बुधवार, ६ मे, २०१५

लोकल डायरी --१३

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१० 
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी --१२ 


( ह्या कथेतील  घटना व त्यातील पात्रे काल्पनिक आहेत . त्यांचा वास्तव जीवनाशी कोणताही संबंध नाही . जर तसा काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा ...)

                     आज परीक्षेचा दिवस होता . शरदचा , मॅगीचा आणि आमचाही  !  प्रेमासाठी आज तो स्वतः च्या प्राणांचे बलिदान करणार होता ... खरं प्रेम काय असतं , खऱ्या प्रेमाची भावना किती उदात्त असते  हे तो आज जगाला दाखवणार  होता .  प्रेमाविषयीच्या बोथट झालेल्या भावनांना  आज तो पुन्हा धार लावणार होता .   कपडे बदलावेत तशा पोरी बदलणाऱ्या   आजकालच्या  तरुणांसमोर तो एक आदर्श घालून ठेवणार होता . शरद आता साधासुधा  शरद राहिला नव्हता ... रोमियो , मजनू , रांझा ... ह्या महान प्रेमवीरांच्या पंगतीत जाऊन  बसायची त्याची तयारी चालू होती . हे सगळे विचार   शरदला प्लॅटफॉर्मवर बघायच्या आधी माझ्या मनात  चालले होते ... पण  जाऊन पहातो तर  वेगळंच दृश्य  !!!  दोन्ही हातांनी डोकं धरून शरद प्लॅटफॉर्मवरच्या  एका  बाकड्यावर बसला होता . मी नीट निरखून पाहिलं  , त्याचे पाय हळूहळू थरथरत होते .  प्लॅटफॉर्मवर भरत , जिग्नेस आणि सावंत सुद्धा होते सावंत कुणाशी तरी फोन वर बोलत होते आणि भरत आणि जिग्नेस  शरदच्या बाजूला उभे  होते . मी त्यांना  हळू आवाजात विचारलं , " काय रे ...हे काय झालं ...? तो असा डोकं धरून का बसलाय  ? "
" टेंशन आलंय त्याला "  भरत  त्याला ऐकू जाणार नाही  अशा आवाजात म्हणाला . ' अरे देवा ' मी काय काय विचार करुन आज आलो होतो . शरद ऐनवेळी नांगी तर टाकणार नाही ना ? मी त्याच्या जवळ गेलो ,  " शरद , काय रे ? असा का बसलायस ? टेंशन घेऊ नकोस . सगळं ठीक होईल ..." त्यावर  त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं ... आणि केविलवाणे हसला . ' तुला काय जातंय सांगायला … ज्याची जळते त्यालाच कळते ' असा त्या केविलवाण्या हास्याचा अर्थ असावा . सावंत फोन वर बोलून परत आले
" ओके , ट्रेनच्या मोटरमनला फोन केला होता ... मी सांगितलं तसं तो अगदी सावकाश ट्रेन आणणार आहे . रेल्वे सुरक्षा बलाच्या माझ्या मित्राला फोन केलाय ... त्याला थोडा उशीर लागेल पण  तो  येईल म्हणाला . पण त्याची काही गरज लागेल  असं मला वाटत नाही . त्या आधीच ती हो म्हणेल . बरं भडकमकरांचा फोन येईल ती घरातून निघाल्यावर ,  बाकी काही टेंशन नाही , गाडी यायला अजुन अर्धा तास आहे ... " सावंतांच्या अंगात  पुलंचा व्यक्ति आणि वल्लीतला ‘  नारायण ‘  शिरला होता . त्यांच्या दृष्टीने त्यांची सगळी प्लॅनिंग झाली होती .
" ओके  शरद बाबू .... अब आप की बारी ... टेंशन घेऊ नको... बिनधास्त विचारुन टाक . आणि मला खात्री आहे की ती होच म्हणेल . "  सावंत  त्याला धीर  देत म्हणाले ,  त्यावर त्याने होकरार्थी मान डोलवली.
" शरद बी ब्रेव ... टेंशन लेनेका नय .. बेस्ट ऑफ लक … " नायर अंकलही त्याला प्रोत्साहन देऊ लागले . बोर्डाच्या परिक्षेला जाताना एखाद्या विद्यार्थ्याला  सगळे  बेस्ट ऑफ लक देतात.  खरं तर त्या बेस्ट ऑफ लक मुळे काहीच होत नाही , पण टेंशन  मात्र वाढत जातं  …  शरदच्या बाबतीतही आज असंच काहीसं  होत होतं . आम्ही   अर्धा  तास आधीच प्लॅटफॉर्मवर आलो होतो . त्यामुळे आम्हाला आता तसंच थांबण्यावाचुन काही पर्याय उरला नाही . पलीकडे प्लॅटफॉर्म नंबर तीनवरुन मुंबई सी एस टी ला जाणाऱ्या गाड्या जात होत्या . थोडा वेळ मधे गेला आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनवरच्या इंडिकेटरवर  ८: २४ ची फास्ट सी एस टी लावली . आता पंधरा मिंटात गाडी येणार होती . प्लॅटफॉर्म नंबर दोनवर हळूहळू  लोकांची गर्दी होऊ लागली . तेवढ्यात सावंतांचा  मोबाईल वाजला . ते फोनवर बोलले आणि नंतर एकदमच घाई करत शरद जवळ आले , " भडकमकरांचा फोन होता , मॅगी तिच्या  घरातून निघाली आहे . "
त्यांनी असं सांगताच आमच्या  सगळ्यांच्या काळजाचा  ठोका चुकला . सर्वजण शरदकडे पाहू लागले . येऊ घातलेल्या प्रसंगाचं टेंशन त्याच्या चेहऱ्यावर साफ़ दिसत होतं . आणि तोच का , त्याच्या जागी दूसरा कुणीही असता तरी त्याला असंच टेंशन आलं असतं .  एकतर एखाद्या मुलीला प्रपोज करणं हेच  भयानक  काम आहे , त्यात ते इतक्या लोकांसमोर ! , आणि मनात नसताना  ट्रेन खाली जीव वगैरे देण्याची धमकी देणे म्हणजे जीवाशीच  खेळ !!! . पण ते करायचं शरदने ठरवलं होतं ... मानलं त्याला आपण ...! मी हा  असला प्रकार  कधीच केला  नसता , तो केवळ शरद होता म्हणून हे करु शकणार होता . आता फक्त दहा मिनिटांत मॅगी  स्टेशनमधे येणार होती . "  प्लॅटफॉर्म नंबर दोनवर येणारी पुढील लोकल आठ वाजून चोवीस मिनीटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे .... " गाडीची सूचना पाठोपाठ ऐकायला येऊ लागली . सावंतांचा फोन पुन्हा वाजला ... फोनवर एक मिनिट बोलून ते पुन्हा आमच्याकडे आले , " आपली लोकल विठ्ठलवाडीवरुन निघाली आहे .  ५ ते ७  मिनिटांत ती स्टेशनला येईल ... मध्या तू  स्टेशनच्या गेटवर थांब ... मॅगी  आली की लगेच मला फोन कर आणि  तिला इकडे घेऊन ये ... भरत तू शरद जवळ थांब आणि त्याला काय हवं नको ते बघ ... नायर अंकल आपको क्या करना है पता है ना ?  "  शत्रु समोर दिसल्यावर आपल्या सैन्याला फटाफट आदेश देणाऱ्या सेनापतीसारखे सावंत वागत होते आणि  आम्ही सगळे त्यांचे आदेश पाळत होतो . मी स्टेशनच्या गेटजवळ जाऊन उभा राहिलो . आता तिकडे प्लॅटफॉर्मवर  शरद , भरत , जिग्नेस ,  सावंत आणि नायर अंकल होते . मी मॅगीच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो . आज  काय होईल ? ह्या एकाच प्रश्नाचा तणाव मला इतका जाणवत होता तर तिकडे शरदची काय अवस्था झाली असेल . लोक स्टेशनच्या दिशेने येत होते , त्यात मॅगी कुठे  असेल हेच माझे डोळे शोधत होते . अचानक ती मला दिसली . स्टेशनबाहेर रिक्षातून उतरत होती . मी लगेच सावंतांना फोन लावला . मॅगीला स्टेशनमधे येऊ दिलं .
" अ एक्सक्यूज मी ... तुमचं नाव मॅगी  ना ? " मी तिला अदबीत विचारलं .
" हो... पण ... " ती पुढे काही विचारणार इतक्यात मीच तिला म्हणालो , "  तुम्ही मला ओळखत नाही . मी शरदचा मित्र . " असं म्हणल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले ... " शरद तुमची स्टेशनवर वाट बघतोय ,  प्लीज जरा येता का ? " ती साशंक मनाने माझ्याबरोबर येऊ लागली . मी चालता चालता सावंतांना मेसेज केला की मी तिला घेऊन येत आहे . आम्ही प्लॅटफॉर्म नंबर २  वर आमच्या नेहमीच्या जागी आलो . शरद समोर उभा होता . तो तिच्या जवळ आला . मी त्याच्याकडे पाहिलं , त्याच्या डोळ्यात निर्धार होता . तो तिच्या  डोळ्यात डोळे घालून म्हणाला , " मॅगी , मला तू खुप आवडतेस ,  लग्न करशील माझ्याशी ? " त्यावर ती काही म्हणाली नाही  तशीच पुढे निघुन जाऊ लागली . " मॅगी थांब , मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो . तुझ्याशिवाय मी जगु शकत नाही ... प्लीज मला समजून घे "
" शरद प्लीज मी हे नाही करु शकत ... डोंट वेस्ट माय टाईम " म्हणत ती निघुन जाऊ लागली . ती तशी जात असताना शरद चरफडला . त्याने रागाने प्लॅटफॉर्मखाली ट्रॅकवर उडी मारली . " मॅगी , तू जर मला उत्तर दिलं नाहीस तर मी ह्या ट्रेनखाली जीव देईन " मी सावंतांच्या बाजूला उभा होतो . शरदने ट्रॅकवर उडी मारल्यावर ते टाळी वाजवून ' शाब्बास रे पठ्या ' असं ओरडले .समोरून ८ : २४ च्या  लोकलचा हॉर्न वाजला . लोकल हळूहळू प्लॅटफॉर्ममधे शिरत होती . शरद लोकल पासून १०० फुटांच्या अंतरावर होता .  नायर अंकलनी त्यांची ऍक्टिंग सुरु केली , " शरद ऐसा मत करो … मत करो ...."  मॅगीने मागे वळून पाहिलं  , " शरद  , ही मस्करीची वेळ नाही . चुपचाप प्लॅटफॉर्मवर ये ... "  एव्हाना  आमच्याभोवती   चांगलीच गर्दी जमली . लोक आपापसांत चर्चा करु लागले .
" तुला मस्करी वाटतेय ही .... ?  मस्करी वाटतेय ?   मॅगी आय ऍम डॅम सीरियस ... तू जर मला हो बोलली नाहीस तर खरच मी ह्या ट्रेनखाली जीव देईन "  शरदच्या बोलण्यात आवेश होता . का कुणास ठाऊक पण मला त्याची भीती वाटली ... शरदला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो ... तो थोडा सनकी सुद्धा आहे... आणि कधी काय करील ह्याचा नेम नसतो . मी सावंतांना म्हणालोही तसं , पण ते सुद्धा वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे मला वाटले . त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही .
" हा पोरकटपणा बंद कर ... ह्या ट्रेनखाली तू जीव देऊ शकत नाहीस ... ती तुझ्यासमोर येऊन  थांबेल ...सो प्लीज मला मुर्ख बनवु नकोस ...." तिने हे उत्तर दिलं आणि आम्ही सगळे तिच्याकडे बघतच राहिलो . शरद जीव देण्याचं फक्त नाटक करतोय हे तिच्या लक्षात आलं होतं . इतक्यात  एक  अनाउंसमेंट ऐकायला आली ... ' प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या किनाऱ्यापासून दूर उभे रहा एक जलद गाडी जाणार आहे .... कोणीही रेल्वे लाईन ओलांडु नका  .... '
" अच्छा ... ह्या ट्रेनखाली माझा जीव जाणार नाही काय ...? मग आता बघच मी काय करतो ते ..." असं म्हणून शरदने प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या ट्रॅकवर उडी मारली ... " आता झालं समाधान ... येणारी ट्रेन पुरेशी फास्ट आहे ...तिच्या खाली तरी माझा जीव नक्कीच जाईल ... " असं तो म्हणाला आणि डोळे मिटून त्याने आपले दोन्ही  हात उंचावले … जणू काही तो त्या येणाऱ्या भरधाव ट्रेनला आलिंगनच देणार होता . त्याने ट्रॅक बदलला हे बघुन आता  एकच गोंधळ उडाला . सावंतांनी केलेल्या प्लॅनिंगचा हा भाग नव्हता . इतका वेळ सुरळीत चाललेली प्लॅनिंग अचानक बदलली . मरण्याचं फक्तं नाटक करायचं होतं पण हे आता काहीतरी वेगळंच घडू पहात होतं . सावंत एकदम भांबावले .  शरद  असं काही करेल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते .

" शरद , हा काय वेडेपणा करतोयस ... बाजूला हो ट्रॅक वरुन ... समोरून एक्सप्रेस येतेय .... जोरात ....!!! " सावंत ओरडून सांगू लागले .  आम्ही सगळे त्याला ओरडून सांगू लागलो .  पण तो सारं काही ऐकायच्या पलीकडे गेला होता . तो तसाच डोळे मिटून उभा राहिला .   प्रकरणाने वेगळेच वळण घेतले  आहे हे कदाचित मॅगीच्या लक्षात आलं . तीही गोंधळून गेली , "शरद प्लीज ...आय ऍम सॉरी . प्लीज  कम  आउट ऑफ द ट्रॅक ... प्लीज ..."  त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही . लांबुन एक्सप्रेसचा हॉर्न ऐकू आला ... शरद उभा होता त्या  ट्रॅकमधून बारीक बारीक आवाज यायला लागला . ह्याचा अर्थ ट्रेन अतिशय वेगात येत होती . समोरचा प्रकार बघुन तर जिग्नेस चक्कर येऊन खाली पडला . माझ्या डोक्याला  मुंग्या आल्यासारखं वाटलं . लोकांनी एकदम आरडा ओरड़ा केला . समोरून प्रचंड वेगात येणारी एक्सप्रेस दिसली . ती शरद पासून फारतर ७०  ते ८०  फुटांवर आली ....  आणि तेव्हाच मॅगी जोरात ओरडली , शरद , आय लव यु ... आय रिअली मीन इट ... आय लव यु शरद .... " ते  ऐकल्याबरोबर शरदने त्याचे बंद असलेले  डोळे उघडले . आणि तिच्याकडे विजयी मुद्रेने पाहिलं . पण त्याच वेळी समोरून येणाऱ्या एक्सप्रेसचा कर्णकर्कश्य हॉर्न वाजला .... शरदने समोर पाहिलं .... पण आता वेळ निघुन गेली होती ... ट्रेन एखाद्या राक्षसीणीसारखा आवाज करत त्याच्या अंगावर धावून येत होती . शरद पूर्णपणे सुन्न झाला आणि त्याचे  पाय जागच्या जागी खिळुन  राहिले.  प्लॅटफॉर्मवरचे सगळे लोक एकदम जोरात ओरडले , काहींनी डोळे झाकून घेतले ...  आणि तेवढ्यात एक वेगळीच घटना घडली  . प्लेटफार्म नंबर तीनवरुन  एका   तरुणाने शरदच्या अंगावर उडी मारली . एक्सप्रेस त्याला स्पर्श करणार इतक्यात  शरदला  घेऊन तो ट्रॅकच्या बाजूला पडला .... सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या लोकांचा  अडकून राहिलेला निश्वास एकत्रित सुटला  ." ओ माय गॉड ,  ओह फ... , अरे देवा ,वाचला बाबा ..." लोकांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले . तूफान वेगात आणि  भरमसाठ धूळ उडवत ,   धड़ाक धड़ाक करत एक्सप्रेस निघुन गेली . एक्सप्रेस गेल्यावर सगळे लोक त्या दोघांना उचलायल धावले ...एकच गर्दी त्यांच्या भोवती झाली .  मॅगी मटकन खाली बसली आणि रडू लागली . नायर अंकलना तिच्या सोबत ठेवून आम्हीसुद्धा ट्रॅकवर उडया मारल्या . आम्ही शरदला किती लागलं ते पाहू लागलो . त्याच्या पायाला थोडंसं खरचटलं होतं . नशीबाने बाकी जास्त काही मोठी दुखापत झाली नव्हती . त्याला वाचवणाऱ्या तरुणाला काही लागलं आहे का ते आम्ही पाहू लागलो तर गर्दीत तो आम्हाला दिसेनाच ... तो तरुण गर्दीत कुठे गायब झाला आम्हाला कळालंच नाही . आम्ही त्याचा बराच  शोध घेतला तरी  तो आम्हाला कुठेच दिसेना ... हे कसं काय शक्य होतं ...? शेवटी आम्ही शरदला उचलून प्लॅटफॉर्वर आला . मॅगी समोर उभी होती . ती जवळ आली आणि तिने खाड़कन शरदच्या मुस्काटित मारली आणि त्याला मीठी मारून रडू लागली . " आय ऍम व्हेरी सॉरी शरद  ... आय लव यु " म्हणत ती आणखीनच रडू लागली .  जीवघेण्या प्रसंगातून शरद वाचला होता  , पण  माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता ,  ' शरदला  वाचवणारा तो तरुण कोण होता ? '

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा