http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html लोकल डायरी --४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html लोकल डायरी --५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html लोकल डायरी --१३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html लोकल डायरी --१४
जी गोष्ट अटळ आहे तिच्या बाबतीत चिंता करुन अस्वस्थ होण्याला काहीच अर्थ नाही , हे मेंदू जाणतो पण मन मानत नाही . मन सारखा त्याच त्याच गोष्टीचा विचार करत रहाते. माझंही तसंच झालं होतं . काल अँटी व्हायरसने मला तिची एंगेजमेंट रिंग दाखवली आणि वेड्या मनाला होती नव्हती ती आशाही धुळीला मिळाली . तिची एंगेजमेंट झाली आहे हे तिने माझ्यासारख्या एका तिर्हाइताला सांगायची काय गरज होती ? बहुतेक ' इस रुट की सभी लाईने व्यस्त है ।' असं कदाचित तिला सुचवायचं असेल . ठीक आहे .... पण काल आम्ही एकमेकांचे मित्र तर झालो होतो . हेही काही वाईट नव्हतं . मी सगळे विचार झटकुन टाकले . आणि नव्या उत्साहात ट्रेन मधे चढ़लो . सगळ्यांना नेहमीप्रमाणे हाय हॅलो , नमस्कार चमत्कार झाले . वरच्या रॅकवर बॅग ठेवली , इतक्यात माझा मोबाईल वाजला ... बघितलं तर बॉसचा फोन होता . मी लगेच फोन घेतला , " हॅलो , गुड मॉर्निंग सर , ... येस सर ..... ओके सर .... , पण असं अचानक ? .... ओके सर .... मी जातो तिथे .... गुड डे सर ..." फोन वैतागातच बंद केला . रॅकवरची माझी बॅग काढली . मी बॅग काढलेली बघुन सगळे आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले .
" काय रे ... काय झालं .... परत घरी चाल्लास काय ? " भडकमकर विचारु लागले .
" नाही हो , बॉसचा फोन होता , मला आमच्या ठाण्याच्या ब्रॅन्चला जायचं आहे ... बॉसचं काहीतरी काम आहे . आता डोअरला उभा राहतो ... नाईतर ठाण्याला उतरता येणार नाही . "
" हो .. हो ... बरोबर आहे ... पण यार तू आम्हाला सोडून चाललास ... कसंतरी वाटतंय ... " भरत मला गमतीत टाटा करत म्हणाला .
" अरे सोड , डोंबिवली गेल्यावर जा डोअरला ... काय टेंशन घेतो , बस ..." सावंत माझा हात पकडत म्हणाले .
" ओ सावंत , त्याला ठाण्याला उतरायचय , कुर्ल्याला नाही ... मध्या तू ह्यांचं काही ऐकू नको , सरळ डोअरला बाजूला उभा रहा , ए रवी , आमचा पंटर येतोय रे डोअरला , . त्याला जागा ठेव ..." शरदने माझी डोअरला उभी राहायची सोय सुद्धा करुन दिली . रवीनेही ओके अशी खुण केली . रवीचा ग्रुप डोअरलाच असतो . त्यामुळे मला तरी काही काळजी नव्हती . लोकलने हॉर्न दिला आणि लगेच ती निघाली . मी माझी बॅग घेऊन डोअरला जाऊ लागलो , सावंत हळू आवाजात म्हणाले , " यार , तुला एक गोष्ट सांगायची होती , पण तू तर आता डोअरला चाल्लास ... "
" बोला ना .... काय सांगायचंय ? "
" नको , एवढ्या गड़बडीत ते शक्य नाही .... उद्याच बोलू ... ठीक आहे .जा तू , नाहीतर गर्दी होईल पुढच्या स्टेशनला . " म्हणत त्यांनी हिरमुसल्यासारखा चेहरा केला . मला नाईलाजाने जावं लागलं ," ओके , उद्या बोलू , बाय ..." मी डोअरला जाऊन रवीबरोबर उभा राहिलो . आमचा ग्रुप सोडून वेगळ्याच ठिकाणी उभं राहिल्याने मला माहेर सोडून सासरी आलेल्या मुलीसारखं वाटायला लागलं .
" आज अचानक ठाण्याला कसा काय रे ? " रवी मला जागा करुन देत म्हणाला .
" अरे तो आमचा बॉस रे .... त्याचं काम आहे म्हणून जातोय . इथं उभं राहिलं तर चालेल ना ? "
" अरे तिकडे नको , तिकडे जाम गर्दी होते , ए पांडे , ये साईड आजा , इसको कोने में खड़ा रेहने दे .... अपना दोस्त है ...। " रवीने फर्मान सोडलं , तो कोण पांडे की कोण होता तो निमुटपणे बाजूला झाला आणि त्याने मला जागा दिली . मी दरवाज्याच्या आतल्या बाजूला सुरक्षित उभा राहिलो .
" तुझी बॅग दे ... इकडे अडकवतो . " म्हणत रवीने माझ्या हातातली बॅग घेतली आणि दरवाज्याच्या कड़ीला त्याने सोबत आणलेल्या स्टीलच्या हुकात अडकवली ," ओके , आता आरामात उभा रहा " रवी माझी एखाद्या पाहूण्यासारखी ख़ातिरदारी करत होता . मला थोडं संकोचल्यासारखं झालं . मी शेजारच्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून थोडं अंग चोरुन उभा राहिलो . रवीच्या ते लक्षात आलं ," गाडीचा पास काढलायस ना ? "
" हो ... पण का रे ? " मला कळेना तो असं का विचारतोय .
" अरे मग असा चोरासारखा का उभा राहतोय ? नीट बिंदास उभा रहा की ... ए दिग्या तिकडे सरक .... आपल्या मित्राला जरा नीट उभं राहु दे ..." रवी पेटला होता .
" अरे , मी उभा आहे व्यवस्थित ... काही प्रॉब्लेम नाही . "
" अरे तुम्हा डायरेक्ट मुंबईला जाणाऱ्या लोकांना माहित नाही , इथे डोअरला काय काय करायला लागतं ते ...!. असली गर्दी होते ना , एका पायावर पण उभं राहायचं मुश्किल होतं .... बघशीलच तू आता . " रवी म्हणाला . त्याचंही खरंच होतं . डोंबिवली , ठाणे , घाटकोपर , कुर्ला ह्या असल्या मधल्या स्टेशनवर उतरणाऱ्या लोकांच्या पुढे गर्दीचं भयानक मोठं आव्हान असतं , त्यांच्यात आणि शत्रु समोर दिसल्यावर त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या सैनिकांत काहीच फरक नसतो . आम्ही थेट दादर , भायखला सी एस टी ला उतरतो त्यामुळे नशीबाने हा त्रास जाणवत नाही . मी व्यवस्थित उभा राहिलो आणि समोर पाहिलं , नेहमीप्रमाणे अँटी व्हायरस उभी होती . इकडे तिकडे बघता बघता तिची नजर माझ्यावर पडली . तिच्या नजरेत एक लहानसं प्रश्नचिन्ह उभं राहिलं . ' आज डोअरला कसा काय उभा ? ' असा त्या नजरेत प्रश्न होता . मी ओळखीचं हसल्यावर तिनेही तसाच प्रतिसाद दिला . इतक्यात उल्हासनगर आलं आणि कधीही गाडीत चढायला न मिळाल्यासारखे लोक चढू लागले . कुणी धड़पड़त होते ... कुणी समोरच्याला ढकलत होते ... ३-४ सेकंदात ट्रेनचा सगळा पॅसेज भरुन गेला . मी आधी जिथे उभं राहणार होतो तिथे तर चेंगराचेंगरी सुरु झाली . मागचा पुढच्याला ढकलत होता ... नशीब रवी होता म्हणून मला दरवाज्याजवळ सुरक्षित जागा मिळाली , नाहीतर माझं काही खरं नव्हतं .
" आयला , बेकार गर्दी आहे रे ... आम्ही आत बसतो त्यामुळे आम्हाला अंदाज येत नाही . पण खरंच तुम्हाला मानलं पाहिजे बाबा ..." मी त्याला म्हणालो .
" मग , तुला बोललो नाही का , जाम गर्दी असते . " रवी दरवाज्यावर लटकत म्हणाला . ही त्याची नेहमीची जागा होती . त्याच्याबरोबर आणखी ४ जण डोअरला लटकत उभे होते . ते गाडीच्या आत कमी बाहेरच जास्त होते . डोअरला उभं राहण्यात पण हिम्मत लागते ... आणि त्याही पेक्षा टेकनिक महत्वाची ....! म्हणजे एखादं स्टेशन आलं की स्वतः न उतरता दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला अति चिंचोळया भागावर एका पायावर उभं राहून लोकांना आत जाण्यासाठी रस्ता करुन देणे हे महाकठीण काम असं कुणालाही जमत नाही ... तेथे असावे जातीचे ... येड्या गबाळयाचे ते काम नव्हे ...! एका पायावर तपश्चर्या करण्यापेक्षा एका पायावर प्रवास करणं अवघड आहे असं मला उगाच वाटून गेलं . डोअरवाले म्हणजे लढाईला निघालेल्या सैनिकांची पहिली फळी ... ! शत्रुचा पहिला वार अक्षरशः आपल्या अंगावर घेणारी ... ! ऑफिस टाईममधे डोअरला उभे राहायचे सुद्धा काही अलिखित नियम असतात हे मला आज कळत होतं . डोअरचा आणि पॅसेजचा अर्धा भाग हा ठाण्याला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी राखीव असतो . उरलेल्या अर्ध्या भागात मधल्या स्टेशन्सवर चढणे आणि उतरणे दोन्ही कामं जशी जमतील तशी करायची असतात . नेहमीच्या प्रवाशांना हे सगळं माहीत असतं , पण एकदा नवखा आला की हुज्जत घालायला लागतो . ठाण्याला उतरायची रांग असते तिथुनच चढायचा प्रयत्न करतो , मग त्यातून बाचाबाची , भांडणं , हाणामाऱ्या असले प्रकार घडतात , आणि हे डोअरवाल्यांना काही नविन नसतं . आज कल्याणलाच गाडी फुल्ल झाली . आत्ताही दोन माणसांची चांगलीच जुंपली होती
" अरे पिछेसे क्यूँ ढकेलता है ... ऊपर हॅंडल को पकड़ ना ..."
" अरे बाबा , पिछेसे प्रेशर आ रहा है तो मैं क्या करुँ ...?
" तो तू ठीक से खड़ा रेह ना ... और तेरा ये बॅग नीचे ले ... मेरेको लग रहा है ..."
" अब बॅग कैसे निचे लूँ ...? इधर हिलने को नहीं हो रहा ... "
" यार , क्या कर रहा है ? पीछे दबा ना .... "
" अरे कैसे दबाऊँ यार ? "
" नया है क्या ट्रेन मैं ... पेहली बार आया है क्या .... आयला कुठून कुठून येतात साले ....."
" ओ , जरा नीट बोला , साला बिला बोलायचं काम नाय .... मघापासून ऐकतोय .... " एखाद्या भाषणाची सुरुवात जशी प्रस्तावनेने होते तशी लोकल मध्ये भांडणाची सुरुवात हिंदीत होते . लोकलमधे सुरुवातीला हिंदीतून भांडणारे दोघेही मराठीच होते ... आता त्यांनी मराठीत भांडायला सुरुवात केली .
" इथे मी एका पायावर उभा आहे कसातरी , आणि तुम्ही मागून ढकलताय ... "
" बर मग तुम्ही या ना माझ्या जागी , काय पण चु सारखं बोलतोय ..."
" ए शिव्या काय देतो ....आ ... शिव्या काय देतो ...." अशा रीतीने ते अगदी हमरातुमरीवर आले . त्यांची ही निव्वळ बडबड बाकीच्या लोकांना सहन झाली नाही , मग त्यातल्याच काही लोकांनी त्यांना शांत केलं . बाकीच्यांचा होणारा चांगला टाईमपास बंद झाला . रवी आणि आणि त्याची गॅंग मजेने बाहेर लटकत होते .... त्यांचे मनुष्यरुपी पक्षीच झाले होते जणू ! त्यांची मजा मस्ती चालु होती ... एकमेकांची टर उडवणे , प्लॅटफॉर्मवरच्या चालत्याबोलत्या प्रेक्षणीय गोष्टींना न्याहाळणे , असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो . आमच्यात जसा जिग्नेस आहे , तसा त्यांच्यातही एक नेहमीचा गिर्हाइक आहे , शाम म्हणून ! . अचानक रवी त्याला म्हणाला , " अरे शाम तुला मोर बघायचाय का ? एक सोडून तीन चार आहेत ..." बिचारा शाम एकदम आश्चर्याने बाहेर बघू लागला .... तर रेल्वे पटरीच्या बाजूला झोपडपट्टीतले तीन चार लोक टमरेल घेऊन बसले होते . " आयला ... हट , साल्यांनो ...." म्हणत शाम चिडला . सगळे त्याला चिडवुन हसु लागले . त्यानंतर आतल्या कोणीतरी दिलेली निर्माल्याने भरलेली , सुकलेल्या फुलांची , पानांची एक पिशवी हस्तांतारित होत होत रवीकडे आली . मुंब्र्याच्या खाडीत ती सोडायची होती . रवीने ती हातात बाहेर तशीच धरली . मुंब्र्याची खाडी पास झाली तरी त्याने ती निर्माल्याची पिशवी पाण्यात टाकली नाही ... मी त्याला खुणावलं . त्याने नजरेनेच शांत रहा अशी खुण केली . आणि थोडं पुढे गेल्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हळूच टाकली .
" अरे हे काय केलंस ? पाण्यात टाकायची होती ना पिशवी ? " मी हळू आवाजात त्याला विचारलं .
" यडछाप माणसं आहेत ती ... आपण कशाला उगाच पाणी खराब करा ... ? आणि निर्माल्य पाण्यात टाकलं तर असं कोणतं पुण्य मिळणारे त्याला ? मरु दे ... मी कधीच टाकत नाही पाण्यात . आणि आजपर्यंत जो ते टाकायला देतोय त्याचंही काही वाईट झालेलं नाही ... काय ? " रवी बेफिकीरीने म्हणाला .
" भारी आहेस बाबा ...." मी असं म्हणत असतानाच गाडी पारसिकच्या बोगदयात शिरली ... डोअरवरच्या रवीच्या ग्रुपने " जय भवानी .... जय अम्बे " चा जयघोष चालू केला . सबंध बोगदाभर तो जयघोष चालूच होता . आम्ही आतून रोजच ऐकतो हा जयघोष , पण आज त्यांच्याबरोबर जय भवानी , जय अम्बे चा जयघोष करताना ब्रम्हानंदी टाळी लागली . वेगळाच फील आला . धडाडत गाडी बोगद्याच्या अंधारातून प्रकाशात आली . आणि ठाण्याला उतरणाऱ्यांची गडबड सुरु झाली . कुणी रॅकवर ठेवलेल्या बॅग घेत होता , कुणी मागून पुढे ढकलत होता ... कुणी रांगेत मधेच शिरायचा प्रयत्न करत होता ... रवीने माझी बॅग काढून दिली . स्वतःची बॅग खांद्याला लावली . स्टेशनात गाडी शिरते न शिरते तोच मागचे लोक ओरडायला लागले ...' चलो भाय ... चलो ... डोअर वाले ... छोडो ... चलो ' धबधब्यातुन पाणी कोसळावं तसं सगळे लोक धबाधब बाहेर पडले ... आणि तेवढेच पुन्हा आत शिरले ... मी माझी बॅग सांभाळत धक्काबुक्की करत एकदाचा कसातरी उतरलो . उतरल्यावर पाकीट , मोबाईल चेक केला . दोन्ही जागेवर होते . जाताना रवीचे आभार मानले . आणि बाहेरुन आमच्या खिडकीपाशी गेलो . सगळ्यांचा निरोप घेतला . सावंत आतून म्हणाले , " उद्या लवकर ये ... बोलायचय ज़रा ..."
"ओके ...." म्हणत असतानाच ट्रेन निघाली . आमचा डबा पुढे गेला आणि लेडीज डब्याचा दरवाजा माझ्या समोर आला . अँटी व्हायरसची झलक मला दिसली . तीही बाहेर बघत होती . तिच्या डोळ्यात लहानसं प्रश्न चिन्ह पुन्हा तयार झालेलं मला दिसलं ...
ये तीर- ए - नजर कहीं ओर करलो …
घायल को ओर कितना घायल करोगी ….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा