लोकल मधे दररोज लाखो लोक प्रवास करतात . प्रत्येकाची कसली ना कसली कहाणी असेल . कुणाची कहाणी सुरु व्हायची असेल तर कुणाची सुरु असेल....त्यात एक गोष्ट मात्र नक्की की लाखो लोकांच्या कहाण्यांमधून एक कहाणी कमी झाली होती , ती म्हणजे माझी ... ! कालपासूनच एक प्रकारची उदासीनता आली होती . एखाद्या क्रिकेटप्रेमीला भारताची मॅच हरल्यावर येते तशी ..! लोकलच्या प्रवासाचा इंटरेस्टच गेल्यासारखा वाटत होता . तसा माझा काही प्रेमभंग वगैरे झालेला नव्हता , पण मनाला एक प्रकारची मरगळ आली होती. कालची अँटी व्हायरसबरोबरची माझी भेट मला आकाशात सुर्रर्रकन जाऊन फुटणाऱ्या दिवाळीतल्या रॉकेट सारखी वाटली ... केवळ क्षणिक आनंद देणारी ...! त्यानंतर त्या रॉकेटसारखा मी कुठे जाऊन पडलो ते माझं मला सुद्धा कळलं नाही... मी तसाच पाय ओढत स्टेशनच्या दिशेने चाललो होतो . इतक्यात एक रिक्षा जवळजवळ मला घासुन गेली ... माझं असं टाळकं सटकलं... !!!
" अरे ए ... भो ××× डोळे फुटले काय ? " हाताला जिथं रिक्षाचा धक्का लागला तिथं कितिसं खरचटलंय ते बघत मी त्या रिक्षावाल्याला शिव्या दिल्या . पण तो तसाच सुसाट निघुन गेला . आपल्यामुळे कुणाला दुखापत झाली असेल हे तर त्याच्या गावीही नव्हते . आयला , दिवसच खराब आहे आजचा ... !! माझा दिवस आणखी खराब जाणार होता ... स्टेशनच्या जवळ पोहोचलो आणि जिथे रिक्षा येऊन थांबतात तिथे लांबुन पहिलं तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना , शरद आणि अँटी व्हायरस दोघे एका रिक्षातून उतरत होते . मला आश्चर्यचा धक्काच बसला . रिक्षातून उतरून ते दोघे एकमेकांशी थोडे हसून बोलले आणि निघुन गेले . शरद आणि अँटी व्हायरस एकत्र ? हे कसं शक्य आहे ? शरद इतके दिवस जे दुःखी होता ते तिच्यामुळे ? काल अँटी व्हायरस सांगत होती की ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोनवर बोलत होती ... म्हणजे तिचा होणारा नवरा शरद आहे ? ओह माय गॉड .....!!! म्हणजे मला इतके दिवस आवडणारी मुलगी माझ्या जीवलग मित्राची होणारी बायको होती...? माझ्या डोक्यात एकदमच विचारांचं चक्रीवादळ उठलं.... त्याच बरोबर जोरात काहीतरी वाजल्याचा आवाज झाला... " अबे देख के चल ना बाबा ..." कारचा मालक माझ्यावर खेकसत हॉर्न वाजवत होता . माझ्या लक्षात आलं , मी विचारांच्या नादात रस्त्याच्या मधोमध उभा होतो . " सॉरी ... सॉरी.... " म्हणत मी रस्त्यातून बाजूला झालो . कसेबसे मी रेल्वेच्या ब्रिज चढुन वर गेलो. दोन नंबर प्लॅटफॉर्मला आमची नेहमीची ८ : २४ लागलेली होती. मला आता त्या आमच्या नेहमीच्या डब्यात जायचा धीर होईना . तिथे शरद असेल , बाजूला अँटी व्हायरस असेल ... मी शरदच्या नजरेला नजर कसा भिडवु ... ? शरदला हे आमचं कालचं भेटणं समजलं तर .... तर काय होईल ...? " दोस्त दोस्त ना रहा ....प्यार प्यार ना रहा .... " शरद हे गाणं माझ्यासाठी म्हणत असल्याचं मला दिसू लागलं .... कदाचित आमचं जोराचं भांडण होईल ... कदाचित शरद माझ्याशी बोलणंच सोडून देईल ... कदाचित तो आमच्या नेहमीचा डबाही सोडून देईल... ही गोष्ट आमच्या ग्रुपला समजेल आणि सगळेच माझ्याशी बोलणं सोडून देतील. मला वाळीत टाकतील... गद्दारचा शिक्का मारतील . माझ्या हातून महान पातक घडल्यासारखं मला वाटायला लागलं . इतक्या सगळया विचारांनी डोक्यात थैमान घातल्यामुळे माझं डोकं भणभणु लागलं. माझ्या अंगातली शक्तिच नाहीशी झाल्यासारखी मला वाटली. कसातरी मी माझ्या डब्यापर्यंत पोहोचलो . पण आत जायचं धाडस होईना .
" काय रे मध्या ..., आज डोअरलाच उभा राहणार आहेस काय ? " डोअरवरच्या रवीने माझी तंद्री मोडली .
" नाही रे .... जातोय ना आत ... "
"तब्येत बरी आहे ना भाई तुझी ... ? असा का दिसतोयस... " त्याने काळजीने विचारलं . मी नुसतं हूं करुन आत शिरलो . आत गेल्यावर भरत आणि सावंतांनी ' अरे मध्या आला ...मध्या आला ' म्हणत माझं स्वागत केलं . मला शरदकडे बघायचं धाडस होईना . मी माझी बॅग वरच्या रॅकवर ठेवली आणि शांतपणे दोन सीट्सच्या मधे जाऊन उभा राहिलो . पलीकडे अँटी व्हायरसकडेही बघायचा धीर मला काही झाला नाही .
" अरे मधु काय झालंय ...? एकदम शांत शांत ... " भडकमकर मला विचारु लागले .
" काही नाही ओ ... जरा बरं वाटत नाही ... " मी म्हणालो.
" अरे बरं वाटत नाही तर उभा कशाला आहेस ...? बस ... " म्हणत शरद उठला आणि त्याने त्याची बसायची जागा मला दिली .
" अरे नको ... मी बरा आहे ... जास्त काही नाही.... " मी त्याच्या नजरेला नजर न देताच म्हणालो . अपराधीपणाची भावना मला बोचत होती . तरी त्याने माझ्या हाताला धरून बळेच मला त्याच्या जागेवर बसवलं , आणि तो माझ्या जागेवर उभा राहिला . मी खरंच नकळत शरदची जागा घेतली होती . शरद आज पहिल्यासारखा सर्वांशी बोलत होता . मस्करी करत होता . तो नार्मल झाला होता . मंडळींच्या गप्पा रंगल्या होत्या . मी शांतपणे मान खाली घालून त्या ऐकत होतो . बोलता बोलता सावंतांनीच विषय काढला .
" भरत , तुझा भाऊ आज नार्मलला आलाय ... प्रॉब्लेम संपला वाटतं ... ? " त्यावर सगळे जण शरदकडे भुवया उंचावून पाहू लागले .
" काय ... असे काय बघताय माझ्याकडे ... ? काही झालं नव्हतं मला ... " शरद सरवासारव करत म्हणाला .
" आणि मधे तुझा देवदास झाला होता ते ? " भरत उलट तपासणी घेऊ लागला .
" त्याचं ...? त्याचं काही नाही...वो सब मैंने भुला दिया । आता मी कसलाच विचार करत नाही... जाने दो , गोली मारो उसको ..."
" जाने दो ... अच्छा हुआ ... अबी तो कुच टेंशन नय है ना ? तो क्या हुआ ता वो तो बताव..." नायर अंकल त्याला तसे सोडणार नव्हते .
" कुछ नहीं अंकल ..."
" अरे सांग ना आता ... इतका भाव नको खाऊ ...." भरत म्हणाला .
" मेरी एक फ्रेंड थी ... उसको मैंने प्रपोज़ किया था ..." शरदने सांगून टाकलं .
" और वो ना बोली... यही ना … " शरदच वाक्य नायर अंकलनी पूर्ण केलं...
" येस , मध्या बघ मी काय बोललो होतो तुला ... नक्कीच पोरीचा मॅटर असणार ..." सावंत माझ्या मांडीवर थाप ठोकत म्हणाले ... त्यावर मी काय बोलणार ? मला तर ते थोड्या वेळापूर्वीच समजलं होतं. मी नुसतं हूं करुन त्यांना प्रतिसाद दिला .
" कौन थी वो लड़की ? " नायर अंकल पोलिस नाहीतर डिटेक्टिव हवे होते . आता उगाचच विषय वाढवत होते . खरं सांगायचं तर त्यात ते वेगळं असं काही विचारत नव्हते . तो तर खरा सगळ्यांच्या आवडीचा विषय होता . पण मला ह्या चर्चेत रस वाटेना . ह्या सगळ्यात आज ना उद्या माझाही कुठेतरी संबंध येणार होता , जे मला नको होतं .
" अपने ही लोकल में आती है ...। लेकिन छोड़ दो ना अंकल ... वो किस्सा अब ख़तम हुआ है ...।" शरदला त्या आठवणी पुन्हा उगाळाव्याशा वाटत नव्हत्या. मला जास्तच अस्वस्थ वाटायला लागलं .
" तुमने क्या बोला ता उसको. ? और वो क्या बोली ? "
" मैं उसको बोला की , तू मला खुप आवड़तेस ... तर ती म्हणाली आपलं पुढे काही होऊ शकत नाही. "
" पुढे काही होउ शकत नाही म्हणजे ? " भरतने विचारलं .
" म्हणजे ती आमच्याबद्दल घरी सांगू शकत नाही. "
" का ? " सावंतांनी विचारलं .
" कारण ती धर्माने ख्रिश्चन आहे आणि मी हिन्दू ....! " शरद असं म्हणाला आणि मी एकदम चमकलोच . शरदचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती ख्रिश्चन आहे ? म्हणजे अँटी व्हायरस ख्रिश्चन आहे ? हे कसं शक्य आहे ? काल मी तिच्या गळ्यात सोन्याच्या चेनसोबत गणपतीचं लॉकेट बघितलं होतं ... आणि शरद तर म्हणतोय की ती ख्रिश्चन आहे म्हणून ... ? नक्कीच काहीतरी घोळ झालाय ...
" कशा… वरून ती मुलगी ख्रिश्चन आहे… ? " मी अडखळत त्याला विचारलं .
" कशावरून म्हणजे ? अरे मी तिला बऱ्याच दिवसांपासून ओळखतो ... बऱ्याच वेळा रविवारी मी तिला चर्चच्या बाहेर भेटायचो..." शरदने स्पष्टीकरण दिलं . मला काहीच कळेना . काल तिच्या गळ्यात मी चुकून क्रॉसच्या ऐवजी गणपती बघितला की काय ... ? मला आता गरगरल्यासारखं वाटू लागलं ... माझी स्मरणशक्ति मला धोका तर देत नाही ना ...? पण आता त्याला विचारूनच टाकू म्हणून मी टेंशनमधे त्याला विचारलं ., " तू आत्ता जिच्याबरोबर रिक्षातून आलास तीच का ती मुलगी ...?
" कोण ? मी कुणाबरोबर रिक्षातून आलो ? " त्याला काही न समजल्यासारखं तो विचारु लागला .
" अरे आता येताना रे ... तू एका मुलीबरोबर रिक्षातून उतरलास ना , आणि तुम्ही काहीतरी बोलत पण होतात ..."
" ओह... ती ...? ती नाही रे ... " त्याने पाल झटकल्यासारखं उत्तर दिलं .
" काय ? ती … , ती मुलगी नाही ...? " हमखास नापास होणाऱ्या मुलाला तो पास झाल्याची बातमी मिळाल्यावर जसा होईल तसा माझ्या चेहरा झाला .
" नाही रे बाबा ... तिचा काही संबंध नाही . ती आपल्या पलिकडच्या कंपार्टमेंटमधे असते . आम्ही असंच चेहऱ्याने ओळखतो एकमेकांना ... पण एक सेकंद... एक सेकंद.... तू का एवढा खुश झालास रे ? " शरद माझ्यावरच घसरला .
" अरे ते सोड ... पण नाव काय तुझ्या त्या मुलीचं ... ? " सावंतांनी मधेच प्रश्न विचारुन मला त्याच्या तावडीतून वाचवलं ... मी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले . मला आता खुप बरं वाटत होतं . पाऊस पडून गेल्यावर आभाळ जसं स्वच्छ होतं ना , अगदी तसं ...! ऍटलिस्ट आता मित्राला फसवल्याचा गिल्ट तरी राहणार नव्हता.
" मॅगी .... मॅगी नाव आहे तिचं ...! "
" तिच्या घरच्यांचा विरोध आहे का ? "
" त्यांचं माहित नाही . तसे ते चांगले आहेत , पण ती तिच्या घरच्यांचा फार विचार करते . त्यांना वाईट वाटेल असं ती काही करणार नाही . "
" ह्म्म्म... म्हणजे मुलगी समजूतदार आहे ...." सावंत तर्क लढवत म्हणाले .
" पण जाउद्या हो सावंत ... झालं गेलं गंगेला मिळालं ..."
" गंगेला नाही उल्हास नदीला मिळालं ... आपल्याला तीच जवळ आहे ना ... अरे काय रे तू ...? असा लगेच हार मानतोस ? बी अ मॅन !!! आपण करु काहीतरी . फक्त तू हिंमत सोडु नकोस .." सावंत त्याला धीर देत म्हणाले . त्यानेही होकरार्थी मान हलवली पण त्यात निश्चय असा नव्हता. उगाच सावंतांना बरं वाटावं म्हणून तो हो म्हणाला .
" शरद टेंशन नय लेनेका ... हम लोग है ना ... तुम लडो , हम कपडे संभालते है । " नायर अंकल मजेत म्हणाले . मग सगळ्या ग्रुपचा एकदम मूड बदलला ... सगळे शरदला त्यांच्या ठेवणीतल्या नवनविन टिप्स द्यायला लागले . सगळे आपापल्या परीने त्याचे लवगुरु झाले होते .
" शरद भाय मेरे पास एक सुपब आयडिया है... बोलू क्या ..? " इतका वेळ शांत बसलेला जिग्नेस मधेच म्हणाला .
" बोल बाबा बोल ... सगळे बोलतायत ... तू तरी मागे का राहतोस ... बोल "
" वो क्या है ना शरदभाय, तुम ना ट्रेन के नीचे जान देनेकी धमकी देदो मॅगी भाभी को ... ! वो डर के तुरंत हां बोल देगी । कैसी है आयडिया ? " म्हणत त्याने टाळीसाठी हात पुढे केला .
" ए च्यायला , पागल बीगल हो गया क्या तू ? दिमाग ठीक है ना तेरा ...? " शरद त्याच्यावर खेकसला .
" क्यूँ ..? क्या हुआ ? अरे ये तो सबसे बेस्ट आयडिया है ... क्या बोलते है सावंत सर ...? " सावंत त्याच्याकडे बारकाईने पाहू लागले . आणि थोडा वेळ विचार करुन म्हणाले , " जिग्नेस , आज सुभे क्या खाया था ? एकदम खत्रुड आयडिया है यार ... ओके डन ! प्यार के लिए शरद अपनी जान दे देगा ... "
" ओ सावंत तुम्हीपण ? कुठे त्या येड्याच्या नादाला लागताय ? " शरद बेफिकिरीने म्हणाला .
" नाही ... आता ठरलं म्हणजे ठरलं .... प्रेमासाठी शरद आपल्या प्राणांची आहुती देणार ..." सगळा ग्रुप सावंतांकडे आ वासुन पहात राहिला . आता एक वेगळीच कहाणी सुरु होणार होती .…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा