गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १३…

 
झोजी ला .... लडाख प्रदेश आणि काश्मिर प्रदेश  यांना जोडणारा घाट... त्याबद्दल असं ऐकलं होतं की तो पास  अतिशय अरुंद ,  खतरनाक आहे आणि दिवसाचे काही तास कामकाजामुळे बंद असतो...  विजय स्मारकावरुन निघुन आज आम्हाला राञीपर्यंत श्रीनगर गाठायचं होतं. पण मधे वाटेत झोजी -ला शी सामना करायचा होता... झोजी ला पास कडे जात होतो समोर पाहतो तो सबंध आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आलेलं दिसलं... जोरदार पाऊस पुढे पडताना दिसत होता...काश्मिर खोऱ्यातला सगळा पाऊस एकवटुन इथंच पडतोय की काय असं वाटण्याजोगा धुंवाधार पाऊस समोर पडताना दिसत होता.  मला पुन्हा त्या फुटुला  पासमधल्या हाडं गोठवणाऱ्या पावसाळी थंडीची आठवण झाली आणि अंगावर  काटा उभा राहीला.... समोरच्या पर्वतावर  बरसणारा तो पाऊस बघुन आम्ही थोडं थांबलो. निसर्गाच्या सामर्थ्यापुढे आमचं काय चालणार होतं...?  रेनकोट अंगावर चढवले. हळुहळु पुढे निघालो. पण पुन्हा आमचा पोपट झाला... जसा घाट चढायला लागलो तसा पाऊस गायब झाला आणि लख्ख ऊन पडलं... झोजीला मधे एक विशेष होतं की तिथे डोंगरांच्या कुशीत सर्वञ लांबच लांब हिरवीगार कुरणे दिसत होती....गालिचा अंथरल्यासारखी...अगदी बालकवींच्या कवितेसारखी.... 




बरेच मेंढपाळ आपल्या काश्मिरी शेळ्या मेंढ्यासोबत आनंदाने बागडत होते... क्षणातले रौद्र वातावरण  दुसऱ्या क्षणी आल्हाददायक बनले होते... काय म्हणावं आता इथल्या निसर्गाला...!  कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत आम्ही निघालो. काही ठिकाणी बर्फाच्या ताशिव भिंती रस्त्याच्या दुतर्फा प्रेक्षकांसारख्या उभ्या होत्या ... आम्ही थोडं अंतर पुढे जातो न जातो तोच....काय झालं असेल ?  ...सांगायलाच नको...  पुन्हा गाड्यांची रांग...काम चालु  रस्ता बंद...!  


                                    

आम्ही जवळपास दुपारी १ च्या सुमारास तिथे पोहोचलो असु. आता ३ वाजता हा मार्ग मोकळा करण्यात येईल असे तिथले पहाऱ्यावर असलेले सैनिक म्हणाले... तब्बल दोन तास वाट पहावी लागणार होती... आमच्या बरोबर तसे बरेच लोक अडकले होते. दोन तास ह्या वैराण घाटात बसुन काय करणार...?  आजुबाजुला फिरायला जागाही नव्हती... मुळातच झोजी ला  मधुन एकच गाडी जाऊ शकेल इतका अरुंद रस्ता होता, एका बाजुला उंच कडा आणि दुसऱ्या बाजुला खोल दरी... मागे गाड्यांच्या रांगा... काय फिरणार...? आम्ही थोडा वेळ तसेच बसलो. काही लोक त्यांच्या गाड्यांबाहेर  आले आणि दोन तीन तासांची निश्चिंती असल्यामुळे पथारी टाकुन मस्तपैकी आडवे झाले... सुखी प्राणी... काही जणांनी तीन दगडांची चुल मांडुन त्यावर चहा कराय़ला सुरुवात केली... कोणतीही परिस्थीती येवो माणुस आपला गुणधर्म काही सोडत नाही. आपण काय टाईमपास करावा ह्या विवंचनेत असताना पप्याने त्याच्या बॅगेतुन पत्ते काढले.... आणि आमची सुटका केली... तीनपत्ती खेळण्याचा ठराव पास झाला...आणि पैसे म्हणुन प्रत्येकाने २०-२० खडे वापरायचे ठरले... काय गमतीदार परीस्थीती पहा... आम्ही घरापासुन सुमारे 3000 किमी लांब झोजीला मधे बसुन पत्ते खेळणार आहोत हे कुणाच्या स्वप्नातही आलं नसतं... पण ते घडत होतं. पियु ला तीनपत्तीचे रुल्स माहीत नव्हते पण पोरीचं ऩशीब जोरावर होतं... जवळपास सगळे गेम तिने आणि खोप्याने जिंकले...माझ्याजवळचे खडे संपायला आले की मी हळुच आजुबाजुचे खडे गोळा करुन ते कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीने वापरत होतो... तीनपत्तीच्या खेळात कसली इमानदारी दाखवायची...?  ते पप्याच्या लक्षात येणार तेवढ्यात आम्ही बसलो होतो त्या बाजुच्या कड्यावरुन काही खडे खाली पडले... आधी वाटलं की कोणीतरी मस्करी करतंय पण थोड्या वेळाने जास्तच खडे पडु लागले... वरचा कडा अंगावर ढासळणार या भितीने आम्ही जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला आणि पळत सुटलो... आमची धावाधाव बघुन आजुबाजुचे लोकही घाबरले आणि पळु लागले...जे झोपले होते ते तडफडुन जागे झाले...गाडीत होते ते गाडीतुन बाहेर पडुन सैरावैरा पळु लागले.  हा प्रांत म्हणजे वेड्याचा झटका आलेल्या माणसासारखा आहे... कधी काय होईल ते सांगता येत नाही... ह्या पळापळीत आमचे काही पत्ते  उडुन समोरच्या दरीत पडले...चोरटा जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची धाड पडल्यावर जशी होईल तशी धावपळ झाली... पण आमची भिती  निरर्थक होती... काहीच झालं नाही... पण त्या कड्याखाली बसायचं धाडस नंतर कुणाला होईना... बराच वेळ रस्ता बंदच होता... भुकही लागली होती ...हा रस्ता कधी मोकळा होईल असं झालं... शेवटी आमची प्रतिक्षा संपली... आम्ही गाड्या काढल्या खऱ्या पण पुढचा रस्ता बघुन तो बंद होता तेच चांगलं होतं असं वाटायला लागलं...सगळा रस्ता मातीचा... आणि नुसता मातीचा नाही तर मोठमोठे खड्डे असलेला ... ओबडधोबड... बाजुला आमच्याकडे अधाशीपणे पाहाणारी  खोल दरी तिच्याकडे आकर्षित करीत आहे असं वाटत होतं.. फार जपुन गाडी चालवावी लागत होती... आम्ही घाटात समोर लांबवर पाहीलं... समोरुन येणाऱ्या गाड्यांची भलीमोठी रांग दिसली... जसे आम्ही ह्या बाजुला थांबलो होतो तसे त्या गाड्या पलीकडे थांबल्या होत्या ... झोजीला मधे काही ठिकाणी समांतर रस्ते होते ... त्यापैकी एका ठिकाणी रस्ता चुकलो,  वरुन काम चालु असल्याने काही ठिकाणी दगडांचा वर्षाव,  चिखलाचा राडा, गाडी घसरणे असल्या प्रकारांना तोंड देत आम्ही कसेबसे झोजी ला उतरलो... खाली येऊन पहातो तो मुंग्यांचं वारुळ फुटावं तशी सर्वञ माणसं आणि गाड्या... मुंबईमधे लोकल्स लेट झाल्यावर होते तशी तोबा गर्दी.… ! हे सर्वजण अमरनाथ याञेसाठी आलेले होते...त्यांच्यातुन वाट काढत आमचे रायडर्स सुसाट निघाले... खाली आम्हाला सोनमर्ग हे ठिकाण लागलं. तिथे आलो त्यावेळी पोटात काकयुद्ध सुरु झालं होतं... मग एका हॉटेलात मस्तपैकी मॅगी हाणली... आणि जरा आराम केला...मी सहज मागे पाहीलं., मागचा झोजीला चा डोंगर मावळतीच्या प्रकाशात सोन्यासारखा  उजळुन निघाला होता... आपले सोनमर्ग हे नाव सार्थ करत होता... 



खाणंपिणं झालं....गाड्यांवर टांगा टाकल्या ...आणि श्रीनगर च्या दिशेने निघालो... ते अंतर जवळपास ७० -८० किमी होतं ...पुढचा रस्ता तसा चांगला दिसत होता... आणखी दोन तासाचा प्रवास ... आम्ही सुसाट गाड्या सोडल्या. रस्त्याने जाताना मधेच एक चारचाकी गाडी आमच्या बाजुने पुढे जात असताना  " नमस्कार  ओ कल्याणकर ... " अशी हाक ऐकु आली. गाडीचा नंबर MH 05 असल्याने आम्ही कल्याण च्या जवळपासचे असु असा अंदाज  करुन गाडीतला तो  माणुस आम्हाला all the best...देत होता... आम्हीही त्याला प्रतिसाद दिला.  खरं तर आमची आणि त्याची ओळख असण्याची कोणतीच शक्यता नव्हती. तरीही त्याने आम्हाला हाक मारली... हाच माणुस जर महाराष्ट्रात कुठे भेटला असता तर त्याने आमच्याकडे बघितलंही नसतं...अनोळखी प्रदेशात आपल्याकडचा अनोळखी माणुसही जवळचा वाटतो... आता श्रीनगरला कसे पोहोचलो  ह्यात काही  सांगण्यासारखं नाही.... फक्त  अमरनाथ याञेमुळे रस्त्यावर मरणाचं ट्रॅफिक होतं.... श्रीनगर मधे आलो त्यावेळी तिथं वातावरण ठिक नव्हतं ...कर्फ्यु लावला होता.... त्यामुळे राञी शहरात न जाता बाहेर हायवेवरच्याच एखाद्या हॉटेलात रहावे म्हणजे  कर्फ्यु मधे न अडकता सकाळी लवकर निघता येईल असा विचार करुन आम्ही शहराबाहेरच राहीलो... रात्री झोपायच्या तंद्रीत असतानाच खोप्या आणि पियू हातात लहानसा केक घेऊन आमच्या रूम मध्ये आले… रात्रीचे १२ वाजले होते … २७ तारीख … माझा वाढदिवस होता जो ह्या धावपळीत माझ्याही लक्षात नव्हता … पण बाकीच्यांनी आठवणीने सगळी तयारी केली होती … केक-बिक खाल्यानंतर खोप्या , संदीप , पप्या आणि पियू यांनी जी भेटवस्तू दिली , ती बघून तर मला काय बोलावं तेच कळत नव्हतं … मी माझ्या अल्पमतीने लिहिलेल्या blog च्या प्रिंट काढून ते पुस्तक रुपात माझ्या हाती दिलं … आईला आपलं नवजात बाळ पहिल्यांदा पाहिल्यावर जसं वाटत असेल तसंच काहीसं त्यावेळी मला वाटलं … काय बोलणार ? धन्यवाद मित्रांनो …!!!




शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १२ …

                                         सकाळी  डी - झोजीला हॉटेल चा निरोप घेतला . सर्व समान घेऊन बाईक्स पाशी आलो…  बाईक्स वर समान बांधू  लागलो तसे  आमच्या आजूबाजूला हॉटेलच्या आसपासचे लोक जमा झाले … आम्ही त्या सगळ्यांचा  चांगलाच  मनोरंजनाचा विषय झालो होतो … मला डोंबारयाच्या  खेळाची आठवण झाली … लोक आमच्याकडे त्याच कुतूहलाने पाहत होते… हे समान लवकर बांधून होईल आणि इथून लगेच निघता येईल तर बरं  , असं  मला वाटू लागलं … शेवटी आमचं विंचवाचं  बिऱ्हाड घेऊन आम्ही निघालो…. सकाळचं  कोवळं  उन पडलं  होतं … वर निळंशार  आकाश …जमिनीवरचा रखरखाटपणा  जाउन  आता हिरवळ दिसू लागली … मोठमोठी झाडे अदबीने रांगेत उभी असलेली दिसत होती . अधून मधून काही  ' काश्मिरी कळ्या '   उमललेल्या दिसत होत्या …



                 कारगिलला येण्याआधी आणि तिथून निघताना वाटेत काही लहान मोठी गावं  लागली … त्यातल्या लहान शाळकरी मुलांची निराळीच सवय दिसली… आमच्या गाड्या  ज्या  ज्या गावातून जात होत्या त्या त्या गावातली लहान मुले आम्हाला  टाळ्या मारण्यासाठी  रस्त्यात आडवा हात पसरून उभी होती … सुरुवातीला आम्हाला वाटलं  कि लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत आहेत , परंतु नंतर  लक्षात आल्यानंतर आम्हीही उस्फुर्तपणे  त्यांना प्रतिसाद दिला … गोऱ्या  , लाल गालाची , गोबरी , लहान लहान मुले आम्हाला टाळ्या देण्यासाठी धडपडत होती …हे करताना  त्यांना भारी मजा वाटत होती,  असं  त्यांच्या हसऱ्या  चेहऱ्यांवरून कळत होतं … मी तर आडवा हात पसरूनच बसलो होतो … लहान मुले रांगेत उभे राहून  टाळ्या देऊ लागले … काही खट्याळ  पोरं जोरात फटका मारायची … एकाने तर कहर केला , हातात लहानसा दगड घेऊनच टाळी  देण्यासाठी तो उभा होता … त्याला लांबूनच नमस्कार केला अन सटकलो … उजवीकडे दुधासारख्या पांढर्याशुभ्र , खळाळत  वाहणाऱ्या नदीच्या सोबतीने निघालो… एके ठिकाणी रस्ताच्या कडेला नदीच्या बाजूला दगडाची मोठी आणि उंच भिंत उभारलेली आढळली …आणि तिथे एक बोर्ड लिहिलेला होता जो वाचल्यानंतर मानेवर बर्फाचा थंडगार खडा ठेवल्यासारखं ... अहं .... हा जुना वाक्प्रचार झाला....नविन वाक्प्रचार,  मानेवर डिओड्रंट स्प्रे मारल्यासारखं  वाटलं …!  बोर्ड होता - ' You are under enemy surveillance ...' '  दुश्मन आपको देख रहा है । '  संदीप म्हणाला , " ह्या भिंतीच्या आणि नदीच्या  पलीकडे डोंगरावर पाकिस्तानची चौकी आहे …त्यांना आपला  रस्ता दिसू नये म्हणून ह्या भिंती बांधल्या आहेत…"   सहज दोरी म्हणून दुर्लक्ष करावे आणि तोच जहरी नाग निघावा तसं  बाजूने खळाळत वाहणारी ती  नदी  ' लाईन ऑफ कंट्रोल '  आहे हे समजल्यावर  तिच्या  सौंदर्याचे  भीषणतेत  रुपांतर झाले …एकुणच कारगिल मधे येण्याअगोदर आणि त्यापुढे जात असताना एक प्रकारचा तणाव जाणवत होता. लेह लडाखचं स्वच्छ, मुक्त आणि आनंदी वातावरण या प्रदेशात कुठेतरी हरवुन गेलंय असं सारखं वाटत होतं... कारगिल चा इतिहास असेल किंवा इथे प्रत्यक्षात दिसत असलेल्या सैनिकांच्या चौक्या असतील , वातावरण संघर्षपुर्ण,  धामधुमीचं वाटत होतं... आता रस्त्याने जाताना हिरवी झाडे सोबतीला होती...  पुढे द्रास कडे कुच केलं. द्रास हे अतिशय थंड हवेचं ठिकाण.... तिथेच कारगिल युद्धाचं विजय स्मारक आहे... जणू शिस्तीने उभ्या राहिलेल्या हिरव्यागार झाडांमधून लांबवर आम्हाला विजय स्मारक दिसलं …



 
' ए वतन … ए वतन … हमको तेरी कसम …. ' , ' मेरा रंग दे बसंती चोला … ' अशी देश भक्तीपर गीते लावली होती …त्यामुळे आधीच भारावलेल्या वातावरणाला पार्श्वसंगीत लाभल्याने ते अधिक प्रभावी झाले होते … सैनिक सज्ज झाले होते . थोड्या वेळातच तिथे परेड सुरु होणार होती. आर्मीचा कोणी मोठा ऑफिसर तिथे भेट देणार होता … एकूणच वातावरण रोमांच आणणारं होतं … आम्ही तिथे पोहोचलो … अमर जवान च्या ह्या स्मारकावरील ओळी वाचल्या , आणि सर्रकन काटाच आला अंगावर …. !!!




आम्ही त्या स्मारकासमोर उभे होतो. एकूण १०९१ शहिदांची नावे त्यांच्या रेजिमेंटनुसार त्यावर लिहिली होती . हेच ते वीर ज्यांनी मातृभूमीसाठी कारगिलच्या होमकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली … त्यांचा सन्मान म्हणून त्या सगळ्यांची नावे स्मारकावर कोरली होती … विजय स्मारकाला  अभिवादन करुन आम्ही बाजुला असलेल्या कारगिल युद्धासंदर्भातील वस्तुंचे प्रदर्शन बघायला गेलो. सुरुवातीलाच हरिवंशराय बच्चन यांची ' अग्निपथ ' ही कविता लिहिलेली दिसली... वीररसाला साजेशी अशी ती कविता आहे ती...! प्रदर्शनात बॅटल ऑफ टोलोलींग, बॅटल ऑफ टायगर हिल ह्यांचे मॉडेल्स बनवलेले, युद्ध साहित्य , बॉम्बगोळ्याचे शेल्स ठेवलेले , कारगिल युद्धातील वीरांचे फोटो होते... ते पाहुन मी भारतीय आहे ह्याचा अभिमान वाटला.  इथे येणारा प्रत्येक जण मातृभुमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांपुढे नतमस्तक होतो... भारलेल्या डोळ्यांनी ते  प्रदर्शन पाहुन बाहेर आलो. त्यावेळी आर्मीचा तो बडा ऑफिसर तिथे आला … आमच्या पेहेरावाकडे बघून आम्ही बायकर्स आहोत हे त्यांनी बरोब्बर ओळखले . त्यांनी आमची आस्थेने विचारपूस केली … आमच्यात एक मुलगीही आहे हे समजल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पियुची प्रशंसाही केली … लहानपणी घरात आलेल्या पाहुण्यांनी  चॉकलेट
देऊन कौतुक केल्यानंतर जसा होतो तसा आनंद
आम्हा सगळ्यांना झाला … तिथे दोन तीन सैनिकांशी बोललो.... " आप लोग कहॉं से है? " त्यातल्या एका सैनिकाने मला विचारलं.  "मुंबई " म्हटल्यावर त्याने स्मित केलं आणि म्हणाला " मुंबई और दुबई मे क्या फर्क है?  " मला कळेना तो असं का विचारत होता ते... " सरजी , मुंबई तो अपने देश मे है..." माझ्या उत्तरावर तो समजुतीने हसला. तो तसा का हसला हे मात्र कळले नाही … तिथल्या सैनिकांनी  कारगिल युद्धाबद्दल माहीती दिली ... " वो सामने पहाड दिख रहां है, वहॉं तक दुष्मन अंदर घुस आया था... " समोरची टेकडी आम्ही बघितली. ती फारतर २०० मीटर लांब असेल... त्यावर टोलोलींग असं लिहीलं होतं. आईशप्पथ....!  म्हणजे ' बॅटल ऑफ टोलोलींग 'ही आम्ही उभे होतो त्याच ठिकाणी झाली होती तर...!  प्रत्यक्ष युद्धभुमीत उभे होतो आम्ही...! " टायगर हिल यहां से कितना दुर है...? " आमच्यातल्या कोणीतरी विचारलं. " वो देखिये सामने टायगर हिल..." आम्ही बघीतलं ... ते शिखर इतकं दिमाखदार दिसत होतं की  त्या शिखराला दुसरं कोणतच नाव शोभलं नसतं... त्याला स्वतःचा वेगळाच असा सार्थ अभिमान होता.…




टायगर हिल काबिज केल्यानंतर आपल्या विजयी जवानांचा हाती तिरंगा घेतलेला फोटो असलेले टी शर्ट तिथे विक्रीस ठेवलेले होते,  ते आम्ही सर्वांनी घेतले. ते नुसते टी शर्ट नव्हते तर एकप्रकारचा बहुमान वाटत होता… , 'ताकद वतन की हम से है....' हे गाणं लागलं होतं .. खरंच ते किती सार्थ आहे हे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही... भारावलेल्या मनाने आम्ही तिथुन निघालो. आज आम्हाला श्रीनगर गाठायचं होतं. बरंच अंतर कापायचं होतं … निघता निघता , " कर चले … हम फिदा … जानोतन सथियो …. " हे गाणं लागलं …. पावलं आपोआप जड झाली ….



शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

दुचाकी लडाखायण …भाग - ११

                                  सप्प्... धनुष्यातुन  बाण सुटला आणि 50  फुटांवर ठेवलेल्या लहानश्या बॉक्स मधे घुसला.  त्याबरोबर आम्ही एकच जल्लोश केला. आमच्या हॉटेलचे मालक गलवान अंकल  धनुर्विद्येत भलतेच पारंगत होते... त्यांनी आम्हालाही त्यांचा धनुष्यबाण दिला ... तो चालवणं किती अवघड आहे ह्याचा प्रत्यय तो हातात घेतल्यावर आला . धनुष्याची प्रत्यंचा कितीही जोर लावला तरी खेचली जात नव्हती.  कधी बाण तिरका जात असे तर कधी समोरच पडत असे. पुढे ठेवलेल्या टार्गेटच्या जवळपासही कुणाचा बाण जाईना. गलवान अंकलनी पुन्हा आमच्याकडुन तो धनुष्य घेतला आणि बरोब्बर नेम साधला. Bulls eye....!!!  गल्वान अंकलनी त्यांच्या गेस्टहाऊसच्या आवारात छोटीशी बाग केली होती व उरलेल्या जागेत शेती केली होती... गेस्टहाऊस मात्र आटोपशीर पण छान होतं... आम्ही लेह मधल्या आमच्या वास्तव्यात त्या गेस्टहाऊस वर अगदी मजेत राहीलो. परंतु आता तिथून निघण्याची वेळ आली होती …
                                 आज सकाळीच आम्ही लेह सोडुन आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार होतो. पण आम्ही ते गेस्टहाऊस जणु सोडुन जाऊ नये अशी परिस्थीती निर्माण झाली. आज सकाळपासुनच लेह मधे जोरदार पाऊस सुरु झाला. आणि तो थांबायचं नावच घेईना.... सकाळी 8 वाजता आम्ही निघणार होतो. पण आता 10 वाजले तरी आम्ही काही बाहेर पडु शकलो नव्हतो. गल्वान अंकल म्हणत होते,  "आज मत जाओ, ये बारीश नही रुकेगा… " पण आम्हाला पुढे जम्मु मधे लवकरात लवकर पोहोचणं अतिशय गरजेचं होतं,  कारण आमच्या परतीच्या प्रवासाची ट्रेनची तिकीटे अजुनही confirm झालेली नव्हती. त्यामुळे त्यासाठीची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला एक दिवस आधी जम्मूत जाणे क्रमप्राप्त होते. पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही आपापल्या आवडत्या देवाचं नाव घेऊन गाड्यांवर टांगा टाकल्या.…  भुरुभुरु पाऊस पडतच होता. बाहेर तर पडलो , पण बाहेर पडुन आम्ही  चुक तर केली नाही ना असं  वाटु लागलं.…  पण जसजसे आम्ही  लेह शहर सोडुन पुढे जाऊ  लागलो तसतसे पावसाचे  प्रमाण कमी होऊ लागले. हा खरंच शुभशकुन होता.…  थोडं पुढे गेलो आणि ग्रहण सुटावं तसा सुर्य ढगाआडुन समोर आला… . सहस्ञ किरणांचे उबदार  बाण अंगावर घेत आम्ही  निघालो.…  लेह शहर जवळपास सर्वच बाजुंनी  डोंगरांनी  आणि पर्वतांनी वेढलेले  आहे.  चहा प्यायच्या कप बशितली  बशीच जणू …! लेह शहराबाहेर पडल्यावर मॅग्नेटीक हिल हा एक भुगर्भशास्ञीय  चमत्कार आम्हाला बघायला मिळाला.…  तिथे कसलेही बाह्य  बल न लावता चढणावर २०-३० फुट गाडी आपोआप वर चढते. अगदी बंद गाडी सुद्धा …!  खोप्याने ही गोष्ट पुर्वी आम्हाला सांगितली होती. पण आम्ही त्याला त्या वेळी काही सिरियसली घेतलं नव्हतं…   पण आता माञ निसर्गाचा  हा अद्भुत जादुचा प्रकार पाहुन  आम्ही अगदी थक्क झालो.  अशी  किती रहस्ये हिमालयाच्या  उदरात दडलेली आहेत हे तो कैलासाधिपतीच जाणे...!



                                   रस्त्याने जाताना उन पावसाची पकडापकडी चालुच  होती. लांबवर कुठेतरी काळ्या ढगांनी गच्च भरलेलं आभाळ दिसु लागलं. पावसाची रिपरिप चालु झाली. हा काही आपली पाठ सोडणार नाही हे ओळखुन आमच्या रायडर्सनी  गाडी तशीच पुढे दामटायला सुरुवात  केली.…  पुढे ' फुटु-ला ' नावाचा पास  लागला. सगळ्या रस्त्यावर  रिपरिप पडणाऱया पावसामुळे  चिखलाचा राडा झाला होता आणि  वातावरणात एक प्रकारचा विचिञ  गारठा आला होता. ' फुटु-ला ' पास  जसजसा वर चढत होतो तसा गारठा आणखीनच वाढु लागला. मी तरी मागे बसलो होतो. पण संदिप, खोप्या आणि पप्या  हे गाडी चालवत होते , समोरुन येणारा थंडगार वारा थेट त्यांच्या अंगावर येत होता. हातात हँडग्लोज होते तरी बोटे थंडीने आखडली  होती. मधे थोडा वेळ ब्रेक  घेतला . अंगात थंडी इतकी भरली  की नीट उभंही राहता येत  नव्हतं. सु सु च्या ब्रेक  नंतर संदिप म्हणाला,  "आता  जरा बरं वाटतंय " कसं  काय ? म्हणुन विचारलं तर म्हणाला, " मॅन व्हर्सेस वाईल्ड वाल्या बेअर ग्रिलस  ची टेकनिक वापरली. थंडीने आखडलेल्या  बोटांवर सुसु केली. फरक  पडला जरा.…   " मलाही तसं करावसं वाटलं पण आमची टाकी नुकतीच रिकामी करुन आल्याने माझा भलताच हिरमोड झाला…  तसंच कुडकुडत  पुन्हा आपापल्या बाईक्सवर बसलो अन् निघालो थोडं पुढे जातो न जातो तोच गाड्यांची  रांग लागलेली दिसली. इतका वेळ जरा चुकल्या चुकल्या  सारखं वाटत होतं पण समोरचा बंद रस्ता बघुन वाटलं  की आपण योग्य रस्त्यावर  आहोत.…  ह्या सबंध लडाखायणात  असा एकही पास (घाट) नव्हता की जिथे आम्हाला रस्ता  चांगल्या स्थितित मिळाला. रस्ता  दुरुस्तीच्या कारणामुळे  प्रत्येक ठिकाणी आम्हाला थांबावं लागत होतं आणि 'फुटु-ला'  पास ह्या गोष्टीला अपवाद कसा असेल…?  अर्ध्या तासाने रस्ता मोकळा झाला. आता आम्हाला कारगिल च्या दिशेने जायचे होते. मातीचा, खडीचा रस्ता, बाजुला नुकतीच वयात आल्यासारखी, अल्लड, खळाळत वाहणारी सुरु नदी आमची साथ देत होती. जवळपास, सर्वच रस्ते नदीच्या मार्गाने जात होते. सुमारे ६ वाजता आम्ही कारगिल ला पोहोचलो. युद्धभुमी ...! तिथे पोहोचल्यावर , तिथल्या सैनिकांच्या चौक्या पाहिल्यावर एक वेगळीच अनुभूती आली …वीररसाने भारलेलं  वातावरण …! लाईन  ऑफ कंट्रोलला अगदी खेटूनच होतो…सरहद्द …!    तिथे हॉटेल  डी- झोजीला  म्हणुन एक भलं मोठं हॉटेल होतं. एखाद्या जुन्या काळातल्या गढीवजा आकाराचं आवाढव्य बांधकाम होतं त्या हॉटेलचं....!  आजची रात्र इथेच काढायची  ठरवली … गाड्यांवरचं सामान काढुन आपापल्या रुमवर नेणे हे सगळ्यात अवघड काम वाटे. कारण सबंध दिवस कष्टप्रद प्रवास केल्यानंतर जेव्हा समोर विसाव्याचं ठिकाण दिसत असेल तर पावलं आपोआप जड होतात. रुममधे कसेबसे गेलो. अत्यानंदाची गोष्ट म्हणजे रुम मधे टिव्ही होता . तब्बल १०-११ दिवसांनंतर आम्ही आज टिव्ही पाहणार होतो. सितामाईला अशोकवनात प्रभुरामचंद्रांची अंगठी पाहील्यावर झाला नसेल त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आनंद आम्हाला तो टिव्ही बघीतल्यावर झाला…. कोणता चॅनल बघु अन् कोणता नको असं झालं. हॉटेलवर STD होता. तो बघितल्यावर मला कॉलेज ची आठवण आली … घरच्यांना खुशालीचे फोन झाले.…  खुशाली म्हणण्यापेक्षा  ' अजून जिवंत आहोत '  हे कळवण्यासाठी फोन झाले ….  राञीच्या  जेवणात ताटानुसार पैसे होते, आणि ते खुपच जास्त  असल्याचे सर्वांना जाणवलं. त्यामुळे  जेवण हे "अलाकार्टे " पद्धतीने मागवुया म्हणजे विनाकारण जास्त पैसे जाणार नाहीत  असे पियु म्हणाली. ही नविनच भानगड मी ऐकत होतो. अलाकार्टे म्हणजे सर्व पदार्थ न घेता निवडक पदार्थ जेवणासाठी घ्यायचे व फक्त  त्या पदार्थाचे होतील तेवढेच पैसे द्यायचे. हि कल्पना सगळ्यांना आवडली . त्यानंतर सर्वानुमते अलाकार्टे च्या नावानं चांगभलं केलं...' अरे अलाकार्टे आहे , नो प्रोब्लेम ...,  अलाकार्टे आहे , हे मागवा , ते मागवा ...' करत बरेच वेगवेगळे पदार्थ घेतले . आणि जेव्हा बिल मागवलं तेव्हा मात्र काय झालं असेल हे सूज्ञ वाचकांस सांगणे नलगे …!! भलं  मोठं बिल आमच्याकडे मिश्किलपणे पाहत आहे  असं  मला जाणवलं … 





रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

दुचाकी लडाखायण... भाग - १०

                            पँगाँग लेक... !  लडाख मधलं  असं  ठिकाण कि ते जर नसतं  तर तिथल्या प्रदेशाच्या सौंदर्यात कुठेतरी कमीपणा आला असता . सर्व साज शृंगार केलेली नववधू आणि कपाळावर टिकली नाही , अशी काहीतरी अवस्था  झाली असती , पँगाँग लेक नसता तर ...!!!   आज  आम्हाला पँगाँग लेक ला जायचे होते. आधल्या दिवशी   गॅरेजवर भेटलेल्या त्या मित्राने  पँगाँग लेक वरून येताना त्या  भयानक शैतान नाल्याबाबतीत सांगितलेल्या सुरस गोष्टीं आम्ही ऐकल्या होत्या.  शैतान नाल्यासंदर्भात तो म्हणाला होता की,  संध्याकाळ झाली की त्या नाल्यातलं पाणी वाढतं. कारण दिवसा उन्हामुळे जमा झालेलं बर्फ वितळते  आणि मावळतीच्या वेळी ते लहान लहान ओहोळांमार्फत एकत्र येऊन शैतान नाल्याला येऊन मिळते. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह संध्याकाळी त्या नाल्यातून वाहातो. जर पँगाँग लेक ला जायचे असेल तर एका दिवसात जाऊन येणे अशक्य आहे. तुम्ही रात्री तिथे रहा आणि दुसऱया दिवशी सकाळी निघा असा सल्ला त्याने आम्हाला दिला. परंतु आमच्या ठरलेल्या वेळापत्रकानूसार पँगाँग लेकला रहाणे शक्य नव्हते. तो लेक जवळपास 150 किमी लांब होता म्हणजे एकूण अंतर 300 किमी होणार होते. एवढ्या लांबचा पल्ला बाईक वर एका दिवसात जाणे आता आम्हाला शक्य नव्हते  त्यामुळे मग एका दिवसासाठी गाडी करुन जाणे याशिवाय चांगला पर्याय आम्हाला तरी दिसत नव्हता. हॉटेलच्या मालकाने एक गाडी सांगितली. गाडीने जाण्याचा आणखी एक फायदा असा होता की आमच्या रायडरर्सना आरामही मिळणार होता. हमने एक तिर से दो शिकार किये.....   सकाळी 7 च्या सुमारास गाडी आली.  लहान असताना शाळेच्या सहलीला जावे तसे आम्ही त्या गाडीत जाउन बसलो.‍.. आता आरामात जाता येणार होतं. पप्या तर मागच्या सिट वर आडवाच झाला. पँगाँग ला जाताना मधे चांग- ला ही खिंड लागते. घाट सुरू होण्याआधी आम्ही एका पंजाबी हॉटेल वर  जाऊन मस्त परांठे हाणले... बऱयाच दिवसांनी त्या राईस,  नुडल्स ला पकलेले आम्ही पराठ्यांवर तूटून पडलो. नाष्टा झाला, निघालो... चांग- ला चा घाट सूरू झाला.....



आम्ही गाडीतून बाहेर वर पाहिलं तर वरचा पर्वत गडद पांढऱया धुक्यात हरवुन गेलेला दिसत होता. घाटाने वर गेलो तसे गाडीच्या पुढच्या काचेवर थेंब पडत असलेले दिसले. आमच्या गाडीचा ड्रायवर म्हणाला "उपर बरप गिर रहा है। "  बर्फ ....!!! खरीखुरी हिमवृष्टी ...! आईशप्पथ ...! आमच्या मनोरथाचे घोडे ' बर्फात ' नहाले .



 थोडे आणखी वर गेलो,  वर आकाशातुन कुणीतरी कापुस पिंजुन खाली टाकत आहे असं वाटत होतं. वर पोहोचलो,    वातावरण तर असं होतं की आम्ही कुठल्या तरी अद्भुत आणि जादुई नगरीत आलोय. बर्फाचे पांढरेशुभ्र कण हवेबरोबर कसेही उडत येत होते. हिमवृष्टी अनुभवायचा माझा पहिलाच प्रसंग... सगळं वातावरण भारलेलं. ड्रायवर ने गाडी थांबवली.  शाळा सुटल्यानंतर लहान मुले धावत पळत बाहेर येतात तसे आम्ही गाडीबाहेर पडलो. मजबुत थंडी होती बाहेर,   कुडकुडत उभे राहीलो. चांग -ला  लिहिलेल्या पाटीसमोर उभं  राहून फोटो काढून घेतले ... पुरावा म्हणून...!



                  खोप्याच्या डोक्यात नविन कल्पना आली.  एक काचेचा ग्लास घेतला बर्फाने पुर्ण भरला आणि त्यात कोकाकोला टाकुन पिऊ लागला. कोक ऑन द रॉक्स .... धमाल आली.  तिथेही खोप्या आणि पियु लहान मुलांसारखं बर्फात जाऊन खेळत होते. ह्या आख्या लडाख टूर मधे कोणती जडीबुटी खाल्ली होती देव जाणे... आम्ही माञ लगेच गाडीत जाऊन बसलो. पुढे निघालो . वळणं तर अगदी पाचवीला पुजली होती.  मधे रस्त्यात एका ठिकाणी काळ्या केसांचे याक दिसले. निसर्गाने खडबडीत रंगाचे दगडी कपडे काढून हिरवीगार शाल लपेटून घेतलेली दिसली . थोडा पुढे जातो न जातो तोच खोप्या जीव खाउन ओरडला ... " वूल्फ .... वूल्फ ..." . ड्रायवर ने करकचून ब्रेक दाबला ... मागे झोपलेला पप्या घाबरून तडफडत जागा झाला... बघतो तर तो कोल्हा  नसून असाच एक गावठी  केसाळ कुत्रा होता ... सगळे पक्के वैतागले खोप्यावर ...! त्यानंतर उगाचच आम्ही त्याची खेचू लागलो ...  बरेचसे डोंगर पार केल्यानंतर एका वळणावर दुरवर पँगॉंग लेकचं बारीकसं  प्रथम दर्शन आम्हाला घडलं. काळ्या राखाडी पर्वतांच्या पार्श्वभुमीवर पँगॉंग लेकचं आकाशी रंगांच्या विविध रंगछटा असलेलं प्रथम दर्शन डोळ्यांना आणि मनालाही अतिशय सुखावह असं वाटत होतं.



                परंतु तिथं पोहोचलो आणि आमचा भ्रमनिरास झाला. समोर विस्तीर्ण पँगॉंग लेक पसरलेला. परंतु   कलर मुघले आझम बघण्यासाठी जावं आणि समोर पुन्हा तोच जुना ब्लॅक अन् व्हाईट सिनेमा लागावा तसं काहीसं झालं. बरेच ढग जमा झाल्याने  आकाशाची निळी नितळाई काही त्या उतरली नव्हती. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे मात्र उतरले... असे म्हणतात कि चांगल्या वातावरणात पँगॉंग लेकमध्ये निळ्या रंगांच्या आठ वेगवेगळ्या छटा  दिसतात . परंतु आमच्या नशिबात बहुदा ते पाहणं नव्हतं . पँगॉंग लेकचं आडवं पसरलेलं एक टोक लांबवर कुठेतरी पर्वतरांगांमधे हरवुन गेलेलं ...





थोड्या वेळाने वरची ढगांची गर्दी काही काळासाठी हटली. आणि त्या  निळ्या नितळाईचं  हलकंसं  दर्शन आम्हाला झालं ... ते आम्ही अधाशासारखे  डोळ्यात साठवून घेऊ लागलो.


पँगॉंग लेक ने आमचा थोडा भ्रमनिरास केला . आम्ही  निघालो ते भविष्यात पुन्हा इथे येउन ह्या पँगॉंग लेकची निळी नितळाई अनुभवण्याचा पक्का इरादा करूनच....!



रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ९


                   आज सकाळी उठल्यापासूनच मनात धाकधुक सुरु झाली.... आता आम्ही जगातल्या हाय्येस्ट मोटोरेबल रोडवर जाणार होतो... खारदुंग-ला पास ! लेह पासून फक्त ५० किमी लांब .... आणि तिकडे जायचा रस्ताही लेह शहरातून दिसत होता .... आम्ही एकदमच १८३८० फुटांवर जाणार होतो .... भीती अशासाठी होती कि , टांगलांग - ला हे  खारदुंग-ला पास पेक्षा उंचीने कमी होतं , त्या तिथे माझी ही  हालत  झाली ,  इथे आता तर त्यापेक्षाही अधिक उंचीवर जायचे होते ... त्यामुळे मी तिथे जाईन  तर दुचाकीवर ... पण येताना मात्र चार चाकीवर येईन कि  चार खांद्यांवर ...?? ही भीती मनात घर करून बसली ... इतकी कि मी मेडीकल मध्ये जाऊन ऑक्सिजनचा एक छोटा सिलिंडर पण विकत घेतला ..., उगाच रिस्क कशाला घ्या...!  आम्ही निघणार तेवढ्यात खोप्याचं  लक्ष त्याच्या बुलेटच्या मागच्या टायरकडे गेलं .... त्याचा तो टायर  आणि मागील मडगार्ड घासून  टायरची झीज सुरु झालीय असं  लक्षात आलं ... हि  खरंच चिंतेची बाब होती... असाच जर  टायर  घासत राहिला  तर तो फुटण्याचा संभव होता ... आणि मुख्य म्हणजे त्यावरील सामानामुळे आणि वजनामुळे तर तो नक्कीच फुटला असता ... आता काहीही करून garage  गाठणं भाग होतं. आम्ही शहराच्या बाहेर एका garage मध्ये गेलो ... तिथे बाकीचे लोकही आपापल्या बुलेट दुरुस्त करून घेण्यासाठी आले होते ... गाड्यांच्या रांगा  लागल्या होत्या , मग थांबणं तर आलंच ... आम्ही वर  खारदुंग-ला च्या दिशेने बघितलं ... वर खूप काळे ढग  जमा झाले होते ...  तिथे जोरदार पाउस आणि हिमवृष्टी होणार अशी चिन्हे दिसत होती ... आमच्या हॉटेलचा मालक निघताना म्हणाला होता कि तिथलं  वातावरण सारखं  बदलत असतं ... सकाळी तर तसं काही  दिसत नव्हतं ... आणि आता  वर जोरदार हिमवृष्टी होतेय हे बघून तर आम्ही ' आता काही खरं  नाही ! ' असेच चेहरे केले ... 
         इकडे garage  वाल्याने आमची गाडी हातात घेतली... तो त्याच्या कामात भलताच  तरबेज होता ... गाडीला बघता क्षणीच त्याने काय प्रॉब्लेम  आहे ते सांगितलं ... मागच्या टायरमध्ये लोखंडी रॉड  टाकून मडगार्ड वर उचलून घेतलं... मी , पप्या  आणि संदीप तिथे असलेल्या दुसऱ्या  बुलेट बघत बसलो... २-३ तास त्यातच गेले , काम झालं , आम्ही निघालो . तोपर्यंत खारदुंग-ला पास वर हिमवृष्टी होऊन गेली होती ... आमचं  नशीब चांगलं म्हणून खोप्याची गाडी garage  ला घेऊन जायला लागली नाहीतर आम्ही त्या हिमवृष्टीत नेमके सापडलो असतो ... खारदुंग-ला ला  जाताना रस्ता मात्र चांगला होता . असाच रस्ता असेल तर मग बरं  आहे असा विचार करत असतानाच एकदम दगड मातीचा रस्ता सुरु झाला ... काही अंदाज बांधू लागलो कि निसर्ग त्याचे झाकून ठेवलेले पत्ते आमच्यासमोर उलघडत असे ... unpredictable ...!!! जसजसे वर जाऊ तसतसे रस्त्याची परिस्थिती बिघडत होती ... खरं सांगायचं  तर त्या ठिकाणी रस्ता तयार करणं हेच जिकिरीचं  काम आहे ... खडक असा तो कुठे नाहीच... नुसती ठिसूळ माती ... वळणावळणाचे U टर्न घेत आम्ही वर चढू लागलो.... बाजूची ठिसूळ माती घसरून खालच्या रस्त्यावर पडत होती ... आम्ही मध्यापर्यंत आलो... इथून पुढे रस्त्यावर बर्फाच्या राशी पडलेल्या दिसू लागल्या ... त्यांतून झिरपणाऱ्या  पाण्यामुळे आणि ठिसूळ मातीमुळे रस्त्यात बऱ्याच ठिकाणी चिखलाचा राडा झाला होता ....






   संदीपची  आणि खोप्याची गाडी व्यवस्थित होती , पण पप्याची गाडी सारखी मागे मागेच राहत होती... आम्ही एका ठिकाणी थांबून त्याची वाट पाहू लागलो... त्याची गाडी प्रॉब्लेम  द्यायला लागली ... थोड अंतर गेलं  कि गरम होऊन बंद पडत होती ... पप्या अगदी मेटाकुटीला आला होता ... रस्त्यात कुणाच्यातरी  २ यामाहा FZ  गाड्या बंद पडलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या आम्ही मागे पहिल्या होत्या  ... आणि दुर्दैवाने पप्याची गाडी यामाहा FZ च होती.... आम्ही खारदुंग-ला वर पोहोचलो तरी पप्या  अजून  कसा आला नाही म्हणून  आम्ही पुन्हा खाली यायला निघालो तर महाशय हळूहळू येत असलेले दिसले... तो केवळ पप्या  होता म्हणून वरपर्यंत त्याची यामाहा गाडी घेऊन येऊ शकला ... मानलं साल्याला  ...! 

                            
    

               
                    ' खारदुंग-ला वर १० मिनिटांच्या वर थांबू देत नाहीत ' , ' सगळ्यात उंच ठिकाणचा रस्ता असल्याने श्वास घायला फार त्रास होतो ' , वगैरे वगैरे अशी मौलिक माहिती आधीच  सांगून खोप्याने माझं  उरलं  सुरलं धैर्यही संपवलं  होतं ... वर कोणीच नसेल असा कयास बांधून माथ्यावर पोहोचलो आणि बघतो तर काय ...?? वर माणसांची जत्राच भरल्यासारखी वाटत होती .... लहान लहान मुले बर्फात खेळत होती... बरीच वयस्कर माणसेही तिथे आम्हाला दिसली... जगातला सगळ्यात उंच cafeteria ही  तिथे होता . आता बोला....!! आणि इतक्या उंचीवर श्वासाचा ही  काही त्रास जाणवत नव्हता .... पुन्हा पोपट ...!!  घाबरून विकत घेतलेला ऑक्सिजनचा सिलिंडर वाया गेला... ! पण वरचं  वातावरण फारच आल्हाददायक होतं ...  सर्वत्र बर्फाच्या पांढऱ्या राशी ... मस्त उन पडल होतं ... आणि त्याचं   परावर्तन होऊन डोळ्यांसमोर प्रारणं  चमकत होती... आम्ही सर्वांनी खारदुंग - ला लिहिलेल्या पाटी  समोर उभं  राहून फोटो काढून घेतले ... 
              

                          खर तर आम्ही पुढे नुब्रा vally  लाही जाणार होतो पण ते आणखी १०० किमी पुढे होते आणि आधीच निघायला उशीर झाल्याने आमचा नाईलाज झाला... खारदुंग - ला पर्यंत जाऊन आम्ही पुन्हा माघारी फिरलो... परतीच्या वाटेवर पप्या  कुठे गायब झाला काही कळलं  नाही , तो आम्हाला डायरेक्ट जेवणाच्या हॉटेलवर भेटला... जेवण झाल्यावर आम्हाला भलताच कंटाळा आला... खोप्या आणि पियू म्हणत होते कि थिकसे मॉनेस्ट्री बघायला जाऊया , पण आम्हाला जाम  वैताग आला होता , मी संदीप आणि पप्या रूम वर जाऊन पडलो ... खोप्या आणि पियुचा उत्साह खरच हेवा वाटण्याजोगा होता ... ते दोघे गेले ती मॉनेस्ट्री बघायला ... ! पण नंतर त्या मॉनेस्ट्रीचे फोटो बघितले आणि तिथे न जाऊन आम्ही बरंच  काही मिस केलं  असं  वाटू लागलं ... संध्याकाळी संदीप ने त्याची  गाडी garage  मध्ये नेली ,  गाडीचे शॉकअब्सोर्बेर खराब झाले होते , ते बदलले ...  पप्याच्या गाडीचेही  काम निघाल्याने आम्ही दोघे दुसऱ्या  garage  मध्ये गेलो... तिथे एक जण  आम्हाला भेटला , तोही तिथे त्याची बाईक दुरुस्त करायला आला होता .  त्याने कथन केलेले अनुभव ऐकले आणि आम्ही सर्दच झालो... रोहतांग मध्ये एका ओढ्यात पडून त्याचे पाकीट , इतर महत्वाची कार्डे , कागदपत्रे वाहून गेली ...., पँगाँग लेक वरून येताना शैतान नाल्यात स्वतः वाहून जाता जाता वाचला , खारदुंग ला मध्ये गाडीवरून धडपडला , गाडी बंद पडली ... आणि १० किमी च्या वर अंतर गाडी ढकलत घेऊन आला .... हे ऐकल्यावर मात्र आम्ही आतापर्यंत झालेल्या प्रवासात चांगलेच सुदैवी ठरलेले होतो असं  वाटू लागलं.... एव्हढं  सगळं  त्या माणसाबाबत घडलं  पण त्याच्या चेहऱ्यावर थकव्याचा किंवा नैराश्येचा लवलेशही नव्हता ... उलट ते आम्हाला सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज दिसत होतं .... युद्ध जिंकून आलेल्या  सैनिकाला  त्याच्या जखमांची काहीच पर्वा  नसते ....  खरंच  , हा प्रदेशच असा आहे कि तिथे माणसाचा कस लागतो ... एकाच वेळी  स्वर्गासम सृष्टीसौंदर्याची प्रचीती येते  आणि त्याचवेळी नरकयातनाही  भोगाव्या लागतात...  आणि आम्ही त्याचा  ' याची देही याची डोळा ' अनुभव घेत होतो ...

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण .... भाग - ८


                   लेह मध्ये पोहोचायला रात्रीचे ८.३० -९ झाले ... राहण्याची व्यवस्था कुठे करावी हे ठरवण्यात बराच वेळ गेला ....एकतर भयंकर दमून आम्ही कसेबसे लेह गाठले होते ... बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर खोप्याने आधीच माहिती काढून ठेवलेल्या रेस्टहाउसचा शोध लागला ... २५० किमी च्यावर खडतर प्रवास केल्यावर अगदी कोलंबसला अमेरिकेचा शोध लागल्यानंतर होणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटींनी आनंद  आम्हाला त्या " गल्वान गेस्टहाउस " चा शोध लागल्यानंतर झाला ... हे गेस्टहाउस मुख्य शहरापासून थोडे बाहेरच्या बाजूला होते ... रात्री १० च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो तर  तिथे सर्वत्र सामसूम....!!  अंधार ....गल्वान गेस्टहाउस  म्हणजे हिंदी हॉरर  फिल्मचं  लोकेशन वाटत होतं ...त्यात आम्ही रात्री उशिरा तिथे पोहोचलो होतो त्यामुळे आपोआपच वातावरण भयपटाला साजेसं असच  झालं होतं ... पण आम्ही इतके दमलो होतो , वैतागलो होतो कि एखादा खरा भूत जरी समोर आला असता तरी आम्ही '' सुबुको आओ ... अभी जावो " असंच  काहीसं  म्हटल असतं ... रूम मध्ये गेलो मऊ उबदार रजया अंगावर घेतल्या ... आणि जगाचा तात्पुरता निरोप घेतला...
                   सकाळी ९-१० च्या सुमारास  जाग  आली... डोळे उघडल्यावर बघितलं ,  गल्वान गेस्टहाउस  च्या रूमस चांगल्या होत्या , भिंतींना निळसर रंग ....खाली मऊ  गालीचा ,  छतावर मोठ मोठे बांबू आडवे टाकलेले ... खिडक्यांना पडदे होते... सकाळी मस्त उन  पडल  होतं  त्यामुळे प्रसन्न वाटतं होतं.... बाहेर येऊन बघितलं तर रात्री जसं  वाटलं होत तसं हे गेस्टहाउस नव्हतं ...  समोर छान पैकी एक बगीचा होता ... त्यापुढे एक लहानसे शेड उभारले होते त्यात टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या ... गेस्टहाउस च्या मालकाने बाजूला लहानशी शेतीही केली होती.. कंपाउंड च्या बाजूने रांगेत उभी केल्यासारखी उंचच उंच झाडे लावली होती...


                       रात्रीच्या आणि दिवसाच्या वातावरणात जमीन आसमानाचा फरक होता .... आम्ही फ्रेश होऊन    नाष्टा केला... ओम्लेट - ब्रेड , चहा  आणि घरून आणलेल्या शंकरपाळ्यांवर  ताव मारला. लेह च्या आजूबाजूला जिथे चीनची हद्द जवळ आहे , म्हणजे पँगाँग लेक , खारदुंग ला , नुब्रा valley   अशा ठिकाणी जाण्यासाठी पास लागतो .. तो काढण्यासाठी आमच्या हॉटेलच्या मालकाला सांगितले... ते पास येईपर्यंत आम्ही लेह मध्ये जाऊन गाड्या सर्विसिंग करून घेण्यासाठी बाहेर पडलो.... आमच्या गाड्या जवळ पास १००० किमी चालल्या होत्या , त्यामुळे ऑईल बदलणे व  इतर दुरुस्तीसाठी आम्ही लेह शहरात आलो ... आणि बघतो तर काय... ? जिकडे तिकडे बुलेटच बुलेट... ' विना बुलेट लेह शहरात फिरण्यास मनाई ' असा काहीसा अलिखित नियम असावा , इतक्या प्रमाणात बुलेट दिसत होत्या ...जगात दोनच ठिकाणी  रॉयल  एन्फिल्ड  बुलेट जास्त प्रमाणात दिसू शकतात .. एक म्हणजे लेह  आणि  दुसरं ठिकाण  म्हणजे  रॉयल  एन्फिल्ड  बुलेटची  factory .... !!!  बुलेट  किती प्रकारच्या असू शकतात हे तिथेच कळेल.... आम्ही garage मध्ये गेलो तर तिथेही सगळ्या बुलेट दुरुस्तीसाठी आलेल्या.... त्या  बघून पप्याने  लेह मध्ये एक  बुलेटचं  garage  टाकूया , असा एक बिझनेसचा प्लान बोलून दाखवला ... खोप्याही त्याला तत्वतः मान्यता देणार एवढ्यात मी  जोरदार हसलो आणि तो प्लान बारगळला ., नाहीतर एका हातात पाना आणि दुसऱ्या  हातात स्क्रू ड्रायवर घेऊन खोप्या लगेच तयारच झाला असता... असो...! आज आमचा कुठेही फिरण्याचा कार्यक्रम नव्हता .. दुपारी जेवलो आणि मस्त ताणून दिली ... संध्याकाळी जवळचं  एखाद ठिकाण करावं  म्हणून आमच्या गेस्टहाउसच्या मागे असलेल्या शांतीस्तूप कडे आम्ही निघालो..... हिमाच्छादित पर्वताच्या पार्श्वभूमीवर पांढरेशुभ्र शांतीस्तूप  उठून दिसत होते ...



                  शांतीस्तूप आणि त्याचं  विस्तीर्ण अंगण मावळतीच्या प्रकाशात अतिशय विलोभनीय दिसत होतं ... स्तुपावर गौतम बुद्धांच्या जीवनावरची काही प्रसंगे दर्शवली होती ....लाल , पिवळ्या, निळ्या , हिरव्या रंगाच्या पताका  फड फड करीत  त्यावर लिहिलेली  प्रार्थना ,  शांतीचा संदेश वाऱ्याबरोबर दूरपर्यंत पसरविण्याचे काम करीत होत्या .... तिथलं  बुद्धदर्शन  खरच  मनाला शांती देणारं  होतं ... नाव अगदीच सार्थ होतं ... शांतीस्तूप ...!!



                    शांतीस्तूपाच्या समोरच्या डोंगरावर लांबवर लेह palace दिसत होता . काही लोक  कॅमेऱ्याची  तोंडे तिकडे वळवून दूरवर असलेल्या लेह palace ची छायाचित्रे घेण्यात मग्न दिसत होती ... आम्हीही तिथे आमचे फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेतली ... काही पर्यटक  तिबेटी लोकांचा पोशाख अंगावर चढवून स्वतः चे फोटो काढून घेत होते ... लोकांना कोणत्या गोष्टी करण्यात मजा येईल हे सांगणं कठीण आहे ....



                 अंधार पडला तसे आम्ही तिथून  लेह शहर फिरण्यास निघालो... लेह फिरताना इतक्या डोंगर दऱ्या पार करून आलो आहोत असं वाटतच नव्हतं ... इथेच कुठेतरी गोव्याला आल्यासारखं  वाटत होतं... दुकाने  दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती ... आणि बाजारपेठ माणसांनी फुलून आली होती ... तिथे बऱ्याच तिबेटी वस्तू , स्वेटर्स , jackets  , शाली , खेळणी  विकण्यासाठी आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या होत्या ... तिबेटी वस्तूंच्या एका दुकानात गेलो , तिथे विविध प्रकारच्या धातूच्या वस्तू , रंगीबेरंगी खडे मांडलेले होते ...ते एकदा फिरून बघितलं  अन  मी बाहेर पडलो , आणि इतर दुकानांची विंडो शॉपिंग करू लागलो .... खोप्या आणि पियुने काहीतरी ३-४ निळ्या रंगाचे दगड विकत  घेतले ... पियुने एकदम खुशीत येऊन आम्हाला ते दगड दाखवले ....' कितीला ? ' असं विचारल्यावर तिने जी किंमत सांगितली ती ऐकून  मला पुन्हा एकदा हाय अल्टीट्युड  सिकनेस आल्यासारखं  वाटू लागलं .... खोप्याचा चेहराही सहा महिन्याच्या आजारातून उठलेल्या माणसासारखा झाला होता ... पण  बिचारा उसणं हास्य चेहऱ्यावर आणून उभा होता .... शॉपिंग तर झाली ... आता पोटपूजा ...! एका हॉटेल मध्ये गेलो .... मस्त चायनीज नुडल्स , राईस हाणला....कोल्ड्रिंक झालं ... जेवण झालं  तसं  जास्तच थंडी जाणवू लागली....  गेस्ट हाउस  वर जाऊन पडलो ... आजचा दिवस असाच लेह शहर फिरण्यात आणि शॉपिंग करण्यात घालवला  आणि ' जीवाचं लेह '  करून घेतलं...
                    संध्याकाळी शांती स्तूप ला जाताना त्याच्या पलीकडे लांब उंच असा  जगातला हाय्येस्ट मोटोरेबल रोड  खारदुंग-ला पास ( उंची १८३८० फुट ) आम्हाला दिसला होता ... आता उद्या आम्ही जगातल्या सगळ्यात उंच रस्त्यावर असणार होतो .... top  of  the  world ....!!!


सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ७

     
                          आईशप्पथ ....!!  जाम दम लागतोय ... माझं  काही खरं  नाही...
                           
                          अरे यार कधी संपणार हा रस्ता ....??
                             
                          ओ  माय  गॉड ....

                          सरजी ,   थोडा पाणी मिलेगा ...??

                          आयचा घो ... ते बघ  पुढे रस्ता बंद आहे ... गाड्यांची रांग लागलीय...

                          पुढे ब्लास्टिंग करणार आहेत.... ७ ब्लास्ट आहेत ... एक - दीड तास लागणार....आपण                                                                   अडकलो  .... आता वाट ...!!!  

                                                               ... टांगलांग- ला....  ( उंची  १७५८२ फुट ...)                                                                                                                 
                                                    ( एकही फोटो नाही.... )
       
                                                                           @
                                                                           @
                                                                           @

                    साला एखादा दिवसच खराब असतो... इतका खराब ,  कि आपण पुढचे दिवस बघायला जिवंत राहू कि नाही याची शंका येते... अजूनही तो दिवस आठवला कि श्वास जड झाल्या सारखं  वाटतं ...
  माणसाच्या आयुष्यातला चांगला काळ  जसा झरकन सरतो तसा तो मख्खन रस्ता लगेच संपला .. आणि सुरु झाला तो तुकड्या तुकड्यातला रस्ता ... म्हणजे १०० -१५० मीटर रस्ता आणि मध्ये बारीक माती ...!  इतकी  कि त्यात गाडीचे टायर  रुतून बसत ...  बॉर्डर रोड   ऑर्गनायझेशन च्या  जवानांनी मोठ्या  कष्टाने  हा रस्ता तयार करायला घेतला आहे ... आणि काही  ठिकाणी जवान स्वतः उभे होते . उन्हातान्हाची परवा न करता गाड्यांना ते रस्ता दाखवत होते जेणेकरून गाड्या मातीत अडकू नयेत... धन्य ते जवान ! एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ते सहज फिरायला म्हणून येणाऱ्या पर्यटकांसाठी आपलं  कर्तव्य बजावत होते. असंच अर्ध  अंतर पार केल्यानंतर आम्हांला कळलं  कि आम्ही  ' मोरे प्लेन ' ( morey plains ) मधून जात आहोत. नजर जाईल तिथवर सपाट समतल प्रदेश ...
                खरं  तर ह्या मोरे प्लेन मध्ये शिरण्याआधी पासूनच मला पुन्हा त्रास व्हायला लागला...  लडाखला निघालेल्या पाच जणांपैकी मी सगळ्यात ' कमजोर कडी ' होतो ... खोप्या , संदीप , पप्या हे तर इतक्या अवघड रस्त्यांवरून बाईक चालवत होते , मानलं  त्यांच्या एकाग्रतेला....आणि चिकाटीला ...!   पियू एक मुलगी असूनही इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही  बाईक राईड  एन्जॉय  करत होती ... मला ह्या सगळ्यांच्या मनोधैर्याचा हेवा वाटू लागला...
                   मोरे प्लेन मधून जात असताना एका ठिकाणी मला इतकं  अस्वस्थ वाटू लागलं  कि मी बाईक वरून खाली पडतो कि काय अशी शंका यायला लागली ....एके ठिकाणी थांबलो , रोड ची कामे करणाऱ्या माणसांसाठी तात्पुरते तंबू उभारले होते , तिथे संदीप आणि खोप्या आसरा मिळतो का ते पाहायला गेले , त्या कामगारांनीही  मोठ्या अगत्याने आम्हाला त्यांच्या तंबू मध्ये आराम करण्यास सांगितले ... त्यांचा तो तंबू म्हणजे दुसरी भट्टीच होती ... पण तिथे थोडा वेळ आडवा झालो , खोप्याने मला कापराच्या २-३ वड्या दिल्या त्या हुंगल्याने जरा बरं  वाटलं ... त्या तशाच रुमालात बांधून मी नाकासमोर तो रुमाल बांधला... थोड्या वेळाने  बरं वाटू लागलं ... खोप्याचा हा उपाय खरच चांगला होता ....आता जास्त वेळ थांबून चालणार नव्हतं .... अजून बरंच अंतर आम्हाला पार करायचं  होतं ... तिथून निघणं   अतिशय जीवावर आलं  होतं ...सपाट रस्ता काही केल्या संपत नव्हता , त्यात रस्त्याचं  काम चालू असल्याने गाडी चालवायला फार त्रास होत होता ... अनेक वेळा त्या मातीच्या रस्त्यावरून आमच्या गाड्या घसरत होत्या , पुढे  चाललेल्या गाडीचा धुरळा  मागे उडत होता ,  त्यामुळे पुढच काहीच नीट  दिसत नव्हतं , गाडी हळू चालवली तर मातीत रुतत होती आणि फास्ट चालवली तर मातीवरून घसरत होती , त्यामुळे गाडी चालवावी तरी कशी ....? असा प्रश्न आमच्या रायडर्स पुढे होता ...एक वेळ तर अशी आली कि रस्ताच नव्हता , नुसती बारीक माती ...' तुम्हाला  कुठून जायचंय तिथून जा....' अशीच मुभा जणू निसर्गाने दिलेली ...!!!
                     थोड्या वेळाने आम्ही एका डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो , आमच्या समोरून आर्मी चा कॉन्वोय येत होता ... ५०-६०  आर्मी च्या गाड्या ....आम्ही बाजूला थांबलो ... मी आणि संदीप ने त्यातल्या जवानांना salute  केला .. त्यांनी त्याचा  स्वीकार करून आम्हालाही  salute  केला ... केवढा तरी अभिमान वाटला आम्हाला ...!!  त्यांच्यातल्या एका जवानाने गाडीची नंबर प्लेट बघितली आणि   " जय महाराष्ट्र..."  केलं ... फक्त दोनच शब्द....! हजारो किलोमीटरच्या अंतराचं अवडंबर एका झटक्यात गळून पडलं ... आणि आम्ही महाराष्ट्रातच आहोत कि काय असा क्षणभर भास झाला .... जाता जाता त्यांनी   " मुंबईचे का...?? " असं  विचारलं. आम्हीही त्यांना उत्साहात होकार दिला... ते ट्रक पास होईपर्यंत आम्ही थांबलो... पुढे निघालो तशी चढण सुरु झाली ... एका मागोमाग एक वळणे , खडबडीत रस्ता , अंगातला अणु -रेणू थडथडत होता., त्यात श्वास घ्यायला त्रास ... बेकार हालत  झाली होती ... टांगलांग -ला पास ...!! रस्त्याची एक खासियत होती , एक वळण घेतलं  कि समोर लांबच लांब चढणीचा रस्ता दिसायचा... त्या शेवटच्या टोकावर पोहोचून  वळण घेतलं  कि समोर पुन्हा तसाच लांबच लांब रस्ता....असं  किमान ७-८ वेळा झालं  असेल....टेप  रेकॉर्डर मधली कसेट अडकली कि कसा तोच तोच आवाज येतो तसाच विधात्याच्या टेप  रेकॉर्डर मधली कसेट अडकली कि काय असं वाटू लागलं ... वळण घेतलं  कि तेच तेच दृश्य समोर ...!! असा वैताग आला ... कधी संपेल हा रस्ता ?? सगळेच  बेजार झालो ... त्यात आमच्याकडचे पाणीही संपले ... कसेबसे वर पोहोचलो... वर  वारा  तर वेड लागल्यासारखा सुसाट सुटला होता ...   तहानेने सगळेच कासावीस झाले होते . एक आर्मीची जिप्सी गाडी उभी होती ... त्यांना खोप्या ने थोडं  पाणी मिळेल का म्हणून विचारलं ... त्यांच्याकडेही फारच थोडं  पाणी शिल्लक होतं . तरीही त्यांनी आम्हाला त्यातलं  पाणी प्यायला दिलं... औदार्य म्हणतात ते ह्याला !!  त्या तिथे इतकं  अस्वस्थ वाटत होतं  कि ' टांगलांग - ला ' लिहिलेल्या त्या पाटीसमोर उभं राहून फोटो काढण्याची इच्छाही कोणाला झाली नाही ... टांगलांग - ला मध्ये आमचा जीव टांगणीला लागला होता ... लवकरात लवकर तिथून निघावं  म्हणून आम्ही लगेच गाड्यांवर टांगा  टाकल्या ... पुढचं  एक वळण घेतो न घेतो तोच समोर जे दृश्य दिसलं  त्याने तर माझा होता नव्हता तो धीरही सुटला ... समोर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या ...  आता जिथे श्वास घेणंही जड जात होतं  तिथे आम्हाला नाईलाजाने थांबावं  लागणार होतं ...गाड्या रस्त्याच्या बाजूला लावल्या , मी तर रस्त्यावर सरळ आडवाच झालो... एक प्रकारची ग्लानी आणि अस्वस्थता मला जाणवत होती... पप्या  संदीप , खोप्या आणि पियू सुद्धा रस्त्यावर बसले ... मी डोळे मिटून पडून राहिलो... अर्धवट ग्लानीमध्ये काही काही वाक्ये ऐकायला येत होती ...
-- " पुढे ब्लास्टिंग करणार आहेत.... ७ ब्लास्ट आहेत ... एक - दीड तास लागणार....आपण                                                                   अडकलो  .... आता वाट ...!!!  "
-- " रस्ता रुंद करण्याच काम चालू आहे ...."
-- " अरे तो बघ , बिडी ने सुरुंगाची वात  पेटवतोय.... "

                                                 ...... टिक  टिक  ... टिक  टिक

                           ध s  डाम ....  ध s  डाम ......  ध s  डाम  
               एका पाठोपाठ किती ब्लास्ट झाले मला समजलं  नाही ... पण प्रत्येक धमाक्यानंतर मी आडवा पडलो होतो ती जमीन धरणीकंप झाल्यासारखी हादरत होती... हे असले धमाके ह्या हिमालयाला काही नवीन नाहीत... मग ते विधायक असोत कि विघातक ... त्याने ते सारे सहन केले  ,  अजूनही करतोय ... आणि आणखी किती काळ  सहन करावे लागतील , देव जाणे ...!  त्या धमाक्याने मी भानावर आलो... खोप्याने मला दिलेली कापराची वडी  नाकाला लावली ... बरं  वाटलं . खरंच , हा उपाय नक्कीच काम करत होता ... त्यावेळी  खोप्याने मला तो प्रथमोपचार दिला नसता तर मी नक्कीच मेलो असतो... आमच्याकडे पाणी नसल्याने खोप्याने  आजूबाजूचा बर्फ बाटलीत टाकून ते वितळवून पाणी तयार करण्याचा एक  अयशस्वी प्रयत्न केला... आमचं  बोलणं ऐकून तिथे पाण्याचा tanker  घेऊन जाणारा एक माणूस जवळ आला .. तो बुलढाण्याचा होता त्याने लांबवर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीतून थोड पाणी आम्हाला दिलं . ती गाडी आमच्यापासून फारतर ५० फुट लांब असेल , पण तिथून ते पाणी घेऊन येताना पप्या अगदी मेटाकुटीला  आला . तो जवळ आला , पाण्याची बाटली दिली आणि गाडीवर ओणवाच झाला ... तिथलं  वातावरणच असं  भयानक होतं ... थोड्या वेळाने रस्ता मोकळा झाला , आणि आम्ही निघालो ... रस्त्यावर पाणी आणि चिखलाचा राडा झालेला ... कसेबसे  त्या रस्त्यावरून  आम्ही निघालो ...काही अतिउत्साही रायडर्स आमच्या बरोबर होते ... इतक्या खराब रस्त्यांवर ते कशीही गाडी चालवत होते , एक जण तर रस्त्याला अगदी दरीच्या बाजूने जाता जाता अचानक गपकन खालीच गेला  ... अति आत्मविश्वास ... म्हणजे ज्याला नेहमीच्या भाषेत , ' शानपना ' म्हणतो तो नडला ... पण नशीब चांगलं  म्हणून ते जास्त खाली घसरले नाहीत ...'  पुढच्यास ठेस मागचा शहाणा  ' ह्या म्हणीच्या शब्दशः अर्थाने आम्ही हळूहळू गाडी चालवत टांगलांग - ला  उतरलो ...संध्याकाळी  ६ च्या सुमारास  खाली रुम्त्से नावाच्या  गावात  पोहोचलो ...अतिशय टुमदार गाव होतं  ते ...!! तिथे बसून थोडा श्रम परीहार केला... चहा  नाश्ता घेतला... सगळे इतके थकले  होते कि पुन्हा गाड्यांवर बसू वाटत नव्हतं... लेह अजूनही ६० - ७० किलोमीटर लांब होतं ... पुढे उप्शी या ठिकाणी थांबावं  कि डायरेक्ट लेह गाठावं अशी द्विधा मनस्थिती सगळ्यांची झाली ... कारण सगळेच जाम दमले होते ...
                         शेवटी गाड्यांवर बसलो ... पुढचा रस्ता अगदीच मक्खन होता ... आणि आम्ही  लेहला जायचा निर्णय घेतला ....  मध्ये पप्याला बरं वाटत नसल्याने त्याने गाडी माझ्याकडे दिली ...  मला एक  चांगलं  वाटलं  कि लेह मध्ये जाताना मी स्वतः गाडी चालवत होतो...  गया  , उप्शी , करू , थिकसे , शे  अशी गावे पार करीत आम्ही लेह कडे मार्गक्रमण करु लागलो  ... लेह कडे जाताना रस्त्यात एक लहानसे वादळ झाले...अंधार पडला ....  झाडे आपली पाने आमच्यावर बरसवीत होती ... मायथोलोजिकल  सिरीयल मध्ये आनंदाच्या प्रसंगी जसे स्वर्गातून फुलांचा वर्षाव केला जातो तसंच काहिसं आम्ही लेह मध्ये पोहोचताना झालं ... फरक इतकाच होता कि इथे फुलांच्या ऐवजी झाडांची वाळलेली पाने आणि  धूळ  होती... पण काही का असेना तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता ...
                          इतका भयानक , खडतर प्रवास.... एक लहानसा अपघात .... टांगलांग - ला मध्ये झालेल्या मरणप्राय यातना.... हे सर्व पार करून आम्ही अखेर आमच्या 'मंजिल ' ला पोहोचलो होतो ... पण नंतर थोडा विचार केला , आणि लक्षात आलं  कि लेह तरी आपली ' मंजिल  ' कुठे आहे ...??

                             ये तो ऐसा सफ़र है जहां  रास्ते ही मंजिल है ....।