सोमवार, २० जुलै, २०१५

लोकल डायरी -- २१

                            

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९ http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०                                          

                   '  सावंतांच्या घरी कोण गेलं असेल ? ' हा एकच प्रश्न मला सारखा सतावत होता . त्यांची  ही गोष्ट फक्त मला माहित होती . त्यांच्या ह्या प्रकरणाचा कुणालाही गंध नव्हता . हां ... एकदा भरतने आम्हाला बोलताना बघितलं होतं पण त्यालाही मी  निटसं काही माहित होऊ दिलं नव्हतं . मग त्यांच्या मिसेसला समजवायला गेलं कोण ? आणि अशा परक्या माणसाचं बोलणं त्यांच्या मिसेसना पटलं कसं ? असं काय म्हणाला असेल तो ? जे सावंतांना जमलं नाही ते कोण कुठल्या  त्या अनोळखी माणसाने केलं होतं .  हे  सगळंच आकलनाबाहेरचं होतं .
 " मध्या ... ए मध्या .... थांब ..." मागून कुणीतरी हाक मारत होतं . मी वळून पाहिलं , मागून शरद धावत येत होता .
" अरे , किती हाका मारत होतो तुला ...लक्ष कुठं होतं तुझं ? " तो धापा टाकत म्हणाला .
" सॉरी यार , मी दुसऱ्याच विचारात होतो . बोल , काय म्हणतोस ? "
" काही नाही .... असंच .... तू स्टेशनकडे जाताना दिसलास म्हणून हाक मारली ...." शरद '  काही नाही ' असं जेव्हा म्हणतो तेव्हा काहीतरी नक्कीच असतं .... इतकी वर्ष मी त्याला उगाचच ओळखत नाही ...! पण तो लगेच सांगणार नाही हेही मला माहित आहे . त्यामुळे मी त्याला जास्त काही विचारलं नाही . आम्ही स्टेशनचा ब्रिज चढत असतानाच पुन्हा मागून हाक आली .  मागून भरत येत होता . मला आता संकटाची जाणीव होऊ लागली . हे दोघे एकत्र आले की काही ना काही भानगड नक्की करतात . आज दोघेही काहीतरी ठरवून आलेले दिसत होते . आणि त्यांनी मला पकडल्यामुळे मी थोडा सतर्क झालो होतो . ह्यांचं काही सांगता येत नाही . कधी कुणाचा बकरा करतील नेम नाही ....
" अरे वा .... आज दोघेही एकत्र ....? " मी भरतकडे पहात म्हणालो .
" एकत्र कुठे ...? तो आधी आलाय " भरत शरदकड़े बघत म्हणाला .
" चला उशीर होतोय ..." मी पुढे जात म्हणालो . ते दोघे माझ्या मागून  यायला लागले . माझ्या मागे ते काहीतरी कुजबुजत असल्याचं मला जाणवलं . मी मागे बघितलं तर एकदम गप्प झाले . नक्कीच काहीतरी शिजतंय ... मी आणखी सावध !
मी तसाच पुढे निघालो . थोडं पुढे गेल्यावर शरद मागून आला  आणि त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला .
" अरे काय यार मध्या , एवढा काय पळतोयस ? गाडीला अजुन बराच टाईम आहे . " तो म्हणाला . मी त्याच्याकडे पाहिलं . डोळ्यात काही मिश्किल भाव आहेत का  हे मला पहायचं होतं .पण  तसं काही  जाणवलं नाही .  माझ्या दुसऱ्या बाजूने भरत माझ्याजवळ आला . ' आयला , हे डाकू लोक करणार तरी काय आहेत ? ' मी विचार करु लागलो . पण मला जास्त विचार करायची गरज पडली नाही . शरदने लगेच मला विचारलंच . , " अरे मध्या , तुला ज़रा विचारायचं होतं . "
" बोल ना ..."  आता काय विचारेल देव जाणे ...
" काल तू म्हणालास की आम्ही तुला काही सांगत नाही , तसं काही नाही यार .... तुझा काहीतरी गैरसमज झालाय ...तू तसं काही मनात ठेऊ नकोस ...  " शरद कसनुसं तोंड करुन म्हणाला .अच्छा ... ! म्हणजे हे लोक कालच्या गोष्टीबद्दल बोलतायत तर .... ओके , मग ठीक आहे ....  मला तर आधी वाटलं की अँटी व्हायरस बद्दल विचारतात की काय ?
" तुला माहित आहे का , आम्ही कुणाबद्दल बोलत होतो ..." भरत विचारु लागला . मी हो म्हटल्यावर तर ते दोघे एकदम काळजीत पडल्यासारखे वाटले . काल मी सहज खडा मारून पाहिला आणि तो बरोबर लागला होता  . शरद - भरत जिग्नेस बद्दलच बोलत होते .
" होय , तुम्ही जिग्नेसबद्दल बोलत होतात ना ....  मला माहित आहे ...." मी पुन्हा ठोकून दिलं .
" अरे यार , तेच तुला आम्ही सांगायला आलोय की , आम्ही जे पाहिलं ते खरं असेलच असं नाही ... म्हणजे आमचा पण गैरसमज झाला असेल ... " शरद गोंधळल्यासारखा वाटू लागला .
" तुम्ही जे पाहिलं म्हणजे ? असं काय पाहिलंत तुम्ही ? " मी गडबडित विचारुन गेलो . आणि लगेच चूक माझ्या लक्षात आली .
" बघ , तुला बोललो होतो ना ...? ह्याला काही माहित नाही म्हणून ... तू उगाच मला पण टेंशन दिलंस ... चु ... " शरद भरतवर घसरला .
" अरे पण काल हा इतक्या कॉन्फिडंटली बोलत होता ... मला वाटलं ह्याला माहित झालं सगळं ..." भरत त्याची बाजू सावरत म्हणाला .
" सोड आता , चल ... " असं म्हणत दोघे पुढे  जाऊ लागले . म्हणजे  जिग्नेसची  ह्यांना माहीत असलेली एखादी गुप्त बातमी मला माहीत आहे की नाही हे तपासण्यासाठी हे डाकू  आले होते तर .... !  पण ऐनवेळी माझ्या मुर्खपणामुळे मी फसलो . भेळ खाऊन झाल्यावर त्याचा कागद जसा फेकून देतात तसे ते मला टाकून  पुढे निघुन गेले .
" शरद , थांब शरद ..... जिग्नेसचं काय झालं .... तुम्ही काय पाहिलंत ...? " मी त्याला थांबवत  विचारलं . तर तो काहीच सांगेना ... तसाच पुढे जायला लागला . " शरद , यार सांग ना काय झालं ते ... काय भाव खातोय एवढा ....? "
" तुला माहीत नाही तेच बरं आहे , आणि असंही आम्हाला अजुन नक्की काय ते कळालं नाही ... त्यामुळे तुला काही सांगू शकत नाही . सॉरी .... "  शरद म्हणाला .
" काही सिरिअस प्रॉब्लेम आहे का ? मी नाही सांगणार कुणाला ... प्लीज सांग ना ...." मी चेहऱ्यावर अजिजी आणत म्हणालो . पण त्याचा काही उपयोग झाला नाही . ते मला काही सांगणार नव्हते .
" ठीक आहे , मी जिग्नेसलाच विचारतो काय मॅटर आहे ते ....!" मी असं निर्वाणीचं म्हणाल्यावर  ते दोघे होते तिथेच थांबले . परत  येऊन शरद  माझ्याकडे  रोखून बघत म्हणाला , " मध्या , ही मस्करी नाही . एखाद्याच्या आयुष्याच्या प्रश्न आहे . तू उगाच बावळटासारखं   काहीतरी विचारुन वाट लावशील . त्यामुळे शांत रहा . वेळ आली की आम्ही तुला सांगू सगळं ... पण आता त्याला काही विचारायला जाऊ नकोस ... काही प्रॉब्लेम झाला तर त्याला तूच जबाबदार रहाशील … समजलं  … ? "
" सॉरी , पण खरंच काही मोठा प्रॉब्लेम आहे का ? "  शरदच्या गंभीर चेहऱ्याकड़े बघत मी विचारलं
" हो बहुतेक   .... !  " भरत म्हणाला .
" तसं काही नसेलही .... आम्ही  उगाच असा विचार करीत असू ... जाऊ दे ... मध्या आम्ही तुला योग्य वेळ आल्यावर नक्की सांगू ... पण आता त्याला काही विचारु नको , प्लीज ...." शरद म्हणाला .
" ठीक आहे ... मी नाही काही विचारणार ... चला ...." आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तेव्हा गाडी आधीच आली होती . आमच्या दोन - तीन जागा त्याच्यामुळे गेल्या . आत आल्या आल्या जिग्नेस आमच्यावर खेकसला , " अरे किदर थे तुम लोग ... गयी ना जगा अब ..."
" जाने दे जिग्नेस ...  एक दिन जगा नहीं मिली तो क्या फर्क पड़ता है …?  थाना के बाद बैठते है .... तू बैठ आरामसे ..." शरदला जिग्नेसशी इतकं चांगलं बोलताना मी पहिल्यांदा पहात होतो . हे म्हणजे वाघ बकरीकड़े दयाभावनेने पहात असल्यासारखं झालं  ...   इतर वेळी तो जिग्नेसला अगदी  नको नको करुन सोडतो .  नक्कीच मोठा प्रॉब्लेम असावा ....
सावंत आज आले नव्हते . त्यांनी आज सुट्टी घेतली होती . काल तसे ते मला म्हणालेही होते . पडत्या फळाची आज्ञा समजून  ते आज   शकुंतलाबाईंना त्यांच्या घरी घेऊन जाणार होते . तसं मीच त्यांना सांगितलं होतं . कुणी सांगावं , त्यांच्या मिसेसचा निर्णय पुन्हा बदलला तर !  सावंत खरेच नशीबवान ! आपल्या बायकोबरोबर आणि प्रेयसीबरोबर ते एकाच घरात राहणार होते ... भारिच ...!
अँटी व्हायरस समोर उभी होती . मी तिच्याकडे पाहिलं . तिनेही ओळखीचं हसून प्रतिसाद दिला . बऱ्याच वेळा ती जीन्स आणि टॉप घालायची पण  आज तिने मरून कलरचा चूड़ीदार घातला होता . मॅचिंग बांगड्या ,   कानात मॅचिंग इअर रिंग्स , मॅचिंग टिकली . तिच्या मुळच्या गोऱ्या वर्णावर हे अगदीच खुलुन दिसत होतं .   सगळं अगदी परफेक्ट ... आणि तितकंच सुंदर  ...  उभ्या उभ्याच मला तरंगल्यासारखं  वाटायला लागलं . मी सगळं काही विसरुन तिच्याकडे बघत राहिलो . तिच्याही ते लक्षात आलं असेल .... तिही ओठातल्या ओठात हसत होती .  त्यावरचा तो तीळ तर जीवघेणाच होता ....   कधी एकदा भायखळा येतय असं मला झालं .
" हाय ... आज काय स्पेशल ...? " उतरल्या उतरल्या मी तिला गाठलं .
" नाही .... काही खास नाही ... असंच .... " तिच्या कानातले मॅचिंग इयर रिंग्स लयीत हलले ....
" नाही म्हणजे , आज वेगळी ड्रेसिंग आहे म्हणून विचारलं ... ऑफिसमधे काही फंक्शन आहे का ? "
" नाही ... असंच थोडा चेंज म्हणून घातला हा ड्रेस ..."
" तुम्हाला एक कॉम्प्लीमेंट देऊ का ....? "
" ह्म्म ....?  " मी काय बोलणार हे तिने आधीच ओळखलं असावं .
" तुम्ही आज फारच सुंदर दिसताय ... "
" हो .... मला माहीत आहे ते ..." असं म्हणून ती समजुतीने हसली ., " आणि ,  तुम्हाला वेळ असेलच , तेव्हा ... " असं म्हणून तिने आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटकडे खुण केली . खरं तर आज मला बिलकुल वेळ नव्हता .  ऑफिसमधे लवकर जायचं होतं . आज उशीर झाला तर महिन्यातला  आजचा माझा तिसरा लेट मार्क लागणार  होता .  पण आता त्याची पर्वा कुणाला आहे ....!  गेली सुट्टी तर गेली उडत ...!
" चला , मला तर नेहमीच वेळ असतो ...." ऑफिसचा विषय तात्पुरता बाजूला ठेऊन   मी उत्साहात तिला म्हणालो  अन  आम्ही दोघे निघालो . रेस्टॉरंटमधे गेल्यावर पुन्हा काऊंटरवरच्या मालकाचं औपचारिक हास्य आणि ऑर्डर घेणाऱ्या पोऱ्याने न सांगता बन मस्का आणि चहा आणून देणं हे झालंच !
" ह्याला न सांगता सुद्धा हा आपली ऑर्डर कशी काय आणतो ...? " वेटर  चहा आणि बन मस्का टेबलावर ठेऊन गेल्यावर तिने आश्चर्याने विचारलं .
" ती तुमचीच जादू आहे ... "
"  माझी जादू ... ? कायतरिच काय ...? "
" हो ... खरंच .... तुम्हाला असं वाटतं का , की तो माझ्याकडे बघुन ही असली ट्रीटमेंट देत असेल ...? "  त्यावर ती खुलुन हसली . दुरवरच्या मंदिरात घंटानाद झाल्यासारखं मला वाटलं .
" मे बी,   आपण बऱ्याच वेळा इथे येऊन हीच ऑर्डर देतो म्हणून असेल कदाचित ..."
" तसंही असेल कदाचित ... पण त्याला तसा  लक्षात राहण्याजोगा माणूस लागतो ... तुम्ही तशाच आहात ..." मी  एक डायलॉग बोलून गेलो .
" फिल्मी आहात तुम्ही  अगदी ... चहा घ्या ... ठंड होतोय .... "
" एक सांगू का ….  तुम्ही मला अहो-जाहो  नका करु .... कसंतरीच वाटतं ... "
" बरं .... नाही करत ... पण तुम्हीसुद्धा  मग हा नियम पाळला पाहिजे ..."
" बघा परत तुम्ही ...! " मी तिला शब्दात पकडलं . पुन्हा दुरवरच्या मंदिरात घंटानाद झाला .
" सॉरी , तू ....तू पण हा नियम पाळायला पाहिजे ..."
"  मला काही प्रॉब्लम नाही ...." मी असं म्हणत असताना माझी नजर तिच्या उजव्या हाताच्या बोटांवर पडली . तिच्या अनामिकेत अंगठी नव्हती . मला लगेच परवाचा प्रसंग आठवला . आम्हा दोघांना एकत्र बघुन  तिचा होणारा नवरा तिच्यावर रागावून निघुन गेला होता .   त्याच्याशी तिचं भांडण  वगैरे झालं नाही ना ...? मी तिच्या बोटांकडे बघत असा विचार करत होतो हे तिच्या लक्षात आलं होतं बहुतेक ! ती लगेच म्हणाली , " अंगठी शोधतोयस  का ? काढून ठेवली ....  ती जास्त सैल होते म्हणून काढून ठेवली ... उगाच कुठे पडायला नको म्हणून...."
" ओह ...! मला वाटलं ...."
" तुला  वाटलं की,  माझं लग्न मोडलं  .... ! " ती फटकन बोलून गेली .
" नाही ग ... तसं नाही ... माझं सहज लक्ष गेलं .... म्हणून ....." मला काय बोलायचं ते सुचेना . त्यावर ती औपचारिक हसली .  हिचा स्वाभाव जरा वेगळाच आहे . मनात येतं तसं लगेच बोलून मोकळी होते , पुढचा मागचा विचार न करता ....  तसा मला आधीही त्याचा अनुभव होताच . आमच्या पहिल्या भेटीत ती अशीच माझ्यावर खेकसली होती . मनाला येईल तसं बोलून मोकळी झाली होती . पण मला आवडतात  अशी माणसं . ! मनात काही ठेवत नाहीत . जे मनात , तेच ओठांवर ... माझं लक्ष पुन्हा तिच्या ओठांवरच्या तिळावर गेलं . माणसांच्या नजरेतून येणाऱ्या व्हायरससाठी इफेक्टिव  अँटी व्हायरस ...!  काय नाव सापडलंय  ....! अँटी व्हायरस ....  वा ...!

क्रमशः ...


माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

सोमवार, १३ जुलै, २०१५

लोकल डायरी -- २०

                     
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८

http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी -- १९


आज प्लेटफॉर्मवर आल्या आल्या सावंतांनी अत्यानंदात   मला मिठीच मारली . मला कळेना हे असं का करतायत ?
" थॅंक यु मित्रा ... थॅंक यु व्हेरी मच ..." सावंत आनंदाने हुरळून गेले होते .
" अहो , पण झालं काय ? "  त्यांना असं बघुन मला आनंद तर झाला होता , पण कारण कळालं नाही .
" तुझ्यामुळे हे शक्य झालं , तूच कारणीभुत आहेस ह्या सगळ्याला  ! "  ते माझा हात हातात घेत म्हणाले . मी गोंधळून गेलो .  त्यांना काही विचारणार इतक्यात शरद - भरत ,  नायर अंकल , भडकमकर सगळे आमच्या भोवती गोळा झाले ...
" अरे वा ... बहुत याराना लगता है ...। " नायर अंकलनी तेव्हढयात टोमणा मारलाच  !
" काय सावंत , एवढा कसला आनंद झालाय ... आम्हाला पण सांगा ..." शरद विचारु लागला .
" सांगिन नंतर ... नक्की सांगिन ..  आत्ता ती वेळ नाही ..." सावंतांनी राजकारण्याला शोभेल असं उत्तर दिलं . शरद - भरत त्यांच्या मागे लागले , ‘ सांगा सांगा ’  म्हणून , पण ते काही बोलले नाही . परत तेच उत्तर , ' नंतर सांगिन ' . त्यांच्या अशा असहकारामुळे सगळ्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.  , " मध्या , काय झालं ते सांग ... काय केलंस तू ? " भरत विचारु लागला .
" अरे , मलाच माहीत नाही ... ते काय बोलतायत ते मलाच कळालं नाही तर तुला काय सांगू ...? "
" आम्ही काय येडे वाटलो काय तुला ? गपचुप सांग काय झालं ते ...! " शरद पिसाळाला .
" अरे बाबा ,खरंच मला माहीत नाही ... ओ सावंत तुम्हीच सांगा मी काय केलंय ते ..."  मला काही सुचत नसल्याने मी सावंतांच्या कोर्टात बॉल टाकला .
" हाच तर तुझा मोठेपणा आहे मध्या ... तू स्वतः कड़े क्रेडिट घेत नाहीस ..." हे असलं काहीतरी न समजणारं  बोलून सावंत मला आणखी गोंधळात आणि आणखी संकटात टाकत होते .
" सावंत प्लीज ... मी खरं सांगतो , तुम्ही जे काही म्हणताय ते मला काहीही कळलं नाही . तुम्ही प्लीज नीट सांगा काय ते ...! " मी असं म्हणालो आणि तेवढ्यात आमची लोकल प्लेटफॉर्मला लागली . सगळं  काही जिथल्या तिथे थांबून  आम्ही सगळे चढण्याच्या गड़बड़ीला लागलो .  कितीही मोठा विषय असू दे .... डोक्यात हजारो विचार असू देत …. , कितीही मोठी चर्चा असू देत ... लोकल प्लेटफॉर्मवर दिसली की सगळं बंद होतं . प्लॅटफॉर्मवरच्या मुंबईकराला पक्षाचा डोळा फोडणाऱ्या अर्जुनाची अवस्था प्राप्त होते . गाडी प्लॅटफॉर्मवर लागायच्या आत सगळे अर्जुन गाडीत ...! गाडीत बसल्यावर जो तो आपापल्या कामाला लागला . शरद भरत कोणतीतरी फ़िल्म मोबाईलवर बघण्यात दंग झाले . नायर अंकल पेंगु लागले . जिग्नेस कॅंडी क्रश खेळत होता . भड़कमकरांची समाधी लागली होती . मी सावंतांकडे बघितलं , ते पेपर वाचत बसले होते पण त्यांचं त्यात लक्ष नसावं . ते मिशितल्या मिशीत हसत होते . मला कळेना ते इतके कसे बदलले ? काल परवापर्यंत ते चिंतेच्या गर्तेत कुठेतरी हरवलेले दिसत होते आणि आज अचानक आनंदच्या उकळया कशा काय फूटत होत्या ? आज आल्या आल्या त्यांनी मला आनंदाने मीठी कशासाठी मारली ? आणि मला सारखं सारखं थॅंक यु पण म्हणत होते ... मी असा  काय मोठा पराक्रम केला होता  ?   शकुंतलाबाईंना त्यांच्या घरी घेऊन जायची  फालतू आयडिया मी त्यांना  दिली , त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हा गोंधळ उडाला होता . त्यांच्या त्या  परिस्थितीला मीच कारणीभूत होतो . ते उपरोधिकपणे तर मला थॅंक यु म्हणत नसतील ?   टेंशनमुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला तर नाही ना ? ते स्वतः शीच हसत होते . नक्कीच कायतरी लफडा झालेला आहे .  मी मनोमन निष्कर्ष काढला .  आत्ता सावंतांना विचारुन काही फायदा नाही . हे सगळे उतरले की मग विचारु . पण आता काय करायचं ? माझ्या डोक्यातून सावंतांचा विचार जाईना . कधी त्यांना विचारेन असं मला झालं.  पण अजुन बराच अवकाश होता . मी पलीकडे पाहिलं , आज अँटी व्हायरस सुद्धा आलेली दिसली नाही . त्यामुळे तोही टाईमपास नव्हता . टाईमपास म्हणजे तसा टाईमपास नाही बर का ... ! आपल्याला खरंच आवडते अँटी व्हायरस ...!  तिच्याकडे बघत बसावं असं वाटतं . त्यामुळे वेळ कसा जातो तेही कळत नाही . पण आज काय करावे ? शरद - भरत कोणती तरी नवीन फिल्म मोबाईलवर बघत होते . मी त्यात डोकं घालून पाहू लागलो . शरदच्या ते लगेच लक्षात आलं . मोबाईल वर हात ठेऊन तो लगेच म्हणाला , "आता कशाला बघतोय रे आमची फिल्म ? "
" बघु ना ... कोणती फिल्म आहे ? "
" तुला का दाखवु मी ? तू सांगतोस आम्हाला सगळं ? " भांडण झाल्यावर लहान मुलं  करतात तशी आडीबाजी करत शरद म्हणाला .  
"  बास काय यार ... हीच का आपली दोस्ती .... ? " मलाही त्याची गंमत करायचा मूड झाला .
" चल हाट .... साल्या , दोस्त बोलतो आणि काय सांगत नाय ..." भरत पेटला .
" अरे काय सांगू तुम्हाला ? मलाच माहित नाही ...." मी पुन्हा तीच टेप लावली . त्यांना पटणार नव्हतेच ...!
" ठीक आहे रे ... नको सांगुस ... आम्ही तुमचे मित्र थोडीच आहोत ...? आम्ही काय असेच फालतू .... नाय का ?  " शरद मला आणि सावंतांनाही  ऐकायला जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाला .  “ भरत ,  जाऊ दे रे … आपण काय तेवढे महत्वाचे नाहीत त्यांच्यासाठी … ”   शरद इमोशनल ब्लॅक मेल करायला लागला . ही त्याची नेहमीची स्टाईल होती. आता त्याला उत्तर द्यावं लागणार होतं .  अचानक मला त्यांच्या विरुद्ध एक मुद्दा आठवला .
" हो का ... फालतू काय ? आणि तुम्ही तरी कुठे मला सांगता रे सगळं ? " मी पण तलवारीला धार लावत आक्रमणाची  तयारी केली .
" आम्ही काय सांगत नाही रे तुला ? " भरत विचारु लागला .
" आठव ना , काल .... कायतरी गपचुप बोलणं चाललं होतं . मी विचारलं तर म्हणालास  कॉन्फिडेंशल आहे म्हणून  ... आठवलं का ? " मी हे म्हणाल्यावर दोघांचे चेहरे एकदम पडले . शरदने जिग्नेसकडे  जो एक चोरटा कटाक्ष टाकला तो माझ्या  चाणाक्ष नजरेतून सुटला नाही . जिग्नेसचं  आमच्याकडे लक्ष नव्हतं . त्याने मोबाईलमधे  डोकं घातलं  होतं  . अच्छा ...! म्हणजे त्याच्याच बाबतीत हे लोक काहीतरी कुजबुजत होते तर ...! आता माझ्या डोक्यात आणखी एक युद्धनिति तयार झाली .   " आणि मला माहित आहे की तुम्ही कुणाबद्दल बोलत होतात ...." मी जिग्नेसकडे डोळ्यांनी खुणावत असं म्हटल्यावर तर त्या दोघांनी शस्त्रच टाकली.
" अरे , शांत रहा ... गप बस ... त्याला काही कळून देऊ नकोस ...." शरद दबक्या आवाजात म्हणाला .
" आता पटलं ना तुला ...." मी विजयी सुरात म्हणालो .
" हो .... बाबा .... हो ....शांत रहा प्लीज ...." शरद अगदी हात वगैरे जोडून म्हणाला . खरं तर हा  शरदचा  स्वभाव नाही . तो दुसऱ्याला नामोहरम करण्यात पटाईत आहे . पण आज त्याने हार मान्य केली हीच मोठी गोष्ट आहे . कदाचित काहीतरी गंभीर प्रकरण असणार ...! मी पुढे त्याला जास्त काही बोललो नाही . पारसिकचा बोगदा आला  आणि लगेच सावंतांनी मला बसायला जागा दिली . मला अगदी आग्रहाने त्यांनी त्यांच्या जागेवर बसवलं . नेहमी ठाणा आलं तरी जागा न सोडणारे सावंत आज पारसिकच्या बोगद्याच्या आतच उठले आणि त्यांनी मला बसायला जागा दिली . हे बघुन तर आमच्या ग्रुपला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला .  नक्की काय भानगड झाली आहे ? ह्या विचाराने माझ्या मनात पुन्हा घर करायला सुरुवात केली . दादरला पोहोचेपर्यंत तर काहीही करता येणार नव्हतं . मी स्वस्थपणे डोळे मिटून बसलो . दूसरा कोणतातरी विचार करावा ....  अँटी व्हायरस आज आली नव्हती .... कुठे गेली असेल ? तिचं आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं भांडण वगैरे झालं असेल का ?  काल तिने उत्तर द्यायचं टाळलं म्हणजे नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार ... आमच्या भेटीची सुरुवात सुद्धा तिच्या अशाच प्रॉब्लेम मुळे झाली होती . मी तिच्याकडे बघत असल्यामुळे ती चिडली होती . पण नंतर ती सॉरी म्हणाली आणि आमच्या भेटी होत राहिल्या . जास्त नाही,  पण आम्ही चांगले मित्र तर नक्कीच झालो होतो . तिला माझ्याबरोबर बोलून बरं वाटतं असही ती एकदा म्हणाली होती . तिचा विचार .... नुसता  विचार करणं सुधा मला सुखद वाटत होतं . तिची आणि माझी मैत्री अशीच टिकून राहावी असं मला मनापासुन वाटत होतं .
' पुढील स्टेशन दादर.... अगला स्टेशन दादर ...' गाडीतली सूचना देणारी बाई बोलू लागली ...  अरेच्चा ! गाड़ी इतक्या लवकर दादरला पोहोचली सुद्धा  !  कुर्ल्याला शरद भरत उतरले होते , दादरला नायर अंकल आणि भडकमकर ... आता आम्ही तिघेच राहिलो . जिग्नेसचं आमच्याकडे लक्ष नव्हतं . तो कँडी क्रश खेळण्यात दंग होता .   मी सावंतांना काही विचारणार इतक्यात तेच मला म्हणाले , " तुझे खुप उपकार झाले मध्या ..."
" सावंत , आता नीट सांगा काय झालंय ते ..." मला त्यांच्या ह्या असल्या बोलण्याचा कंटाळा आला .
" काय झालंय म्हणजे ? तुच तर हे जुळवून आणलंस ... आता  माझ्याकडून पुन्हा काय ऐकायचंय तुला ...? " पुन्हा तेच !
" सावंत प्लीज ... मी काहीही केलं नाही ... आणि प्लीज तुम्ही सांगा काय झालंय ते ... " मी थोड्या चिडक्या सुरातच म्हणालो .
" ओके ... ओके.... सांगतो , अरे तुझ्या समजावण्यामुळे  माझ्या बायकोने शकुंतलेला घरी आणण्याची परवानगी दिली ...." सावंतांनी अगदी खुश होऊन टाळी देण्यासाठी हात उंचावला ,  नकळत मीही हात पुढे केला . त्यांनी टाळी दिली .
" काय .... मी कुणाला समजावलं ...? तुम्ही मला पहिल्यापासून सांगा जे झालं ते ...  " ते काय बोलत होते ते अजूनही मला कळेना ...
" अरे , ऐक .... काल रात्री मी घरी गेलो आणि माझा डोळ्यांवर विश्वास बसेना . बायकोने हसत हसत दार उघडलं . माझी बॅग घेतली . मला थंडगार पाणी आणून दिलं ....."
" सावंत मुद्द्याचं बोला हो ...."
" हां.... तेच तर  सांगतोय ...  ती माझ्याशी पूर्वीसारखीच वागायला लागली . रात्री  झोपताना मी तिला विचारलं तर म्हणाली , काल एक तरुण आमच्या घरी आला आणि त्याने तिला माझी बाजू व्यवस्थित समजावून सांगितली . आणि आश्चर्य म्हणजे ती तिला पटली . आता माझी ही गोष्ट तुझ्याशिवाय कुणाला माहीत होती ? तू माझ्यासाठी इतकं करशील ह्याची कल्पना नव्हती मला .…  तू माझा संसार  वाचवलास ... आणि माझे प्रेमही ... थॅंक्स यार ...."
" अहो पण सावंत , मी तुमच्या घरी गेलोच नाही तर मी तुमच्या मिसेस ना कसं आणि काय  समजावून सांगणार ... ? "
" म्हणजे ? तू माझ्या घरी गेला नाहीस ....? मग कोण गेलं होतं ....? " सावंत बुचकळयात पडले .
" मला काय माहित ....?  पण मी गेलो नव्हतो  एवढं तर खरं ...!  "
" अरे असं कसं म्हणतोस तू ...? शकुंतलेबाबत फक्त तुलाच माहीत होतं .... "
" हो ... ते खरं आहे .... मी काहीही केलं नाही .... "
" तू नाहीस मग काल माझ्या घरी कोण गेलं होतं ....? "
" असेल तुमचा कोणीतरी हितचिंतक ...."
" भल्या माणसा , हितचिंतक जरी असला तरी त्याला ह्या सगळ्या प्रकरणाबाबत माहिती असायला हवी की नको ... ती  फक्त मला आणि तुलाच होती ना ? "
" जाउद्या हो सावंत ... तुमचा प्रॉब्लेम तर मिटला ना .... बास ! सोडून द्या आता विचार करणं ....  तुमच्या मिसेसचा विचार बदलायच्या आत पुढचं प्लॅनिंग करा ...चला ओके , मी जातो , माझं स्टेशन आलं ...." मी त्यांना म्हणालो .

" हो ... हो ... बरोबर आहे ... चल बाय ...." मी सावंतांचा निरोप घेऊन उतरलो खरा ... पण डोक्यातून त्यांचा विचार जाईना ....  आयला ,  सावंतांच्या घरी नेमकं गेलं कोण ?




माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7


बुधवार, ८ जुलै, २०१५

लोकल डायरी -- १९

                          आज आभाळ काळ्या ढगांनी भरुन गेलं होतं . मान्सून केरळला दाखल झालाय असं न्यूज चॅनलवाले सांगत होते . आता दोन चार दिवसातच पावसाला सुरुवात होणार होती . अरेरे ....! वैताग नुसता ...!   पहिला पाऊस म्हणजे मुंबई बाहेरच्या लोकांना रोमॅंटिक वगैरे वाटत असेल , पण आम्हा लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मात्र ही  छत्री  दुरुस्त करायला टाकण्याची वेळ ,  किंवा पावसाळी बूट विकत घ्यायचे दिवस ... !  आता  ह्याला अपवाद असतील ... शरद वगैरे  सारखे फिल्मी  लोक ! ,  पण बहुवंशी लोक असाच विचार करीत असावेत . मला तर हा पाऊस बिलकुल आवडत नाही ... त्याचे टपाटप थेंब अंगावर पडले की कसंतरीच होतं . ह्या पावसात रेनकोट घाला नाहीतर छत्री घ्या , जोरदार पाऊस असेल तर ऑफिसला जाईपर्यंत शरीराचा कोणताही भाग भिजण्यापासून वाचत नाही .  रस्त्यात सगळी चिक चिक ... , चिखलाचा राडा ... रिक्शावाले , बाईकवाले रंगपंचमी खेळल्यासारखे खड्डयातुन चिखलाचं पाणी उडवत जातात , इस्त्री केलेल्या पँटवर चिखलाची नक्षी उमटते तेव्हा तर डोकंच फिरतं ...  आणि सगळ्यात कहर म्हणजे आमची लोकल ....!  ज़रा पाऊस पडला की ही आजारी पड़ते . कधी ओव्हरहेड वायर तुटते तर कधी ट्रॅकवर पाणी जमा होतं .   एक तास , दोन तास लेट  तर कधी येतच नाही . आजही पाऊस पडणार म्हणून मी आधीच छत्री बॅगमधे  ठेवली . पाऊस पडो अगर न पडो , मला मात्र भिजायचं नव्हतं ...
        रस्त्याने चालताना पुन्हा कालची घटना डोळ्यांसमोरुन तरळुन गेली . कधी नव्हे ते अँटी व्हायरसला मी दिलखुलासपणे हसताना पाहिलं होतं . पण तेही जास्त काळ टिकलं नाही . कुठून तो तिचा होणारा नवरा अनिकेत की कोण तो,   उगवला आणि रंगाचा बेरंग झाला . ती परत होती तशीच झाली . शोले फिल्ममधल्या जया भादुरी सारखी ! . तिच्या होणाऱ्या  नवऱ्याला आमच्याबाबत संशय आला होता हे काही वेगळं सांगायची गरज नाही . तसं काहीही नसताना   त्याचा  जास्त त्रास बिचाऱ्या अँटी व्हायरसला होणार होता  आणि हेच मला नको होतं . पण मी काय करु शकणार होतो ... ?  तिच्याशी बोलणं खुप गरजेचं होतं . काल ती तशीच माझ्याशी न बोलता निघुन गेली होती . पण कालच्या मॅटरमुळे ती माझ्याशी बोलेल का ? बघुया  .... !!!
सावंत आज आले ते सुद्धा काळजीत  असल्यासारखे वाटत होते . म्हणजे त्यांच्याही  परिस्थितीत काहीच फरक पडला नव्हता . ते निदान माझ्याशी बोलून त्यांचं मन  हलकं करु शकत होते पण मी हे काहीच करु शकत नव्हतो . अँटी व्हायरसबद्दल कुणाला सांगूही शकत नव्हतो .
" अजूनही बायको माझ्याशी बोलत नाही रे ... " सावंत गंभीर चेहऱ्याने म्हणाले .
" काही म्हणजे काहीच बोलत नाहीत ...?"
" तसं नाही रे ... पण गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत . मला तिला अंधारात ठेवायचं नव्हतं म्हणून सगळं सांगितलं . ह्यात माझं काय चुकलं सांग ..." सावंत म्हणाले . त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी नव्हतं . मी त्यांना धीर दिला आणि म्हणालो , " थोडा वेळ जाउद्या , त्या नक्की बोलतील तुमच्याशी ...सगळं नीट होईल ..."  
" अरे पण मला अपराध्यासारखं वाटतंय घरी गेल्यावर ... असं वाटतंय की मी कुणा दुसऱ्याच्या घरात आलोय ... "
