Wednesday, July 13, 2011

..... उम्याची फजिती .....!!!


ऑफिस सुटल्यावर उम्या आम्हाला न सांगताच कुठेतरी गायब झाला...
--" कुठे गेला रे तो ?? " आनंद विचारत होता...
-- " मला काही बोलला नाही....पण घाईत होता .... " मी म्हणालो...
_ " मला जाम भूक लागली रे .... चल ना काहीतरी मस्त खाऊ... " आनंद लहान मुलं भूक लागल्यावर करतात तसा चेहरा करून म्हणाला..
--" चल., ' द्वारका' मधे जाऊ, मस्त पाव-भाजी हादडू ...." मी त्याला सुचवलं ...तोही लगेच तयार झाला....'द्वारका' हे उत्तम snacks मिळणारं प्रसिद्ध हॉटेल आहे . बऱ्याच कॉलेज मधल्या मुलामुलींचं ते आवडतं ठिकाण आहे ..... एकतर तिथे बसण्याची व्यवस्था चांगली .... आणि क्राउड पण चांगला असतो..... ऑर्डर दिल्यानंतर मागवलेला पदार्थ बऱ्याच वेळाने येत असल्याने इकडे तिकडे बघत टाईमपास चांगला होतो....आम्ही दोघांनी पण ऑर्डर दिली आणि टाईमपास सुरु केला.....आमच्या बाजूला एक कॉलेज चा मुलामुलींचा ग्रुप होता ... त्यांची कसली तरी पार्टी होती बहुतेक......! हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता..... मधेच त्यांचा गोंगाट वाढला, कि त्या ग्रुप मधलं कोणीतरी इतरांना ' शांत बसा ' च्या सूचना करत होतं..... आणि जर ग्रुप मधे मुलींचा समावेश असेल तर मुलांना भलताच चेव येतो.... प्रत्येक जण मुलींवर इम्प्रेशन मारायचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत होता.... आपण किती ' कूल ' आहोत हे जो तो दाखवत होता ...आणि मुली पण लाडीकपणे बोलून त्यांना चेतवण्याच काम करत होत्या ...
--" आयला ह्या पोरांच्या ...... काय गोंधळ लावलाय.....!!! " आनंद वैतागलेला दिसला...
--" जाऊ दे रे ....दिवस आहेत त्यांचे .... मजा करू दे....." मी त्या गोंधळ घालणाऱ्या मुलांची बाजू घेत म्हणलो.....
--" हा साला वेटर पण किती वेळ लावतोय ....? " आनंद ला कदाचित जास्त भूक लागली असावी.... तो वेटर च्या शोधात इकडे तिकडे बघू लागला....
--" आणेल रे तो.....तोपर्यंत बाजूचा टाईमपास बघ कि....." मी त्याला सुचवलं....
--" कसला टाईमपास आयला.... डोकेदुखी आहे नुसती....!! आता ती लाल ड्रेस वाली मुलगी बघ , उगाचच तोंडाचा चंबू करून बोलतेय मघापासून..... ह्या असल्या मुली बघितल्या कि डोकंच फिरतं माझं.! ... एक कानाखाली ठेऊन द्यावीशी वाटते... .."
आनंद च्या ह्या बोलण्यावर मला हसायला आलं...
--" मग ? कशा प्रकारच्या मुली आवडतात तुला?? " मी योग्य प्रश्नाचा खडा टाकला...
--" अरे मुली कशा पाहिजेत.... शांत , सरळ...जास्त बडबड न करणाऱ्या ....." आनंद बोलत असताना मी मधेच म्हणालो , " म्हणजे , संध्या सारख्या.....!!! " आणि मिश्कील पणे त्याच्याकडे बघत राहिलो....
--'' हट ....ती कसली काळूंद्री....!!! तुम्ही लोक पण पक्के शाणे आहात , खराब माल आमच्याच गळ्यात घालणार.... त्याजागी एखादी सुंदर गोरी मुलगी असती तर , तिला शिकवण्यासाठी एकमेकांचे जीव घेतले असते तुम्ही..." तो वैतागून बोलत असताना मला हसायला आलं..आणि ते खरंही होतं...हसता हसता मी सहज हॉटेलच्या गेट कडे पाहिलं , तर उम्या आत येत होता....आणि बरोबर कोणीतरी सुंदर तरुणी !!! .... मी आनंद कडे बघितलं आणि नजरेनेच ' मागे बघ ' असं खुणावलं....
--" अरे .... हा बघ.... !! आणि त्याच्याबरोबर ती पोरगी कोण आहे ??? " आनंद मला आश्चर्याने विचारत होता...
--" आता मला काय माहित ?? हा शाणा तिला भेटायलाच लवकर पळाला वाटतं ऑफिस मधून...."
--" कशा काय पटवतो हा सुंदर सुंदर मुली ?? " आनंद च्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव अद्यापही तसेच होते....आणि ते खरंही होतं.... उम्याबरोबरची ही चौथी नवीन मुलगी आम्ही पहात होतो.....
--" नशीबवान आहे .... !! आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे ती कला आहे ....." मी म्हणालो... उम्याने आत येताना आम्हाला पाहिलं नाही बहुतेक .....आता इतकी सुंदर मुलगी बरोबर असताना तो आम्हाला कशाला पाहील...? .ते दोघे खिडकीपाशी चांगली जागा बघून बसले....त्यांनी वेटर ला snacks ची ऑर्डर दिली...आणि ते बोलत बसले....उम्या मुलींबरोबर असला कि इतका सभ्यपणे वागतो, कि आमच्या बरोबर राहणारा ' दानव' हाच कि कोणी दुसरा असा प्रश्न पडतो...
-- " मक्या , माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलीय .... जरा कान इकडे कर ... " आनंद गरम तव्यातल्या फुटाण्यासारखा उडत म्हणाला ... त्याची आयडिया ऐकण्यासाठी मी कान केला.....
-- " हा हा हा हा .... भारी आहे... गम्मत करू .....जिरवू जरा त्याची...." आनंद ची आयडिया खरंच मस्त होती... इतक्यात वेटर ने आमची ऑर्डर आणली....खरं तर आता भूक राहिलीच नव्हती....आम्ही जास्त एक्सायटेड झालो होतो...आम्ही पटापट ते समोरचं खाल्लं .... उम्याच्या टेबलवरही त्याची ऑर्डर आली होती... उम्या त्या तरुणीशी बोलत असतानाच आम्ही त्यांच्या टेबलपाशी गेलो....
--" नमस्कार साहेब...." मी अगदी हात जोडून, कृतज्ञता पूर्वक उम्याला नमस्कार केला....उम्या आमच्या दोघांना पाहून चापापलाच....! पण थोडाच वेळ... त्याने पण लगेच नमस्कार केला... समोरच्या तरुणीमुळे तो आमच्याशी इमानदारीत वागत होता....
-- " नमस्कार वाहिनी ...." आनंद ने त्या तरुणीलाच नमस्कार घातला ... तिला बिचारीला काय बोलावं तेच कळेना... ती एकदम गोंधळल्या सारखी आमच्याकडे आणि उम्याकडे पाहू लागली ... उम्याचा चेहरा पाहण्यालायक झाला होता....
--" अरे मूर्खा .., ह्या वाहिनी नाहीत..... मागच्या आठवड्यात भेटल्या ना त्या वाहिनी होत्या ....." मी आनंद ला खोटं खोटं रागावलो...
--" काय...?? " त्या तरुणीच्या गोंधळात आता आश्चर्याची भर पडली... आणि ती उम्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली....
--" तू ह्यांचं काही ऐकू नको ., ते मस्करी करतायत..." उम्या तिला समजावणीच्या सुरात म्हणाला...
--" तुझं लग्न झालंय का....? " तिने संशयाने उम्याला विचारले...
--"अगं तसं काही नाही.... " उम्या बोलायचा प्रयत्न करत असतानाच आनंद मधेच तिच्याकडे बघत म्हणाला..." म्हणजे ?? परवाच्या पार्टी ला तुम्हाला आमंत्रण नव्हतं का ...??? "
--" कोणती पार्टी ??? " ती बिचारी भलतीच गोंधळली होती...
--" अहो साहेबांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी होती परवा...!! जेवण बाकी झकास होतं .....! व्हेज - नॉन व्हेज., दोन्हीही ....शिवाय शेवटी आईस्क्रीम पण.....!! " आनंद पार सुटला होता ....नाटकातल्या ओव्हर रीअक्टिंग करणाऱ्या पात्रासारखा..... उम्या आनंद कडे गोंधळ मिश्रित रागात पहात होता...
-- " धिस इस टू मच ....." त्या तरुणीच्या चेहऱ्यावरच्या गोंधळाची जागा आता रागाने घेतली..." मी हे काय ऐकतेय उमाकांत...??? मला फसवलंस तू....... "
-- " अगं , माझं ऐकून तरी घे... " उम्या बोलण्याचा प्रयत्न करीत असताना च ती भडकून म्हणाली.." आता काय सांगणार आहेस.., कि तुला मुलगी नाही म्हणून...?? "
--" हो.... खरंच नाही...." उम्या तिला पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करत होता...
--" साहेब , सॉरी बरं का ?? आम्ही चुकून ह्या बाईसाहेबांसमोर वहिनींचा विषय काढला...आम्हाला वाटलं ह्यांना माहित असेल म्हणून ...." हे बोलत असताना मला खरं तर जाम हसायला येत होतं... पण चुकून जरी हसलो तर सगळंच मुसळ केरात जाईल...म्हणून मी महत्प्रयासानं ते रोखलं.....माझ्या बोलण्याने ती तरुणी तर आणखीनच रागाने उम्याकडे बघू लागली...तिने तिच्या पर्स मधून उम्याने नुकतंच तिला दिलेलं गिफ्ट बाहेर काढलं ... आणि ,.." हे घे...... तुझ्या बायकोला दे...." असं म्हणत ते टेबलावर आपटलं ....आणि फणकाऱ्याने ती जाण्यासाठी निघाली..... उम्याने आमच्याकडे एक भयानक कटाक्ष टाकला... ' बघून घेतो तुम्हाला' अशा अर्थाचा चेहरा त्याने केला... आणि " अगं थांब....अगं माझं ऐकून तरी घे..." असं म्हणत तिच्यामागे बाहेर पळत गेला...." ओ साहेब .... ओ साहेब...." ओंरडत बिचारा हॉटेलचा वेटर बिल घेऊन त्याच्या मागे पळत होता.....

.....