मुंबईकरांइतका प्रवासातला समजूतदारपणा जगात इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळणार नाही.... दररोज सकाळी जे लोकलचा प्रवास करतात, त्यांच्यात एक प्रकारची शिस्त असते, वळण असतं ... काही अलिखित नियम सगळेच पाळतात..... जसे डब्यात आल्यानंतर हाय - हेलो , नमस्कार - चमत्कार होतात ..... लोक रांगेत चढतात नि उतरतात ,..... मुंब्र्याची खाडी पास होताना आपोआप पाया पडले जाते ..... पारसिकच्या बोगद्यात जय भवानी - जय अंबेचा जयघोष होतो ...... ठाणे आलं कि बसलेले उठतात आणि उभे असणाऱ्यांना बसायला जागा मिळते ..... मुलुंड आलं कि ' गणपती बाप्पा मोरया' , ' उंदीरमामा कि जय ' चा जयघोष होतो .....एखादी लेडीज असेल तर तिला स्त्री दाक्षिण्य दाखवलं जातं ..... स्वतः विकत घेतलेला पेपर अनेकांच्या हातातून फिरून काहीश्या चुरगळलेल्या अवस्थेत परत येतो .... लांबूनच कुणीतरी दिलेली bag पास होत होत वर rack वर पोहोचवली जाते ..... आणि तशीच उतरताना त्या त्या माणसाकडे परत येते .... एकंदर खूप मजेचं आणि खेळीमेळीचं वातावरण प्रत्येक डब्यात असतं..... पण दर वेळी असंच घडेल असं मात्र नाही ....
आज भडकमकरांनी आपला जमदग्नी अवतार दाखवलाच.... त्याचं झालं असं कि ,प्रत्येक ग्रुपच्या बसण्याच्या जागा ठरलेल्या असतात . नेहमीच्या बसण्याच्या जागेवर शक्यतो दुसरा कुणी बसत नाही.... अंबरनाथ गाडीत तर बरेच जण उल्हासनगरहून ' डाऊन ' करून येतात , पण त्यांच्याही जागा ठरलेल्या .... तसे बऱ्याच ग्रुप मध्ये उल्हासनगरचे लोक असतात ते आधीच सगळ्यांच्या जागा पकडून येतात ....आमच्या ग्रुप मध्येही एक जण होता - जीग्नेस .... पण त्याचं हल्लीच लग्न झाल्याने महाशय सकाळी उशिरा उठू लागले आणि त्यामुळे जागा पकडण्याच काम आमच्यावर आलं... तरी शरद -भरत ह्या दोघांपैकी कोणी न कोणी गाडी प्लाटफॉर्म मध्ये येतानाच पुढे जाऊन जागा पकडायचे .... पण गेले ३-४ दिवस उल्हासनगरचा एक ग्रुप ' डाऊन' करून आमच्याच जागेवर बसायला लागला ... बर , बसले तर बसले , सी . एस. टी. पर्यंत बसूनच जायचे ... ठाण्याला उठायची काही भानगड नाही...! आम्ही आपले उभेच ...! आमचं जाऊ दे पण नायर अंकल एवढे वयस्कर .... त्यांनाही बसायला जागा नाही ...!
-- " आज साला काय ते करूनच टाकतो...." म्हणत भडकमकर डब्यात शिरले... उल्हासनगरच्या त्या ग्रुप ने नेहमीप्रमाणे आजही आमच्या जागेवर अतिक्रमण केलेलंच होतं .... भडकमकर शांतपणे मध्ये जाऊन उभे राहिले ...त्यांच्या नेहमीच्या विंडो वर जो बसला होता त्याला उठायला सांगितलं तर त्याला एकदम आश्चर्य वगैरे वाटून तो त्यांच्याशी वाद घालायला लागला ... मी, शरद -भरत , सावंत त्यांच्या मागेच होतो.... भडकमकरांनी आमच्याकडे एकदा बघून ' सुधारणार नाहीत ' अशा अर्थाची मान डोलावली .... आता पुढे काय होणार हे तो ग्रुप सोडून डब्यातल्या बाकी सगळ्यांना कळून चुकलं होतं .... भडकमकरांनी डाव्या हाताच्या शर्टाची बाही जरा वर केली .... थोडे मागे सरले ..... आणि एकच ठा sss प असा आवाज झाला .... त्या विंडोत बसलेल्याच्या श्रीमुखात भडकमकरांची एक डाव्या हाताची जोरदार बसली ....शरद - भरतही दोन- तीन जणांवर तुटून पडले .... मी पण एकाच्या वाजवली.... फटाफट फटाके वाजल्यासारखे आवाज यायला लागले...
-- " साले झंडू लोग .... आज सुधरेंगे ., कल सुधरेंगे बोलके रुका था..... इधर हम क्या झक मारता है क्या ...?? " म्हणत भडकमकरांनी आणखी दोन लगावल्या.... तो ग्रुप तसा पेद्रू लोकांचा होता...आणि दरवाज्यावरच्या रवीच्या ग्रुप ने आवाज दिल्यावर तर त्यांनी कसल्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही.... शेवटी नायर अंकल आणि सावंत मध्ये पडले .... त्यांनी भडकमकरांना शांत केलं ....
-- " भडकू भडक गया... भडकू भडक गया....."
-- " असंच पाहिजे त्यांना .... फुल सी.एस.टी.पर्यंत बसून जायचे साले ...."
-- " क्या लोग मारामारी करते है फालतू में... देड - दो घंटे का तो सफर है ....."
-- " आय थिंक वुई शुड कॉल पुलिस ओवर हिअर .... "
-- " रोज बैठते है तो जगा क्या उनका नाम पे हुआ क्या ...?? "
-- " भडकमकरांनी बरयाच दिवसांनी रुद्रावतार दाखवला....."
-- " बिचारयांनी फुकट मार खाल्ला... "
-- " मजा आ गया ... रोज ऐसा मारामारी होना मंगता....." अशा चित्र विचित्र प्रतिक्रिया डब्यातल्या लोकांमध्ये उमटल्या ....पण आम्हाला त्याची कसलीच फिकीर नव्हती .... त्या पेद्रू लोकांना हुसकावून लावल्यानंतर भडकमकरांनी मग आपलं आसन ग्रहण केलं..... बाजूचा लेडीज कंपार्टमेंट - नेबरिंग कंट्रीही
आमच्याकडे काहीश्या आश्चर्यानेच पाहत होती.... त्यामुळे आमच्यातल्या शरद - भरत जोडीला तर आणखीनच जोश आला .... आपण कुणीतरी मोठे भाई आहोत असे ते सगळ्यांना भासवू लागले.... इकडे भडकमकरही आता शांत झाले ....
-- " भडकमकर., पलीकडच्या २-३ तरी गटणार आता तुम्हाला..." म्हणत शरद - भरत यांनी वातावरणात थोडी गंमत आणली.... मी सहज पलीकडे बघितलं , तो antivirus वाला सुंदर चेहरा कुठे दिसतो का ते बघू लागलो ... अचानक मला ती दिसली .....माझी आणि तिची नजरानजर झाली ..... ' काळजाचा ठोका चुकणे ' हा वाक्प्रचार शाळेत असताना वाचला होता , आज मात्र प्रत्यक्षात अनुभवला....
Hmmmmmmmm.
उत्तर द्याहटवाआवडलं
उत्तर द्याहटवा