http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
" काल तुमचं काय चाललं होतं ...? खुप आरडा ओरडा चालू होता ... " अँटी व्हायरस मला विचारत होती . आम्ही स्टेशनच्या रोडवर सकाळी अचानक भेटलो . ती रिक्षातून उतरत असताना मला दिसली . आमच्या पावसाळी भटकंतीनंतर तर आम्ही चांगले मित्र तर झालोच होतो . त्यामुळे मला तिला भेटताना काहीतरी वेगळं करतोय असं वाटत नव्हतं. सहज एखादा मित्र भेटतो तसं ....
" काही नाही ... आमच्या ग्रुप मधला शरद आहे ना त्याची एंगेजमेंट आहे पुढच्या आठवड्यात . त्यामुळे सगळे खुश होते . "
" अरे , पण कितीतरी वेळा ओरडत होता तुम्ही लोक ...! "
" हां ... नंतर भरतने सांगितलं की तो रविवारी मुलगी बघायला जाणार आहे ... त्यामुळे आम्ही खुप खेचली त्याची .... जाम घाबरवला त्याला ...." एखादी गमतीदार गोष्ट सांगावी तसं मी तिला सांगितलं .
" का ? कशासाठी घाबरवला ? "
" अगं , त्याला आधीच टेंशन आलं होतं . मुलगी बघायचा त्याचा पहिलाच कार्यक्रम होता . आम्ही मुद्दाम आणखी टेंशन दिलं त्याला ..." मी गमतीत म्हणालो . पण अँटी व्हायरसचा चेहरा गंभीर होता . मी तिच्याकडे पाहिलं , " काय झालं ...?"
" हे मुलगी बघणं , कांदेपोहेचा कार्यक्रम करणं ... मला बिलकुल आवडत नाही ... मुलगी म्हणजे काय बाजारात ठेवलेली एखादी वस्तु आहे की तिला बघायला येतात ...? " अँटी व्हायरस थोडीशी चिडलेली वाटत होती .
" बरोबर आहे ... पण काय करणार ? तशीच पद्धत आहे ना , पहिल्यापासून ... " मी सावरण्याचा प्रयत्न केला .
" तेच ... तेच तर आवडत नाही ना मला .... मुलींच्या भावनेला काही किंमतच नसते . मुलाला मुलगी पसंत म्हणजे मुलीलाही मुलगा पसंत अशी सरळ सरळ समजूतच करुन घेतात तुम्ही लोक ...! तिला कदाचित वेगळं वाटू शकतं . वाटू शकतं की नाही ...? "
" हो ... बरोबर आहे ... पण आता परिस्थिती बदलते आहे ... आजकाल मुले- मुली बाहेर भेटतात ... बोलतात , एकमेकांना समजून घेतात , मग पुढचा विचार करतात ..."
" पण असं करणारे किती असतील ? हजारात एक ... ! मग बाकीच्या नउशे नव्यान्नवांच काय ? "
" अरे , तू तर भांडायलाच लागलीस माझ्याशी ... जसं काय मीच ही प्रथा बनवलीय .... "
" मग तुला इतका आनंद का होतोय ? तू सुद्धा केलेस वाटतं असले कार्यक्रम ...!"
" छे .... आपण नाही करणार असले कांदेपोहयाचे कार्यक्रम . खरं तर मलाही नाही आवडत असले कार्यक्रम, पण भरतचा कालचा चेहरा आठवून गंमत वाटतेय .... त्याचा चेहरा पहाण्यालायक झाला होता . " आम्ही असेच बोलत जात असताना सावंत मागून आले .
" अरे मध्या , तुला किती वेळा फोन लावतोय , चल जरा लवकर , एक प्रॉब्लेम झालाय ... " ते माझ्याकडे बघत म्हणाले .
" काय झालं ? आणि तुम्ही इतके घामाघूम कसे काय झालात ? "
" चल तुला सांगतो .... " असं म्हणत जवळ जवळ मला ते खेचूनच घेऊन जाऊ लागले . मी अँटी व्हायरसचा निरोप घेऊन निघालो .
" सावंत काय झालं ? घरी सगळं ठीक आहे ना ? "
" माझा नाही रे काही प्रॉब्लम .... मला शरदचा फोन आला होता . लगेच प्लॅटफॉर्मवर या असं म्हणालाय , त्याच्यामुळे मी धावत -पळत आलो ..." दोन नंबरवरच्या प्लॅटफॉर्मवर उतरणाऱ्या पायऱ्या उतरत ते म्हणाले . आम्ही आमच्या नेहमीच्या जागी पोहोचलो . तिथे आमचा ग्रुप उभाच होता . भडकमकर , नायर अंकल , शरद , भरत ... आम्ही घाईघाईत तिथे पोहोचलो .
" शरद , काय रे ? काय झालं ? " सावंतांनी विचारलं .
" जिग्नेसचा थोडा प्रॉब्लेम झालाय ..... आपल्याला उल्हासनगरला जायला लागेल . "
" प्रॉब्लेम झालाय म्हणजे ? नक्की काय झालंय ... ? " मी विचारलं .
" चल, रस्त्यात सांगतो ..." म्हणत ते सगळे निघाले . मी आणि सावंत त्यांच्या मागून निघालो . आम्ही स्टेशनच्या बाहेर लायनीत उभ्या असलेल्या रिक्षांच्या तिथे आलो ." बालाजी हॉस्पिटल ...? " शरदने विचारलं . आणि आम्ही सगळे रिक्षांमधे बसलो . रिक्षात बसल्यावर मी अंदाज केला , हॉस्पिटलला जायचंय म्हणजे कुणीतरी खुप आजारी असेल , पण कोण ? जिग्नेस ...? की त्याचे कोणीतरी जवळचे नातेवाईक ? पण जिग्नेस तर त्याच्या बायकोसोबत वेगळा रहात होता .... म्हणजे तो किंवा त्याची बायको आजारी असेल . मागे एकदा शरद भरत त्याच्या बाबतीत गुप्तपणे चर्चा करीत होते . मी त्यावेळी विचारलं तर मला त्यांनी सांगितलं नव्हतं पण , त्याच्या बाबतीत ते अतिशय गंभीरपणे बोलत असलेले मला आठवत होतं . त्या गोष्टीचा ह्या घटनेशी नक्कीच काहीतरी संबंध असावा असं मला वाटलं . पहिल्या रिक्षात शरद, नायर अंकल आणि भडकमकर बसले . तिच्या मागच्या रिक्षात मी , सावंत आणि भरत बसलो आणि निघालो .
" अरे काय झालंय जिग्नेसला ? तब्येत बरी नाही का त्याची ? " सावंतांनी भरतला विचारलं .
" सावंत अहो , जिग्नेसने काल रात्री खुप झोपेच्या गोळ्या खाल्ल्या ... त्याला बालाजी हॉस्पिटलला एडमिट केलंय ..."
" काय ? झोपेच्या गोळ्या ? का ? आणि कशामुळे ? " मी विचारलं .
" ते काही माहीत नाही ... " भरत म्हणाला . पण त्याला नक्की काहीतरी माहित आहे आणि ते आम्हाला इतक्यात कळू नये असा त्याने विचार केला असावा .
" तुम्ही दोघे त्या दिवशी जिग्नेसबद्दल बोलत होतात . त्याच्याशी संबंधित आहे का हे ? " मी विचारलं . त्यावर त्याने नुसती होकरार्थी मान डोलवली . रिक्षा बालाजी हॉस्पिटलच्या गेटपाशी थांबली . आम्ही रिसेप्शनला चौकशी केली आणि जिग्नेसला एडमिट केलं होतं त्या रूममधे गेलो . हॉस्पिटलचा टिपिकल , औषधांचा , फिनाईलचा समिश्र वास नाकात शिरला . जाऊन बघतो तर बेडवर जिग्नेस झोपलेला . सलाइनची बॉटल उलटी लटकवलेली . त्यातून थेंब थेंब सलाइनमधलं ते द्रव्य जिग्नेसच्या शरीरात जात होतं . त्याच्या बाजूला त्याचे वडील आणि त्याची बायको बसले होते . आम्ही तिथे पोहोचल्यावर ते उठून उभे राहिले .
" अब कैसा है जिग्नेस ? " शरदने विचारलं .
" अबी ठीक है थोडा .... डॉक्टर ने दवाई दी है ... अबी सोया है ...." त्याचे वडील रडवेल्या सुरात म्हणाले . त्यांचा त्याच्यावर खुप जीव असल्याचं दिसत होतं . आणि का नसावा ? त्यांचा तो एकुलता एक मुलगा होता . बऱ्याच वर्षांनी नवसाने झालेला . त्याला असं हॉस्पिटलमधे पडलेला पाहून त्यांना वाईट वाटणं सहाजिकच होतं . आम्ही सर्वजण त्याच्याकडे बघत उभे राहिलो . कुणाला काय बोलावं ते सुचेना . ते पाहून आमचे सीनियर मेंबर पुढे झाले .
" कब हुआ ये सब ...? " नायर अंकलनी विचारलं .
" कल रात हुआ होगा शायद .... "
" शायद मतलब ? "
" कल रात वो घर पर आये और बिना खाना खाकेही सो गए ... मैंने पूछा क्या हुआ लेकिन उन्होंने मुझसे बात तक नहीं की. आज सुबह मैं उन्हें उठाने गयी तो वो उठेही नहीं और देखा तो नींद की गोलियोंकी खाली बोतल निचे पड़ी थी .... " त्याची बायको रडत म्हणाली .
" इसने मुझे तुरंत फोन करके घर बुलाया .... और हम उसे यहाँ ले आये " त्याचे वडील म्हणाले .
" उसने कुछ बी नय बताया की क्या प्राब्लम है ? " नायर अंकल विचारु लागले .
" नहीं ना .... मेरा तो दिमागही काम नय कर रहा ... सब अच्छा चल रहा है .... उसका बिझनेस भी ठीक चल रहा था ... वो खुश था ... तो फिर ये बिच मैं ऐसा कैसे हो गया , कुछ समझ नहीं आ रहा " त्याचे वडील डोक्याला हात लावून खाली बसले . जिग्नेस असा माणूस होता .... म्हणजे आहे अजुन .... की त्याला पैशांचं असं काही टेंशन नव्हतं . वडिलांप्रमाणेच त्याने बिझनेस सुरु केला होता . आणि त्याने कधीही त्याबाबत तक्रार केलेली मला तरी आठवत नव्हती . बिझनेस करणे त्याच्या रक्तातच होतं . त्यामुळे पैशाच्या चिंतेत त्याने हे असं केलं असेल असं वाटत नव्हतं . आम्ही थोडा वेळ तिथे बसलो . आमच्या सीनियर मेंबरर्सनी त्याच्या वडिलांना आणि बायकोला धीर दिला आणि आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर आलो . शरद बाजूच्या टपरीवर गेला . आणि एक सिगरेट पेटवून घेऊन आला.
" काय साला ... काय झालं असेल रे बाबा ? इतकं आत्महत्या वगैरे करण्यासारखं ? " भडकमकर आश्चर्याने म्हणाले .
" शेवटी मला भिती होती तसंच झालं ...." धुर पायाच्या दिशेने खाली सोडत नैराश्याने मान हलवत शरद म्हणाला . सगळे जण आश्चर्याने त्याच्याकडे बघु लागले .
" म्हणजे तुला माहित आहे , त्याने असं का केलं ते ? " सावंतांनी विचारलं .
" सगळं नाही ... पण थोडंसं माहित आहे ... " सिगारेटचा एक झुरका घेत तो म्हणाला .
" काय ? सांग ना मग ..." मी म्हणालो .
" त्याचं हे असं होण्याचं कारण त्याची बायको आहे ... " शेरलॉक होम्स जसा कहाणीच्या शेवटी आपल्याला अपेक्षित नसलेलं सत्य सांगतो तसा शरदने गौप्यस्फोट केला . सगळे त्याच्याकडे अविश्वासने पाहू लागले . फक्त भरत समजुतीने नकरार्थी मान हलवत होता. त्याला आणि शरदला हे आधीपासूनच माहीत होतं . मी त्यांना पूर्वी विचारण्याचा प्रयत्न केला होता ,पण त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं . जिग्नेसच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण त्याची बायको असावी ? मला तर हे पटतच नव्हतं . मघाशी आम्ही बघितलं ना ... किती साधी आणि सालस बाई होती ती ! ती काय करणार ?
" चल ... कायतरीच् काय ? ती किती सिंपल आहे ...." सावंत म्हणाले .
" सावंत, नेहमी जे दिसतं ते खरं असतच असं नाही . मी आणि भरतने तिला एकदा नाही, दोनदा नाही तर तिनदा एका वेगळ्याच माणसाबरोबर फिरताना पाहिलं आहे .... आधी आमचा विश्वास बसला नाही , पण आम्ही एकदा त्यांचा पाठलाग सुद्धा केला तेव्हा सगळा प्रकार आमच्या ध्यानात आला . खोटं वाटत असेल तर विचारा भरतला …! " तो अगदी आत्मविश्वासाने बोलत होता . भरतचं नाव घेतल्यावर त्याने नुसती होकरार्थी मान हलवली .
" खरं तर आम्ही दोघे हे सगळं जिग्नेसला सांगणारसुद्धा होतो , पण मग विचार केला की कशाला उगाच त्याला टेंशन ...! आणि अशा गोष्टी समजल्यावर काय होतं ते आपण बघतोच आहोत .... " भरत म्हणाला .
" छे मईना बी नय हुआ उनके शादीको ...." नायर अंकल हळहळ व्यक्त करु लागले .
" काय बोलणार आता ... ? माझं तर डोकंच सुन्न झालंय ...." सावंत हताश होत म्हणाले .
" आयला त्याची बायकोच बकवास आहे ... ह्या असल्या बायका ना , कुणाच्याच नसतात ... ह्यांची जागा दुसरीकडेच आहे ... " शरद भडकला होता .
" यार पण असा डायरेक्ट आरोप करणं ठीक नाही .... तिचा कदाचित नुसता मित्रही असू शकतो तो माणूस "
" कसला घंटयाचा मित्र ...! हे असं असतं का कधी ? ती बाईच साली खराब आहे " रागात शरदने हातातली पेटती सिगरेट जमिनीवर आपटली . भरतनेसुद्धा मग त्याची री ओढली . थोड्या फार फरकाने आमच्या ग्रुपच्या सगळ्याच लोकांना हे पटलं होतं . प्रत्येक जण ह्याच विचारात होता. कदाचित असेलही असं काही . पण मग तसं नसेल तर ? मग मला अचानक अँटी व्हायरस आणि तिचा होणारा नवरा अनिकेत ह्यांची आठवण झाली . मागे मी आणि अँटी व्हायरस असेच भायखळयाच्या हॉटेलमधे बसलो असताना त्याने आम्हाला पाहिलं होतं आणि रागाने तो काहीही न बोलता निघुन गेला होता . त्यावेळी त्याची जिग्नेस सारखीच काहीशी अवस्था झाली असेल . त्यालाही अँटी व्हायरसचा भयंकर राग आला असेल .... तोही तिच्याबद्दल असाच विचार करत असेल जसा आत्ता शरद - भरत जिग्नेसच्या बायकोबद्दल विचार करत आहेत . पण माझ्या आणि अँटी व्हायरसच्या दृष्टीने आम्ही निषिद्ध , गैर असं काही केलेलं नव्हतं . आम्ही केवळ एकमेकांच्या सोबत होतो . एखाद्या मित्रासारखे . . . उद्या जर हे लोक अँटी व्हायरसबद्दल सुद्धा असंच बोलले तर आपल्याला आवडेल का हे ? मग आपण आणि अँटी व्हायरस जे भेटतो ते योग्य आहे की अयोग्य ? एखाद्या बाईला तिचा नवरा सोडून दूसरा पुरुष हा मित्र नसु शकतो का ? ती त्याच्यासोबत बिनधास्त बोलू , फिरु शकत नाही का ? आणि जर एखाद्या बाईने तसं केलं तर आपला समाज त्याला कितपत स्विकारेल ? की त्या मैत्रीला एखादं ओंगळवाणं नाव देऊन त्याची निर्भत्सनाच केली जाणार कायम ?