रविवार, ४ डिसेंबर, २०११

लोकल डायरी - २


दिनांक - २ डिसेंबर 

              आज एक विचित्र गोष्ट घडली....  आज भडकमकर आले नाहीत....  त्यामुळे त्यांची जागा सावंतांनी पटकावली.... विंडो ...! मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो... समोर नेबरिंग कंट्री ... मग काय टाईमपासच.....!  कधी नव्हे ते सावंतपण निरीक्षणात दंग असलेले दिसले.... नायर अंकल  पेपर वाचत बसले होते  .... थोड्या वेळाने  गाडीत एक मध्यम वयाच्या बाई चढल्या , आमच्या बाजूला त्यांनी एक कटाक्ष टाकला ..... आणि एक मंद स्मित केल्याचे मला जाणवले.... त्यांनी  कुणाकडे बघून स्माईल केलं असावं म्हणून मी सहज इकडे तिकडे पाहिलं ... तर सावंत पलीकडे त्या बाईंकडे बघून समजुतीने हसलेले मला दिसले .... हि काय भानगड...??? शरद- भरत , मी , जिग्नेश , मूड मध्ये असले तर भडकमकर आणि नायर अंकल सगळेच नेबरिंग कंट्री बाबत काही न काही नेहमीच बोलत असतो... पण सावंत त्या बाबतीत काहीच बोलत नसत .... त्यांची नेहमीची बसायची जागाही लेडीज कम्पार्टमेंटला पाठ करून असायची .... पण आज सगळंच उलट घडत होतं... थोडा वेळ गेल्यानंतर मी सहज त्यांना हळू आवाजात त्या मघाच्या  बाईंबद्दल  विचारलं ... तर ते माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले ... ' ह्याला कसं कळलं....' असे भाव त्यांच्या  चेहऱ्यावर दाटले होते बहुतेक.... नंतर ते नुसते हसले पण उत्तर देण्याचं मात्र  टाळलं .... मला म्हणाले , ' नंतर सांगीन...ह्या सगळ्या प्रजेच्या समोर नको...' आणि बाहेर बघायला लागले... नक्कीच काहीतरी खास असणार...
             जीग्नेस ने त्याच्या हनिमूनचे फोटो मोबाईल मध्ये आणले  होते ....  शरद-भरत ते बघत बसले .... मधेच कसल्याही कमेंट करत होते..., -' अरे ये फोटो में सो गया क्या तू..?? '
- ' ये किधर देख राहा है  बे .....?? ' प्रत्येक फोटो मध्ये काहीतरी शोधून त्याला पकवत बसले होते...
-' अरे वो फोटू निकलनेवाला  था  ने  वो रेडी बोलनेसे पेहेलेही क्लिक कर देता था...साला ' तोही न कंटाळता त्यांना उत्तरं देत होता... नायर अंकलही  त्यांच्यात सामील झाले .... जीग्नेसने बायको बरोबर एका छोट्याश्या होडीच्या टोकाशी उभं राहून  टायटानिक स्टाईलची आडवे  हात पसरून  दिलेली पोज  बघून तर सगळेच हसायला लागले.... नायर अंकल  शरद- भरतला म्हणाले कि , ' ज्यादा हंसो मत, तुम्हारा भी टाईम आयेगा....'   जीग्नेस खुशीत होता ... आणि थोडा लाजल्यासारखाही करत होता ....
