रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

संक्रमण

                   
                 

                                    संक्रमण


                   कधीपासून कानांमध्ये एकच आवाज येतोय ... टू ss क .... टू ss क .... टू ss क .... काय आहे हे ?  डोळ्यांसमोर धूसर दिसत आहे ... काहीतरी हलताना दिसतंय . डोळ्यांच्या पापण्यांत पाणी जमा झालेय की डोळ्यांची पाहण्याची शक्ती निघून गेलीय कळत नाही . संबंध शरीरभर होत असलेल्या वेदना कमी झाल्यात की , माझं शरीरच बधिर होत चाललं आहे , कळत नाही .  घसा कोरडा झालाय .  पाणी प्यायचंय पण ते सांगायची ताकद  उरली नाही . खोकल्याची उबळ येतेय पण तेवढे त्राण नाहीत.  डोळे आपोआप मिटत आहेत . त्यात पापण्यांमध्ये जमा झालेलं पाणी डोळ्यांच्या कडांनी थेंबाथेंबाने ओघळून कानापाशी जात आहे . त्या उष्ण पाण्याचा स्पर्श होतोय .  चेहऱ्याला कसलातरी  स्पर्श होतोय . बहुतेक कोणीतरी डोळ्यांतून ओघळलेलं पाणी टिपून घेतंय . कोण असेल ते ?   मेंदूला ताण देऊन विचार करतोय ,पण काही फायदा नाही . मेंदूतल्या पेशींनी आपलं काम करणं थांबवलेलं दिसतंय ?  कोण आहे मी ? माझं नाव काय ? अरे देवा ... हेही आता आठवत नाही . शरीरातले एकेक अवयव त्यांचं काम थांबवत आहेत , नाही , कदाचित त्यांचं काम बंद पडत चाललं आहे . आधी  आजूबाजूला कुजबुजलेलंही ऐकू येत होतं , पण आता काहीच ऐकू येत नाही . तो . टू ss क .... टू ss क .... टू ss क ....  आवाजही आता क्षीण होत चालला आहे . श्वास जड होतोय ... नव्हे जोरात घ्यावा लागतोय .   कोणीतरी बोलतंय असा भास होतो  . अचानक अंगभर मुंग्या आल्यासारख्या वाटतात , आणि परत नाहीशा होतायत . लहरी जातायत शरीरातून असं वाटतंय . हळूहळू वेदना कमी होत आहेत .   हलकं झाल्यासारखं वाटतंय . डोळे मिटल्यावर पिवळट केशरी रंगाचा पडदा दिसतोय ... पण त्याचा फिकट रंग हळूहळू गडद होत चाललाय , इतका गडद की समोर काळोख झालाय असं वाटतंय . शरीरातून एकदम सर्वत्र कंपने जाणवतायत आणि त्याच बरोबर एकदम हलकंही वाटतंय . अगदी पिसासारखं ...  समोरून तीक्ष्ण प्रकाशाचा झोत अंगावर  येतोय  आणि एकदम पुन्हा नाहीसा होतोय . असेच वारंवार झोत अंगावर येतायत ...  त्यांचा वेग वाढत चालला आहे ,  कुठेतरी वेगाने जात असल्यासारखं वाटतंय ... हे काय होतंय  ? अचानक पुन्हा काळोख , मिट्ट काळोख ... निरव शांतता . इतकी शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती . असं वाटतंय ही शांतता अशीच राहावी .... कायम . अचानक पुन्हा कंपने .... त्याचा वेग आणि तीव्रता वाढलीय . डोळ्यांसमोरचा काळोख हळूहळू फिकट होतोय , लालसर रंग त्यात मिसळलाय ... हळूहळू तो प्रखर होतोय . लालसर रंग फिकट होत होत केशरी पिवळसर झालाय . प्रखर प्रकाश जाणवतोय . अचानक काहीतरी झालं आणि  वेदनेचा आगडोंब उसळला . संबंध शरीरातून झिणझिण्या गेल्यासारख्या वाटल्या . डोळे अर्धवट उघडले तोच तीव्र प्रकाश बाणासारखा डोळ्यांत शिरला आणि डोळ्यांची आग ... आग ... झाली . सबंध शरीरभर वेदनेच्या एकामागून एक लहरी ...  असह्य होतंय .  जोरात ओरडतोय  , पण त्या वेदना काही थांबायचं नाव घेईनात , आणखी वेदना , भयंकर वेदना , नकोत त्या वेदना , जोरजोरात ओरडून मी व्यक्त होतोय . आजूबाजूला हर्षोल्हासित उद्गार आणि हसण्याचा आवाज येतोय . ओह नो ... परत !

                                                                  समाप्त





माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा