शनिवार, २३ मे, २०१५

लोकल डायरी -- १५

         http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html    लोकल डायरी --१३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html   लोकल डायरी --१४        
जी गोष्ट अटळ आहे तिच्या बाबतीत चिंता करुन  अस्वस्थ होण्याला काहीच अर्थ नाही , हे मेंदू जाणतो पण मन मानत नाही . मन सारखा त्याच त्याच गोष्टीचा विचार करत रहाते.  माझंही तसंच झालं होतं .   काल अँटी व्हायरसने मला तिची एंगेजमेंट रिंग दाखवली  आणि वेड्या मनाला होती नव्हती ती आशाही धुळीला मिळाली . तिची एंगेजमेंट झाली आहे हे तिने माझ्यासारख्या एका तिर्हाइताला सांगायची काय गरज होती ? बहुतेक ' इस रुट की सभी लाईने व्यस्त है ।' असं कदाचित तिला सुचवायचं असेल . ठीक आहे ....  पण काल आम्ही एकमेकांचे मित्र तर झालो होतो . हेही काही वाईट नव्हतं . मी सगळे विचार झटकुन टाकले . आणि नव्या उत्साहात ट्रेन मधे चढ़लो . सगळ्यांना नेहमीप्रमाणे  हाय हॅलो , नमस्कार चमत्कार झाले . वरच्या  रॅकवर बॅग ठेवली ,  इतक्यात माझा मोबाईल वाजला ... बघितलं तर बॉसचा फोन होता . मी लगेच फोन घेतला , " हॅलो , गुड मॉर्निंग सर , ... येस सर ..... ओके सर .... , पण असं अचानक ? .... ओके सर .... मी जातो तिथे .... गुड डे सर ..." फोन वैतागातच बंद  केला . रॅकवरची  माझी बॅग काढली . मी बॅग काढलेली बघुन सगळे आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले .
" काय रे ... काय झालं .... परत घरी चाल्लास काय ? " भडकमकर विचारु लागले .
" नाही हो , बॉसचा फोन होता , मला आमच्या ठाण्याच्या ब्रॅन्चला जायचं आहे ... बॉसचं  काहीतरी काम आहे  . आता डोअरला उभा राहतो ... नाईतर ठाण्याला उतरता येणार नाही . "
"  हो .. हो ... बरोबर आहे ... पण यार तू आम्हाला सोडून चाललास ... कसंतरी वाटतंय ... " भरत मला गमतीत  टाटा करत म्हणाला .
" अरे सोड , डोंबिवली गेल्यावर जा डोअरला ... काय टेंशन घेतो , बस ..." सावंत माझा हात पकडत म्हणाले .
" ओ सावंत , त्याला ठाण्याला उतरायचय , कुर्ल्याला नाही ... मध्या तू ह्यांचं काही ऐकू नको , सरळ डोअरला बाजूला उभा रहा ,  ए   रवी , आमचा पंटर येतोय रे डोअरला , . त्याला जागा ठेव ..." शरदने माझी डोअरला उभी राहायची सोय सुद्धा करुन दिली . रवीनेही ओके अशी खुण केली . रवीचा ग्रुप डोअरलाच असतो . त्यामुळे मला तरी काही काळजी नव्हती .  लोकलने हॉर्न दिला आणि लगेच ती निघाली . मी माझी बॅग घेऊन डोअरला जाऊ लागलो , सावंत हळू आवाजात  म्हणाले , " यार , तुला एक गोष्ट सांगायची होती , पण तू तर आता डोअरला चाल्लास ... "
" बोला ना ....  काय सांगायचंय ? "
" नको , एवढ्या गड़बडीत ते शक्य नाही .... उद्याच बोलू ... ठीक आहे .जा तू , नाहीतर गर्दी होईल पुढच्या स्टेशनला . " म्हणत  त्यांनी हिरमुसल्यासारखा चेहरा केला . मला नाईलाजाने जावं लागलं ," ओके , उद्या बोलू , बाय ..." मी डोअरला जाऊन रवीबरोबर उभा राहिलो .  आमचा ग्रुप सोडून वेगळ्याच ठिकाणी उभं राहिल्याने मला माहेर सोडून सासरी आलेल्या मुलीसारखं वाटायला लागलं .
" आज अचानक ठाण्याला कसा काय रे ? "  रवी मला जागा करुन देत म्हणाला .
" अरे तो आमचा बॉस रे .... त्याचं काम आहे म्हणून जातोय . इथं उभं राहिलं तर चालेल ना ? "
" अरे तिकडे नको , तिकडे जाम गर्दी होते , ए पांडे , ये साईड आजा  , इसको कोने में खड़ा रेहने दे .... अपना दोस्त है ...। " रवीने फर्मान सोडलं , तो कोण पांडे की कोण होता तो निमुटपणे बाजूला झाला आणि त्याने मला जागा दिली . मी दरवाज्याच्या आतल्या बाजूला  सुरक्षित उभा राहिलो .
"  तुझी बॅग दे ... इकडे अडकवतो . " म्हणत रवीने माझ्या हातातली बॅग घेतली आणि दरवाज्याच्या कड़ीला त्याने सोबत आणलेल्या  स्टीलच्या हुकात अडकवली ," ओके , आता आरामात उभा रहा "  रवी माझी  एखाद्या पाहूण्यासारखी ख़ातिरदारी करत होता . मला थोडं संकोचल्यासारखं झालं . मी शेजारच्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून थोडं अंग चोरुन उभा  राहिलो . रवीच्या ते लक्षात आलं ," गाडीचा पास काढलायस ना ? "
"  हो ... पण का रे ? "  मला कळेना तो असं का विचारतोय .
" अरे मग असा चोरासारखा का उभा राहतोय ? नीट बिंदास उभा रहा की ... ए  दिग्या तिकडे सरक .... आपल्या मित्राला जरा नीट उभं राहु दे ..."  रवी पेटला होता .
" अरे , मी उभा आहे  व्यवस्थित ... काही  प्रॉब्लेम नाही . "
" अरे तुम्हा डायरेक्ट  मुंबईला जाणाऱ्या लोकांना माहित नाही , इथे डोअरला काय काय करायला लागतं ते ...!. असली गर्दी होते ना , एका पायावर पण उभं राहायचं   मुश्किल  होतं .... बघशीलच तू आता . " रवी म्हणाला . त्याचंही खरंच होतं . डोंबिवली , ठाणे , घाटकोपर ,  कुर्ला ह्या  असल्या मधल्या स्टेशनवर उतरणाऱ्या लोकांच्या पुढे गर्दीचं भयानक मोठं आव्हान असतं , त्यांच्यात आणि  शत्रु समोर दिसल्यावर त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या सैनिकांत काहीच फरक नसतो .  आम्ही थेट  दादर , भायखला सी एस टी ला उतरतो त्यामुळे  नशीबाने हा त्रास  जाणवत नाही . मी व्यवस्थित उभा राहिलो आणि समोर  पाहिलं , नेहमीप्रमाणे अँटी व्हायरस उभी होती . इकडे तिकडे बघता बघता तिची नजर माझ्यावर पडली . तिच्या नजरेत एक लहानसं प्रश्नचिन्ह उभं राहिलं . ' आज डोअरला कसा काय उभा ? ' असा त्या नजरेत प्रश्न होता . मी ओळखीचं हसल्यावर तिनेही तसाच प्रतिसाद दिला .  इतक्यात उल्हासनगर आलं  आणि कधीही गाडीत चढायला न मिळाल्यासारखे लोक चढू लागले . कुणी धड़पड़त होते ... कुणी समोरच्याला ढकलत होते ... ३-४ सेकंदात ट्रेनचा सगळा पॅसेज  भरुन गेला . मी आधी जिथे उभं राहणार होतो तिथे तर चेंगराचेंगरी सुरु झाली . मागचा पुढच्याला ढकलत होता ... नशीब रवी होता म्हणून मला दरवाज्याजवळ   सुरक्षित जागा मिळाली ,  नाहीतर माझं काही खरं नव्हतं .
" आयला , बेकार गर्दी आहे रे ... आम्ही आत बसतो त्यामुळे आम्हाला अंदाज येत नाही . पण  खरंच तुम्हाला मानलं पाहिजे बाबा ..." मी त्याला म्हणालो .
" मग , तुला बोललो नाही का , जाम गर्दी असते . " रवी दरवाज्यावर लटकत म्हणाला . ही त्याची नेहमीची जागा होती . त्याच्याबरोबर  आणखी ४  जण डोअरला लटकत उभे होते . ते गाडीच्या आत कमी बाहेरच जास्त होते . डोअरला उभं राहण्यात पण हिम्मत लागते ... आणि त्याही पेक्षा टेकनिक महत्वाची ....!  म्हणजे एखादं स्टेशन आलं की स्वतः न उतरता दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला  अति चिंचोळया भागावर  एका पायावर उभं राहून  लोकांना आत जाण्यासाठी रस्ता करुन देणे  हे महाकठीण काम असं  कुणालाही जमत नाही ... तेथे असावे जातीचे ... येड्या गबाळयाचे ते काम नव्हे ...!   एका पायावर तपश्चर्या करण्यापेक्षा एका पायावर प्रवास करणं अवघड आहे असं मला उगाच वाटून गेलं . डोअरवाले म्हणजे लढाईला निघालेल्या सैनिकांची पहिली फळी ... ! शत्रुचा पहिला वार अक्षरशः आपल्या अंगावर घेणारी ... !  ऑफिस टाईममधे   डोअरला उभे राहायचे सुद्धा काही अलिखित नियम असतात हे मला आज कळत होतं . डोअरचा आणि  पॅसेजचा  अर्धा भाग हा ठाण्याला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी राखीव असतो . उरलेल्या अर्ध्या भागात मधल्या स्टेशन्सवर चढणे आणि उतरणे दोन्ही कामं  जशी जमतील तशी   करायची असतात . नेहमीच्या प्रवाशांना हे सगळं माहीत असतं , पण एकदा नवखा आला की हुज्जत घालायला लागतो . ठाण्याला उतरायची रांग असते तिथुनच चढायचा प्रयत्न करतो ,  मग त्यातून बाचाबाची , भांडणं , हाणामाऱ्या असले प्रकार घडतात , आणि हे डोअरवाल्यांना काही नविन नसतं .   आज  कल्याणलाच गाडी फुल्ल झाली  . आत्ताही दोन माणसांची चांगलीच जुंपली होती
" अरे पिछेसे क्यूँ ढकेलता है ... ऊपर हॅंडल को पकड़ ना ..."
" अरे बाबा , पिछेसे  प्रेशर आ रहा है तो मैं क्या करुँ ...?
"  तो तू ठीक से खड़ा रेह ना ... और तेरा ये बॅग नीचे ले ... मेरेको लग रहा है ..."
" अब बॅग कैसे निचे लूँ ...? इधर हिलने को नहीं हो रहा ... "
" यार , क्या कर रहा है ? पीछे दबा ना .... "
" अरे कैसे दबाऊँ यार ? "
" नया है क्या ट्रेन मैं ... पेहली बार आया है क्या .... आयला कुठून कुठून येतात साले ....."
" ओ , जरा नीट बोला , साला बिला बोलायचं काम नाय .... मघापासून ऐकतोय .... " एखाद्या भाषणाची सुरुवात जशी प्रस्तावनेने होते तशी लोकल मध्ये भांडणाची सुरुवात हिंदीत होते .  लोकलमधे सुरुवातीला हिंदीतून भांडणारे दोघेही मराठीच होते ... आता त्यांनी मराठीत भांडायला सुरुवात केली .
" इथे मी एका पायावर उभा आहे कसातरी , आणि तुम्ही मागून ढकलताय ... "
" बर मग तुम्ही या ना माझ्या जागी  , काय पण चु सारखं बोलतोय ..."
" ए शिव्या काय देतो ....आ ... शिव्या काय देतो ...." अशा रीतीने ते अगदी हमरातुमरीवर आले . त्यांची ही निव्वळ बडबड बाकीच्या लोकांना सहन झाली नाही , मग त्यातल्याच काही लोकांनी त्यांना शांत केलं . बाकीच्यांचा  होणारा चांगला टाईमपास बंद झाला . रवी आणि आणि त्याची गॅंग मजेने बाहेर लटकत होते .... त्यांचे मनुष्यरुपी पक्षीच झाले होते जणू ! त्यांची मजा मस्ती चालु होती ...  एकमेकांची टर उडवणे , प्लॅटफॉर्मवरच्या चालत्याबोलत्या प्रेक्षणीय गोष्टींना न्याहाळणे  , असा  त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो . आमच्यात  जसा जिग्नेस आहे , तसा त्यांच्यातही एक नेहमीचा गिर्हाइक आहे , शाम म्हणून ! .  अचानक रवी त्याला म्हणाला , "  अरे  शाम  तुला मोर बघायचाय का ? एक सोडून  तीन चार आहेत ..." बिचारा शाम  एकदम आश्चर्याने  बाहेर बघू लागला  .... तर रेल्वे पटरीच्या बाजूला झोपडपट्टीतले तीन चार लोक टमरेल घेऊन बसले होते .  " आयला ... हट , साल्यांनो ...." म्हणत शाम चिडला . सगळे त्याला चिडवुन हसु लागले . त्यानंतर आतल्या  कोणीतरी दिलेली निर्माल्याने  भरलेली , सुकलेल्या फुलांची , पानांची एक  पिशवी हस्तांतारित होत होत रवीकडे आली . मुंब्र्याच्या खाडीत ती सोडायची होती . रवीने ती हातात बाहेर  तशीच धरली . मुंब्र्याची खाडी पास झाली तरी त्याने ती निर्माल्याची पिशवी पाण्यात टाकली नाही ... मी त्याला खुणावलं . त्याने नजरेनेच शांत रहा अशी खुण केली . आणि थोडं पुढे गेल्यावर कचऱ्याच्या  ढिगाऱ्यात हळूच टाकली .
" अरे हे काय केलंस ? पाण्यात टाकायची होती ना पिशवी ? " मी हळू आवाजात त्याला विचारलं .
" यडछाप  माणसं आहेत ती ... आपण कशाला उगाच पाणी खराब करा ... ? आणि निर्माल्य पाण्यात टाकलं तर असं कोणतं पुण्य मिळणारे त्याला ?  मरु दे ... मी कधीच टाकत नाही पाण्यात . आणि आजपर्यंत जो ते टाकायला देतोय त्याचंही काही वाईट झालेलं नाही ... काय ? " रवी  बेफिकीरीने म्हणाला .
" भारी आहेस बाबा ...." मी असं म्हणत असतानाच गाडी पारसिकच्या  बोगदयात शिरली ... डोअरवरच्या रवीच्या ग्रुपने " जय भवानी .... जय अम्बे " चा जयघोष चालू केला . सबंध बोगदाभर तो जयघोष चालूच होता . आम्ही आतून रोजच ऐकतो हा जयघोष , पण आज त्यांच्याबरोबर जय भवानी , जय अम्बे चा जयघोष करताना ब्रम्हानंदी टाळी लागली . वेगळाच फील आला . धडाडत गाडी बोगद्याच्या अंधारातून प्रकाशात आली . आणि ठाण्याला उतरणाऱ्यांची गडबड सुरु झाली . कुणी रॅकवर ठेवलेल्या बॅग घेत  होता , कुणी मागून पुढे ढकलत होता ... कुणी रांगेत मधेच  शिरायचा प्रयत्न करत होता ... रवीने माझी बॅग काढून दिली . स्वतःची बॅग खांद्याला लावली . स्टेशनात गाडी शिरते न शिरते तोच मागचे लोक ओरडायला लागले ...' चलो भाय ... चलो ... डोअर वाले ... छोडो ... चलो '  धबधब्यातुन पाणी कोसळावं तसं सगळे लोक धबाधब बाहेर पडले ... आणि तेवढेच पुन्हा आत शिरले ... मी माझी बॅग  सांभाळत धक्काबुक्की करत एकदाचा कसातरी  उतरलो . उतरल्यावर पाकीट , मोबाईल चेक केला . दोन्ही जागेवर होते . जाताना रवीचे आभार मानले . आणि बाहेरुन आमच्या खिडकीपाशी गेलो . सगळ्यांचा निरोप घेतला . सावंत आतून म्हणाले , " उद्या लवकर ये ... बोलायचय ज़रा ..."
"ओके ...." म्हणत असतानाच ट्रेन निघाली . आमचा डबा पुढे गेला आणि लेडीज डब्याचा दरवाजा माझ्या समोर आला . अँटी व्हायरसची झलक मला दिसली . तीही बाहेर बघत होती . तिच्या डोळ्यात लहानसं प्रश्न चिन्ह पुन्हा तयार झालेलं मला दिसलं ...
                              ये तीर- ए - नजर कहीं ओर करलो  …
                              घायल  को ओर कितना घायल करोगी ….

रविवार, १७ मे, २०१५

लोकल डायरी -- १४

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी --१२          
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html     लोकल डायरी --१३          
       
          आजचा दिवस मस्तच होता . भारताने क्रिकेटमधे पाकिस्तानला हरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जशी मॅच बद्दल  महाचर्चा होते तसाच आजचा दिवस होता . काल हिट विकेट होता होता वाचलेला शरद  आणि शेवटच्या बॉलवर सिक्सर मारुन मॅच जिंकणारी मॅगी ह्यांचाच विषय चर्चेला होता . होऊन गेलेल्या गोष्टींवर  चर्चा करण्यासारखं सुख दुसरं नसतं . त्यामुळे तोटा तर काही होत नाही उलट टाईमपास चांगला होतो .   प्रत्येक जण चवीने त्यांची चर्चा करण्यात गुंतलेला होता .
लवबर्डस्  , शरद आणि मॅगी हातात हात घालून  आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला .  शरदच्या  हाताला आणि पायाला लागलं असल्यामुळे त्याने हाताला बँडेज बांधलं होतं . एखाद्या सैनिकाने छातीवरची मेडल्स मिरवावीत तसा तो ते बँडेज मिरवत होता . ते दोघे  आता कुणीतरी सेलिब्रिटी असावेत असं वाटत होतं.  लोक त्यांच्याकडे कुतुहलाने बघत होते . सगळ्यात जास्त  आनंदी तर सावंत  होते .  अर्जुनाने  पक्षाचा डोळा फोडल्यावर द्रोणाचार्यांना झाला नसेल तेवढा आनंद सावंतांना झाला होता  . मॅगीने आमच्या सगळ्यांना ' हाय ' केलं . आम्हीही तिला ‘हाय ‘ केलं .
शरद तिला  सोडायला तिच्या डब्यापर्यंत गेला . आणि मंडळी गॉसिप करायला मोकळी झाली .
" शरद तर काल गेलाच होता ढगात ..." भरत म्हणाला .
" हो रे ...  खरंच .... काल तो वाचला नसता ,  जर मॅगी त्याला आय लव यू बोलली नसती तर ... " सावंत म्हणाले .
" पण सावंत तो वाचला ते मॅगी त्याला हो बोलली म्हणून नाही , तर  ३  नंबरच्या प्लॅटफॉर्म वरुन  कोणीतरी त्याच्या अंगावर उडी मारली आणि त्याला घेऊन तो बाजूला पडला म्हणून ..." मी सगळ्यांना कालच्या त्या  अज्ञात तरुणाची आठवण करुन दिली .
" हां .... हां .... बराबर है  । लेकिन कौन ता वो आदमी ...? "  नायर अंकल विचारु लागले .
" वही तो पता नहीं ना अंकल , वो अचानक से तूफान की तरा आया , शरद को बचाया और  न जाने कहाँ गायब हो गया ..."
"  कोणी चेहरा बघितला का त्याचा .... ? " भरतने विचारलं .
" मी पुसटसा बघितला होता , पण त्याला आधी  कधी  इथे पाहिलं नाही  " मी म्हणालो .
" परत बघितलास तर ओळखशील ? "  सावंत विचारू लागले .
" बहुतेक ..." मला खात्री नव्हती . " पण एवढं धाडसाचं काम केल्यावर तो तिथे थांबला का नाही ? आणि इतक्या जलद तो निघुन तरी कसा काय गेला तेच समजत नाही ..."
" परत भेटला तर त्याचे आपण आभार मानू ... कारण आज शरद आपल्यात आहे तो केवळ त्याच्यामुळे . " सावंतांनी मांडलेल्या ह्या प्रस्तावाला सगळ्यांनी होकार दिला . आमच्या अशा गप्पा चालल्या असतानाच शरद मॅगीला लेडीज डब्यापर्यंत सोडून परत आमच्या नेहमीच्या डब्यात आला . पुन्हा आम्ही सगळ्यांनी उठून त्याच्यासाठी  टाळ्या वाजवल्या . जिग्नेसने तर त्याच्या चरणांची धूळ मस्तकाला लावायचा अभिनय केला  . पलीकडे व्हीडिओ कोच मधेही त्याचीच चर्चा चालू होती . काहीजणी त्याच्याकडे बघुन आपापसांत बोलत होत्या .
" यार शरद , तुम तो हीरो बन गया ... " नायर अंकल गमतीने म्हणाले . त्यावर जिग्नेसने लगेच ऑटोग्राफसाठी  त्याचा हात पुढे केला . शरदने एक जोराचा फटका त्याच्या हातावर मारला . , " साले , तेराही आयडिया था ना ... मरते मरते बचा मैं .... मुझे मारने का प्लॅन बनाया था ना तूने ...." शरद जिग्नेसवर खोटा खोटा आरोप करीत म्हणाला .
" अरे शरद , तू त्या तरुणाला पाहिलंस का , ज्याने तुला वाचवलं ...? " मी त्याला विचारलं .
" नाही रे यार  .... ती ट्रेन माझ्या इतक्या जवळ आली  की  माझी फूल टू फाटली होती . मला काहीच समजलं नाही . मी  बाजूला उडी मारण्याचा प्रयत्न करत होतो पण माझे पाय तिथेच  खिळून राहिले  . मग  मी डोळेच मिटून घेतले . नंतर कुणीतरी माझ्या अंगावर उडी मारली . आम्ही दोघे बाजूला पडलो , गाडी एवढा धुरळा उडवत गेली की मला काहीच दिसलं  नाही . नंतर सगळे आमच्या भोवतीने गोळा झाले त्यात तो तरुण कुठे नाहिसा झाला मलाही समजलं नाही "
" ओह .... डॅमइट ...! " भरत हातावर मुठ आपटत म्हणाला .
" लेकिन मैं क्या बोलता हूँ ... मॅगी  भाभीने इतना टाईम क्यूँ लगाया ... हां बोलने को ...? " जिग्नेसने कळीचा मुद्दा काढला .
" हो रे ... खुप वेळ लावला तिने . मी तर अंदाज केला होता की तू खाली ट्रॅक वर उडी मारल्या मारल्या ती घाबरुन हो म्हणेल..." सावंत  म्हणाले .
" नाही हो . त्याचं काय आहे ना की , मी बरेच वेळा तिला असा प्रपोज मारला होता त्यामुळे ती मला जास्त सीरियसली घेत नव्हती . खरं तर ती तिच्या फॅमिलीचा खुप विचार करते , घरात ती एकटीच कमावती आहे . आणि तिला अजुन २ लहान बहिणी आहेत . त्यांच्या शिक्षणाची आणि घर चालवायची जबाबदारी तिच्यावर आहे . त्यामुळे तिच्यासाठी हे प्रेमबीम फालतू आहे . पण तिला मी आवडतो हे मला माहीत होतं . म्हणून म्हणलं अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए ... आणि अनायसे आपला प्लॅन पण ठरला होताच ..."
" उंगली टेढ़ी नाही , तुटलीच  असती तुझी लेका ... !!! "  भरतच्या ह्या टोमण्यावर  सगळे मोकळेपणाने  हसले . बोलता बोलता ठाणे कधी आलं ते कळालच नाही . मी माझ्या जागेवरुन उठलो  , आणि भरतला  बसायला जागा दिली .  उभं राहिल्यावर सहाजिकच नजर जाते ती  व्हिडिओ कोच कड़े .... अँटी व्हायरस समोर उभी होतीच ... तिच्याकडे बघावं की बघू नये ह्या विचारात असतानाच मुजोर नजर तिकडे वळलीच ! ती तशीच कानात एअर फोन घालून गाणी ऐकत होती . निरागस ... !  मनात विचार आला , कशाला आपण उगाच तिचा विचार करत असतो , आता  तर तिची एंगेजमेंट होणार आणि काही दिवसांत तर तिचं लग्नही होईल . आणखी काही दिवसांनी बघितलं तर  तिच्या गळ्यात लायसन्स असणार ... आपण नुसतंच तिच्याकडे बघत राहणार .... काय फायदा ..... बास ! आपण तिचा नाद सोडून देणंच चांगलं .... पण तिचा नाद सोडायचा तर दूसरा कुठला तरी नाद लावून घ्यायला पाहिजे . बरोबर ....! आपण दूसरी कोणी चांगली दिसते का ते शोधलं पाहिजे , जेणेकरुन अँटी व्हायरसला विसरणे सुलभ होईल ... म्हणून मी दुसरीकडे पाहू लागलो . नजर फिरता फिरता पुन्हा अँटी व्हायरस वर येऊन थांबली . त्याचवेळी नेमकं  तिनेही माझ्याकडे पाहिलं  आणि तिच्या चेहऱ्यावर  प्रसन्न हास्य  उमटलं . नकळत मी सुद्धा तिला प्रतिसाद दिला . तिने माझ्याकडे बघुन कसली तरी खूण केली ... पण मला समजेना ती काय म्हणतेय ते . तिने ' उतरल्यावर थांब 'अशी खूण परत केली . म्हणजे भायखळयाला उतरल्यावर तिला काहीतरी बोलायचं होतं . काय बोलायचं असेल ?   ' पुढील स्टेशन दादर ... अगला स्टेशन ... ' ट्रेन मधला स्पीकर बोलू लागला . नायर अंकल जायला निघाले . थोड्याच वेळात भायखळा आलं मी सावंतांचा आणि जिग्नेसचा  निरोप घेऊन निघालो .  उतरलो आणि विचार केला , आपण थांबायला  नको , उगाच आपण तिच्यामागे आहोत असं वाटेल म्हणून हळू हळू पुढे निघालो . थोडा पुढे जातो न जातो तोच तिचा मागून आवाज आला .
" हॅलो  ,  मी तुम्हाला  थांबा अशी खूण केलेली तुमच्या लक्षात आली नाही का ? "  
" सॉरी माझं लक्ष नव्हतं ..."  मी घड्याळात किती वाजले ते बघू लागलो .
" तुम्हाला उशीर होतोय का ? "
" उशीर ...? नाही .... बोला ना तुम्ही ...."  उशीर तर झालाच होता ऑफिसलाही .... आणि सगळ्याच गोष्टींना , पण तिला काय सांगून फायदा  ?
" इथेच बोलू  ? एवढ्या उन्हात ?  आपल्या त्या रेस्टॉरंटमधे जाऊया ... " ती विनंतीवजा सुरात म्हणाली . मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता . पहिल्यांदा तिच्याबरोबर ह्याच रेस्टॉरंटमधे आलो होतो तेव्हा तर मला हवेत तरंगल्यासारखं वाटत होतं आणि आता कुणीतरी मला  फरपटत नेल्यासारखं पाय ओढ़त मी चाललो होतो . आम्ही नेहमीच्या टेबलवर बसलो . बसता बसताच तिने प्रश्न केला , " काल तुमच्या ग्रुपच्या मुलाने म्हणे ट्रेनखाली जीव देण्याचा प्रयत्न केला ... खरं आहे का ? "
" हो ,   एखाद्या फिल्मसारखा सीन झाला होता . थोडक्यात वाचला तो … हो ,  काल तुम्ही  बघितलं  नाही का ? "
"  नाही ना …  काल मी सुट्टी घेतली होती …   पण त्याने असं  का केलं  आणि तुम्ही त्याला थांबवलं का नाहीत  ? " तिच्या ह्या प्रश्नावर मी शरदचं सगळ प्रकरण तिला पहिल्यापासून सांगितलं . मी सांगत असताना तिच्या  चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले . .
" बाप रे ...!!  कसले लोक आहात तुम्ही ?    एवढी मोठी रिस्क ..... आणि काही झालं असतं म्हणजे ..."
“ खरं तर आमचा प्लॅन साधा होता , शरदने शहाणपणा करून तो रिस्की केला , त्याला आम्ही तरी काय करणार ? ”  
"   प्रेमात   पडलेली माणसं अशीच वेडी असतात . ते परिणामांची  पर्वा करीत नाहीत. "  पुस्तकात शोभणारं एक वाक्य तिने  मला  चिकटवुन दिलं . ती हरवल्या सारखी बोलत होती . मला कळेना ह्या पोरीचा प्रॉब्लेम काय आहे ? मागे ती फोनवर बोलताना रडत होती . मी तिच्याकडे पाहिलं तर माझ्यावर भडकली , दुसऱ्या  दिवशी स्वतःहून सॉरी  म्हणाली ,  माझ्याशी जास्त ओळख पाळख नसताना ही  माझ्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये आली , मनातलं  सगळं  सागितलं , काय म्हणायचं  ह्याला ? मी असा विचार  करत असतानाच , " तुम्हाला  कोणत्या फिल्म्स आवडतात ...? "  स्लो ट्रॅकवरची गाड़ी अचानक फास्ट ट्रॅकवर यावी तसा  तिने विषय बदलला .
" मला .... असं काही फिक्स नाही ... "
" मला लव स्टोरीज आवडतात ..." ती म्हणाली .   हे  तिने कशाला सांगायला हवं होतं . तिच्यासारख्या सुंदर मुलीला लव स्टोरिजच आवडत असणार ...  पण  मुद्दा  तो नाही … मला कळेना ही  असं असंबंध  का विचारतेय ...?
" एक विचारु का ?  तुम्ही माझ्याबरोबर का आहात ? " मी डायरेक्ट विचारुन टाकलं .
" का आहात म्हणजे ? "
" म्हणजे आपली  जास्त ओळख नसताना तुम्ही असे माझ्याबरोबर रेस्टॉरंटमधे कशा काय येऊ शकता ... ? "
" तेच तर मला कळत नाही ना ... एवढी कुणाशी न बोलणारी मी , तुमच्याबरोबर येताना मला काहीच वाटत नाही ... तुमच्याशी बोलल्यावर मला बरं वाटत असेल म्हणून कदाचित मी इथे आहे ... " तिच्या ह्या उत्तरावर मी तिच्या सारखाच कोडयात पडलो . बऱ्याच मुलींना रडण्यासाठी एखादा खांदा हवा असतो , त्यांना समजून घेईल असं  कोणीतरी त्यांना हवा असतो .  आपल्याबरोबर हिला सुरक्षित वाटतं म्हणजे ?   ही आपल्याला भावासारखं तर मानत नाही ना ? एक भयानक शंका मनाला चाटुन गेली .  अरे देवा ...! हे म्हणजे  घरी जाण्यासाठी   ट्रेन पकडावी आणि ती सायडिंगला  यार्डात जावी तसं झालं . हिची गाडी दुसऱ्याच कुठल्या रुळावर जाण्याआधी तिला थांबवलं पाहिजे ....
" नाही ..... नाही .... मी भाऊ नाही ..... नाही ....." मी एकदम म्हणालो .
" अहो ... हे काय बडबड़ताय ? मी कुठं काय बोलले ? आणि कोण भाऊ ? " ती गोंधळून म्हणाली .
" नाही ... काही नाही ... तुम्ही काय म्हणत होतात ...? " मी एकदम खजिल होऊन विचारलं .
" त्या दिवशी मी तुम्हाला इतकं काहीबाही बोलले , पण तुम्ही तुमची चूक नसताना ही शांत पणे ऐकून घेतलंत . म्हणून तुम्ही मला चांगले वाटलात . समजूतदार ...दुसऱ्याच्या भावना समजून घेणारे .... सो फ्रेंड्स ...? " तिने तिचा मैत्रीचा  हात पुढे केला . भावापेक्षा हे बरं आहे ...
"ओह ... ओके .... फ्रेंड्स ..." म्हणत मी तिचा कापसासारखा शुभ्र आणि मुलायम हात हातात घेतला . तिच्या अनामिकेत मला  हिऱ्याची  अंगठी दिसली ...  मी तिच्याकडे पाहिलं , माझ्या डोळ्यातील बदललेले भाव तिच्या लक्षात आले असावेत .
" माझी एंगेजमेंट झाली काल .... हेच तुम्हाला सांगायचं होतं . "

बुधवार, ६ मे, २०१५

लोकल डायरी --१३

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१० 
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी --१२ 


( ह्या कथेतील  घटना व त्यातील पात्रे काल्पनिक आहेत . त्यांचा वास्तव जीवनाशी कोणताही संबंध नाही . जर तसा काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा ...)

                     आज परीक्षेचा दिवस होता . शरदचा , मॅगीचा आणि आमचाही  !  प्रेमासाठी आज तो स्वतः च्या प्राणांचे बलिदान करणार होता ... खरं प्रेम काय असतं , खऱ्या प्रेमाची भावना किती उदात्त असते  हे तो आज जगाला दाखवणार  होता .  प्रेमाविषयीच्या बोथट झालेल्या भावनांना  आज तो पुन्हा धार लावणार होता .   कपडे बदलावेत तशा पोरी बदलणाऱ्या   आजकालच्या  तरुणांसमोर तो एक आदर्श घालून ठेवणार होता . शरद आता साधासुधा  शरद राहिला नव्हता ... रोमियो , मजनू , रांझा ... ह्या महान प्रेमवीरांच्या पंगतीत जाऊन  बसायची त्याची तयारी चालू होती . हे सगळे विचार   शरदला प्लॅटफॉर्मवर बघायच्या आधी माझ्या मनात  चालले होते ... पण  जाऊन पहातो तर  वेगळंच दृश्य  !!!  दोन्ही हातांनी डोकं धरून शरद प्लॅटफॉर्मवरच्या  एका  बाकड्यावर बसला होता . मी नीट निरखून पाहिलं  , त्याचे पाय हळूहळू थरथरत होते .  प्लॅटफॉर्मवर भरत , जिग्नेस आणि सावंत सुद्धा होते सावंत कुणाशी तरी फोन वर बोलत होते आणि भरत आणि जिग्नेस  शरदच्या बाजूला उभे  होते . मी त्यांना  हळू आवाजात विचारलं , " काय रे ...हे काय झालं ...? तो असा डोकं धरून का बसलाय  ? "
" टेंशन आलंय त्याला "  भरत  त्याला ऐकू जाणार नाही  अशा आवाजात म्हणाला . ' अरे देवा ' मी काय काय विचार करुन आज आलो होतो . शरद ऐनवेळी नांगी तर टाकणार नाही ना ? मी त्याच्या जवळ गेलो ,  " शरद , काय रे ? असा का बसलायस ? टेंशन घेऊ नकोस . सगळं ठीक होईल ..." त्यावर  त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं ... आणि केविलवाणे हसला . ' तुला काय जातंय सांगायला … ज्याची जळते त्यालाच कळते ' असा त्या केविलवाण्या हास्याचा अर्थ असावा . सावंत फोन वर बोलून परत आले
" ओके , ट्रेनच्या मोटरमनला फोन केला होता ... मी सांगितलं तसं तो अगदी सावकाश ट्रेन आणणार आहे . रेल्वे सुरक्षा बलाच्या माझ्या मित्राला फोन केलाय ... त्याला थोडा उशीर लागेल पण  तो  येईल म्हणाला . पण त्याची काही गरज लागेल  असं मला वाटत नाही . त्या आधीच ती हो म्हणेल . बरं भडकमकरांचा फोन येईल ती घरातून निघाल्यावर ,  बाकी काही टेंशन नाही , गाडी यायला अजुन अर्धा तास आहे ... " सावंतांच्या अंगात  पुलंचा व्यक्ति आणि वल्लीतला ‘  नारायण ‘  शिरला होता . त्यांच्या दृष्टीने त्यांची सगळी प्लॅनिंग झाली होती .
" ओके  शरद बाबू .... अब आप की बारी ... टेंशन घेऊ नको... बिनधास्त विचारुन टाक . आणि मला खात्री आहे की ती होच म्हणेल . "  सावंत  त्याला धीर  देत म्हणाले ,  त्यावर त्याने होकरार्थी मान डोलवली.
" शरद बी ब्रेव ... टेंशन लेनेका नय .. बेस्ट ऑफ लक … " नायर अंकलही त्याला प्रोत्साहन देऊ लागले . बोर्डाच्या परिक्षेला जाताना एखाद्या विद्यार्थ्याला  सगळे  बेस्ट ऑफ लक देतात.  खरं तर त्या बेस्ट ऑफ लक मुळे काहीच होत नाही , पण टेंशन  मात्र वाढत जातं  …  शरदच्या बाबतीतही आज असंच काहीसं  होत होतं . आम्ही   अर्धा  तास आधीच प्लॅटफॉर्मवर आलो होतो . त्यामुळे आम्हाला आता तसंच थांबण्यावाचुन काही पर्याय उरला नाही . पलीकडे प्लॅटफॉर्म नंबर तीनवरुन मुंबई सी एस टी ला जाणाऱ्या गाड्या जात होत्या . थोडा वेळ मधे गेला आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनवरच्या इंडिकेटरवर  ८: २४ ची फास्ट सी एस टी लावली . आता पंधरा मिंटात गाडी येणार होती . प्लॅटफॉर्म नंबर दोनवर हळूहळू  लोकांची गर्दी होऊ लागली . तेवढ्यात सावंतांचा  मोबाईल वाजला . ते फोनवर बोलले आणि नंतर एकदमच घाई करत शरद जवळ आले , " भडकमकरांचा फोन होता , मॅगी तिच्या  घरातून निघाली आहे . "
त्यांनी असं सांगताच आमच्या  सगळ्यांच्या काळजाचा  ठोका चुकला . सर्वजण शरदकडे पाहू लागले . येऊ घातलेल्या प्रसंगाचं टेंशन त्याच्या चेहऱ्यावर साफ़ दिसत होतं . आणि तोच का , त्याच्या जागी दूसरा कुणीही असता तरी त्याला असंच टेंशन आलं असतं .  एकतर एखाद्या मुलीला प्रपोज करणं हेच  भयानक  काम आहे , त्यात ते इतक्या लोकांसमोर ! , आणि मनात नसताना  ट्रेन खाली जीव वगैरे देण्याची धमकी देणे म्हणजे जीवाशीच  खेळ !!! . पण ते करायचं शरदने ठरवलं होतं ... मानलं त्याला आपण ...! मी हा  असला प्रकार  कधीच केला  नसता , तो केवळ शरद होता म्हणून हे करु शकणार होता . आता फक्त दहा मिनिटांत मॅगी  स्टेशनमधे येणार होती . "  प्लॅटफॉर्म नंबर दोनवर येणारी पुढील लोकल आठ वाजून चोवीस मिनीटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे .... " गाडीची सूचना पाठोपाठ ऐकायला येऊ लागली . सावंतांचा फोन पुन्हा वाजला ... फोनवर एक मिनिट बोलून ते पुन्हा आमच्याकडे आले , " आपली लोकल विठ्ठलवाडीवरुन निघाली आहे .  ५ ते ७  मिनिटांत ती स्टेशनला येईल ... मध्या तू  स्टेशनच्या गेटवर थांब ... मॅगी  आली की लगेच मला फोन कर आणि  तिला इकडे घेऊन ये ... भरत तू शरद जवळ थांब आणि त्याला काय हवं नको ते बघ ... नायर अंकल आपको क्या करना है पता है ना ?  "  शत्रु समोर दिसल्यावर आपल्या सैन्याला फटाफट आदेश देणाऱ्या सेनापतीसारखे सावंत वागत होते आणि  आम्ही सगळे त्यांचे आदेश पाळत होतो . मी स्टेशनच्या गेटजवळ जाऊन उभा राहिलो . आता तिकडे प्लॅटफॉर्मवर  शरद , भरत , जिग्नेस ,  सावंत आणि नायर अंकल होते . मी मॅगीच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो . आज  काय होईल ? ह्या एकाच प्रश्नाचा तणाव मला इतका जाणवत होता तर तिकडे शरदची काय अवस्था झाली असेल . लोक स्टेशनच्या दिशेने येत होते , त्यात मॅगी कुठे  असेल हेच माझे डोळे शोधत होते . अचानक ती मला दिसली . स्टेशनबाहेर रिक्षातून उतरत होती . मी लगेच सावंतांना फोन लावला . मॅगीला स्टेशनमधे येऊ दिलं .
" अ एक्सक्यूज मी ... तुमचं नाव मॅगी  ना ? " मी तिला अदबीत विचारलं .
" हो... पण ... " ती पुढे काही विचारणार इतक्यात मीच तिला म्हणालो , "  तुम्ही मला ओळखत नाही . मी शरदचा मित्र . " असं म्हणल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले ... " शरद तुमची स्टेशनवर वाट बघतोय ,  प्लीज जरा येता का ? " ती साशंक मनाने माझ्याबरोबर येऊ लागली . मी चालता चालता सावंतांना मेसेज केला की मी तिला घेऊन येत आहे . आम्ही प्लॅटफॉर्म नंबर २  वर आमच्या नेहमीच्या जागी आलो . शरद समोर उभा होता . तो तिच्या जवळ आला . मी त्याच्याकडे पाहिलं , त्याच्या डोळ्यात निर्धार होता . तो तिच्या  डोळ्यात डोळे घालून म्हणाला , " मॅगी , मला तू खुप आवडतेस ,  लग्न करशील माझ्याशी ? " त्यावर ती काही म्हणाली नाही  तशीच पुढे निघुन जाऊ लागली . " मॅगी थांब , मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो . तुझ्याशिवाय मी जगु शकत नाही ... प्लीज मला समजून घे "
" शरद प्लीज मी हे नाही करु शकत ... डोंट वेस्ट माय टाईम " म्हणत ती निघुन जाऊ लागली . ती तशी जात असताना शरद चरफडला . त्याने रागाने प्लॅटफॉर्मखाली ट्रॅकवर उडी मारली . " मॅगी , तू जर मला उत्तर दिलं नाहीस तर मी ह्या ट्रेनखाली जीव देईन " मी सावंतांच्या बाजूला उभा होतो . शरदने ट्रॅकवर उडी मारल्यावर ते टाळी वाजवून ' शाब्बास रे पठ्या ' असं ओरडले .समोरून ८ : २४ च्या  लोकलचा हॉर्न वाजला . लोकल हळूहळू प्लॅटफॉर्ममधे शिरत होती . शरद लोकल पासून १०० फुटांच्या अंतरावर होता .  नायर अंकलनी त्यांची ऍक्टिंग सुरु केली , " शरद ऐसा मत करो … मत करो ...."  मॅगीने मागे वळून पाहिलं  , " शरद  , ही मस्करीची वेळ नाही . चुपचाप प्लॅटफॉर्मवर ये ... "  एव्हाना  आमच्याभोवती   चांगलीच गर्दी जमली . लोक आपापसांत चर्चा करु लागले .
" तुला मस्करी वाटतेय ही .... ?  मस्करी वाटतेय ?   मॅगी आय ऍम डॅम सीरियस ... तू जर मला हो बोलली नाहीस तर खरच मी ह्या ट्रेनखाली जीव देईन "  शरदच्या बोलण्यात आवेश होता . का कुणास ठाऊक पण मला त्याची भीती वाटली ... शरदला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो ... तो थोडा सनकी सुद्धा आहे... आणि कधी काय करील ह्याचा नेम नसतो . मी सावंतांना म्हणालोही तसं , पण ते सुद्धा वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे मला वाटले . त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही .
" हा पोरकटपणा बंद कर ... ह्या ट्रेनखाली तू जीव देऊ शकत नाहीस ... ती तुझ्यासमोर येऊन  थांबेल ...सो प्लीज मला मुर्ख बनवु नकोस ...." तिने हे उत्तर दिलं आणि आम्ही सगळे तिच्याकडे बघतच राहिलो . शरद जीव देण्याचं फक्त नाटक करतोय हे तिच्या लक्षात आलं होतं . इतक्यात  एक  अनाउंसमेंट ऐकायला आली ... ' प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या किनाऱ्यापासून दूर उभे रहा एक जलद गाडी जाणार आहे .... कोणीही रेल्वे लाईन ओलांडु नका  .... '
" अच्छा ... ह्या ट्रेनखाली माझा जीव जाणार नाही काय ...? मग आता बघच मी काय करतो ते ..." असं म्हणून शरदने प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या ट्रॅकवर उडी मारली ... " आता झालं समाधान ... येणारी ट्रेन पुरेशी फास्ट आहे ...तिच्या खाली तरी माझा जीव नक्कीच जाईल ... " असं तो म्हणाला आणि डोळे मिटून त्याने आपले दोन्ही  हात उंचावले … जणू काही तो त्या येणाऱ्या भरधाव ट्रेनला आलिंगनच देणार होता . त्याने ट्रॅक बदलला हे बघुन आता  एकच गोंधळ उडाला . सावंतांनी केलेल्या प्लॅनिंगचा हा भाग नव्हता . इतका वेळ सुरळीत चाललेली प्लॅनिंग अचानक बदलली . मरण्याचं फक्तं नाटक करायचं होतं पण हे आता काहीतरी वेगळंच घडू पहात होतं . सावंत एकदम भांबावले .  शरद  असं काही करेल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते .

" शरद , हा काय वेडेपणा करतोयस ... बाजूला हो ट्रॅक वरुन ... समोरून एक्सप्रेस येतेय .... जोरात ....!!! " सावंत ओरडून सांगू लागले .  आम्ही सगळे त्याला ओरडून सांगू लागलो .  पण तो सारं काही ऐकायच्या पलीकडे गेला होता . तो तसाच डोळे मिटून उभा राहिला .   प्रकरणाने वेगळेच वळण घेतले  आहे हे कदाचित मॅगीच्या लक्षात आलं . तीही गोंधळून गेली , "शरद प्लीज ...आय ऍम सॉरी . प्लीज  कम  आउट ऑफ द ट्रॅक ... प्लीज ..."  त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही . लांबुन एक्सप्रेसचा हॉर्न ऐकू आला ... शरद उभा होता त्या  ट्रॅकमधून बारीक बारीक आवाज यायला लागला . ह्याचा अर्थ ट्रेन अतिशय वेगात येत होती . समोरचा प्रकार बघुन तर जिग्नेस चक्कर येऊन खाली पडला . माझ्या डोक्याला  मुंग्या आल्यासारखं वाटलं . लोकांनी एकदम आरडा ओरड़ा केला . समोरून प्रचंड वेगात येणारी एक्सप्रेस दिसली . ती शरद पासून फारतर ७०  ते ८०  फुटांवर आली ....  आणि तेव्हाच मॅगी जोरात ओरडली , शरद , आय लव यु ... आय रिअली मीन इट ... आय लव यु शरद .... " ते  ऐकल्याबरोबर शरदने त्याचे बंद असलेले  डोळे उघडले . आणि तिच्याकडे विजयी मुद्रेने पाहिलं . पण त्याच वेळी समोरून येणाऱ्या एक्सप्रेसचा कर्णकर्कश्य हॉर्न वाजला .... शरदने समोर पाहिलं .... पण आता वेळ निघुन गेली होती ... ट्रेन एखाद्या राक्षसीणीसारखा आवाज करत त्याच्या अंगावर धावून येत होती . शरद पूर्णपणे सुन्न झाला आणि त्याचे  पाय जागच्या जागी खिळुन  राहिले.  प्लॅटफॉर्मवरचे सगळे लोक एकदम जोरात ओरडले , काहींनी डोळे झाकून घेतले ...  आणि तेवढ्यात एक वेगळीच घटना घडली  . प्लेटफार्म नंबर तीनवरुन  एका   तरुणाने शरदच्या अंगावर उडी मारली . एक्सप्रेस त्याला स्पर्श करणार इतक्यात  शरदला  घेऊन तो ट्रॅकच्या बाजूला पडला .... सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या लोकांचा  अडकून राहिलेला निश्वास एकत्रित सुटला  ." ओ माय गॉड ,  ओह फ... , अरे देवा ,वाचला बाबा ..." लोकांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले . तूफान वेगात आणि  भरमसाठ धूळ उडवत ,   धड़ाक धड़ाक करत एक्सप्रेस निघुन गेली . एक्सप्रेस गेल्यावर सगळे लोक त्या दोघांना उचलायल धावले ...एकच गर्दी त्यांच्या भोवती झाली .  मॅगी मटकन खाली बसली आणि रडू लागली . नायर अंकलना तिच्या सोबत ठेवून आम्हीसुद्धा ट्रॅकवर उडया मारल्या . आम्ही शरदला किती लागलं ते पाहू लागलो . त्याच्या पायाला थोडंसं खरचटलं होतं . नशीबाने बाकी जास्त काही मोठी दुखापत झाली नव्हती . त्याला वाचवणाऱ्या तरुणाला काही लागलं आहे का ते आम्ही पाहू लागलो तर गर्दीत तो आम्हाला दिसेनाच ... तो तरुण गर्दीत कुठे गायब झाला आम्हाला कळालंच नाही . आम्ही त्याचा बराच  शोध घेतला तरी  तो आम्हाला कुठेच दिसेना ... हे कसं काय शक्य होतं ...? शेवटी आम्ही शरदला उचलून प्लॅटफॉर्वर आला . मॅगी समोर उभी होती . ती जवळ आली आणि तिने खाड़कन शरदच्या मुस्काटित मारली आणि त्याला मीठी मारून रडू लागली . " आय ऍम व्हेरी सॉरी शरद  ... आय लव यु " म्हणत ती आणखीनच रडू लागली .  जीवघेण्या प्रसंगातून शरद वाचला होता  , पण  माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता ,  ' शरदला  वाचवणारा तो तरुण कोण होता ? '

रविवार, ३ मे, २०१५

लोकल डायरी -- १२


अँटी व्हायरसच्या एंगेजमेंटची बातमी कोपऱ्यात  लपून  बसून ओरडत असलेल्या रातकिड्यासारखी माझ्या  डोक्यात वाजत राहिली.  त्याने मला जास्तच अस्वस्थ वाटू लागलं . डोक्यातून तिचा विचार जाता जाईना .   मुश्किलीने  एक मुलगी आवडली होती , पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता . आपलं म्हणून बिनधास्त शिरावं आणि ते दुसऱ्याचं घर निघावं  असं झालं होतं .  माझ्याच बाबतीत असं का व्हावं ?  नशीबच खराब आपलं ... !  मी माझ्या नशिबाला  शिव्या देत स्टेशनच्या दिशेने निघालो .  चालता चालता माझ्या डोक्यात सहज विचार आला ,  आपण किती दिवस अँटी व्हायरसला पहात होतो ...? फार - फार तर ५ - ६ महीने झाले असतील , त्याच्या आधी तर ती मला दिसली नव्हती , किंवा माझी तिच्याशी कसलीच ओळख नव्हती . मग  ,  जे  पहिल्यापासून आपलं  नव्हतच ते गेल्याचं दुःख तरी कशाला उगाळत बसा ? मरु दे च्यायला !!!   मी तिचा विचार करणं सोडून दिलं . आज सावंत त्यांचा  प्लॅन काय आहे ते सांगणार होते . त्याचीच उत्सुकता मनात घेऊन मी प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या चढु लागलो . पाठीमागून भरतची हाक ऐकू आली .
" काय भाई , ऑल ओके ना ? "  अँटी व्हायरसच्या एंगेजमेंटच्या बातमीचा माझ्यावर काय परिणाम झाला याचा अंदाज घेण्यासाठी भरत मला विचारत होता .
" ऑल ओके ... नो प्रोब्लेम ...!"  मी नेहमीपेक्षा जरा जास्तच उत्साहात उत्तर  दिलं .
" सॉरी यार ... कालच्याबद्दल ..." भरत  म्हणाला .
" अरे त्यात काय ? .... तु कशाला सॉरी बोलतोयस ? "
" नाही , तसं नाही , पण ती नको असलेली बातमी मीच तुला सांगितली ना ...."
" सोड रे ... तुला कालच बोललो ना ,की मला हे माहित आहे म्हणून ... जाऊ दे ... बरं  मला सांग शरदच्या  प्लॅनिंगचं काय झालं ? सावंत आज आपल्याला प्लॅन सांगणार आहेत ना "  मी विषय बदलत म्हणालो .
" हो रे .... आज प्लॅन ठरणार आहे . आले असतील ते प्लॅटफॉर्मवर …! " आम्ही दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या उतरत होतो . आमच्या नेहमीच्या जागी पोचलो तेव्हा सावंत , शरद , नायर अंकल , भडकमकर काहीतरी चर्चा करताना दिसले. आम्हाला पाहताच भडकमकर भडकले , " काय रे , इतक्या उशिरा येताय ? मित्राची काही काळजी वगैरे आहे की नाही ? "
" सॉरी भडकमकर साहेब , रिक्शा मिळायला उशीर झाला . शरद भावा , सॉरी यार " मी आणि भरतने   दिलगीरी व्यक्त करुन टाकली.  पण  शरदचं आमच्याकडे लक्षच नव्हतं .  पहिल्यांदाच पोहण्यासाठी   पाण्यात उतरत असलेल्या नवशिक्या मुलाच्या चेहऱ्यावर असते तशी  भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत  होती .  कदाचित उद्या काय करायचं आहे हे सावंतांनी त्याला सांगितलं असलं पाहिजे ...
" सावंत , हे आपल्याच्याने होणार नाही ...फुल्ल तमाशा होईल ... काय फालतुगिरी आहे ही ...!!!" शरद नकरार्थी मान हलवत म्हणाला .
"अरे,  फालतुगिरी काय त्याच्यात  ? तु तुझ्या प्रेमासाठी हे सगळं करतोयस ..."
" पण हे कसलं फिल्मी आहे …!!!  ती काय विचार करेल माझ्या बाबतीत ..."
" काही विचार करणार नाही , बरं तू आधी तिला कसा प्रपोज केला होतास ...?
" काही नाही ... ती रस्त्याने चालली होती . मी तिला मधेच  थांबवून विचारलं … तर ती काही न बोलता निघुन गेली . हो पण नाही आणि नाय पण नाही .... "
" बरोबर आहे ... ह्याला काय प्रपोज करणं म्हणतात ....?  चोरी केल्यासारखं ...!  अरे  कुसुमाग्रज म्हणतात , प्रेम कर भिल्लासारखं ... बाणावरती खोचलेलं ... मातीमधे उगवुन सुद्धा आभाळापर्यंत पोहोचलेलं ...., कदाचित तिला हे तुझं फिल्मी प्रपोज करणं आवडेलही ...
" ह्म्म्म ... बहुतेक ..."  शरदच्या मनात अजूनही शंका होती .
" पटत नाही का तुला ...? बरं ,   मला सांग समजा तुमचं लग्न झालं तर तिच्या  घरच्यांचा काही प्रॉब्लेम आहे का ? "
" नाही ... तसा काही प्रॉब्लेम त्यांना वाटणार नाही ... तसे ते आधुनिक विचारांचे आहेत ..."
" मग तुझ्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम आहे का ? "
"   त्यांनी तर मला ह्या बाबतीत सोडूनच दिलेलं आहे .... आमचे तीर्थरूप तर म्हणाले की फक्त एखाद्या मुलीशीच लग्न कर म्हणजे झालं …! "  त्यावर आम्ही सगळे हसलो .
" अगदी बरोबर आहे तुझ्या वडिलांचं !!! ओके  मग आता तुला मॅगी मनापासून आवडते ?
" होय हो ... आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का ? "
" मग मित्रा , आता राहिलं कोण ? मॅगी .... ! तिचं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे का ? "
" नाही , म्हणजे मी तिला इतक्या वर्षांपासून ओळखतो पण माझ्या माहितीत तर तसं कोणी नाही . तसं काही असतं तर मी स्वतः बाजूला झालो  असतो . "
" झालं तर  मग ...   आता  तू तिच्यावर किती प्रेम करतोस हे तिला पटवून द्यायला नको  का ? " ह्या बाबतीत जास्त वेळ घालवून चालत नाही बाबा , नाहीतर त्याचा सावंत होतो ...! " सावंत असं म्हणाले आणि शरदसकट    सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले . ते असं का म्हणाले हे फक्त मलाच माहित होतं.
" सांगिन नंतर कधी तरी .... फुरसतीत ... आता शरदचा प्रॉब्लेम सॉल्व करु   " कोणी काही विचारायच्या आत त्यांनी सगळ्यांच्या येऊ घातलेल्या प्रश्नाला शिताफिने बगल दिली .  
" ओके ... ठीक आहे ... मी प्रयत्न करतो ..." शरद नाईलाजाने म्हणाला .
इतक्यात  भरत ने आम्हा सगळ्यांना खुणावलं . आमच्या बाजूने मॅगी जात होती . ती कालच्याच वेळेवर आली होती . तिने गुलाबी   रंगाचा ड्रेस घातला होता . डोक्यावरच्या कुरळ्या  केसांच्या काही बटी वाऱ्याबरोबर उडत होत्या .  तिच्या खांद्याला तिची स्टायलिश निळ्या रंगाची हॅंड बॅग होती . आमच्या बाजूने जाता जाता तिने सहज आमच्या ग्रुपकड़े नजर टाकली , तिला शरद दिसला आणि तिच्या नजरेतले भाव अचानक बदलले ...  पण क्षणभरच !  नक्कीच तिला शरदबद्दल काहीतरी वाटत असावं हे आमच्या लक्षात आलं .  त्यानंतर  ती इकडे तिकडे न बघता सरळ नाकासमोर चालत गेली . ती तशी गेली आणि शरदला काय झालं कुणास ठाऊक , तो अचानक  म्हणाला  , " सावंत , उद्या काय व्हायचाय तो तमाशा होऊ देत ... आता मी मागे हटणार नाही . "
" ये हुई ना बात ... चला तर मग , आपण परत एकदा आपल्या सो कॉल्ड फिल्मी  प्लॅनची उजळणी करू ... तर प्लॅन असा आहे ... उद्या आपल्या ८ : २४ च्या गाडीखाली  शरद आपला जीव देणार , आपण रोजच बघतो की गाडीला ट्रॅक चेंज करायचे असल्यामुळे रोजच ती हळू हळू प्लॅटफॉर्म  मधे शिरते ...  ट्रेनचा मोटरमन माझ्या ओळखीचा आहे.  मोटरमनशी मी बोललोय,  तो  उद्याची  गाडी आणखी  हळूहळू  प्लॅटफ़ॉर्म नंबर 2 वर आणेल . मॅगी  स्टेशनमधे आली की  शरद प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या ट्रॅकवर  उडी मारेल  .  आपल्याला शरदची काळजी घेणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर तो तिच्यासाठी जीवही देऊ शकतो हे आपल्याला तिला पटवून द्यायचं आहे ....   तोपर्यंत मध्या तू मॅगीला शरद जिथे उभा असेल तिथे घेऊन यायचं . नायर अंकल  आप शरद को  बार बार मना करेंगे ... ' अरे ऐसा मत करो , मत करो ...' सब रिअल दिखना मांगता है  ।   शरद तिला प्रपोज करेल , आणि जर ती नाही म्हणाली तर ह्या ट्रेन खाली जीव देईल ... , असं तो तिला सांगेल  ... एवढा भयानक  प्रकार बघुन तर ती  नक्कीच त्याला हो म्हणेल , तिच्याकडे दूसरा पर्यायच  उरणार नाही ... काय ...? कशी आहे आयडिया ...? "  सावंत सगळ्यांकडे पाहत म्हणाले .
" येस ... एकदम भारी आहे आयडिया ..."  मी उत्साहाच्या भरात म्हणालो . मला त्यांची आयडिया खरोखर आवडली .
" पण  मला एक शंका आहे ....जर  एवढं करुन पण ती नाय म्हणाली तर ? शरद खरंच  गाडीखाली  जीव देणार ? " भडकमकरांनी मधेच शंका काढली . हे म्हणजे शुभ बोल नाऱ्या तर घर पेटलं असं झालं .

" नाही .... त्याचा पण मी थोडा विचार केलाय ... माझा एक मित्र आहे  रेल्वे सुरक्षा बलात ... त्याला सांगून ठेवलंय ... जर ती उद्या नाहीच म्हणाली आणि शरदला गाडी खाली जीव द्यायचीच पाळी आली तर लगेच तो माझा मित्र येईल , त्याला बाजूला घेईल ... आणि त्याला अटक करायचं नाटक करुन त्याला घेऊन जाईल ... त्यामुळे शरद  डोंट वरी ...! तू खरंच मरणार नाहीस ...  "  सावंत  त्याला डोळा मारत म्हणाले .  सावंतांनी खरोखर सर्व बाजूंचा विचार करुन प्लॅन बनवला होता . एवढं होईपर्यंत आमची नेहमीची गाडी प्लॅटफॉर्मला लागली ... गाडी प्लॅटफॉर्मला लागत असताना मोटरमन ने सावंतांकडे बघुन हात उंचावला . सावंतांनीही त्याला प्रतिसाद दिला . सगळे मग सावंतांकडे एकदम भक्तिभावाने पाहू लागले . उद्याचा प्लॅन नक्की यशस्वी होणार ही खात्री आता आमच्या ग्रुपच्या प्रत्येकाला झाली . गाडी थांबायच्या आत सगळ्यांनी तिच्यावर हल्ला चढवला.  आज गाडीत चढताना एकदम वेगळंच वाटत होतं .... उद्या  ह्याच गाडीखाली शरद आपला जीव देणार होता ...