              मी मधेच सहज सावंतांकडे पाहिलं तर ते मधून मधून पलीकडे  पाहत  होते  ... नेहमी स्थितप्रज्ञासारखे वाटणारे  त्यांचे डोळे मात्र आज मला शाळेतल्या मुलाच्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांसारखे भासले ... कोण असाव्यात त्या बाई ...??  त्या सावंतांच्या वयाच्या वाटत होत्या ....जवळपास ४५- ५० च्या ....  आणि  ज्याप्रमाणे त्या दोघांनी एकमेकांकडे समजुतीने बघितलं  त्यावरून तर त्यांची एकमेकांची जुनी ओळख असली  पाहिजे... असा विचार कम शंका मनाला चाटून गेली.... कुर्ल्याला शरद- भरत उतरले , दादरला नायर अंकल.... मग मी सावंतांचा ताबा घेतला... खूप सांगा - सांगा म्हणल्यानंतर ते एकदाचे तयार झाले .... त्यांनी सांगायला सुरुवात केली...' ती बाई आहे ना,  ती आणि मी शाळेपासून एकत्र होतो .... मला ती शाळेत असल्यापासून आवडायची ...'
-' काय सांगताय काय सावंत ...?? ' मला खरोखरच आश्चर्य वाटत होतं .....
- ' हो.... पण नंतर शाळा संपली.... आमच्या दोघांच्या वाटाही  वेगळ्या झाल्या .... ती हुशार होती त्यामुळे तिला चांगल्या कॉलेजला admission मिळाली . मला मात्र मुंबई सोडावी लागली.... त्यानंतर माझा आणि तिचा संपर्क असा जास्त काही राहिला नाही.... पण तरीही ती मला आवडत होती.... मी सुट्टीत कधी घरी आलो कि ती कधीतरी दिसायची...  शेवटी मी ठरवलं , कि तिला प्रपोज मारूनच  टाकू.....' सावंत रंगात आले होते .
- ' आयला .... मग...?? '
- ' मग काय , एके दिवशी मी सुट्टीवर घरी आलेलो असताना मला ती दिसली... मी तिच्या मागोमाग गेलो.... आणि तिला प्रपोज केलं.... '
- ' काय म्हणालात तुम्ही तिला.... ओह सॉरी त्यांना...?? ' मला तर गुदगुल्या झाल्यासारख्या वाटत होत्या .
- ' काही नाही,  सरळ म्हणालो... मला तू खूप आवडतेस...  झालं....' सावंत सहजच म्हणाले.
- ' मग.. काय म्हणाल्या त्या  ?? ' त्या बाईचं उत्तर ऐकण्यासाठी इथे माझे कान आतुर झाले होते...
- ' ती म्हणाली , बाप रे..! हो का ... पण माझी सेमिस्टर एक्झाम  आहे .... म्हणाली आणि निघून गेली '  सावंत गमतीदार चेहरा करून म्हणाले...
- ' काय...?? त्या असं म्हणाल्या ...?? ' मला तर काय बोलावं तेच कळत नव्हतं...
- ' हो... मग मी पण कोलेजला निघून गेलो... आणि नंतर पुन्हा काही तिला विचारलं नाही....'
- ' अरे देवा.... पण का नाही विचारलं परत...?? ' मला कळेना ते असं का वागले...
- ' काय सांगावं , परत  तिची कोणती तरी  परीक्षा यायची मध्ये ... नंतर कळलं कि तिचं लग्न पण झालं ... मग तर  प्रश्नच मिटला...'  सावंत गमतीने  हसत म्हणाले....पण मला कसतरीच वाटलं.... खूप कमी लोक असतात ज्यांना त्यांचं पाहिलं प्रेम मिळतं....आणि ते शेवटपर्यंत टिकतं ... तसा माणूस वारंवार प्रेमात पडतच असतो , पण त्याला पहिल्या प्रेमाची सर नसते.....ग्रीष्मानंतर जसा पहिला पाउस तसं पाहिलं प्रेम .... बेभान बरसणारं .... भावनांचा वर्षाव करणारं....रखरखीत आयुष्यात चैतन्याची पालवी फुलवणारं ....आणि मनाला नवी उभारी देणारं.....    इतकी वर्ष सरूनही सावंतांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही त्या समोरच्या बाईंबद्दल कुठेतरी जागा होती , हे त्यांच्या डोळ्यांवरूनच कळत होतं.....    बोलता बोलता माझा stop  - भायखळा कधी गेलं मला कळलंच नाही ... बाहेर बघितलं तर सी .एस. टी. स्टेशनात गाडी शिरत होती....


शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

सायको

                     
                           होस्टेलच्या आमच्या  रूमवर अभय आला तेव्हा प्रथम तर मी त्याला ओळखलाच नाही ... त्याचा डावा डोळा काळानिळा पडला होता , उजवा गाल लाल झाला होता . केस विस्कटलेले , उजव्या बाजूचा शर्ट मळलेला .....
-- " काय रे ..? हे काय...??" मी  त्याला काळजीने   विचारलं  तर  तो  सांगायला  तयारच  होईना .... त्याच्या निळसर डोळ्यातून पाणी आल्यासारखं वाटलं मला....
-- " अरे काय झालं ते तर सांगशील..... "  दिप्या ,  माझा रुमपार्टनर त्याला  म्हणाला . मी दिप्याला डोळ्यांनीच शांत राहा असं खुणावलं आणि  अभयला पाणी प्यायला दिलं.
-- " रणपिसे सरांनी मारलं ... मी लेक्चरमध्ये खिडकीतून बाहेर बघत होतो म्हणून...." अभयने खुलासा केला....
-- " काय ...?  रणपिसेने  मारलं.....?? साला हरामखोर ..... बघू कुठे लागलंय....? आईशप्पथ ...!! " म्हणत  दिप्या  त्याचा डोळा निरखू लागला....
-- " च्यायला त्या रणपिसेच्या ....थोडक्यात वाचला , नाहीतर  डोळा  गेला असता कि रे  ह्याचा ....! " मलाही राग आला  होता.
-- " हे आता अति झालं सालं.... ह्या रणपिसेचं काहीतरी केलंच पाहिजे...."  दिप्या निर्धाराने बोलला...
-- " काय करणार रे त्या  राक्षसाचं...?? " मला  तर काहीच सुचत नव्हतं....
-- " आता एकच उपाय ......--   वध......"


              दिप्याचं हे अशा प्रकारचं उत्तर येण्यामागे त्यासंबंधीची पार्श्वभूमीही होती .
रणपिसे  सर वर्गात आले कि सगळा वर्ग एकदम चिडीचूप ...! इतका शांत कि टाचणी पडली तरी आवाज येईल... त्यांचा दरारा होताच तसा ....दररोज कुणाला न कुणाला धोपटल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नसे . हा माणूस मुलगा , मुलगी काही बघत नसे .... मागे एकदा त्यांनी  एका मुलीच्या कानफटात मारली . तिच्या कानाला बरीच मोठी इजा झाली ...... त्यानंतर तिच्या पालकांनी कॉलेज प्रशासनाकडे  तक्रार केली पण रणपिसेला फक्त ताकीद देऊन सोडण्यात आलं.... का कुणास ठाऊक ...??   विद्यार्थ्यांबद्दलच  त्यांना राग होता असे नाही तर इतर शिक्षकांशीही ते तुसडेपणाने वागत .  रणपिसे हा इतका भयानक माणूस होता कि तो नुसता दिसला तरी लोकांचा दिवस खराब जायचा. एक प्रकारच्या प्रतिकूल लहरी त्या माणसापासून निघत असाव्यात , त्यामुळे हा माणूस दिसू नये अशीच सगळे जण प्रार्थना करत..... रणपिसे सरांबाबत एक आख्यायिका सबंध कॉलेजभर प्रसिद्ध होती , ती म्हणजे  काही  वर्षापूर्वी  कॉलेजच्या एका मुलाचं आणि रणपिसे सरांच्या बहिणीचं प्रेम प्रकरण होतं. हे जेव्हा त्यांना कळल तेव्हा त्यांनी त्या मुलाला ताकीद दिली , पण त्या मुलाने  काही ऐकलं नाही . त्यानंतर एका रात्री तो होस्टेल बाहेर पडला तो पुन्हा आलाच नाही. असं  म्हणतात  कि रणपिसेने त्याला मारलं आणि त्याचं प्रेत कॉलेजच्या ग्राउंड मध्ये पुरलं , खरं काय आणि  खोटं काय,  देवालाच ठाऊक ...!
                  पण   हे इतकं जरी खरं असलं तरी रणपिसेचा  वध वगैरे करण्याचा   दिप्याचा  विचार  मला जरा अतिरंजीतच वाटला  ... कदाचित  दिप्यानेही  कधीतरी त्याच्या हातून मार खाल्ला असणार..... पण काहीही झाल  तरी आम्ही सामान्य विद्यार्थी होतो , कोणी खुनी, सीरिअल  किलर वगैरे नव्हतो... आम्ही करून करून    काय करणार......??
-- "  दिप्या हे तुझं जरा जास्तच  होतंय बरं का....." मी त्याला म्हणालो....
-- " जास्त माझं नाही.... त्या नराधमाचं झालंय .... आता त्याला बघतोच मी....."  दिप्या  इरेलाच पेटला होता.... तो वर चढून  कपाटावर काहीतरी शोधू लागला....त्याच्याशी आत्ताच  बोलून काही फायदा नाही असं मला वाटलं... मी अभयला त्याच्या रूम वर जाऊन आराम करायला सांगितलं. तो निमुटपणे निघून गेला. बिचारा अभय ...! कॉलेजमधला ज्युनियरच्या वर्गातला सगळ्यात गोंडस  मुलगा... गोरा वर्ण , तांबूस केस , निळसर डोळे ह्यांमुळे तो कोणीतरी युरोपियनच वाटायचा ... आणि ते काही अंशी खरंही होतं... एकदा बोलता बोलता त्याने सांगितलं  कि त्याच्या आजोबांनी एक युरोपियन बाईशी लग्न केलं होतं ... त्यांचेच काही जीन्स अभय मधेही उतरलेले दिसत होते.  सुरुवातीला कॉलेज मध्ये आल्या आल्या तर मुलांऐवजी सिनियर मुलींनीच त्याची रागिंग घेतली होती.  काही जणींनी तर खोटं  खोटं त्याला प्रपोजही केलं .....तो इतका लाजला कि त्यानंतर तो २-३ दिवस कॉलेजलाच  आला नाही .... अशा शांत , पापभिरू  मुलाला त्या राक्षस रणपिसेने क्षुल्लक कारणावरून गुरासारखं मारलं होतं , साहजिक  कुणालाही राग येईलच....
-- '' माधव , हे बघ ..."  दिप्याच्या बोलण्याने माझी विचार साखळी तुटली ... तो एक पुस्तक  दाखवत होता....
-- " हं..... काय आहे हे ...? कसलं पुस्तक....?? " मला काही कळेना....त्याने ते पुस्तक  माझ्या हातात दिलं , नाव होतं ,  ' द परफेक्ट मर्डर '
-- " हि गोष्ट फक्त आपल्या दोघातच ठेवायची ....आता बघ मी काय करतो ते ..... रणपिसे, तू तर गेलासाच  आता...!! "  दिप्याच्या  डोळ्यात आता वेगळीच चमक आली होती.....  सायको लोकांच्या डोळ्यात असते तशी .....
-- "  दिप्या  तुझं डोकं फिरलंय वाटतं...."
-- " अरे हट्ट.... ह्या कॉलेजला लागलेलं हे रणपिसे नावाचं  ग्रहण आता  मीच सोडवणार..." ते पुस्तक घेऊन  दिप्या कुठेतरी  जायला निघाला .... मी त्याला काही बोलणार त्याच्या आधीच तो बाहेर गेलाही ....
                    दुसऱ्या दिवशी सकाळी  जोरजोरात  धडधड वाजणाऱ्या दरवाज्यामुळे मी जागा झालो... मी वैतागून दरवाजा उघडला तर बाहेर शेजारच्या रूम मधला संजू उभा होता...
-- " अरे तुला कळलं का त्या रणपिसेचं काय झालं ते....?? " तो घाईघाईत बोलत होता .
-- " का  ?? काय झालं...?? " माझ्या डोळ्यांवर अजूनही झोप होती.
-- " अरे काल रात्री मेला तो ....!!  "
-- " काय....??? " माझ्या डोळ्यावरची झोप झटक्यात उडाली .... साहजिकच नजर दिप्याच्या बेड कडे गेली .  दिप्या तिथे नव्हताच...." आईशप्पथ ...!!  काही पण काय बोलतो.... तो कसा मरेल...?? तुला कोणी सांगितलं...?? " माझा तर विश्वासच  बसेना...
-- " अरे खरंच.... काल रात्रीच त्याचा accident  झाला , त्यातच तो गेला .... आजच्या पेपर मध्ये पण आलीय बातमी ....बरं झालं साला गेला ते... कॉलेजची ब्याद गेली ..... " संजू हे सांगून निघून गेला . मी कसातरी माझ्या बेडपर्यंत  आलो .  कालचं   दिप्याचं तावातावाने बोलणं.... , ते त्याच्या  जवळचं    ' द परफेक्ट मर्डर '  पुस्तक .....,   आजची  रणपिसेच्या मृत्यूची बातमी..... , आणि आता  दिप्याचं गायब होणं .... ह्यातून एकच निष्कर्ष निघत होता ....  दिप्या  इतका सायको असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.... माझं डोकं काम करेनासं झालं ....  दिप्या कुठे गेला असेल....?? इतका कसा हा मूर्ख माणूस.....?? बराच वेळ झाला तरी   दिप्या  आला नाही.... काय करावं ते मला कळेना..... रूम मध्ये तर बसवत नव्हतं... मी अभयच्या रूम मध्ये गेलो ... काल  दिप्या वधा- बिधाच्या गोष्टी करत होता तेव्हा अभय आमच्या रूम मध्ये होता ... त्याला कदाचित काही  माहित असेल .... आणि असंही त्याच्यामुळेच  हे प्रकरण उद्भवलं होतं...
 -- " अरे तुला कळलं का त्या रणपिसेचं काय झालं ते....?? " मी अभयच्या  रूम मध्ये शिरता शिरता  घाईघाईत त्याला  विचारलं. तो शांतपणे पेपरमधली तीच बातमी  वाचत बसला होता. त्याने तो पेपर मला दाखवला ... मी ती बातमी वाचली , कोणत्या तरी अवजड वाहनाखाली येऊन त्यांचा  मृत्यू झाल्याचं  लिहिलं होतं... त्यांचा  फोटोही होता... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणपिसे सरांचा क्रूर चेहरा मेल्यानंतर तर आणखीनच भयानक दिसत होता ....
-- " अरे  दिप्याला पाहिलास का तू कुठे...?? काल रात्रीपासून तो रूम वर आला नाही.... आणि काल बघितलस ना  कसा बोलत होता ते .....?? " मला काय बोलावं ते सुचत नव्हतं....
-- " माधव सर, लहानपणी शाळेत असताना एका मुलाचं आणि माझं भांडण झालं होतं...माझी काही चूक नसताना त्याने मला मारलं.....नंतर  मी त्याला सांगितलं कि माझी माफी माग.... तर तो माझ्यावर हसायला लागला ...." अभय शांत आवाजात बोलत होता...
-- " अभय ,  हे तू काय बोलतोयस....?? " मला कळेना तो  काय बडबडतोय ते ...
-- " तो माझ्यावर हसला म्हणून  मी त्याला आमच्या शाळेशेजारच्या  विहिरीत ढकलून दिलं .... " अभय एकटक पेपरमधल्या त्या  फोटोकडे बघत म्हणाला ...
-- " काय...?? " मला काय बोलाव ते कळेना ...
-- " काल रात्री मी रणपिसे सरांना भेटलो आणि  माझी माफी मागायला सांगितली ....  तर ते पण तसेच हसले...." मी अभयच्या डोळ्यात पाहिलं... त्याचे ते निळसर डोळे चमकल्यासारखे वाटले मला.... " त्यांनी तसं हसायला नको  होतं .... " अभय त्या पेपरमधल्या फोटोकडे खुनशी नजरेने बघत म्हणाला .... इतक्यात दरवाज्यातून कोणीतरी आत  धावत आलं .  " अरे तुम्हाला  कळलं का त्या रणपिसेचं काय झालं ते....?? "  दिप्या  धापा टाकत आम्हाला विचारात होता.....


सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

लोकल डायरी



दिनांक - २७ नोव्हेंबर 

   ' पॉ sssss  म '  .....   लोकलचा होर्न वाजला ... तसा मी  सकाळची ८:२६ ची गाडी  पकडण्यासाठी  धावलो  ... आज उशीरच झाला होता .... दरवाज्यावरच्या रवीच्या ग्रुप ने मला आत शिरायला लगेच जागा करून दिली ...
-- " अरे काय  मध्या ...??  काल रात्री जागरण झालं काय...??? " आत शिरता शिरताही  रवीने टोमणा मारायची संधी सोडली नाही . " हा भाई ... काय करणार.... ?? " मीही मजेत त्याला टाळी देत आत शिरलो ....
-- " ओ सावंत ..... आला बघा तुमचा पार्टनर...! " रवीने जोरात सावंतांना हाक मारून सांगितलं....
-- " आला का...?? अरे ये ये मित्रा ... मला वाटलं सुटली आता तुझी लोकल..."
-- " अशी कशी सुटेल मला घेतल्याविना ....?? " मी त्यांच्याशी हात मिळवत म्हणालो... " नायर अंकल कैसे है ?? "..... , " भडकमकर , विंडो काय सुटत नाय हा.... " , " शरद- भरत  , भाय लोग...." म्हणत मी सगळ्याशी हात मिळवले....त्यांनीही मला त्याच उत्साहात प्रतिसाद दिला ... हि वर नावं घेतलेली मंडळी म्हणजे आमचा लोकल मधला ग्रुप ....! आणखी एक जण  पुढच्या स्टेशन वर चढतो , तो जिग्नेश ... पण सगळे त्याला जीग्नेस म्हणतात ....असंच  मजेत ... ! आमची  नेहमीची बसायची जागा फिक्स ... तशी प्रत्येक ग्रुप ची असते ...   आमचा डबा व्हीडिओ कोच आहे , म्हणजे ह्या डब्याचा अर्धा भाग लेडीज आहे ...त्यामुळे ह्या डब्यात इतर डब्यांच्या मानाने जरा जास्तच गर्दी असते ....  बसायची जागाही अगदी लेडीज कम्पार्टमेंट ला खेटूनच ... अर्ध्या भागातून पलीकडच व्यवस्थित दिसतं.... त्यामुळे बऱ्याच सुंदर सुंदर चेहऱ्यांच सकाळी दर्शन होतं. दिवसही चांगला जातो...
-- " अरे , मधु हा घे ' बाबांचा प्रसाद ' ... तूच राहिला होतास... " भडकमकर काल परवाच  शिर्डीला जाऊन आले होते. बाबांवर त्यांची नितांत श्रद्धा .... पण  नावाप्रमाणे त्यांचा  स्वभाव जाम रागीट -  ' पेहेले लाथ फिर बात '.... तोंडावर सगळे त्यांना भडकमकर साहेब म्हणतात , आणि मागून भडकू.....!
-- " आज नेबरिंग कंट्री बहोत शांत शांत दिख राहा है "  नायर अंकल पलीकडच्या लेडीज कम्पार्टमेंटला  नेबरिंग कंट्री आणि मधल्या जाळीच्या डिविजनला बोर्डर म्हणतात....आम्हीही हल्ली बोलायचं झालं  तर ह्याच भाषेत बोलतो... पलीकडच्या भागातही नेहमीचेच चेहरे रोज दिसतात... शरद -भरत पलीकडे बघून कसलीही भाकितं करतात... ' आज अमकी अमकी खुश दिसतेय .... ' ते  ' आज तमकीने अंघोळ केलेली नाही '  इथपर्यंत ...!! हे दोघे सगळ्यात आधी येऊन जागा पकडतात .... आणि नंतर कर्णाचा अवतार घेऊन  इतरांना बसायला देतात ...आपण स्वतः  उभे राहतात , पलीकडे टेहळणी करण्यासाठी .... आज मी गाडी सुटता सुटता आलो होतो तरी मला बसायला व्यवस्थित जागा मिळाली ती त्यांच्यामुळेच.....!  शरद - भरत  हि दोन वेगवेगळी व्यक्तिमत्वे असली तरी त्यांची नावं जुळ्या मुलांसारखीच घेतली जातात... पण ते दोघे शारीरिक जुळे नसून वैचारिक जुळे आहेत ... ग्रुप मध्ये ते नेहमी दुसऱ्यांची खेचत असतात... एक सुरु झाला कि दुसऱ्यालाही लगेच चालना मिळते ...  असं असलं  तरी ग्रुप मध्ये शब्द चालतो तो सावंतांचा ..! ते आणि नायर अंकल आमच्या ग्रुपचे फाउंडर  मेंबर आहेत.... नायर अंकल रिटायरमेंट ला  आले आहेत , त्यांची फारतर १-२ वर्ष राहिली असतील... स्वभाव शांत .... पण मधेच अस काही बोलतात त्याला तोड नसते ...
        पुढच्या स्टेशनला चढणारा जिग्नेश धडपडत आत शिरला... " जीग्नेस आया.... जीग्नेस आया " शरद- भरत ओरडले.... " क्या जीग्नेस ... कल रात सोया नही क्या...?? "  सावंत पण त्याची फिरकी घेत म्हणाले.... त्यावर त्याने लाजून फक्त होकारार्थी मान हलवली.... आणि सगळ्यांनी शिट्या वाजवून आरडाओरडा  केला.....मी त्याला बसायला माझी जागा दिली... जिग्नेश  शांत स्वभावाचा आहे ... त्याला कितीही आणि काहीही बोला तो फक्त एक मंद स्मित करतो... शरद-भरत तर त्याची नेहमीच खेचत असतात.... त्यात त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे ....त्यामुळे त्या दोघांच्या हातात तर आता कोलीतच मिळालंय.... सावंत वाचायला  ३-४ पेपर आणतात . ते  सगळ्या डबाभर फिरून नंतर शेवटी त्यांच्याकडे येतात....
           गेले काही दिवस एक सुंदर चेहरा पलीकडे मला रोज दिसतोय ... गोरा वर्ण ...काळेभोर केस ...तलवारीसारख्या कोरीव भुवया .... हरिणीसारखे डोळे .... धनुष्याकृती ओठ ...आणि ओठांच्या वर डाव्या बाजूला लहानसा पण लक्ष वेधणारा तीळ.... कदाचित कुणाची  नजर लागू नये म्हणून देवाने आधीच तजवीज करून ठेवली असावी... हल्लीच्या टेकनिकल भाषेत सांगायचं म्हणजे लोकांच्या नजरेतून येणाऱ्या व्हायरस साठी  इफेक्टिव्ह  antivirus च जणू ..... तिचं नाव मला माहित नाही पण तिच्याकडे बघत राहायला आवडतं हे मात्र  नक्की..... लोकल ने दररोज गर्दीमध्ये धडपडत येण्याजाण्याचे मिळून ३ --  ३:३० बोरिंग तास आमच्या ग्रुपमुळे  सुसह्य  होतात... प्रवास मजेशीर होतो .... आणि मनोरंजनासाठी व्हीडिओ कोच आहेच ..... एकूणच आनंद आहे .....

   

माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

क्यूँ .....??


क्यूँ होता है ये मिलना- बिछड़ना
हसना और अश्कोंका बहना l
अंजान राहोंपर इत्तफ़ाक से ही सही ,
कोई हमराही मिल जाता है l
दो चार बातें होंती ,
और दोस्त बन जाता है l
मंजिल भलेही अलग हो ,
पर कुछ देर साथ चलना होता है l
अगले किसी मोड़पर न जाने क्यों
बनाबनाया साथ छुट जाता है l
तब यही ख़याल आता है ,
क्यों होता है ये मिलना- बिछड़ना
हसना और अश्कोंका बहना l