Saturday, May 28, 2011

संध्याबाई

-- " तुम्ही वरच्या मजल्यावर राहायला आलात काय??? " एक ५०-५५ वयाच्या डोळ्याला चष्मा असणाऱ्या बाई आम्हाला विचारात होत्या . त्यावेळी आम्ही आमच्या दरवाज्याच्या कुलुपाची चावी तिघांपैकी कोणाकडे आहे ? ह्यावर भांडत होतो .त्या बाईंच्या प्रश्नाने आम्ही शांत झालो .
-- " हो परवाच आलो राहायला " आनंद त्या बाईंना म्हणाला.
-- "हो का? .... आपलं नाव कसं ?
-- " मी आनंद , हा मकरंद . आणि हा उमाकांत" आनंद ने आमची पण ओळख करून दिली . मी आणि उम्याने त्यांना हसून नमस्कार केला .
-- तुम्ही कॉलेज मध्ये आहात कि कसं ?
-- नाही , आम्ही जॉब करतो ...
-- तिघेही??
-- हो
-- कुठे ??
-- FDA
-- FDA ?? हि कोणती कंपनी ?? , त्या बाईंची प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली ...मला तर असा कंटाळा आला होता ... मनात आलं कि त्या बाईंना सरळ सांगावं कि , 'ओ , बाई तुमचा आणि आमचा कसलाही संबध या पूर्वी नव्हता.... आणि पुढेही येणार नाही ...का उगाच डोकं खाताय??' पण मला तेव्हा काय माहित होतं कि माझं हे विचार करणं किती फोल होतं ते...
-- कंपनी नाहीं... महाराष्ट्र शासन .... आनंद च्या उत्तराने मी भानावर आलो .' महाराष्ट्र शासन' हा शब्द ऐकल्यावर
त्या बाईंनी त्यांच्या चष्म्यापेक्षा मोठे डोळे केले .
-- अरे वा !! म्हणजे गव्हर्मेंट मध्ये का??
-- हो ...
आम्ही गव्हर्मेंट मध्ये काम करतो हे कळल्यावर त्या बाईंच्या डोळ्यात आमच्याविषयी आदर आणि आश्चर्य ह्यांचं मिश्रण दिसलं.
-- काय हो ? कसे काय लागलात गव्हर्मेंट मध्ये??... ह्या विचारण्यामागे त्या बाईंचा वेगळाच उद्देश दिसला.
-- "department ची परीक्षा होती ती पास झालो, त्यानंतर interview ., आणि मग आमची निवड झाली " .उम्या म्हणाला , त्यालाही कदाचित त्या बाईंनी विचारलेल्या प्रश्नाचा रोख कळला असावा. .
--" ओ ... अच्छा .. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला होतात तर... ... इथे कोणत्या पदावर आहात??... " ह्या बाई तर आमच्या तिघांचीही कुंडली काढायच्या विचारात दिसत होत्या . त्या सर्व प्रश्न आनंद लाच विचारात होत्या , ते एक बरं होतं .आम्ही आपले मागे हाताची घडी घालून उभे होतो आणि जाम वैतागलो होतो. पण मधेच त्या बाई आमच्याकडेही पाहत होत्या त्यामुळे उगाचच खोटं खोटं हसायला लागत होतं.
-- मी आणि उमाकांत वरिष्ठ लिपिक आहोत आणि मकरंद कनिष्ठ लिपिक.... आनंद ने आमच्या पदांचीही नावे सांगितली ... प्रथमच मला ह्या सर्वांपेक्षा कनिष्ठ असल्यासारख वाटू लागलं....
-- अरे वा ... त्या बाई म्हणाल्या ... आता वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक ह्या पदामध्ये अरे वा म्हणण्यासारख काय आहे ?? असं मला वाटून गेलं ...पण त्या बाईंची आमच्याबद्दलची स्तुती चालूच होती .
-- " आमच्या संध्याला मी किती वेळा सांगते कि बाई स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कर , अभ्यास कर ,,गव्हर्मेंट मध्ये असलं कि काही टेन्शन नसतं .. नाही का?? " त्या बाई म्हणाल्या ..जणू काही गव्हर्मेंट आम्हाला फुकट पगार देत होतं . इतक्यात एक चष्मा घातलेली , सावळीशी, - सावळीशी कसली काळीच..... - मुलगी जिना चढून वर आली . तिने इतकी पावडर लावली होती कि काळ्या रंगात पांढरा रंग मिक्स केल्यावर विचीत्रसा करडा रंग तयार होतो तसा तिचा चेहरा दिसत होता . दातांमध्ये डाव्या बाजूला दात पडल्याने किंवा वाकडा उगवल्याने खिडकी तयार झाली होती . ती मुलगी हसतच वर येत असल्याने आम्हाला ती खिडकी दिसली . ती वर येणारी मुलगी ' संध्या' आहे हे कळायला आम्हाला क्षणाचाही विलंब लागला नाही .
--" हि संध्या , माझी मुलगी...बी. कॉम. झाली आहे सध्या जॉब शोधतेय ." संध्या बाईंच्या आईसाहेब म्हणाल्या
उम्याला मधेच काय झाल कुणास ठाऊक तो मध्येच म्हणाला ," आमच्या आनंद स्पर्धा परीक्षांचा अभ्यास रोज करतो बरीच पुस्तकं पण आहेत त्याच्याकडे" . समोरच्या त्या बाईंना हवा असलेला धागा मिळाला .
-- "हो का?? मग आमच्या संध्यालाही सांगा न कसा अभ्यास करायचा ते...."
आनंद ने उम्याकडे एक घाणेरडा कटाक्ष टाकला .पण लगेच समोरच्या त्या बाईंकडे पाहून उसण हास्य आणून म्हणाला ,"हो..... ठीक आहे , मी सांगेन कसा अभ्यास करायचा ते ..." एखाद्या मुलाने मुलीला लग्नासाठी होकार दिल्यावर ती मुलगी कश्या प्रकारे लाजेल.....तशा प्रकारे संध्याबाई लाजल्या ....मला तर मनात इतक हसायला येत होत कि काय सांगू ....मी उम्याकडे पहिला तर तो ढिम्म चेहरा करून समोर पाहत होता ..
--" ठीक आहे येतो आम्ही , काही लागलं तर सांगा बरं का !! लाजू नका ...आम्ही इथेच खालच्या मजल्यावर रहातो"
--" ठीक आहे ... आम्ही त्या बाईंचा आणि संध्याबाईंचाहि हसून निरोप घेतला .आम्ही रूम मध्ये आलो दरवाजा बंद केला , आणि जो हास्याचा स्फोट झाला !!! आनंद वैतागून आमच्याकडे पाहत होता ...
--" उम्या साल्या तुला नसता शानपना कोणी करायला सांगितला रे? " आनंद चिडला होता . आमचं हसणं चालूच होतं . त्याने उम्याला एक फाईट लाऊन दिली तरी तो हसतच होता...
-- " आता मजा आहे बाबा एका माणसाची .... भारी आयटम आहे बरं का.... आता रोज सकाळ संध्याकाळ शिकवणी ....." उम्या आणि मी जोरजोरात हसत सुटलो .उम्याने लगेच एक गाणं पण तयार केलं... सायोनारा .. सायोनारा च्या चालीवर .... .......संध्याकाळी.... संध्याकाळी .....
येशील का तू.... माडीखाली......
ह्याच्या पुढच्या ओळी मात्र इथे लिहिण्यासारख्या नाहीत .