रविवार, १७ मे, २०१५

लोकल डायरी -- १४

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी --१२          
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html     लोकल डायरी --१३          
       
          आजचा दिवस मस्तच होता . भारताने क्रिकेटमधे पाकिस्तानला हरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जशी मॅच बद्दल  महाचर्चा होते तसाच आजचा दिवस होता . काल हिट विकेट होता होता वाचलेला शरद  आणि शेवटच्या बॉलवर सिक्सर मारुन मॅच जिंकणारी मॅगी ह्यांचाच विषय चर्चेला होता . होऊन गेलेल्या गोष्टींवर  चर्चा करण्यासारखं सुख दुसरं नसतं . त्यामुळे तोटा तर काही होत नाही उलट टाईमपास चांगला होतो .   प्रत्येक जण चवीने त्यांची चर्चा करण्यात गुंतलेला होता .
लवबर्डस्  , शरद आणि मॅगी हातात हात घालून  आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला .  शरदच्या  हाताला आणि पायाला लागलं असल्यामुळे त्याने हाताला बँडेज बांधलं होतं . एखाद्या सैनिकाने छातीवरची मेडल्स मिरवावीत तसा तो ते बँडेज मिरवत होता . ते दोघे  आता कुणीतरी सेलिब्रिटी असावेत असं वाटत होतं.  लोक त्यांच्याकडे कुतुहलाने बघत होते . सगळ्यात जास्त  आनंदी तर सावंत  होते .  अर्जुनाने  पक्षाचा डोळा फोडल्यावर द्रोणाचार्यांना झाला नसेल तेवढा आनंद सावंतांना झाला होता  . मॅगीने आमच्या सगळ्यांना ' हाय ' केलं . आम्हीही तिला ‘हाय ‘ केलं .
शरद तिला  सोडायला तिच्या डब्यापर्यंत गेला . आणि मंडळी गॉसिप करायला मोकळी झाली .
" शरद तर काल गेलाच होता ढगात ..." भरत म्हणाला .
" हो रे ...  खरंच .... काल तो वाचला नसता ,  जर मॅगी त्याला आय लव यू बोलली नसती तर ... " सावंत म्हणाले .
" पण सावंत तो वाचला ते मॅगी त्याला हो बोलली म्हणून नाही , तर  ३  नंबरच्या प्लॅटफॉर्म वरुन  कोणीतरी त्याच्या अंगावर उडी मारली आणि त्याला घेऊन तो बाजूला पडला म्हणून ..." मी सगळ्यांना कालच्या त्या  अज्ञात तरुणाची आठवण करुन दिली .
" हां .... हां .... बराबर है  । लेकिन कौन ता वो आदमी ...? "  नायर अंकल विचारु लागले .
" वही तो पता नहीं ना अंकल , वो अचानक से तूफान की तरा आया , शरद को बचाया और  न जाने कहाँ गायब हो गया ..."
"  कोणी चेहरा बघितला का त्याचा .... ? " भरतने विचारलं .
" मी पुसटसा बघितला होता , पण त्याला आधी  कधी  इथे पाहिलं नाही  " मी म्हणालो .
" परत बघितलास तर ओळखशील ? "  सावंत विचारू लागले .
" बहुतेक ..." मला खात्री नव्हती . " पण एवढं धाडसाचं काम केल्यावर तो तिथे थांबला का नाही ? आणि इतक्या जलद तो निघुन तरी कसा काय गेला तेच समजत नाही ..."
" परत भेटला तर त्याचे आपण आभार मानू ... कारण आज शरद आपल्यात आहे तो केवळ त्याच्यामुळे . " सावंतांनी मांडलेल्या ह्या प्रस्तावाला सगळ्यांनी होकार दिला . आमच्या अशा गप्पा चालल्या असतानाच शरद मॅगीला लेडीज डब्यापर्यंत सोडून परत आमच्या नेहमीच्या डब्यात आला . पुन्हा आम्ही सगळ्यांनी उठून त्याच्यासाठी  टाळ्या वाजवल्या . जिग्नेसने तर त्याच्या चरणांची धूळ मस्तकाला लावायचा अभिनय केला  . पलीकडे व्हीडिओ कोच मधेही त्याचीच चर्चा चालू होती . काहीजणी त्याच्याकडे बघुन आपापसांत बोलत होत्या .
" यार शरद , तुम तो हीरो बन गया ... " नायर अंकल गमतीने म्हणाले . त्यावर जिग्नेसने लगेच ऑटोग्राफसाठी  त्याचा हात पुढे केला . शरदने एक जोराचा फटका त्याच्या हातावर मारला . , " साले , तेराही आयडिया था ना ... मरते मरते बचा मैं .... मुझे मारने का प्लॅन बनाया था ना तूने ...." शरद जिग्नेसवर खोटा खोटा आरोप करीत म्हणाला .
" अरे शरद , तू त्या तरुणाला पाहिलंस का , ज्याने तुला वाचवलं ...? " मी त्याला विचारलं .
" नाही रे यार  .... ती ट्रेन माझ्या इतक्या जवळ आली  की  माझी फूल टू फाटली होती . मला काहीच समजलं नाही . मी  बाजूला उडी मारण्याचा प्रयत्न करत होतो पण माझे पाय तिथेच  खिळून राहिले  . मग  मी डोळेच मिटून घेतले . नंतर कुणीतरी माझ्या अंगावर उडी मारली . आम्ही दोघे बाजूला पडलो , गाडी एवढा धुरळा उडवत गेली की मला काहीच दिसलं  नाही . नंतर सगळे आमच्या भोवतीने गोळा झाले त्यात तो तरुण कुठे नाहिसा झाला मलाही समजलं नाही "
" ओह .... डॅमइट ...! " भरत हातावर मुठ आपटत म्हणाला .
" लेकिन मैं क्या बोलता हूँ ... मॅगी  भाभीने इतना टाईम क्यूँ लगाया ... हां बोलने को ...? " जिग्नेसने कळीचा मुद्दा काढला .
" हो रे ... खुप वेळ लावला तिने . मी तर अंदाज केला होता की तू खाली ट्रॅक वर उडी मारल्या मारल्या ती घाबरुन हो म्हणेल..." सावंत  म्हणाले .
" नाही हो . त्याचं काय आहे ना की , मी बरेच वेळा तिला असा प्रपोज मारला होता त्यामुळे ती मला जास्त सीरियसली घेत नव्हती . खरं तर ती तिच्या फॅमिलीचा खुप विचार करते , घरात ती एकटीच कमावती आहे . आणि तिला अजुन २ लहान बहिणी आहेत . त्यांच्या शिक्षणाची आणि घर चालवायची जबाबदारी तिच्यावर आहे . त्यामुळे तिच्यासाठी हे प्रेमबीम फालतू आहे . पण तिला मी आवडतो हे मला माहीत होतं . म्हणून म्हणलं अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए ... आणि अनायसे आपला प्लॅन पण ठरला होताच ..."
" उंगली टेढ़ी नाही , तुटलीच  असती तुझी लेका ... !!! "  भरतच्या ह्या टोमण्यावर  सगळे मोकळेपणाने  हसले . बोलता बोलता ठाणे कधी आलं ते कळालच नाही . मी माझ्या जागेवरुन उठलो  , आणि भरतला  बसायला जागा दिली .  उभं राहिल्यावर सहाजिकच नजर जाते ती  व्हिडिओ कोच कड़े .... अँटी व्हायरस समोर उभी होतीच ... तिच्याकडे बघावं की बघू नये ह्या विचारात असतानाच मुजोर नजर तिकडे वळलीच ! ती तशीच कानात एअर फोन घालून गाणी ऐकत होती . निरागस ... !  मनात विचार आला , कशाला आपण उगाच तिचा विचार करत असतो , आता  तर तिची एंगेजमेंट होणार आणि काही दिवसांत तर तिचं लग्नही होईल . आणखी काही दिवसांनी बघितलं तर  तिच्या गळ्यात लायसन्स असणार ... आपण नुसतंच तिच्याकडे बघत राहणार .... काय फायदा ..... बास ! आपण तिचा नाद सोडून देणंच चांगलं .... पण तिचा नाद सोडायचा तर दूसरा कुठला तरी नाद लावून घ्यायला पाहिजे . बरोबर ....! आपण दूसरी कोणी चांगली दिसते का ते शोधलं पाहिजे , जेणेकरुन अँटी व्हायरसला विसरणे सुलभ होईल ... म्हणून मी दुसरीकडे पाहू लागलो . नजर फिरता फिरता पुन्हा अँटी व्हायरस वर येऊन थांबली . त्याचवेळी नेमकं  तिनेही माझ्याकडे पाहिलं  आणि तिच्या चेहऱ्यावर  प्रसन्न हास्य  उमटलं . नकळत मी सुद्धा तिला प्रतिसाद दिला . तिने माझ्याकडे बघुन कसली तरी खूण केली ... पण मला समजेना ती काय म्हणतेय ते . तिने ' उतरल्यावर थांब 'अशी खूण परत केली . म्हणजे भायखळयाला उतरल्यावर तिला काहीतरी बोलायचं होतं . काय बोलायचं असेल ?   ' पुढील स्टेशन दादर ... अगला स्टेशन ... ' ट्रेन मधला स्पीकर बोलू लागला . नायर अंकल जायला निघाले . थोड्याच वेळात भायखळा आलं मी सावंतांचा आणि जिग्नेसचा  निरोप घेऊन निघालो .  उतरलो आणि विचार केला , आपण थांबायला  नको , उगाच आपण तिच्यामागे आहोत असं वाटेल म्हणून हळू हळू पुढे निघालो . थोडा पुढे जातो न जातो तोच तिचा मागून आवाज आला .
" हॅलो  ,  मी तुम्हाला  थांबा अशी खूण केलेली तुमच्या लक्षात आली नाही का ? "  
" सॉरी माझं लक्ष नव्हतं ..."  मी घड्याळात किती वाजले ते बघू लागलो .
" तुम्हाला उशीर होतोय का ? "
" उशीर ...? नाही .... बोला ना तुम्ही ...."  उशीर तर झालाच होता ऑफिसलाही .... आणि सगळ्याच गोष्टींना , पण तिला काय सांगून फायदा  ?
" इथेच बोलू  ? एवढ्या उन्हात ?  आपल्या त्या रेस्टॉरंटमधे जाऊया ... " ती विनंतीवजा सुरात म्हणाली . मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता . पहिल्यांदा तिच्याबरोबर ह्याच रेस्टॉरंटमधे आलो होतो तेव्हा तर मला हवेत तरंगल्यासारखं वाटत होतं आणि आता कुणीतरी मला  फरपटत नेल्यासारखं पाय ओढ़त मी चाललो होतो . आम्ही नेहमीच्या टेबलवर बसलो . बसता बसताच तिने प्रश्न केला , " काल तुमच्या ग्रुपच्या मुलाने म्हणे ट्रेनखाली जीव देण्याचा प्रयत्न केला ... खरं आहे का ? "
" हो ,   एखाद्या फिल्मसारखा सीन झाला होता . थोडक्यात वाचला तो … हो ,  काल तुम्ही  बघितलं  नाही का ? "
"  नाही ना …  काल मी सुट्टी घेतली होती …   पण त्याने असं  का केलं  आणि तुम्ही त्याला थांबवलं का नाहीत  ? " तिच्या ह्या प्रश्नावर मी शरदचं सगळ प्रकरण तिला पहिल्यापासून सांगितलं . मी सांगत असताना तिच्या  चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले . .
" बाप रे ...!!  कसले लोक आहात तुम्ही ?    एवढी मोठी रिस्क ..... आणि काही झालं असतं म्हणजे ..."
“ खरं तर आमचा प्लॅन साधा होता , शरदने शहाणपणा करून तो रिस्की केला , त्याला आम्ही तरी काय करणार ? ”  
"   प्रेमात   पडलेली माणसं अशीच वेडी असतात . ते परिणामांची  पर्वा करीत नाहीत. "  पुस्तकात शोभणारं एक वाक्य तिने  मला  चिकटवुन दिलं . ती हरवल्या सारखी बोलत होती . मला कळेना ह्या पोरीचा प्रॉब्लेम काय आहे ? मागे ती फोनवर बोलताना रडत होती . मी तिच्याकडे पाहिलं तर माझ्यावर भडकली , दुसऱ्या  दिवशी स्वतःहून सॉरी  म्हणाली ,  माझ्याशी जास्त ओळख पाळख नसताना ही  माझ्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये आली , मनातलं  सगळं  सागितलं , काय म्हणायचं  ह्याला ? मी असा विचार  करत असतानाच , " तुम्हाला  कोणत्या फिल्म्स आवडतात ...? "  स्लो ट्रॅकवरची गाड़ी अचानक फास्ट ट्रॅकवर यावी तसा  तिने विषय बदलला .
" मला .... असं काही फिक्स नाही ... "
" मला लव स्टोरीज आवडतात ..." ती म्हणाली .   हे  तिने कशाला सांगायला हवं होतं . तिच्यासारख्या सुंदर मुलीला लव स्टोरिजच आवडत असणार ...  पण  मुद्दा  तो नाही … मला कळेना ही  असं असंबंध  का विचारतेय ...?
" एक विचारु का ?  तुम्ही माझ्याबरोबर का आहात ? " मी डायरेक्ट विचारुन टाकलं .
" का आहात म्हणजे ? "
" म्हणजे आपली  जास्त ओळख नसताना तुम्ही असे माझ्याबरोबर रेस्टॉरंटमधे कशा काय येऊ शकता ... ? "
" तेच तर मला कळत नाही ना ... एवढी कुणाशी न बोलणारी मी , तुमच्याबरोबर येताना मला काहीच वाटत नाही ... तुमच्याशी बोलल्यावर मला बरं वाटत असेल म्हणून कदाचित मी इथे आहे ... " तिच्या ह्या उत्तरावर मी तिच्या सारखाच कोडयात पडलो . बऱ्याच मुलींना रडण्यासाठी एखादा खांदा हवा असतो , त्यांना समजून घेईल असं  कोणीतरी त्यांना हवा असतो .  आपल्याबरोबर हिला सुरक्षित वाटतं म्हणजे ?   ही आपल्याला भावासारखं तर मानत नाही ना ? एक भयानक शंका मनाला चाटुन गेली .  अरे देवा ...! हे म्हणजे  घरी जाण्यासाठी   ट्रेन पकडावी आणि ती सायडिंगला  यार्डात जावी तसं झालं . हिची गाडी दुसऱ्याच कुठल्या रुळावर जाण्याआधी तिला थांबवलं पाहिजे ....
" नाही ..... नाही .... मी भाऊ नाही ..... नाही ....." मी एकदम म्हणालो .
" अहो ... हे काय बडबड़ताय ? मी कुठं काय बोलले ? आणि कोण भाऊ ? " ती गोंधळून म्हणाली .
" नाही ... काही नाही ... तुम्ही काय म्हणत होतात ...? " मी एकदम खजिल होऊन विचारलं .
" त्या दिवशी मी तुम्हाला इतकं काहीबाही बोलले , पण तुम्ही तुमची चूक नसताना ही शांत पणे ऐकून घेतलंत . म्हणून तुम्ही मला चांगले वाटलात . समजूतदार ...दुसऱ्याच्या भावना समजून घेणारे .... सो फ्रेंड्स ...? " तिने तिचा मैत्रीचा  हात पुढे केला . भावापेक्षा हे बरं आहे ...
"ओह ... ओके .... फ्रेंड्स ..." म्हणत मी तिचा कापसासारखा शुभ्र आणि मुलायम हात हातात घेतला . तिच्या अनामिकेत मला  हिऱ्याची  अंगठी दिसली ...  मी तिच्याकडे पाहिलं , माझ्या डोळ्यातील बदललेले भाव तिच्या लक्षात आले असावेत .
" माझी एंगेजमेंट झाली काल .... हेच तुम्हाला सांगायचं होतं . "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा