Tuesday, June 21, 2011

....मांडवी.....

शनिवार आणि रविवार आमचा ठरलेला प्रोग्राम --- मांडवी ... तिथे एक सुंदरसा समुद्रकिनारा आहे आणि जेटी कि काय म्हणतात तो तसला प्रकार .....जेटीच एक टोक पाण्यात आतपर्यंत गेलेलं .....असं म्हणतात कि पूर्वी तिथे मोठी मोठी जहाजं लागायची .गेट वे ऑफ इंडिया सारखं इथेही ' गेट वे ऑफ सोनगिरी ' आहे आणि .मुंबईला चौपाटीवर भरते तशीच जत्राही ....चौपाटी म्हटली कि भेळपुरी आलीच ... मग नारळपाणी आणि मक्याची कणसेही जोडीला असतात . दोन चार घोडागाड्या , एक -दोन उंट उगाचच आपले फेऱ्या मारत असतात . मला आजपर्यंत कळलं नाही कि घोडागाडीत आणि त्या उंटाच्या पाठीवर बसून लोकांना काय मिळतं ? संध्याकाळी सूर्यास्त बघण्यासाठी भलतीच गर्दी होते जेटीवर... कुणी तो सूर्य डोळ्यात साठवून घेतंय ... कुणी कॅमेऱ्यात.... तर कुणी मोबाईल मधे .... खरंच , सूर्यास्त बघावा तो समुद्रकीनारीच !!! दुसऱ्या कोणत्याही ठिकाणाला त्याची सर येणार नाही. आल्याआल्या आम्ही नेहमी त्या जेटीच पाण्यात बुडलेल टोक गाठतो...समोर अथांग पसरलेला सागर ... अथकपणे घुसळत असलेलं पाणी ... त्याचा गर्जनासदृष्य होणारा आवाज... मधूनच दिसणारी एखादी होडी... लालबुंद होत जाणारा सूर्य ... आणि त्यामुळे क्षणाक्षणाला बदलत जाणारा आकाशाचा रंग ....हे सांर दृश्य अतिशय विलोभनीय आहे . जेटीच्या टोकावर गेल्यावर एक वेगळीच अनुभूती होते . समोर मुक्तहस्ताने कोणीतरी गुलाल उधळला आहे , आणि त्याचे मनोहारी प्रतिबिंब पाण्यावर पडलेले आहे . आता सूर्य पूर्णपणे बुडालेला होता , पण तरीही आपली छाप त्याने सभोवतालच्या आकाशावर सोडलेली होती. समोरच्या सोनदुर्गावर असलेल्या दिपगृहावरचा प्रकाश गोल गोल फिरू लागला , तो तसा फिरू लागला कि आपल्या प्रकाशाने सगळ्यांना आशीर्वादच देतोय असं वाटत . अंधार पडू लागला तसं सभोवतालचं पाणी भयानक वाटायला लागलं...असं वाटलं कि ह्या लाटा आता त्यांच्या हजार हातांनी आपल्याला आत खेचून घेतील .... एक सूर्य काय बुडाला , आजूबाजूचं वातावरण एकदमच बदलून गेलं,... आयुष्याचही असंच असेल का ? ... आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यावर असाच अंधार दाटत असेल... सुर्यास्तामुळे बदललेल्या वातावरणाचा परिणाम आपल्या मनावरही होतोय हे माझ्या लक्षात आलं. ही तिथून निघायची खुण होती. ...आणि आमच्या मित्रांनाही आता निराळीच ओढ लागलेली दिसली. .... जेटीवर बरेच लोक संध्याकाळी जमतात... त्यात तरुण मुलांची संख्या जास्त.,! का ..? तर सुंदर सुंदर मुली येतात म्हणून ...आमचंही मांडवीला येण्याचं ते एक प्रमुख कारण आहे. आमचं म्हणजे उम्याच !!! .उम्या तर तिथे शिकारासारखा वावरतो, आपलं सावज शोधत...आणि बऱ्याचदा त्याला यश आलेलही आम्ही पाहिलं आहे ....आत्ताही तो समोरच्या एका आकाशी कलरचा ड्रेस घातलेल्या मुलीकडे एकटक पाहत होता.आणि ती मुलगीही त्याच्याकडे मधून मधून पाहत होती
-- " प्रगती आहे ...." मी हळूच उम्याच्या कानाजवळ जाऊन म्हणालो...त्यावर तो मिश्किलपणे हसला , आणि म्हणाला ," ती मुलगी फक्त ' टाईमपास' करतेय...."
-- " हे तू कशावरून म्हणतोस?? " उम्या लगेच निष्कर्षाप्रत आल्यामुळे मी आश्चर्याने त्याला विचारले...
_ " नीट बघ , मधून मधून ती घड्याळाकडे बघतेय... ती तिच्या बॉयफ्रेंड ची वाट पाहात आहे ...." उम्याने माझ्या शंकेचं निरसन केलं.
-- " पण बॉयफ्रेंडच कशावरून ?? मैत्रीणीचीही वाट बघत असेल..." आनंद ने आपली एक शंका उपस्थित केली .
--" नाही , १०० टक्के ती तिच्या बॉयफ्रेंडची वाट बघतेय...मैत्रिणीला भेटण्यासाठी एवढं सजून धजून कोणी येत नाही. ." उम्या त्याच्या निष्कर्षावर ठाम होता.
-- " हो का ?? मग ती तुझ्याकडे का पाहतेय एवढी ...? '' मी वाद घालण्याच्या उद्देशाने म्हणालो.
-- " अरे बाबा , काहीतरी टाईमपास नको का......' सेकंड ऑप्शन ' म्हणून पाहतेय. .." उम्या म्हणाला...पण आनंद आणि माझा त्यावर विश्वास बसला नाही . पण थोड्या वेळात उम्याच खरा ठरला... त्या मुलीचा बॉयफ्रेंड तिला भेटायला आला, आणि ते दोघे जेटीच्या टोकाकडे गेले ... आम्ही उम्याकडे ' तुस्सी ग्रेट हो ' अशा अर्थाने पाहू लागलो ... उम्याची मुलींच्या बाबतीतली ही निरीक्षणशक्ती आणि तर्कशक्ती पाहून आम्ही थक्क झालो होतो...
--" पण तुला वाईट नाही वाटलं तिला बॉयफ्रेंड आहे हे पाहून ?? " मी त्याला काळजीने विचारलं..
--" त्यात वाईट काय वाटायचं?? चलता है ..." उम्या बेफिकीरीने म्हणाला...
--" जाऊ दे उम्या .... वाईट वाटून घेऊ नकोस .... मी समजू शकतो तुझ्या भावना....." आनंद उम्याला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला
--" पण माझा असा तर्क आहे कि ती मुलगी आपल्याला पटू शकते ...तिच्या वागण्यावरून मला असं वाटतंय ...." उम्या आत्मविश्वासाने सांगत होता ...
--" कसं काय? " आनंद ने उत्सुकतेने विचारले.
-- " . ते दोघे जेटीवरून थोड्या वेळात येतील परत ....माझा अभ्यास सांगतोय ,.येताना ती मुलगी माझ्याकडे परत बघेल " उम्याने भविष्य वर्तवले....
--" आणि नाही बघितलं तर ? आम्हाला पार्टी द्यायची तू..." आनंद उत्साहित होऊन म्हणाला...
_ " आणि बघितलं तर ?? तू देणार का आम्हाला पार्टी ??" उम्याने पलटवार केला .
--" हो देतो ना ... त्यात काय !!! '' आनंदनेही तयारी दाखवली...चला बर झालं ....आता ती मुलगी उम्याकडे बघो अगर न बघो माझी पार्टी मात्र फिक्स होती.....थोड्या वेळाने आम्ही विनय हॉटेल मधे गेलो .....मस्त चिकन तंदुरी आणि बिर्याणी हादडली .... त्यानंतर मसालापान पण खाल्लं..... उम्या तर आग्रह करत होता कि आईस्क्रीम पण खाऊ म्हणून , पण मीच नको म्हणून सांगितलं .......जेवणाचे आणि मसालापानाचे बिल बिचारा आनंद भरत होता......