शनिवार, १३ जून, २०१५

लोकल डायरी -- १६

  http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
                                                           
   " Nighala ka ? " माझ्या व्हॉट्स ऍपवर सावंतांचा मेसेज आला . मग मला अचानक त्यांचं कालचं  बोलणं आठवलं . त्यांना कालच मला काहीतरी सांगायचं होतं . आज लवकर गेलं पाहिजे . म्हणून मी पटापट आवरू लागलो .
"10 minitat pohochto " असा मेसेज त्यांना करुन  टाकला,  आणि निघालो . काय सांगायचं असेल सावंतांना ? इतकं महत्वाचं असं काय आहे की ते काल मला सांगण्यासाठी अधीर झाले होते  ? प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तेव्हा ते एकटेच एका बाकावर बसले होते . मी लांबुन पाहिलं तर मोबाईलमधे डोकं घालून बसलेले मला दिसले. मी त्यांच्या जवळ गेलो.
" हां ... बोला सावंत .... एवढं काय अर्जंट बोलायचं होतं ? "  मला बघुन त्यांना एकदम हायसं वाटलं . " ये ... ये ... बस " ते  बाकड्यावर सरकुन मला जागा करुन देत म्हणाले . ते काय सांगणार ह्याची उत्सुकता मनात घेऊन मी त्यांच्या शेजारी बसलो . थोडा वेळ ते तसेच शांतपणे बसून राहिले . पण त्या शांततेतही त्याच्या मनात खुप मोठं वादळ चालू असावं हे त्यांच्या हाताच्या बोटांची   चाळवाचाळव चालू होती त्यावरुन माझ्या लक्षात आलं . मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अन म्हणालो , " सावंत , काही प्रॉब्लेम आहे का ? घरी सगळं ओके ना ? " त्यावर त्यांनी चटकन माझ्याकडे पाहिलं . पण नंतर नजर पुन्हा दुसरीकडे वळवली. नक्कीच काहीतरी सिरिअस प्रॉब्लेम झाला असावा .
" तुला कसं सांगू तेच कळत नाही . "  सावंत काळजीने म्हणाले .
" सांगा ना ,काय प्रॉब्लेम झालाय ? "  मी विचारलं तरी सावंत तसेच  शांत बसून राहिले .   "  हे बघा तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार कसं ? "
" माझं पहिलं प्रेम पुन्हा माझ्या आयुष्यात आलय...."   त्यांच्या  चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता .  .
" काय ? म्हणजे त्या शकुंतला जोशी ....? " मला काय बोलवं तेच कळेना .
" कोण रे शकुंतला जोशी ...? " शरद माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाला . मी एकदम दचकलोच . खरं तर ही  फक्त सावंतांच्या आणि माझ्यातली गोष्ट होती .  आमच्या न कळत शरदला ही गोष्ट समजली होती का ?
" अरे केव्हढयाने दचकलास ? काय झालं ? आणि ही शकुंतला जोशी कोण ? "  शरदला संशय आलाच .
" अरे ती आमच्या शेजारी राहते , तिचे मिस्टर  सावंतांच्या ऑफिसमधे काम करतात  ..." मी मनाला येईल ते ठोकुन दिलं .
" मग ? तिचं काय ? " शरदने पुन्हा विचारलं . आता त्याला असं उत्तर द्यावं लागणार होतं की त्यातून त्याचे कसलेही उपप्रश्न निर्माण होणार नाहीत . मी  चटकन विचार केला , " अरे , त्यांना कॉस्ट कटिंग  आणि रिसेशनमुळे  काढून टाकलं रे... त्या बिचाऱ्या आमच्याकडे येऊन सांगत होत्या . तेच मी सावंतांना सांगत होतो . " जसं सुचेल तसं सांगितलं  . सावंतांचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता .
" हो यार ... जाम बेकार अवस्था होते , ज्यावेळी सांगतात की तुम्हाला उद्यापासून यायचं नाही ते .... मी पण अनुभवलंय हे आधी . " शरद हळहळ व्यक्त करत म्हणाला . इतक्यात भडकमकर आणि भरत आले . तेही आमच्या इथे येऊन थांबले . मी सावंतांना नंतर बोलू असं खुणावलं. लांबुन गाडीचा हॉर्न  ऐकू आला . सगळे आपापल्या जागेवर बसले . मी आणि सावंत उभे राहिलो . मी पलीकडे व्हिडिओ कोच कडे पाहिलं , शकुंतला जोशी कुठे दिसत नव्हत्या. अँटी व्हायरस समोरच उभी होती . आमचं ओळखीचं स्माईल देऊन झालं . सावंतांनी मोबाईलमधे डोकं घेतलं होतं . मोबाईल ही वस्तु कठीण प्रसंगी  उपयोगाची झाली आहे  . काहीही कारण नसताना आपण मोबाईलशी चाळा करु शकतो . स्मार्ट फोनमुळे तर हे काम आणखी  सोप्पं झालंय . मी  त्यांना काहीच बोललो नाही . मघाशी ते म्हणाले की त्यांचं पहिलं प्रेम त्यांच्या आयुष्यात परत आलंय ... म्हणजे नेमकं काय झालंय ? सावंत त्या बाईंच्या बाबतीत सिरिअस वगैरे नाहीत ना ? तसं असेल तर मोठाच प्रॉब्लेम होईल .  त्यांच्या सुखाच्या संसारात मधेच हे वादळ कसं काय निर्माण झालं  ?  मी सावंतांच्या मिसेस ना एकदा भेटलो होतो . अतिशय सुस्वभावी आणि मन मिळाऊ वाटल्या मला . त्यांच्या संसारात कशा प्रकारची कमतरता मला जाणवली नाही . त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं होती . मुलगा बारावी आणि मुलगी नववीला होती . दोघेही हुशार  आणि  चुणचुणीत , थोडक्यात अभ्यासाच्या बाबतीत  आई बापच्या डोक्याला टेंशन न देणारी अशी मुलं होती . इतकं सगळं सुरळीत चाललं असताना , सावंतांना हे मधुनच कुठून सुचलं ? अशा ह्या चौकोनी कुटुंबात आणखी एक कोन वाढणार होता की काय ?   शांत ,  निश्चल पाण्यावर कुणीतरी दगड मारुन  त्याची स्थिरता भंग करावी तसं काहीतरी सावंतांच्या बाबतीत झालेलं होतं .  मी सावंतांकडे पाहिलं . ते अजूनही मोबाईलमधे डोकं घालून बसले होते . त्यांना आपण काय बघतोय ह्याच्याशी सोयर सुतक नव्हतं  कारण मोबाईलवर कॅलेंडर उघडलेलं मला दिसलं . ते वेगळाच विचार करीत असावेत . आणि तो शकुंतला बाईंच्या बाबतीतच असावा हे मात्र निश्चित ...!  पहिल्यांदा मला असं वाटलं की दादर लवकर यावं , कारण आमची ही सगळी प्रजा आपापल्या स्टेशन्सवर   उतरल्याशिवाय सावंत काहीही सांगणार नाहीत . शेवटी सगळे उतरले . मी सावंतांच्या बाजूला जाऊन बसलो .
" सावंत , हे काय आहे ? हे असं कसं काय झालं ? " मी त्यांना विचारलं .
" यार मला पण कळत नाही . तुला मागे बोललो ना की आम्ही एकदा भेटलो होतो म्हणून , त्यानंतर आम्ही आणखी एक दोन  वेळा भेटलो . त्या भेटींमधे  तिने मला तिची कहाणी सांगितली .  तिची कहाणी ऐकशील तर तुझ्या डोळ्यात पाणी येईल .  तिचे मिस्टर आणि मुलगा दोघेही चार वर्षापुर्वी  एका  ऍक्सीडंट मधे वारले .  ती एकटी पडली .  तिच्या नवऱ्याची इस्टेटसुद्धा तिच्या नातेवाईकांनी  तिला  मिळून दिली नाही . तिला फसवुन ती सगळी प्रॉपर्टी त्यांनी लुबाडली . एक वेळ अशी आली होती की तिच्याकडे काहीही उरलं नाही . ती अगदी एकाकी , असहाय झाली ,  त्यामुळे ती शेवटी तिच्या भावाकडे आली . त्याने तिला आता एक नोकरी मिळवून दिली आहे . आधी ती  तिच्या भावाकडे राहात होती  पण तिच्या वहिनीबरोबर रोजच खटके उडायला लागले . तिने तेही घर सोडलं आणि आता एका भाड्याच्या रुममधे एकटीच राहते . यार मध्या , तिने हे मला सांगितलं तेव्हा तर मला एकदम भडभडून आलं ...  आधी जवळचे गेले , नंतर नातेवाईकांनी फसवलं , माहेर म्हणावं  असं  काही राहिलं नाही , काय वाटलं असेल रे तिला  ?  एखाद्या तिर्हाइताबरोबर असं झालं तरी आपल्याला दुःख होतं , इथे तर मी तिच्यावर प्रेम  केलंय यार ... " असं म्हणून सावंतांनी ओंझळीत तोंड झाकलं आणि ते रडु लागले . त्यांना असं लहान मुलासारखं रडताना पाहुन मला काय बोलावं तेच सुचेना . ते तसेच काही वेळ रडत राहिले . मी बाहेर पाहिलं गाडी सी एस टी स्टेशनमधे शिरत होती . मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला .
" सावंत प्लीज शांत व्हा ... तुमची काय चूक आहे हयात ? "
" मला तिच्याबद्दल खुप वाईट वाटतंय रे ..."
" बरोबर आहे ... सहाजिकच आहे ... वाईट वाटणारच... पण आता आपण करणार तरी काय ? "
" तु जर माझ्या जागी असतास तर तू काय केलं असतंस ? " असं बोलून त्यांनी माझी बोलतीच बंद केली . खरंच माझ्या बाबतीत असं झालं असतं तर मी काय केलं असतं ? गाडी बराच वेळ सी एस टी स्टेशनला उभी होती . सगळे उतरुन गेले . आमच्या डब्यात फक्त आम्ही दोघेच राहिलो . गाडी पुन्हा निघणार होती . मी सावंतांना म्हणालो , " चला , आपण उतरुया .... इथेच एक चांगलं रेस्टॉरंट आहे तिथे बसून बोलू .... चला ." मी कसंबसं त्यांना उठवलं .  आम्ही दोघे स्टेशनबाहेरच्या कॅफेत आलो . मी माझा फोन बंद करुन टाकला . जरा उशीर झाला की  ऑफिसचा  बॉस अगदी प्रलय आल्यासारखा फोन करत रहातो. आज सावंत महत्वाचे ! बाकी काही नाही . मी वेटरला दोन चहाची ऑर्डर दिली .  सावंतसुद्धा आता नॉर्मल झाले होते .
" सावंत मला सुद्धा जोशीबाईंबद्दल सहानुभूती वाटते . अशी वेळ कुणावरही येऊ नये . "
"  मला तिच्यासाठी काहीतरी  करायचंय ... मला तिची ही परिस्थिती बघवत नाही रे .... काय करु सांग ना प्लीज ..."  त्यांची ही याचना मला लहान मुलाच्या हट्टासारखी वाटली .
" एक विचारु का सावंत ? ."
" विचार ना ... "
" त्या तुम्हाला काही म्हणाल्या का ? "
"  म्हणजे ? तुला काय म्हणायचंय ? "
" हेच की त्यांना मदतीची गरज आहे , किंवा त्यांना एकटेपणा वगैरे वाटतोय ... "
" तिने तिची कहाणी मला सांगितली , आणि ती रडायलाच लागली .  याचा अर्थ काय ?  ती फार एकटी पडलीय . आपलं म्हणावं  असं ह्या घडीला तिच्याजवळ कोणीही नाही . "
" हम्म्म ... पण मग आता काय करायचं ? तुम्ही काय ठरवलंय ? "
" अरे तेच तर सुचत नाही ना ... . सारखा तिचाच विचार येतोय  डोक्यात ! माझं तर  डोकं फिरायची वेळ आलीय " असं म्हणून ते डोकं धरुन बसले .
" त्यांना आपण दुसरीकडे कुठे शिफ्ट करु शकतो का ? "
" दुसरीकडे म्हणजे कुठे ? "
" वर्किंग वुमन हॉस्टेल ..., किंवा एखादं लेडीज हॉस्टेल ... ? "
" ह्याचा विचार मी पण केला होता  , पण एक दोन  ठिकाणी जागा शिल्लक नाहीत , आणि काही हॉस्टेल फारच महाग आहेत ... आणि जरी आपण हॉस्टेलचा पर्याय निवडला तरी ती तिथे एकटीच राहणार  , आता जशी भाड्याच्या रुममधे रहाते तशीच ...! तिला मानसिक  आधाराची गरज आहे . "
" हम्म ...  तुम्ही शकुंतला बाईंबद्दल घरी सांगितलंय का ? " मी मुख्य प्रश्नाला हात घातला .
" नाही , अजुन तरी नाही . "
" मला आता एकच पर्याय दिसतोय  "
" काय ... काय ...? " त्यांनी अधाशीपणे विचारलं .
" पण माझा पर्याय तुम्हाला परवडणार नाही,  सावंत  . " मी म्हणालो .
" सांग तरी .... परवडेल की नाही ते नंतर बघू ..."

" तुम्ही त्यांना तुमच्या घरी घेऊन जा ... "  मी हे सुचवल्यावर शॉक लागल्यासारखे ते माझ्याकडे पहात राहिले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा