दिनांक - २ डिसेंबर
आज एक विचित्र गोष्ट घडली.... आज भडकमकर आले नाहीत.... त्यामुळे त्यांची जागा सावंतांनी पटकावली.... विंडो ...! मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो... समोर नेबरिंग कंट्री ... मग काय टाईमपासच.....! कधी नव्हे ते सावंतपण निरीक्षणात दंग असलेले दिसले.... नायर अंकल पेपर वाचत बसले होते .... थोड्या वेळाने गाडीत एक मध्यम वयाच्या बाई चढल्या , आमच्या बाजूला त्यांनी एक कटाक्ष टाकला ..... आणि एक मंद स्मित केल्याचे मला जाणवले.... त्यांनी कुणाकडे बघून स्माईल केलं असावं म्हणून मी सहज इकडे तिकडे पाहिलं ... तर सावंत पलीकडे त्या बाईंकडे बघून समजुतीने हसलेले मला दिसले .... हि काय भानगड...??? शरद- भरत , मी , जिग्नेश , मूड मध्ये असले तर भडकमकर आणि नायर अंकल सगळेच नेबरिंग कंट्री बाबत काही न काही नेहमीच बोलत असतो... पण सावंत त्या बाबतीत काहीच बोलत नसत .... त्यांची नेहमीची बसायची जागाही लेडीज कम्पार्टमेंटला पाठ करून असायची .... पण आज सगळंच उलट घडत होतं... थोडा वेळ गेल्यानंतर मी सहज त्यांना हळू आवाजात त्या मघाच्या बाईंबद्दल विचारलं ... तर ते माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले ... ' ह्याला कसं कळलं....' असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दाटले होते बहुतेक.... नंतर ते नुसते हसले पण उत्तर देण्याचं मात्र टाळलं .... मला म्हणाले , ' नंतर सांगीन...ह्या सगळ्या प्रजेच्या समोर नको...' आणि बाहेर बघायला लागले... नक्कीच काहीतरी खास असणार...
जीग्नेस ने त्याच्या हनिमूनचे फोटो मोबाईल मध्ये आणले होते .... शरद-भरत ते बघत बसले .... मधेच कसल्याही कमेंट करत होते..., -' अरे ये फोटो में सो गया क्या तू..?? '
- ' ये किधर देख राहा है बे .....?? ' प्रत्येक फोटो मध्ये काहीतरी शोधून त्याला पकवत बसले होते...
-' अरे वो फोटू निकलनेवाला था ने वो रेडी बोलनेसे पेहेलेही क्लिक कर देता था...साला ' तोही न कंटाळता त्यांना उत्तरं देत होता... नायर अंकलही त्यांच्यात सामील झाले .... जीग्नेसने बायको बरोबर एका छोट्याश्या होडीच्या टोकाशी उभं राहून टायटानिक स्टाईलची आडवे हात पसरून दिलेली पोज बघून तर सगळेच हसायला लागले.... नायर अंकल शरद- भरतला म्हणाले कि , ' ज्यादा हंसो मत, तुम्हारा भी टाईम आयेगा....' जीग्नेस खुशीत होता ... आणि थोडा लाजल्यासारखाही करत होता ....
मी मधेच सहज सावंतांकडे पाहिलं तर ते मधून मधून पलीकडे पाहत होते ... नेहमी स्थितप्रज्ञासारखे वाटणारे त्यांचे डोळे मात्र आज मला शाळेतल्या मुलाच्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांसारखे भासले ... कोण असाव्यात त्या बाई ...?? त्या सावंतांच्या वयाच्या वाटत होत्या ....जवळपास ४५- ५० च्या .... आणि ज्याप्रमाणे त्या दोघांनी एकमेकांकडे समजुतीने बघितलं त्यावरून तर त्यांची एकमेकांची जुनी ओळख असली पाहिजे... असा विचार कम शंका मनाला चाटून गेली.... कुर्ल्याला शरद- भरत उतरले , दादरला नायर अंकल.... मग मी सावंतांचा ताबा घेतला... खूप सांगा - सांगा म्हणल्यानंतर ते एकदाचे तयार झाले .... त्यांनी सांगायला सुरुवात केली...' ती बाई आहे ना, ती आणि मी शाळेपासून एकत्र होतो .... मला ती शाळेत असल्यापासून आवडायची ...'
-' काय सांगताय काय सावंत ...?? ' मला खरोखरच आश्चर्य वाटत होतं .....
- ' हो.... पण नंतर शाळा संपली.... आमच्या दोघांच्या वाटाही वेगळ्या झाल्या .... ती हुशार होती त्यामुळे तिला चांगल्या कॉलेजला admission मिळाली . मला मात्र मुंबई सोडावी लागली.... त्यानंतर माझा आणि तिचा संपर्क असा जास्त काही राहिला नाही.... पण तरीही ती मला आवडत होती.... मी सुट्टीत कधी घरी आलो कि ती कधीतरी दिसायची... शेवटी मी ठरवलं , कि तिला प्रपोज मारूनच टाकू.....' सावंत रंगात आले होते .
- ' आयला .... मग...?? '
- ' मग काय , एके दिवशी मी सुट्टीवर घरी आलेलो असताना मला ती दिसली... मी तिच्या मागोमाग गेलो.... आणि तिला प्रपोज केलं.... '
- ' काय म्हणालात तुम्ही तिला.... ओह सॉरी त्यांना...?? ' मला तर गुदगुल्या झाल्यासारख्या वाटत होत्या .
- ' काही नाही, सरळ म्हणालो... मला तू खूप आवडतेस... झालं....' सावंत सहजच म्हणाले.
- ' मग.. काय म्हणाल्या त्या ?? ' त्या बाईचं उत्तर ऐकण्यासाठी इथे माझे कान आतुर झाले होते...
- ' ती म्हणाली , बाप रे..! हो का ... पण माझी सेमिस्टर एक्झाम आहे .... म्हणाली आणि निघून गेली ' सावंत गमतीदार चेहरा करून म्हणाले...
- ' काय...?? त्या असं म्हणाल्या ...?? ' मला तर काय बोलावं तेच कळत नव्हतं...
- ' हो... मग मी पण कोलेजला निघून गेलो... आणि नंतर पुन्हा काही तिला विचारलं नाही....'
- ' अरे देवा.... पण का नाही विचारलं परत...?? ' मला कळेना ते असं का वागले...
- ' काय सांगावं , परत तिची कोणती तरी परीक्षा यायची मध्ये ... नंतर कळलं कि तिचं लग्न पण झालं ... मग तर प्रश्नच मिटला...' सावंत गमतीने हसत म्हणाले....पण मला कसतरीच वाटलं.... खूप कमी लोक असतात ज्यांना त्यांचं पाहिलं प्रेम मिळतं....आणि ते शेवटपर्यंत टिकतं ... तसा माणूस वारंवार प्रेमात पडतच असतो , पण त्याला पहिल्या प्रेमाची सर नसते.....ग्रीष्मानंतर जसा पहिला पाउस तसं पाहिलं प्रेम .... बेभान बरसणारं .... भावनांचा वर्षाव करणारं....रखरखीत आयुष्यात चैतन्याची पालवी फुलवणारं ....आणि मनाला नवी उभारी देणारं..... इतकी वर्ष सरूनही सावंतांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही त्या समोरच्या बाईंबद्दल कुठेतरी जागा होती , हे त्यांच्या डोळ्यांवरूनच कळत होतं..... बोलता बोलता माझा stop - भायखळा कधी गेलं मला कळलंच नाही ... बाहेर बघितलं तर सी .एस. टी. स्टेशनात गाडी शिरत होती....