औमूआमूआ - विज्ञानकथा
हवाई बेटावरच्या पॅन स्टार ऑब्झअरवेटरीमध्ये रॉजर नेहमीप्रमाणे रात्री आपल्या टेलिस्कोप समोर बसला होता . रॉजरला त्याचं काम आवडत असे . तो तासंतास त्याच्या दूरदर्शीतुन आकाशाचा वेध घेत असे . अंतराळात वेगाने जाणाऱ्या किंवा हलणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवर नजर ठेवण्याचे काम त्या ऑब्झअरवेटरीचे होते. रॉजर नेहमीप्रमाणे अवकाशाचं निरीक्षण करीत असताना कॉम्पुटरच्या स्क्रीनवरच्या एका वेगळ्याच आकाराच्या वस्तूने त्याचं लक्ष वेधलं . आधी त्याला वाटलं की स्क्रीनमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल पण थोडं झूम करून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा स्क्रीनमधला बिघाड नाही . स्क्रीनवर तो जे काही पहात होता ते सतत आपली जागा बदलत एका सरळ दिशेत आपल्या सुर्यमालेच्या दिशेने येत असलेलं त्याला दिसलं .
" काय आहे हे ? " त्याने स्वतःलाच प्रश्न केला . बारीक दांडीच्या आकाराचं असं काहीतरी दिसत होतं . त्याने लगेच समोरच्या फोनची बटणे दाबली .
" हॅलो , सॅव्ही मला चीफशी बोलायचंय .... ताबडतोब .
" आता खूप रात्र झाली आहे रॉजर .... इज दॅट सो इम्पॉरटंट ...? तू गंमत करत नाहीस ना ? "
" वेडी आहेस का ? रात्रीचे दोन वाजलेत .... ही काय गम्मत करायची वेळ आहे का ? प्लिज चीफला कनेक्ट करून दे "
थोड्या वेळात चीफ फोन वर आला . " येस रॉजर "
" चीफ , इतक्या रात्री तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी . पण प्रकरणच तसं विचित्र आहे .
" बोल . "
" माझ्या टेलिस्कोपने एक विचित्र गोष्ट ओबझर्व केली आहे "
" बोलत रहा . ऐकतोय "
" मला सांगता येणार नाही . तुला इमेजेस पाठवतो . "
"ओके "
रॉजरने चीफला ती इमेजेस पाठवली आणि थोड्याच वेळात त्याचा पुन्हा कॉल आला
" काहीतरी वेगळंच आहे हे .... सध्या तरी आपल्याला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल . त्याचे सगळे अस्पेक्ट्स तपासावे लागतील . हे काय आहे , कुठून आलं आहे , कसल्या प्रकारचं आहे , स्पीड काय आहे वगैरे वगैरे .... गुड जॉब रॉजर .... त्याच्यावर नजर ठेव . "
अशी एक विचित्र आणि नवीन गोष्ट आपल्या सुर्यमालेच्या दिशेने येत असल्याबाबत बातमी सर्व न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्राद्वारे लगेचच सर्वत्र पसरली . सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली . जगभरातल्या सर्वच खगोल शास्त्रज्ञांनी त्यावर नजर ठेवली होती . तब्बल ३४ दिवस ती विचित्र खगोलीय गोष्ट आपल्या सुर्यमालेजवळ येऊन बुध ग्रहाच्या जवळून पुढे निघून गेली होती . ३४ दिवसांनंतर ह्या अंतराळातल्या विचित्र खगोलीय गोष्टीवर नजर ठेवल्यावर जगभरातल्या शास्त्रज्ञांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली , त्यामध्ये ह्या दुर्मिळ अशा खगोलीय घटनेसंबंधी चर्चा करण्यात आली .
( व्हिडीओ कॉन्फरन्स )
रॉजर - वेलकम फ्रेंड्स, चीफ मी गेले चार आठवडे त्या वेगळ्या आकाराच्या खगोलीय वस्तुचं निरीक्षण करतोय . आणि माझ्यासोबत चायना , इंडियामधले माझे मित्र चँग ली आणि रामकृष्णन हे दोघेही त्या ऑब्जेक्टवर नजर ठेवून होते . आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स आहे .
चीफ - गुड , वेलकम अँड गुड मॉर्निंग चँग ली आणि रामकृष्णन.
दोघांनीही चीफला गुड मॉर्निंग केले .
रॉजर - तर आता आपण आपल्या सूर्यमालेत नव्यानेच आलेल्या त्या ऑब्जेक्टबद्दल चर्चा करू.
चीफ - त्या ऑब्जेक्टबद्दल मी काही प्राथमिक माहिती देतो . आपण त्याला 1I / 2017 U1 असे शास्त्रीय नाव दिले आहे . हा आपण ऑब्झर्व केलेला पहिला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे . आणि रॉजरने त्याला एक हवाई नाव ही दिले आहे .
रॉजर - येस .... मी त्यांचं नाव औमूआमूआ असं ठेवलंय ...
चँग ली - म्हणजे काय ?
रॉजर - ते एक हवाईयन नाव आहे .... त्याचा अर्थ खूप दुरून आलेला पहिला मेसेंजर ....
रामकृष्णन - वा .... नाव तर छानच आहे . आम्हीही ह्या ऑब्जेक्टवर नजर ठेवली होती . आधी तो आपल्याला एक धूमकेतू आहे असं वाटतं होतं पण आपण त्यावर अभ्यास केला व निरीक्षणे नोंदवली आहेत त्यावरून तर तो धूमकेतू वाटत नाही .
चँग ली - बरोबर आहे . धुमकेतूसारखी शेपटी त्याला नाही . त्याला काय कारण असू शकेल राम ?
रामकृष्णन - धूमकेतूची शेपटी ही त्याच्यातल्या गॅसेसच्या बाहेर पडण्यामुळे किंवा त्यावर असलेल्या बर्फाच्या वितळण्यामुळे होत असते . त्यातील धूलिकण मागे पसरत जातात व सूर्याच्या प्रकाशामुळे ते प्रकाशित होऊन आपल्याला दिसतात त्यामुळे ती शेपटी असल्यासारखे दिसते . आणि आपला औमूआमूआचा पृष्ठभाग कठीण असल्यामुळे कदाचित त्यातून धूलिकण बाहेर पडत नसावेत .
रॉजर - बरोबर , आम्ही त्याचे काही अस्पेक्ट्स स्टडी केले आहेत . त्यावरून त्याची लांबी खूप जास्त असून तो एखाद्या सिगारच्या आकाराचा आहे . आणि तो एखाद्या कठीण पदार्थापासून किंवा धातूपासून तयार झाला असावा .
चँग ली - त्याचा वेग खूपच जास्त होता .... आणि तो ज्या वेगात आपल्या सूर्यमालेत दाखल झाला त्यापेक्षा जास्त वेगात आपल्या सुर्यमालेच्या बाहेर जात आहे ....
रॉजर - ह्याचं काय कारण असू शकेल ?
चीफ - आता तरी ह्याचं उत्तर आपल्याकडे नाही .... आपल्याला काही हायपोथॅसिस मांडावे लागतील आणि त्या दिशेने संशोधन करावं लागेल . तुला काय वाटतं रामकृष्णन ?
रामकृष्णन - मला असं वाटतं , की औमूआमूआ हे कदाचित परग्रहावरच्या एखाद्या अतिप्रगत मानवजातीने पाठवलेले एखादे यान किंवा टेहळणीसाठी पाठवलेला एखादा प्रोबही असू शकतो ...
रामकृष्णनच्या बोलण्यावर सर्वजण हसले .
रॉजर - तुम्ही इंडियन लोक नेहमी अशा काहीतरी विचित्र कल्पना लढवत असता . ह्याला काय पुरवा आहे ?
रामकृष्णन - ज्या अर्थी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा त्याच्या वेगावर परिणाम झाला नाही किंवा त्याचा वेग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढला त्यावरून मला असं वाटतं . कदाचित ते एखादं यान असू शकतं ....
चँग ली - नाही मला तसं वाटत नाही . रामकृष्णन तुझ्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही .
चीफ - बरोबर आहे .... हायपोथॅसिस मांडला तरी त्याला काहीतरी पक्का बेस असावा . तसं तुझ्याकडे काही आहे का ?
रामकृष्णन - सध्या तरी तसं काही माझ्याजवळ नाही . पण मला असं सारखं वाटत आहे .
रॉजर - रामकृष्णन , विज्ञानात आपल्या वाटण्याला काही किंमत नसते . एखादी घटना का घडली त्यामागची शास्त्रीय कारणे देता येणे गरजेचे आहे ....
रामकृष्णन - ठीक आहे . तुम्ही तुमची चर्चा पुढे चालू ठेवा .
रामकृष्णन असं म्हणाला आणि चर्चा पुढे चालू राहिली . परंतु त्याचे लक्ष त्या चर्चेत नव्हते .
पृथ्वीवर खगोल शास्त्रज्ञांची अशी चर्चा चालू असतानाच त्याच वेळी आपल्या सुर्यमालेपासून अनेक प्रकाशवर्षे दूर असलेल्या अँड्रॉमिडा गलेक्सीतल्या ओबँका ग्रहावरच्या मुख्य संगणकावर एक कोड रिसिव्ह झाला .
¶◆●★¶ ◆◆★◆■
ज्याचा अर्थ होता -
दुसरी पृथ्वी सापडली . आपलं नवीन घर !
समाप्त
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
समाप्त
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7