Saturday, July 16, 2011

.... भूतबंगला ....!सोनगीरीत ऑफिस ला जॉईन झाल्यानंतर आमच्यापुढे मुख्य प्रश्न होता तो म्हणजे घराचा..! सुरुवातीला शासकीय विश्रामगृहात आमची सोय झाली, पण तिथे जास्त दिवस राहता येणार नाही , असं आनंद म्हणाला...त्यामुळे आम्ही युद्धपातळीवर घर शोधायच्या कामाला लागलो.....बऱ्याच ठिकाणी आम्ही घर शोधायचा प्रयत्न केला परंतु आमच्या पदरी निराशाच आली...आणि एक भयानक अनुभवही आला..... त्याचं काय झालं ......एके दिवशी रात्रीचं जेवण करून आम्ही आमच्या नेहमीच्या घर शोधण्याच्या उद्योगाला लागलो... मेन रस्ता सोडून आतल्या एका गल्लीमध्ये एक बिल्डिंग दिसली .. त्याखाली १ इस्त्रीच दुकान होतं. मी सहज त्या दुकानदाराला इथे एखादी रूम भाड्याने देण्यासाठी आहे का म्हणून विचारलं .
--" रूम पायजेल ....?? उम्म्म .. एक आहे .. बंगला आहे मस्त ...! ... " इस्त्रीवाला म्हणाला
वा ....आंधळा मागतो १ डोळा आणि देव देतो २ ... बंगला ?? आमचे मनोरथाचे घोडे गंगेत नहाले...
-- " आता मिळेल का बघायला?? " आनंद ने विचारले .
-- " चला दाखवतो..." म्हणत तोही उठला... जणू काही तो आमचीच वाट बघत होता. त्याने बंगल्याची चावी घेतली. आणि निघाला .. आम्ही पण त्याच्या मागे जाऊ लागलो. इस्त्रीवाला सांगत होता , बंगला एकदम मस्त आहे, पुढे गार्डन आहे , पाण्याचा प्रोब्लेम नाही वगैरे वगैरे ' . आम्ही आपलं ' हो का ....अरे वा ...'. करत त्याच्या मागे चालत होतो. इस्त्रीवाल्याच नाव बबन होतं....तो आम्हाला मुख्य रस्त्यापासून जरा आत आड रस्त्याला घेऊन गेला.... तिथे बराच अंधार होता...
-- " काय हो , असाच अंधार असतो का नेहमी इथे ??" आनंद ने बबन ला विचारले , त्यात थोडी चिंतेची झाक दिसत होती..
--" त्याच काय आहे ,,इथे राहत नाही ना कोणी , बंगला बंदच असतो...आतून बाहेरच्या लाईट लावल्या कि प्रकाशाच प्रकाश ! " बबन बंगल्याच्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटलं...आम्ही आपले त्याच्या मागे अंदाजाने पावलं टाकत चाललो होतो...तिथं इतका अंधार होता कि कुणी डोळ्यात बोट घातलं असता तरी दिसलं नसतं.... अंधारामुळे दिसत नसल्याने
असेल किंवा घाबरल्याने असेल , आनंद माझ्या हाताला धरून चालत होता.... उम्या मात्र आपलाच बंगला बघायला जातोय अशा थाटात बिनधास्त बबनच्या मागे चालत होता....अखेर एका जुनाट गेटपाशी येऊन आम्ही थांबलो... त्याला नुसतीच एक साखळी गुंडाळलेली होती...गेट उघडताना हिंदी हॉरर फिल्म मधे येतो तसा.... कर्रर्र .....आवाज झाला...' आयला कुठून मारायला आलो इथे ' असं मला वाटायला लागलं .... थोडं पुढे गेल्यावर , " इथे पायऱ्या आहेत बरं का...." बबन ने आम्हाला सूचना केली ... आम्ही अंदाजाने चालत होतो.... उम्या आमच्या पुढे चालला होता... तो पायऱ्या चढत असताना , अचानक..... म्याआव्व्व्व ssssss....आयंव ssss आयंव .sss असला काहीतरी भयानक विचित्र आवाज झाला..... आणि त्याबरोबर उम्याची भयाकारी किंकाळी आली... " ओय ... ओय ..." करत घाबरत उम्याने टणाटण तीन - चार उड्या मारल्या... आनंद ने तर घाबरून माझा हात आणखीनच घट्ट पकडला...त्यामुळे मी पण थोडा घाबरलो...
--" अहो काय झालं ??? काय झालं ???" करत बबन विचारत होता...त्याने त्याच्या जवळची छोटी टोर्च मारली.... तर तिथे एक छोटं मांजरीचं पिल्लू केकाटत होतं... अंधारात उम्याचा पाय चुकून त्याच्यावर पडला होता बहुतेक...! त्या टोर्च च्या प्रकाशात मी उम्याचा चेहरा पाहिला तर तो चांगलाच टरकलेला दिसला मला...!
--" अहो टोर्च होती, तर मघाशीच का नाही लावली...?? " उम्या बबनला विचारत होता.....त्याच्या स्वरांवरून तो पक्का घाबरलाय हे आम्ही ओळखलं .....
--" अहो काय घाबरताय...!! मांजराचं पिल्लूच ते....!! वर हे बबन आम्हालाच सुनावत होता.... एकूणच इथे जमलेल्यांपैकी बबन सोडून बाकी सगळ्याची पाचावर धारण बसलेली आहे हे मला जाणवलं..... बबन ने दरवाज्याचं कुलूप उघडलं , आणि आत शिरून खटां-खट सगळी बटण दाबली...सगळ्या बंगल्यात प्रकाश पसरला...अचानक डोळ्यावर पडलेल्या प्रकाशामुळे आमचे डोळे दिपले...प्रकाशाशी समायोजन साधण्यात काही क्षण गेल्यानंतर आम्ही पाहिलं.....प्रचंड मोठा हॉल ....आणि त्यात अतिशय सुंदर इंटिरियर केलेलं , ....जुन्या वाड्यांमध्ये असतं तसं.....सुरेख नक्षीकाम केलं होतं ...छताला मधोमध एक मोठं कीमती झुंबर लावलेलं होतं...बाकी हॉल मधे तितकंसं सामान नव्हतं ....
--" हा हॉल.... बघा कसा भारी आहे ....!! इकडे आत ३ रूम आहेत ,...toilet बाथरूम आहे ..." बबन आम्हाला उत्साहात सांगत होता ...एखादं प्रदर्शन बघितल्यासारख आम्ही सगळ्या रूम आणि किचन बघून घेतलं.....परत हॉल मधे येता येता मी विचारलं ," काय हो भाड्याचं कसं काय?? " तर काहीच उत्तर आलं नाही.....आम्ही मागे, इकडे तिकडे बघितलं तर बबन कुठेच दिसेना..." अरे तो बबन कुठे गायब झाला ?? " आनंद भयमिश्रित गंभीर आवाजात विचारत होता...
--" इथेच तर होता, आपल्या मागे...मग कुठे गेला...? उम्याही घाबरत म्हणाला... त्याच्या डोळ्यात भय स्पष्टपणे दिसत होतं...." इथेच आतल्या रूम मधे असेल रे ... उम्या बघ रे...!! " मी त्या दोघांना धीर देत म्हणालो खरं... पण माझीही अवस्था त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हती...
-- " हट .... मी नाही जाणार आतल्या रूम मधे ... मरू दे त्याला....!! आपण निघू इथून..." उम्या एकटा आत जायला घाबरत होता....तोच काय पण आमच्या पैकी कोणीही आत जाऊन पाहण्याचं धाडस दाखवलं नसतं.....
--" ओ .... बबन....!!.... बबन....??? " मी बाहेरूनच त्याला हाक मारण्याचा प्रयत्न करू लागलो...परंतु काहीच आवाज येईना...
--" त्याचे पाय बघितलेत का कुणी....?? " आनंद घाबरत काहीच्या काही विचारायला लागला...हे मात्र जरा जास्तच झालं...
तेवढ्यात आमचं लक्ष दरवाज्याच्या उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेलं...भिंतीवर एक भला मोठा फोटो लावलेला होता... आणि जुन्या काळातला एक लामणदिवा त्याला लटकवलेला होता... त्या फोटोमध्ये एक व्यक्ती उभी होती....थोडी रागीट चेहऱ्याची .... पांढऱ्या पोशाखात....आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर तो फोटो नसून एक तैलचित्र होतं...
--" हा ... हा फोटो इथे कसा आला...?? मघाशी तर नव्हता .... " उम्या आता कसल्याही शंका उपस्थित करायला लागला...त्यामुळे मला पण तो चित्रातला माणूस भयानक वाटायला लागला...
--" मरू दे... आयला...चला निघू इथून..." असं म्हणत आम्ही मागे फिरलो, आणि पाहतो तर काय...., एक पांढऱ्या कपड्यातला उंच माणूस आमच्या मागे उभा होता...तो अचानक समोर आल्याने अस्फुटशी किंकाळी आमच्या तिघांच्याही तोंडून बाहेर पडली...उंची ६ फुटांवर , संपूर्ण पांढरे कपडे , चप्पलही पांढरी , खांद्यापर्यंत लांब लालभडक केस, आणि निळसर डोळे...अचानक त्याला बघून आम्ही जामच टरकलो...!
--" अहो... काय झालं ?? ..एवढे का घाबरलात??? " तो माणूस आम्हांला विचारत होता .
--"न ...न.... नाही... तू... तू... तुम्ही कोण...?? उम्याने घाबरत घाबरत विचारले...आनंद ने परत घाबरून माझा हात धरला..
--" मी मालक आहे ह्या बंगल्याचा.... मघाशी इथून जात होतो तर बंगल्यात प्रकाश दिसला म्हणून आलो.... तो बबन कुठाय...??? " तो माणूस विचारत होता...
--" अहो तो मधेच कुठेतरी गायब झाला...." मी कसाबसा बोललो...मागच्या चित्रातला हाच माणूस समोर प्रगट झाला नाही ना....?? म्हणून मी हळूच घाबरत ते तैलचित्र पाहून घेतलं.... ' हा कुणीतरी दुसराच होता...' मी आनंद कडे बघितलं तर तो त्याचे पाय निरखत होता.... पायही सरळच होते...
--" काय...? गायब झाला म्हणजे.....?? " असं म्हणून त्याने एक जोरदार हाक बबन ला मारली.... " आलो... आलो साहेब..." करत ते बावळट ध्यान आतल्या रूम मधून पळत आलं...
--" जरा बंगल्याच्या मागच्या बाजूला गेलो होतो ...विहिरीवर झाकण टाकलं... कचरा पडू नये म्हणून...." तो सांगत होता... आयला, हा गायब झाला असं वाटून केवढी घाबरगुंडी उडाली आमची... !!!
--" बरं ... बंगला आवडला ना तुम्हाला....?? १००० रुपये भाडं आहे , लाईट, पाणी वेगळं.... " तो पांढऱ्या कपड्यातला माणूस सांगत होता...आम्ही यापूर्वी पाहिलेल्या जागांपेक्षा ही जागा चांगलीच प्रशस्त होती...पण त्यामानाने भाडं फारच कमी होतं.... इतकं कमी भाडं ऐकून आमच्या मनात शंकेची पाल पुन्हा चूकचुकली .....
--" फक्त एक अट आहे ....." तो मालक बोलू लागला.... , " फक्त वर्षातून २ दिवस आमचा एक माणूस इथे येईल, आणि हा जो तुमच्या मागे फोटो आहे ना त्याला दिवाबत्ती करेल....आणि पूजा करेल...बाकी काही अडचण नाही..." आम्ही परत ते चित्र पाहू लागलो...म्हणजे हा भयानक फोटो मालक काही काढणार नव्हता तर ...
--" कोण आहेत हे.....? " मी सहज मालकांना विचारले...
--" हा माझा मोठा भाऊ.... ह्या बंगल्यात राहायचा .... इथेच त्याने आत्महत्या केली.... ह्या झुम्बराला लटकून...! ." आम्ही तिघेही तडक त्या झुम्बराखालून बाजूला झालो...आता असल्या बंगल्यात कोण राहील....???
--" ठीक आहे ... आम्ही सांगतो तुम्हाला नंतर..." असं म्हणून आम्ही तिथून सटकलोच ...पळत पळत बाहेर आलो..... मुख्य रस्त्यावर आल्यावर सहज मी मागे पाहिलं....बंगला परत अंधारात गडप झाला होता.........