शनिवार, २८ मार्च, २०१५

लोकल डायरी - ७

आजचा दिवस चांगला होता कि वाईट ते अजूनही मला कळलं  नाही . आता मी हे असं का म्हणतोय ? ते तुम्हीच ठरवा …  
      आज बऱ्याच दिवसांनी मी ' अँटीव्हायरस ' ला पहात होतो. ती कधी गाडीत चढली ते कळालंच नाही... रोजचे चेहरे आणि त्यांच्या येण्याच्या वेळा सवय़ीने लक्षात राहतात. अँटीव्हायरसबाबतही माझं तसंच काहीसं झालं होतं. ती बरोब्बर ८.२० ला यायची. आणि समोर उभी रहायची. जास्त कुणाशी बोलायची नाही. शेजारी उभ्या असलेल्या बाईंकडे बघुन एकदाच ओळखीचं हसायची. मग नंतर मोबाईल काढला की इअरफोन कानात घालुन गाणी ऐकत बसायची.... ह्या तीच्या दिनक्रमात जराही फरक पडत नसे.    पण गेले काही दिवस ती आमच्या नेहमीच्या गाडीत येईनाशी झाली. मी गाडी सुटेपर्यंत तिची वाट बघायचो.  तिने कदाचीत जॉब बदलला असावा किंवा ऑफिसला जायची वेळ बदलली असावी अशी मी माझ्या मनाची समजुत करुन घेतली. काल परवा तर मी तिला आधीच्या ट्रेनने जाताना पाहिलं , त्यामुळे तर माझी उरली सुरली आशाही संपली होती . पण आज तिला समोर बघुन तर मला इतका आनंद झाला म्हणुन सांगु...! संध्याकाळी ऑफिस अवर्स मधे कुर्ल्याला लोकल पकडुनही विंडो सीट मिळाल्यावर होईल इतका आनंद मला तिला पाहिल्यावर झाला.  मी उड्या मारायच्याच बाकी ठेवल्या.  माझ्या वागण्यातला बदल लगेच सावंतांच्या लक्षात आला.
" काय़ रे बाबा ?  अचानक काय झालं तुला ...? " त्यांनी आश्चर्याने मला विचारलं.
" काही नाही ... सहजच.... " मी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत म्हणालो.
" पलीकडे कोणी दिसली की काय ओळखीची .... आं.....?  " असं म्हणुन ते हसु लागले.  आधी तर मला वाटलं ह्यांना  कसं कळालं ...?  पण ते गमतीने म्हणालेले बघुन मीही नुसता हसलो.  पण काहीही म्हणा,  आज मस्तच वाटत होतं .... मी तिच्याकडे  पुन्हा  एकदा पाहीलं .... तिचे डोळे काहीसे लाल झालेले होते ... रात्री झोप झाली नसावी.  पण त्यातही ती सुंदर दिसत होती,  नुकत्याच उमललेल्या पारीजाताकासारखी !
' प्लॅटफॉर्म क्र. २ ची लोकल ८ वाजुन २४ मिनीटांची मुंबई छत्रपती ..... ' गाडी सुटण्याची अनाउन्समेंट होत होती. त्याबरोबर गाडी निघालीही... सावंतांनी आपला पेपर उघडला आणि त्यात डोकं घातलं. नायर अंकल बसल्या बसल्या पेंगु लागले. मी पुन्हा तिच्याकडे पाहीलं .... तिचा चेहरा ताणल्यासारखा दिसत होता. काहीतरी टेन्शन होतं  तिला !  तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने घाईघाईत तो उचलला. ती काय बोलत असेल ...? मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करु लागलो. मला नीट ऐकु येत नव्हतं ... काही काही शब्द तुटकपणे कानावर पडत होते. " विनवण्या ....” , “  नाही.... " " कंटाळलेय ... " " कळत नाही .... "  ती खाली बघत हळु आवाजात बोलत होती. आज नेमका भरत  आला नव्हता . त्याने बरोब्बर सांगितलं  असतं  की  ती काय बोलतेय ते  !  मी एकदा आमच्या ग्रुपवरुन नजर फिरवली. नायर अंकल , भडकमकर यांची तर केव्हाच समाधी लागली होती. सावंतांचा अग्रलेख सुरु झाला होता.  मी तिच्याकडे कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा बारकाईने पाहु लागलो.  पहातो तर,   बोलता बोलता अचानक एक हुंदका देऊन रडु लागली....   मला कळेना अचानक असं काय झाल असेल की ती एकदम रडायला लागली . गेले पाच सहा महीने  मी अँटीव्हायरसला  पहातोय ... पण असं कधी तिला पहिलं नव्हतं .    मी  आश्चर्यने  तिच्याकडे निरखुन पाहू लागलो . डोळे पुसता पुसता तिचं लक्ष अचानक माझ्याकडे गेलं अन् तिच्या भुवयांमधे एक लहानसं  प्रश्नचिन्ह उभं राहीलं . हा कोण आपल्याकडे इतका निरखुन पहात आहे ? असेच तिचे डोळे विचारत असावेत. आपल्या नकळत कोणीतरी आपल्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा आपल्या नकळत कोणीतरी आपल्या अन्तरंगाचा ठाव घेत आहे ही भावनाच विचित्र आहे . तिने माझ्याकडे पहिलं अन् मी लगेच दुसरीकडे मान वळवली . आता लगेच पुन्हा तिच्याकडे पहायला नको , पण मन हे लहान हट्टी मुलाप्रमाने असतं . त्याला जे  करण्यास मनाई केली जाते तीच गोष्ट ते पुन्हा पुन्हा करतं...  थोड्या वेळाने मी पुन्हा तिकडे नजर टाकली तर ती माझ्याकडेच पहात होती . असंच दोनदा,  तिनदा , कितीदा झाले कळलेच नाही. आमचा नजरेचा लपंडाव सुरु होता . प्रत्येक वेळी मला तिच्या नजरेत प्रश्नचिन्ह दिसत होतं . सारा  प्रवास ह्याच लपंडावात संपला . आमच्या   ग्रुपचे लोक  आपापल्या स्टेशनवर  उतरले .  मी  सावंतांचा निरोप घेऊन   माझ्या नेहमीच्या  भायखळा स्टेशनवर उतरलो अणि थोडं पुढे जातो न जातो तोच मागून एक आवाज आला
" एक्सक्यूज मी , हॅलो..... "
मी मागे वळुन पाहीलं , मागे अँटीव्हायरस उभी होती अणि हाक मारत होती . मला आधी वाटलं की ती दुसऱ्या कुणाला तरी हाक मारत असावी म्हणून मी माझ्या मागे कोण आहे का ते पाहू लागलो .
" हॅलो तुम्हीच.... "
" मी ? " मी पुन्हा खात्री करुन घेतली . ज्या अँटीव्हायरसला मी बरेच दिवस पहात होतो ती अशी माझ्या समोर उभी आहे अणि मलाच बोलावत आहे ह्याचा माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसेना . .
" हो.... " म्हणून तिने जरा श्वास घेतला . मी प्रथमच तिला इतक्या जवळून पहात होतो .  तिच्या ओठांवरचा जो तीळ होता , ज्यावरुन  तिचं  अँटीव्हायरस असं नाव मला सुचलं , तो तर अतिशय मोहक दिसत होता . मी नीट निरखुन पहिलं तिचे केस सरळही नव्हते आणि कुरळेही नव्हते .   मी तिच्याकडे बघतच राहिलो . तिने कशासाठी मला हाक मारली असेल ह्याचा विचार करत असतानाच तिचा प्रश्न आला
" तुम्ही मघाशी माझ्याकडे पहात होता का ? "   तिच्या  ह्या  अचानक प्रश्नावर मला काय बोलवं तेच कळेना  . ह्या प्रश्नात थोडयाश्या रागाची झाक होती.  आता काय उत्तर द्यावे ? आपण पाहत तर होतोच ! ,  पण असा अनपेक्षित प्रश्न आल्यावर उत्तर तरी काय देणार ?  मी तसाच शांतपणे उभा राहिलो .
" हॅलो,  मी तुम्हाला विचारतेय..." तिने पुन्हा त्याच रागात विचारलं . तिच्या कानातले झुमकेही रागाने हलल्यासारखे मला वाटले .  आता माघार घेऊन चालणार नाही कारण आम्ही दोघेही एकमेकांकड़े पहात होतो.
" हो , मी तुमच्याकडे पहात होतो. " मी निर्धारने हे वाक्य  उच्चारल. आणि आता तिच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहू लागलो . मी लगेच  हे कबूल करणार नाही किंवा आढेवेढे घेईन  असं तिला वाटल असावं  . ती माझ्याकडे काहिशा आश्चर्याने पाहू लागली पण लगेचच तिचा राग पुन्हा उफाळून आला .
"  तुम्हाला काय वाटतं हो , की एखादी मुलगी रडायला लागली की तिच्याकड़े सहानभूतीने पहिलं की आपण तिच्यावर फार मोठे उपकार करतोय  ?"
" अहो नाही ...  तुमचा काहीतरी गैरसमज होतोय "
" माझा काहीही गैरसमज झालेला नाही  "
" अहो, पण मला तसं काहीच वाटत  नाही. माझं सहज लक्ष गेलं तर  तुम्ही रडत असल्याचं दिसलं म्हणून मी तुमच्याकडे पहिलं . माझा तसला काही वाईट हेतु नव्हता .
" मला कुणाची सहानुभूति नकोय ... "
" हे बघा,  सहानुभूती नाही देत मी तुम्हाला ...  आणि तुम्हाला जर तसंच काही वाटत असेल तर मी तुमची क्षमा मागतो. आय एम सॉरी "
" सॉरी म्हटलं की झालं का ? तुम्ही पुरुषांनी  कसंही वगायचं आणि आम्ही बायकांनी ते सहन करायचं ... का म्हणून ? आम्ही बायका काही तुमच्या गुलाम नाही आहोत ... अबला नाही आहोत आम्ही ! तुमच्या इछेप्रमाने आम्ही  वागायचं काय ? आणि मग आमच्या इच्छेचं काय ?  "
तिच्या मनाला येईल तसं ती बोलत होती . मी इतकं काय पाप केलं होतं ? मला समजेना . मी तसाच शांत उभा राहिलो . थोडा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ती  दुसऱ्या कुणाचा तरी  राग माझ्यावर काढत होती . आजुबाजुची लोकं आमच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली . मीच ह्या समोरच्या तरुणीची काहीतरी छेड  काढली की काय अशा अर्थाने काही लोक माझ्याकडे बघू  लागले .  एक दोन जण तर थांबून काय चाललं आहे ते पाहू लागले . अँटीव्हायरस  त्यांच्यावरही   घसरली
" क्या है ? क्या काम है ? "

हे असलं ऐकून त्या दोघांनी तर धुमच ठोकली. आता मीच एकटा उरलो.  वर्गात खोडकर मुलाला बाई ज्याप्रमाणे ओरडतात त्याप्रमाणे ती मला ओरडत होती . आणि मी शांतपणे तिचं ऐकुन घेत होतो . थोडया वेळाने तिचा राग शांत झाला. आणि मला  ओरडून ती निघुन गेली . मी एकटाच पुतळ्या प्रमाणे उभा राहिलो ,  पिक्चर संपला … , आजूबाजूची लोकंही पांगली …   जी मुलगी आपल्याला आवडते  तिच्या मनात आपल्यविषयी गैरसमजामुळे  राग निर्माण होणे ह्यासारखे  दुसरे कोणते दुःख असुच शकत नाही ...    इतक्या दिवसांनी अँटीव्हायरस  दिसली पण  पुरती वाट लावून गेली … शिट … !

शुक्रवार, २० मार्च, २०१५

लोकल डायरी -- ६

                                                               
                   मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी 8 वाजून 24 मिनीटांची जलद लोकल आज 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे  .....       मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस को जाने वाली 8 बजकर 24 मिनट की तेज लोकल आज 5 से 10 मिनट देरी से चलाई जायेगी .... mumbai chhatrapati shivaji ......
प्लॅटफॉर्मवर   शिरता शिरताच  अनाउंसमेंट ऐकायला आली . सकाळ सकाळी फालतू बातमी मिळाली .... आता सगळा  दिवस बकवास जाणार ... आपल्याला जेव्हा लवकर  जायचं असतं नेमकं त्यावेळीच लोकलला असा काहीतरी  प्रॉब्लेम येतो . मी आमच्या नेहमीच्या जागी जाऊन पाहतो तो प्लॅटफॉर्मवर  नायर अंकल , सावंत उभे होते . भरत आणि भडकमकर गाडी पकडण्यासाठी प्लेटफॉर्मच्या अगदी टोकावर जाउन उभे राहिले... नेहमीप्रमाणे !  गाडी प्लॅटफॉर्म वर शिरता शिरताच ते चालत्या गाडीत चढतात . मीही पूर्वी तसं करायचो , पण एकदा धावती  गाडी पकडण्याच्या नादात  प्लॅटफॉर्मवरच  साष्टांग नमस्कार घातल्याने मी तो नाद सोडून दिला .
" गुड मॉर्निंग नायर अंकल ....   काय म्हणताय सावंत .... ? "  आल्या आल्या मी  नेहमीप्रमाणे दोघांची विचारपुस केली .
" काही नाही बाबा... गाडीची वाट बघतोय ...  दुसरं काय करणार ? " सावंत गाडी  येण्याच्या दिशेने डोकावून बघत होते .
" काय झालय गाडीला ?"
"   च्यायला , नेहमीप्रमाणे पेंटोग्राफ तुटला... "
"  ये साला पेंटोग्राफ  बी  अपने हिंदी फ़िल्म के हीरो के दिल जैसा लगता   ए ... बार बार टूटता है ... !  " नायर अंकल डोळा मारत म्हणाले   आणि आम्ही त्यांच्या ह्या उपमेची दाद देत त्यांना टाळी दिली .
" रोजचं   नाटक  आहे यार  ...!   आता  उल्हासनगर वरुन सगळे लोक  डाऊन  करून येणार ... "   सावंत  वैतागाने म्हणाले .  आम्ही आमच्या आजुबाजुला  पाहिलं .... प्लॅटफॉर्म  इंडिया - पाकिस्तान  मॅचच्या स्टेडियमसारखा    लोकांनी   खचाखच  भरला होता.
" आज काय आपल्याला बसायला जागा मिळेल असं वाटत नाही. "                     
" भडकमकर आणि भरत गेलेत पुढे .... बघू काय करतात ते ...."
" शरद आज  आला नाही  काय ? "
" नाय दिसला रे ... नायर साब आपको दिखा क्या शरद ? "
"  नय .... आज बी लेट आयेगा लगता ऐ .... कल तो किसीको कुछ बताए बिना चला गया ... क्या हुआ ए  उसको ...?   "
" हो , खरंच...     काय झालं असेल हो सावंत त्याचं ? काल जाम टेंशन मधे वाटला ... "  
"   हम्मम.... मला डाउट वाटतोय .... नक्की कायतरी पोरीबिरी चा मॅटर असेल ... "
" कशावरून .... ? "
" अरे हे असं  उदास उदास राहणं ....  कुणाशी काहीही न बोलणं ....आणि मुख्य म्हणजे दाढी  वावणं   हे कशाचं लक्षण आहे असं तुला वाटतं ?  "  
"  आयला .... हे असं असेल का ? "
" मग काय ?  अनुभवाचे बोल  आहेत बाबा ...  "
" अनुभवाचे बोल ..? म्हणजे सावंत .... तुम्ही पण हे असं दाढी वाढवून ....? "  मी असं बोलत असतानाच नायर अंकल सावंतांना म्हणाले , " वो लेडी आपको बुला रही है ..."
मी त्यांच्या   मागे  पाहिलं   तर त्या ह्याच बाई होत्या ज्यांनी    त्या दिवशी सावंतांकडे बघुन स्माईल केलं होतं .  आणि सावंत सुद्धा एखाद्या प्रेमात पडलेल्या कॉलेजकुमारासारखे वागत होते .  प्रेमाला वय नसतं हेच खरं ... ! सावंत तिकडे गेले . मी त्या दोघांकडे पहात उभा राहिलो . सावंतांच्या दाढी वाढवण्यासाठी ह्या बाई कारणीभूत असाव्यात का ?   एक शंका मनात येऊन गेली .  विचार करता करता माझं  लक्ष सहज  समोरच्या प्लॅफॉर्म वर गेलं . पहातो तर समोरच्या प्लॅटफॉर्म वर  अँटीव्हायरस उभी   ! अरे देवा !  तिने ट्रेन बदलली वाटतं ...
"  ये लेडी कौन है ?  पेहेले कबी देका नय ? " नायर अंकल  विचारू लागले .  मी दचकलोच ! नंतर लक्षात आलं की ते  अँटीव्हायरस बद्दल नसून त्या बाईंबद्दल विचारत होते .
" मुझे भी नहीं पता अंकल ... "  
" सावंत का चेहरा सडनली  किल गया ... एकदम कुश हुआ वो , इसलिए पुछा ..."  नायर अंकलना पण लगेच त्यांच्या  वागण्यातला फरक जाणवला . मी काही बोलणार इटक्यात स्टेशनवरच्या उभ्या असलेल्या लोकांमधे गडबड सुरु झाली . आम्ही  पहिलं तर गाडी स्टेशनमधे शिरत होती . लोकल स्टेशनला लागण्याच्या आधीच प्लॅटफॉर्म वरच्या लोकांनी तिच्यावर हल्ला चढवला.   कुणी चालत्या गाडीत चढत होते…  कुणी उतरत होते .... कुणी धडपडत होते ...कुणी ओरडत होते.  युद्धजन्य परिस्थिती झाली  ...  हलकल्लोळ झाला एकदम ...! आम्ही त्या गोंधळात कधी सामील झालो ते आम्हाला ही कळले नाही . आत जाऊन पाहतो तर  आमची जागा  भडकमकर आणि भरतने पकडली होती  आणि आश्चर्य म्हणजे जिग्नेस सुद्धा डाऊन  करुन आला होता .  मी  जोराची धावपळ करत जागा पकडली . नायर अंकल सगळी गर्दी कमी झाल्यावर निवांत चढले.  मी त्यांना माझी बसायची जागा दिली .  सगळे आले पण सावंत कुठे  दिसेनात.  मी त्यांना डोअरच्या दिशेने शोधु लागलो . पण ते अद्याप ट्रेन मधे चढलेच नव्हते .
" शरद आज  आला नाही का ? त्याचा फोनपण लागत नाही .  " भरत मला विचारत होता .
" मला नाही दिसला रे ... " म्हणत मी खिडकीबाहेर  सावंतांना शोधु लागलो . पण मी जे पहात होतो  त्यावर आणि  माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास  बसेना .  ते लेडिज डब्याच्या दाराशी उभे होते , मघाच्या बाईंशी बोलत !! सावंत... आणि लेडीज डब्यापाशी ?  काय प्रकार आहे हा ?    गाडीचा हॉर्न वाजला . तसे ते धावत पळत आमच्या डब्यात शिरले.
" सावंत , जरा आरामात .... "  रवीने त्यांना टोमणा मारला. सावंत आमच्या बसायच्या जागेवर आले . मी त्यांच्याकडे आश्चर्याने पहात असताना त्यांनी डोळे मिचकावले. आणि माझ्या बाजूला येऊन व्हिडिओ कोचकडे तोंड करुन उभे राहिले .
"  आज सबसे ज्यादा  कुश   कोई होगा तो वो सावंत है ! " नायर अंकल मिश्किल  चेहरा करुन म्हणाले .
" क्या हुआ अंकल ?" भरत विचारू लागला .
" नया दोस्त मिला उनको ... इसीलिए बहुत कुश है ...। " नायर अंकल व्हिडिओ कोचकडे नजरेने खुणावत म्हणाले .
" आ ...ssss  सावंत ... लै भारी .... "  म्हणत भरत त्यांना चिडवायला लागला .
" ऐसा कुछ नहीं ...।  जुनी  ओळख आहे . बास बाकी काय नाय ... " सावंत म्हणाले .
"   सावंत ..... मजा आहे ....! " भडकमकर  म्हणाले .  
"  चलो , आज पार्टी... "  जिग्नेस
" सावंत , सही ना.... ,  छुपे रुस्तम निघाले…  " , भरत  म्हणाला .    आमचा ग्रुप म्हणजे  काही बोलायची सोय नाही. एखाद्यावर घसरले की घसरले !   समोरच्याला रडकुंडीला  आणतात  अगदी  ! सावंत मात्र   शांत उभे राहिले.  थोड्या वेळाने मंडळी आपोआप दुसऱ्या विषयवार वळली .  ट्रेन कल्याणला पोहोचली आणि मी हळूच सावंतांच्या कानात म्हणालो , " सावंत ह्या त्याच बाई आहेत ना.... त्या दिवशीच्या  ?" तर त्यांनी पुन्हा डोळे मिचकावले . मला तर त्यांची गंमतच वाटली.
" सावंत , काय नाव आहे त्यांचं ? "  त्यांनी एकदा माझ्याकडे पहिलं . मी त्यांचं हे सीक्रेट कुठे फोडणार तर नाही ना  , याचा ते अंदाज घेत होते बहुतेक ... " मी नाही सांगणार कुणाला ... शप्पथ !! " त्यावर ते नुसतेच हसले .
"  जोशी .... शकुंतला   जोशी   "
" शकुंतला ....  वॉव ... मस्त नाव आहे . एकदम जुनं आणि भारी .   त्या शकुंतला ...  आणि तुम्ही कोण दुष्यंत ?? " मी गमतीने म्हणालो.
" अरे ए ... येडा बीडा आहेस काय ? काय पण जोड्या जुळवु नको. ती माझ्या शाळेत होती  तेव्हा आवडायची आणि त्याला आता जवळ जवळ   तीसेक वर्ष झाली आहेत .   आता तसं काही नाही ." ते पुरते गोंधळून गेल्यासारखे वाटत होते .

" त्यांच्या मनात तुमच्याविषयी नक्कीच काहीतरी आहे . तसं काही नसतं  तर मग इतक्या वर्षांनी  तुमच्याशी बोलायला    कशाला आल्या असत्या  ?  " मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना लगेच काही उत्तर सुचलं नाही . त्यावर त्यांनी काहीतरी थातुर मातुर कारण दिलं जे त्यांनाही नीट पटवून देता आलं नाही . ते माझी नजर चुकवून मुद्दाम इकडे तिकडे पाहू लागले . मग मी त्यांना काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही  . जिग्नेस आणि भरत बरोबर भंकस करत उभा राहिलो . मी मधून मधून सावंतांकडे  त्यांना कळणार नाही अशा रीतीने पहात होतो . ते कोणत्या तरी गहन विचारात बुडालेले दिसत होते .  शाळेत , कॉलेजात असताना  मित्रांच एकच वाक्य   आपल्या आयुष्याची उल्थापालथ करु शकतं  , ते वाक्य म्हणजे ' ती तुझ्याकडे बघत होती '  आताही मी त्यांना विचारलेला प्रश्न सुद्धा त्याच धाटणीचा होता .   त्यांच्या मनात मागील काळाच्या आठवणी आणि चालू काळाची सध्याची परिस्थिती  यांचे मिश्रण सुरु  असल्यासारखं  वाटत होतं .  कधीकधी  मनात  अशा काही गोष्टी असतात त्या पुन्हा आठवून त्यावर विचार करण्यास मन सहसा  तयार नसतं . आपण त्या  गोष्टी   टाळत असतो . परंतु एखाद्या  तिर्हाईत व्यक्तिकडून  तीच  गोष्ट समोर आली की मनातल्या सुप्त  अवस्थेत असलेल्या निखाऱ्यांवरची राख उडते आणि मन नकळत पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करायला लागते . आपल्याही  नकळत  ! आजही  तसंच काहिसं झालं होतं ....
www.milindmahangade.blogspot.com

रविवार, १५ मार्च, २०१५

लोकल डायरी -- ५



   गाडी  सुटता सुटता एकजण धडपडत आत आला .  आधी तर आम्ही त्याला ओळखलंच नाही . तो शरद  होता …   आज तब्बल सात  दिवसांनी शरद लोकल मधे आला होता  आणि   तोही उशिरा …! त्याला बघुन तर आमच्या ग्रुपचा प्रत्येक मेंबर आश्चर्यचकित झाला .    कारणही तसंच होतं . वाढलेली दाढी , बिना इस्त्रीचा शर्ट  तोही इन न केलेला  , तारवटलेले डोळे ,  केस   विस्कटलेले  आणि मुख्य म्हणजे तो अगदी शांतपणे येऊन आपल्या जागी बसला . आल्या आल्या ना कुणाची भंकस  केली ना  कुणाशी  काही बोलला ....  खाली  मान घालून बसून राहिला . हे म्हणजे वाल्याकोळीचा  वाल्मीकी  झाल्यासारखं होतं . अनायसे  रामायण सीरियल मधल्या वाल्मिकींएवढी  नाही तरी लहानशी  दाढीही वाढवलेली होतीच …!    तो असा येऊन बसला , आमच्या कुणाला काय बोलवं तेच कळेना . शेवटी  सीनियर मेंबर सावंतच पुढे  झाले  
" काय रे शरद ? हे काय   ? आणि तू हे काय करुन घेतलस स्वतः चं ? "  
त्यावर तो काहीच बोलला नाही . नुसता मान खाली घालून  बसून राहिला . नायर अंकलही विचारू लागले पण त्याच्यात काहीच फरक पडला नाही . तो डोळे बंद करुन स्वस्थपणे बसून राहिला . आज शरदचं नक्कीच काहीतरी बिनसलं होतं . सावंतांनी खुणेने भरतला ‘ काय झालंय  ? ‘ विचारलं . पण त्याने खांदे उडवले.  त्याला  काही  माहित नव्हतं . तोही आमच्यासारखा त्याच्याकडे  आश्चर्यने पहात होता.
" ए भाई , काय  झालाय काय तुला  ? गेले   पाच सहा   दिवस ट्रेनला आला पण नाहीस ... आणि आज हा असा अवतार का करुन घेतलायस् ?  घरी काय प्रॉब्लेम नाही ना ?  "  भरतने  त्याला विचारण्याचा प्रयत्न करुन पाहीला . तरी काही उत्तर नाही.  भरतला ते सहन झालं नाही . त्याने परत  त्याच्या दंडाला हलवुन विचारलं , तसा तो एकदम भडकला , " प्लीज मला काहीही विचारू नका .  मला  एकट्याला राहु दया  ....प्लीज !   "  तो असं बोलला आणि मग सगळेच शांत बसले . पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता , तो म्हणजे शरदचं हे असं का झालं ? " नायर अंकलने भरतला शांत रहा असं  खुणावलं . इतक्यात गाडी निघाली . उल्हासनगरला जिग्नेस चढला . तो  नेहमीप्रमाणे धड़पडत आला आणि  चुकून  शरदच्या  पायावर त्याचा पाय   पडला . शंकराने तिसरा डोळा उघडावा तसे त्याने आपले डोळे उघडले .
" अबे साले , दिखता नई क्या तेरेको ? "  म्हणत शरदने त्याला दुसरीकडे ढकलुन दिलं .
" शरद भाय ... यार ढकेलता क्यूँ है ? " स्वतःला सावरत जीग्नेस म्हणाला .
" तो क्या तेरेको सर पे बिठाऊँ ? " शरद भडकुन म्हणाला .  जिग्नेसलाही त्याच्या वागण्यातला फरक जाणवला . त्याने मला नजरेने  विचारलं . मीही त्याला नजरेनेच शांत रहा असं खुणावलं.
“ शरद यार , काय झालंय  ?  काय प्रॉब्लेम  असेल तर सांग  ना … आपण सॉल्व  करू  … ” मी शरदला म्हणालो .
“  प्लीsss ज …   ”  शरद अगदी हात वगैरे जोडून म्हणाला .  ‘ मला काहीही विचारू नका ‘ असाच त्या ‘ प्लीज ‘ चा अर्थ होता . शरदला  आणखी  विचारून  काही फायदा होणार नाही हे आता  आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला   कळलं होतं .  सगळे जण नेहमी प्रमाणे वागू लागले . शरद आमच्यात नाही असं समजून आमच्या गप्पा सुरु झाल्या .
" नायर अंकल ,  मेरा नया शूज देखिये ....। "  जिग्नेस म्हणाला
" अरे वा... सॉलिड है ... कहाँ से लिए ....? "
" यु एस ए "
" ओह .... मतलब  तेरे घर के बाजुसे   ना ? " सावंत भरतला टाळी देत म्हणाले .
" अरे नहीं ... सच्ची यु एस ए से ही लिए है .... मेरे अंकल है वहां पे । उन्होंने भेजे है । एक्चुली मेरे जिगरी   दोस्त को  दिखाना था लेकिन वो तो बोहोत भाव खा रहा है । " जिग्नेस शरदला टोमणा मारत म्हणाला . शरद मात्र समाधीच्या अवस्थेत गेलेल्या ऋषीसारखा  गंभीरपणे  डोळे मिटून बसला होता . परंतु त्याचे कान अर्थात आमच्या बोलण्याकडे आहेत असं  आम्हाला वाटत होतं  .
" वो क्या है न जिग्नेस , आज कल  कोई किसीका नहीं है ....।  सब अपनी अपनी सोचने मैं लगे रहेते है । " नायर अंकल सुद्धा  अप्रत्यक्षपणे  शरदलाच उद्देशून  बोलत होते .
" घोर कलियुग आलय बाबा... " भडकमकर मधेच म्हणाले . ते कधी काय बोलतील याचा नेम नाही.  त्यानंतर जीग्नेसने आपला  मोबाईल  काढला आणि त्यावर कोणत्या तरी डान्सचा  व्हिडीओ पाहत उभा राहिला . मीही  त्यात डोकं घालून पाहू लागलो .
“ अरे , एवढं  काय पाहताय ? आम्हाला पण दाखवा …   ”  सावंत विचारु  लागले  . जीग्नेसने त्यांना  आपला मोबाईल  दिला . “ ह्याच्या पायाला मुंग्या  चावल्यासारखा  पाय झाडत का नाचतोय हा  ? ” सावंत गमतीने म्हणाले . त्यावर सगळे हसले ,  शरद सोडून !
“ अरे  नही  उसको  Tap  डान्स  बोलते है  … धूम ३ में अमीर खान ने नै किया था ?  ”
“ अब तू ये नये शूज पेहेन्के  Tap  डान्स  करके दिखा … ” भरत म्हणाला .
“ नही  बाबा … अगर फिरसे  किसीके  पैरोपे  पांव  गिरे तो भगवान शंकर अपनी तिसरी  आंख  खोलेंगे … ”  जीग्नेसने   शरदकडे  एक चोरटा  कटाक्ष टाकला .  अशी सगळी मजा  मस्ती चालू होती पण त्यात नेहमीचा सहजपणा नव्हता .  आपल्या एखाद्या अवयवाला जर दुखापत झाली असेल तर  जसं  आपलं  लक्ष सारखं  सारखं  त्याच अवयवाकडे  जातं  त्याप्रमाणे आज आमचं  झालं  होतं  . आम्ही  अधून मधून शरदकडे  पाहायचो  पण त्याचे डोळे मिटलेलेच राहिले .  आज  व्हिडीओ कोच कडे  कुणाचं  लक्षही  गेलं  नाही . ना कुणी त्याबद्दल काही बोलले …  नेहमी विंडोत  झोपणारे भडकमकरही  आज जागे राहिले . हा तर रेकॉर्डच झाला आज ! पारसिकचा बोगदा लागला आणि डोअर वरच्या रवीच्या ग्रुपने ‘ जय  भवानी … जय अंबे … ‘  चा जयघोष सुरु केला .  आमच्या  जागा अदलाबदली  करणं  सुरु झालं  . सावंत , भरत  उभे  राहिले . मी आणि जीग्नेस त्यांच्या जागेवर बसलो . शरद  तसाच डोळे मिटून बसून राहिला . त्याला त्याच्या जागेवरून उठवण्याची रिस्क कोण  घेईल ?  आम्ही त्या भानगडीत पडलोच नाही .  ठाणे गेलं  , शरद  आपल्या जागेवरून उठला आणि डोअरच्या दिशेने जाऊ लागला .  
“ आयला , असा काय हा ? न सांगताच गेला !  सावंत,  जाम मोठा लोचा झालाय बहुतेक … ” भरत  त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला . शरद-  भरत  दोघे नेहमी घाटकोपर गेलं  कि मग बरोबरच गोंधळ घालत निघतात आणि कुर्ल्याला उतरतात . पण आज असं  झालं  नाही . तो भरतला न सांगताच पुढे गेला . तेही सर्वांना खटकलं  .
“ हो रे… बघ ,  कुर्ल्याला उतरल्यावर तरी काय बोलतो का ? तुला सांगेल कदाचित … ” मी  भरतला म्हणलो.  

कुर्ला आलं . तुडुंब भरलेल्या  धरणाच्या  लहानशा दरवाज्यातून पाणी सोडावं  तसे लोक धडाधड  त्या दरवाज्यातून बाहेर पडले .  आणि तितकेच पुन्हा आत आले .  आम्ही खिडकीतून बाहेर पाहू लागलो ,    भरतला  न भेटताच शरद निघून गेला होता .

रविवार, ८ मार्च, २०१५

लोकल डायरी -- ४

                                                                         
नमस्कार मित्रांनो …!!
बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहितोयकाही दिवसांपूर्वी  लोकल डायरी  ही  मालिका  लिहित होतो , पण काही कारणामुळे ती अर्धवट राहिली  .  लोकल डायरी  अर्धवट सोडल्याबद्दल क्षमस्व …. !  ह्या डायरीचे तीन भाग पूर्वी प्रकाशित केले होते पण आता  त्याला बरेच दिवस झाले . त्यासाठी ते तीनही भाग सोबत जोडत आहे …  

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html     लोकल डायरी २

http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html   लोकल डायरी ३

  आणि आता  पुढचा भाग लिहितोय


                                                                  लोकल  डायरी --  ४

                                  आमचा लोकलचा ग्रुप हा इतर ग्रुप पेक्षा एकदम  भारी आणि यूनिक आहे असं काही माझं म्हणण नाही . आमची फक्त एकमेकांना सवय झालीय एवढंच ! मनुष्याचा स्वभावच असतो तसा ... तो जास्तीत जास्त आहे त्या परिस्थितीत तसाच राहण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत त्याला स्वतःला काही त्रास होत नाही….  आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर येण्याचा प्रयत्न शक्यतो कुणी करत नाही. आमचा ग्रुपही त्याला अपवाद नव्हता . एवढंच काय , आमच्या बसायच्या जागेत दूसरा कोणी आला तरी आम्हाला  कसतरीच   वाटायचं ... आणि आमच्या पैकी सुद्धा कोणी दुसरीकडे जाऊन बसला तर त्यालाही अगदी दुसऱ्या ग्रहावर आल्यासारखं वाटत असावं . भड़कमकर विंडोत दिसले नाहीत , नायर अंकल नसले , सावंतांनी पेपर वाचायला आणले नाहीत  किंवा शरद भरत विडिओ कोच कड़े पाठ करुन उभे राहिले किंवा जिग्नेस ने काही बावळटपणा केला नाही तर चुकल्या चुकल्या होतं . प्रत्येकाची  वेगळी अशी एक खासियत आहे. प्रत्येकाला त्याच्या एका विशिष्ठ स्थितीत पाहण्याची सवय झाली आहे . आणि माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे अँटीव्हायरस  !!!  अजूनही मला तिचं  नाव कळलेलं  नाही त्यामुळे मी तिला  अँटीव्हायरसच म्हणतो …  ती दिसली नाही तर संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो . ती आली की सगळं वातावरण कसं प्रसन्न होऊन जातं. संजीवनीच जणू !!! एखाद्या व्यक्तीच्या येण्याने इतका फरक कसा काय पडावा ? कदाचित माझ्या नजरेलाही तिची सवय  झाली असावी .  पण आज काल ती ट्रेन ला दिसत नाही . किती दिवस ती मला दिसली नाही .... ?  हां... आजचा धरून नऊ  दिवस झाले . मी दिवस मोजतोय ह्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच !  नजर सारखी व्हिडिओ कोच कडे वळते. स्टेशन वर आल्यापासून माझे डोळे सतत तिलाच शोधत असतात. कानात इअर फोन घालून ती डब्यात दरवाज्यापाशी उभी आहे असा सारखा मला भास होतो  . मी तिकडेच बघत असताना ,  रादर तिलाच शोधत असताना  माझ्या पाठीवर एक जोराची थाप पडली. मी दचकुन पहिलं तर मागे भरत उभा होता.
" काय रे ... काय चाललय ? " त्याच्या विचारण्यात मिश्किलपणाची झाक होती .
" काय नाय रे ... पोरी बघत होतो ... दुसरं काय करणार ? " त्याला अपेक्षित असलेलं  उत्तर मी   देऊन टाकलं, त्यामुळे त्यालाही संशय घेण्यासारखं काही वाटलं नसावं . तोही मला मजेत टाळी देत म्हणाला , " हो बाबा,  हे मात्र महत्वाचं काम आहे ."
मग आम्ही इकडे तिकडे बघत बसलो.   शरद आला नव्हता.  त्यामुळे भरत आज माझ्याशी गप्पा मारत होता . एरवी ते दोघे इतरांची खेचत असतात . एकाने सुरूवात केली की दुसरा सुरू होतोच  . पण आज त्याचा उजवा हात नसल्यासारखं त्याला वाटंत असावं . आणि टाईमपास करायला दुसरा कोणी नसल्याने तो माझ्याशी बोलु लागला .
" काय रे ? तुझा भाऊ कुठं आहे ? " , सावंतानी  भरतला  विचारलंच !
" आज येणार नाही तो ...." भरत व्हिडिओ कोच कडे नजर टाकत म्हणाला .
" किधर गया है ? " नायर अंकल विचारू लागले .
" मालूम  नही…  "
" अरे , तेरा दोस्त है और तेरेकोही  मालूम नही ? "
" दोस्त है अंकल , बिबी थोडी है ? " त्याच्या हया उत्तरावर सगळे हसले . उल्हासनगरला जिग्नेसही चढला नाही.
" अरे , जीग्नेस भी नही आया …. बघा दोघे कुठे गेले नाहीत ना ? " सावंत गमतीने म्हणाले . आज दोन महत्वाची माणसं नव्हती , एक खिल्ली उडवणारा आणि दुसरा खिल्ली उडवुन घेणारा .... त्यामुळे डब्यात शांतता होती . मलाही आज कंटाळा आला होता . पलीकडे अँटीव्हायरस नसल्याने आणखीनच बोअर होत होतं. लोकलने कल्याण सोडलं आणि भड़कमकरांची गाडी घाटाला लागली . ते ट्रेन जशी हालेल तसे नागोबासारखे डोलत होते. सावंत पेपर वाचत बसले . नायर अंकलचं मात्र दोन्हीही चालू होतं. ते पेपरही वाचत होते आणि  मधून मधून  डुलक्याही काढत होते. आमच्या बसायच्या जागेवर एक कुटुंब आल्याने मी अणि भरतने त्यांना बसायला जागा दिली आणि आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या आवडत्या कामाला लागलो . मी बघत असताना भरत माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला ," ती ग्रीन ड्रेस वाली मुलगी आहे ना… ”
" कुठे रे ? " मीही त्याच हळू आवाजात विचारलं .
" अरे ती बघ ना समोर,  डोअरपासून तिसरी.... "
" हां…  हां… . पण तिचं काय ? "
" ती आता ठाण्याला उतरून एका आशिष नावाच्या मुलाला भेटणार आहे ." भरत अतिशय आत्मविश्वासने बोलत होता .
" तुझ्या ओळखीची आहे का ती ? "
" माझी कसली डोंबलाची ओळख !! मी तिला फोन वर बोलताना पहिलं "
" तुला एवढ्या गोंधळात कसं काय ऐकायला आलं ? " इतक्या अचूकपणे त्याने हे सांगितल्यामुळे मला जरा आश्चर्यच वाटलं.
" अरे ऐकायला कसं येईल ? मी तिचे लिप्स रीड केले. तिच्या ओठांच्या हालचालीवरुन मी हे सांगू शकतो ." भरतने दिलेल्या ह्या स्पष्टीकरणावर तर मी त्याच्याकडे पहातच राहिलो .
" आयला... पोरी पटवण्यासाठी माणसं काय काय करतात ... धन्य आहे ... " मी त्याच्याकडे अविश्वासने पाहू लागलो.
" पोरी पटवण्यासाठी नाही रे बाबा ... माझा चुलत भाऊ बहिरा आणि मुका आहे . त्यामुळे आम्हाला त्याच्याशी बोलताना असंच खाणाखुणा करुन आणि ओठांच्या हालचाली वरुन बोलावं लागतं. मीही ती लिप रीडिंग शिकलो आणि  त्यामुळे मला ती सवयच लागली आहे . कोणी लांब जरी बोलत असेल अणि फक्त लिप रीडिंग करुन मी सांगू शकतो की तो माणूस काय बोलतोय ते ..."
" आयला भारीच की आहे हे !!!  बर चल सांग त्या निळ्या साडी वाल्या काकू काय बोलतायत शेजारच्या काकुंशी ? "
" कोणत्या ? ओह  त्या का ... ?  थांब , मला थोडा वेळ निरिक्षण करू दे ...." म्हणत भरत त्या कामाला  लागलाही ! तो डोळे बारीक करुन एकटक त्या निळ्या साडीवाल्या बाईँकडे पाहू लागला.
" अरे ए ... एवढं एकटक बघू नकोस ... त्या बाईंना काहीतरी वेगळाच संशय यायचा... मार खाशील फुकटचा ! "
" गप रे काय होत नाही.... " तो तसाच नजर न हटवता म्हणाला . असंच अजुन 3 -4 मिनिटे एकटक पाहिल्यावर तो म्हणाला , " ती तिच्या ऑफिस मधल्या एक बाई बद्दल बोलत आहे आणि ती तिची सीनियर असावी "
" कशावरून ? "
" ती म्हणत होती की, " त्या सटवीचं प्रोमोशन काय झालं स्वतःला फार शहाणी समजायला लागलीय... "
" काय ... ?  असं म्हणाल्या त्या बाई ? " मला मोठी गंमतच वाटली.
" हो ... मी माझ्या डोळ्यांनी ऐकलय ...."  म्हणत तो मिश्किल पणे हसु लागला .
"  मस्तच रे ... मानला यार तुला .... कडक !!! पण मला अजुनही जरा शंका वाटतेय ..."
" आयला , आता एवढं तुला प्रात्यक्षिक करुन  दाखवलं तरी तुझा विश्वास नाही ? "
" आता मला काय माहित की त्या बाई खरंच असं बोलत असतील ते ? तू सांगितलस म्हणून मी आपलं हो म्हणतोय ... "
" आई शप्पत ..... भरत ला चॅलेंज  !   ” मी नकळत   भरतचा  स्वाभिमान   दुखावला   होता  .
" नाय रे बाबा ... तुला कशाला चॅलेंज देऊ  ? " मी आपलं सावरण्याचा प्रयत्न करु लागलो .
" नाय .... नाय .... तुझा विश्वास बसत नाही ना ? चल ...  तू आवाज न करता फक्त ओठांची हालचाल करुन एखादा शब्द बोल .... मी तो ओळखतो ..."
" अरे जाउ दे रे बाबा ... "
" नाय ... आपल्यावर  अविश्वास ? बोल बोललो ना आवाज न काढता  एक शब्द ." भरत एकदम इरेलाच पेटला...
भरत आता मला तसं सोडणार नव्हता , हे माझ्या लक्षात आलं . आता त्याला कोणता तरी  शब्द द्यावा लागणार होताच . कोणता शब्द द्यावा ? मी मनात विचार करू लागलो . आता शब्द दिला तर जरासा अवघडच द्यावा , म्हणजे जिरेल जरा त्याची असा विचार करुन मी एक शब्द ठरवला. भरत माझ्याकडे लहान मुलाच्या कुतुहलाने पहात होता.  त्याचं तसं ते तोंड बघुन तर मला हसायला यायला लागलं .
" हसतोस काय साल्या .... बोल ना आता ... "
" ओके ... ओके... ऐक .... सॉरी... बघ...." म्हणत मी मनात ठरवलेला शब्द आवाज न काढता नुसत्या ओठांच्या हालचालीवरुन बोलून दाखवला ....तो माझ्याकडे  निरखून पाहू लागला . अन म्हणाला , “ सोप्पय  … ”
“  सांग  ना मग,   मी काय बोललो ते  !  ”
 त्याने जे उत्तर दिलं त्यावर माझी बोलतीच बंद झाली .
तो म्हणाला  -  " अँटी व्हायरस ! "