बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

फटाके


                फटाक्यांची लांबलचक माळ त्याने जमिनीवर पसरवली.  त्याच्या एका हातात पेटवलेली अगरबत्ती होती. त्यातुन निघणारा धुर नागमोडी वळणे घेत वर जाऊन हवेत कुठेतरी  अदृश्य होत होता.   त्याचबरोबर त्यातुन मोगऱ्याचा मंद सुगंध फटाक्यांच्या दारुच्या वासात मिसळत होता.  फटाक्यांच्या  त्या माळेला पेटती अगरबत्ती लावण्यापुर्वी आठवणीने त्याने तिची वात खुडली.   मागच्या अनुभवावरुन तो हे शिकला होता.  पुर्वी  एका फटाक्याची वात न खुडताच त्याने तो पेटवला आणि  त्या  क्रूर  फटाक्याने त्याला हलायला पुरेसा वेऴही दिला नव्हता.               ' ढाम्म....  ' त्याच्या कानाच्या  बाजुलाच तो फुटला.  बराच वेळ त्या कानाने त्याला काही ऐकु येत नव्हते.  परंतु आता त्याने ती खबरदारी घेतली होती.  सावकाशपणे तो खाली वाकला.  पेटती अगरबत्ती त्या खुडलेल्या वातीच्या जवळ आणली.  हावरटपणे त्या वातीने अगरबत्तीची ती आग आपल्याकडे ओढली .... सुरसुर  पेटत ती फटाक्याच्या दिशेने वेगाने जाऊ लागली.  तो चलाखीने बाजुला झाला  आणि तडातड फटाक्यांची माळ वाजली .....                         

                   फटाक्यांच्या त्या आवाजाने संजू  झोपेतुन जागा झाला.  त्याला स्वप्न पडलं होतं.  आज दिवाळीची पहीली पहाट होती.  कालपर्यंत उत्साहात असणारा  संजू  आज मात्र जरासा निराश होता.  निराशेपेक्षा त्याला  राग जास्त  आला होता. तो तसाच अंथरुणात पडुन होता.  आज आपण उठायचंच नाही असं मनाशी ठरवुन तो तोंडावर चादर घेऊन तसाच पडुन राहीला.  
" संजू ,  उठ बाळा ,  आज दिवाळीचा पहीला दिवस आहे.  " पणत्या पेटवता पेटवता आई त्याला हाक मारत होती .  त्याने चादरीच्या कोपऱ्यातुन पाहीलं,  बाबा गॅलरीत आकाशकंदिल लावत होते.  आकाशकंदिल लावुन झाला,  त्यातल्या बल्बचे बटन दाबले अन् लाल - पिवळा प्रकाश सर्वत्र पसरला.  त्यासरशी संजू   अंथरुणातुन उठला.  काही वेळापुर्वी केलेला निश्चय तो साफ विसरला होता .   आकाशकंदिलाच्या प्रकाशातच काहीतरी जादू असावी.  पहीली अंघोळ मस्तपैकी सुगंधी उटणे लावुन , उरकुन तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला.  बाबा सकाळचा पेपर वाचत बसले होते.  
" बाबा, फटाके .... " त्याने सुर लावला.  आधी तर त्यांचं लक्षच गेलं नाही.  ते तसेच पेपर वाचत बसले.  
" बा  बा..... फ  टा  के...... " ह्यावेळी आणखी मोठ्याने सुर लावला.  बाबांनी त्याच्याकडे पाहीलं.
" हं...  आज संध्याकाळी आणुया . " एवढं बोलुन त्यांनी परत पेपरमधे डोकं घातलं.  तेवढ्याने संजूचं समाधान झालं आणि तो खेळायला पळाला.  
       "  माझ्या बाबांनी काल मला खुप फटाके आणले.  चल तुला दाखवतो.  " संजूचा मित्र अभि त्याला म्हणाला.  दोघेही त्याच्या घरी गेले.  दोन मोठे बॉक्स भरुन अभिच्या  घरी फटाके आणले होते ... पाऊस,  भुईचक्र, फुलबाज्या,  रॉकेट.,  लवंगीच्या माळा,  नागाची गोळी,  टिकल्या,  बंदुक.... सुट्टे फटाके असे बरेच  प्रकार पाहुन संजूचे डोळे चमकले.  प्रत्येक प्रकार हातात घेउन तो कुतुहलाने पाहु लागला.
" तुला माहितीये  ? हा ना,  आकाशात जाऊन सात वेळा फुटतो ... ” एका मोठ्या फटाक्याकडे बोट दाखवुन अभि त्याला म्हणाला.  संजू   डोळे विस्फारुन ते पहात होता.  
" हा ..?  "  एका वेगळ्याच फटाक्याकडे पहात संजूने  विचारलं.
“ हा ?   हा  कलरवाला रॉकेट  आहे  ”
“  आणि  हा  ? ”
" हा ...?  मला पण माहीत नाई .  माझे काका अमेरीकेत असतात ना,  त्यांनी पाठवलाय .  आज संध्याकाळी बाबा आले की आम्ही हे फटाके फोडणार ... " अभि  भलताच खुशीत येउन ते सांगत होता .  संजू  त्याच्याकडे असुयेने पाहु लागला.  आपले पण कोणी काका अमेरीकेत असते तर किती बरं झालं असतं ?  असा एक निरर्थक विचार त्याच्या मनात चमकुन गेला.  ते दोघे समोर मांडलेले फटाके बघत असताना ,
" अभि,  सगळा पसारा काढुन बसु नकोस.  संध्याकाळी काढ ते ... आता ठेव.  मार खाशील नाईतर .... "  आतुन अभिच्या आईचा ओरडण्याचा आवाज आला . अभि घाईघाईने तो समोर मांडलेला पसारा आवरु लागला.  त्यात  संजूच्या हातात असलेलं भुईचक्र त्याने हिसकावुन घेतलं आणि पिशवीत टाकलं.  संजूचा हिरमोड झाला.  तो तसाच उठला अन् काहीश्या रागातच घरी आला.
" आई,  बाबा कधी येणार ?  "  तोंड वेंगाडून त्याने विचारलं .
" संध्याकाळी येतील .... " करंज्यामधे सारण भरता भरता आई त्याला म्हणाली.  
" आज मला  फटाके पाहीजेत.  माझ्या सगळ्या मित्रांकडे बघ किती  फटाके आहेत , आणि माझ्याकडेच काही नाही ... मला फटाके पाहीजेत.  " त्याने हट्टच धरला.  
" हो.... हो…  बाबा आणणार आहेत हा  आज फटाके तुला.…  " त्याची समजूत काढून  आई आपल्या दिवाळीच्या फराळाच्या कामाला लागली.  संजू कसनुसं तोंड करुन पुन्हा बाहेर आला. आता संध्याकाळपर्यंत काय करायचं ...?  काहीच टाईमपास नाही. फटाके असले असते तर,  निदान ते बघण्यात वेळ गेला असता.  पाच दिवसात रोज किती किती फटाके  वाजवायचे  त्याची वर्गवारी करता आली असती. आपण पण  मित्रांना आपल्याकडचे फटाके  दाखवले असते .  पण छे ...!   वैतागुन त्याने टिव्ही लावला.   समोर एका फिल्म मधलं फटाके फुटण्याचा सीन चालु होता.  त्याने चॅनल बदलला. ,  पुढच्या न्युज चॅनलवरचा रिपोर्टर फटाक्यांच्या दुकानासमोर उभा राहुन मार्केट मधे कोणकोणते नवनवीन फटाके आले आहेत त्याची माहीती देत होता.  त्याने पुन्हा रागाने चॅनल बदलला.  पुढच्या चॅनलवर कुठेतरी फटाक्यांच्या फॅक्टरीला आग लागल्याचा व्हीडीओ चालु होता.  ते पाहुन तर संजूच्या तळपायाची आग मस्तकात गेली.  त्याने रागाने टिव्ही बंद केला आणि रिमोट सोफ्यावर फेकला. घड्याळात पाहिलं ,  संध्याकाळ व्हायला अजून पाच - सहा तास होते .  बाबा कधी येणार  ? आणि त्यांनी  आठवणीने  फटाके  आणले तर बरं  ! विचारांचा भुंगा त्याच्या डोक्यात फिरू लागला . वैतागून तो  गॅलरीत जाऊन उभा राहीला.  पलीकडच्या झोपडपट्टीतली त्याच्या वयाची लहान लहान पोरं  सुट्टे लवंगी फटाके वाजवत होती.  संजू  ते पहाण्यांत दंग झाला.  ती मुलं फटाक्यांसोबत वेगवेगळे प्रयोग करत होती.  कधी ते फटाक्यावर धुळ मातीचा ढिगारा टाकुन तो पेटवत,  फटाका फुटला की  फिल्म मधे दाखवतात तसा बॉम्ब फुटल्याचा भास होत होता. धुळीचा लहानसा ढग तयार होत होता आणि  लगेच विरतही होता.  ते दिसायला अतिशय गमतीदार दिसत होतं.  ,  कधी  कधी ती मुले दोन - तीन सुट्ट्या फटाक्यांच्या वाती एकमेकांवर पिळुन एकत्र फोडत होते.  त्यामुळे एकाच वेळी दोन तीन फटाक्यांचे आवाज येत, असे वेगवेगळे प्रयोग केल्यावर त्यांच्याकडचे सगळे फटाके संपले.  मग कुणीतरी टिकल्यांची बंदुक आणली  आणि त्यांचा चोर पोलिसचा खेळ सुरु झाला.  दोन गट पडले.  ते एकमेकांना लपत छपत  टिकल्यांच्या बंदुकांनी गोळ्या मारत होते,  थोड्या वेळाने त्यांना त्याचाही कंटाळा आला.  मग ती मुलं  न फुटलेले फटाके  शोधत फिरू लागली .  त्यातली दारू काढून  ती पेटवण्याचा खेळ सुरु झाला . तेही मजेदार होतं .  तो पहात असताना आतून आईची हाक  ऐकू आली .
“  ह्या कारंजा बघ कशा  झाल्यात   ? ”  आईने  बशीत कारंजा दिल्या .  त्याने कशीबशी एक करंजी  खाल्ली .  खरं  तर करंज्या म्हणजे त्याचा आवडीच्या  ! पण त्याला आज त्या गोड लागेनात .  इतक्यात खालून  कॉलनीतल्या पोरांचा आवाज आला .  त्याचे मित्र विकी , मन्या  , अभि  त्याला बोलावत होते . त्यांनी भरपूर दगड आणि माती आणली होती . किल्ला करण्यासाठी  .  त्यांची दुपार किल्ला बनवण्यात गेली . किल्ल्याला  नागमोडी  पायऱ्या , मध्ये मध्ये वाघ सिंहांच्या गुहा केलेल्या , जागोजागी  मावळ्यांचा खडा पहारा  उभा केला . हत्ती , घोडे उभे केले.   किल्ल्याच्या  पायथ्याला हिरवीगार शेती केली.  त्यात सलाईनचं  कारंजं उभं  केलं  .  किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी शिवाजी महाराजांची रेखीव मूर्ती स्थापन केली आणि किल्ल्याला  वेगळंच तेज प्राप्त झालं  . तोपर्यंत  फटाक्यांच तर संजू  साफ विसरून गेला . तो  गेरूने  किल्ला रंगवण्यात  गढून गेला होता. पण मधेच  मन्याने  विचारलं , “ दिवाळी झाल्यावर ह्या किल्ल्याचं  काय करायचं ?  ”  
“  काय करायचं  म्हणजे  ?  ह्या गुहेत   ना  एक मोठा फटाका  लावून  फोडायचा … ” कोणीतरी म्हणालं .
“  ए  नाय रे …. आपला किल्ला  फोडायचा नाही  … ”  पोरांची भंकस  सुरु झाली . त्यात फटाक्यांचं  नाव निघालं  आणि इतका वेळ  विस्मरणात गेलेला  फटाक्यांचा भुंगा   पुन्हा संजूच्या  डोक्यात शिरला .   संध्याकाळ झाली होती .  सगळी मुलं  तयार व्हायला  आपापल्या घरी गेली . संजूही  गेला .  
“  आई , बाबा कधी येणार  ? ”  त्याचा परत तोच प्रश्न  .
“ येतील रे… जर धीर धर … आणि हा काय अवतार केलायस  ? जा तोंड हात पाय धु … जा लवकर . ”
संजू  पाय ओढत ओढत बाथरूम मध्ये गेला .  नंतर सगळं  आवरून पुन्हा बाबांच्या वाटेला डोळे लावून बसला . आता केव्हाही बाबा येतील आणि त्यांनी  फटाके  आणले असतील , मग कित्ती  मज्जा  !!!  संजू   मनातल्या मनात विचार करू लागला .  त्याला पुन्हा खालून अभिचा आवाज आला .  त्याच्या बरोबर त्याचे बाबा होते त्यांच्या हातात एक मोठी पिशवी होती .
“ खाली ये ना .… आम्ही फटाके  फोडतोय … “  अभि  बोलावत होता . त्याचे बाकीचे मित्रही  फटाके  फोडायला  खाली  जमा झाले . आधी तर संजूला खाली  जाउच नये असं वाटत होतं . बाकीचे  फटाके  फोडणार आणि आपण नुसतं  बघत बसायचं  ?  हे  म्हणजे  आपल्याला भूक लागली असून  सुद्धा आपण  स्वतः  न जेवता दुसऱ्या एखाद्या  जेवणाऱ्या माणसाला फक्त बघण्यासारखं  आहे ….   पण आईच म्हणाली कि तो एवढं  बोलावतोय तर जा … म्हणून तो नाईलाजाने खाली गेला . अभि  आणि त्याच्या बाबांनी भरपूर फटाके  आणले होते . अभिने  पाउस लावला , वर उंच  जाणारा पावसाच्या   प्रकाशात  त्याचे डोळे दिपले  .  भुईचक्र एखाद्या चक्रम माणसासारखे  वाट फुटेल तिकडे  पळत होते . लवंगी स्वतःच्याच तोऱ्यात  असल्यासारख्या तडतडत होत्या .  फुलबाज्यातून उडणाऱ्या चांदण्या वर उडून खाली जात होत्या . अभि  आणि बाकीचे सगळे आनंदाने ओरडत होते .   संजू  फक्त ती आतिषबाजी लांब उभा राहून पहात होता . सगळ्यांचे  फटाके  संपले आणि  ते  जायला निघाले . आता संजू  एकटाच उरला होता . त्याची नजर गेट कडे लागली होती . अजूनही त्याचे बाबा आले नव्हते . शेवटी कंटाळून  तोही परत फिरणार इतक्यात त्याला एका कोपऱ्यात  लवंगी फटाक्यांच्या  २-३  माळा  पडलेल्या दिसल्या . मघाशी अभिच्या पिशवीतून त्या पडलेल्या असाव्यात , त्याने विचार केला . आपण त्या घेऊया का ? अशाही त्या तशाच  पडलेल्या आहेत . आणि आजूबाजूला दुसरा कोणीही नाही . त्या लवंगीच्या  माळा  आपण घेतल्या  तर काय फरक पडणार आहे ? त्या  माळा  त्याला खुणावत होत्या . त्याचं  एक मन त्या फटाक्यांकडे  धावत होतं  तर दुसरं  मन ते करण्यापासून त्याला परावृत्त करत होतं  .  दुसऱ्याचे  पडलेले फटाके  कसे घ्यायचे  ? बाबा ओरडतील .  पण आज  बाबांनी फटाके  आणले नाही तर ? शेवटी त्याच्या एका मनाने दुसऱ्यावर  विजय मिळवला .  संजू  त्या माळांच्या दिशेने  जाऊ लागला . तो त्या माळांना  हात लावणार इतक्यात  बिल्डींगच्या  गेटचं  लोखंडी दार वाजलं .  गेटमधून त्याचे बाबा आत येताना त्याला दिसले . त्याने पाहिलं  बाबांच्या हातात दोन मोठ्ठ्या  पिशव्या होत्या …  



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

अंबिका


 अंबिका व्यायामशाळेच्या मैदानात संध्याकाळी पोरं प्रॅक्टीस साठी जमली होती. कुणी कामावरुन आलं होतं,  कुणी कॉलेजमधुन,  तर कुणी असंच वेळ जात नाही म्हणुन . प्रॅक्टीस सुरु झाली. दिल्या, सत्या, बाळ्या,  विक्या आणि असेच बरेच जण प्रॅक्टीस करण्यात गढुन गेले होते.  बराच वेळ झाल्यानंतर सुन्या धावत धावत आला.  
" साल्या,  ही वेळ आहे काय रे यायची ?, पोरींच्या मागे जरा कमी फिरत जा... " दिल्यानेे त्याला चिडवलं
" अबे नाय यार... कॉलेजला जरा काम होतं "
" कसलं काम असतं रे तुझं कॉलेजला ? साला बघावं तेवा पोरीच फिरवत असतो...  " दुसरं कोणीतरी बोलंलं.
" नाय रे ... आईशप्पत … !  " सुन्या  खरोखरंच सांगायचा प्रयत्न करत होता पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. अशी काहीतरी भंकस चालु झाली आणि त्याचा फायदा घेऊन बाकीचेही प्रॅक्टीस सोडुन टाईमपास करायला लागले. सुन्या आला आणि होती नव्हती तेवढी प्रॅक्टीसही बंद पडली.  सगळे कोडाळं करुन मैदानात बसुन गप्पा मारायला लागले. एकमेकांची खेचणे,  शिव्या घालणे,  पांचट जोक मारणे अशी मस्ती चालु असतानाच विक्याने सगळ्यांना शांत केलं.  सगळेजण तो बघत असलेल्या दिशेने पाहु लागले. लाईट गेल्यावर चालु असलेला टिव्ही खट्कन बंद पडावा तशी सगळ्यांची मजामस्ती एका झटक्यात थांबली.  समोर बघतायत त्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. समोरच्या गेटमधुन मोहन चालत आत येत होता. तो आला आणि मुख्याध्यापक वर्गात आल्यावर जसेे विद्यार्थी एकसाथ उभे राहतात तसे सगळे उभे राहीले.  प्रत्येक जण त्याच्याकडे भितीयुक्त आदराने पहात होता. बराच वेळ कुणाला काय बोलावं ते सुचलंच नाही.  सगळे त्याच्याकडे पाहत उभे राहीले.  शेवटी तोच म्हणाला,  " कायरे ?  प्रॅक्टीस का थांबवलीत ?  " तो इतका सहजपणे बोलला की जणु काही झालंच नाही.  पोरांना काय बोलावं तेच कळेना.  पोरांच्या अशा वागण्याला कारणही तसंच होतं. मोहन गेली दोन वर्षे अंबिकेत फिरकला नव्हता. आणि तो पुन्हा कधी परत येईल असं कुणालाच वाटत नव्हतं. पण आज तो सर्वांच्या पुढे येऊन उभा राहीला होता. भुत पहावं तशी सगळी त्याच्याकडे पहात राहीली.
" अरे  भाई ,  काय झालाय काय ? असे काय बघताय माझ्याकडे ?  " मोहन   सगळ्यांकडे  बघत म्हणाला. पोरं एकमेकांकडे पाहु लागली. कुणालाच त्याच्याशी बोलायचं धाडस होईना.  तरी हिम्मत करुन सुन्या त्याला म्हणाला,  " मोहन,  यार तु कसा काय आलास प्रॅक्टीसला ?  "
" का ?  येऊ नको का ?  "
" अरे,  तसं नाही यार... तु तर जान आहेस आपल्या मंडळाची ...! ,  तुझ्यामुळे तर हे मंडळ तयार झालंय ,  खरं तर आम्हालाच समजत नव्हतं की तुला सामोरं कसं जायचं ? दोन वर्षापुर्वी जे घडलं ....   " सुन्या अडखळत म्हणाला.
" जे झालं ते झालं ... गोली मारो उसको ... आजपासुन मी पण येणार प्रॅक्टीसला.  येऊ ना ?  "  तो हसत म्हणाला.  
" बास काय भाई !  तु आलास ... आता आग लावुन टाकु भेंचोद....!  " सुन्याने मोहनला उचललं तसं पोरांनी एकच गलका केला .... कानठळ्या बसतील अशा शिट्ट्या वाजल्या ... काय झालं हे बघायला आजूबाजुचे लोक आपापल्या घरांतुन बाहेर आले ...
" ए भिकारचोट पक्या,  तुझा डिजे लाव मोठ्याने .... आपला भाई आलाय परत .... आता मारुन टाकु सगळ्या मंडळांची ...!  आता फक्त एकच नाव मुंबईभर गाजणार.... अंबिका...!  " त्यावर सगळ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.  
पक्याने पडत्या फळाची आज्ञा समजुन जोरात डिजे लावला ... सगळी पोरं नाचायला लागली ,  पोरांनी मोहनला खांद्यावर घेतला  अन् हंडीचा पहिला थर रचला गेला ...
             " कसली अवदसा परत आठवलीय तुम्हाला ?  डोकं फिरलंय काय ?  एवढं सगळं होऊन पुन्हा तेच !  "  लाटलेली चपाती भडभडत्या स्टोव्हवरच्या तव्यावर टाकुन फणकाऱ्याने मोहनची बायको त्याला बोलली.  तो मात्र शांतच राहीला.  समोर असलेल्या टिव्हीचे चॅनल बदलत बसला.  " काय म्हणतेय मी ...?  इतकं सगळं झालं तरी तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो...?  माणसाचं काळीज  आहे की जनावराचं ?  " ती तशीच बराच वेळ बडबडत राहीली.  मोहन मात्र शांतपणे ऎकुन घेत होता. त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं आणि तिच्याकडे लक्ष न  देण्यासाठीच तो टिव्ही लावुन बसला होता. बाजुला त्याची सात वर्षाची मुलगी बसली होती. " मी इतकी जीव तोडुन सांगतेय आणि तुमचं लक्ष कुठंय हो ...?  आग लावा त्या तुमच्या टिव्हीला ...! " तिचं तणतणंन चालुच होतं. चॅनल बदलता बदलता मोहन एका न्युज चॅनलवर येऊन थांबला.  त्यावरची न्युजरिपोर्टर दहीहंडीची तयारी कशाप्रकारे चालली आहे ते दाखवत होती.
" मी तुम्हाला तिकडे जाऊ द्यायची नाही ... ऐकलंत का ?  " ती अक्षरशः ओरडुन म्हणाली.  मोहन तसाच उठला,  पायात चप्पल घातली आणि चालायला लागला.
" माझ्या पोराचा जीव घेतलाय ह्या अंबिकेने...."  ती कळवळुन रडु लागली.  पुढचं ऐकण्याआधी मोहन घरातुन केव्हाच बाहेर पडला होता.  
           मोहन अंबिकेत परत आल्यामुळे पोरांना चांगलाच जोश आला होता. सात वर्षापुर्वी त्यानेच सगळ्यांना एकत्र करुन अंबिका व्यायामशाळेची स्थापना केली  आणि तेव्हाच दहीहंडीचा चांगला ग्रुपही तयार झाला होता.  एक दोन वर्षातच आठ थर लावणाऱ्या अंबिकेचं नाव सगळ्या मुंबईभर झालं होतं.  पुढे  हंडीचं बाजारीकरण झालं आणि त्यातुनच सुरु झाली ती थरांची जीवघेणी स्पर्धा ...!  पुर्वी सहा - सात थर म्हणजे डोक्यावरुन पाणी ....!  पण उंचीची नशा काही वेगळीच असते.  आणि ह्या नशेतच मोहनने आपला मुलगा गमावला होता.  आठव्या थरावरुन पोरगं खाली कोसळलं ते थेट डोक्यावर पडलं. हॉस्पिटलला नेईपर्यंत उशीर झाला होता. ह्या घटनेला आता दोन वर्षे झाली होती . मोहनच्या  बायकोला त्याचा मोठा धक्का बसला.  सहा महिने ती त्या धक्क्यातुन सावरली नव्हती. परंतु वेळ ही प्रत्येक जखमावरचं औषध असते. हळुहळु ती मुळपदावर आली. परंतू परवा मोहन अंबिकेत गेला आणि पुन्हा ती बिथरली.  
   " ह्या वर्षी आपण रेकॉर्ड करायचा .... नऊ थरांचा ...!  " मोहन ने घोषणा करुन टाकली. पोरं त्याच्या तोंडाकडे बघतच राहीली. एवढं होऊनही ह्या माणसात केवढा उत्साह आहे?   " अरे,  बघताय काय ? चला प्रॅक्टीसला लागा... आपल्या पहील्या थरावर बाज्या  आणि बाकीचे पंधरा जण,  दुसऱ्यावर संजय आणि त्याच्या बरोबरचे दहा  जण ...."  मोहन ने प्रत्येक थराचा एका ग्रुप लिडर बनवला आणि त्याच्याबरोबर त्या ग्रुपला नेमुन दिले होते. शिवाय थरांच्या बाजुने कोण कोण उभं रहाणार ....,  वरच्या थरांवर चढायला मदत कोणकोण करणार ...,  खाली एखादा पडला तर झेलायला कोण असणार, याची सगळी आखणी झाली होती आणि त्याप्रमाणे प्रॅक्टीसही जोरात सुरु होती. वजनाने हलका आणि सडपातळ असल्याने  मोहन स्वतः सातव्या थरावर होता.  
जोरदार प्रॅक्टीसला चालू होती .  हा हा म्हणता दहीहंडी दोन दिवसावर आली.
" यार मोहन,  प्रॅक्टीस तर जोरात चालु आहे पण तु म्हणतोस तसं नऊ थर लावायचे असतील तर आपल्याला  तीन एक्क्यावर भागणार नाही.  काहीतरी वेगळं करायला पाहीजे .... " सुन्या काळजीच्या सुरात म्हणाला.  
" हम्म्... त्याचा विचार मी केलाय .... बघु कसं होतंय ते   "
" नायतर आपण आपले आठ थरच लावु .... काय बोल्तो ...?  "
" नाय.... थर लागले तर नऊच... नाय तर नाय... " मोहनच्या ह्या निर्धारापुढे सुन्याला काय बोलावं ते कळेना.  त्याच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नव्हतं. राहीलेले दोन दिवसही निघुन गेले आणि शेवटी तो दिवस आला.  सगळ्या पोरांच्या अंगात अंबिका व्यायामशाळेचे पिवळे टिशर्ट होते.  नेहमीप्रमाणे बापुशेटचा ट्रक पोरांनी खच्चुन भरलेला. ट्रकच्यामागच्या भागात पोत्यात कापुस भरावा सगळी पोरं  भरलेली ,  ट्रकच्या टपावर चाळीतव्या काही टवाळ पोरांनी आधीच जागा पटकावली होती. गाडीच्या  केबिन मधे लहान लहान पोरं-पोरी  बसली होती. मोहन आणि सुन्याही त्यातच बसले होते.   ट्रक निघतानाच पोरांनी जय अंबिकेचा जयघोष केला.  
" सुन्या मी थोडा बदल केलाय .... " मोहन त्याच्याकडे पहात म्हणाला. सुन्याच्या चेहऱ्यावर लहानसे प्रश्नचिन्ह उमटले " ऐक,आपण  आपल्या जागांची आदलाबदल करु.  मी तुझ्या जागी  आठव्या थरावर जातो.  "
" का रे?  काय झालं ...?  "
" नववा थर रचण्यासाठी .... " मोहनच्या डोळ्यात पक्का निर्धार दिसत होता.  सुन्या त्यावर काहीच बोलला नाही.  त्याला विचारुनही काही फायदा नव्हता.  थोड्याच वेळात ते मानाच्या हंडीपाशी पोहोचले.  भला मोठा जनसागर लोटला होता.  एका मंडळाची सलामीची तयारी चालली होती.  त्यांचे दोन थर रचुन झाले होते. हळुहळु थर वाढत होते.  परंतु सातव्या थरापर्यंत ते गेले आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा तसे कोसळले. कुठुनतरी  पाण्याचा  फवारा आला.  जोरजोरात डिजे सुरु झाला.  एकमेकांच्या अंगावर कोसळलेल्या पोरांना शक्या तितक्या जलद गतीने बाजुला खेचण्याचे काम काही लोक करत होते.  बाकीची मंडळे प्रतिक्षेत होती... अंबिका व्यायामशाळेचे गोविंदा पथक मानाच्या हंडीपाशी पोहोचले.  
                 आता सर्वजण गोल उभे राहीले.  मोहन विक्याच्या खांद्यावर बसला.  त्याच्या सुचना सगळे कान देऊन ऐकु लागले.  पहीला पायाचा थर गोल करुन उभा राहीला.  मोहनने पुढची शिट्टी वाजवली.  लगेचच दुसऱ्या थराची पोरं त्यांच्या खांद्यांवर जाऊन चढुन उभी राहीली.  असं करता करता पाच थरांचा पिरॅमिड उभा राहीला. आता  डिजे आपोआप बंद झाला.  लोंकांचं पाणी मारणं  बंद झांलं. सगळे एकटक त्यांच्याकडे पाहु लागले.  आता  एक्के लावले जाणार होते.  हळुहळु एक एक एक्का वर चडु लागला.  पहीला दिल्या गेला.  त्यानंतर मोहनने खुण केल्यावर सुन्या वर चढायला तयार झाला.  तो वर चढणार तेवढ्यात त्याने मोहनकडे पाहीलं आणि त्याच्या पायाखालची जमिन सरकल्यासारखं त्याला वाटलं.  मोहनच्या खांद्यावर त्याची सात वर्षाची मुलगी अंबिका होती.  त्याला काय बोलावं ते कळेना.  तो नुसता डोळे विस्फारुन मोहनकडे पहात राहीला.  
" सुन्या,  चल लवकर... " मोहनने घाई केली.  
" अरे पण,  मोहन हे काय ?  हा तुझा नववा थर ? तुझं डोकं फिरलंय की काय ? "
" मी करतोय ते बरोबर आहे ... "
" मोहन यार,  माझे पाय थरथरतायत.... "
" नेहमी जसा एक्का लावतोस तसा लाव .  चल... टेंन्शन नको घेऊ "
" अंबिकेला काही झालं तर  ?  "
" काही होत नाही .  तु  जास्त विचार करु नकोस "
दोघे एकामागुन एक चढत गेले.  मोहनच्या खांद्यावर त्याची सात वर्षांची मुलगी अंबिका डोक्याला लहानसं हेल्मेट घालुन बसली होती.  तिने मोहनच्या कपाळाला बांधलेल्या फडक्याला घट्ट पकडलं होतं.  दिल्या सहाव्या  थरावर पोचला आणि बसुन राहीला.  त्याच्या खांद्यावर सुन्या बसला.  मोहन त्याच्या मागोमाग होताच !  त्याच्या खांद्यावर अंबिका घट्ट  धरुन बसली होती.  तो दिल्यापर्यंत आला. त्याची   नजर  तो बिलकुल ढळुन देत नव्हता.  तो सुन्याच्या खांद्यावर चढला.  आत तो अत्युच्च शिखरावर होता . खाली सगळे त्याला मुंग्यांप्रमाणे  दिसत होते.  हीच ती उंचीची नशा ! त्याने मनाची एकाग्रता केली.  सुन्याच्या लटपटणाऱ्या खांद्यावर तो स्वतःचा आणि अंबिकेचा तोल सांभाळत बसुन होता.  
' सर्वांनी शांत रहा,  अंबिका व्यायामशाळा थर रचत आहे  ' माईकवरुन सुचना आली.  लोकांनी श्वास रोखले.  हळुहळु दिल्या उठला. ,  त्याच्यानंतर सुन्या उठायचा प्रयत्न करु लागला पण टेन्शनमुळे त्याला निट उठता येईना.  

" सुन्या गोंधळु नकोस,  आरामात उभा रहा. तु करु शकतोस ",   मोहन त्याला धीर देत होता.  कसाबसा जोर लावुन दिल्याच्या हाताचा आधार घेत तो थरथरत उभा राहीला.  खाले लोक पडणाऱ्यांना सावरण्यासाठी हात उंच करुन उभे राहीले.  आता मोहन त्याच्या खांद्यावरुन  हळुहळु  सरळ रेषेत उठु लागला , उठताना खांद्यावर  अंबिका असल्याने त्याचा तोल जाताजाता त्याने स्वतःला सावरलं . खालच्या उभ्या असलेल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकला.  आता मोहन पुर्णपणे उभा राहीला.  त्याने क्षणाचाही विलंब न लावता खांद्यावरच्या अंबिकेच्या पायावर दोन टिचक्या मारल्या.  हि तिच्यासाठी खांद्यावर उभी रहायचा खुण होती.  ती अलगद सरळ रेषेत उठली.  मोहनने तिचे दोन्ही पाय खांद्यावर घट्ट पकडले होते,  तरी तिचे पाय थरथरत होते.  ती पुर्ण उभी राहीली,  आणि कृष्ण जसा बासरी वाजवतो,  तशी बोटांची रचना केली.  लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  त्यानंतर काय झालं कळालं नाही.  भुकंप झाल्यासारखे पायाखालचे सगळे थर गडगडले,  वरचे चारही एक्के एका क्षणासाठी हवेत होते.  त्यानंतर ती रांग जशीच्या तशी बाणासारखी खाली आली. एकच कल्लोळ उडाला.  एकमेकांच्या अंगावर लोळत थरांवरची पोरं खाली खाली जात राहीली.  मोहन,  सुन्या  त्या गोंधळात गर्दीत चेंगरले गेले.  मोहनच्या खांद्यावर अंबिका नव्हती.  कुणाचा पाय तोंडावर,  कुणाचं डोकं खाली आणि वर पाय,  कुणी साफ आडवा झालेला ,  कसल्याही अवस्थेत पोरं एकमेकांवर पडली.  ठरल्याप्रमाणे काही लोक एकमेकांच्या अंगावर पडलेल्या पोरांना खेचुन बाजुला करण्याचे काम करत होते.,  खाली पडलेल्यांना उचलत होते.  सर्व जण एकमेकांपासुन बाजुला झाले.  मोहन इकडे तिकडे पाहु लागला.  अंबिका त्याला कुठेच दिसेना ... ह्या भल्या मोठ्या  कोलाहलात ती कुठे पडली असेल ? ती नीट असेल ना ?  की आपल्या पहील्या मुलाप्रमाणे तिही .....?  नाही ....  नाही ....!  विचार करुन तो वेड्यासारखा तिला शोधत फिरु लागला,  तिला हाका मारु लागला.  पण ती कुठेच दिसेना.  तो सुन्याला शोधु लागला ,  त्याचाही कुठे पत्ता नव्हता.  इतक्यात चारी बाजुंनी टाळ्यांचा कडकडाट ऐकु आला.  त्याने पाहीलं,  सुन्याच्या खांद्यावर उभी राहुन अंबिका सर्वांना अभिवादन करत होती .  




माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7


रविवार, १३ जुलै, २०१४

बस जिंदगी युहीं गुजर जाय...



                                                          छोटासा मकान हो
उसमेही सुकुन हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय...

किसीसे प्यार हो
उसीपे ऐतबार हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय ...

छोटासा कारोबार हो
खुशीयोंकी भरमार हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय ...

कुछ  सवाल सतातें हो
कुछ अनकहीं बातें हो
बस जिंदगी युहीं  गुजर जाय.....

दिल मे बहोतसी तमन्नाऐं हो
सभी नही पर, कुछ तो पुरी हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय....

दोस्तोंमे प्यार हो
दुश्मन भी कभी यार हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय....

बेफिक्र सुबह हो
चैनसे शाम ढलती हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय....



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

.... भेट ....



                                 " हो ... हो... मी निघतो ताबडतोब  "  दादासाहेबांनी फोन खाली ठेवला, पलीकडुन जी बातमी आली ती डोकं सुन्न करणारी होती हे त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावरुन  कळत होतं. थोडा वेळ ते तसेच बसुन राहीले. नंतर भानावर आल्यावर तत्काळ ड्रायवरला गाडी काढायला सांगितली.  दुसरा फोन लावला,  " Mery , cancel todays all meetings and appointments... i am leaving....  " बोर्ड मिटींग बाबत आणखी काही सुचना देऊन त्यांनी फोन ठेवला. आपल्या केबिनमधुन जवळ जवळ धावतच ते बाहेर पडले. दादासाहेब अचानक बाहेर आलेले पाहुन इतर सगळ्या स्टाफची चांगलीच भंबेरी उडाली. हातातली कामे जशीच्या तशी टाकुन धडपडत सगळे उभे राहीले. पण दादासाहेबांचं मात्र तिकडे लक्षच नव्हतं. सगळे काहीशा आश्चर्याने एकमेकांकडे पहात होते. दादासाहेब घाईघाईने बाहेर आले,  तोपर्यंत ड्रायवर ने गाडी तयार केली. " साताऱ्याला जायचंय... शक्य तितक्या लवकर ...." गाडीत बसता बसता ते ड्रायवरला म्हणाले. दादासाहेब गाडीत बसल्यावर ड्रायवरने लगेचच गाडी स्टार्ट केली. गाडी निघाली.…  एसी फुल असुनही त्यांना अस्वस्थ वाटु लागले. अंगातला कोट काढुन ठेवला, आणि टायची नॉट सैल केल्यावर आता त्यांना थोडे बरे वाटु लागले. डोळ्यांवरचा चश्मा काढुन शर्टच्या खिशात टाकला,  कपाळावर जमा झालेले घामाचे टपोरे थेंब खिशातल्या रुमालाने पुसुन ते सिटला मागे रेलुन बसले. दादासाहेब... अनुसया कन्स्ट्रक्शन्स  कंपनीचे मालक. वय वर्ष ६३,  पण एखाद्या तरुणाला लाजवील असा त्यांचा उत्साह होता,  त्यांचं काम होतं.…  ३० वर्षापुर्वी त्यांनी गाव सोडलं आणि सरळ मुंबई गाठली. त्यांच्या महत्वाकांक्षा फक्त आणि फक्त मुंबई पुर्ण करु शकेल, अशी त्यांची पक्की खात्री होती. आणि त्यात ते यशस्वीही झाले. आता ते एक बडी असामी म्हणुन ओळखले जात होते. आपल्या मुळ गावाशी तसा त्यांचा फारसा संबंध राहीला नव्हता. गावात त्यांचं वडीलोपार्जित घर होतं पण अण्णा,  म्हणजेच दादासाहेबांचे वडील वारल्यानंतर चुलत्यांनी ते बळकावलं. आणि गावाशी जोडलेली त्यांची एकमेव नाळच तुटली. काही नातेवाईक होते पण ते मनाने दुर झाल्याने नसल्यातच जमा होते. जवळपास, दहा बारा वर्ष ते गावाकडे फिरकले नव्हते. आणि आज अचानक ते तडकाफडकी गावाला जायला निघालेही...  त्याचं कारण होतं,  सदाशिव शिर्के.... " तो अतिशय सिरीयस  आहे,  आणि केव्हा काय होईल हे सांगता येत नाही.  तु लवकर निघ…  " मघाशी आलेल्या गणप्याच्या फोनमुळे ते अतिशय अस्वस्थ झाले होते. कामातलं त्यांचं लक्ष उडालं. सगळं काही सोडुन ते साताऱ्याला निघाले.   दादासाहेब,  सद्या आणि गणप्या हे तिघेही बालपणीचे जिवश्च कंठश्च मित्र... हे त्रिकुट सगळ्या गावात प्रसिद्ध होतं. तिघेही जाम मस्तीखोर... लहानपणापासुन एकत्र... त्यात दादासाहेबांना आई नसल्याने सद्याच्या आईनेच त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्या दोघांबरोबर गणप्याही असायचा. त्यामुळे त्याचीही काळजी ती माऊली घेत असे. गणप्या त्याच्या स्वतःच्या घरी कमी आणि सद्याच्या घरीच जास्त असायचा. पहील्या पावसाच्या वेळी जसे संध्याकाळी अचानक आकाशात जसे काळे ढग जमा होतात तशा चाळीस पंचेचाळीस वर्षापुर्वीच्या आठवणी दादासाहेबांच्या मनात जमा होऊ लागल्या. गाडी आता मुख्य रस्त्याला लागली. ते थंड नजरेने गाडीच्या काचेतुन बाहेर पाहु लागले. रस्त्याच्या बाजुची झाडे, घरे वेगाने मागे जाऊ लागली तसे त्यांचे विचारही त्याच वेगाने काळाच्या मागे जाऊ लागले.… 
                             " सद्या,  मला लई भिती वाटतीय ... मी नाय जाणार पाण्यात, बुडलो बिडलो तर ...? " लंगोट घातलेली स्वतःचीच लहानपणीची प्रतिमा दादासाहेबांच्या डोळ्यापुढे उभी राहीली. " आरं यडा का काय तु…?  मी असताना तु कसा बुडशील....? ते तिकडं बग लहान पोरगं कसं पवतंय.... " आपण तिकडे बघायच्या नादात असतानाच सद्याने आपल्याला पाण्यात ढकलुन दिले होते. दोन चार गटांगळ्या खाल्ल्यावर आपण पार बुडणार तेव्हा कुठं सद्याने पाण्यात उडी टाकली आणि आपल्याला बाहेर काढलं.  त्यावेळी रागाच्या भरात आपण  खच्चुन दिलेली शिवी ... आणि सद्याचं निर्लज्ज हास्य तस्संच्या तस्सं दादासाहेबांच्या कानात घुमलं....  पण त्याच्यामुळेच आपण पोहायला शिकलो. सुर मारायला,  विहीरीच्या तळाशी टाकलेला रुपया बुडी मारुन वर काढायला, त्यानेच शिकवले होते..... झाडावर चढण्यात सद्या आणि गणप्या  पटाईत होते. आपल्याला मात्र ते लाख प्रयत्न करुनही शेवटपर्यंत जमलं नाही..... गणप्या झाडावरुन म्हव - ( मधाची पोळी ) काढायचा... रानात गेल्यावर कधीही रिकाम्या हातांनी आपण परत आलो नाही.  पण एकदा एका आगीम्हवाने गणप्याला असा फोडला की त्याचं तोंड पुरीसारखं फुगलं होतं.   सद्याच्या आईने कसलंतरी तेल लावलं तेव्हा कुठे कमी झालं होतं.  पण गणप्या तेच तोंड त्याच्या  घरी घेऊन गेला आणि पुन्हा तोंड सुजवुन आला, तेव्हा सद्या आणि आपण किती हसलो होतो त्याला ..... ते आठवुन आत्ताही दादासाहेबांच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर उमटलीच..... रात्री शाळेत अभ्यास करायला जातो असं सांगुन चोरुन पिक्चर बघायला तालुक्याला जायचो... एकदा शम्मी कपुरचा " राजकुमार " बघुन येत असताना मास्तरांनी पकडलं आणि नंतर  तिघांनाही रांगेत उभं केलं पहीला गणप्याला फोडला. दुसरा सद्या , तिसरे  आपण होतो ... मास्तरांनी हात पुढे करायला सांगितला ... जीव खाऊन मास्तरांनी पट्टी हातावर मारली... आणि आत्ताही दादासाहेबांनी दचकुन हात मागे घेतला...   एक एक विचार त्यांच्या मनात प्रवेश करु लागला , नव्हे तर इतक्या वर्षांपूर्वीची चित्रफीतच त्यांच्या डोळ्यांसमोर येऊ लागली .   तेवढ्यात दादासाहेबांचा मोबाईल वाजला. घाईघाईने त्यांनी तो उचलला,  " हॅलो.,  हा बोल गणप्या,...  हो हो .... निघालोय मी... वाटेतच आहे... सद्या कसा आहे....?  " गणप्याने दिलेल्या उत्तराने त्यांची काळजी आणखीनच वाढली.  त्यांनी ड्रायवरला गाडी जलद चालवण्यास सांगितले. अस्वस्थ मनाने ते पुन्हा बाहेर पाहु लागले. ' सद्या भावा ... मी येतोय.... ' दादासाहेब मनातल्या मनात म्हणाले. आपण पोहोचेपर्यंत सद्या व्यवस्थीत असु दे अशी त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली. गाडी सुसाट वेगात चालली होती पण दादासाहेबांचं मन गाडीपुढे धावत होतं. कधी एकदा गावात जातोय असं त्यांना झालं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या , वेदनांनी पिळवटलेला सद्याचा चेहरा त्यांना दिसत होता... पण आता तरी निदान स्वस्थ बसण्यावाचुन काही पर्याय नाही हे त्यांच्या व्यवहारी मनाने त्यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा ते गाडीच्या काचेबाहेर पाहु लागले.... आता दिवस मावळतीकडे झुकला होता. अस्ताला जाणारा लालबुंद सुर्य पाहुन तर त्यांचं मन आणखीनच खिन्न झालं...
              " लेका  दादु,   तुला जर ती सुनी इतकी आवडती तर तु सांगुन का नाय टाकत...?  " परमवीर कॉलेजच्या बाहेर असलेल्या अंबर बारमधे अशाच एका संध्याकाळी सद्या आपल्याला विचारत होता.
 " विचारायला काय नाय रे,  पन ती नाय म्हनली तर...?  " आपण मनातली भिती बोलुन दाखवली होती.
" आरं नाय त नाय ... पन एकदा विचारलंस तर कळंल  ना....?  ती नाय तर दुसरी...." सद्या असं बोलल्यावर आपण गोंधळलो होतो. सुनीवर आपलं फार प्रेम होतं. अन् तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाच आपण केली नव्हती...
 " गंमत केली रे.... खरं सांगु.?  तिची पन लाईन हाय तुज्यावर.....बिन्दास विचार... तिच्या घरच्यांचा काय प्रॉब्लेम असंल तर पळवुन घेऊन जाऊ च्यामायला....!!! "  सद्याने दिलेल्या धीरामुळेच आपण सुनीला विचारु शकलो.... आज सुनी असती तर तीही आली असती सद्याला बघायला... आयुष्यरुपी प्रवाहाने आजपर्यंत अनेक वळणे घेतली... सुरुवातीला उथळ असलेला हा प्रवाह आता अनुभव व पैसारुपी  पाण्याने तुडुंब भरलेला आहे.  पण सुरुवातीच्या उथळपणात जी मजा होती ती आताच्या संथ प्रवाहात नाही... दादासाहेब असा विचार करत असताना पुन्हा त्यांचा मोबाईल वाजला.,  " बोल गणप्या,  .... मी पोचतोच अर्ध्या तासात... " आताच्या फोन नंतर तर दादासाहेबांचा धीर सुटत चालला... शेवटची हातघाईची लढाई व्हावी तसं काहीसं झालं. गाडी तिच्या सुसाट वेगात होती.  समोरच्याला हॉर्न देत, ओव्हरटेक करत,  इतर गाड्यांना कट मारत दादासाहेबांची कार चालली होती.... न सांगता ड्रायवरही त्याचे सर्व कौशल्य पणाला लावुन सुसाट गाडी चालवत होता.  आता आणखी एक उजवे वळण घेतलं की गावाची वेस येणार होती. ती ओलांडली की जगन्नाथाचं देऊळ...! इतक्या वर्षांनंतर दादासाहेब गावात जात होते पण असं वाटत होतं की काल-परवाच गाव सोडुन आले आहेत... पुर्वीच्या लहानशा जगन्नाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता... गावात डांबरी रस्ते आले ... घरोघरी टिव्ही आले होते व त्यावर त्याच रटाळ मालिका लागलेल्या दिसत होत्या ... गावात बाकी बराच बदल झालेला दादासाहेबांना दिसला ... त्यांची गाडी आता चावडीत शिरली ... ग्रामपंचायतीची दोन मजली इमारत नजरेत भरत होती...  " इथुन सरळ घे,  नंतर डावीकडे आणि नंतर उजवीकडे घे आणि समोर माडीवाल्या घरापाशी थांबव. " दादासाहेब ड्रायवरला सांगत होते... ते सांगतानाही त्यांचा स्वर कापरा झाला होता. आता सद्याचं घर अगदीच जवळ होतं ... काय चालु असेल तिथे ....?  कसल्या अवस्थेत असेल तो ...?  कल्पनाही करवत नव्हती .... त्याच विचारात दादासाहेब असताना सद्याच्या घरासमोर गाडी थांबली . गाडीच्या बाहेर आल्यावर आपल्या पायात त्राण उरले नसल्याचं दादासाहेबांना जाणवलं.  " सद्या .... " जोरात हाक मारुन ते दारात उभे राहीले ... समोरचं दृष्य पाहुन ते जागच्या जागीच थबकले....आणि समोर पहातच राहीले..... " हा हा हा हा .... " समोरुन जोरदार हसण्याचा आवाज आला.... पाहतात तर समोर सद्या आणि गणप्या बसलेले .... हातात व्हीस्कीचे ग्लास .... समोर चखणा म्हणुन पापड,  शेंगदाणे,  मटणाचा रस्सा ठेवलेला... दादासाहेबांचा डोळ्यावर विश्वास बसेना. " अरे,  काय हे ....? " अविश्वासाने त्यांनी विचारले....
" काय नाय.... पार्टी चालु आहे.... ये बस... गणप्या,  साहेबांसाटी पेग तयार कर... " सद्या जणु काही झालंच नाही अशा आविर्भावात बोलत होता. ... दादासाहेबांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य अजुनही तसंच होतं.
 " आरं ये की ... बस लेका .... दमुन आला आश्शील .... " गणप्या त्यांना बोलवत होता. आता मात्र दादासाहेबांच्या चेहऱ्यावरच्या आश्चर्याची जागा रागाने घेतली ...
" सद्या , हा काय पोरखेळ लावलाय ...? तू सिरियस आहेस , आणि असशील तसा निघून ये असा निरोप दिला ह्या गणप्याने …!  मी माझ्या महत्वाच्या मिटींग्स् सोडुन एवढ्या लांब तातडीने आलोय .... वाटेत माझी काय अवस्था झाली माझी मलाच ठाऊक....!  काय चाल्लय हे ?  " दादासाहेब भलतेच भडकले.
" दादु,  तु बिलकुल बी बदलला नाईस ... आज बी तसाच हाईस.…पन  माफ कर यार आम्हाला ... राग मानू नकोस  भावा … " सद्या पेगचा एक घोट घेत बोलला.
" सद्या , काय लेका हे... ! मी .... काय काय विचार माझ्या डोक्यात आले .... जाम घाबरलो होतो मी ....एक वेळ वाटलं की तुझी- माझी भेट होते की नाही. सगळ्या प्रवासात नुसते तुझेच विचार येत होते... तू कसा असशील …? काय झालं असेल …? ह्या विचारांनी माझं डोकं फिरलं …  पण जाऊ दे... तु बरा आहेस ना.... बास... आता काय काळजी नाही ….  " दादासाहेबांचा राग जसा आला तसा निघुन गेला... आणि तेही निवांतपणे  त्या  दोघांच्यात जाऊन बसले... गप्पा टप्पा सुरु झाल्या ... पेग पुन्हा भरले गेले... बालपणीचे किस्से पुन्हा निघाले... हास्याचा स्फोट झाला ... हसता हसता सद्याला जोराचा ठसका लागला... आणि त्याच्या हातातला ग्लास खाली पडला.  गणप्या त्याला सावरायला धावला...
" सद्या , काय होतंय तुला ...?  " दादासाहेब घाबरलेल्या सुरात म्हणाले... सद्याला सावरता सावरता गणप्याला रडु कोसळले.
" दादु,  तुला फोन केला व्हता ते सगळं खरं हाय... सद्यानेच सांगितलं तसं करायला... दोस्ताचा निरोप घेतल्याशिवाय जाणार नाही,  असं मला म्हणाला... त्याला कँसर झालाय... उद्या त्याला हॉस्पीटलात जायचंय... पन मला म्हनाला मी काय परत येत नाय म्हणुन दादुला बोलावुन घे... मी जायच्या वेळी आपण सगळे एकत्र असलो पाहिजे... " बोलता बोलता गणप्या रडु लागला... दादासाहेबांना काय बोलावं ते कळेना... क्षीण नजरेने त्यांच्याकडे पहात असलेल्या सद्याचा हात हातात घेऊन ते लहान मुलासारखे रडु लागले...



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7