नमस्कार मित्रांनो …!!
बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहितोय … काही दिवसांपूर्वी लोकल डायरी ही मालिका लिहित होतो , पण काही कारणामुळे ती अर्धवट राहिली . लोकल डायरी अर्धवट सोडल्याबद्दल क्षमस्व …. ! ह्या डायरीचे तीन भाग पूर्वी प्रकाशित केले होते …पण आता त्याला बरेच दिवस झाले . त्यासाठी ते तीनही भाग सोबत जोडत आहे …
आणि आता पुढचा भाग लिहितोय …
लोकल डायरी -- ४
आमचा लोकलचा ग्रुप हा इतर ग्रुप पेक्षा एकदम भारी आणि यूनिक आहे असं काही माझं म्हणण नाही . आमची फक्त एकमेकांना सवय झालीय एवढंच ! मनुष्याचा स्वभावच असतो तसा ... तो जास्तीत जास्त आहे त्या परिस्थितीत तसाच राहण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत त्याला स्वतःला काही त्रास होत नाही…. आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर येण्याचा प्रयत्न शक्यतो कुणी करत नाही. आमचा ग्रुपही त्याला अपवाद नव्हता . एवढंच काय , आमच्या बसायच्या जागेत दूसरा कोणी आला तरी आम्हाला कसतरीच वाटायचं ... आणि आमच्या पैकी सुद्धा कोणी दुसरीकडे जाऊन बसला तर त्यालाही अगदी दुसऱ्या ग्रहावर आल्यासारखं वाटत असावं . भड़कमकर विंडोत दिसले नाहीत , नायर अंकल नसले , सावंतांनी पेपर वाचायला आणले नाहीत किंवा शरद भरत विडिओ कोच कड़े पाठ करुन उभे राहिले किंवा जिग्नेस ने काही बावळटपणा केला नाही तर चुकल्या चुकल्या होतं . प्रत्येकाची वेगळी अशी एक खासियत आहे. प्रत्येकाला त्याच्या एका विशिष्ठ स्थितीत पाहण्याची सवय झाली आहे . आणि माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे अँटीव्हायरस !!! अजूनही मला तिचं नाव कळलेलं नाही त्यामुळे मी तिला अँटीव्हायरसच म्हणतो … ती दिसली नाही तर संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो . ती आली की सगळं वातावरण कसं प्रसन्न होऊन जातं. संजीवनीच जणू !!! एखाद्या व्यक्तीच्या येण्याने इतका फरक कसा काय पडावा ? कदाचित माझ्या नजरेलाही तिची सवय झाली असावी . पण आज काल ती ट्रेन ला दिसत नाही . किती दिवस ती मला दिसली नाही .... ? हां... आजचा धरून नऊ दिवस झाले . मी दिवस मोजतोय ह्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच ! नजर सारखी व्हिडिओ कोच कडे वळते. स्टेशन वर आल्यापासून माझे डोळे सतत तिलाच शोधत असतात. कानात इअर फोन घालून ती डब्यात दरवाज्यापाशी उभी आहे असा सारखा मला भास होतो . मी तिकडेच बघत असताना , रादर तिलाच शोधत असताना माझ्या पाठीवर एक जोराची थाप पडली. मी दचकुन पहिलं तर मागे भरत उभा होता.
" काय रे ... काय चाललय ? " त्याच्या विचारण्यात मिश्किलपणाची झाक होती .
" काय नाय रे ... पोरी बघत होतो ... दुसरं काय करणार ? " त्याला अपेक्षित असलेलं उत्तर मी देऊन टाकलं, त्यामुळे त्यालाही संशय घेण्यासारखं काही वाटलं नसावं . तोही मला मजेत टाळी देत म्हणाला , " हो बाबा, हे मात्र महत्वाचं काम आहे ."
मग आम्ही इकडे तिकडे बघत बसलो. शरद आला नव्हता. त्यामुळे भरत आज माझ्याशी गप्पा मारत होता . एरवी ते दोघे इतरांची खेचत असतात . एकाने सुरूवात केली की दुसरा सुरू होतोच . पण आज त्याचा उजवा हात नसल्यासारखं त्याला वाटंत असावं . आणि टाईमपास करायला दुसरा कोणी नसल्याने तो माझ्याशी बोलु लागला .
" काय रे ? तुझा भाऊ कुठं आहे ? " , सावंतानी भरतला विचारलंच !
" आज येणार नाही तो ...." भरत व्हिडिओ कोच कडे नजर टाकत म्हणाला .
" किधर गया है ? " नायर अंकल विचारू लागले .
" मालूम नही… "
" अरे , तेरा दोस्त है और तेरेकोही मालूम नही ? "
" दोस्त है अंकल , बिबी थोडी है ? " त्याच्या हया उत्तरावर सगळे हसले . उल्हासनगरला जिग्नेसही चढला नाही.
" अरे , जीग्नेस भी नही आया …. बघा दोघे कुठे गेले नाहीत ना ? " सावंत गमतीने म्हणाले . आज दोन महत्वाची माणसं नव्हती , एक खिल्ली उडवणारा आणि दुसरा खिल्ली उडवुन घेणारा .... त्यामुळे डब्यात शांतता होती . मलाही आज कंटाळा आला होता . पलीकडे अँटीव्हायरस नसल्याने आणखीनच बोअर होत होतं. लोकलने कल्याण सोडलं आणि भड़कमकरांची गाडी घाटाला लागली . ते ट्रेन जशी हालेल तसे नागोबासारखे डोलत होते. सावंत पेपर वाचत बसले . नायर अंकलचं मात्र दोन्हीही चालू होतं. ते पेपरही वाचत होते आणि मधून मधून डुलक्याही काढत होते. आमच्या बसायच्या जागेवर एक कुटुंब आल्याने मी अणि भरतने त्यांना बसायला जागा दिली आणि आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या आवडत्या कामाला लागलो . मी बघत असताना भरत माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला ," ती ग्रीन ड्रेस वाली मुलगी आहे ना… ”
" कुठे रे ? " मीही त्याच हळू आवाजात विचारलं .
" अरे ती बघ ना समोर, डोअरपासून तिसरी.... "
" हां… हां… . पण तिचं काय ? "
" ती आता ठाण्याला उतरून एका आशिष नावाच्या मुलाला भेटणार आहे ." भरत अतिशय आत्मविश्वासने बोलत होता .
" तुझ्या ओळखीची आहे का ती ? "
" माझी कसली डोंबलाची ओळख !! मी तिला फोन वर बोलताना पहिलं "
" तुला एवढ्या गोंधळात कसं काय ऐकायला आलं ? " इतक्या अचूकपणे त्याने हे सांगितल्यामुळे मला जरा आश्चर्यच वाटलं.
" अरे ऐकायला कसं येईल ? मी तिचे लिप्स रीड केले. तिच्या ओठांच्या हालचालीवरुन मी हे सांगू शकतो ." भरतने दिलेल्या ह्या स्पष्टीकरणावर तर मी त्याच्याकडे पहातच राहिलो .
" आयला... पोरी पटवण्यासाठी माणसं काय काय करतात ... धन्य आहे ... " मी त्याच्याकडे अविश्वासने पाहू लागलो.
" पोरी पटवण्यासाठी नाही रे बाबा ... माझा चुलत भाऊ बहिरा आणि मुका आहे . त्यामुळे आम्हाला त्याच्याशी बोलताना असंच खाणाखुणा करुन आणि ओठांच्या हालचाली वरुन बोलावं लागतं. मीही ती लिप रीडिंग शिकलो आणि त्यामुळे मला ती सवयच लागली आहे . कोणी लांब जरी बोलत असेल अणि फक्त लिप रीडिंग करुन मी सांगू शकतो की तो माणूस काय बोलतोय ते ..."
" आयला भारीच की आहे हे !!! बर चल सांग त्या निळ्या साडी वाल्या काकू काय बोलतायत शेजारच्या काकुंशी ? "
" कोणत्या ? ओह त्या का ... ? थांब , मला थोडा वेळ निरिक्षण करू दे ...." म्हणत भरत त्या कामाला लागलाही ! तो डोळे बारीक करुन एकटक त्या निळ्या साडीवाल्या बाईँकडे पाहू लागला.
" अरे ए ... एवढं एकटक बघू नकोस ... त्या बाईंना काहीतरी वेगळाच संशय यायचा... मार खाशील फुकटचा ! "
" गप रे काय होत नाही.... " तो तसाच नजर न हटवता म्हणाला . असंच अजुन 3 -4 मिनिटे एकटक पाहिल्यावर तो म्हणाला , " ती तिच्या ऑफिस मधल्या एक बाई बद्दल बोलत आहे आणि ती तिची सीनियर असावी "
" कशावरून ? "
" ती म्हणत होती की, " त्या सटवीचं प्रोमोशन काय झालं स्वतःला फार शहाणी समजायला लागलीय... "
" काय ... ? असं म्हणाल्या त्या बाई ? " मला मोठी गंमतच वाटली.
" हो ... मी माझ्या डोळ्यांनी ऐकलय ...." म्हणत तो मिश्किल पणे हसु लागला .
" मस्तच रे ... मानला यार तुला .... कडक !!! पण मला अजुनही जरा शंका वाटतेय ..."
" आयला , आता एवढं तुला प्रात्यक्षिक करुन दाखवलं तरी तुझा विश्वास नाही ? "
" आता मला काय माहित की त्या बाई खरंच असं बोलत असतील ते ? तू सांगितलस म्हणून मी आपलं हो म्हणतोय ... "
" आई शप्पत ..... भरत ला चॅलेंज ! ” मी नकळत भरतचा स्वाभिमान दुखावला होता .
" नाय रे बाबा ... तुला कशाला चॅलेंज देऊ ? " मी आपलं सावरण्याचा प्रयत्न करु लागलो .
" नाय .... नाय .... तुझा विश्वास बसत नाही ना ? चल ... तू आवाज न करता फक्त ओठांची हालचाल करुन एखादा शब्द बोल .... मी तो ओळखतो ..."
" अरे जाउ दे रे बाबा ... "
" नाय ... आपल्यावर अविश्वास ? बोल बोललो ना आवाज न काढता एक शब्द ." भरत एकदम इरेलाच पेटला...
भरत आता मला तसं सोडणार नव्हता , हे माझ्या लक्षात आलं . आता त्याला कोणता तरी शब्द द्यावा लागणार होताच . कोणता शब्द द्यावा ? मी मनात विचार करू लागलो . आता शब्द दिला तर जरासा अवघडच द्यावा , म्हणजे जिरेल जरा त्याची असा विचार करुन मी एक शब्द ठरवला. भरत माझ्याकडे लहान मुलाच्या कुतुहलाने पहात होता. त्याचं तसं ते तोंड बघुन तर मला हसायला यायला लागलं .
" हसतोस काय साल्या .... बोल ना आता ... "
" ओके ... ओके... ऐक .... सॉरी... बघ...." म्हणत मी मनात ठरवलेला शब्द आवाज न काढता नुसत्या ओठांच्या हालचालीवरुन बोलून दाखवला ....तो माझ्याकडे निरखून पाहू लागला . अन म्हणाला , “ सोप्पय … ”
“ सांग ना मग, मी काय बोललो ते ! ”
त्याने जे उत्तर दिलं त्यावर माझी बोलतीच बंद झाली .
तो म्हणाला - " अँटी व्हायरस ! "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा