Tuesday, June 21, 2011

....मांडवी.....

शनिवार आणि रविवार आमचा ठरलेला प्रोग्राम --- मांडवी ... तिथे एक सुंदरसा समुद्रकिनारा आहे आणि जेटी कि काय म्हणतात तो तसला प्रकार .....जेटीच एक टोक पाण्यात आतपर्यंत गेलेलं .....असं म्हणतात कि पूर्वी तिथे मोठी मोठी जहाजं लागायची .गेट वे ऑफ इंडिया सारखं इथेही ' गेट वे ऑफ सोनगिरी ' आहे आणि .मुंबईला चौपाटीवर भरते तशीच जत्राही ....चौपाटी म्हटली कि भेळपुरी आलीच ... मग नारळपाणी आणि मक्याची कणसेही जोडीला असतात . दोन चार घोडागाड्या , एक -दोन उंट उगाचच आपले फेऱ्या मारत असतात . मला आजपर्यंत कळलं नाही कि घोडागाडीत आणि त्या उंटाच्या पाठीवर बसून लोकांना काय मिळतं ? संध्याकाळी सूर्यास्त बघण्यासाठी भलतीच गर्दी होते जेटीवर... कुणी तो सूर्य डोळ्यात साठवून घेतंय ... कुणी कॅमेऱ्यात.... तर कुणी मोबाईल मधे .... खरंच , सूर्यास्त बघावा तो समुद्रकीनारीच !!! दुसऱ्या कोणत्याही ठिकाणाला त्याची सर येणार नाही. आल्याआल्या आम्ही नेहमी त्या जेटीच पाण्यात बुडलेल टोक गाठतो...समोर अथांग पसरलेला सागर ... अथकपणे घुसळत असलेलं पाणी ... त्याचा गर्जनासदृष्य होणारा आवाज... मधूनच दिसणारी एखादी होडी... लालबुंद होत जाणारा सूर्य ... आणि त्यामुळे क्षणाक्षणाला बदलत जाणारा आकाशाचा रंग ....हे सांर दृश्य अतिशय विलोभनीय आहे . जेटीच्या टोकावर गेल्यावर एक वेगळीच अनुभूती होते . समोर मुक्तहस्ताने कोणीतरी गुलाल उधळला आहे , आणि त्याचे मनोहारी प्रतिबिंब पाण्यावर पडलेले आहे . आता सूर्य पूर्णपणे बुडालेला होता , पण तरीही आपली छाप त्याने सभोवतालच्या आकाशावर सोडलेली होती. समोरच्या सोनदुर्गावर असलेल्या दिपगृहावरचा प्रकाश गोल गोल फिरू लागला , तो तसा फिरू लागला कि आपल्या प्रकाशाने सगळ्यांना आशीर्वादच देतोय असं वाटत . अंधार पडू लागला तसं सभोवतालचं पाणी भयानक वाटायला लागलं...असं वाटलं कि ह्या लाटा आता त्यांच्या हजार हातांनी आपल्याला आत खेचून घेतील .... एक सूर्य काय बुडाला , आजूबाजूचं वातावरण एकदमच बदलून गेलं,... आयुष्याचही असंच असेल का ? ... आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यावर असाच अंधार दाटत असेल... सुर्यास्तामुळे बदललेल्या वातावरणाचा परिणाम आपल्या मनावरही होतोय हे माझ्या लक्षात आलं. ही तिथून निघायची खुण होती. ...आणि आमच्या मित्रांनाही आता निराळीच ओढ लागलेली दिसली. .... जेटीवर बरेच लोक संध्याकाळी जमतात... त्यात तरुण मुलांची संख्या जास्त.,! का ..? तर सुंदर सुंदर मुली येतात म्हणून ...आमचंही मांडवीला येण्याचं ते एक प्रमुख कारण आहे. आमचं म्हणजे उम्याच !!! .उम्या तर तिथे शिकारासारखा वावरतो, आपलं सावज शोधत...आणि बऱ्याचदा त्याला यश आलेलही आम्ही पाहिलं आहे ....आत्ताही तो समोरच्या एका आकाशी कलरचा ड्रेस घातलेल्या मुलीकडे एकटक पाहत होता.आणि ती मुलगीही त्याच्याकडे मधून मधून पाहत होती
-- " प्रगती आहे ...." मी हळूच उम्याच्या कानाजवळ जाऊन म्हणालो...त्यावर तो मिश्किलपणे हसला , आणि म्हणाला ," ती मुलगी फक्त ' टाईमपास' करतेय...."
-- " हे तू कशावरून म्हणतोस?? " उम्या लगेच निष्कर्षाप्रत आल्यामुळे मी आश्चर्याने त्याला विचारले...
_ " नीट बघ , मधून मधून ती घड्याळाकडे बघतेय... ती तिच्या बॉयफ्रेंड ची वाट पाहात आहे ...." उम्याने माझ्या शंकेचं निरसन केलं.
-- " पण बॉयफ्रेंडच कशावरून ?? मैत्रीणीचीही वाट बघत असेल..." आनंद ने आपली एक शंका उपस्थित केली .
--" नाही , १०० टक्के ती तिच्या बॉयफ्रेंडची वाट बघतेय...मैत्रिणीला भेटण्यासाठी एवढं सजून धजून कोणी येत नाही. ." उम्या त्याच्या निष्कर्षावर ठाम होता.
-- " हो का ?? मग ती तुझ्याकडे का पाहतेय एवढी ...? '' मी वाद घालण्याच्या उद्देशाने म्हणालो.
-- " अरे बाबा , काहीतरी टाईमपास नको का......' सेकंड ऑप्शन ' म्हणून पाहतेय. .." उम्या म्हणाला...पण आनंद आणि माझा त्यावर विश्वास बसला नाही . पण थोड्या वेळात उम्याच खरा ठरला... त्या मुलीचा बॉयफ्रेंड तिला भेटायला आला, आणि ते दोघे जेटीच्या टोकाकडे गेले ... आम्ही उम्याकडे ' तुस्सी ग्रेट हो ' अशा अर्थाने पाहू लागलो ... उम्याची मुलींच्या बाबतीतली ही निरीक्षणशक्ती आणि तर्कशक्ती पाहून आम्ही थक्क झालो होतो...
--" पण तुला वाईट नाही वाटलं तिला बॉयफ्रेंड आहे हे पाहून ?? " मी त्याला काळजीने विचारलं..
--" त्यात वाईट काय वाटायचं?? चलता है ..." उम्या बेफिकीरीने म्हणाला...
--" जाऊ दे उम्या .... वाईट वाटून घेऊ नकोस .... मी समजू शकतो तुझ्या भावना....." आनंद उम्याला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला
--" पण माझा असा तर्क आहे कि ती मुलगी आपल्याला पटू शकते ...तिच्या वागण्यावरून मला असं वाटतंय ...." उम्या आत्मविश्वासाने सांगत होता ...
--" कसं काय? " आनंद ने उत्सुकतेने विचारले.
-- " . ते दोघे जेटीवरून थोड्या वेळात येतील परत ....माझा अभ्यास सांगतोय ,.येताना ती मुलगी माझ्याकडे परत बघेल " उम्याने भविष्य वर्तवले....
--" आणि नाही बघितलं तर ? आम्हाला पार्टी द्यायची तू..." आनंद उत्साहित होऊन म्हणाला...
_ " आणि बघितलं तर ?? तू देणार का आम्हाला पार्टी ??" उम्याने पलटवार केला .
--" हो देतो ना ... त्यात काय !!! '' आनंदनेही तयारी दाखवली...चला बर झालं ....आता ती मुलगी उम्याकडे बघो अगर न बघो माझी पार्टी मात्र फिक्स होती.....थोड्या वेळाने आम्ही विनय हॉटेल मधे गेलो .....मस्त चिकन तंदुरी आणि बिर्याणी हादडली .... त्यानंतर मसालापान पण खाल्लं..... उम्या तर आग्रह करत होता कि आईस्क्रीम पण खाऊ म्हणून , पण मीच नको म्हणून सांगितलं .......जेवणाचे आणि मसालापानाचे बिल बिचारा आनंद भरत होता......

Wednesday, June 8, 2011

संध्याबाईंची शिकवणी


ऑफिस मधून दमून भागून संध्याकाळी ७ वाजता आम्ही तिघेही घरी आलो. आज महिना अखेर असल्याने भरपूर काम होतं ,.त्यामुळे तिघेही जाम वैतागलो होतो. उम्या तर उघडाबंब होऊन फरशीवर आडवा झाला होता.त्याच्या हातात TV चा रिमोट होता . समोर TV पाहताना रिमोट वर त्याचा फक्त अंगठा चाले. रिमोट ची त्याच्या हाताला इतकी सवय झाली होती कि तो पाहिजे ते चानेल बरोबर लावत होता .. .कधी . ५७ ,कधी २४ .... कधी १८ . ऑफिस मधून आल्यावर आनंद नेहमीप्रमाणे अंघोळीला गेला .मी आपलं उम्या जे चानेल सेकांदापेक्षाही कमी वेळेत पाहून बदलत होता, ते निमुटपणे बघत होतो. शेवटी एका गाण्याच्या चानेल वर तो थांबला . कदाचित ते गाणं त्याच्या आवडीच असल्याने तो ते बघत बसला..... इतक्यात दारावरची बेल वाजली. ' आता ह्यावेळेला कोण तडमडलय ?' हा विचार आमच्या दोघांच्याही मनात आला. मी कंटाळवाण्या नजरेनेच उम्याला ' दार उघड' असं खुणावलं . उम्याही महाद्काष्टाने उठला... पिन होल मधून बघितलं आणि तो उडालाच ., इकडे तिकडे पळापळ करायला लागला.
-- '' अरे काय झालं ? कोण आहे ?'' मला तर भीती वाटली कि आमचा ऑफिसचा साहेबच आला कि काय? परत काहीतरी काम लागणार....
-- '' अरे उठ उठ .. कपडे घाल... माझा टी शर्ट कुठे आहे ?'' उम्या घाई घाईत बोलत होता. आता तर माझी खात्रीच पटली कि ऑफिस मधलच कोणीतरी ह्या वेळी तडमडलय म्हणून ....उम्याने थोडासा पसारा आवरल्यासारखं केलं .मी पण शर्ट घातला... आणि दरवाज्यापलीकडे कोण असेल ह्याचा विचार करीत उभा राहिलो. उम्याने दार उघडले - तर समोर साक्षात संध्याबाई उभ्या होत्या . चेहऱ्यावर तोच पावडर लावल्याने झालेला करडा रंग. आणि दातांची खिडकी दाखवत संध्या उभी होती. ... ऑफिसचाच काय पण हेडऑफिस चा साहेब जरी आला असता तरी चालल असतं, पण हि बया नको रे बाबा ....
-- '' तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? '' संध्या चेहऱ्यावर स्मित हास्य करीत विचारात होती .
-- '' अरे, नाही आम्ही TV च बघत होतो. ये ना , आत ये. '' उम्याने तिला आत यायला सांगितलं ... आणि दरवाजा मग मुद्दामच उघडा ठेवला.... संध्याच्या हातात कसलीही वही दिसत होती.
-- '' बस ना.... तू इकडे कशी काय? '' मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं ...
-- '' तुमचा गायडन्स घ्यायला आलेय ...MPSC चा अभ्यास कसा करायचा ते... तुम्ही करता ना अभ्यास??? '' ती आमच्या दोघांकडे पाहत म्हणाली . संकटे हि कधी आपल्याला सांगून येत नाहीत हेच खरं !! आता ह्या संकटावर मात करता येणार नव्हती . पण त्यापासून दूर पाळता येणं शक्य होतं.पण आता सुटका करायची म्हणजे कुणाचा तरी बळी देणं गरजेचं होतं. मी उम्याकडे पाहिलं तर तोही असाच काहीतरी विचार करतोय असं मला वाटलं ...त्याच वेळी आनंद च्या अनुपस्थितीचा आम्ही फायदा उचलला.....
-- '' नाही, आम्ही नाही करत अभ्यास ... आमचा तिसरा पार्टनर आहे , आनंद ... तो करतो अभ्यास.... तो मुंबईला क्लास्सेस मध्ये शिक्वयचाही.... '' उम्याने आमच्यावर येऊ पाहणार संकट आनंद वर ढकलून दिलं.
-- ''तो MPSC ची प्रि परीक्षा पण पास झाला आहे . तो तुला चांगला गायडन्स करेल ...'' उम्याने लावलेल्या आगीत मीहि थोडं तेल ओतलं ...
-- ''अरे वा.. हो का ? पण ते दिसत नाहीत... कुठे बाहेर गेले आहेत का? " संध्याने विचारणा केली.
-- '' नाही , तो वॉश घेतोय .... स्वच्छतेची त्याला भारी आवड.. कधी कधी ३-३ वेळाही अंघोळ करतो....'' उम्या त्याच्या मूळ स्वभावावर आला कि काहीही बडबडतो .... त्याच्या त्या पाणचट विनोदावर संध्या बाईंनी पुन्हा आम्हाला त्या ' खिडकीचं' दर्शन घडवलं. इतक्यात आनंद कमरेला टॉवेल लावून बाथरूम मधून बाहेर आला. त्याला बहुतेक माहित नव्हतं कि बाहेर कोण आलं आहे ते ,.त्यामूळे तो बिनधास्त बाहेर आला. संध्याला पाहून जोरात भूत पहिल्यासारखा ओरडला आणि आतल्या खोलीत पळाला . संध्याने त्याच्या त्या अर्धनग्न शरीराकडे पाहिलं आणि भलतीच लाजली . उम्या मिश्कील पणे माझ्याकडे बघत हसत होता.
-- " बघ, मी म्हटलं नव्हतं ??? भलताच स्वच्छंदी माणूस ..." उम्या संध्याकडे बघत म्हणाला. . ' स्वच्छता राखणारा' म्हणजे ''स्वच्छंदी'' हा मराठी भाषेतला नवीनच शब्दार्थाचा प्रकार मला उम्याच्या तोंडून ऐकायला मिळाला. संध्याबाईं लाजत हसल्या ...आता ह्या उम्याला काय बोलणार ...
आनंद आतल्या खोलीत गेला होता त्याला बराच वेळ झाला. त्याला इतका वेळ का लागतोय हे पाहण्यासाठी मी आत गेलो , तर हा आतच बसलेला ...
-- '' अरे आत काय करतोयस? ती संध्या आली आहे तुला भेटायला....'' खरं तर मला हे सांगताना हसायला येत होतं...पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही..
-- '' मला??? मला कशाला?? मी नाही म्हणून सांग....'' आनंद वैतागून म्हणाला .
-- ''अरे सांग काय शाण्या ..?? मघाशी जोरात ओरडून तूच आत पळालास ना?? तिने बघितलं तुझ्याकडे .. आणि तुझ्या अर्धनग्न शरीराकडे..'' ..मला आता हसायला यायला लागलं
-- '' च्या आयला त्या बयेचं माझ्याकडे काय काम आहे?. ''
-- ''मला काय माहित ?? तूच विचार , चल ती बाहेर वाट पाहतेय..." मी आनंदला हाताने खेचत म्हणालो
--'' साल्यांनो , तुम्ही दोघांनी काहीतरी किडेगिरी केलेली दिसतेय ... मला लटकवलत तुम्ही ...'' आनंद माझ्याकडे संशयाने बघत म्हणाला ... आणि खाटीकच्या मागून चालणाऱ्या बकऱ्यासारखा हळूहळू माझ्या मागे चालत बाहेर आला.
तो बाहेर आलेला पाहून संध्याने स्मितहास्य केलं . आनंदलाही मग खोट खोट हसायला लागलं.
--'' hi ..''..संध्या म्हणाली
--'' hi .''...आनंदहि म्हणाला... ' हाय.....' मी मनातल्या मनात म्हणालो.
-- '' माझ्याकडे काय काम होतं तुझं? " आनंद तुटकपणे म्हणाला.
-- '' तुमचा गायडन्स घ्यायला आलेय ...MPSC चा अभ्यास कसा करायचा ते...हे सांगत होते कि तुम्ही क्लास्सेस घेत होतात आणि MPSC ची प्रि परीक्षाही पास झालात ... '' संध्या आमच्याकडे बघत म्हणाली. आनंद ने १ थंड कटाक्ष आमच्याकडे टाकला.
-- संध्या , तू आणि आनंद इथे बसा... मला आणि मकरंद ला जरा ऑफिस चा काम आहे ... आम्ही आतल्या खोलीत बसतो. .... OK ?'' उम्या आणि मी तिथून आत सटकलो . थोडं वेळ शांततेत गेला . नंतर आम्हाला त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकायला यायला लागला.
-- '' तुम्ही कोणत्या क्लास मध्ये शिकवत होतात मुंबईला? "-- संध्या
-- '' मी ? मी नाही ? Actually माझ्या मित्राचा क्लास होता . मी तिथे कधी कधी लेक्चर्स घ्यायचो .''
--'' वॉव.. तुमचे मित्र म्हणाले कि तुम्ही बऱ्याच परीक्षा पास झालात म्हणून... " बिचारी संध्या काहीतरी विचारायचं म्हणून विचारात होती.
-- '' .हो पास झालोय ... पण मी एकटा नाही... ते दोघे पण पास झाले आहेत... '' आनंद आम्हाला असंच सोडणार नव्हता.
-- अय्या हो ?? .... पण ते बोलले नाहीत.... " संध्याने आश्चर्याने विचारलं
--'' अगं . खरतर माझ्यापेक्षा त्या दोघांना जास्त मार्क आहेत. ... " आनंद आता पेटला होता.... आम्ही आतून हे सगळं ऐकत होतो .. आपण सोडलेला बूमरांग आपल्यावरच येऊन आदळणार कि काय? आता लवकरात लवकर काहीतरी कृती व्हायला हवी होती नाहीतर आमचं काही खरं नव्हतं. इतक्यात उम्याच्या सुपीक डोक्यातून १ कल्पना निघाली . त्याने १ गणिताचं पुस्तक काढलं आणि तसाच बाहेर गेला . मीही त्याच्या मागोमाग बाहेर गेलो. मी जर बाहेर गेलो नसतो तर त्या दोघांनी मिळून मलाच मास्तर म्हणून लटकवायला कमी केलं नसतं....
--'' अरे आनंद ... जरा हे गणित कसं सोडवायचं ते सांग ना....'' उम्या त्याला म्हणाला . आनंदने ते पुस्तक जरा रागातच घेतलं , आणि पाहिलं, . ते इतकं फालतू गणित होतं कि पाचवीच्या मुलाने पण सोडवलं असतं... पण आम्हाला वेळ मारून न्यायची होती . उम्याने चांगलीच शक्कल लढवली होती.
-- '' तुम्ही आत जा ... तुम्हाला नंतर सांगतो मी...." आनंद आमच्याकडे ' बघून घेतो तुम्हाला ' अशा अर्थाने बोलला
--'' बघितलस ... आनंदला सगळ येतं ... फारच हुशार आहे तो... '' उम्या संध्याकडे पाहून म्हणाला.
-- '' आम्हाला काही अडलं कि आम्ही त्यालाच विचारतो. " मीही त्याच्या सरणावर १ लाकूड टाकले. संध्या आनंद कडे ' अरे वा ' असं चेहरा करून पाहू लागली....
-- " तुमचं चालू दे....सॉरी हा आनंद , तुला डिस्टर्ब केलं.." . मी त्याला म्हणालो...
आता आनंद पक्का ' मास्तर ' झाला होता.