बुधवार, १ मे, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १४ … ( अंतिम भाग )

श्रीनगर मधल्या हॉटेलच्या बाहेर सकाळी पाहीलं तर दोन हत्यारबंद सैनिक पहारा देत उभे होते. श्रीनगर मधे गोंधळ चालु होता.  कर्फ्यु लावण्यात आला असल्याने वातावरण तंग होते.   काश्मिरसारख्या स्वर्गात हे सैनिक बिचारे नरकयातना भोगत असलेले बघुन मला खरंच वाईट वाटलं... आम्ही लवकर आवराआवरी केली.  आज आमचा दुचाकीवरचा शेवटचा दिवस होता. जम्मु मधे पोचल्यानंतर आमच्या गाड्या रेल्वेच्या बोगीने स्वतंञपणे येणार होत्या. आमची परतीची रेल्वेची तिकीटे अजुन कन्फर्म झाली नव्हती... ते एक टेन्शन होतंच... रस्ता चांगला असल्याने गाड्या सणाणत निघाल्या... लडाखचा रस्ता एकलकोंडा होता , पण आता इथल्या रस्त्याला सर्वञ रस्त्याच्या दुतर्फा दुकाने,  रहदारी होती... सकाळी नाष्ट्यासाठी एका पंजाबी हॉटेल मधे थांबलो. पंजाबी हॉटेल म्हटलं की पराठे आलेच...खाऊन निघालो. अमरनाथ  याञेमुळे  रस्त्यावर सर्वञ  गाड्याच गाड्या. त्यातुन वाट काढत आम्ही निघालो... आता ऊन 'मी' म्हणत होतं. श्रीनगर हुन  काश्मिर खोऱ्यात जाण्यासाठी एक बोगदा लागतो,  जवाहर टनेल ... तो भलामोठा बोगदा पार केल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी लाईट गेल्यावर होते तशी परीस्थीती झाली. वातावरण एकदम बदललं, अगदी जाणवे इतपत ...! थंडगार वातावरण एकदम उष्ण वाटु लागलं...  
हायवे वर बरेच मजेमजेदार स्लोगन लिहीलेले होते... " पीप पीप , डोंट स्लीप... " , " अगर रफ्तार का इतनाही शौक है तो पी टी उषा बन जाओ..." तसेच " प्लीज , बी सॉफ्ट ऑन माय कर्वस्..." अशासारख्या द्वयार्थी पाट्याही लावलेल्या दिसत होत्या . आत्ताचा रस्ता म्हणजे संपुर्ण घाट आणि तोही भरपुर ट्रॅफिक असलेला ...समोरच्या गाडीला बराच वेळ ओव्हरटेकही करता येत नव्हतं... जीव मेटाकुटीला येणे म्हणजे काय ते त्यावेळी आम्हाला कळाले... जम्मु ला आज पोहोचणं अतिशय गरजेचं होतं. कारण आम्हाला परतीची पर्यायी व्यवस्था करावी लागणार होती... संध्याकाळच्या सुमारास आम्ही जम्मु पासुन ५० - ६० किमी असु तेव्हा गच्च आभाळ भरुन आलं. जसजसे पुढे जाऊ तसतसे ते आमच्या मागेच येऊ लागले. पाउस पुन्हा आपली गोची करणार असे वाटून आम्ही गाड्या सुसाट सोडल्या . पण शेवटी चपळ शिकारामागे धावुनही ती हातात येत नाही असे समजल्यामुळे पावसाने माघार घेतली… आता जम्मु काही लांब नव्हतं. त्यामुळे आपण सुखरुप पोहोचु अशी मनात खाञी वाटु लागली... पण खाञी देता येईल अशी कोणतीही गोष्ट ह्या सबंध प्रवासात घडलेली नव्हती तर ती आता तरी कशी घडेल… ?  पाहतो तो समोर गाड्यांच्या रांगा दिसल्या ... सुरुवातीला वाटलं काही  काम चालु असेल... पण हळुहळु जागा मिळेल तसे पुढे गेलो तर गाड्याच गाड्या उभ्या होत्या ... हे काही निराळच प्रकरण आहे हे आमच्या लक्षात आलं … जवळपास ८-९ किलोमीटर अंतरावर ट्रॅफिकमुळे गाड्या अडकल्या होत्या ... त्यातुन आमच्या गाड्या काढणं म्हणजे चक्रव्युह भेदण्यासारखं होतं ... कधी दोन गाड्यांच्या चिंचोळ्या जागेतुन तर कधी रस्ता सोडुन आडमार्गाने  आमचे अभिमन्यू जिथुन मिळेल तिथुन गाड्या घालत होते... आता शेवटची हातघाईची लढाई सुरु झाली... लक्ष - कोणत्याही परिस्थीतीत लवकरात लवकर जम्मु गाठणे... शर्यतीचा शेवटचा टप्पा असतो तसा... पप्या, संदीप आणि खोप्या यांच्या ड्रायविंगला मानलं आपण...! त्यांनी चपळाई करुन गाड्या काढल्या नसत्या तर आम्ही सकाळपर्यंत तिथेच अडकलो असतो. रात्री ९च्या सुमारास कसेबसे आम्ही जम्मु मधे पोहोचलो.. आता सर्वात कंटाळवाणं काम म्हणजे हॉटेल शोधणे... पण आमच्या नशिबाने एक चांगलं हॉटेल मिळालं - हॉटेल विवेक.  त्याचा मालकही चांगला होता. आमच्या परतीच्या तिकीटांचा प्रश्न त्याला सांगितल्यावर त्याने लगेच दोन- चार फोन फिरवले... परंतु त्याचा फारसा काही फायदा झाला नाही. सकाळी तत्काळ तिकीटांसाठी जम्मु स्टेशन वर जाण्याचा सल्लाही त्याने दिला. आम्ही सर्व जण एका मोठ्या प्रशस्त रुम मधे राहीलो...हॉटेल छान होतं आणि जेवणही … दुसऱ्या दिवशी पहाटे खोप्या आणि संदीप तत्काळची तिकीटे मिळवण्यासाठी तिकीट खिडकीपाशी नंबर लावायला गेले... थोड्या वेळाने मी आणि पप्या  गेलो तर तिथे भलीमोठी रांग लागलेली दिसली...रांग काही पाठ सोडत नव्हती...  आमचा नंबर बराच मागे होता... बऱ्याच वेळाने जेव्हा गेट उघडलं तेव्हा शाळा सुटल्यावर मुलं जशी पळतात तशी सगळी माणसं तिकीट खिडकी कडे पळत सुटली ... एकच झुंबड उडाली... त्या गोंधळात  खोप्याने चपळाई करुन  पुढचा नंबर पटकावला ... आता आम्ही तिकीट खिडकीच्या बरेच जवळ आलो होतो. मग रांगेतल्या माणसांची जागेवरुन भांडणं, आरडाओरडा,  गोंधळ सुरु झाला. खिडकी उघडली ... तत्काळची तिकीटे इतक्या तत्काळ संपतील ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती... भल्या पहाटे तिकीटे काढण्याचा प्रयत्न असफल ठरला... आमच्यापुढे आता फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहीलं ... घरी जायचं कसं?  कारण एवढ्या लांबचा प्रवास, भरपुर सामानासकट , बिना रिझर्वेशन कसं जाणार...? डोक्याला हात लावुन बसायची पाळी आली... कुणीतरी म्हणाले " प्लेन ने जाऊ... " आधी तो विचार म्हणजे अतिशयोक्ती वाटली पण नंतर  त्यातले फायदे लक्षात आले... आम्ही चारपाच तासात घरी जाणार होतो... शिवाय एक दिवस आधी... ऑफिसला जाण्याआधी एक दिवस आराम... पप्या, पियु आणि खोप्या यांनी विमानप्रवास आधी केला होता... पण माझा आणि संदीपचा हा पहिलाच विमान प्रवास … ! त्यामुळे आमच्याकडुन तर होकार होताच... प्लेनच्या तिकीटाचे जास्तीचे ५ -६ हजार माञ जाणार होते .. परंतु एवढ्या सगळ्या फायद्यासमोर हा  तोटा सोसण्याजोगा होता. शेवटी सर्वानुमते ठरवलं... खोप्या आणि संदिप त्या कामाला लागले... माझा तर पहीलाच विमान प्रवास , त्यामुळे मला आधीच आकाश ठेंगणं झालं होतं... आता आणखी महत्वाचं काम म्हणजे गाड्या पार्सल करणे... जम्मु स्टेशनवर एका एजंटला गाठला ... पण तिथे गाडीतल्या पेट्रोलवरुन खोप्या आणि तिथल्या एका पोलीस हवालदाराचं वाजलं... तो हवालदार गाडीतुन काढलेलं पेट्रोल परस्पर घेऊन आपल्या गाडीत टाकण्यासाठी नेत होता... आता काय बोलायचं त्या हवालदाराला …! खोप्या ते द्यायला तयार नव्हता. हवालदार अरेरावी करु लागला... त्याने एजंटला धमकावलं कि गाड्या रेल्वे च्या हद्दीत pack करायच्या नाहीत … खोप्याही भडकला होता... ह्या दोघांच्या भांडणामुळे गाड्या इथेच अडकुन पडतील की काय असं वाटु लागलं तेव्हा मी खोप्याला समजावलं आणि तिथुन रुमवर  घेऊन गेलो. इकडे पप्या आणि संदीप ने मोठ्या मुश्कीलीने गाड्या पाठवण्याचा बंदोबस्त केला... मुंबईला येणाऱ्या गाडीचा लगेजचा डबा हा पुढच्या संपुर्ण महीन्यासाठी बुक होता... मग पुण्याला जाणाऱ्या गाडीच्या लगेज बोगीतुन गाड्या पाठवल्या... असे एक ना अनेक अडचणींना तोंड देत आमची शेवटी जाण्याची तयारी झाली... आम्ही आता लवकरच उडणार होतो. 
दुसऱ्या दिवशी सर्व सामान सुमान घेऊन जेव्हा जम्मु एअरपोर्ट वर गेलो तेव्हा तर माझी घोर निराशा झाली . आपल्याकडचा एस टी स्टॅंड बरा... ! एअरपोर्ट भलतंच लहान होतं .  पण काही का असेना आपण आकाशात उडणार ह्या कल्पनेनेच मला स्वर्ग दोनच बोटे उरला होता. शेवटी एकदाचे आम्ही सर्वजण विमानात स्थानापन्न झालो... माझी विमानप्रवासाची पहीलीच वेळ असल्याने खोप्या आणि पियु ने उदार अंतःकरणाने मला खिडकीजवळची सीट दिली... लहान मुलाला आकाशपाळण्यात बसल्यावर कसे वाटेल तसे मला विमानात बसल्यावर वाटत होते. काही वेळाने विमानात सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पहात असतात त्या हवाईसुंदरी आल्या... आपल्या स्मितहास्याने आणि लाघवी बोलण्याने, त्या विमानातल्या प्रवाशांना बसल्या बसल्याच  वर घेऊन जात होत्या. त्यातल्या एकीने लहान मुलं बडबडगीतांच्या चालीवर  हावभाव करुन दाखवतात तसे हातवारे करुन सुचना द्यायला सुरुवात केली ... ते फारच गमतीदार वाटत होतं... मला तर चुकुन जोरात हसायला येईल की काय अशी भिती वाटु लागली.…  थोड्या वेळाने विमानाच्या इंजिनाचा आवाज यायला लागला... आणि भुकंप झाल्यासारखे हादरे बसायला लागले.  बाहेर पाहीलं तर विमान सुरु झालं होतं.. हळू हळू वेग वाढु लागला … ते विमान इतकं हादरत होतं की मला एसटीत बसल्यासारखं वाटू लागलं , आणि एका क्षणी झोकांड्या देत गपकन ते महाकाय धूड आकाशात झेपावलं . पोटात लहानसा गोळा आला … मी आता खऱ्या अर्थाने ' हवेत ' होतो… हवेत थडथडणारं विमान काही वेळाने उंचीवर गेल्यावर मात्र स्थिर होऊन उडू लागलं … एक मन म्हणत होतं , एवढ्या उंचीवरून हे विमान खाली पडलं तर …? त्याचवेळी दुसरं मन त्या उंचीची मजा लुटत होतं … हवाई सुंदऱ्या आमची सरबराई करत होत्या … कधी चहा - कॉफी आणून दे तर कधी काही खायला आणून दे … त्या सगळं हसत मुखाने करत होत्या … रात्री ८ -९ च्या सुमारास विमान मुंबई जवळ आलं … वरून जे दृश्य दिसलं ते केवळ अवर्णनीय …! लक्ष दिवे , त्यात मुंबई उजळून गेलेली … झगमगती मुंबई … डोळ्यांचं पारणं फिटणे म्हणजे काय ते त्यावेळी मला कळाले … वर आकाशात स्थिर असलेलं विमान आता वेगाने मुंबईकडे झेपावू लागलं … हलकासा धक्का देऊन विमान मुंबईच्या भूमीवर उतरले … जाताना हवाईसुंदऱ्या स्मितहास्य करून निरोप देत होत्या … त्या गोड निरोपाबरोबर आमचे लडाखायणही संपले होते … हे कळले , जेव्हा शरीर आणि मन दोन्ही जमिनीवर आले तेव्हा … !!!




मागे वळुन पाहताना ...
' केवळ पाच जण, सर्व नवखे,  तीन दुचाकी,  विशेष असा कोणताही बॅकअप नसताना,  कोणताही अनुभव नसताना ... जवळपास २००० किलोमीटरच्या वर अंतर , जगातल्या अत्यंत खडतर प्रदेशात,  जिथे काही ठिकाणी माणसं क्वचितच पहायला मिळतात अशा निर्मनुष्य प्रदेशात, अनेक संकटांना तोंड देत आपली सफर पुर्ण करतात आणि तितकीच धमालही … ! ' , स्वप्नवत आहे सगळं ….
मी जेव्हा जेव्हा लडाख बद्दल विचार करतो तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटतं .... तब्बल वर्षभर आधी हा प्लॅन बनत होता … कसं जायचं..? कुठे रहायचं....? याबाबत चर्चासत्रे होत होती, वाद-विवाद होत होते … पण  मी त्यात तितकासा भाग घेतला नाही ,  कारण  इतके दिवस सुट्टी मिळेल याची माझी मलाच शाश्वती नव्हती... जे अगदी ठामपणे जायचं म्हणत होते त्यातले  काही जण ऐन वेळी रद्द झाले... आणि मी काहीही विशेष तयारी नसताना लडाखला जायला निघालोही... कदाचीत ही लडाख टुर माझ्या ऩशीबात होती…! 
लडाख … केवळ शब्दावरूनच काहीतरी भयानक ठिकाण असेल याचा अंदाज येतो … परंतु जितका तो प्रदेश भयानक आहे त्यापेक्षा त्याचे सौंदर्य अधिक … ! भयानक सौंदर्य …! इथला निसर्ग जरी काही वेळा क्रूरपणे वागला असला तरी त्याने आमची अडवणूक कधीही केली नाही … त्याने बिनधास्त पणे आम्हाला त्याच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे फिरू दिले … आमच्यासमोर संकटेही अशी ठेवली कि ज्यांचा आम्ही सामना करू शकु… न पेलणारी संकटे त्याने आमच्यापासून दूर ठेवली किंवा आम्हाला त्यांच्यापासून लांब राहण्यात अप्रत्यक्षरित्या मदत केली , आता हे आमचं नशीब असेल किंवा निसर्गाने आमच्यावर दाखवलेली मेहेरबानी … काहीही असो … आम्ही सुखरूप पणे घरी परतलो … 
जम्मूवरून विमान आकाशात उडाले तेव्हा मागच्या १०-१५ दिवसांचा काळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरुन येऊन गेला.  लडाखायणासाठीची आमची तयारी, राजधानीचा प्रवास, दिल्लीतली अंग भाजुन काढणारी उष्णता..., मनालीतलं हिमाच्छादीत शिखरांचं फर्स्ट साईट लव… , रोहतांग मधला हिमरोमॅन्स… , आपल्याच धुंदीत असणारा मनमौजी रस्ता… ,  मधुनच त्याला  प्रेयसीप्रमाणे भेटणारी, नुकतीच वयात आल्यासारखी वाहणारी अल्लड नदी, पर्वतरुपी बापाचा डोळा चुकवुन आल्यासारखी वाटायची... , वाटेत व्हीलनप्रमाणे भेटलेले टेरर टांगलांग ला, खतरनाक खारदुंग ला, फाडु फुटु ला, झंजावाती झोजी ला  ह्यांची भिती कायम राहील ... पण चांग - ला चा चांगुलपणाही आठवणीत राहील... , बियास , झेलम , सतलज ह्यांच्या सोबतीने केलेला प्रवास स्मरणातून जाणार नाही … , लेह आणि त्याला स्पर्शुन जाणारी सिंधु नदी मनाच्या एका कोपऱ्यात सुरक्षीत आहेत... , शांतीस्तुपाने मनातला कलह शांत झाला... , पॅंगॉंग लेक मधल्या नितळाईची नुसती एक झलक पुढच्या संपुर्ण आयुष्यासाठी पुरेशी आहे... , टायगर हिल,  टोलोलिंग ची टेकडी, विजयस्मारक तर ह्रृदयावर असं कोरलंय की त्याचे विस्मरण केवळ मृत्यु नंतरच होईल... , चित्रपटाच्या climax प्रमाणे अनपेक्षित घडलेल्या विमानप्रवासाने शेवट गोड झाला … , आणखी काय सांगु ... ? हे सर्व लिहिताना संपूर्ण प्रवास पुन्हा डोळ्यांसमोरून तरळून जातोय … दुचाकी लडाखायण करून आम्ही परत सुखरूप घरी आलो खरे , पण आमची मने मात्र अजूनही तिथेच आहेत ………



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7