बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

सीज़न २ - लोकल डायरी ३

सीज़न २ - लोकल डायरी ३ 

" message kashala kelas ... ata lagali waat ! "

तिचा मेसेज वाचला आणि मला काही सुचनासं झालं . वाट लागली म्हणजे नक्की काय झालं हे कळायला मार्ग नव्हता .तिला फोन करावा का ? नको , कदाचित तिच्या अडचणीत आणखी वाढ व्हायची , आणि मेसेज सुद्धा पाठवू शकत नव्हतो , आता ती जेव्हा उद्या सकाळी भेटेल तेव्हाच काय तो उलघडा होईल . असा विचार करून मी शांत राहायचं ठरवलं . पण संबंध दिवस माझं ऑफिसमध्ये लक्ष लागलं नाही, आणि रात्री सुद्धा झोप आली नाही . नक्की काय झालं असेल ? ह्या विचाराने मी अस्वस्थ होतो . कधी एकदा सकाळ होतेय असं मला झालं . मी पटपट आवरून लवकरच प्लॅटफॉर्मवर पोहोचलो . आता माझे डोळे प्लॅटफॉर्मच्या गेटवर लागून राहिले . आमच्या ग्रुपचे सर्वजण आले तरी अवंती आली नाही . गाडीसुद्धा प्लॅटफॉर्मवर लागली. आम्ही आमच्या जागेवर बसलो आणि तेवढ्यात ती मला ट्रेनमध्ये चढताना दिसली . तिच्या नेहमीच्या जागेवर उभे राहिल्यानंतर तिने माझ्याकडे पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. नक्कीच काहीतरी मोठी भानगड झाली असावी .

kaay zala ? मी व्हॉट्सअप्पवर विचारलं .

kaahi naahi .... तिचा रिप्लाय आला . जेव्हा मुली काही नाही असं म्हणतात तेव्हा खूप काहीतरी भयंकर असतं .

utarlyavar bhetuya ka nehmichya restaurant madhe ?

ok . तिच्या तुटक रिप्लाय वरून तर मला आता टेन्शनच यायला लागलं .

" तुझं काय मध्या ? तू काय घेणार ? " अचानक शरद ने मला विचारलं .

" अं ? काय म्हणतोयस ? " माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं . आमच्या ग्रुपमध्ये शरदच्या पार्टीचं डिस्कशन चालू होतं .

" अरे , तू काय घेणार ? " असं म्हणून त्याने दारूची खूण केली .

" आपली नेहमीचीच बिअर " मी म्हणालो .

" बरं , म्हणजे भरत , मधू आणि जिग्नेस बिअरवाले आणि बाकीचे रम ओक्के …? "

" शरदभाय , मैं नहीं पीएगा । खाली खाना खानेको आता हूँ । " जिग्नेस म्हणाला .

" ए , तू चूप बैठ । चूप चाप पिना पडेगा । ऐसा सुक्का सुक्का पार्टी मैं नहीं देता ।" शरद असं म्हटल्यावर तर तो काहीच म्हणाला नाही .

मधेच नायर अंकल म्हणाले , " मै बारा बजे के बाद पीएगा । मेरा शनिवार है । "

" अरे अंकल , छोडो ना शनिवार बिनिवार , एक दिन से कुछ फरक नहीं पडेगा । " शरद म्हणाला . पण ते काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते . मग त्यांना जास्त समजवण्याचा भानगडीत कोणीही पडले नाही . असंही संपूर्ण रात्रभर पार्टी चालणार होती . नायर अंकल रात्रीच्या बारानंतर घेणार असले तरी काही फरक पडणार नव्हता . सगळं ठरलं . आता आपापल्या स्टेशनवर जो तो उतरून जाऊ लागला . भायखळा आलं आणि मी उतरलो ते थेट इराण्याच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो . अवंती मागून येतंच होती . आम्ही आत जाऊन बसलो.

" काय झालं ? काय प्रॉब्लेम झाला ? " मी बसता बसता विचारलं . त्यावर तिने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली .

" मेसेज उगाचच पाठवलास " ती म्हणाली .

" कोणी बघितला का मेसेज ? काय झालं नीट सांग तरी " मी म्हणालो . तेवढ्यात वेटर न सांगता बन मस्का आणि चहा घेऊन आला .

" पैर जल गया मेरा , तुम दोनो की बजे से " चहाचे कप टेबलवर ठेवता ठेवता तो वेटर म्हणाला .

" क्यूँ भाई ? क्या हुआ ? हमने क्या किया ? " आधीच मला हिचं काय झालं ते नीट कळेना त्यात हा वेटर येऊन त्याची कर्मकहाणी सांगू लागला .

" अरे, उस दिन तुम्हारा लव सीन चल राहा था , वो देखने के चक्कर में मेरे से टाकरा गया , गरम चाय पैर पे गिरा डाला । " असं म्हणून त्याच्या सोबतचा वेटर त्याच्यावर हसू लागला .

" लव सिन... क्या लव सिन बे ? ठिकसे बोल " माझा पारा चढायला लागला .

" अरे , जाऊ दे ना . ओह , सॉरी भैया .... ज्यादा लगा क्या? किधर लगा ? " अवंती मात्र अगदी तो तिचा मावसभाऊ असल्यासारखी त्याची चौकशी करू लागली .

" इधर और इधर " असं म्हणत तो वेटरही लाडात येऊन चहा पायावर पडलेलं ठिकाण दाखवू लागला . फार काही झालं नव्हतं तरी ' ओह , सॉरी भैया ' म्हणत अवंतीने दिलगिरी व्यक्त केली . त्या वेटरला तेवढंच बरं वाटलं आणि तो निघून गेला .

" बिचाऱ्याला आपल्यामुळे खूपच त्रास झाला नाही ! " अवंती म्हणाली .

" त्याचं सोड , मला किती त्रास झाला कालपासून ते बघ ! आता काय झालं ते तरी सांगशील प्लिज " मी गाडी पुन्हा ट्रॅक वर आणायचा प्रयत्न करू लागलो .

" सॉरी , सॉरी , अरे , माझा फोन टेबलवर ठेवलेला . आणि माझी आज्जूडी नेमकी तिथेच बसली होती . तिने वाचला मेसेज . आणि गोंधळ सुरू केला. " ती वैतागून म्हणाली .

" आज्जूडी ? कोण आज्जूडी ? "

" आज्जूडी म्हणजे माझी आजी रे " तिने खुलासा केला . ह्या मुली आपल्या नातेवाईकांना काय काय नावे देतील देव जाणे !

" तू फोन लॉक करत नाहीस का ? असाच टाकतेस कुठेही ? "

" उं हुं . मला नाही आवडत ते सारखं अनलॉक करायला "

" बरं ते जाऊदे . तिने का गोंधळ केला ? म्हणजे असं काय झालं एवढं ? " न समजून मी विचारलं .

" तिचा माझ्यावर जरा रागच आहे . "

" का बरं ? "

" अरे देवा ! थांब तुला पाहिल्यापासून सांगते ." असं म्हणून तिने बनपावाचा एक तुकडा तोडून तोंडात टाकला .आणि चहाचा एक घोट घेतला . " त्याचं काय झालं , की माझ्या आत्तुडीने माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं .

" आत्तुडी ... ? आत्तुडी की आज्जूडी ?

" आत्तुडी रे "

" थांब थांब , आत्तुडी म्हणजे तुझी आत्या असेल ... " मी म्हणालो . खरं तर मी हे उपरोधिकपणे म्हणालो होतो , पण अवंतीला माझ्या समजून घेण्याचा फारच आनंद झालेला दिसला .

" येस, दॅटस इट ! .... हुशार आहेस तू .... " ती म्हणाली आणि मी मनातल्या मनात डोक्याला हात लावला . " हां तर कुठे होते मी ? हां ... माझ्या आत्तुडीने तिच्या जवळच्या मैत्रिणीचा मुलगा स्थळ म्हणून आणला होता . चांगला यु एस मध्ये सेटल होता . माझ्या आज्जूडीला पण आवडला होता . पण अनिकेतमुळे मी ते स्थळ नाकारलं . आणि त्या दिवसापासून त्या दोघींनी माझ्यावर राग धरला. "

" अरे बाप रे ! " कधी कधी सांगणाऱ्याला बरं वाटावं म्हणून आणि आपल्याला समोरच्याचं बोलणं ऐकण्यात रस आहे हे दाखवण्यासाठी आपण उगाच मध्ये एक वाक्य टाकतो , तसं मी म्हणून टाकलं .

" तसा काही खरा राग नाही , आपला, खोटा खोटा . पण नंतर मी अनिकेतलासुद्धा सोडलं . हे जेव्हा तिला कळलं तेव्हा ती आणखीनच वैतागली . त्या यु एस वाल्या मुलाचं पण लग्न झालं आणि त्यात नेमका तुझा मेसेज तिने बघितला . ते बघितल्यावर तर तिने आकांडतांडव केला . ह्या पोरीचं काही खरं नाही म्हणाली ." मी अवंतीच्या आज्जीने आकांडतांडव कशा प्रकारे केला असेल ह्याची कल्पना करीत होतो. , " लक्ष कुठे आहे तुझं ? हॅलो ! "

" हां ... हां ... बोल ना . ऐकतोय मी . तुझे आई बाबा काही म्हणाले नाहीत का ? "

" माझा बाबा आहे ना त्याला काही प्रॉब्लेम नाही . त्याने सगळं माझ्यावर सोडलंय . आई जरा काळजी करते पण तिचंही फार काही नसतं . फक्त आमच्या आज्जूडीला माझ्या लग्नाचं टेन्शन आहे . आणि ती सारखी मागे लागलेली असते . मला तिला आपल्याबद्दल इतक्यात सांगायचं नव्हतं . तिचा मूड बघून नंतर सांगणार होते मी . पण कालच्या तुझ्या मेसेजमुळे घोळ झाला सगळा "

" शीट .... शीट .... तरी मला वाटलंच होतं , आणि मी तो मेसेज डिलीटसुद्धा करणार होतो , पण लगेच ब्लु टिक झाली. त्यामुळे मला वाटलं की तूच वाचला मेसेज. "

" तेच तर ! मोबाईल समोरच पडला होता टेबलवर आणि आमची आज्जूडी तिथेच बसली होती. तिने लगेच वाचला तो मेसेज."

" बरं आता पुढे काय ? मग तुला विचारल्यावर तू काय म्हणालीस ? "

" तू जे सांगितलंस तेच तिला सांगितलं ... "

" काय ? "

" हेच की आपलं एकत्र येणं हे प्रेमदूताने घडवून आणलं आहे म्हणून . "

" काय ? तू असं म्हणालीस ? मग काय म्हणाली तुझी आजी ? "

" काय म्हणणार ? मला वेड्यात काढलं तिने . असं कुठं असतं का म्हणाली ... आणि म्हणाली कोण कुठला मवाली असेल , त्याने काहीबाही सांगून फसवलं असेल तुला . " हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते .

" मवाली ? मला मवाली म्हणाली ? यार काये हे ? मी मवाली वाटतो तुला ? आणि मी कशाला तुला फसवेन ? "

" अरे बाबा , ती एक बोलायची पद्धत असते . आता तिला काय माहीत तुझ्याबद्दल "

" पण एखाद्याला न भेटता त्याच्याबद्दल असं मत बनवणं चांगलं नाही . तू काही बोलली नाहीस का ? "

" मी समजावलं रे . पण ती काही ऐकूनच घेत नव्हती . "

" मग आता काय करायचं ? "

" बघू थोडा वेळ जाऊदे . मला खात्री आहे , मी तिला समजावेन , चल , उशीर होतोय , मला निघालं पाहिजे . " ती म्हणाली खरं पण मला काही ते ठीक वाटेना . तसं तिच्या आज्जीचं तरी काय चुकलं म्हणा ? अमेरिकेत सेटल असलेल्या मुलाला हिने नकार दिला , तो अनिकेत सुद्धा चांगला मल्टी नॅशनल कंपनीत होता , म्हणजे त्याची सॅलरी आपल्या सारख्या कारकुनापेक्षा तर नक्कीच जास्त असणार , त्याच्याबरोबरसुद्धा तिचं पटलं नाही . मग आपल्याबद्दल तिच्या आज्जीच्या मनात असंच काहीतरी येणार . आम्ही बिल देऊन बाहेर आलो .

" अवंती , मी तुला खरंच मवाली वाटतो ? " मी अगदी कसंनुसं तोंड करून विचारलं . त्यावर ती दिलखुलास हसली .

" हो , मवाली तर वाटतोस , आणि हा मवाली मला खूप आवडतो . "


क्रमशः --- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा