मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

सिझन २ , लोकल डायरी- १ Local Diary - 1




नमस्कार वाचक मित्रहो ! लोकल डायरी Local Diary चे ३० भाग प्रकाशित झाले . बऱ्याच वाचकांना ते आवडले , निदान त्यांच्या कमेंट्स वरून तरी तसं दिसतंय . लोकल डायरी ही अर्ध्यावरच संपली आहे असं काही वाचकांचं मत आहे . तसं ते काही अंशी खरं आहे आणि खरं नाहीही . ज्यावेळी मी लोकल डायरी लिहायला सुरुवात केली, त्यावेळी काही कारणांमुळे तिचे केवळ तीनच भाग लिहू शकलो , पण नंतर हळूहळू तीनचे तीस कधी झाले माझं मलाही कळलं नाही . लोकल डायरी संपली आहे , असं मला वाटत होतं , पण वाचकांच्या प्रेमामुळे व सुंदर प्रतिक्रियांमुळे मला लोकल डायरी आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा मिळाली . मधू आणि अँटीव्हायरसची लव स्टोरी , आणि त्या भोवती फिरणाऱ्या लोकल ट्रेनमधल्या ग्रुपच्या इतर सदस्यांच्या सुरस कथा घेऊन लोकल डायरीचे दुसरे पर्व लवकरच आपल्या भेटीला येत आहे. लोकल डायरी - सिझन १ संपले . आता सिझन २ ! लोकल डायरी सिझन २ चे पुढील भाग प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी प्रकाशित होत राहतील . लोकल डायरी , सिझन २ आपल्याला आवडेल अशी आशा करतो . लोकल डायरीवर आपले प्रेम असेच राहू द्या ... धन्यवाद :) 




लोकल डायरी -  सिझन १ चे १ ते ३० भागाची लिंक खाली दिली आहे. 

https://milindmahangade.blogspot.com/search/label/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%20%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80

सिझन २ , लोकल डायरी - १


आज मी जगातला सगळ्यात आनंदी माणूस आहे . का ? ते तुम्हाला सर्वांना माहीत आहेच ! आमच्या रोजच्या लोकल प्रवासात एक मुलगी मला आवडते काय ... माझी तिच्याशी ओळख होऊन मैत्री होते काय .... तिचं ठरलेलं लग्न मोडतं काय .... आणि मी प्रपोज केल्यावर ती होकार देते काय ..... सगळंच भन्नाट ! आय कान्ट बिलिव्ह धिस ! सिम्पली ग्रेट ! , जाम भारी ! अँटीव्हायरस Antivirus मला हो म्हणाली, येस्स ! बाय द वे तिचं नाव अवंती आहे . मस्त नाव आहे .... अवंती ! जितकी सुंदर ती आहे तितकंच सुंदर नाव. तिला माझ्यासोबत आयुष्यभर चहा आणि बन मस्का खायचाय असं ती जाता जाता म्हणाली . हे माझ्या आयुष्यातलं मी ऐकलेलं सर्वात सुंदर वाक्य होतं आणि हे सर्व शक्य झालं ते प्रेमदूतामुळे ! लव रिलेशनशिप ऑफिसर ! भलतीच विचित्र गोष्ट घडली माझ्या आयुष्यात ! साक्षात प्रेमदूताने मला माझं प्रेम मिळवून दिलं होतं . आणखी काय पाहिजे एखाद्या माणसाला ? पण एका गोष्टीचं वाईट वाटतंय , नियम मोडल्यामुळे त्याला कदाचित शिक्षा होईल असं तो म्हणाला होता . त्याला खरंच शिक्षा झाली असेल का ? त्याला शिक्षा होऊ नये हीच प्रार्थना ! कदाचित तो पुन्हा दिसेल की नाही हे सुद्धा मला माहित नाही , पण आज मी जो आनंदी आहे तो त्याच्यामुळेच ! आज सकाळी लवकर उठलो , लवकर उठलो कसला , रात्री झोपलोच नाही . खूप प्रयत्न करूनही झोप आलीच नाही . कालच्या दिवसभराचा तो मनोरंजक प्रसंग चित्रफितीप्रमाणे डोळ्यांसमोरून जात होता , व्हॉटस अप वर आलेल्या GIF file सारखा . एवढी रात्र जागून काढली तरी सकाळी आळस काही येत नव्हता . उलट एका विचित्र अशा उत्साहात आणि धुंदीत मी सकाळचं सर्व उरकत होतो . 

" आज काय लवकर जायचंय का ? " आईने विचारलं . 

" नाही , नेहमीचीच ट्रेन ८:२७ ची " 

" मग एवढ्या लवकर उठून तयार झालास ते ! " आजची सकाळ नेहमीसारखी नाही हे आईच्याही लक्षात आलं होतं तर ! 

" काही नाही . तू डबा भरलास का ? चल , निघतो मी " म्हणत मी घरातून बाहेर पडलोही . एक वेगळ्याच धुंदीत मी चालत होतो . नाक्यावरच्या चहावाल्याने रेडिओ लावला होता . त्यावर गाणं सुरू झालं . , ' आजकल पांव जमीं पर , नहीं पडते मेरे .... ' जणूकाही माझ्यासाठीच ते गाणं लागलं होतं . मी उडत होतो खरंच ! आज मला कसलाच त्रास जाणवत नव्हता . गर्दी नाही , पॅ पॅ करणारे गाड्यांचे हॉर्न नाही , काहीच नाही . रस्त्याने चालताना एकाचा चुकून धक्का लागला , तो फोनवर बोलत समोरून येत होता , चूक त्याची असूनही मीच त्याला सॉरी म्हणालो . हे काय विचित्र घडत होतं ? एरवी त्याच्यावर खेकसून पुढे गेलो असतो . पण आज मला कुणाचाच राग येत नव्हता , कुणावरच चिडावसं वाटत नव्हतं . प्रेमात खरंच जादू असते म्हणतात ते खोटं नाही, कारण रस्त्याने चालताना एका रिक्षेचं मागचं चाक माझ्या पायाच्या पंजावरून गेलं तरी मला त्याचं काही वाटलं नाही . 

प्लॅटफॉर्मवर येऊन बघितलं तर आधीची ट्रेन अजून आली नव्हती . त्या ट्रेनचे लोक माना वाकड्या करून ट्रेन येण्याच्या दिशेकडे पाहत होते . मी जरा जास्तच लवकर आलो होतो . बाजूला असलेल्या बाकड्यावर जाऊन बसलो . त्या तीन जणांच्या बाकड्यावर नंतर पाच जण येऊन बसले तरी मला त्याचं काहीच वाटत नव्हतं . एखाद्या उदार राजाने त्याचा खजिना प्रजेमध्ये वाटावा तसे , प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या एक - दोन नव्हे तर तब्बल सहा भिकाऱ्यांना मी माझ्याजवळची रिक्षासाठी ठेवलेली सर्व चिल्लर वाटून टाकली . लोकल यायला वेळ होता . काय करावं म्हणून मग मी माझ्या बुटांना पॉलिश करावं म्हणून बाजूला बसलेल्या बूटपॉलिशवाल्या पोऱ्याकडे गेलो . बूट पॉलिश करता करता त्याने " अब नया ले लो साब " असा टोमणा मारला तरी मला त्याचं काही वाटलं नाही . उलट त्याला ५ रुपये जास्तच दिले मी . बूटपॉलिश चालू असताना आधीची गाडी आली आणि प्लॅटफॉर्मवरची माणसं पोटात भरून निघून गेली . आता आमची गाडी यायला अजून थोडा अवकाश होता . आमच्या ग्रुपचे कोणी येतंय का ह्याची मी वाट बघू लागलो , वास्तविक मी अँटीव्हायरस , ओह सॉरी , अवंतीची वाट पाहत होतो. शरद मला लांबून येताना दिसला . त्याच्या सोबत भरतही होता . 

" अरे , मध्या आज एकदम लवकर ? " जवळ येता येता शरदने विचारलं . 

" हो रे , लवकर उठलो , म्हटलं घरी बसून काय करायचं ? आलो मग " 

" खुश दिसतोयस आज ? क्या बात है ? " भरतने विचारलं . 

" काही नाही रे ... नेहमीचंच " मी म्हणालो इतक्यात लांबून गाडीचा हॉर्न वाजला . गाडी हळूहळू स्टेशनमध्ये शिरत होती . ते बघून शरद- भरत घाईघाईने पुढे धावले . जागा पकडण्याचं काम त्या दोघांकडे असतं म्हणून . इतक्यात सावंत , भडकमकर आणि नायर अंकलही आले . आमचा संपूर्ण ग्रुप आला होता तरी मी ज्या व्यक्तीची वाट बघत होतो ती काही अजून आली नव्हती . ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली . सर्व जण आपापल्या जागी जाऊन बसले . मी आत पाहतो तर जिग्नेससुध्दा आज डाऊन करून आला होता . सर्व जण आले होते , पण अवंती कुठे होती ? मी माझी सीट नायर अंकलना देऊन उभा राहिलो आणि लेडीज कंपार्टमेंटकडे शोधक नजरेने पाहू लागलो . 

" काय शोधतोयस रे मध्या ? " शरदने विचारलंच . 

" काय नाय रे " 

" ओ सावंत , जरा मध्याकडे बघा हो , आज जरा जास्तच फ्रेश दिसतोय " भरत म्हणाला , तसं सावंतांनी नाकावर आलेल्या चष्म्याच्या वरून निरखून माझ्याकडे पाहिलं . " हो रे ...माझं लक्षच गेलं नाही . हिरो दिसतोय आज .... " त्याबरोबर सगळ्यांनी माझ्याकडे पाहून माझी मस्करी करायला सुरुवात केली . आमच्या ग्रुपचे लोक येडे आहेत . एखाद्याला पकडला की त्याला नको करून सोडतात . आज कदाचित मी त्यांचं गिर्हाईक होतो . मला जाम हसायला येत होतं पण मी ते महत्प्रयासाने दाबून धरलं . गंमत वाटत होती . कोणतेही नियंत्रण नसल्यासारखे डोळे सारखे लेडीज कंपार्टमेंटकडे वळत होते . ती आली की नाही हे बघण्यासाठी . पण ती काही आलीच नाही . मला आता कसंतारीच वाटू लागलं . आज ती येईल की नाही ? का नसेल आली ? काय प्रॉब्लेम झाला असेल ? ह्या सारख्या अनेक विचारांनी डोक्यात गर्दी केली . 

" लेकीन मधू भाई तुम जरा टेन्शन में दिख रहे हो ... क्या बात है ? " जिग्नेसने विचारलं . 

" टेंशन में और में ? नही यार .... " मी पलीकडे नजर टाकत म्हणालो . 

" कोणाची तरी वाट बघणं चालू आहे .... काय मध्या ? " भडकमकर म्हणाले . 

" नाही हो , तसं काही नाही . " मी जसं जमेल तसं सावरत होतो . 

" कूच तो बात जरूर है मधू ..... तुमारा चेअरा साप बता राहा है .... "आता नायर अंकलही सुरू झाले . 

गाडी सुटण्याचा हॉर्न वाजला आणि गाडी सुरूही झाली . इतक्यात कोणीतरी एक मुलगी धावत लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढली . ती अवंती होती . ग्रीष्मातली घामट दुपार गडगडाटी पावसामुळे जशी सुगंधित आणि आल्हाददायक, थंडगार होते तसं आमच्या ट्रेनच्या डब्यातलं वातावरण एकदम बदलल्यासारखं वाटलं मला . आत शिरल्या शिरल्या ती तिच्या नेहमीच्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली आणि तिने जेन्ट्स डब्याकडे कटाक्ष टाकला . मी तर तिच्याकडेच बघत होतो . तिची आणि माझी नजरानजर झाली . एक सुंदरसे स्मित तिच्या चेहऱ्यावर झळकले त्यात थोडी लाजरेपणाचीही झाक होती . माझ्या छातीत कोणीतरी गोळी मारल्यासारखं मला वाटलं . एक बारीकशी विजेची लहर संबंध अंगभर दौडत गेली . मला एकदम मस्त वाटलं . कदाचित माझ्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा बदलले असावेत आणि आमच्या चाणाक्ष ग्रुपच्या हे लक्षात न आल्यावाचून कसे राहील ? त्यांनी लगेच मला त्या गोष्टीवरून विचारायला सुरुवात केली . आधी गप्प गप्प होता ... चेहरा कोमेजलेला होता , आता कसा काय खुलला वगैरे वगैरे ... आमचा हा लोकलचा ग्रुप माझ्या खूप जवळचा आहे पण तरीही मला ह्या लोकांना इतक्यात काही सांगायचं नव्हतं आणि ही सांगायची वेळही नव्हती . काय केलं म्हणजे त्यांना ह्या गोष्टी पासून दूर ठेवता येईल ? काहीतरी वेगळा विषय काढला पाहिजे ...असा विषय की सगळ्यांचं लक्ष माझ्यावरून उडून दुसऱ्या विषयावर गेलं पाहिजे . कोणता विषय काढावा ? हां sss सापडला . 

" अरे शरद , तुझं लग्न कधी आहे म्हणालास ? " मी विचारलं . 

" आता विषय नको बदलुस .... " भरतने मला बरोब्बर टोकलं . 

" अरे विषय बदलायचा प्रश्न नाही. मला सहज आठवलं म्हणून विचारलं .... आपल्याला त्याच्याकडून बॅचलर्स पार्टी घ्यायला लागेल ना …" मी म्हणालो. 

" आयला हो रे .... शरद , साल्या कधी देतोय तू पार्टी ? " भरत म्हणाला . पार्टीचं नाव काढलं आणि आमची जनता एकदम जागृत झाली . त्यांना मला चिडवण्यापेक्षा शरदची पार्टी नक्कीच महत्वाची असणार हा माझा कयास एकदम बरोबर ठरला . कर्जतला जाणारी ट्रेन ट्रॅक बदलून एकदम कसाऱ्याला निघाल्यासारखा झालं हे . 

" नुसती पार्टी नाही , तर पार्टीचा सप्ताह झाला पाहिजे . शरद पार्टी सप्ताह ... क्यूँ नायरजी ? " पार्टीचं नाव काढलं आणि झोपलेले भडकमकर सुद्धा उठून उभे राहिले . 

" एकदम बराबर बोले भडकमकरजी . पार्टी तो होनाही चाहीये . और ओ भी बडा पार्टी " नायर अंकल म्हणाले म्हणजे आता तर पार्टीवर शिक्कामोर्तबच झालं. सावंत माझ्याकडे बघून समजुतीने हसले . त्यांनी माझी युक्ती बरोबर ओळखली होती. सगळ्यांनी मग शरदला पार्टीबद्दल विचारायला सुरुवात केली आणि शरद त्यांना उत्तरे देण्यात मग्न झाला . आता मी निर्धास्त झालो. मी कुणाच्या लक्षात येणार नाही असा पलीकडे कटाक्ष टाकला . अवंती कानात इअरफोन घालून गाणी ऐकत उभी होती . तिचं कदाचित लक्ष नव्हतं . मी माझा मोबाईल काढून पाहिला , तर व्हॉट्स अप वर तिचा मेसेज होता . 

" Utarlyavar nehamichya thikani bhet " चला , हे बाकी चांगलं झालं . मला तिला भेटायचं होतंच , पण तिला कसं सांगावं हे सुचत नव्हतं . त्यात आमच्या ग्रुपच्या लोकांनी गोंधळ घातला. त्यामुळे ते सांगायचं राहूनच गेलं . 

आता मला ट्रेन भायखळ्या कधी पोहोचेल असं झालं . वेळ जाता जात नव्हता , मनात एक विचित्रशी हुरहूर लागली होती . त्याचबरोबर तिच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं ? तिची प्रतिक्रिया काय येईल ? असे एक ना अनेक प्रश्न मनात येऊ लागले . 

भायखळा स्टेशन आलं आणि मी मनात एक हुरहूर घेऊन खाली उतरलो. मी मुद्दामच पुढे निघून गेलो , नाहीतर आमच्या लोकांना शंका आली असती . रस्ता क्रॉस केला आणि पलीकडे जाऊन उभा राहिलो . अवंती मागून येतच होती . आज ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटत होती . तिने माझ्याकडे पाहिलं आणि एक सुंदर स्माईल दिलं . मी तर तिथेच आडवा होतो की काय असं वाटलं . ती जवळ आली आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर सुंदरसे स्मित उमटले . मला काय बोलायचं तेच सुचेना मी तिच्याकडे बघत राहिलो , शेवटी तीच म्हणाली , " आत जाऊया ? " 

" ओह सॉरी ..... चल ना " म्हणत आम्ही दोघे आत जाऊन बसलो . नेहमीप्रमाणे काउंटरवरच्या म्हाताऱ्या शेठने चष्म्याच्या कोनातून आमच्याकडे पाहिलं . हॉटेलच्या वेटरने त्याचं काम न सांगता केलं . आमच्यापुढे चहा आणि बन मस्का आणून ठेवला . बराच वेळ आमच्या दोघांपैकी कुणालाच काही बोलता आलं नाही . इकडे तिकडे बघत आम्ही मधूनच एकमेकांकडे बघत होतो आणि औपचारिक हास्य चेहऱ्यावर येत होतं . याआधी आम्ही चांगले मित्र होतो , मैत्रीत सगळं कसं सहज सोपं असतं , पण आता मात्र स्थिती वेगळी होती . आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं , एक गोड जबाबदारी असल्यासारखी वाटत होती आणि विचित्रशी हुरहूर लागल्यासारखी . 

" बोल काहीतरी . " तिनेच सुरुवात केली . 

" काय बोलायचं तेच सुचत नाही . एकदम भारी वाटतंय मला " मी म्हणालो . 
" मलापण मस्त वाटतंय , पण तुझ्यामुळे मला खूप बोलणी खावी लागली ऑफिसमध्ये " 

" माझ्यामुळे ? कशी काय ? " 

" एक तर मला आधीच उशीर झाला होता . त्यात तू प्रोपोज केलास आणि माझं ऑफिसमधलं लक्षच उडून गेलं . महत्वाची मीटिंग होती पण माझं लक्षच लागेना . बॉस वैतागला ना माझ्यावर ! " ती खोट्या रागात म्हणाली . मला हसू आलं . , " हसतोस काय शहाण्या ? चांगला मुहूर्त शोधला होतास प्रपोज करायचा " 

" प्रोपोज करायचा मुहूर्तच होता मॅडम , साक्षात प्रेमदूताने मला मदत केली आहे . " 

" काय ? प्रेमदूत …? " असं म्हणून ती जोरजोरात हसायला लागली . 

" अरे बाबा , खरंच ! तुझा विश्वास बसणार नाही पण , हे खरं आहे . मला तू आवडत होतीस पण तुला ते सांगायचा धीर होत नव्हता . तेव्हा प्रेमदुतानेच माझी मदत केली " असं म्हणून मी घडला सगळा प्रकार तिला सांगितला . ती डोळे विस्फारुन सगळं ऐकत होती . तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याची जागा आश्चर्याने घेतली .

" तू खरं सांगतोयस हे ? " तिने विचारले . 

" खरंच .... शप्पथ ! मी सांगितलेला शब्दन शब्द खरा आहे " मी म्हणालो . सगळी कहाणी ऐकल्यावर तिलाही नवल वाटले . आम्ही दोघे एकत्र येणं हे देवाच्याच मनात होतं , असा एक विश्वास तिच्या मनात निर्माण झाला. मी सांगितलेल्या घटनेवर ती विचारात पडली . 

" मला भेटता येईल प्रेमदूताला ? " तिने विचारलं . 

" माहीत नाही गं ? पण तो तर गेला आता .... भेट कधी होईल किंवा होणार की नाही ते सांगता येणार नाही . " मी म्हणालो आणि ती विचारात पडली . " काय ग ? काय झालं ? " 

" मधू खरंच असं झालं होतं का रे ? " 

" होय ... आपल्या दोघांना प्रेमदुतानेच एकत्र आणलंय " 

" भारीच आहे हे सगळं .... " ती भारावून जात म्हणाली . आणि पुन्हा अंतर्मुख झाल्यासारखी चहाच्या कपाकडे पाहू लागली . आमचा चहा पिऊन झाला होता . 

" चला निघुया का ? उशीर होतोय . " मी तिला म्हणालो आणि पुढे जाऊन काउंटरवर बिल देत असतानाच तिची मागून हाक आली . मी मागे पाहिलं , पुढे येऊन अवंतीने मला थेट मिठीच मारली . हे बघून काउंटरवरचा म्हातारा खुर्चीवरून कोलमड्याच्या बेतात आला आणि तिकडे दोन वेटरांची टक्कर होऊन चहाची कपबशी खळकन फुटल्याचा आवाज झाला. 



------ क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा