बुधवार, ८ जुलै, २०१५

लोकल डायरी -- १९

                          आज आभाळ काळ्या ढगांनी भरुन गेलं होतं . मान्सून केरळला दाखल झालाय असं न्यूज चॅनलवाले सांगत होते . आता दोन चार दिवसातच पावसाला सुरुवात होणार होती . अरेरे ....! वैताग नुसता ...!   पहिला पाऊस म्हणजे मुंबई बाहेरच्या लोकांना रोमॅंटिक वगैरे वाटत असेल , पण आम्हा लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मात्र ही  छत्री  दुरुस्त करायला टाकण्याची वेळ ,  किंवा पावसाळी बूट विकत घ्यायचे दिवस ... !  आता  ह्याला अपवाद असतील ... शरद वगैरे  सारखे फिल्मी  लोक ! ,  पण बहुवंशी लोक असाच विचार करीत असावेत . मला तर हा पाऊस बिलकुल आवडत नाही ... त्याचे टपाटप थेंब अंगावर पडले की कसंतरीच होतं . ह्या पावसात रेनकोट घाला नाहीतर छत्री घ्या , जोरदार पाऊस असेल तर ऑफिसला जाईपर्यंत शरीराचा कोणताही भाग भिजण्यापासून वाचत नाही .  रस्त्यात सगळी चिक चिक ... , चिखलाचा राडा ... रिक्शावाले , बाईकवाले रंगपंचमी खेळल्यासारखे खड्डयातुन चिखलाचं पाणी उडवत जातात , इस्त्री केलेल्या पँटवर चिखलाची नक्षी उमटते तेव्हा तर डोकंच फिरतं ...  आणि सगळ्यात कहर म्हणजे आमची लोकल ....!  ज़रा पाऊस पडला की ही आजारी पड़ते . कधी ओव्हरहेड वायर तुटते तर कधी ट्रॅकवर पाणी जमा होतं .   एक तास , दोन तास लेट  तर कधी येतच नाही . आजही पाऊस पडणार म्हणून मी आधीच छत्री बॅगमधे  ठेवली . पाऊस पडो अगर न पडो , मला मात्र भिजायचं नव्हतं ...
        रस्त्याने चालताना पुन्हा कालची घटना डोळ्यांसमोरुन तरळुन गेली . कधी नव्हे ते अँटी व्हायरसला मी दिलखुलासपणे हसताना पाहिलं होतं . पण तेही जास्त काळ टिकलं नाही . कुठून तो तिचा होणारा नवरा अनिकेत की कोण तो,   उगवला आणि रंगाचा बेरंग झाला . ती परत होती तशीच झाली . शोले फिल्ममधल्या जया भादुरी सारखी ! . तिच्या होणाऱ्या  नवऱ्याला आमच्याबाबत संशय आला होता हे काही वेगळं सांगायची गरज नाही . तसं काहीही नसताना   त्याचा  जास्त त्रास बिचाऱ्या अँटी व्हायरसला होणार होता  आणि हेच मला नको होतं . पण मी काय करु शकणार होतो ... ?  तिच्याशी बोलणं खुप गरजेचं होतं . काल ती तशीच माझ्याशी न बोलता निघुन गेली होती . पण कालच्या मॅटरमुळे ती माझ्याशी बोलेल का ? बघुया  .... !!!
सावंत आज आले ते सुद्धा काळजीत  असल्यासारखे वाटत होते . म्हणजे त्यांच्याही  परिस्थितीत काहीच फरक पडला नव्हता . ते निदान माझ्याशी बोलून त्यांचं मन  हलकं करु शकत होते पण मी हे काहीच करु शकत नव्हतो . अँटी व्हायरसबद्दल कुणाला सांगूही शकत नव्हतो .
" अजूनही बायको माझ्याशी बोलत नाही रे ... " सावंत गंभीर चेहऱ्याने म्हणाले .
" काही म्हणजे काहीच बोलत नाहीत ...?"
" तसं नाही रे ... पण गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत . मला तिला अंधारात ठेवायचं नव्हतं म्हणून सगळं सांगितलं . ह्यात माझं काय चुकलं सांग ..." सावंत म्हणाले . त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी नव्हतं . मी त्यांना धीर दिला आणि म्हणालो , " थोडा वेळ जाउद्या , त्या नक्की बोलतील तुमच्याशी ...सगळं नीट होईल ..."  
" अरे पण मला अपराध्यासारखं वाटतंय घरी गेल्यावर ... असं वाटतंय की मी कुणा दुसऱ्याच्या घरात आलोय ... "
" तुम्ही तसं  का वाटून घेताय...?  तुम्ही काहीही केलं नाही ... तुमचा काय दोष ..? . तुम्ही जे आहे ते खरं सांगितलय ... उलट त्यांनी असा विचार केला पाहिजे की आपला नवरा खरं बोलला . " मी त्यांना समजावलं  पण त्याचा जास्त काही परिणाम झाला असावा असं वाटत नव्हतं … त्यांनी  त्यांचा पेपर उघडून त्यात डोकं घातलं .   आम्ही बसलो असतानाच  भडकमकर आले आणि त्यांनी  माझ्या हातावर लाडुचा अर्धा तुकडा ठेवला . " शिर्डीला गेलो होतो . छोकऱ्याला  घेऊन ... बाबांच्या चरणी ठेवला त्याला , आणि म्हटलं बाबा , लक्ष असू दया ... "
" वा .... हे बाकी चांगलं केलंत ..." प्रसादच्या  लाडूचा तुकडा तोंडात टाकत मी  म्हणालो . ते सगळ्यांना प्रसाद वाटत होते . नायर अंकलपाशी आले अन म्हणाले , " नायरजी , मैंने डिसाइड किया की अब लडके को मारूँगा नहीं ... उसको प्यार से समझाऊँगा ....  उसका ऑक्टोबर का फॉर्म  भरनेवाला है ....  " भडकमकरांचा वाल्याचा वाल्मीकि झाला होता .
" व्हेरी नाईस .... वुई आर प्राउड ऑफ़ यू  मिस्टर भडकमकर ..."  नायर अंकल खुश झालेले दिसले . चला ! एक गोष्ट तरी चांगली झाली ... नाहीतर प्रॉब्लेमस् तर सगळीकडेच होते . जिग्नेस आज आला नव्हता .  मी पलीकडे पाहिलं , अँटी व्हायरस उभी होती . तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते . कानात इअर फोन घालून ती गाणी ऐकत उभी होती . मी बराच वेळ तिच्याकडे तसंच पहात राहिलो , पण एकाच ठिकाणावर  तिची स्थिर नजर अडकून पडल्यासारखी वाटू लागली . ती काहीतरी गहन विचार करीत असावी .  तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं . मी तिच्याकडे बघत असतानाच शरद भरत काहीतरी कुजबुजत असल्याचे मला जाणवलं . मी त्यांच्याकडे पाहिलं .
" काय चाल्लय रे तुमचं .... कसली कुजबुज करताय ? " मी त्यांना कोपरखळी मारली .
" काय नाय रे .... असंच ..." त्या दोघांचं खालच्या आवाजात    काहीतरी बोलणं चालू होतं .
" सांगा ना साल्यांनो ..."  मी शरदच्या पाठीत एक बुक्का घातला . भरत त्याला डोळ्यांनीच   नको म्हणाला .
" तुला सांगता येणार नाही ... कॉन्फिडेंशियल  आहे ..." शरद म्हणाला .
" आयला बास काय ... मला संशय येतोय.... तुम्ही लोक माझ्याबद्दल बोलताय ना ... ? सांगा काय ते ...! "
" अरे बाबा , तुझ्याबद्दल तर नक्कीच नाही . टेंशन घेऊ नकोस ..."   मला उडवाउडवीची उत्तरं त्या दोघांनी दिली . पण ते दोघे गुप्तपणे  बोलत आहेत म्हणजे नक्कीच कुठल्या ना कुठल्या मुलीबद्दल असावं हे मात्र नक्की ! त्यांच्याकडे दूसरा कोणता विषय असणार ?  
लोकलने पारसिकचा बोगदा पार केला आणि पलीकडे पोहोचल्यावर बाहेर बघतो तो  धो - धो पावसाला सुरुवात झाली होती . सगळं वातावरण पावसाने बदलून टाकलं . विंडोवरचे लोक पाणी आत येऊ नये म्हणून धडपड करु लागले .  पण विंडोच्या काचा लावेपर्यंत  ते  अर्धे भिजलेच ...! काही खिडक्यांच्या  काचा मधेच अडकल्याने धबधब्यासारखं पाणी आत येत होतं . डोअरवरचे बाहेर लटकणारे तर पूर्ण भिजुन गेले .   हेच .... हेच ... मला आवडत नाही ... आता चार महीने हीच कटकट ....!  ह्याच्या उलट , शरद - भरत तर उड्याच मारायला लागले . लहान मुलांसारखे !
" येस ... येस ... मस्तच ... वा .... काय मस्त वाटतंय ... थंडगार ... " शरद आनंदाने म्हणाला .
" पड आयला ,  पड ...अजुन जोरात ... "  हे  पावसाला उद्देशून होतं  .  पाऊस आल्याने आमच्या डब्यातले सगळे जण खुश झालेले दिसले . आमचा ग्रुपही आनंदित झालेला होता . मी सावंतांकडे पाहिलं , ते सुद्धा सर्व काही विसरुन खिडकीबाहेर  पडणाऱ्या मुसळधार पावसाकडे हरवल्यासारखे बघत राहिले . मला तर असं काहीच वाटत नव्हतं . हे लोक इतके  खुश होत होते आणि इथे  मला माझ्या लेदरच्या बुटाची काळजी वाटू लागली . असाच पाऊस पडत राहिला तर त्याची वाट लागणार होती ...  पाऊस पडत असताना  आपोआपच माझी नजर अँटी व्हायरसकडे वळाली . तिही कोसळणाऱ्या पावसाकडे पहात होती .  तिच्या डोळ्यात मला उत्सुकता , आनंद , समाधान असे कितीतरी भाव दिसले . भायखळयाला लोकल  आली तेव्हा पावसाचा जोर थोड़ा कमी झाला होता . पण रिमझिम पाऊस पडतच होता  . हे लोकलचे दरवाजे कुठल्या इंजीनियरने तयार केले असतात कुणास ठाऊक ...?  बरोब्बर लोकलच्या दारातून उतरताना बदाबदा पाणी अंगावर  पडतं... आत्ताही तसंच झालं . " ओह ... शीट ...! " डोक्यावर ,  अंगावर पडलेलं पाणी झाडत मी उतरलो . समोर अँटी व्हायरस सुद्धा उतरलेली दिसली . मी लगेच बॅग मधून  माझी छत्री काढली . पहिलाच पाऊस असल्याने फारच थोड्या छत्र्या दिसत होत्या . बाकीची माणसं  पहिल्या पावसात  भिजत चालली होती . मी अँटी व्हायरसकडे पाहिलं , तिच्याकडेही छत्री नव्हती . तिने एकदा माझ्याकडे पाहिलं ती हसली आणि तशीच भिजत निघाली .
" ओ ... हॅलो ... " मी हाक मारल्यावर ती थांबली . रिमझिम पाऊस पडत होता . ती एका दुकानाच्या छपराखाली थांबली . मी छत्री घेऊन तिच्या जवळ गेलो . ,  " तुमच्याकडे छत्री नाही का ? "
" नाही ... पण  तुम्ही आंतर्ज्ञानी  आहात काय ? "  
" म्हणजे ? "
" पाऊस येणार हे तुम्हाला कसं काय माहित ? एकदम छत्री वगैरे ..? "
" ओह ...ही छत्री होय ...  मला नाही आवडत पाऊस ... सगळी चिक चिक  नुसती ... म्हणून आधीच आणली ही छत्री . तुम्ही भिजत जात होता म्हणून हाक मारली तुम्हाला . तुम्ही पाहिजे तर माझ्या छत्रीत येऊ शकता . मी सोडतो तुम्हाला . "
" सॉरी नो थॅंक्स ... मी तशीच जाईन .. "
"  तुम्ही रागवलात का ? "
" नाही ... मी कशाला रागवेन ? "
" ते काल जे झालं ... म्हणजे तुमचे  मिस्टर ... म्हणजे काल  तुम्ही काही न बोलता निघुन गेलात ..." मला काय बोलावं तेच कळेना . गोंधळ उडाला .
" नाही , ते काही नाही ..." तिनेही  उत्तर द्यायचं टाळलं  .
" ते चिडलेत का तुमच्यावर ..?  एक्चुली आय ऍम सॉरी ... हे माझ्यामुळे झालं  ... मीच तुम्हाला काल रेस्टॉरंट मधे यायला सांगितलं होतं . सॉरी ..."
" तसं नाही हो ... तुमचं काही चुकलं नाही . तुम्ही कशाला सॉरी म्हणताय ? "
" नाही म्हणजे तुमचे  मिस्टर काही बोलले का तुम्हाला ...? "

" नाही ... कालपासून फोन नाही . मी पण केला नाही . जाउद्या ... मला उशीर होतोय ... मी जाते...  " असं म्हणून ती तशीच भिजत जाऊ लागली . मला तिला पुन्हा थांबवण्याचा धीर झाला नाही . आधीच ती दुःखी होती ,  माझ्यामुळे आणखी दुःखी झाली . नकळत माझ्या हातून चूक झाली होती . इतका वेळ रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला .  सुड उगावल्यासारखा  पाऊस  पडायला लागला .  मी माझ्या हातातली छत्री मिटवली . पावसाचे अगणित थेंब अंगावर  सुयांसारखे टोचु लागले  . माझ्या चुकीचे निदान तेवढे तरी प्रायश्चित्त मी घेऊ शकत होतो .


माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा