बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

.... भेट ....



                                 " हो ... हो... मी निघतो ताबडतोब  "  दादासाहेबांनी फोन खाली ठेवला, पलीकडुन जी बातमी आली ती डोकं सुन्न करणारी होती हे त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावरुन  कळत होतं. थोडा वेळ ते तसेच बसुन राहीले. नंतर भानावर आल्यावर तत्काळ ड्रायवरला गाडी काढायला सांगितलीदुसरा फोन लावला,  " Mery , cancel todays all meetings and appointments... i am leaving....  " बोर्ड मिटींग बाबत आणखी काही सुचना देऊन त्यांनी फोन ठेवला. आपल्या केबिनमधुन जवळ जवळ धावतच ते बाहेर पडले. दादासाहेब अचानक बाहेर आलेले पाहुन इतर सगळ्या स्टाफची चांगलीच भंबेरी उडाली. हातातली कामे जशीच्या तशी टाकुन धडपडत सगळे उभे राहीले. पण दादासाहेबांचं मात्र तिकडे लक्षच नव्हतं. सगळे काहीशा आश्चर्याने एकमेकांकडे पहात होते. दादासाहेब घाईघाईने बाहेर आलेतोपर्यंत ड्रायवर ने गाडी तयार केली. " साताऱ्याला जायचंय... शक्य तितक्या लवकर ...." गाडीत बसता बसता ते ड्रायवरला म्हणाले. दादासाहेब गाडीत बसल्यावर ड्रायवरने लगेचच गाडी स्टार्ट केली. गाडी निघाली.…  एसी फुल असुनही त्यांना अस्वस्थ वाटु लागले. अंगातला कोट काढुन ठेवला, आणि टायची नॉट सैल केल्यावर आता त्यांना थोडे बरे वाटु लागले. डोळ्यांवरचा चश्मा काढुन शर्टच्या खिशात टाकला,  कपाळावर जमा झालेले घामाचे टपोरे थेंब खिशातल्या रुमालाने पुसुन ते सिटला मागे रेलुन बसले. दादासाहेब... अनुसया कन्स्ट्रक्शन्स  कंपनीचे मालक. वय वर्ष ६३पण एखाद्या तरुणाला लाजवील असा त्यांचा उत्साह होतात्यांचं काम होतं.…  ३० वर्षापुर्वी त्यांनी गाव सोडलं आणि सरळ मुंबई गाठली. त्यांच्या महत्वाकांक्षा फक्त आणि फक्त मुंबई पुर्ण करु शकेल, अशी त्यांची पक्की खात्री होती. आणि त्यात ते यशस्वीही झाले. आता ते एक बडी असामी म्हणुन ओळखले जात होते. आपल्या मुळ गावाशी तसा त्यांचा फारसा संबंध राहीला नव्हता. गावात त्यांचं वडीलोपार्जित घर होतं पण अण्णाम्हणजेच दादासाहेबांचे वडील वारल्यानंतर चुलत्यांनी ते बळकावलं. आणि गावाशी जोडलेली त्यांची एकमेव नाळच तुटली. काही नातेवाईक होते पण ते मनाने दुर झाल्याने नसल्यातच जमा होते. जवळपास, दहा बारा वर्ष ते गावाकडे फिरकले नव्हते. आणि आज अचानक ते तडकाफडकी गावाला जायला निघालेही...  त्याचं कारण होतंसदाशिव शिर्के.... " तो अतिशय सिरीयस  आहेआणि केव्हा काय होईल हे सांगता येत नाहीतु लवकर निघ…  " मघाशी आलेल्या गणप्याच्या फोनमुळे ते अतिशय अस्वस्थ झाले होते. कामातलं त्यांचं लक्ष उडालं. सगळं काही सोडुन ते साताऱ्याला निघाले.   दादासाहेबसद्या आणि गणप्या हे तिघेही बालपणीचे जिवश्च कंठश्च मित्र... हे त्रिकुट सगळ्या गावात प्रसिद्ध होतं. तिघेही जाम मस्तीखोर... लहानपणापासुन एकत्र... त्यात दादासाहेबांना आई नसल्याने सद्याच्या आईनेच त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्या दोघांबरोबर गणप्याही असायचा. त्यामुळे त्याचीही काळजी ती माऊली घेत असे. गणप्या त्याच्या स्वतःच्या घरी कमी आणि सद्याच्या घरीच जास्त असायचा. पहील्या पावसाच्या वेळी जसे संध्याकाळी अचानक आकाशात जसे काळे ढग जमा होतात तशा चाळीस पंचेचाळीस वर्षापुर्वीच्या आठवणी दादासाहेबांच्या मनात जमा होऊ लागल्या. गाडी आता मुख्य रस्त्याला लागली. ते थंड नजरेने गाडीच्या काचेतुन बाहेर पाहु लागले. रस्त्याच्या बाजुची झाडे, घरे वेगाने मागे जाऊ लागली तसे त्यांचे विचारही त्याच वेगाने काळाच्या मागे जाऊ लागले.… 
                             " सद्यामला लई भिती वाटतीय ... मी नाय जाणार पाण्यात, बुडलो बिडलो तर ...? " लंगोट घातलेली स्वतःचीच लहानपणीची प्रतिमा दादासाहेबांच्या डोळ्यापुढे उभी राहीली. " आरं यडा का काय तु…मी असताना तु कसा बुडशील....? ते तिकडं बग लहान पोरगं कसं पवतंय.... " आपण तिकडे बघायच्या नादात असतानाच सद्याने आपल्याला पाण्यात ढकलुन दिले होते. दोन चार गटांगळ्या खाल्ल्यावर आपण पार बुडणार तेव्हा कुठं सद्याने पाण्यात उडी टाकली आणि आपल्याला बाहेर काढलंत्यावेळी रागाच्या भरात आपण  खच्चुन दिलेली शिवी ... आणि सद्याचं निर्लज्ज हास्य तस्संच्या तस्सं दादासाहेबांच्या कानात घुमलं....  पण त्याच्यामुळेच आपण पोहायला शिकलो. सुर मारायलाविहीरीच्या तळाशी टाकलेला रुपया बुडी मारुन वर काढायला, त्यानेच शिकवले होते..... झाडावर चढण्यात सद्या आणि गणप्या  पटाईत होते. आपल्याला मात्र ते लाख प्रयत्न करुनही शेवटपर्यंत जमलं नाही..... गणप्या झाडावरुन म्हव - ( मधाची पोळी ) काढायचा... रानात गेल्यावर कधीही रिकाम्या हातांनी आपण परत आलो नाही.  पण एकदा एका आगीम्हवाने गणप्याला असा फोडला की त्याचं तोंड पुरीसारखं फुगलं होतं.   सद्याच्या आईने कसलंतरी तेल लावलं तेव्हा कुठे कमी झालं होतंपण गणप्या तेच तोंड त्याच्या  घरी घेऊन गेला आणि पुन्हा तोंड सुजवुन आला, तेव्हा सद्या आणि आपण किती हसलो होतो त्याला ..... ते आठवुन आत्ताही दादासाहेबांच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर उमटलीच..... रात्री शाळेत अभ्यास करायला जातो असं सांगुन चोरुन पिक्चर बघायला तालुक्याला जायचो... एकदा शम्मी कपुरचा " राजकुमार " बघुन येत असताना मास्तरांनी पकडलं आणि नंतर  तिघांनाही रांगेत उभं केलं पहीला गणप्याला फोडला. दुसरा सद्या , तिसरे  आपण होतो ... मास्तरांनी हात पुढे करायला सांगितला ... जीव खाऊन मास्तरांनी पट्टी हातावर मारली... आणि आत्ताही दादासाहेबांनी दचकुन हात मागे घेतला...   एक एक विचार त्यांच्या मनात प्रवेश करु लागला , नव्हे तर इतक्या वर्षांपूर्वीची चित्रफीतच त्यांच्या डोळ्यांसमोर येऊ लागली .   तेवढ्यात दादासाहेबांचा मोबाईल वाजला. घाईघाईने त्यांनी तो उचलला,  " हॅलो.,  हा बोल गणप्या,...  हो हो .... निघालोय मी... वाटेतच आहे... सद्या कसा आहे....?  " गणप्याने दिलेल्या उत्तराने त्यांची काळजी आणखीनच वाढलीत्यांनी ड्रायवरला गाडी जलद चालवण्यास सांगितले. अस्वस्थ मनाने ते पुन्हा बाहेर पाहु लागले. ' सद्या भावा ... मी येतोय.... ' दादासाहेब मनातल्या मनात म्हणाले. आपण पोहोचेपर्यंत सद्या व्यवस्थीत असु दे अशी त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली. गाडी सुसाट वेगात चालली होती पण दादासाहेबांचं मन गाडीपुढे धावत होतं. कधी एकदा गावात जातोय असं त्यांना झालं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या , वेदनांनी पिळवटलेला सद्याचा चेहरा त्यांना दिसत होता... पण आता तरी निदान स्वस्थ बसण्यावाचुन काही पर्याय नाही हे त्यांच्या व्यवहारी मनाने त्यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा ते गाडीच्या काचेबाहेर पाहु लागले.... आता दिवस मावळतीकडे झुकला होता. अस्ताला जाणारा लालबुंद सुर्य पाहुन तर त्यांचं मन आणखीनच खिन्न झालं...
              " लेका  दादु,   तुला जर ती सुनी इतकी आवडती तर तु सांगुन का नाय टाकत...?  " परमवीर कॉलेजच्या बाहेर असलेल्या अंबर बारमधे अशाच एका संध्याकाळी सद्या आपल्याला विचारत होता.
 " विचारायला काय नाय रेपन ती नाय म्हनली तर...?  " आपण मनातली भिती बोलुन दाखवली होती.
" आरं नाय नाय ... पन एकदा विचारलंस तर कळंल  ना....?  ती नाय तर दुसरी...." सद्या असं बोलल्यावर आपण गोंधळलो होतो. सुनीवर आपलं फार प्रेम होतं. अन् तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाच आपण केली नव्हती...
 " गंमत केली रे.... खरं सांगु.?  तिची पन लाईन हाय तुज्यावर.....बिन्दास विचार... तिच्या घरच्यांचा काय प्रॉब्लेम असंल तर पळवुन घेऊन जाऊ च्यामायला....!!! "  सद्याने दिलेल्या धीरामुळेच आपण सुनीला विचारु शकलो.... आज सुनी असती तर तीही आली असती सद्याला बघायला... आयुष्यरुपी प्रवाहाने आजपर्यंत अनेक वळणे घेतली... सुरुवातीला उथळ असलेला हा प्रवाह आता अनुभव पैसारुपी  पाण्याने तुडुंब भरलेला आहेपण सुरुवातीच्या उथळपणात जी मजा होती ती आताच्या संथ प्रवाहात नाही... दादासाहेब असा विचार करत असताना पुन्हा त्यांचा मोबाईल वाजला.,  " बोल गणप्या,  .... मी पोचतोच अर्ध्या तासात... " आताच्या फोन नंतर तर दादासाहेबांचा धीर सुटत चालला... शेवटची हातघाईची लढाई व्हावी तसं काहीसं झालं. गाडी तिच्या सुसाट वेगात होतीसमोरच्याला हॉर्न देत, ओव्हरटेक करतइतर गाड्यांना कट मारत दादासाहेबांची कार चालली होती.... सांगता ड्रायवरही त्याचे सर्व कौशल्य पणाला लावुन सुसाट गाडी चालवत होताआता आणखी एक उजवे वळण घेतलं की गावाची वेस येणार होती. ती ओलांडली की जगन्नाथाचं देऊळ...! इतक्या वर्षांनंतर दादासाहेब गावात जात होते पण असं वाटत होतं की काल-परवाच गाव सोडुन आले आहेत... पुर्वीच्या लहानशा जगन्नाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता... गावात डांबरी रस्ते आले ... घरोघरी टिव्ही आले होते त्यावर त्याच रटाळ मालिका लागलेल्या दिसत होत्या ... गावात बाकी बराच बदल झालेला दादासाहेबांना दिसला ... त्यांची गाडी आता चावडीत शिरली ... ग्रामपंचायतीची दोन मजली इमारत नजरेत भरत होती...  " इथुन सरळ घेनंतर डावीकडे आणि नंतर उजवीकडे घे आणि समोर माडीवाल्या घरापाशी थांबव. " दादासाहेब ड्रायवरला सांगत होते... ते सांगतानाही त्यांचा स्वर कापरा झाला होता. आता सद्याचं घर अगदीच जवळ होतं ... काय चालु असेल तिथे ....?  कसल्या अवस्थेत असेल तो ...?  कल्पनाही करवत नव्हती .... त्याच विचारात दादासाहेब असताना सद्याच्या घरासमोर गाडी थांबली . गाडीच्या बाहेर आल्यावर आपल्या पायात त्राण उरले नसल्याचं दादासाहेबांना जाणवलं.  " सद्या .... " जोरात हाक मारुन ते दारात उभे राहीले ... समोरचं दृष्य पाहुन ते जागच्या जागीच थबकले....आणि समोर पहातच राहीले..... " हा हा हा हा .... " समोरुन जोरदार हसण्याचा आवाज आला.... पाहतात तर समोर सद्या आणि गणप्या बसलेले .... हातात व्हीस्कीचे ग्लास .... समोर चखणा म्हणुन पापडशेंगदाणेमटणाचा रस्सा ठेवलेला... दादासाहेबांचा डोळ्यावर विश्वास बसेना. " अरेकाय हे ....? " अविश्वासाने त्यांनी विचारले....
" काय नाय.... पार्टी चालु आहे.... ये बस... गणप्यासाहेबांसाटी पेग तयार कर... " सद्या जणु काही झालंच नाही अशा आविर्भावात बोलत होता. ... दादासाहेबांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य अजुनही तसंच होतं.
 " आरं ये की ... बस लेका .... दमुन आला आश्शील .... " गणप्या त्यांना बोलवत होता. आता मात्र दादासाहेबांच्या चेहऱ्यावरच्या आश्चर्याची जागा रागाने घेतली ...
" सद्या , हा काय पोरखेळ लावलाय ...? तू सिरियस आहेस , आणि असशील तसा निघून ये असा निरोप दिला ह्या गणप्याने …!  मी माझ्या महत्वाच्या मिटींग्स् सोडुन एवढ्या लांब तातडीने आलोय .... वाटेत माझी काय अवस्था झाली माझी मलाच ठाऊक....!  काय चाल्लय हे ?  " दादासाहेब भलतेच भडकले.
" दादुतु बिलकुल बी बदलला नाईस ... आज बी तसाच हाईस.…पन  माफ कर यार आम्हाला ... राग मानू नकोस  भावा … " सद्या पेगचा एक घोट घेत बोलला.
" सद्या , काय लेका हे... ! मी .... काय काय विचार माझ्या डोक्यात आले .... जाम घाबरलो होतो मी ....एक वेळ वाटलं की तुझी- माझी भेट होते की नाही. सगळ्या प्रवासात नुसते तुझेच विचार येत होते... तू कसा असशील …? काय झालं असेल …? ह्या विचारांनी माझं डोकं फिरलं …  पण जाऊ दे... तु बरा आहेस ना.... बास... आता काय काळजी नाही ….  " दादासाहेबांचा राग जसा आला तसा निघुन गेला... आणि तेही निवांतपणे  त्या  दोघांच्यात जाऊन बसले... गप्पा टप्पा सुरु झाल्या ... पेग पुन्हा भरले गेले... बालपणीचे किस्से पुन्हा निघाले... हास्याचा स्फोट झाला ... हसता हसता सद्याला जोराचा ठसका लागला... आणि त्याच्या हातातला ग्लास खाली पडलागणप्या त्याला सावरायला धावला...
" सद्या , काय होतंय तुला ...?  " दादासाहेब घाबरलेल्या सुरात म्हणाले... सद्याला सावरता सावरता गणप्याला रडु कोसळले.
" दादुतुला फोन केला व्हता ते सगळं खरं हाय... सद्यानेच सांगितलं तसं करायला... दोस्ताचा निरोप घेतल्याशिवाय जाणार नाहीअसं मला म्हणाला... त्याला कँसर झालाय... उद्या त्याला हॉस्पीटलात जायचंय... पन मला म्हनाला मी काय परत येत नाय म्हणुन दादुला बोलावुन घे... मी जायच्या वेळी आपण सगळे एकत्र असलो पाहिजे... " बोलता बोलता गणप्या रडु लागला... दादासाहेबांना काय बोलावं ते कळेना... क्षीण नजरेने त्यांच्याकडे पहात असलेल्या सद्याचा हात हातात घेऊन ते लहान मुलासारखे रडु लागले...



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7


बुधवार, १ मे, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १४ … ( अंतिम भाग )

श्रीनगर मधल्या हॉटेलच्या बाहेर सकाळी पाहीलं तर दोन हत्यारबंद सैनिक पहारा देत उभे होते. श्रीनगर मधे गोंधळ चालु होता.  कर्फ्यु लावण्यात आला असल्याने वातावरण तंग होते.   काश्मिरसारख्या स्वर्गात हे सैनिक बिचारे नरकयातना भोगत असलेले बघुन मला खरंच वाईट वाटलं... आम्ही लवकर आवराआवरी केली.  आज आमचा दुचाकीवरचा शेवटचा दिवस होता. जम्मु मधे पोचल्यानंतर आमच्या गाड्या रेल्वेच्या बोगीने स्वतंञपणे येणार होत्या. आमची परतीची रेल्वेची तिकीटे अजुन कन्फर्म झाली नव्हती... ते एक टेन्शन होतंच... रस्ता चांगला असल्याने गाड्या सणाणत निघाल्या... लडाखचा रस्ता एकलकोंडा होता , पण आता इथल्या रस्त्याला सर्वञ रस्त्याच्या दुतर्फा दुकाने,  रहदारी होती... सकाळी नाष्ट्यासाठी एका पंजाबी हॉटेल मधे थांबलो. पंजाबी हॉटेल म्हटलं की पराठे आलेच...खाऊन निघालो. अमरनाथ  याञेमुळे  रस्त्यावर सर्वञ  गाड्याच गाड्या. त्यातुन वाट काढत आम्ही निघालो... आता ऊन 'मी' म्हणत होतं. श्रीनगर हुन  काश्मिर खोऱ्यात जाण्यासाठी एक बोगदा लागतो,  जवाहर टनेल ... तो भलामोठा बोगदा पार केल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी लाईट गेल्यावर होते तशी परीस्थीती झाली. वातावरण एकदम बदललं, अगदी जाणवे इतपत ...! थंडगार वातावरण एकदम उष्ण वाटु लागलं...  
हायवे वर बरेच मजेमजेदार स्लोगन लिहीलेले होते... " पीप पीप , डोंट स्लीप... " , " अगर रफ्तार का इतनाही शौक है तो पी टी उषा बन जाओ..." तसेच " प्लीज , बी सॉफ्ट ऑन माय कर्वस्..." अशासारख्या द्वयार्थी पाट्याही लावलेल्या दिसत होत्या . आत्ताचा रस्ता म्हणजे संपुर्ण घाट आणि तोही भरपुर ट्रॅफिक असलेला ...समोरच्या गाडीला बराच वेळ ओव्हरटेकही करता येत नव्हतं... जीव मेटाकुटीला येणे म्हणजे काय ते त्यावेळी आम्हाला कळाले... जम्मु ला आज पोहोचणं अतिशय गरजेचं होतं. कारण आम्हाला परतीची पर्यायी व्यवस्था करावी लागणार होती... संध्याकाळच्या सुमारास आम्ही जम्मु पासुन ५० - ६० किमी असु तेव्हा गच्च आभाळ भरुन आलं. जसजसे पुढे जाऊ तसतसे ते आमच्या मागेच येऊ लागले. पाउस पुन्हा आपली गोची करणार असे वाटून आम्ही गाड्या सुसाट सोडल्या . पण शेवटी चपळ शिकारामागे धावुनही ती हातात येत नाही असे समजल्यामुळे पावसाने माघार घेतली… आता जम्मु काही लांब नव्हतं. त्यामुळे आपण सुखरुप पोहोचु अशी मनात खाञी वाटु लागली... पण खाञी देता येईल अशी कोणतीही गोष्ट ह्या सबंध प्रवासात घडलेली नव्हती तर ती आता तरी कशी घडेल… ?  पाहतो तो समोर गाड्यांच्या रांगा दिसल्या ... सुरुवातीला वाटलं काही  काम चालु असेल... पण हळुहळु जागा मिळेल तसे पुढे गेलो तर गाड्याच गाड्या उभ्या होत्या ... हे काही निराळच प्रकरण आहे हे आमच्या लक्षात आलं … जवळपास ८-९ किलोमीटर अंतरावर ट्रॅफिकमुळे गाड्या अडकल्या होत्या ... त्यातुन आमच्या गाड्या काढणं म्हणजे चक्रव्युह भेदण्यासारखं होतं ... कधी दोन गाड्यांच्या चिंचोळ्या जागेतुन तर कधी रस्ता सोडुन आडमार्गाने  आमचे अभिमन्यू जिथुन मिळेल तिथुन गाड्या घालत होते... आता शेवटची हातघाईची लढाई सुरु झाली... लक्ष - कोणत्याही परिस्थीतीत लवकरात लवकर जम्मु गाठणे... शर्यतीचा शेवटचा टप्पा असतो तसा... पप्या, संदीप आणि खोप्या यांच्या ड्रायविंगला मानलं आपण...! त्यांनी चपळाई करुन गाड्या काढल्या नसत्या तर आम्ही सकाळपर्यंत तिथेच अडकलो असतो. रात्री ९च्या सुमारास कसेबसे आम्ही जम्मु मधे पोहोचलो.. आता सर्वात कंटाळवाणं काम म्हणजे हॉटेल शोधणे... पण आमच्या नशिबाने एक चांगलं हॉटेल मिळालं - हॉटेल विवेक.  त्याचा मालकही चांगला होता. आमच्या परतीच्या तिकीटांचा प्रश्न त्याला सांगितल्यावर त्याने लगेच दोन- चार फोन फिरवले... परंतु त्याचा फारसा काही फायदा झाला नाही. सकाळी तत्काळ तिकीटांसाठी जम्मु स्टेशन वर जाण्याचा सल्लाही त्याने दिला. आम्ही सर्व जण एका मोठ्या प्रशस्त रुम मधे राहीलो...हॉटेल छान होतं आणि जेवणही … दुसऱ्या दिवशी पहाटे खोप्या आणि संदीप तत्काळची तिकीटे मिळवण्यासाठी तिकीट खिडकीपाशी नंबर लावायला गेले... थोड्या वेळाने मी आणि पप्या  गेलो तर तिथे भलीमोठी रांग लागलेली दिसली...रांग काही पाठ सोडत नव्हती...  आमचा नंबर बराच मागे होता... बऱ्याच वेळाने जेव्हा गेट उघडलं तेव्हा शाळा सुटल्यावर मुलं जशी पळतात तशी सगळी माणसं तिकीट खिडकी कडे पळत सुटली ... एकच झुंबड उडाली... त्या गोंधळात  खोप्याने चपळाई करुन  पुढचा नंबर पटकावला ... आता आम्ही तिकीट खिडकीच्या बरेच जवळ आलो होतो. मग रांगेतल्या माणसांची जागेवरुन भांडणं, आरडाओरडा,  गोंधळ सुरु झाला. खिडकी उघडली ... तत्काळची तिकीटे इतक्या तत्काळ संपतील ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती... भल्या पहाटे तिकीटे काढण्याचा प्रयत्न असफल ठरला... आमच्यापुढे आता फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहीलं ... घरी जायचं कसं?  कारण एवढ्या लांबचा प्रवास, भरपुर सामानासकट , बिना रिझर्वेशन कसं जाणार...? डोक्याला हात लावुन बसायची पाळी आली... कुणीतरी म्हणाले " प्लेन ने जाऊ... " आधी तो विचार म्हणजे अतिशयोक्ती वाटली पण नंतर  त्यातले फायदे लक्षात आले... आम्ही चारपाच तासात घरी जाणार होतो... शिवाय एक दिवस आधी... ऑफिसला जाण्याआधी एक दिवस आराम... पप्या, पियु आणि खोप्या यांनी विमानप्रवास आधी केला होता... पण माझा आणि संदीपचा हा पहिलाच विमान प्रवास … ! त्यामुळे आमच्याकडुन तर होकार होताच... प्लेनच्या तिकीटाचे जास्तीचे ५ -६ हजार माञ जाणार होते .. परंतु एवढ्या सगळ्या फायद्यासमोर हा  तोटा सोसण्याजोगा होता. शेवटी सर्वानुमते ठरवलं... खोप्या आणि संदिप त्या कामाला लागले... माझा तर पहीलाच विमान प्रवास , त्यामुळे मला आधीच आकाश ठेंगणं झालं होतं... आता आणखी महत्वाचं काम म्हणजे गाड्या पार्सल करणे... जम्मु स्टेशनवर एका एजंटला गाठला ... पण तिथे गाडीतल्या पेट्रोलवरुन खोप्या आणि तिथल्या एका पोलीस हवालदाराचं वाजलं... तो हवालदार गाडीतुन काढलेलं पेट्रोल परस्पर घेऊन आपल्या गाडीत टाकण्यासाठी नेत होता... आता काय बोलायचं त्या हवालदाराला …! खोप्या ते द्यायला तयार नव्हता. हवालदार अरेरावी करु लागला... त्याने एजंटला धमकावलं कि गाड्या रेल्वे च्या हद्दीत pack करायच्या नाहीत … खोप्याही भडकला होता... ह्या दोघांच्या भांडणामुळे गाड्या इथेच अडकुन पडतील की काय असं वाटु लागलं तेव्हा मी खोप्याला समजावलं आणि तिथुन रुमवर  घेऊन गेलो. इकडे पप्या आणि संदीप ने मोठ्या मुश्कीलीने गाड्या पाठवण्याचा बंदोबस्त केला... मुंबईला येणाऱ्या गाडीचा लगेजचा डबा हा पुढच्या संपुर्ण महीन्यासाठी बुक होता... मग पुण्याला जाणाऱ्या गाडीच्या लगेज बोगीतुन गाड्या पाठवल्या... असे एक ना अनेक अडचणींना तोंड देत आमची शेवटी जाण्याची तयारी झाली... आम्ही आता लवकरच उडणार होतो. 
दुसऱ्या दिवशी सर्व सामान सुमान घेऊन जेव्हा जम्मु एअरपोर्ट वर गेलो तेव्हा तर माझी घोर निराशा झाली . आपल्याकडचा एस टी स्टॅंड बरा... ! एअरपोर्ट भलतंच लहान होतं .  पण काही का असेना आपण आकाशात उडणार ह्या कल्पनेनेच मला स्वर्ग दोनच बोटे उरला होता. शेवटी एकदाचे आम्ही सर्वजण विमानात स्थानापन्न झालो... माझी विमानप्रवासाची पहीलीच वेळ असल्याने खोप्या आणि पियु ने उदार अंतःकरणाने मला खिडकीजवळची सीट दिली... लहान मुलाला आकाशपाळण्यात बसल्यावर कसे वाटेल तसे मला विमानात बसल्यावर वाटत होते. काही वेळाने विमानात सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पहात असतात त्या हवाईसुंदरी आल्या... आपल्या स्मितहास्याने आणि लाघवी बोलण्याने, त्या विमानातल्या प्रवाशांना बसल्या बसल्याच  वर घेऊन जात होत्या. त्यातल्या एकीने लहान मुलं बडबडगीतांच्या चालीवर  हावभाव करुन दाखवतात तसे हातवारे करुन सुचना द्यायला सुरुवात केली ... ते फारच गमतीदार वाटत होतं... मला तर चुकुन जोरात हसायला येईल की काय अशी भिती वाटु लागली.…  थोड्या वेळाने विमानाच्या इंजिनाचा आवाज यायला लागला... आणि भुकंप झाल्यासारखे हादरे बसायला लागले.  बाहेर पाहीलं तर विमान सुरु झालं होतं.. हळू हळू वेग वाढु लागला … ते विमान इतकं हादरत होतं की मला एसटीत बसल्यासारखं वाटू लागलं , आणि एका क्षणी झोकांड्या देत गपकन ते महाकाय धूड आकाशात झेपावलं . पोटात लहानसा गोळा आला … मी आता खऱ्या अर्थाने ' हवेत ' होतो… हवेत थडथडणारं विमान काही वेळाने उंचीवर गेल्यावर मात्र स्थिर होऊन उडू लागलं … एक मन म्हणत होतं , एवढ्या उंचीवरून हे विमान खाली पडलं तर …? त्याचवेळी दुसरं मन त्या उंचीची मजा लुटत होतं … हवाई सुंदऱ्या आमची सरबराई करत होत्या … कधी चहा - कॉफी आणून दे तर कधी काही खायला आणून दे … त्या सगळं हसत मुखाने करत होत्या … रात्री ८ -९ च्या सुमारास विमान मुंबई जवळ आलं … वरून जे दृश्य दिसलं ते केवळ अवर्णनीय …! लक्ष दिवे , त्यात मुंबई उजळून गेलेली … झगमगती मुंबई … डोळ्यांचं पारणं फिटणे म्हणजे काय ते त्यावेळी मला कळाले … वर आकाशात स्थिर असलेलं विमान आता वेगाने मुंबईकडे झेपावू लागलं … हलकासा धक्का देऊन विमान मुंबईच्या भूमीवर उतरले … जाताना हवाईसुंदऱ्या स्मितहास्य करून निरोप देत होत्या … त्या गोड निरोपाबरोबर आमचे लडाखायणही संपले होते … हे कळले , जेव्हा शरीर आणि मन दोन्ही जमिनीवर आले तेव्हा … !!!




मागे वळुन पाहताना ...
' केवळ पाच जण, सर्व नवखे,  तीन दुचाकी,  विशेष असा कोणताही बॅकअप नसताना,  कोणताही अनुभव नसताना ... जवळपास २००० किलोमीटरच्या वर अंतर , जगातल्या अत्यंत खडतर प्रदेशात,  जिथे काही ठिकाणी माणसं क्वचितच पहायला मिळतात अशा निर्मनुष्य प्रदेशात, अनेक संकटांना तोंड देत आपली सफर पुर्ण करतात आणि तितकीच धमालही … ! ' , स्वप्नवत आहे सगळं ….
मी जेव्हा जेव्हा लडाख बद्दल विचार करतो तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटतं .... तब्बल वर्षभर आधी हा प्लॅन बनत होता … कसं जायचं..? कुठे रहायचं....? याबाबत चर्चासत्रे होत होती, वाद-विवाद होत होते … पण  मी त्यात तितकासा भाग घेतला नाही ,  कारण  इतके दिवस सुट्टी मिळेल याची माझी मलाच शाश्वती नव्हती... जे अगदी ठामपणे जायचं म्हणत होते त्यातले  काही जण ऐन वेळी रद्द झाले... आणि मी काहीही विशेष तयारी नसताना लडाखला जायला निघालोही... कदाचीत ही लडाख टुर माझ्या ऩशीबात होती…! 
लडाख … केवळ शब्दावरूनच काहीतरी भयानक ठिकाण असेल याचा अंदाज येतो … परंतु जितका तो प्रदेश भयानक आहे त्यापेक्षा त्याचे सौंदर्य अधिक … ! भयानक सौंदर्य …! इथला निसर्ग जरी काही वेळा क्रूरपणे वागला असला तरी त्याने आमची अडवणूक कधीही केली नाही … त्याने बिनधास्त पणे आम्हाला त्याच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे फिरू दिले … आमच्यासमोर संकटेही अशी ठेवली कि ज्यांचा आम्ही सामना करू शकु… न पेलणारी संकटे त्याने आमच्यापासून दूर ठेवली किंवा आम्हाला त्यांच्यापासून लांब राहण्यात अप्रत्यक्षरित्या मदत केली , आता हे आमचं नशीब असेल किंवा निसर्गाने आमच्यावर दाखवलेली मेहेरबानी … काहीही असो … आम्ही सुखरूप पणे घरी परतलो … 
जम्मूवरून विमान आकाशात उडाले तेव्हा मागच्या १०-१५ दिवसांचा काळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरुन येऊन गेला.  लडाखायणासाठीची आमची तयारी, राजधानीचा प्रवास, दिल्लीतली अंग भाजुन काढणारी उष्णता..., मनालीतलं हिमाच्छादीत शिखरांचं फर्स्ट साईट लव… , रोहतांग मधला हिमरोमॅन्स… , आपल्याच धुंदीत असणारा मनमौजी रस्ता… ,  मधुनच त्याला  प्रेयसीप्रमाणे भेटणारी, नुकतीच वयात आल्यासारखी वाहणारी अल्लड नदी, पर्वतरुपी बापाचा डोळा चुकवुन आल्यासारखी वाटायची... , वाटेत व्हीलनप्रमाणे भेटलेले टेरर टांगलांग ला, खतरनाक खारदुंग ला, फाडु फुटु ला, झंजावाती झोजी ला  ह्यांची भिती कायम राहील ... पण चांग - ला चा चांगुलपणाही आठवणीत राहील... , बियास , झेलम , सतलज ह्यांच्या सोबतीने केलेला प्रवास स्मरणातून जाणार नाही … , लेह आणि त्याला स्पर्शुन जाणारी सिंधु नदी मनाच्या एका कोपऱ्यात सुरक्षीत आहेत... , शांतीस्तुपाने मनातला कलह शांत झाला... , पॅंगॉंग लेक मधल्या नितळाईची नुसती एक झलक पुढच्या संपुर्ण आयुष्यासाठी पुरेशी आहे... , टायगर हिल,  टोलोलिंग ची टेकडी, विजयस्मारक तर ह्रृदयावर असं कोरलंय की त्याचे विस्मरण केवळ मृत्यु नंतरच होईल... , चित्रपटाच्या climax प्रमाणे अनपेक्षित घडलेल्या विमानप्रवासाने शेवट गोड झाला … , आणखी काय सांगु ... ? हे सर्व लिहिताना संपूर्ण प्रवास पुन्हा डोळ्यांसमोरून तरळून जातोय … दुचाकी लडाखायण करून आम्ही परत सुखरूप घरी आलो खरे , पण आमची मने मात्र अजूनही तिथेच आहेत ………



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १३…

 
झोजी ला .... लडाख प्रदेश आणि काश्मिर प्रदेश  यांना जोडणारा घाट... त्याबद्दल असं ऐकलं होतं की तो पास  अतिशय अरुंद ,  खतरनाक आहे आणि दिवसाचे काही तास कामकाजामुळे बंद असतो...  विजय स्मारकावरुन निघुन आज आम्हाला राञीपर्यंत श्रीनगर गाठायचं होतं. पण मधे वाटेत झोजी -ला शी सामना करायचा होता... झोजी ला पास कडे जात होतो समोर पाहतो तो सबंध आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आलेलं दिसलं... जोरदार पाऊस पुढे पडताना दिसत होता...काश्मिर खोऱ्यातला सगळा पाऊस एकवटुन इथंच पडतोय की काय असं वाटण्याजोगा धुंवाधार पाऊस समोर पडताना दिसत होता.  मला पुन्हा त्या फुटुला  पासमधल्या हाडं गोठवणाऱ्या पावसाळी थंडीची आठवण झाली आणि अंगावर  काटा उभा राहीला.... समोरच्या पर्वतावर  बरसणारा तो पाऊस बघुन आम्ही थोडं थांबलो. निसर्गाच्या सामर्थ्यापुढे आमचं काय चालणार होतं...?  रेनकोट अंगावर चढवले. हळुहळु पुढे निघालो. पण पुन्हा आमचा पोपट झाला... जसा घाट चढायला लागलो तसा पाऊस गायब झाला आणि लख्ख ऊन पडलं... झोजीला मधे एक विशेष होतं की तिथे डोंगरांच्या कुशीत सर्वञ लांबच लांब हिरवीगार कुरणे दिसत होती....गालिचा अंथरल्यासारखी...अगदी बालकवींच्या कवितेसारखी.... 




बरेच मेंढपाळ आपल्या काश्मिरी शेळ्या मेंढ्यासोबत आनंदाने बागडत होते... क्षणातले रौद्र वातावरण  दुसऱ्या क्षणी आल्हाददायक बनले होते... काय म्हणावं आता इथल्या निसर्गाला...!  कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत आम्ही निघालो. काही ठिकाणी बर्फाच्या ताशिव भिंती रस्त्याच्या दुतर्फा प्रेक्षकांसारख्या उभ्या होत्या ... आम्ही थोडं अंतर पुढे जातो न जातो तोच....काय झालं असेल ?  ...सांगायलाच नको...  पुन्हा गाड्यांची रांग...काम चालु  रस्ता बंद...!  


                                    

आम्ही जवळपास दुपारी १ च्या सुमारास तिथे पोहोचलो असु. आता ३ वाजता हा मार्ग मोकळा करण्यात येईल असे तिथले पहाऱ्यावर असलेले सैनिक म्हणाले... तब्बल दोन तास वाट पहावी लागणार होती... आमच्या बरोबर तसे बरेच लोक अडकले होते. दोन तास ह्या वैराण घाटात बसुन काय करणार...?  आजुबाजुला फिरायला जागाही नव्हती... मुळातच झोजी ला  मधुन एकच गाडी जाऊ शकेल इतका अरुंद रस्ता होता, एका बाजुला उंच कडा आणि दुसऱ्या बाजुला खोल दरी... मागे गाड्यांच्या रांगा... काय फिरणार...? आम्ही थोडा वेळ तसेच बसलो. काही लोक त्यांच्या गाड्यांबाहेर  आले आणि दोन तीन तासांची निश्चिंती असल्यामुळे पथारी टाकुन मस्तपैकी आडवे झाले... सुखी प्राणी... काही जणांनी तीन दगडांची चुल मांडुन त्यावर चहा कराय़ला सुरुवात केली... कोणतीही परिस्थीती येवो माणुस आपला गुणधर्म काही सोडत नाही. आपण काय टाईमपास करावा ह्या विवंचनेत असताना पप्याने त्याच्या बॅगेतुन पत्ते काढले.... आणि आमची सुटका केली... तीनपत्ती खेळण्याचा ठराव पास झाला...आणि पैसे म्हणुन प्रत्येकाने २०-२० खडे वापरायचे ठरले... काय गमतीदार परीस्थीती पहा... आम्ही घरापासुन सुमारे 3000 किमी लांब झोजीला मधे बसुन पत्ते खेळणार आहोत हे कुणाच्या स्वप्नातही आलं नसतं... पण ते घडत होतं. पियु ला तीनपत्तीचे रुल्स माहीत नव्हते पण पोरीचं ऩशीब जोरावर होतं... जवळपास सगळे गेम तिने आणि खोप्याने जिंकले...माझ्याजवळचे खडे संपायला आले की मी हळुच आजुबाजुचे खडे गोळा करुन ते कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीने वापरत होतो... तीनपत्तीच्या खेळात कसली इमानदारी दाखवायची...?  ते पप्याच्या लक्षात येणार तेवढ्यात आम्ही बसलो होतो त्या बाजुच्या कड्यावरुन काही खडे खाली पडले... आधी वाटलं की कोणीतरी मस्करी करतंय पण थोड्या वेळाने जास्तच खडे पडु लागले... वरचा कडा अंगावर ढासळणार या भितीने आम्ही जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला आणि पळत सुटलो... आमची धावाधाव बघुन आजुबाजुचे लोकही घाबरले आणि पळु लागले...जे झोपले होते ते तडफडुन जागे झाले...गाडीत होते ते गाडीतुन बाहेर पडुन सैरावैरा पळु लागले.  हा प्रांत म्हणजे वेड्याचा झटका आलेल्या माणसासारखा आहे... कधी काय होईल ते सांगता येत नाही... ह्या पळापळीत आमचे काही पत्ते  उडुन समोरच्या दरीत पडले...चोरटा जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची धाड पडल्यावर जशी होईल तशी धावपळ झाली... पण आमची भिती  निरर्थक होती... काहीच झालं नाही... पण त्या कड्याखाली बसायचं धाडस नंतर कुणाला होईना... बराच वेळ रस्ता बंदच होता... भुकही लागली होती ...हा रस्ता कधी मोकळा होईल असं झालं... शेवटी आमची प्रतिक्षा संपली... आम्ही गाड्या काढल्या खऱ्या पण पुढचा रस्ता बघुन तो बंद होता तेच चांगलं होतं असं वाटायला लागलं...सगळा रस्ता मातीचा... आणि नुसता मातीचा नाही तर मोठमोठे खड्डे असलेला ... ओबडधोबड... बाजुला आमच्याकडे अधाशीपणे पाहाणारी  खोल दरी तिच्याकडे आकर्षित करीत आहे असं वाटत होतं.. फार जपुन गाडी चालवावी लागत होती... आम्ही घाटात समोर लांबवर पाहीलं... समोरुन येणाऱ्या गाड्यांची भलीमोठी रांग दिसली... जसे आम्ही ह्या बाजुला थांबलो होतो तसे त्या गाड्या पलीकडे थांबल्या होत्या ... झोजीला मधे काही ठिकाणी समांतर रस्ते होते ... त्यापैकी एका ठिकाणी रस्ता चुकलो,  वरुन काम चालु असल्याने काही ठिकाणी दगडांचा वर्षाव,  चिखलाचा राडा, गाडी घसरणे असल्या प्रकारांना तोंड देत आम्ही कसेबसे झोजी ला उतरलो... खाली येऊन पहातो तो मुंग्यांचं वारुळ फुटावं तशी सर्वञ माणसं आणि गाड्या... मुंबईमधे लोकल्स लेट झाल्यावर होते तशी तोबा गर्दी.… ! हे सर्वजण अमरनाथ याञेसाठी आलेले होते...त्यांच्यातुन वाट काढत आमचे रायडर्स सुसाट निघाले... खाली आम्हाला सोनमर्ग हे ठिकाण लागलं. तिथे आलो त्यावेळी पोटात काकयुद्ध सुरु झालं होतं... मग एका हॉटेलात मस्तपैकी मॅगी हाणली... आणि जरा आराम केला...मी सहज मागे पाहीलं., मागचा झोजीला चा डोंगर मावळतीच्या प्रकाशात सोन्यासारखा  उजळुन निघाला होता... आपले सोनमर्ग हे नाव सार्थ करत होता... 



खाणंपिणं झालं....गाड्यांवर टांगा टाकल्या ...आणि श्रीनगर च्या दिशेने निघालो... ते अंतर जवळपास ७० -८० किमी होतं ...पुढचा रस्ता तसा चांगला दिसत होता... आणखी दोन तासाचा प्रवास ... आम्ही सुसाट गाड्या सोडल्या. रस्त्याने जाताना मधेच एक चारचाकी गाडी आमच्या बाजुने पुढे जात असताना  " नमस्कार  ओ कल्याणकर ... " अशी हाक ऐकु आली. गाडीचा नंबर MH 05 असल्याने आम्ही कल्याण च्या जवळपासचे असु असा अंदाज  करुन गाडीतला तो  माणुस आम्हाला all the best...देत होता... आम्हीही त्याला प्रतिसाद दिला.  खरं तर आमची आणि त्याची ओळख असण्याची कोणतीच शक्यता नव्हती. तरीही त्याने आम्हाला हाक मारली... हाच माणुस जर महाराष्ट्रात कुठे भेटला असता तर त्याने आमच्याकडे बघितलंही नसतं...अनोळखी प्रदेशात आपल्याकडचा अनोळखी माणुसही जवळचा वाटतो... आता श्रीनगरला कसे पोहोचलो  ह्यात काही  सांगण्यासारखं नाही.... फक्त  अमरनाथ याञेमुळे रस्त्यावर मरणाचं ट्रॅफिक होतं.... श्रीनगर मधे आलो त्यावेळी तिथं वातावरण ठिक नव्हतं ...कर्फ्यु लावला होता.... त्यामुळे राञी शहरात न जाता बाहेर हायवेवरच्याच एखाद्या हॉटेलात रहावे म्हणजे  कर्फ्यु मधे न अडकता सकाळी लवकर निघता येईल असा विचार करुन आम्ही शहराबाहेरच राहीलो... रात्री झोपायच्या तंद्रीत असतानाच खोप्या आणि पियू हातात लहानसा केक घेऊन आमच्या रूम मध्ये आले… रात्रीचे १२ वाजले होते … २७ तारीख … माझा वाढदिवस होता जो ह्या धावपळीत माझ्याही लक्षात नव्हता … पण बाकीच्यांनी आठवणीने सगळी तयारी केली होती … केक-बिक खाल्यानंतर खोप्या , संदीप , पप्या आणि पियू यांनी जी भेटवस्तू दिली , ती बघून तर मला काय बोलावं तेच कळत नव्हतं … मी माझ्या अल्पमतीने लिहिलेल्या blog च्या प्रिंट काढून ते पुस्तक रुपात माझ्या हाती दिलं … आईला आपलं नवजात बाळ पहिल्यांदा पाहिल्यावर जसं वाटत असेल तसंच काहीसं त्यावेळी मला वाटलं … काय बोलणार ? धन्यवाद मित्रांनो …!!!




शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १२ …

                                         सकाळी  डी - झोजीला हॉटेल चा निरोप घेतला . सर्व समान घेऊन बाईक्स पाशी आलो…  बाईक्स वर समान बांधू  लागलो तसे  आमच्या आजूबाजूला हॉटेलच्या आसपासचे लोक जमा झाले … आम्ही त्या सगळ्यांचा  चांगलाच  मनोरंजनाचा विषय झालो होतो … मला डोंबारयाच्या  खेळाची आठवण झाली … लोक आमच्याकडे त्याच कुतूहलाने पाहत होते… हे समान लवकर बांधून होईल आणि इथून लगेच निघता येईल तर बरं  , असं  मला वाटू लागलं … शेवटी आमचं विंचवाचं  बिऱ्हाड घेऊन आम्ही निघालो…. सकाळचं  कोवळं  उन पडलं  होतं … वर निळंशार  आकाश …जमिनीवरचा रखरखाटपणा  जाउन  आता हिरवळ दिसू लागली … मोठमोठी झाडे अदबीने रांगेत उभी असलेली दिसत होती . अधून मधून काही  ' काश्मिरी कळ्या '   उमललेल्या दिसत होत्या …



                 कारगिलला येण्याआधी आणि तिथून निघताना वाटेत काही लहान मोठी गावं  लागली … त्यातल्या लहान शाळकरी मुलांची निराळीच सवय दिसली… आमच्या गाड्या  ज्या  ज्या गावातून जात होत्या त्या त्या गावातली लहान मुले आम्हाला  टाळ्या मारण्यासाठी  रस्त्यात आडवा हात पसरून उभी होती … सुरुवातीला आम्हाला वाटलं  कि लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत आहेत , परंतु नंतर  लक्षात आल्यानंतर आम्हीही उस्फुर्तपणे  त्यांना प्रतिसाद दिला … गोऱ्या  , लाल गालाची , गोबरी , लहान लहान मुले आम्हाला टाळ्या देण्यासाठी धडपडत होती …हे करताना  त्यांना भारी मजा वाटत होती,  असं  त्यांच्या हसऱ्या  चेहऱ्यांवरून कळत होतं … मी तर आडवा हात पसरूनच बसलो होतो … लहान मुले रांगेत उभे राहून  टाळ्या देऊ लागले … काही खट्याळ  पोरं जोरात फटका मारायची … एकाने तर कहर केला , हातात लहानसा दगड घेऊनच टाळी  देण्यासाठी तो उभा होता … त्याला लांबूनच नमस्कार केला अन सटकलो … उजवीकडे दुधासारख्या पांढर्याशुभ्र , खळाळत  वाहणाऱ्या नदीच्या सोबतीने निघालो… एके ठिकाणी रस्ताच्या कडेला नदीच्या बाजूला दगडाची मोठी आणि उंच भिंत उभारलेली आढळली …आणि तिथे एक बोर्ड लिहिलेला होता जो वाचल्यानंतर मानेवर बर्फाचा थंडगार खडा ठेवल्यासारखं ... अहं .... हा जुना वाक्प्रचार झाला....नविन वाक्प्रचार,  मानेवर डिओड्रंट स्प्रे मारल्यासारखं  वाटलं …!  बोर्ड होता - ' You are under enemy surveillance ...' '  दुश्मन आपको देख रहा है । '  संदीप म्हणाला , " ह्या भिंतीच्या आणि नदीच्या  पलीकडे डोंगरावर पाकिस्तानची चौकी आहे …त्यांना आपला  रस्ता दिसू नये म्हणून ह्या भिंती बांधल्या आहेत…"   सहज दोरी म्हणून दुर्लक्ष करावे आणि तोच जहरी नाग निघावा तसं  बाजूने खळाळत वाहणारी ती  नदी  ' लाईन ऑफ कंट्रोल '  आहे हे समजल्यावर  तिच्या  सौंदर्याचे  भीषणतेत  रुपांतर झाले …एकुणच कारगिल मधे येण्याअगोदर आणि त्यापुढे जात असताना एक प्रकारचा तणाव जाणवत होता. लेह लडाखचं स्वच्छ, मुक्त आणि आनंदी वातावरण या प्रदेशात कुठेतरी हरवुन गेलंय असं सारखं वाटत होतं... कारगिल चा इतिहास असेल किंवा इथे प्रत्यक्षात दिसत असलेल्या सैनिकांच्या चौक्या असतील , वातावरण संघर्षपुर्ण,  धामधुमीचं वाटत होतं... आता रस्त्याने जाताना हिरवी झाडे सोबतीला होती...  पुढे द्रास कडे कुच केलं. द्रास हे अतिशय थंड हवेचं ठिकाण.... तिथेच कारगिल युद्धाचं विजय स्मारक आहे... जणू शिस्तीने उभ्या राहिलेल्या हिरव्यागार झाडांमधून लांबवर आम्हाला विजय स्मारक दिसलं …



 
' ए वतन … ए वतन … हमको तेरी कसम …. ' , ' मेरा रंग दे बसंती चोला … ' अशी देश भक्तीपर गीते लावली होती …त्यामुळे आधीच भारावलेल्या वातावरणाला पार्श्वसंगीत लाभल्याने ते अधिक प्रभावी झाले होते … सैनिक सज्ज झाले होते . थोड्या वेळातच तिथे परेड सुरु होणार होती. आर्मीचा कोणी मोठा ऑफिसर तिथे भेट देणार होता … एकूणच वातावरण रोमांच आणणारं होतं … आम्ही तिथे पोहोचलो … अमर जवान च्या ह्या स्मारकावरील ओळी वाचल्या , आणि सर्रकन काटाच आला अंगावर …. !!!




आम्ही त्या स्मारकासमोर उभे होतो. एकूण १०९१ शहिदांची नावे त्यांच्या रेजिमेंटनुसार त्यावर लिहिली होती . हेच ते वीर ज्यांनी मातृभूमीसाठी कारगिलच्या होमकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली … त्यांचा सन्मान म्हणून त्या सगळ्यांची नावे स्मारकावर कोरली होती … विजय स्मारकाला  अभिवादन करुन आम्ही बाजुला असलेल्या कारगिल युद्धासंदर्भातील वस्तुंचे प्रदर्शन बघायला गेलो. सुरुवातीलाच हरिवंशराय बच्चन यांची ' अग्निपथ ' ही कविता लिहिलेली दिसली... वीररसाला साजेशी अशी ती कविता आहे ती...! प्रदर्शनात बॅटल ऑफ टोलोलींग, बॅटल ऑफ टायगर हिल ह्यांचे मॉडेल्स बनवलेले, युद्ध साहित्य , बॉम्बगोळ्याचे शेल्स ठेवलेले , कारगिल युद्धातील वीरांचे फोटो होते... ते पाहुन मी भारतीय आहे ह्याचा अभिमान वाटला.  इथे येणारा प्रत्येक जण मातृभुमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांपुढे नतमस्तक होतो... भारलेल्या डोळ्यांनी ते  प्रदर्शन पाहुन बाहेर आलो. त्यावेळी आर्मीचा तो बडा ऑफिसर तिथे आला … आमच्या पेहेरावाकडे बघून आम्ही बायकर्स आहोत हे त्यांनी बरोब्बर ओळखले . त्यांनी आमची आस्थेने विचारपूस केली … आमच्यात एक मुलगीही आहे हे समजल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पियुची प्रशंसाही केली … लहानपणी घरात आलेल्या पाहुण्यांनी  चॉकलेट
देऊन कौतुक केल्यानंतर जसा होतो तसा आनंद
आम्हा सगळ्यांना झाला … तिथे दोन तीन सैनिकांशी बोललो.... " आप लोग कहॉं से है? " त्यातल्या एका सैनिकाने मला विचारलं.  "मुंबई " म्हटल्यावर त्याने स्मित केलं आणि म्हणाला " मुंबई और दुबई मे क्या फर्क है?  " मला कळेना तो असं का विचारत होता ते... " सरजी , मुंबई तो अपने देश मे है..." माझ्या उत्तरावर तो समजुतीने हसला. तो तसा का हसला हे मात्र कळले नाही … तिथल्या सैनिकांनी  कारगिल युद्धाबद्दल माहीती दिली ... " वो सामने पहाड दिख रहां है, वहॉं तक दुष्मन अंदर घुस आया था... " समोरची टेकडी आम्ही बघितली. ती फारतर २०० मीटर लांब असेल... त्यावर टोलोलींग असं लिहीलं होतं. आईशप्पथ....!  म्हणजे ' बॅटल ऑफ टोलोलींग 'ही आम्ही उभे होतो त्याच ठिकाणी झाली होती तर...!  प्रत्यक्ष युद्धभुमीत उभे होतो आम्ही...! " टायगर हिल यहां से कितना दुर है...? " आमच्यातल्या कोणीतरी विचारलं. " वो देखिये सामने टायगर हिल..." आम्ही बघीतलं ... ते शिखर इतकं दिमाखदार दिसत होतं की  त्या शिखराला दुसरं कोणतच नाव शोभलं नसतं... त्याला स्वतःचा वेगळाच असा सार्थ अभिमान होता.…




टायगर हिल काबिज केल्यानंतर आपल्या विजयी जवानांचा हाती तिरंगा घेतलेला फोटो असलेले टी शर्ट तिथे विक्रीस ठेवलेले होते,  ते आम्ही सर्वांनी घेतले. ते नुसते टी शर्ट नव्हते तर एकप्रकारचा बहुमान वाटत होता… , 'ताकद वतन की हम से है....' हे गाणं लागलं होतं .. खरंच ते किती सार्थ आहे हे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही... भारावलेल्या मनाने आम्ही तिथुन निघालो. आज आम्हाला श्रीनगर गाठायचं होतं. बरंच अंतर कापायचं होतं … निघता निघता , " कर चले … हम फिदा … जानोतन सथियो …. " हे गाणं लागलं …. पावलं आपोआप जड झाली ….



शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

दुचाकी लडाखायण …भाग - ११

                                  सप्प्... धनुष्यातुन  बाण सुटला आणि 50  फुटांवर ठेवलेल्या लहानश्या बॉक्स मधे घुसला.  त्याबरोबर आम्ही एकच जल्लोश केला. आमच्या हॉटेलचे मालक गलवान अंकल  धनुर्विद्येत भलतेच पारंगत होते... त्यांनी आम्हालाही त्यांचा धनुष्यबाण दिला ... तो चालवणं किती अवघड आहे ह्याचा प्रत्यय तो हातात घेतल्यावर आला . धनुष्याची प्रत्यंचा कितीही जोर लावला तरी खेचली जात नव्हती.  कधी बाण तिरका जात असे तर कधी समोरच पडत असे. पुढे ठेवलेल्या टार्गेटच्या जवळपासही कुणाचा बाण जाईना. गलवान अंकलनी पुन्हा आमच्याकडुन तो धनुष्य घेतला आणि बरोब्बर नेम साधला. Bulls eye....!!!  गल्वान अंकलनी त्यांच्या गेस्टहाऊसच्या आवारात छोटीशी बाग केली होती व उरलेल्या जागेत शेती केली होती... गेस्टहाऊस मात्र आटोपशीर पण छान होतं... आम्ही लेह मधल्या आमच्या वास्तव्यात त्या गेस्टहाऊस वर अगदी मजेत राहीलो. परंतु आता तिथून निघण्याची वेळ आली होती …
                                 आज सकाळीच आम्ही लेह सोडुन आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार होतो. पण आम्ही ते गेस्टहाऊस जणु सोडुन जाऊ नये अशी परिस्थीती निर्माण झाली. आज सकाळपासुनच लेह मधे जोरदार पाऊस सुरु झाला. आणि तो थांबायचं नावच घेईना.... सकाळी 8 वाजता आम्ही निघणार होतो. पण आता 10 वाजले तरी आम्ही काही बाहेर पडु शकलो नव्हतो. गल्वान अंकल म्हणत होते,  "आज मत जाओ, ये बारीश नही रुकेगा… " पण आम्हाला पुढे जम्मु मधे लवकरात लवकर पोहोचणं अतिशय गरजेचं होतं,  कारण आमच्या परतीच्या प्रवासाची ट्रेनची तिकीटे अजुनही confirm झालेली नव्हती. त्यामुळे त्यासाठीची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला एक दिवस आधी जम्मूत जाणे क्रमप्राप्त होते. पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही आपापल्या आवडत्या देवाचं नाव घेऊन गाड्यांवर टांगा टाकल्या.…  भुरुभुरु पाऊस पडतच होता. बाहेर तर पडलो , पण बाहेर पडुन आम्ही  चुक तर केली नाही ना असं  वाटु लागलं.…  पण जसजसे आम्ही  लेह शहर सोडुन पुढे जाऊ  लागलो तसतसे पावसाचे  प्रमाण कमी होऊ लागले. हा खरंच शुभशकुन होता.…  थोडं पुढे गेलो आणि ग्रहण सुटावं तसा सुर्य ढगाआडुन समोर आला… . सहस्ञ किरणांचे उबदार  बाण अंगावर घेत आम्ही  निघालो.…  लेह शहर जवळपास सर्वच बाजुंनी  डोंगरांनी  आणि पर्वतांनी वेढलेले  आहे.  चहा प्यायच्या कप बशितली  बशीच जणू …! लेह शहराबाहेर पडल्यावर मॅग्नेटीक हिल हा एक भुगर्भशास्ञीय  चमत्कार आम्हाला बघायला मिळाला.…  तिथे कसलेही बाह्य  बल न लावता चढणावर २०-३० फुट गाडी आपोआप वर चढते. अगदी बंद गाडी सुद्धा …!  खोप्याने ही गोष्ट पुर्वी आम्हाला सांगितली होती. पण आम्ही त्याला त्या वेळी काही सिरियसली घेतलं नव्हतं…   पण आता माञ निसर्गाचा  हा अद्भुत जादुचा प्रकार पाहुन  आम्ही अगदी थक्क झालो.  अशी  किती रहस्ये हिमालयाच्या  उदरात दडलेली आहेत हे तो कैलासाधिपतीच जाणे...!



                                   रस्त्याने जाताना उन पावसाची पकडापकडी चालुच  होती. लांबवर कुठेतरी काळ्या ढगांनी गच्च भरलेलं आभाळ दिसु लागलं. पावसाची रिपरिप चालु झाली. हा काही आपली पाठ सोडणार नाही हे ओळखुन आमच्या रायडर्सनी  गाडी तशीच पुढे दामटायला सुरुवात  केली.…  पुढे ' फुटु-ला ' नावाचा पास  लागला. सगळ्या रस्त्यावर  रिपरिप पडणाऱया पावसामुळे  चिखलाचा राडा झाला होता आणि  वातावरणात एक प्रकारचा विचिञ  गारठा आला होता. ' फुटु-ला ' पास  जसजसा वर चढत होतो तसा गारठा आणखीनच वाढु लागला. मी तरी मागे बसलो होतो. पण संदिप, खोप्या आणि पप्या  हे गाडी चालवत होते , समोरुन येणारा थंडगार वारा थेट त्यांच्या अंगावर येत होता. हातात हँडग्लोज होते तरी बोटे थंडीने आखडली  होती. मधे थोडा वेळ ब्रेक  घेतला . अंगात थंडी इतकी भरली  की नीट उभंही राहता येत  नव्हतं. सु सु च्या ब्रेक  नंतर संदिप म्हणाला,  "आता  जरा बरं वाटतंय " कसं  काय ? म्हणुन विचारलं तर म्हणाला, " मॅन व्हर्सेस वाईल्ड वाल्या बेअर ग्रिलस  ची टेकनिक वापरली. थंडीने आखडलेल्या  बोटांवर सुसु केली. फरक  पडला जरा.…   " मलाही तसं करावसं वाटलं पण आमची टाकी नुकतीच रिकामी करुन आल्याने माझा भलताच हिरमोड झाला…  तसंच कुडकुडत  पुन्हा आपापल्या बाईक्सवर बसलो अन् निघालो थोडं पुढे जातो न जातो तोच गाड्यांची  रांग लागलेली दिसली. इतका वेळ जरा चुकल्या चुकल्या  सारखं वाटत होतं पण समोरचा बंद रस्ता बघुन वाटलं  की आपण योग्य रस्त्यावर  आहोत.…  ह्या सबंध लडाखायणात  असा एकही पास (घाट) नव्हता की जिथे आम्हाला रस्ता  चांगल्या स्थितित मिळाला. रस्ता  दुरुस्तीच्या कारणामुळे  प्रत्येक ठिकाणी आम्हाला थांबावं लागत होतं आणि 'फुटु-ला'  पास ह्या गोष्टीला अपवाद कसा असेल…?  अर्ध्या तासाने रस्ता मोकळा झाला. आता आम्हाला कारगिल च्या दिशेने जायचे होते. मातीचा, खडीचा रस्ता, बाजुला नुकतीच वयात आल्यासारखी, अल्लड, खळाळत वाहणारी सुरु नदी आमची साथ देत होती. जवळपास, सर्वच रस्ते नदीच्या मार्गाने जात होते. सुमारे ६ वाजता आम्ही कारगिल ला पोहोचलो. युद्धभुमी ...! तिथे पोहोचल्यावर , तिथल्या सैनिकांच्या चौक्या पाहिल्यावर एक वेगळीच अनुभूती आली …वीररसाने भारलेलं  वातावरण …! लाईन  ऑफ कंट्रोलला अगदी खेटूनच होतो…सरहद्द …!    तिथे हॉटेल  डी- झोजीला  म्हणुन एक भलं मोठं हॉटेल होतं. एखाद्या जुन्या काळातल्या गढीवजा आकाराचं आवाढव्य बांधकाम होतं त्या हॉटेलचं....!  आजची रात्र इथेच काढायची  ठरवली … गाड्यांवरचं सामान काढुन आपापल्या रुमवर नेणे हे सगळ्यात अवघड काम वाटे. कारण सबंध दिवस कष्टप्रद प्रवास केल्यानंतर जेव्हा समोर विसाव्याचं ठिकाण दिसत असेल तर पावलं आपोआप जड होतात. रुममधे कसेबसे गेलो. अत्यानंदाची गोष्ट म्हणजे रुम मधे टिव्ही होता . तब्बल १०-११ दिवसांनंतर आम्ही आज टिव्ही पाहणार होतो. सितामाईला अशोकवनात प्रभुरामचंद्रांची अंगठी पाहील्यावर झाला नसेल त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आनंद आम्हाला तो टिव्ही बघीतल्यावर झाला…. कोणता चॅनल बघु अन् कोणता नको असं झालं. हॉटेलवर STD होता. तो बघितल्यावर मला कॉलेज ची आठवण आली … घरच्यांना खुशालीचे फोन झाले.…  खुशाली म्हणण्यापेक्षा  ' अजून जिवंत आहोत '  हे कळवण्यासाठी फोन झाले ….  राञीच्या  जेवणात ताटानुसार पैसे होते, आणि ते खुपच जास्त  असल्याचे सर्वांना जाणवलं. त्यामुळे  जेवण हे "अलाकार्टे " पद्धतीने मागवुया म्हणजे विनाकारण जास्त पैसे जाणार नाहीत  असे पियु म्हणाली. ही नविनच भानगड मी ऐकत होतो. अलाकार्टे म्हणजे सर्व पदार्थ न घेता निवडक पदार्थ जेवणासाठी घ्यायचे व फक्त  त्या पदार्थाचे होतील तेवढेच पैसे द्यायचे. हि कल्पना सगळ्यांना आवडली . त्यानंतर सर्वानुमते अलाकार्टे च्या नावानं चांगभलं केलं...' अरे अलाकार्टे आहे , नो प्रोब्लेम ...,  अलाकार्टे आहे , हे मागवा , ते मागवा ...' करत बरेच वेगवेगळे पदार्थ घेतले . आणि जेव्हा बिल मागवलं तेव्हा मात्र काय झालं असेल हे सूज्ञ वाचकांस सांगणे नलगे …!! भलं  मोठं बिल आमच्याकडे मिश्किलपणे पाहत आहे  असं  मला जाणवलं … 





रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

दुचाकी लडाखायण... भाग - १०

                            पँगाँग लेक... !  लडाख मधलं  असं  ठिकाण कि ते जर नसतं  तर तिथल्या प्रदेशाच्या सौंदर्यात कुठेतरी कमीपणा आला असता . सर्व साज शृंगार केलेली नववधू आणि कपाळावर टिकली नाही , अशी काहीतरी अवस्था  झाली असती , पँगाँग लेक नसता तर ...!!!   आज  आम्हाला पँगाँग लेक ला जायचे होते. आधल्या दिवशी   गॅरेजवर भेटलेल्या त्या मित्राने  पँगाँग लेक वरून येताना त्या  भयानक शैतान नाल्याबाबतीत सांगितलेल्या सुरस गोष्टीं आम्ही ऐकल्या होत्या.  शैतान नाल्यासंदर्भात तो म्हणाला होता की,  संध्याकाळ झाली की त्या नाल्यातलं पाणी वाढतं. कारण दिवसा उन्हामुळे जमा झालेलं बर्फ वितळते  आणि मावळतीच्या वेळी ते लहान लहान ओहोळांमार्फत एकत्र येऊन शैतान नाल्याला येऊन मिळते. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह संध्याकाळी त्या नाल्यातून वाहातो. जर पँगाँग लेक ला जायचे असेल तर एका दिवसात जाऊन येणे अशक्य आहे. तुम्ही रात्री तिथे रहा आणि दुसऱया दिवशी सकाळी निघा असा सल्ला त्याने आम्हाला दिला. परंतु आमच्या ठरलेल्या वेळापत्रकानूसार पँगाँग लेकला रहाणे शक्य नव्हते. तो लेक जवळपास 150 किमी लांब होता म्हणजे एकूण अंतर 300 किमी होणार होते. एवढ्या लांबचा पल्ला बाईक वर एका दिवसात जाणे आता आम्हाला शक्य नव्हते  त्यामुळे मग एका दिवसासाठी गाडी करुन जाणे याशिवाय चांगला पर्याय आम्हाला तरी दिसत नव्हता. हॉटेलच्या मालकाने एक गाडी सांगितली. गाडीने जाण्याचा आणखी एक फायदा असा होता की आमच्या रायडरर्सना आरामही मिळणार होता. हमने एक तिर से दो शिकार किये.....   सकाळी 7 च्या सुमारास गाडी आली.  लहान असताना शाळेच्या सहलीला जावे तसे आम्ही त्या गाडीत जाउन बसलो.‍.. आता आरामात जाता येणार होतं. पप्या तर मागच्या सिट वर आडवाच झाला. पँगाँग ला जाताना मधे चांग- ला ही खिंड लागते. घाट सुरू होण्याआधी आम्ही एका पंजाबी हॉटेल वर  जाऊन मस्त परांठे हाणले... बऱयाच दिवसांनी त्या राईस,  नुडल्स ला पकलेले आम्ही पराठ्यांवर तूटून पडलो. नाष्टा झाला, निघालो... चांग- ला चा घाट सूरू झाला.....



आम्ही गाडीतून बाहेर वर पाहिलं तर वरचा पर्वत गडद पांढऱया धुक्यात हरवुन गेलेला दिसत होता. घाटाने वर गेलो तसे गाडीच्या पुढच्या काचेवर थेंब पडत असलेले दिसले. आमच्या गाडीचा ड्रायवर म्हणाला "उपर बरप गिर रहा है। "  बर्फ ....!!! खरीखुरी हिमवृष्टी ...! आईशप्पथ ...! आमच्या मनोरथाचे घोडे ' बर्फात ' नहाले .



 थोडे आणखी वर गेलो,  वर आकाशातुन कुणीतरी कापुस पिंजुन खाली टाकत आहे असं वाटत होतं. वर पोहोचलो,    वातावरण तर असं होतं की आम्ही कुठल्या तरी अद्भुत आणि जादुई नगरीत आलोय. बर्फाचे पांढरेशुभ्र कण हवेबरोबर कसेही उडत येत होते. हिमवृष्टी अनुभवायचा माझा पहिलाच प्रसंग... सगळं वातावरण भारलेलं. ड्रायवर ने गाडी थांबवली.  शाळा सुटल्यानंतर लहान मुले धावत पळत बाहेर येतात तसे आम्ही गाडीबाहेर पडलो. मजबुत थंडी होती बाहेर,   कुडकुडत उभे राहीलो. चांग -ला  लिहिलेल्या पाटीसमोर उभं  राहून फोटो काढून घेतले ... पुरावा म्हणून...!



                  खोप्याच्या डोक्यात नविन कल्पना आली.  एक काचेचा ग्लास घेतला बर्फाने पुर्ण भरला आणि त्यात कोकाकोला टाकुन पिऊ लागला. कोक ऑन द रॉक्स .... धमाल आली.  तिथेही खोप्या आणि पियु लहान मुलांसारखं बर्फात जाऊन खेळत होते. ह्या आख्या लडाख टूर मधे कोणती जडीबुटी खाल्ली होती देव जाणे... आम्ही माञ लगेच गाडीत जाऊन बसलो. पुढे निघालो . वळणं तर अगदी पाचवीला पुजली होती.  मधे रस्त्यात एका ठिकाणी काळ्या केसांचे याक दिसले. निसर्गाने खडबडीत रंगाचे दगडी कपडे काढून हिरवीगार शाल लपेटून घेतलेली दिसली . थोडा पुढे जातो न जातो तोच खोप्या जीव खाउन ओरडला ... " वूल्फ .... वूल्फ ..." . ड्रायवर ने करकचून ब्रेक दाबला ... मागे झोपलेला पप्या घाबरून तडफडत जागा झाला... बघतो तर तो कोल्हा  नसून असाच एक गावठी  केसाळ कुत्रा होता ... सगळे पक्के वैतागले खोप्यावर ...! त्यानंतर उगाचच आम्ही त्याची खेचू लागलो ...  बरेचसे डोंगर पार केल्यानंतर एका वळणावर दुरवर पँगॉंग लेकचं बारीकसं  प्रथम दर्शन आम्हाला घडलं. काळ्या राखाडी पर्वतांच्या पार्श्वभुमीवर पँगॉंग लेकचं आकाशी रंगांच्या विविध रंगछटा असलेलं प्रथम दर्शन डोळ्यांना आणि मनालाही अतिशय सुखावह असं वाटत होतं.



                परंतु तिथं पोहोचलो आणि आमचा भ्रमनिरास झाला. समोर विस्तीर्ण पँगॉंग लेक पसरलेला. परंतु   कलर मुघले आझम बघण्यासाठी जावं आणि समोर पुन्हा तोच जुना ब्लॅक अन् व्हाईट सिनेमा लागावा तसं काहीसं झालं. बरेच ढग जमा झाल्याने  आकाशाची निळी नितळाई काही त्या उतरली नव्हती. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे मात्र उतरले... असे म्हणतात कि चांगल्या वातावरणात पँगॉंग लेकमध्ये निळ्या रंगांच्या आठ वेगवेगळ्या छटा  दिसतात . परंतु आमच्या नशिबात बहुदा ते पाहणं नव्हतं . पँगॉंग लेकचं आडवं पसरलेलं एक टोक लांबवर कुठेतरी पर्वतरांगांमधे हरवुन गेलेलं ...





थोड्या वेळाने वरची ढगांची गर्दी काही काळासाठी हटली. आणि त्या  निळ्या नितळाईचं  हलकंसं  दर्शन आम्हाला झालं ... ते आम्ही अधाशासारखे  डोळ्यात साठवून घेऊ लागलो.


पँगॉंग लेक ने आमचा थोडा भ्रमनिरास केला . आम्ही  निघालो ते भविष्यात पुन्हा इथे येउन ह्या पँगॉंग लेकची निळी नितळाई अनुभवण्याचा पक्का इरादा करूनच....!