दारावरची बेल वाजली . अदितीने दार उघडले तर समोर संजय ...
" ओ , हाय संजय .... कसा आहेस आणि किती दिवसांनी येतोयस ? " अदिती खुशीत येऊन म्हणाली .
" अरे ,हो यार , थोडा बिझी होतो . तू कशी आहेस ? आणि मंदार साहेब आहेत का घरी ? " संजयनेही त्याच उत्साहात विचारपूस केली .
" हो , आहे ना ... म्हणजे तू मला भेटायला आला नाहीस तर ! " तिने लटक्या रागात विचारलं .
" तुम्हालाही भेटणारच की बाईसाहेब ! " इतक्यात मंदार बाहेर आला , " अरे , यार मंदार , वाचव बाबा तुझ्या बायकोच्या तावडीतून .... "
" ये , ये मित्रा .... " म्हणत मंदारने हसत त्याचं स्वागत केलं . " आज कसं काय येणं केलंस ? आणि बऱ्याच दिवसांनी आलास ! "
" बघ ना ... किती दिवसांनी उगवलाय हा .... मला वाटतं वर्ष तरी झालं असेल .... " अदिती म्हणाली .
" सॉरी .... सॉरी .... अरे बाबा , कामं असतात .... काय करणार ? पापी पेट के लिये करना पडता है ... " म्हणत तो सोफ्यावर बसला . अदितीने त्याला पाणी दिलं आणि चहा करण्यासाठी ती स्वयंपाकघरात गेली . मंदार , संजय आणि अदिती हे तिघे कॉलेजपासूनचे मित्र ... पुढे मंदार आणि अदिती एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रीतसर प्रेमविवाह केला . त्यात संजयने त्यांना खूप मदत केली होती . कॉलेज संपलं , मग जो तो आपापल्या कामात व्यस्त झाला . तरी संजय अधून मधून त्यांच्याकडे येत राहिला . त्याला कारण म्हणजे त्याचा विम्याचा व्यवसाय . संजय इन्शुरन्स एजंट होता . बोलण्यात पटाईत आणि आपलं म्हणणं समोरच्याच्या गळी उतरविण्याचं कसब अंगी असल्याने काही वर्षातच त्याने ह्या व्यवसायात चांगला जम बसवला . वर्षाला त्याचं कमिशन आणि इंसेंटिव्ह काही लाखात जात होतं . तो एक यशस्वी इन्श्युरन्स एजंट म्हणून ओळखला जात होता . आताही त्याचं काम होतं म्हणून तो मंदारकडे आला होता . पाण्याचा ग्लास समोरच्या टीपॉयवर ठेवत त्याने लगेच आपल्या बॅगेतून एक फोल्डर काढला .
" तुमची मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू करायची आहे ... पुढच्या आठवड्यात संपतेय तुमची पॉलिसी .... " म्हणत संजयने त्याच्या फोल्डरमधून काही फॉर्म्स काढले ." ह्या फॉर्मवर तुझ्या सह्या करून दे "
" कुठली पॉलिसी ... ओह ! मेडिक्लेम का ? " म्हणत मंदारने थोड्या नाखुषीनेच ते पेपर्स घेतले .
" हो , फॅमिली कव्हर आहे . तुमच्या दोघांसाठी .... आणि तुझा चेक सुद्धा दे ... उद्या भरून टाकतो लगेच .... "
मंदार बराच वेळ त्या फॉर्म्सकडे पाहात राहिला . त्याला असा विचारात पडलेला पाहून संजयनेच त्याला विचारलं , “ काय रे ? काय झालं ? करतोयस ना सही ? ”
“ मी काय म्हणतोय संजय , ही पॉलिसी रिन्यू करणं गरजेचं आहे का ? आत्तापर्यंत कितीतरी वेळा मी ती रिन्यू केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही . आम्हाला त्याची काहीच गरज लागली नाही . शिवाय तो मेडिक्लेम वापरला नाही तर पैसे तसेच वाया जातात . आमच्या दोघांच्याही प्रकृती अगदी ठणठणीत आहेत , तेव्हा मला असं वाटत की ह्यावेळी तुझ्या त्या मेडिक्लेमचं राहू दे .... ” म्हणत त्याने तो फॉर्म तसाच टीपॉयवर ठेवला . संजयला ह्या सगळ्या प्रकारांची चांगलीच माहिती होती . विमा किंवा मेडिक्लेमच्या बाबतीत सर्वसाधारण लोकांचा असाच कल असतो , आणि ते ह्यात पैसे टाकायला थोडे नाखुषच असतात . संजयला ट्रेनिंगमध्ये हेच शिकवलं गेलं होतं . विमा किंवा मेडिक्लेममध्ये पैसे भरून थेट काहीही मिळत नाही , त्यामुळे विमा विकणं हि सगळ्यात अवघड गोष्ट आहे , ह्याची जाणीव संजयला होतीच . एखादा दुसरा क्लायंट असता तर त्याने वेगळ्या पद्धतीने त्याला समजावलं असतं , पण मंदार तर त्याचाच मित्र होता. तो सरळ साध्या भाषेत त्याला समजावून सांगू लागला . , “ वेडा बिडा आहेस काय … आजच्या घडीला मेडिक्लेम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रा ! कधी काय होईल सांगता येत नाही , आणि तुझी पॉलिसी तशी जुनी आहे त्यामुळे बाकीचे बेनिफिट्ससुद्धा वाढतील ... त्यात कॅशलेसची सुद्धा फॅसिलिटी आहे , त्यामुळे पॉलिसी बंद करायचा विचार मनातून काढून टाक ... मी तुला सांगतो , ह्याचा तुम्हाला पुढे नक्कीच फायदा होईल ... ”
" अरे , कसला फायदा घेऊन बसलास ? वर्षाला तीस पस्तीस हजार प्रीमियम असाच जातोय ... त्याचा काहीच उपयोग नाही ... त्याचे काहीच रिटर्न्स मिळत नाहीत ... माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की पैसा सत्कारणी लागला पाहिजे . तो असा वाया जाता कामा नये .... "
" वाया कसा म्हणतोस तू ? उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली तर तुला तुझ्या खिशातून एक पै सुद्धा खर्च करावी लागणार नाही ... सगळं काही ह्या पॉलिसीतुन जाईल . असं होऊ नये , टचवूड ! पण समजा काही प्रसंग आलाच तर ही पॉलिसीच तुझ्या कामाला येईल .... " इतक्यात अदिती चहा घेऊन आली . " अदिती , यार तु तरी समजावून सांग तुझ्या नवऱ्याला … , मेडिक्लेम खरंच खूप महत्त्वाचा आहे . " संजयने अदितीला आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला . कारण त्याला माहित होतं कि अदितीने हट्ट केला तर मंदारला नाईलाजाने पॉलिसी रिन्यू करावी लागेलच …! ही युक्ती तो बऱ्याच ठिकाणी वापरायचा … घरातल्या कर्त्या पुरुषाने जर पॉलिसीत पैसे गुंतवायला नकार दिला किंवा टाळाटाळ केली तर तो घरातल्या बाईमाणसाला आपल्या मदतीला घ्यायचा . त्यांना समजेल अशा भाषेत पॉलिसीचं महत्व पटवून द्यायचा. मग त्या बायकाच त्याचं काम सोप्पं करून टाकायच्या .
" अरे मंदार , असं काय करतोय ? तो एवढं म्हणतो तर घे की ती पॉलिसी . "
" अदिती , तुला काही कळत नाही , या आधी आपण भरपूर पैसे ह्या पॉलिसीत घातलेत , आपल्याला एक रुपयाचाही फायदा झाला नाही .... मग कशाला आपले पैसे वाया घालवायचे ? " मंदारच्या बोलण्यात तुसडेपणाची झाक दिसत होती .
" अरे मित्रा , पैसे वाया जाणार नाहीत , कधी न कधी तरी उपयोगी येतीलच . या आधी कदाचित तुम्हाला गरज लागली नसेल पण पुढे लागणार नाही असं कसं म्हणता येईल ? " संजय आपल्या परीने किल्ला लढवत होता
" मी काय म्हणते , आता ह्या वर्षासाठी रिन्यू करूया पॉलिसी , पुढचं पुढच्या वर्षी बघू .... " अदिती .
" आणि ह्या वेळी प्रीमियमसुद्धा थोडा कमी केला आहे कंपनीने , त्यामुळे तुला पैसे कमी भरावे लागणार आहेत . " संजय
" प्लिज , मंदार मी सांगते म्हणून घे पॉलिसी , माझ्यासाठी ..... "
दोन विरुद्ध एक असा मंदारचा पराभव झाला आणि नाईलाजाने त्याला पॉलिसी रिन्यू करायचं मान्य करावं लागलं.
" मी जिथे फुल्या केल्या आहेत तिथे सह्या कर . " पडत्या फळाची आज्ञा समजून संजयने लगेच त्याच्यासमोर फॉर्म समोर धरला . नाखुषीनेच मंदारने त्यावर सह्या केल्या . संजयला चेक मिळाला आणि आता तो निर्धास्त झाला . त्या तिघांच्या आवांतर गप्पा सुरु झाल्या . संजय आणि अदिती दिलखुलासपणे गप्पा मारत होते, पण मंदार मात्र पैसे वाया गेल्याचं दुःख मनात असल्यामुळे गप्पांमध्ये तितकासा भाग घेत नव्हता . संजयच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही.
" अदिती , तुझा नवरा काही बदलला नाही , कॉलेजमध्ये होता तसाच आहे अजून .... " संजयने गंमतीने टोमणा मारला . अदितीला हसू आलं .
" हो , अरे परवा तर गंमतच झाली , मी आणि मंदार स्टेशनवरून रिक्षाने घरी आलो . तर मीटरनुसार ४० रुपये झाले . त्या रिक्षावल्याकडे सुट्टे नव्हते आणि आमच्याकडे फक्त पन्नासची नोट होती . मंदार त्याला म्हणाला , पुढच्या चौकापर्यंत चल . तो रिक्षावाला आम्हाला घेऊन गेला . मंदार म्हणाला परत यु टर्न घे . तसा त्याने यु टर्न घेतला , असं करत आम्ही पुन्हा आमच्या घराजवळ उतरलो , रिक्षाचं भाडं बरोब्बर पन्नास रुपये झालं होतं ....त्याच्या हातात ५० रुपये ठेवले , मग आम्ही खाली उतरलो . ” अदिती हसत हसत सांगत होती.
“ धन्य आहेस बाबा … तुला सांगतो अदिती , आमची कधी पार्टी असली आणि काही अन्न उरलं तर तो पॅक करून घ्यायचा ” संजय गमतीने म्हणाला . मग मंदारच्या अशा वागण्याचे गमतीदार प्रसंग अदिती आणि संजय एकमेकांना सांगू लागले . दोघे त्याची टिंगल करीत असल्यामुळे आधी मंदार फुगून बसला , मग त्यालाच त्याच्या असल्या वागण्याची गंमत वाटून तोही त्यांच्या हसण्यात सामील झाला .
गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कुणालाच कळलं नाही . अदितीने संजयला जेवणासाठी थांबवून घेतलं . तो नको नको म्हणत होता पण अदिती काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती . मग मंदारही गमतीने म्हणाला , “ मला नको असताना तो मेडिक्लेम माझ्या माथी मारलास ना … भोग आता आपल्या कर्माची फळं … ” आधी त्याच्या बोलण्याचा रोख कुणाला कळला नाही , मग संजय अचानक स्फोट झाल्यासारखा जोरजोरात हसू लागला . मंदारही त्या हास्यात सामील झाला . अदिती चांगलीच चिडली …
मधे दोन आठवडे निघून गेले आणि एके दिवशी संजयला मंदारचा फोन आला . त्याचा सूर अत्यंत रडवेला झाला होता .
“ काय झालं मंदार ? आणि इतका घाबरलेला का आहेस ? ” पलीकडून संजयने विचारलं .
“ अरे , अदितीचा ऍक्सिडंट झालाय … तिला आताच सिटी हॉस्पिटलला आणलंय … तू प्लिज इथे येशील का ? … मला काहीच सुचत नाही … ”
संजय लगेच तिथे पोहोचला देखील … आल्या आल्या त्याने विचारलं , “ कसा काय झाला ऍक्सिडंट ? ”
“ आज सकाळी ती बाथरूममध्ये घसरून पडली , खूप जोरात पडली , तिला उठता येईना … मलाही काही सुचेना तेव्हा लगेच रिक्षा करून इथे घेऊन आलो . डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढलाय , म्हणाले कमरेच्या हाडाचं ऑपरेशन करावं लागणार आहे … ”
“ अरे बापरे ! … आता कुठे आहे ती ? ”
“ तिला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं आहे … काय होऊन बसलं यार … ” असं म्हणून मंदार रडायलाच लागला . संजय त्याला धीर देत होता . पण त्यालाही मनातून अदितीची काळजी वाटत होती . ऑपरेशन मोठं होतं . कंबरेचं हाड तुटल्याने ते रिप्लेस करावं लागलं . साडेचार पाच लाख खर्च आला , परंतु सुदैवाने संजयने आग्रहाने काढून घेतलेल्या मेडिक्लेम पॉलिसीमुळे मंदारला त्याच्या खिशातून एकही रुपया भरावा लागला नाही . त्याने संजयचे खूप आभार मानले . त्या प्रसंगातून सावरायला अदितीला सहा महिने घालवावे लागले . आता ती हळू हळू चालूही लागली होती . वर्षभरात ती पूर्वीसारखी हिंडू फिरु लागली . असाच एकेदिवशी संजय पुन्हा मंदार आणि अदितीच्या घरी आला .
" मंदार , आपल्याला संजयचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत ... त्याच्याच आग्रहामुळे आपण मेडिक्लेम काढला आणि आपला पाच लाखांचा खर्च वाचला . संजय , खरच मनापासून आभार ... थँक्स यार ... " अदिती कृतज्ञता व्यक्त करू लागली .
" हो , खरंच .... थँक्स यार संजय… इतका मोठा खर्च मी कसा काय केला असता … देव जाणे ! " मंदार म्हणाला .
" इट्स ओके ... पण आताही मी त्याच कामासाठी आलोय . तुमच्या त्याच मेडिक्लेमच्या पॉलिसीचे रिन्यूएशन आहे . काय मग मंदार साहेब , आता पॉलिसी रिन्यू करायची की नाही ? " तो मंदारकडे पहात गंमतीने म्हणाला .
" सॉरी यार संजय .... आता काय बोलणार मी .... ? आण तुझे ते फॉर्म्स ... कुठे सह्या करायच्यात ते बोल ... "
संजयने त्याचा फॉर्म भरून घेतला . प्रीमियमचा चेक घेऊन तो जायला निघाला पण पुन्हा अदितीने त्याला तसं जाऊ दिलं नाही .तिने आग्रहाने त्याला जेवणासाठी थांबवून घेतलं . तिघांनी जेवण केलं . भरपूर गप्पा मारल्या . प्रसन्न मनाने संजय त्यांच्या घरून निघाला . रात्रही खूप झाली होती . मंदार आणि अदिती बेडवर आडवे झाले . थोड्याच वेळात अदितीला गाढ झोप लागली पण मंदार जागाच होता . त्याने एकदा अदीतीकडे पाहिलं . वर्षभर तिला फारच त्रास झाला होता . त्याला झोप लागेना . तो उठून हॉलमध्ये आला . सिगारेट पेटवली आणि धुरांची वलये हवेत सोडत निवांत आरामखुर्चीवर बसला . अचानक त्याच्या मनात अदिती आणि संजयचा विचार आला . कॉलेजमध्ये त्याचं आणि अदितीचं जुळायच्या अगोदर ते दोघे खूप चांगले मित्र होते … ‘ हे दोघे नुसते मित्र होते कि त्यापेक्षा आणखी काही ? अदिती कधी कधी त्याच्याशी खूपच लगट करते … तिच्याच आग्रहामुळेच आपण ती मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केली . नाहीतर आपण ती पॉलिसी रिन्यू करणार नव्हतोच … अदितीला खूपच त्रास झाला . त्या मेडिक्लेममुळे आधी भरलेले सगळेच पैसे वसूल झाले . पण आता ह्यावर्षी भरलेल्या पैशांचं काय ? तेही वसूल व्हायला हवेतच ! बिचारी अदिती , आणखी किती त्रास सहन करेल , कुणास ठाऊक … ! सिगारेटच्या धुरांची वलये हळूहळू मोठा आकार घेऊ लागली .
समाप्त
समाप्त
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा