रविवार, १५ मार्च, २०१५

लोकल डायरी -- ५



   गाडी  सुटता सुटता एकजण धडपडत आत आला .  आधी तर आम्ही त्याला ओळखलंच नाही . तो शरद  होता …   आज तब्बल सात  दिवसांनी शरद लोकल मधे आला होता  आणि   तोही उशिरा …! त्याला बघुन तर आमच्या ग्रुपचा प्रत्येक मेंबर आश्चर्यचकित झाला .    कारणही तसंच होतं . वाढलेली दाढी , बिना इस्त्रीचा शर्ट  तोही इन न केलेला  , तारवटलेले डोळे ,  केस   विस्कटलेले  आणि मुख्य म्हणजे तो अगदी शांतपणे येऊन आपल्या जागी बसला . आल्या आल्या ना कुणाची भंकस  केली ना  कुणाशी  काही बोलला ....  खाली  मान घालून बसून राहिला . हे म्हणजे वाल्याकोळीचा  वाल्मीकी  झाल्यासारखं होतं . अनायसे  रामायण सीरियल मधल्या वाल्मिकींएवढी  नाही तरी लहानशी  दाढीही वाढवलेली होतीच …!    तो असा येऊन बसला , आमच्या कुणाला काय बोलवं तेच कळेना . शेवटी  सीनियर मेंबर सावंतच पुढे  झाले  
" काय रे शरद ? हे काय   ? आणि तू हे काय करुन घेतलस स्वतः चं ? "  
त्यावर तो काहीच बोलला नाही . नुसता मान खाली घालून  बसून राहिला . नायर अंकलही विचारू लागले पण त्याच्यात काहीच फरक पडला नाही . तो डोळे बंद करुन स्वस्थपणे बसून राहिला . आज शरदचं नक्कीच काहीतरी बिनसलं होतं . सावंतांनी खुणेने भरतला ‘ काय झालंय  ? ‘ विचारलं . पण त्याने खांदे उडवले.  त्याला  काही  माहित नव्हतं . तोही आमच्यासारखा त्याच्याकडे  आश्चर्यने पहात होता.
" ए भाई , काय  झालाय काय तुला  ? गेले   पाच सहा   दिवस ट्रेनला आला पण नाहीस ... आणि आज हा असा अवतार का करुन घेतलायस् ?  घरी काय प्रॉब्लेम नाही ना ?  "  भरतने  त्याला विचारण्याचा प्रयत्न करुन पाहीला . तरी काही उत्तर नाही.  भरतला ते सहन झालं नाही . त्याने परत  त्याच्या दंडाला हलवुन विचारलं , तसा तो एकदम भडकला , " प्लीज मला काहीही विचारू नका .  मला  एकट्याला राहु दया  ....प्लीज !   "  तो असं बोलला आणि मग सगळेच शांत बसले . पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता , तो म्हणजे शरदचं हे असं का झालं ? " नायर अंकलने भरतला शांत रहा असं  खुणावलं . इतक्यात गाडी निघाली . उल्हासनगरला जिग्नेस चढला . तो  नेहमीप्रमाणे धड़पडत आला आणि  चुकून  शरदच्या  पायावर त्याचा पाय   पडला . शंकराने तिसरा डोळा उघडावा तसे त्याने आपले डोळे उघडले .
" अबे साले , दिखता नई क्या तेरेको ? "  म्हणत शरदने त्याला दुसरीकडे ढकलुन दिलं .
" शरद भाय ... यार ढकेलता क्यूँ है ? " स्वतःला सावरत जीग्नेस म्हणाला .
" तो क्या तेरेको सर पे बिठाऊँ ? " शरद भडकुन म्हणाला .  जिग्नेसलाही त्याच्या वागण्यातला फरक जाणवला . त्याने मला नजरेने  विचारलं . मीही त्याला नजरेनेच शांत रहा असं खुणावलं.
“ शरद यार , काय झालंय  ?  काय प्रॉब्लेम  असेल तर सांग  ना … आपण सॉल्व  करू  … ” मी शरदला म्हणालो .
“  प्लीsss ज …   ”  शरद अगदी हात वगैरे जोडून म्हणाला .  ‘ मला काहीही विचारू नका ‘ असाच त्या ‘ प्लीज ‘ चा अर्थ होता . शरदला  आणखी  विचारून  काही फायदा होणार नाही हे आता  आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला   कळलं होतं .  सगळे जण नेहमी प्रमाणे वागू लागले . शरद आमच्यात नाही असं समजून आमच्या गप्पा सुरु झाल्या .
" नायर अंकल ,  मेरा नया शूज देखिये ....। "  जिग्नेस म्हणाला
" अरे वा... सॉलिड है ... कहाँ से लिए ....? "
" यु एस ए "
" ओह .... मतलब  तेरे घर के बाजुसे   ना ? " सावंत भरतला टाळी देत म्हणाले .
" अरे नहीं ... सच्ची यु एस ए से ही लिए है .... मेरे अंकल है वहां पे । उन्होंने भेजे है । एक्चुली मेरे जिगरी   दोस्त को  दिखाना था लेकिन वो तो बोहोत भाव खा रहा है । " जिग्नेस शरदला टोमणा मारत म्हणाला . शरद मात्र समाधीच्या अवस्थेत गेलेल्या ऋषीसारखा  गंभीरपणे  डोळे मिटून बसला होता . परंतु त्याचे कान अर्थात आमच्या बोलण्याकडे आहेत असं  आम्हाला वाटत होतं  .
" वो क्या है न जिग्नेस , आज कल  कोई किसीका नहीं है ....।  सब अपनी अपनी सोचने मैं लगे रहेते है । " नायर अंकल सुद्धा  अप्रत्यक्षपणे  शरदलाच उद्देशून  बोलत होते .
" घोर कलियुग आलय बाबा... " भडकमकर मधेच म्हणाले . ते कधी काय बोलतील याचा नेम नाही.  त्यानंतर जीग्नेसने आपला  मोबाईल  काढला आणि त्यावर कोणत्या तरी डान्सचा  व्हिडीओ पाहत उभा राहिला . मीही  त्यात डोकं घालून पाहू लागलो .
“ अरे , एवढं  काय पाहताय ? आम्हाला पण दाखवा …   ”  सावंत विचारु  लागले  . जीग्नेसने त्यांना  आपला मोबाईल  दिला . “ ह्याच्या पायाला मुंग्या  चावल्यासारखा  पाय झाडत का नाचतोय हा  ? ” सावंत गमतीने म्हणाले . त्यावर सगळे हसले ,  शरद सोडून !
“ अरे  नही  उसको  Tap  डान्स  बोलते है  … धूम ३ में अमीर खान ने नै किया था ?  ”
“ अब तू ये नये शूज पेहेन्के  Tap  डान्स  करके दिखा … ” भरत म्हणाला .
“ नही  बाबा … अगर फिरसे  किसीके  पैरोपे  पांव  गिरे तो भगवान शंकर अपनी तिसरी  आंख  खोलेंगे … ”  जीग्नेसने   शरदकडे  एक चोरटा  कटाक्ष टाकला .  अशी सगळी मजा  मस्ती चालू होती पण त्यात नेहमीचा सहजपणा नव्हता .  आपल्या एखाद्या अवयवाला जर दुखापत झाली असेल तर  जसं  आपलं  लक्ष सारखं  सारखं  त्याच अवयवाकडे  जातं  त्याप्रमाणे आज आमचं  झालं  होतं  . आम्ही  अधून मधून शरदकडे  पाहायचो  पण त्याचे डोळे मिटलेलेच राहिले .  आज  व्हिडीओ कोच कडे  कुणाचं  लक्षही  गेलं  नाही . ना कुणी त्याबद्दल काही बोलले …  नेहमी विंडोत  झोपणारे भडकमकरही  आज जागे राहिले . हा तर रेकॉर्डच झाला आज ! पारसिकचा बोगदा लागला आणि डोअर वरच्या रवीच्या ग्रुपने ‘ जय  भवानी … जय अंबे … ‘  चा जयघोष सुरु केला .  आमच्या  जागा अदलाबदली  करणं  सुरु झालं  . सावंत , भरत  उभे  राहिले . मी आणि जीग्नेस त्यांच्या जागेवर बसलो . शरद  तसाच डोळे मिटून बसून राहिला . त्याला त्याच्या जागेवरून उठवण्याची रिस्क कोण  घेईल ?  आम्ही त्या भानगडीत पडलोच नाही .  ठाणे गेलं  , शरद  आपल्या जागेवरून उठला आणि डोअरच्या दिशेने जाऊ लागला .  
“ आयला , असा काय हा ? न सांगताच गेला !  सावंत,  जाम मोठा लोचा झालाय बहुतेक … ” भरत  त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला . शरद-  भरत  दोघे नेहमी घाटकोपर गेलं  कि मग बरोबरच गोंधळ घालत निघतात आणि कुर्ल्याला उतरतात . पण आज असं  झालं  नाही . तो भरतला न सांगताच पुढे गेला . तेही सर्वांना खटकलं  .
“ हो रे… बघ ,  कुर्ल्याला उतरल्यावर तरी काय बोलतो का ? तुला सांगेल कदाचित … ” मी  भरतला म्हणलो.  

कुर्ला आलं . तुडुंब भरलेल्या  धरणाच्या  लहानशा दरवाज्यातून पाणी सोडावं  तसे लोक धडाधड  त्या दरवाज्यातून बाहेर पडले .  आणि तितकेच पुन्हा आत आले .  आम्ही खिडकीतून बाहेर पाहू लागलो ,    भरतला  न भेटताच शरद निघून गेला होता .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा