बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

सिझन २- लोकल डायरी ४

https://milindmahangade.blogspot.com/2019/10/blog-post_24.html  सिझन २ - लोकल डायरी १
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html  सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html  सिझन २ - लोकल डायरी ३

सिझन २ - लोकल डायरी ४ 
             अवंतीला मेसेज पाठवून मी चूक करून बसलो असं आधी मला वाटत होतं . पण नंतर शांतपणे विचार केला , आणि लक्षात आलं की हे कधी ना कधी तिच्या घरच्यांना कळणारच होतं ते आता कळालं . जाऊद्या जे होईल ते बघून घेऊ असा विचार करून मी सकाळी आठ वाजता स्टेशनला जायला निघालो . स्टेशनवर पोहोचलो तेव्हा भरत आलेला होता . तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या पाठीवर थाप मारली तसा तो एकदम दचकला आणि बाजूला जाऊन बोलू लागला . त्याच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव होते . थोड्या वेळात शरद सुद्धा आला . आमचे एक एक मेम्बर येत होते . तेवढ्यात गाडी येण्याची सूचना माईक वरून देण्यात आली . तसा शरद पुढे जायला निघाला त्याने फोनवर बोलत असलेल्या भरतला हटकले . त्यावर त्याने पुढे जा अशी खूण केली आणि फोनवर तावातावाने बोलू लागला . शरद काहीही न बोलता पुढे गेला . आम्ही गाडी पकडली पण आज शरद फक्त दोन जणांची जागा पकडू शकला . भरत त्याच्या मदतीला नव्हता आणि जिग्नेसही डाऊन करून आला नाही . नायर अंकल आज ट्रेनला नव्हते. अवंतीचाही मेसेज आला होता , ती आज येणार नव्हती , मला त्या गर्दीत असूनही एकटं वाटू लागलं . का कुणास ठाऊक शरद महाराज आज एकदम उदार झाले आणि त्यांनी पकडलेली खिडकी मला दिली. सावंत माझ्या बाजूला बसले. आज कधी नव्हे ते भडकमकर उभे राहिले . त्यांचीही जागा गेली . मी त्यांना माझी खिडकीची जागा देऊ लागलो तर त्यांनी बळेच मला खाली बसवलं. आणि आज त्यांचा उभं राहायचा मूड आहे असं सांगून टाकलं . खरं तर भरत आज जागा पकडण्यासाठी पुढे गेला नाही त्यामुळे भडकमकरांना उभं रहावं लागत होतं . आताही त्याचं काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं, कारण नेहमी दिलखुलास गप्पा मारणारा भरत आज शांत शांत होता . मी शरदकडे बघून ' भरतला काय झालंय ?' असं नजरेनेच विचारलं त्यानेही ' माहीत नाही ' असं खुणावलं .
मी बाहेर बघितलं तर पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर कर्जतला जाणारी ट्रेन नुकतीच आली होती आणि त्यातुन जिग्नेस बाहेर पडला . डाऊन करायला अंबरनाथ गाडी मिळाली नाही किंवा चुकली की त्या मागची गाडी पकडून बरेच जण डाऊन करून येतात तसा आज जिग्नेस आला होता . चालती गाडी सोडली आणि तो एक नंबर प्लॅटफॉर्मवरून धावत आमच्या गाडीच्या दिशेने येऊ लागला . त्याच्या कानाला मोबाईल लागलेला होता आणि तो कुणाशी तरी बोलत ,धावत आमच्या गाडीच्या दिशेने येऊ लागला . त्याचं बहुतेक लक्ष नव्हतं अचानक गाडीचा हॉर्न वाजला आणि तो धावत येत असताना दुसऱ्या दिशेने येत असलेल्या एका तरुणीवर धाडकन आदळला . तीही कुणाशी तरी फोन वर बोलत होती . त्या टकरीत दोघांचे मोबाईल हातातून पडले आणि तेव्हढ्यात गाडी हॉर्न देऊन निघालीही . जिग्नेसने गडबडीत खाली पडलेला मोबाईल उचलला , आणि धावती ट्रेन पकडली . ती तरुणीची लेडीज डब्याकडे पळाली. डोअरवरच्या रवीने त्याला आत चढायला लगेच जागा करून दिली आणि वर " जिग्नेसभाय , संभालके जरा ' असा टोमणाही मारला .
" क्या रे जिग्नेस , किधर देख के चलता है रे ? " आत आल्या आल्या सावंत चेष्टेने म्हणाले .
" अरे क्या यार , वो पागल लडकी बीच में आ गयी ना " तो वैतागून म्हणाला .
" लेकिन तूने जान बुझके धक्का मारा ना उस लडकी को ?" भडकमकर गमतीत म्हणाले .
" नै भडकमकरजी , मैं क्यू मारुंगा धक्का ? वो लडकी फोन पे बात करते करते मेरेसे टकराई "
" जाने दे , इतना भागा दौडी करके आया है तो बैठ जरा ", म्हणत मी त्याला माझी जागा दिली . गाडीने स्टेशन सोडलं आणि ती पुढे निघाली . इतक्यात जिग्नेसच ओरडला .
" अरे ये तो मेरा फोन नही है .... ओ पागल लडकी मेरेसे टकरा गयी ना उसिमें मेरा मोबाईल गिर गया ...। शीट , मेरा फोन गुम गया । " असं म्हणून तो डोक्याला हात लावून बसला .
" फिर ये फोन किसका है ? " सावंतांनी विचारलं .
" क्या मालूम , लेकींन मेरा नहीं है । पिछले हफ्तेही लिया था । " तो अजूनही डोकं धरून बसला होता .
" अरे , ये तेरा फोन नहीं तो उस लडकी का फोन होगा ना । " शरद म्हणाला .
" अरे हां यार । तो फिर मेरा फोन गया मतलब ! "
" अबे दिमाग से पैदल है क्या तू ? अब उसका फोन तेरे पास है तो तेरा फोन उसके पासही होगा ना ? " शरद वैतागला .
" जिग्नेस , तू पहिला फोन कर त्या मुलीला .... आणि सांग फोन एक्सचेंज झाले आहेत . पुढे कुठल्या तरी स्टेशनवर भेटा आणि आपापले फोन घ्या " मी उपाय सुचवला.
" लेकीन मुझे नहीं मालूम उस लडकी का फोन नंबर और ये फोनका स्क्रीन भी लॉक है । " जिग्नेस एकदम गोंधळून गेला होता .
" काय करावं ह्याचं ? तुझे तेरा फोन नंबर तो मालूम है ना ? उसपे लगा फोन । ये ले मेरे मोबाईल से लगा । " म्हणत मी माझा फोन त्याला दिला. त्यावर कठीण कोडं सुटल्यासारखा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .
" आईला , मधू यार तुम तो जिनियस हो " जिग्नेस हरखून म्हणाला .
" अबे इस्को कॉमन सेन्स बोलते है । जो तेरे पास कम है ।" शरद नेहमीसारखाच त्याची खेचत म्हणाला . जिग्नेसने माझ्या फोन वरून त्याच्या मोबाईलवर फोन लावला . पहिल्यांदा एकदम तावातावाने सुरुवात केली , पण हळूहळू त्याचा जोर कमी झाला , आणि शेवटी एकदम मऊ मांजर होऊन त्याने दादरला उतरून मोबाईलची आदला बदली करायचं मान्य केलं. मला एकदम गंमतच वाटली आणि त्याच्यावर हसूही येत होतं .
" तू दादर उतरेगा ? अबे , उस्को बोल सी एस एम टी तक आने को । " शरद उगाचच त्याला चढवून देऊ लागला . त्यावर सावंत आणि भडकमकरांनी पण री ओढली . त्यावर तो एकदम गोंधळात पडला . मलाच त्याची दया आली
" नै रे , दादर उतर और मोबाईल लेले .... " मी असं म्हणल्यावर शरद आणि सावंत त्याच्यावर हसू लागले . तेवढ्यात त्या फोन वर फोन आला . तो फोन घ्यावा की न घ्यावा ह्या संभ्रमात असतानाच कोणीतरी म्हणलं , " अरे उठा ना फोन " त्याने फोन घेतला तर पलीकडुन कोणीतरी मुलगी बोलू लागली . जिग्नेसच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव दिसू लागले.
" अरे मॅडम , पेहेले सून तो लो , ये फोन बदली हो गया है । और मेरा फोन आपकी फ्रेंड के पास गया है । " जिग्नेस अजून काहीतरी बोलणार तेवढ्यात पलीकडून ती मुलगी आणखी काहीतरी बोलू लागली . मधेच तिला थांबवत म्हणाला , " मॅडम , मेरेको गलत मत समझो । में उनको ये फोन लौटाने वाला हूँ । " त्याने फोन ठेवला आणि निश्वास सोडला .
" क्या हुआ रे ? " सावंतांनी विचारलं .
" ये फोन पे तो वो लडकीसे भी ज्यादा पागल लडकी थी । मेरेको बोल रही थी की बिना का मोबाईल वापस करो नहीं तो पुलीस में कंप्लेन्ट करुंगी ... "
" अरे तो तू बोलने का ना , की मई क्या चोर लगता हूँ क्या ? गलतीसे आया मोबाईल ... झापनेका ना उस्को " भडकमकर त्यांच्या स्पेशल हिंदीत म्हणाले .
" साला आजका दिन ही खराब है । जाने दो , ओ पागल लडकी को दादर उतरतेही उसका फोन लौटाता हूँ । जिग्नेस वैतागला . बाकीचे सगळे त्याला ' क्या यार डर गया क्या ? ' , टेन्शन मत ले , वगैरे सल्ले देत होते . बराच वेळ झाला भरत काहीच बोलत नव्हता . आज काहीतरी बिनसलं होतं एवढं मात्र नक्की ! मी शरद ला खूण केली .
" काय भरत भाय ! आज एकदम शांत शांत ? " त्याने भरतला विचारलंच . त्यावर त्याने काही नाही अशी मानेनेच खुण केली . याचा अर्थ नक्कीच काहीतरी भानगड आहे . इतका शांत मी त्याला आजपर्यंत बघितला नव्हता . शरद आणि भरत दोघे कुर्ल्याला उतरतात .
" उतरल्यावर त्याला विचार " असं मी शरदच्या कानात सांगितलं . दोघे उतरून गेले . ते गेल्यावर जिग्नेसची उतरायची घाई सुरू झाली .
" अरे जिग्नेस , बैठ आरामसे जा .... दादर मे सब उतरते है । " सावंत त्याला म्हणत होते पण त्याचा पाय काही ठरेना , सायन यायच्या आधीच तो बाहेर जायला उठला सुद्धा ! दादरला बऱ्यापैकी गाडी रिकामी झाली . जिग्नेस उतरून त्या मुलीला फोन करू लागला आणि वेंधळ्यासारखा इकडे तिकडे बघत राहिला . मी खिडकीतून पाहत होतो , इतक्यात एक मुलगी त्याच्या जवळ आली आणि मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. ही तीच मुलगी होती जिच्या कानाला नेहमीच मोबाईल चिकटलेला असायचा आणि त्याचवेळी मला आठवलं की जिच्याबद्दल प्रेमदूताने मला सांगितलं होतं की हिचं आणि जिग्नेसचं पुढे जुळणार आहे . मला तो सुखद धक्का होता . आता खरी गंमत येणार होती . आपल्याला काही गोष्टी आधीच माहीत असतील तर त्यातली मजा निघून जाते असं म्हणतात ,पण का कुणास ठाऊक मला एकदम भारी वाटत होतं .
" अरे , ही तर तीच आहे .... " मी बोलून गेलो .
" कोण ? तू ओळ्खतोस काय तिला ? " सावंतांनी विचारलंच .
" असंच चेहऱ्याने ओळखतो , ही तीच मुलगी आहे , जी सारखी मोबाईल वर बोलत असते . जसं काय मोबाईल हिच्या कानाला चिकटलेलाच आहे . "
" मग चूक तर तिचीच आहे .... आपला जिग्नेस उगाच वाईट वाटून घेतोय ... ही पोरगी तर भयानक आहे ... बघ कशी तावातावाने बोलतेय जिग्नेस शी ... " सावंत मला सांगू लागले.
" हो ना , आणि जिग्नेस तर काहीच बोलत नाही .... पण मला वाटतं त्याला आवडली आहे ती " मी सावधपणे म्हणालो . इतक्यात हॉर्न देऊन लोकल पुढे निघाली .
" छे ! जिग्नेसची तंतरलीय ... गप उभा आहे " सावंत बोलत होते ते काही अंशी खरं होतं .
" जिग्नेस .... चल बाय ... " मी ओरडून त्याला हाक दिली . त्यानेही प्रतिसाद दिला . मी विषय पुढे वाढवला नाही . कारण ह्या दोघांचं पुढे काय होणार हे इतर कुणालाच काय , त्यांनाही माहीत नव्हतं पण मला पक्कं माहीत होतं . फक्त आता ह्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम कसं फुलत जातं हेच बघायचं ! . जिग्नेसच्या " प्यारची " सुरुवात " नफरतने " होईल असं मात्र मला वाटलं नव्हतं .

क्रमशः ....

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

सीज़न २ - लोकल डायरी ३

सीज़न २ - लोकल डायरी ३ 

" message kashala kelas ... ata lagali waat ! "

तिचा मेसेज वाचला आणि मला काही सुचनासं झालं . वाट लागली म्हणजे नक्की काय झालं हे कळायला मार्ग नव्हता .तिला फोन करावा का ? नको , कदाचित तिच्या अडचणीत आणखी वाढ व्हायची , आणि मेसेज सुद्धा पाठवू शकत नव्हतो , आता ती जेव्हा उद्या सकाळी भेटेल तेव्हाच काय तो उलघडा होईल . असा विचार करून मी शांत राहायचं ठरवलं . पण संबंध दिवस माझं ऑफिसमध्ये लक्ष लागलं नाही, आणि रात्री सुद्धा झोप आली नाही . नक्की काय झालं असेल ? ह्या विचाराने मी अस्वस्थ होतो . कधी एकदा सकाळ होतेय असं मला झालं . मी पटपट आवरून लवकरच प्लॅटफॉर्मवर पोहोचलो . आता माझे डोळे प्लॅटफॉर्मच्या गेटवर लागून राहिले . आमच्या ग्रुपचे सर्वजण आले तरी अवंती आली नाही . गाडीसुद्धा प्लॅटफॉर्मवर लागली. आम्ही आमच्या जागेवर बसलो आणि तेवढ्यात ती मला ट्रेनमध्ये चढताना दिसली . तिच्या नेहमीच्या जागेवर उभे राहिल्यानंतर तिने माझ्याकडे पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. नक्कीच काहीतरी मोठी भानगड झाली असावी .

kaay zala ? मी व्हॉट्सअप्पवर विचारलं .

kaahi naahi .... तिचा रिप्लाय आला . जेव्हा मुली काही नाही असं म्हणतात तेव्हा खूप काहीतरी भयंकर असतं .

utarlyavar bhetuya ka nehmichya restaurant madhe ?

ok . तिच्या तुटक रिप्लाय वरून तर मला आता टेन्शनच यायला लागलं .

" तुझं काय मध्या ? तू काय घेणार ? " अचानक शरद ने मला विचारलं .

" अं ? काय म्हणतोयस ? " माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं . आमच्या ग्रुपमध्ये शरदच्या पार्टीचं डिस्कशन चालू होतं .

" अरे , तू काय घेणार ? " असं म्हणून त्याने दारूची खूण केली .

" आपली नेहमीचीच बिअर " मी म्हणालो .

" बरं , म्हणजे भरत , मधू आणि जिग्नेस बिअरवाले आणि बाकीचे रम ओक्के …? "

" शरदभाय , मैं नहीं पीएगा । खाली खाना खानेको आता हूँ । " जिग्नेस म्हणाला .

" ए , तू चूप बैठ । चूप चाप पिना पडेगा । ऐसा सुक्का सुक्का पार्टी मैं नहीं देता ।" शरद असं म्हटल्यावर तर तो काहीच म्हणाला नाही .

मधेच नायर अंकल म्हणाले , " मै बारा बजे के बाद पीएगा । मेरा शनिवार है । "

" अरे अंकल , छोडो ना शनिवार बिनिवार , एक दिन से कुछ फरक नहीं पडेगा । " शरद म्हणाला . पण ते काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते . मग त्यांना जास्त समजवण्याचा भानगडीत कोणीही पडले नाही . असंही संपूर्ण रात्रभर पार्टी चालणार होती . नायर अंकल रात्रीच्या बारानंतर घेणार असले तरी काही फरक पडणार नव्हता . सगळं ठरलं . आता आपापल्या स्टेशनवर जो तो उतरून जाऊ लागला . भायखळा आलं आणि मी उतरलो ते थेट इराण्याच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो . अवंती मागून येतंच होती . आम्ही आत जाऊन बसलो.

" काय झालं ? काय प्रॉब्लेम झाला ? " मी बसता बसता विचारलं . त्यावर तिने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली .

" मेसेज उगाचच पाठवलास " ती म्हणाली .

" कोणी बघितला का मेसेज ? काय झालं नीट सांग तरी " मी म्हणालो . तेवढ्यात वेटर न सांगता बन मस्का आणि चहा घेऊन आला .

" पैर जल गया मेरा , तुम दोनो की बजे से " चहाचे कप टेबलवर ठेवता ठेवता तो वेटर म्हणाला .

" क्यूँ भाई ? क्या हुआ ? हमने क्या किया ? " आधीच मला हिचं काय झालं ते नीट कळेना त्यात हा वेटर येऊन त्याची कर्मकहाणी सांगू लागला .

" अरे, उस दिन तुम्हारा लव सीन चल राहा था , वो देखने के चक्कर में मेरे से टाकरा गया , गरम चाय पैर पे गिरा डाला । " असं म्हणून त्याच्या सोबतचा वेटर त्याच्यावर हसू लागला .

" लव सिन... क्या लव सिन बे ? ठिकसे बोल " माझा पारा चढायला लागला .

" अरे , जाऊ दे ना . ओह , सॉरी भैया .... ज्यादा लगा क्या? किधर लगा ? " अवंती मात्र अगदी तो तिचा मावसभाऊ असल्यासारखी त्याची चौकशी करू लागली .

" इधर और इधर " असं म्हणत तो वेटरही लाडात येऊन चहा पायावर पडलेलं ठिकाण दाखवू लागला . फार काही झालं नव्हतं तरी ' ओह , सॉरी भैया ' म्हणत अवंतीने दिलगिरी व्यक्त केली . त्या वेटरला तेवढंच बरं वाटलं आणि तो निघून गेला .

" बिचाऱ्याला आपल्यामुळे खूपच त्रास झाला नाही ! " अवंती म्हणाली .

" त्याचं सोड , मला किती त्रास झाला कालपासून ते बघ ! आता काय झालं ते तरी सांगशील प्लिज " मी गाडी पुन्हा ट्रॅक वर आणायचा प्रयत्न करू लागलो .

" सॉरी , सॉरी , अरे , माझा फोन टेबलवर ठेवलेला . आणि माझी आज्जूडी नेमकी तिथेच बसली होती . तिने वाचला मेसेज . आणि गोंधळ सुरू केला. " ती वैतागून म्हणाली .

" आज्जूडी ? कोण आज्जूडी ? "

" आज्जूडी म्हणजे माझी आजी रे " तिने खुलासा केला . ह्या मुली आपल्या नातेवाईकांना काय काय नावे देतील देव जाणे !

" तू फोन लॉक करत नाहीस का ? असाच टाकतेस कुठेही ? "

" उं हुं . मला नाही आवडत ते सारखं अनलॉक करायला "

" बरं ते जाऊदे . तिने का गोंधळ केला ? म्हणजे असं काय झालं एवढं ? " न समजून मी विचारलं .

" तिचा माझ्यावर जरा रागच आहे . "

" का बरं ? "

" अरे देवा ! थांब तुला पाहिल्यापासून सांगते ." असं म्हणून तिने बनपावाचा एक तुकडा तोडून तोंडात टाकला .आणि चहाचा एक घोट घेतला . " त्याचं काय झालं , की माझ्या आत्तुडीने माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं .

" आत्तुडी ... ? आत्तुडी की आज्जूडी ?

" आत्तुडी रे "

" थांब थांब , आत्तुडी म्हणजे तुझी आत्या असेल ... " मी म्हणालो . खरं तर मी हे उपरोधिकपणे म्हणालो होतो , पण अवंतीला माझ्या समजून घेण्याचा फारच आनंद झालेला दिसला .

" येस, दॅटस इट ! .... हुशार आहेस तू .... " ती म्हणाली आणि मी मनातल्या मनात डोक्याला हात लावला . " हां तर कुठे होते मी ? हां ... माझ्या आत्तुडीने तिच्या जवळच्या मैत्रिणीचा मुलगा स्थळ म्हणून आणला होता . चांगला यु एस मध्ये सेटल होता . माझ्या आज्जूडीला पण आवडला होता . पण अनिकेतमुळे मी ते स्थळ नाकारलं . आणि त्या दिवसापासून त्या दोघींनी माझ्यावर राग धरला. "

" अरे बाप रे ! " कधी कधी सांगणाऱ्याला बरं वाटावं म्हणून आणि आपल्याला समोरच्याचं बोलणं ऐकण्यात रस आहे हे दाखवण्यासाठी आपण उगाच मध्ये एक वाक्य टाकतो , तसं मी म्हणून टाकलं .

" तसा काही खरा राग नाही , आपला, खोटा खोटा . पण नंतर मी अनिकेतलासुद्धा सोडलं . हे जेव्हा तिला कळलं तेव्हा ती आणखीनच वैतागली . त्या यु एस वाल्या मुलाचं पण लग्न झालं आणि त्यात नेमका तुझा मेसेज तिने बघितला . ते बघितल्यावर तर तिने आकांडतांडव केला . ह्या पोरीचं काही खरं नाही म्हणाली ." मी अवंतीच्या आज्जीने आकांडतांडव कशा प्रकारे केला असेल ह्याची कल्पना करीत होतो. , " लक्ष कुठे आहे तुझं ? हॅलो ! "

" हां ... हां ... बोल ना . ऐकतोय मी . तुझे आई बाबा काही म्हणाले नाहीत का ? "

" माझा बाबा आहे ना त्याला काही प्रॉब्लेम नाही . त्याने सगळं माझ्यावर सोडलंय . आई जरा काळजी करते पण तिचंही फार काही नसतं . फक्त आमच्या आज्जूडीला माझ्या लग्नाचं टेन्शन आहे . आणि ती सारखी मागे लागलेली असते . मला तिला आपल्याबद्दल इतक्यात सांगायचं नव्हतं . तिचा मूड बघून नंतर सांगणार होते मी . पण कालच्या तुझ्या मेसेजमुळे घोळ झाला सगळा "

" शीट .... शीट .... तरी मला वाटलंच होतं , आणि मी तो मेसेज डिलीटसुद्धा करणार होतो , पण लगेच ब्लु टिक झाली. त्यामुळे मला वाटलं की तूच वाचला मेसेज. "

" तेच तर ! मोबाईल समोरच पडला होता टेबलवर आणि आमची आज्जूडी तिथेच बसली होती. तिने लगेच वाचला तो मेसेज."

" बरं आता पुढे काय ? मग तुला विचारल्यावर तू काय म्हणालीस ? "

" तू जे सांगितलंस तेच तिला सांगितलं ... "

" काय ? "

" हेच की आपलं एकत्र येणं हे प्रेमदूताने घडवून आणलं आहे म्हणून . "

" काय ? तू असं म्हणालीस ? मग काय म्हणाली तुझी आजी ? "

" काय म्हणणार ? मला वेड्यात काढलं तिने . असं कुठं असतं का म्हणाली ... आणि म्हणाली कोण कुठला मवाली असेल , त्याने काहीबाही सांगून फसवलं असेल तुला . " हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते .

" मवाली ? मला मवाली म्हणाली ? यार काये हे ? मी मवाली वाटतो तुला ? आणि मी कशाला तुला फसवेन ? "

" अरे बाबा , ती एक बोलायची पद्धत असते . आता तिला काय माहीत तुझ्याबद्दल "

" पण एखाद्याला न भेटता त्याच्याबद्दल असं मत बनवणं चांगलं नाही . तू काही बोलली नाहीस का ? "

" मी समजावलं रे . पण ती काही ऐकूनच घेत नव्हती . "

" मग आता काय करायचं ? "

" बघू थोडा वेळ जाऊदे . मला खात्री आहे , मी तिला समजावेन , चल , उशीर होतोय , मला निघालं पाहिजे . " ती म्हणाली खरं पण मला काही ते ठीक वाटेना . तसं तिच्या आज्जीचं तरी काय चुकलं म्हणा ? अमेरिकेत सेटल असलेल्या मुलाला हिने नकार दिला , तो अनिकेत सुद्धा चांगला मल्टी नॅशनल कंपनीत होता , म्हणजे त्याची सॅलरी आपल्या सारख्या कारकुनापेक्षा तर नक्कीच जास्त असणार , त्याच्याबरोबरसुद्धा तिचं पटलं नाही . मग आपल्याबद्दल तिच्या आज्जीच्या मनात असंच काहीतरी येणार . आम्ही बिल देऊन बाहेर आलो .

" अवंती , मी तुला खरंच मवाली वाटतो ? " मी अगदी कसंनुसं तोंड करून विचारलं . त्यावर ती दिलखुलास हसली .

" हो , मवाली तर वाटतोस , आणि हा मवाली मला खूप आवडतो . "


क्रमशः --- 

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

सीझन - २ लोकल डायरी -२

सीझन - २ लोकल डायरी -२

अवंतीच्या मिठीमुळे मी माझा राहिलो नाही. एका वेगळ्याच धुंदीत होतो मी दिवसभर . तो सुगंधाचा दरवळ अजूनही माझ्या श्वासात  होता . ऑफिसमध्ये असूनही मी तिथे नव्हतो , मी होतो  त्या इराण्याच्या कॅफेत , जिथे  सर्वांसमक्ष तिने बिनधास्त मला मिठी मारली होती.  दिवसभर काय काम केलं हेही मला आठवत नाही . रात्रीही झोप आली नाही . सारखा तिचाच चेहरा डोळ्यासमोर दिसत होता . आजकाल सकाळी लवकर उठू लागलो असल्याने घरच्यांनाही तो सुखद धक्का होता . लवकर आटोपून मी स्टेशनवर आलो तेव्हा सावंत पाय ओढत येताना दिसले .
" काय सावंत ? कसल्या विचारात आहात ? घरी ओक्के ना सगळं ? " मी मजेत  त्यांना विचारलं .
" तसं ओक्केच म्हणायचं ... दोन बायका आणि फजिती ऐका अशी गत झालीय " तेही गमतीदार चेहरा करून म्हणाले .
" म्हणजे ? काय झालं असं ? "
" तसं खूप काही झालं नाही रे , नेहमीचंच . आमच्या घरात दोन गट पडलेत ."
" काय ? म्हणजे भांडणं सुरू झाली की काय ? "
" नाही रे , दोन गट म्हणजे माझी बायको आणि  शकुंतला एका गटात  आणि दुसऱ्या गटात मला टाकून दिलंय त्यांनी . माझी मस्करी करत असतात दोघी , आणि शॉपिंग पण फार वाढलंय . एकीला दोघी जणी आहेत , चालू आहे धिंगाणा !  " मला त्यांच्या बोलण्यावर हसू आलं .
" आता बायको आणि प्रेयसीबरोबर एकत्र राहायचं म्हणजे तेवढं तर आता तुम्हाला सहन करावंच लागेल "
" हो , ते तर आहेच . पण दोघी खुश असतात . आणि शकुंतलेच्या डोळ्यांत समाधान दिसतं ,  आणि बायकोच्या डोळ्यांत विश्वास !   दोघींच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला ,   आणखी काय पाहिजे ? "
" खरं आहे , नशीबवान आहात "
" कोण नशीबवान आहे ? आम्हाला तरी सांगा .... " शरदने येता येता विचारलं .
" शंभर वर्षे आयुष्य तुला .... तुझाच विषय चालू होता .... " मी बिनधास्त ठोकून दिलं . सावंत माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले .
" माझा ? कशाबद्दल  …? " त्याने न समजून विचारलं .
" अरे , म्हणजे तुला तुझं प्रेम मिळालं ... लवकरच तुझं तिच्याशी  लग्न होणार,  सर्व जण असे नशिबवान नसतात " मी गाडी वेगळ्याच ट्रॅकवर नेली  आणि मुख्य म्हणजे शरदला ते पटलंही . सावंत गमतीदार चेहरा करून आमच्याकडे  बघत होते .
" हो यार , ते तर आहेच ! पण तुम्ही सगळे होतात म्हणून हे शक्य झालं . " शरद म्हणाला .
" हे तू मान्य करतोस ना ,  मग आता आमच्या पार्टीचं काय ? " सावंतांनी विचारलं .
" अरे , गाडी आली , मी पळतो पुढे " म्हणत तो तिथून निसटला .
" पार्टीचं नाव काढलं की पळाला बघ कसा , पण आज त्याला सोडायचा नाही " सावंत म्हणाले . तोपर्यंत भडकमकर , भरत आणि  नायर अंकल आले . भरत जागा पकडण्यासाठी पुढे गेला . माझे डोळे अवंतीच्या वाटेवर लागले . ती अजून आली नव्हती . गाडी प्लॅटफॉर्मला येऊन लागली .  जिग्नेस डाऊन करून आला होता . आजकाल तो नियमितपणे लवकर गाडीला येत होता , आणि इमाने इतबारे आमची जागा पकडत होता . नुकताच त्याचा त्याच्या बायकोशी घटस्फोट झाला होता , त्यामुळे तो काहीसा उदास उदास राहात असे . आम्ही आलो की त्याच्या चेहऱ्यावर एक औपचारिक हास्य येत असे , कधी कधी आमच्याशी शेकहँड  करून काहीही न बोलता  तो एअरफोन कानात घालून YouTube video   किंवा Netflix  वरच्या  web series  बघत असे.  त्याची ही अवस्था बघून शरद , भरत सुद्धा त्याच्याशी जपून वागत . आधीसारखी दंगामस्ती बिलकुल बंद झाली होती . आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर बसलो . मी नायर अंकलना खिडकीची जागा दिली आणि शरदसोबत उभा राहिलो . पलीकडे लेडीज कंपार्टमेंटमधेही गर्दी होऊ लागली , पण अवंती काही दिसत नव्हती . गाडीने लगेचच हॉर्न दिला आणि हलकासा धक्का देऊन ती हळूहळू निघाली . अवंती आज आली नाही . मला एकदम कडकडीत दुपारी सूर्यग्रहण लागल्यासारखं वाटू लागलं  . काय झालं असेल ? ती का आली नसेल आज ? फोन करूया का ? छे ! एवढ्या गोंधळात फोन कसा करणार ? मग  whatsapp  वरून एखादा मेसेज पाठवूया का ? हे जरा पटलं आणि मी तिला ' आज लोकलला का आली नाहीस ? मी तुझी खूप वाट बघितली. लव यु .  ' असा मेसेज टाईप करून पाठवून दिला  आणि रिप्लायची वाट बघत बसलो.  पाच  सेकंदानंतर मला असं वाटलं की शेवटचं ते ' लव यु ' लिहायला नको  होतं . मी तो मेसेज डिलीट करणार तेवढ्यात त्या मेसेजवर डबल टिक झाली आणि लगेच ती निळी सुद्धा झाली. म्हणजे तिने माझा मेसेज नक्कीच  वाचला . आता तिचा रिप्लाय कधीही येऊ शकतो , म्हणून मी दर पाच सेकंदांनी मोबाईल पाहू लागलो .
" तू असा पळून कसा काय जाऊ शकतोस ? पार्टी का नाम लिया तो भाग गया ये शरद " सावंत नायर अंकलना सांगू लागले . त्यांनाही काहीतरी मुद्दा हवाच असल्यासारखे तेही इरेला पेटले , " बराबर है । शरद तुम बॅचलर्स पार्टी कब दे रहे ओ ?
" अरे अंकल आप खाली बोलो कब करने का है पार्टी ! " शरद म्हणाला .
" जैसा सबको कंव्हीनियंट लगेगा वैसा डीसाईड करो । " नायर अंकलनी बॉल आमच्या कोर्टात टाकला .
" ह्या  शनिवारी ठेवूया . रात्री ? म्हणजे दुसऱ्या दिवशी टेन्शन नाय " भरत म्हणाला .
" कोणता शनिवार आहे ? दुसरा की तिसरा ? " भडकमकर
" तिसरा "
" अरे , मग चौथ्या शनिवारी ठेवा . मला सुट्टी असते " भडकमकर म्हणाले .
" फोर्थ सॅटर्डे  चलेगा क्या तुमको ? " नायर अंकलनी शरदला विचारलं
" चलेगा ना , बाकी लोगोको  पुछो , मेरेको सब लोग चाहीये पार्टीमें । " शरद म्हणाला .
" मधू तुझं काय ? " सावंत मला विचारत होते त्यावेळी मी  whatsapp  चेक करत होतो . तिचा रिप्लाय अजून आला नव्हता . भरतने माझ्या खांद्यावर थाप मारली तसा दचकलो .
" काय रे ? काही महत्वाचा मेसेज येणार आहे का ? " भरत गमतीत म्हणाला .
" नाय रे ... बोला ना काय झालं ? " म्हणत मी मोबाईल बंद करून खिशात टाकला.
" अरे , तुला चौथ्या शनिवारी जमणार आहे का ? शरदची पार्टी आहे ." भडकमकर मला विचारू लागले .
" चालेल की , पार्टीसाठी आपण कधी पण तयार असतो . " मी म्हणालो .
" ओक्के , मग आता कोण राहिला ?  जिग्नेस ..." सावंत म्हणाले त्यावर त्याचं लक्ष नव्हतं , नव्हे त्याचं एकूणच काय चालू आहे ह्याकडेही लक्ष नव्हतं .  तो कानात एअरफोन घालून व्हिडीओ बघत होता . कुछ कुछ होता है फिल्ममधलं " तुझे याद ना मेरी आई , किसिसे अब क्या केहेना ! "  चालू होतं . त्यातली बॉबकट केलेली काजोल ढसा ढसा रडत होती . आजकाल तो असलीच रडकी गाणी बघत बसायचा . , " जिग्नेस ? ए जिग्नेस ! " सावंत त्याला म्हणाले .
" बोलो सावंतजी " डोळ्यांच्या कडा बेमालूमपणे पुसत जिग्नेस म्हणाला .
" अरे , तू चौथे शनिवार को क्या कर राहा है ? अपना शरद का पार्टी है । तू है ना ? "
" अरे , नहीं सावंतजी , मैं थोडा बाहर जा रहा हूँ । आप लोग मजे करिये । " जिग्नेस म्हणाला , पण त्याच्या बोलण्यावरून तो फक्त आम्हाला टाळत होता हे आमच्या लक्षात आलं .
" तो तू बता , तुझे कब टाईम है ? तब करते है पार्टी ... " मी त्याला विचारलं .
" अरे नहीं मधू भाय , ये टाईम जरा बिझी हूँ । आप करलो ना ... मैं बाद में पार्टी लुंगा शरदसे " तो नजर चोरत म्हणाला .
" जिग्नेस , यार बास क्या , थोडे टाईम के लिये आजा ... मेरेको अच्छा लगेगा " शरदनेही त्याला सांगून पाहिलं पण त्याचं उत्तर काही बदललं नाही . तो काहीही फालतू कारणं देत होता .  " सावंत , जाऊद्या , आपण कॅन्सल करू पार्टी , मेरा भाई  जिग्नेस येणार नसेल तर पार्टी करून काय फायदा ? " शरद वैतागून म्हणाला .
" अरे , ऐसा मत करो  शरदभाय । बाकी लोगोंका खयाल करो । "
" तू मुझे मत बता , क्या करने का या क्या नही करनेका । तू नहीं तो पार्टी कॅन्सल " शरदही अडून बसला .
" क्या यार जिग्नेस , कितने दिन से अपुन लोगो ने पार्टी नहीं की , चल ना " भरत म्हणाला .
" अरे , ये शरद एक नंबर का कंजूस है , उसके जेब से  पैसा नहीं निकलता कभी , अबी तुम नय आयेगा तो ये पार्टी कॅन्सल करेंगा । उसका तो पैसा बच गया ना ! यही उसकी चाल है , तुम जरा समझो जिग्नेस " नायर अंकलनी त्यांच्या गमतीदार शैलीत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
" मोठ्या मुश्किलीने शरद आपल्या तावडीत सापडलाय , त्याला असा सोडायचा नाही . हां बोलदे मेरे भाई जिग्नेस । " भडकमकर म्हणाले . नंतर सगळ्यांनीच एकदम जिग्नेसला घेरलं , आणि गोंधळ घालायला सुरुवात केली . आजूबाजूच्या ग्रुपचे लोक  आमच्याकडे विस्मयाने पाहू लागले . पलीकडच्या लेडीजना आमच्या इथे भांडण झाल्यासारखं वाटून त्याही वाकून आमच्या गुपकडे बघू लागल्या . एवढं सगळं जिग्नेसला सहन झालं असतं  तरच नवल होतं . त्याने लगेच हार पत्करली . " आता हूँ बाबा , आता हूँ " करत त्याने शेवटी हात जोडले आणि आम्ही पुन्हा एकदम गोंगाट केला . पार्टीचा दिनांक आणि वेळ ठरली . शरदचा आणखी एक फ्लॅट होता आणि तो सध्या बंद होता , तिथेच जायचं ठरलं . दारू आणि जेवण बाहेरून आणणार होतो, आणखी एक खास आकर्षण होतं ते म्हणजे आमच्या इथल्या गड्डी ढाब्याचे  भेजा फ्राय आणि घावणे ! हे  म्हणजे स्वर्गसुख !  शरदची पार्टी चांगलीच होणार ह्यात आम्हाला शंका नव्हती . मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या , जिग्नेस सुद्धा आज बऱ्याच दिवसांनी आमच्यात सामील  झाला होता . त्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटत होतं . आम्ही त्याला जास्तीत जास्त बोलण्यात गुंतवत होतो . वेळ कसा गेला काहीच कळलं नाही . भायखळयाला उतरलो आणि मला पुन्हा अवंतीची आठवण झाली , त्या पाठोपाठ तिला पाठवलेल्या मेसेजची . मी लगेच माझा मोबाईल काढून पाहिला . तिचा whatsapp वर मेसेज आला होता .
" message kashala kelas ... ata lagali waat ! "