शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

लोकल डायरी -- २५

 http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
 http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post_18.html लोकल डायरी -- २३
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post.html लोकल डायरी -- २४
                                                       
   शनिवार रविवार आरामात झोपा  काढून  घालवल्यानंतर  सर्वात नावडता वार येतो , तो म्हणजे सोमवार ... ! एकतर ह्या वारी गाडीला तूफ़ान गर्दी असते . आणि न्यूटनच्या  गुरुत्वाकर्षणाच्या पहिल्या   नियमाप्रमाणे शरीर  स्थिर स्थितीत  असते आणि जोपर्यंत त्यावर बाह्य बल कार्य करत नाही तोपर्यंत ते आहे त्याच स्थितीत राहते... जड़त्व …!  सगळ्या शरीरात जड़त्व भरलेलं असतं .  ह्या जड़त्वाच्या नियमाचा शोधही न्यूटनला सोमवारीच लागला असावा का ? असा उगाच एक फालतू प्रश्न माझ्या डोक्यात आला . हे आज सकाळी सकाळी अभ्यासाचे विचार कसे काय डोक्यात आले  ? जेव्हा यायची गरज होती तेव्हा नाही आले आणि आता येऊन काय फायदा ? असंच असतं ... माणसाच्या अंतर्मनातल्या गोष्टी कधी उचंबळून वर येतील काही सांगता येत नाहीत . अचानक मला आठवलं की काल म्हणजेच रविवारी भरत मुलगी बघायला जाणार होता . आज समजेल की काल काय काय झालं ते ...! भरतला मुलगी आवडली की नाही ते समजेल . जिग्नेस प्रकरणामुळे जे तणावाचं वातावरण तयार झालं होतं ते तरी ज़रा निवळायला मदत होईल .  एकूणच आज धमाल असणार लोकलला ...  असा विचार करीत मी प्लॅटफॉर्मवर आलो . गाडी अजुन आली नव्हती . आमच्या ग्रुपचे सावंत तेवढे प्लॅटफॉर्मवरच्या पंख्याखाली वारा घेत उभे होते .
" काय सावंत ? काय हवा खाताय काय ? " मी गमतीने त्यांच्या जवळ जाऊन विचारलं .
" हो बाबा ... हवा खातोय ..."
“  भरत आला नाही का ? त्याचं कळलं का काही ? काल मुलगी बघायला जाणार होता ना तो ….  ”
“ हो रे … अजून आला नाही म्हणजे येणार नाही बहुतेक …. उद्या भेटेलच कि …! ”
" हम्म … आणि तुमचं काय  ?  घरी हवा कशी आहे ?  आपलं बोलणंच झालं नाही त्यानंतर ..."
" काय सांगू बाबा तुला ! " सावंतांनी एखादी दुखभरी  कहाणी सांगावी तशी  सुरुवात केली   ..."  माझी बायको आणि शकुंतला ह्या दोघींची एक टीम झालीय ... मी शाळेत कसा होतो ते शकुंतला हिला सांगते आणि मी लग्नानंतर कसा आहे हे आमची बायको,  शकुंतलेला सांगते . दोघी अगदी मनापासून खेचत असतात माझी ... "
" आयला , भारीच की मग ....  मला वाटलं की त्या दोघींच्यात तुमच्यावरुन भांडणं लागत असतील ..."
" अरे कसलं काय ... सख्या बहिणींसारख्या वागतायत एकमेकांशी ... माझं मात्र मधलं माकड केलंय दोघींनी ... पण खरं सांगू , मलाही बरं वाटतं ... खरं तर दोघींच्या चेहऱ्यावर आनंद पाहुन खुप छान वाटतं ..."  सावंत समाधानाने बोलत होते .  जेव्हा  दोन व्यक्ती एकमेकांशी चांगलं वागाव्या असं तिसऱ्या व्यक्तीला वाटत असतं  आणि त्या तशा एकमेकांशी चांगलं वागतात तेव्हा त्या दोन व्यक्तींपेक्षा त्या तिसऱ्या  व्यक्तीलाच जास्त आनंद होत असतो ,  तसंच काहीसं  सावंतांचं झालं होतं .
" नशीबवान आहात तुम्ही सावंत ... तुम्ही पृथ्वीतलावरचे  असे एकमेव पुरुष असाल जे आपल्या बायकोबरोबर आणि जुन्या प्रेयसीबरोबर एकत्र राहताय , आणि तेही आनंदाने...! "
" खरंच रे बाबा , मला अजूनही  विश्वास बसत नाही . एखाद्या  कादंबरीतल्यासारखं ,  असं काल्पनिक घडत असेल असं वाटतं . कसं असतं बघ ना .... मी माझ्या बायकोला शकुंतलेबद्दल सगळं खरं खरं सांगितलं तर ती माझ्याशी कित्येक दिवस बोलत नव्हती आणि  कोण कुठल्या तरी एका तिर्हाईताने सांगितलेल्या गोष्टींवर तिने विश्वास ठेवला . अजब वाटतंय मला . "
" असंच असतं सावंत . आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवतच नाही कधी . पण एखाद्या  अनोळखी माणसाने आपल्या माणसाबद्दल काही सांगितलं की त्यावर  चटकन विश्वास बसतो . "
" अगदी बरोब्बर बोल्लास …!  पण काही का असेना , त्या दोघी मजेत राहतायत हे मात्र खरं "
" पण हे कसं काय शक्य आहे ? दोन बायका, त्यातली एक लग्नाची बायको आणि दूसरी पूर्वीची प्रेयसी  अशा इतक्या समंजसपणे एकत्रित कशा काय राहु शकतात ? आश्चर्य आहे ..."
" हो ना ... तेच मलाही कळत नाही ... पण मी असं का घडतंय ह्याचा कसलाच खोलात जाऊन  विचार केला नाही अन  करतही  नाही ... चाल्लय ना चांगलं , मग चालू दया ..." सावंत दोन्ही हात उडवत म्हणाले . इतक्यात लोकलचा हॉर्न वाजला . लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती . ती आली तसा  आम्ही तिच्यावर हल्ला केला . शरदने  पुढे जाऊन आधीच आमची जागा धरली होती . आज नायर अंकल आणि भरत   आले नव्हते , जिग्नेसला हॉस्पिटलमधून  डिश्चार्ज मिळाला होता . तो दोन - तीन दिवसांनी लोकलला येणार असल्याचं त्याने शरदला फोनवरुन सांगितलं होतं . त्यामुळे आज आमच्या डब्यात नेहमीच्या बसायच्या जागेत जास्त गर्दी नव्हती . भडकमकरांची विंडो फिक्स होती . ते तिथेच बसले  आम्हा चारही जणांना बसायला जागा मिळाली होती . मी आणि सावंत व्हिडिओ कोचच्या समोरच बसलो होतो . मी पाहिलं पण अँटीव्हायरस अजुन आलेली नव्हती . अगदी गाड़ी  सुटायच्या वेळी ती धावत पळत लोकलमधे शिरली . मी सुटकेचा निश्वास टाकला . ती समोर असली की एकदम बरं वाटतं . मी तिच्याकडे बघत होतो . सुरुवातीला धावत धावत आल्याने तिला भरपूर दम लागला होता . अळवाच्या पानावर जसे पाण्याचे थेंब तसे  तिच्या कपाळावर घामाचे बिंदु जमा झाले होते . थोडा दम खाल्ल्यावर तिने तिच्या  हॅंडबॅगमधून पांढरा शुभ्र रुमाल काढला आणि कपाळावरचे घर्मबिंदु टिपून घेतले . त्यानंतर हॅंडबॅगमधून पाण्याची छोटीशी बाटली काढली आणि थोडं पाणी ती प्यायली . तिच्या ह्या हालचाली बघण्यात मी गुंग होऊन गेलो होतो . मी तिच्याकडे बघत असताना तिनेही पाहिले . आम्ही ओळखीचं हसलो .
" बास .... बास .... " सावंत दबक्या आवाजात माझ्या कानाशी येऊन म्हणाले . मी त्यांच्याकडे पाहिलं तर ते गमतीदार चेहरा करुन माझ्याकडे पाहू लागले . मीही त्यांना हसून प्रतिसाद दिला .
" बाकी चॉईस चांगला आहे तुझा ... " सावंत माझ्या कानात म्हणाले .
" अहो , तसं काहीच नाही अजुन ... आत्ता फक्त ओळख झालीय ... "
" होईल हळू हळू .... चांगलं  चालू आहे … " ते स्मितहास्य करीत म्हणाले . सावंत,  तुम्ही म्हणता तसंच होऊ दे . मी मनातल्या मनात म्हणालो . आज गर्दी अशी नव्हतीच आणि गोंधळही कमी होता . भडकमकर आधीच डोलायला लागले होते . शरद त्याच्या मोबाईलमधे डोकं घालून बसला होता . सावंत आपला पेपर उघडून वाचत बसले होते . मी काय करावं ह्यांच्या विचारात होतो . सीटवर बसल्यामुळे मला अँटी व्हायरससुधा दिसत नव्हती . काय करावं .... काय करावं .... असा विचार करता करता मला झोप यायला लागली  आणि कधी माझे डोळे झाकले गेले मलाही कळालं नाही .  उठलो  तेव्हा दादर आलं होतं . दादरला उतरणाऱ्या लोकांपैकी कुणाचा तरी पायाला धक्का लागला आणि मी झोपेतून जागा झालो .
" अरे काय कुंभकर्ण शिरला होता काय तुझ्यात ? कसला झोपला होतास ? " सावंत मी जागा झाल्यावर म्हणाले .
" इतका वेळ कसा काय झोपलो ? काय कळत नाही ... "  मी समोर पाहिलं . अँटी व्हायरस लोकलच्या  दारात  उभी होती . वाऱ्याने तिचे केस भुरुभुरु उडत होते . हवेत उडणाऱ्या सोनपरीसारखी ती दिसत होती .  ' पुढील स्टेशन भायखळा ... अगला स्टेशन भायखला .... ' स्पीकरमधून  रेल्वेची अनाउंसमेंट करणाऱ्या बाईच्या आवाजाने मी भानावर आलो . स्टेशन आलं .
" हाय ... " ती समोर आल्यावर मी हसून तिला म्हणालो .
" हाय ... "
" वेळ आहे का थोडा ...."
" बोल ना ..."
" चहा आणि बन मस्का ? "
" ओके ..."
आम्ही आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमधे गेलो . पुन्हा काउंटरवरच्या मालकाचं समजुतीने हसणं . आणि न मागताही टेबलवर बन मस्का आणि चहा येणं हे झालंच ! आता आम्हालाही त्याची सवय झाली .
"बोल... काय बोलायचं आहे ..." बन मस्क्याचा तुकडा तोंडात टाकत तिने विचारलं .
" मला थोडं विचारायचं होतं तुला ... म्हणजे तू रागावणार नसलीस तर ... " मी सावध पवित्रा घेतला .
" विचार ना मग ... त्यात काय एवढं ...?" ती चहाचा एक घोट घेत म्हणाली .
" नाही म्हणजे तू काही गैरसमज करुन घेऊ नकोस ... आणि मी विचारेन त्याचा  जर तुला राग आला तर ? " मी आणखी एकदा खात्री करण्यासाठी विचारलं .
" ओफ़ ओ ... विचार ना आता ... आता तू नाही विचारलंस तर मला राग येईल हां ...!" ती वैतागली . आता माघार नाही .
" तू ... तू आणि तुझा होणारा नवरा अनिकेत  ह्यांच्यात सगळं ठीक चालू आहे ना ? " मी  एकदम विचारुन टाकलं . ती बन मस्क्याचा तुकडा तोंडात टाकणार इतक्यात तो तसाच तिच्या हातात राहिला . माझ्या प्रश्नाचा होणार हा परिणाम काही चांगला दिसत नव्हता . तिने तो तुकडा न खाता  पुन्हा तसाच बशीत ठेवला . जणुकाही अनिकेतचे नाव घेतल्याने अचानक तो तुकडा  खाण्यालायक राहिलाच नाही . ती गंभीर झालेली दिसत होती .
" आय ऍम सॉरी ... मला हे विचारण्याचा असा कोणताही अधिकार नाही . तुला नसेल सांगायचं तर नको सांगुस ..."
" अनिकेत जर्मनीला गेलाय ...." ती बशीतल्या त्या पावाच्या तुकड्याकडे एकटक बघत म्हणाली .
" काय ? जर्मनीला ....? मग आता ...." मी पुढे काही बोलणार इतक्यात तिने ट्रॅफिक हवालदार गाड्या थांबवण्यासाठी  करतात तसा हात केला . माझा प्रश्न लाल सिग्नल लागल्यासारखा होता तिथेच थांबला .
" पंधरा दिवसांसाठी गेलाय तो . कंपनीच्या कामासाठी ."
" ओह ... ओके ..."  त्यानंतर थोडा वेळ जीवघेणी शांतता पसरली . काहीतरी बोलणं गरजेचं होतं पण काय ते सुचेना . मग तिनेच सुरुवात केली .
" गेले काही दिवस तर तो ज़रा जास्तच विचित्र वागतोय . का ते मलाही कळत नाही . मग मीही मला हवं तसं वागले  त्यामुळे जास्तच भांडणं वाढली . आणि त्या दिवशी त्याने आपल्याला इथे एकत्र पाहिलं तेव्हा तर तो जाम भडकला होता . आमच्यात भांडण सुधा झालं मोठ्ठं .   पण नंतर त्याने शांतपणे विचार केला असेल .   परवा आम्ही भेटलो . मला म्हणाला की , आपल्यात लग्नाआधीच इतके मतभेद  आहेत , इतकी भांडणं आहेत तर लग्नानंतर काय होईल ? तेव्हा आपण दोघांनी ह्याचा विचार करुया . आत्मपरीक्षण करुया .  मी पंधरा दिवसांसाठी जर्मनीला जातोय . आपण पुढे काय करायचं त्याबाबत तटस्थपणे विचार करु म्हणाला .
" मग ? आता काय करणार आहेस तू ? "
" काय करणार ? विचार करतेय ... अनिकेत तसा वाईट मुलगा नाहिये रे . फक्त तो कधी कधी ओव्हर पझेसिव होतो . त्यामुळे आमच्यात कधी कधी भांडणं होतात . कदाचित मधे थोड़ा वेळ गेला तर सगळं निटही होईल . बघु , सध्या मी पंधरा दिवसांच्या प्रोबेशन पिरियडवर आहे ..." ती गमतीने हसत म्हणाली . आयला ह्या पोरीचं काही कळत नाही . कधी त्या अनिकेतला चांगलं म्हणते कधी वाईट म्हणते ... मी उगाचच विचार करतोय मधल्या मधे ...
" काय रे ? कसला विचार करतोयस ? " तिच्या विचारण्याने माझी तंद्री भंग पावली .
" नाही . काही नाही ..." मी माझा चहा संपवला . वेटरला बोलावून बिल आणि टिप दिली . आम्ही दोघे निघालो .

" मधु , मला माहीतिये की तू मला असं का विचारतोयस ते ..." ती म्हणाली .  मी तिच्याकडे चमकुन पाहिलं . माझ्या मनातले विचार  तिच्या डोळ्यात उतरल्यासारखे मला वाटले .

क्रमशः ...


माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा