटरचा गणवेश घालून मंग्या ऑर्डरी घेण्याच्या तयारीत उभा असे....खरं तर  त्याला हा ड्रेस बिलकुल आवडत नव्हता .... शाळेचा गणवेश घातला असता तर हा गणवेश  नशिबी आला नसता असं कधी कधी त्याला वाटे .... पण तो विचार मंग्या लगेच झटकून टाकी...  जे झालं ते झालं... आता परत मागचं आठवून  दुःख कशाला करत बसा..??  तो आपलं काम व्यवस्थित करीत असे.... नीट ऑर्डरी घेऊन चांगली सर्विस दिल्याने बारचा मालक गोपाळशेट्टीने त्याला  लगेच बढतीही दिली....म्हणजे  एसी रूम मध्ये वेटरची बढती....!! त्यामुळे मंग्या आणखीनच खुश झाला.... नाही म्हटलं तरी एसी मध्ये येणारे लोक हे जरा हाय प्रोफाईल असतात..... आणि इथे बाहेरच्यासारखा गोंधळ, गोंगाट नसतो....त्यामुळे मंग्याला इथे काम करायला बरं वाटे.....
                     घेतलेल्या ऑर्डर्स त्या त्या टेबलावर पोहोचवल्यानंतर टेबलवरच्या गिर्हाईकांच्या गप्पा गोष्टी ..., विनोद...., भांडणे... ऐकायला त्याला भारी गंमत वाटे.... त्याचा  छंदच झाला होता तो....! जसजशी दारू चढे तसतशा त्यांच्या गप्पा रंगत .... मंग्या त्यांच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने उभा राहून ऐकत असे.... माणूस एकदा प्यायला कि तो कि तो लहान होतो ....,  कदाचित आपलं हरवलेलं बालपण थोड्या वेळासाठी का होईना पुन्हा अनुभवता यावं म्हणून माणसं पीत असावीत .... असा एक विचार त्याच्या मनाला चाटून गेला.... बारमध्ये काही नेहमीची गिर्हाईके असायची , तर काही शनिवार - रविवार सुट्टीचा दिवस गाठून आलेली.... आजही तो तीन-चार टेबले एकाच वेळी सांभाळत होता... एक होतं ते नेहमीचं गिर्हाईक -  दोन रिटायर्ड झालेले गृहस्थ ... ! ते नेहमी येऊन बसायचे ... आपल्या व्यतीत केलेल्या आयुष्याबाबत बोलत बसायचे  ...,  आज  शनिवारची रात्र  असल्याने  तशी गर्दी होतीच ....! तीन चार लोकांचा एक ग्रुप होता , त्यांच्या कपड्यांवरून  आणि  वागणुकीवरून ते बरेच श्रीमंत असावेत असा मंग्याने  अंदाज केला . त्याचवेळी एक  पाच जणांचा तरुणांचा घोळका आत शिरला... त्यांना बसायला जागा करून देऊन मंग्या त्या श्रीमंत  लोकांच्या टेबलपाशी गेला... त्यांनी विस्की मध्ये काय आहे ते विचारलं...." विस्की मध्ये सिग्नेचर  ,मक्डोवेल ,ब्लेंडर्स प्राईड , रॉयल स्टाग , इम्पिरियल ब्लू   आहे सर..."   मंग्याने त्याला पाठ असलेली सगळी नावं सांगितली... त्यांनी ब्लेंडर्स प्राईड , सोडा , मसाला पापड आणि चिकन -65 ची ऑर्डर दिली . मंग्या ती ऑर्डर आणायला  जाणार तेवढ्यात त्या रिटायर्ड गृहस्थांच्या टेबल हून हाक आली ... त्यांनी आपली नेहमीचीच ऑर्डर दिली.... एक चपटी , दोन ग्लास  आणि रोस्टेड पापड.....!   खरं तर त्यांनी ती ऑर्डर दिली नसती तरी मंग्याने सवयीप्रमाणे तसं सगळं आणलंच असतं.....  ते सगळं आणून त्यांच्या टेबलवर ठेवत असताना त्या दोघा गृहस्थाचं बोलणं त्याच्या कानावर आलं  ...
-- " घरात सगळे असले कि कसं बरं असतं नै.... नाईतर सगळं घर खायला उठतं..."
-- " आमच्या घरात तर नुसता तमाशा असतो , तीन  मुलं ,  त्यांच्या बायका...  नातवंड ... इतका गोंधळ कि मला घरात बसवतच नाही..."
--" नशीबवान आहात राव ... भरल्या गोकुळात राहता की ...!!! आमच्याकडे बोलायला माणूस नाही... मुलगा यु. एस. ला असतो .... घरात फक्त ही आणि मी.... दिवसभर बोलून बोलून काय बोलणार...?? वैताग येतो .." 
--" अहो , बरं आहे कि मग.... घरात शांतता पाहिजेच... डोकं बधीर होतं नाहीतर...." 
मंग्याने विचार केला , ह्या दोन्ही माणसांची परिस्थिती वेगवेगळी होती , त्यांना प्रत्येकाला दुसऱ्याची परिस्थिती चांगली वाटत होती... हे म्हणजे प्रत्येकाला  दुसऱ्याचा  ग्लास आपल्या ग्लास पेक्षा  जास्त भरलेला असल्यासारखा वाटतो तसं झालं ..... गंमतच आहे ....!   इतक्यात त्याला मघाशी आलेल्या तरुणांच्या टेबल हून  हाक आली... तो तिथे गेला ... त्यातल्या एकाने विचारलं , काय काय आहे म्हणून... मंग्याने पुन्हा पाठ असलेली यादी त्यांना ऐकवली...त्या तरुणांचं काय घ्यायचं ते नक्की ठरत नव्हतं ... त्यात एकाने पिणार नसल्याचं जाहीर केलं....का तर शनिवार आहे म्हणून....! मग सगळ्यांनी त्याला "  ए  भाव खातो का ? , आमच्याबरोबर बसायचं नाही का..?? , पी नाईतर मार खाशील ..." वगैरे वगैरे सुनवलं.... मंग्या कुतूहलाने ते सगळं पहात होता.....खरच , जगात मित्र नसते तर माणसाचं काय झालं असतं कुणास ठाऊक.....? आयुष्यरुपी  रोस्टेड पापडाला मसाला पापड करण्याची किमया असते ती फक्त  मित्रांमधेच  ....!
 शेवटी ' तुला काय ..? तुला काय...?? ' अशी बरीच विचारा विचारी झाल्यानंतर त्यांनी ३  बडवायझर ,  लार्ज स्मर्नोफ , चणाडाळ, १ पेप्सी , चिकन लॉलीपॉप , व्हेज क्रिस्पी  अशी भली मोठी ऑर्डर दिली.... त्यांची ऑर्डर आणून देतो न देतो , तोच त्या तीन श्रीमंत वाटणाऱ्या लोकांच्या टेबल वरून हाक आली... त्यांना  आईस क्यूब , आणि सोडा आणून देत असताना  त्याने ऐकलं...
-- " मेहता साब तो आजकाल मिलते हि नही....."
--" कूच नही साब , अपना वो बदलापूरवाला साईट चालू है इसी लिये थोडा बिझी  हु... ! आपका होटल कैसा चल राहा है...??
-- " आजकल होटल लाईन में बी कूच नही राहा ... मै एक  प्लॉट देख राहा हु .... अग्रीकल्चर  है....एन . ए . हो सकता है क्या ...??
-- " हा ... हो तो सकता  है........एक बात बोलता हुं वो  सुनो.............."
तो समोरचा कसली ' बात '   सांगणार हे मंग्याला ऐकायचं होतं... पण इतक्यात...,
-- " अरे मित्रा.... जरा इकडे ये...." मंग्यासाठी मारलेली हि हाक त्या तरुणांच्या टेबल वरून आली होती.... हि त्या लोकांना थोडीशी ' चढल्याची ' खुण होती.... लोकांना चढली कि ते  बॉस , मित्रा , भावा , असल्या नावांनी हाक मारतात  , तर काही जणांना चढल्यानंतर ते जास्तच शहाणपणा करायला लागतात ... ते इतरांना तुच्छ समजतात  , असली माणसं मंग्याला बिलकुल आवडत नसत.... मग तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करी , आणि त्यांनी दिलेल्या ऑर्डर्स मुद्दाम उशिरा आणी.... हे मंग्याला नेहमीचंच होतं. तो तिकडे गेला . " मित्रा , आपल्याला आणखी २ बियर , आणि चणाडाळ घेऊन ये..... " मंग्या  बियर सर्व्ह  करत असताना ....
--" काय बोलतोयस सुन्या ....?? काय म्हणाली ती....??
--" आधी काही बोलली नाही ... पण आज परत भेटल्यावर ' हो ' म्हणाली...." तो सुन्या कि कोण होता त्याने हे सांगितल्यावर एकच गलका केला त्या पोरांनी... !  सगळ्यांनी चियर्स करायला  एकदम आपापले ग्लास उंचावले....मंग्या मजेने ते सर्व पाहत होता... त्याला सुरेखाची आठवण झाली.... आता कुठे असेल ती....?? काय करत असेल....?? आपल्याला तर ती विसरूनच गेली असेल आत्तापर्यंत....!!
-- " ए वेटर ..."  त्याला कोपऱ्यातल्या एका टेबलवरून  हाक आली . एक ३०-३५ वयाचा माणूस नुकताच बार मध्ये आला होता..... आणि त्याला बोलावत होता.....त्याने फक्त विस्कीच्या लार्ज पेग ची ऑर्डर दिली... मंग्या तो घेऊन येत असताना त्याने पाहिलं कि तो माणूस फोनवर कुणाशीतरी बोलत होता....
-- " हे बघ, आम्ही फक्त एकत्र काम करतो.....तुला वाटतं तसं काही नाही...तुझा काहीतरी गैरसमज झालाय.....मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नाही...." पलीकडून  कोण बोलत असावं ह्याचा मंग्याला थोडा अंदाज आला....
-- " अगं पण..... प्लीज ऐक..., घरी ये...... हेलो ....हेलो.... हेलो ....." पलीकडून फोन कट केला असावा.....त्या माणसाने रागाने फोन टेबलावर आपटला.... आणि समोरचा पेग एकाच दमात पिऊन टाकला.... नक्कीच काहीतरी  भानगड असणार..... त्या माणसाने आणखी एक लार्ज पेग मागवला....मंग्या विचार करू लागला ,.... की बार हि जगात  अशी एकच जागा आहे की इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळे मूड्स घेऊन येतात.... कुणी पोरगी पटली म्हणून आनंद साजरा करण्यास  ...., तर कुणी घरात वेळ जात नाही म्हणून.... , कुणी बिझनेस संदर्भातल्या गोष्टी करण्यास ...., तर कुणी बायको  सोडून  गेली  त्याचं  दुखः विसरण्यास...., सगळ्यांना एकच ठिकाण आठवतं ते म्हणजे बार...!    आता बराच वेळ झाला होता.... बाराला दहा मिनिटे बाकी होती .... जवळपास सगळ्या टेबलांच  उरकत आलं होतं.....आता कोण किती टीप देतं ह्याकडे मंग्याचं  लक्ष लागलं ....  तो हा विचार करत असताना त्या रिटायर्ड गृहस्थांनी बिल मागवलं....इथे काहीही टीप मिळणार नाही हे त्याला माहित होतं....त्याने बिल  आणून दिलं , आणि त्या तरुणांच्या टेबल पाशी उभा राहिला..... त्यातल्या दोन -तीन जणांना खरोखरच चढलेली होती.... त्यांचा गोंधळ चालू होता....एक जण तर आणखी प्यायची आहे असं  म्हणत होता... पण त्यांच्यातल्या त्या न पिणाऱ्या मित्राने सगळ्यांना सावरायचं काम केलं... सगळ्यांनाच चढल्यावर न पिणारे किंवा कमी पिणाऱ्या लोकांवर नेहमीच  हि अवघड जबाबदारी येत असते हे मंग्याने अनेकदा पाहिलं होतं..... बाकीचे काहीही बरळत होते...
-- ' आपल्याला काय जास्त चढलेली नाय....'
-- ' आपण अजून २ कोटर मारू शकतो....'
-- ' ए बिल मी देणार....मित्रा त्याच्याकडून घेऊ नको रे ...'  हे मंग्याला उद्देशून होतं.....मंग्याला एकाच वेळी ३-४ जणांनी पैसे देऊ केले ..... आता कोणाचे पैसे बिल म्हणून घ्यावे ह्याचा त्याला प्रश्न पडला....त्यातल्या त्यात ज्याने जास्त आग्रह केला त्याच्याकडून त्याने बिलाचे पैसे घेतले.....त्यांनी टीपही चांगली दिली... मंग्या खुश झाला.... त्यामानाने त्या श्रीमंत वाटणाऱ्या लोकांनी अगदीच किरकोळ टीप  बडीशोपच्या वाटीत ठेवली.... ' लोग बडे  है ,  लेकीन  दिल बडा नही .... ' ह्याचा त्याला प्रत्यय आला .... आता एकच शेवटचं टेबल राहिलं... त्या माणसाने बरीच दारू प्यायली होती.... मंग्याला त्याची काळजी वाटू लागली.... आता जवळजवळ बार बंद व्हायची वेळ आली होती ... मंग्याने  त्या माणसाला  हळुवारपणे त्याबाबत जाऊन सांगितलं....त्याने कसेबसे मागच्या खिशातून पाकीट काढलं.... पाकिटात त्याच्या बायकोचा फोटो होता.... तो बराच  वेळ फोटो पाहत राहिला.... खरंच त्याचं त्याच्या बायकोवर  खूप प्रेम असावं असं मंग्याला वाटलं....' साहेब , त्या नक्की परत येतील ,तुम्ही काळजी करू नका...' असं मंग्याला  त्याला सांगावंसं वाटलं... पण तो शांतच राहिला... त्या माणसाने  बिलाचे पैसे काढले.....टीप देण्यासाठी आणखी पैसे तो काढू लागला...' राहू द्या साहेब... टीप नको ' मंग्या त्या माणसाला बोलला .... त्याने डोळे किलकिले करत काहीशा आश्चर्याने मंग्याकडे पाहिलं ...... तरी त्याने टीप ठेवली आणि निघून गेला...  स्वतः  दुःखी असतानाही त्या माणसाने आपला विचार केला ह्याबद्दल मंग्याला आश्चर्य वाटले... त्याने कृतज्ञतेने त्या जाणाऱ्या माणसाकडे पाहिलं,  ते पैसे खिशात टाकले , आणि तो ते शेवटचं टेबल साफ करू लागला..... 


रविवार, १५ जानेवारी, २०१२

लोकल डायरी - ३


                   मुंबईकरांइतका प्रवासातला  समजूतदारपणा जगात इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळणार नाही.... दररोज सकाळी जे लोकलचा प्रवास करतात,  त्यांच्यात एक प्रकारची शिस्त असते, वळण असतं  ... काही अलिखित नियम सगळेच पाळतात..... जसे डब्यात आल्यानंतर हाय - हेलो , नमस्कार - चमत्कार होतात ..... लोक  रांगेत चढतात नि  उतरतात ,..... मुंब्र्याची खाडी पास होताना आपोआप  पाया पडले जाते  ..... पारसिकच्या बोगद्यात  जय भवानी - जय अंबेचा जयघोष होतो  ...... ठाणे आलं कि बसलेले उठतात आणि  उभे असणाऱ्यांना  बसायला जागा मिळते  ..... मुलुंड आलं कि ' गणपती बाप्पा मोरया' , ' उंदीरमामा कि जय ' चा जयघोष होतो .....एखादी लेडीज असेल तर तिला स्त्री दाक्षिण्य  दाखवलं  जातं  .....  स्वतः विकत घेतलेला पेपर अनेकांच्या हातातून फिरून काहीश्या चुरगळलेल्या अवस्थेत परत येतो .... लांबूनच कुणीतरी दिलेली bag   पास  होत होत वर rack  वर पोहोचवली  जाते ..... आणि  तशीच उतरताना  त्या त्या माणसाकडे परत येते  .... एकंदर खूप मजेचं  आणि खेळीमेळीचं  वातावरण प्रत्येक डब्यात असतं.....  पण दर वेळी असंच घडेल असं मात्र  नाही ....

                                        

                  आज भडकमकरांनी आपला जमदग्नी अवतार दाखवलाच.... त्याचं झालं असं कि ,प्रत्येक ग्रुपच्या बसण्याच्या जागा ठरलेल्या असतात .  नेहमीच्या बसण्याच्या जागेवर शक्यतो दुसरा कुणी बसत नाही.... अंबरनाथ गाडीत तर बरेच जण उल्हासनगरहून  ' डाऊन ' करून येतात , पण त्यांच्याही जागा ठरलेल्या .... तसे बऱ्याच ग्रुप मध्ये उल्हासनगरचे लोक असतात ते आधीच सगळ्यांच्या  जागा पकडून येतात ....आमच्या ग्रुप मध्येही एक जण होता - जीग्नेस .... पण त्याचं हल्लीच लग्न झाल्याने महाशय  सकाळी उशिरा उठू लागले  आणि त्यामुळे  जागा पकडण्याच काम आमच्यावर आलं... तरी शरद -भरत ह्या दोघांपैकी कोणी न कोणी गाडी प्लाटफॉर्म मध्ये येतानाच पुढे जाऊन  जागा पकडायचे .... पण गेले ३-४ दिवस उल्हासनगरचा एक ग्रुप ' डाऊन'  करून आमच्याच जागेवर बसायला लागला ... बर , बसले तर बसले , सी . एस. टी. पर्यंत बसूनच जायचे ...  ठाण्याला उठायची काही भानगड नाही...! आम्ही आपले उभेच ...! आमचं  जाऊ दे पण नायर अंकल एवढे वयस्कर .... त्यांनाही बसायला जागा नाही ...!
-- " आज  साला काय ते करूनच टाकतो...." म्हणत भडकमकर डब्यात शिरले... उल्हासनगरच्या त्या ग्रुप ने नेहमीप्रमाणे आजही आमच्या जागेवर अतिक्रमण केलेलंच होतं .... भडकमकर शांतपणे मध्ये जाऊन उभे राहिले ...त्यांच्या नेहमीच्या विंडो वर जो बसला होता त्याला  उठायला सांगितलं तर  त्याला  एकदम आश्चर्य वगैरे वाटून तो त्यांच्याशी  वाद घालायला लागला ... मी,  शरद -भरत , सावंत त्यांच्या मागेच होतो.... भडकमकरांनी आमच्याकडे एकदा बघून ' सुधारणार नाहीत ' अशा अर्थाची मान डोलावली .... आता पुढे काय होणार हे तो ग्रुप सोडून  डब्यातल्या  बाकी सगळ्यांना कळून चुकलं होतं ....   भडकमकरांनी  डाव्या  हाताच्या     शर्टाची  बाही  जरा  वर केली .... थोडे मागे सरले .....  आणि  एकच   ठा sss प   असा आवाज झाला .... त्या विंडोत बसलेल्याच्या श्रीमुखात भडकमकरांची एक डाव्या हाताची जोरदार बसली ....शरद - भरतही    दोन- तीन जणांवर  तुटून पडले .... मी पण एकाच्या वाजवली.... फटाफट  फटाके वाजल्यासारखे आवाज यायला लागले...
-- " साले झंडू लोग .... आज सुधरेंगे ., कल सुधरेंगे बोलके  रुका था..... इधर हम क्या  झक मारता है क्या ...?? "  म्हणत भडकमकरांनी आणखी दोन लगावल्या.... तो ग्रुप तसा पेद्रू लोकांचा होता...आणि दरवाज्यावरच्या रवीच्या ग्रुप ने आवाज दिल्यावर तर त्यांनी कसल्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही.... शेवटी नायर अंकल आणि सावंत मध्ये पडले .... त्यांनी भडकमकरांना शांत केलं ....
-- " भडकू भडक गया... भडकू भडक गया....."
-- " असंच पाहिजे त्यांना .... फुल सी.एस.टी.पर्यंत बसून जायचे साले ...."
-- " क्या लोग मारामारी करते है फालतू में... देड - दो घंटे का तो सफर है ....."
--  " आय  थिंक  वुई शुड कॉल पुलिस ओवर हिअर .... "
--  " रोज बैठते है तो जगा क्या उनका नाम पे  हुआ क्या ...?? "
--  " भडकमकरांनी बरयाच दिवसांनी रुद्रावतार दाखवला....."
-- " बिचारयांनी फुकट  मार खाल्ला... "
-- " मजा आ गया ... रोज ऐसा मारामारी होना मंगता....."    अशा चित्र विचित्र प्रतिक्रिया डब्यातल्या लोकांमध्ये उमटल्या ....पण आम्हाला त्याची कसलीच फिकीर नव्हती .... त्या पेद्रू  लोकांना हुसकावून लावल्यानंतर भडकमकरांनी मग आपलं आसन ग्रहण केलं..... बाजूचा  लेडीज  कंपार्टमेंट - नेबरिंग कंट्रीही
 आमच्याकडे  काहीश्या आश्चर्यानेच पाहत होती.... त्यामुळे आमच्यातल्या शरद - भरत जोडीला तर आणखीनच जोश  आला .... आपण कुणीतरी मोठे भाई आहोत असे ते सगळ्यांना भासवू लागले.... इकडे भडकमकरही आता शांत झाले ....
-- " भडकमकर., पलीकडच्या २-३ तरी गटणार आता तुम्हाला..." म्हणत शरद - भरत यांनी वातावरणात थोडी गंमत आणली.... मी सहज पलीकडे बघितलं ,  तो  antivirus वाला सुंदर चेहरा कुठे दिसतो का ते बघू लागलो ... अचानक मला ती दिसली .....माझी आणि तिची नजरानजर झाली ..... ' काळजाचा ठोका चुकणे ' हा वाक्प्रचार शाळेत असताना वाचला होता , आज मात्र  प्रत्यक्षात अनुभवला....

रविवार, ४ डिसेंबर, २०११

लोकल डायरी - २


दिनांक - २ डिसेंबर 

              आज एक विचित्र गोष्ट घडली....  आज भडकमकर आले नाहीत....  त्यामुळे त्यांची जागा सावंतांनी पटकावली.... विंडो ...! मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो... समोर नेबरिंग कंट्री ... मग काय टाईमपासच.....!  कधी नव्हे ते सावंतपण निरीक्षणात दंग असलेले दिसले.... नायर अंकल  पेपर वाचत बसले होते  .... थोड्या वेळाने  गाडीत एक मध्यम वयाच्या बाई चढल्या , आमच्या बाजूला त्यांनी एक कटाक्ष टाकला ..... आणि एक मंद स्मित केल्याचे मला जाणवले.... त्यांनी  कुणाकडे बघून स्माईल केलं असावं म्हणून मी सहज इकडे तिकडे पाहिलं ... तर सावंत पलीकडे त्या बाईंकडे बघून समजुतीने हसलेले मला दिसले .... हि काय भानगड...??? शरद- भरत , मी , जिग्नेश , मूड मध्ये असले तर भडकमकर आणि नायर अंकल सगळेच नेबरिंग कंट्री बाबत काही न काही नेहमीच बोलत असतो... पण सावंत त्या बाबतीत काहीच बोलत नसत .... त्यांची नेहमीची बसायची जागाही लेडीज कम्पार्टमेंटला पाठ करून असायची .... पण आज सगळंच उलट घडत होतं... थोडा वेळ गेल्यानंतर मी सहज त्यांना हळू आवाजात त्या मघाच्या  बाईंबद्दल  विचारलं ... तर ते माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले ... ' ह्याला कसं कळलं....' असे भाव त्यांच्या  चेहऱ्यावर दाटले होते बहुतेक.... नंतर ते नुसते हसले पण उत्तर देण्याचं मात्र  टाळलं .... मला म्हणाले , ' नंतर सांगीन...ह्या सगळ्या प्रजेच्या समोर नको...' आणि बाहेर बघायला लागले... नक्कीच काहीतरी खास असणार...
             जीग्नेस ने त्याच्या हनिमूनचे फोटो मोबाईल मध्ये आणले  होते ....  शरद-भरत ते बघत बसले .... मधेच कसल्याही कमेंट करत होते..., -' अरे ये फोटो में सो गया क्या तू..?? '
- ' ये किधर देख राहा है  बे .....?? ' प्रत्येक फोटो मध्ये काहीतरी शोधून त्याला पकवत बसले होते...
-' अरे वो फोटू निकलनेवाला  था  ने  वो रेडी बोलनेसे पेहेलेही क्लिक कर देता था...साला ' तोही न कंटाळता त्यांना उत्तरं देत होता... नायर अंकलही  त्यांच्यात सामील झाले .... जीग्नेसने बायको बरोबर एका छोट्याश्या होडीच्या टोकाशी उभं राहून  टायटानिक स्टाईलची आडवे  हात पसरून  दिलेली पोज  बघून तर सगळेच हसायला लागले.... नायर अंकल  शरद- भरतला म्हणाले कि , ' ज्यादा हंसो मत, तुम्हारा भी टाईम आयेगा....'   जीग्नेस खुशीत होता ... आणि थोडा लाजल्यासारखाही करत होता ....
              मी मधेच सहज सावंतांकडे पाहिलं तर ते मधून मधून पलीकडे  पाहत  होते  ... नेहमी स्थितप्रज्ञासारखे वाटणारे  त्यांचे डोळे मात्र आज मला शाळेतल्या मुलाच्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांसारखे भासले ... कोण असाव्यात त्या बाई ...??  त्या सावंतांच्या वयाच्या वाटत होत्या ....जवळपास ४५- ५० च्या ....  आणि  ज्याप्रमाणे त्या दोघांनी एकमेकांकडे समजुतीने बघितलं  त्यावरून तर त्यांची एकमेकांची जुनी ओळख असली  पाहिजे... असा विचार कम शंका मनाला चाटून गेली.... कुर्ल्याला शरद- भरत उतरले , दादरला नायर अंकल.... मग मी सावंतांचा ताबा घेतला... खूप सांगा - सांगा म्हणल्यानंतर ते एकदाचे तयार झाले .... त्यांनी सांगायला सुरुवात केली...' ती बाई आहे ना,  ती आणि मी शाळेपासून एकत्र होतो .... मला ती शाळेत असल्यापासून आवडायची ...'
-' काय सांगताय काय सावंत ...?? ' मला खरोखरच आश्चर्य वाटत होतं .....
- ' हो.... पण नंतर शाळा संपली.... आमच्या दोघांच्या वाटाही  वेगळ्या झाल्या .... ती हुशार होती त्यामुळे तिला चांगल्या कॉलेजला admission मिळाली . मला मात्र मुंबई सोडावी लागली.... त्यानंतर माझा आणि तिचा संपर्क असा जास्त काही राहिला नाही.... पण तरीही ती मला आवडत होती.... मी सुट्टीत कधी घरी आलो कि ती कधीतरी दिसायची...  शेवटी मी ठरवलं , कि तिला प्रपोज मारूनच  टाकू.....' सावंत रंगात आले होते .
- ' आयला .... मग...?? '
- ' मग काय , एके दिवशी मी सुट्टीवर घरी आलेलो असताना मला ती दिसली... मी तिच्या मागोमाग गेलो.... आणि तिला प्रपोज केलं.... '
- ' काय म्हणालात तुम्ही तिला.... ओह सॉरी त्यांना...?? ' मला तर गुदगुल्या झाल्यासारख्या वाटत होत्या .
- ' काही नाही,  सरळ म्हणालो... मला तू खूप आवडतेस...  झालं....' सावंत सहजच म्हणाले.
- ' मग.. काय म्हणाल्या त्या  ?? ' त्या बाईचं उत्तर ऐकण्यासाठी इथे माझे कान आतुर झाले होते...
- ' ती म्हणाली , बाप रे..! हो का ... पण माझी सेमिस्टर एक्झाम  आहे .... म्हणाली आणि निघून गेली '  सावंत गमतीदार चेहरा करून म्हणाले...
- ' काय...?? त्या असं म्हणाल्या ...?? ' मला तर काय बोलावं तेच कळत नव्हतं...
- ' हो... मग मी पण कोलेजला निघून गेलो... आणि नंतर पुन्हा काही तिला विचारलं नाही....'
- ' अरे देवा.... पण का नाही विचारलं परत...?? ' मला कळेना ते असं का वागले...
- ' काय सांगावं , परत  तिची कोणती तरी  परीक्षा यायची मध्ये ... नंतर कळलं कि तिचं लग्न पण झालं ... मग तर  प्रश्नच मिटला...'  सावंत गमतीने  हसत म्हणाले....पण मला कसतरीच वाटलं.... खूप कमी लोक असतात ज्यांना त्यांचं पाहिलं प्रेम मिळतं....आणि ते शेवटपर्यंत टिकतं ... तसा माणूस वारंवार प्रेमात पडतच असतो , पण त्याला पहिल्या प्रेमाची सर नसते.....ग्रीष्मानंतर जसा पहिला पाउस तसं पाहिलं प्रेम .... बेभान बरसणारं .... भावनांचा वर्षाव करणारं....रखरखीत आयुष्यात चैतन्याची पालवी फुलवणारं ....आणि मनाला नवी उभारी देणारं.....    इतकी वर्ष सरूनही सावंतांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही त्या समोरच्या बाईंबद्दल कुठेतरी जागा होती , हे त्यांच्या डोळ्यांवरूनच कळत होतं.....    बोलता बोलता माझा stop  - भायखळा कधी गेलं मला कळलंच नाही ... बाहेर बघितलं तर सी .एस. टी. स्टेशनात गाडी शिरत होती....