" तुम्ही तसं  का वाटून घेताय...?  तुम्ही काहीही केलं नाही ... तुमचा काय दोष ..? . तुम्ही जे आहे ते खरं सांगितलय ... उलट त्यांनी असा विचार केला पाहिजे की आपला नवरा खरं बोलला . " मी त्यांना समजावलं  पण त्याचा जास्त काही परिणाम झाला असावा असं वाटत नव्हतं … त्यांनी  त्यांचा पेपर उघडून त्यात डोकं घातलं .   आम्ही बसलो असतानाच  भडकमकर आले आणि त्यांनी  माझ्या हातावर लाडुचा अर्धा तुकडा ठेवला . " शिर्डीला गेलो होतो . छोकऱ्याला  घेऊन ... बाबांच्या चरणी ठेवला त्याला , आणि म्हटलं बाबा , लक्ष असू दया ... "
" वा .... हे बाकी चांगलं केलंत ..." प्रसादच्या  लाडूचा तुकडा तोंडात टाकत मी  म्हणालो . ते सगळ्यांना प्रसाद वाटत होते . नायर अंकलपाशी आले अन म्हणाले , " नायरजी , मैंने डिसाइड किया की अब लडके को मारूँगा नहीं ... उसको प्यार से समझाऊँगा ....  उसका ऑक्टोबर का फॉर्म  भरनेवाला है ....  " भडकमकरांचा वाल्याचा वाल्मीकि झाला होता .
" व्हेरी नाईस .... वुई आर प्राउड ऑफ़ यू  मिस्टर भडकमकर ..."  नायर अंकल खुश झालेले दिसले . चला ! एक गोष्ट तरी चांगली झाली ... नाहीतर प्रॉब्लेमस् तर सगळीकडेच होते . जिग्नेस आज आला नव्हता .  मी पलीकडे पाहिलं , अँटी व्हायरस उभी होती . तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते . कानात इअर फोन घालून ती गाणी ऐकत उभी होती . मी बराच वेळ तिच्याकडे तसंच पहात राहिलो , पण एकाच ठिकाणावर  तिची स्थिर नजर अडकून पडल्यासारखी वाटू लागली . ती काहीतरी गहन विचार करीत असावी .  तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं . मी तिच्याकडे बघत असतानाच शरद भरत काहीतरी कुजबुजत असल्याचे मला जाणवलं . मी त्यांच्याकडे पाहिलं .
" काय चाल्लय रे तुमचं .... कसली कुजबुज करताय ? " मी त्यांना कोपरखळी मारली .
" काय नाय रे .... असंच ..." त्या दोघांचं खालच्या आवाजात    काहीतरी बोलणं चालू होतं .
" सांगा ना साल्यांनो ..."  मी शरदच्या पाठीत एक बुक्का घातला . भरत त्याला डोळ्यांनीच   नको म्हणाला .
" तुला सांगता येणार नाही ... कॉन्फिडेंशियल  आहे ..." शरद म्हणाला .
" आयला बास काय ... मला संशय येतोय.... तुम्ही लोक माझ्याबद्दल बोलताय ना ... ? सांगा काय ते ...! "
" अरे बाबा , तुझ्याबद्दल तर नक्कीच नाही . टेंशन घेऊ नकोस ..."   मला उडवाउडवीची उत्तरं त्या दोघांनी दिली . पण ते दोघे गुप्तपणे  बोलत आहेत म्हणजे नक्कीच कुठल्या ना कुठल्या मुलीबद्दल असावं हे मात्र नक्की ! त्यांच्याकडे दूसरा कोणता विषय असणार ?  
लोकलने पारसिकचा बोगदा पार केला आणि पलीकडे पोहोचल्यावर बाहेर बघतो तो  धो - धो पावसाला सुरुवात झाली होती . सगळं वातावरण पावसाने बदलून टाकलं . विंडोवरचे लोक पाणी आत येऊ नये म्हणून धडपड करु लागले .  पण विंडोच्या काचा लावेपर्यंत  ते  अर्धे भिजलेच ...! काही खिडक्यांच्या  काचा मधेच अडकल्याने धबधब्यासारखं पाणी आत येत होतं . डोअरवरचे बाहेर लटकणारे तर पूर्ण भिजुन गेले .   हेच .... हेच ... मला आवडत नाही ... आता चार महीने हीच कटकट ....!  ह्याच्या उलट , शरद - भरत तर उड्याच मारायला लागले . लहान मुलांसारखे !
" येस ... येस ... मस्तच ... वा .... काय मस्त वाटतंय ... थंडगार ... " शरद आनंदाने म्हणाला .
" पड आयला ,  पड ...अजुन जोरात ... "  हे  पावसाला उद्देशून होतं  .  पाऊस आल्याने आमच्या डब्यातले सगळे जण खुश झालेले दिसले . आमचा ग्रुपही आनंदित झालेला होता . मी सावंतांकडे पाहिलं , ते सुद्धा सर्व काही विसरुन खिडकीबाहेर  पडणाऱ्या मुसळधार पावसाकडे हरवल्यासारखे बघत राहिले . मला तर असं काहीच वाटत नव्हतं . हे लोक इतके  खुश होत होते आणि इथे  मला माझ्या लेदरच्या बुटाची काळजी वाटू लागली . असाच पाऊस पडत राहिला तर त्याची वाट लागणार होती ...  पाऊस पडत असताना  आपोआपच माझी नजर अँटी व्हायरसकडे वळाली . तिही कोसळणाऱ्या पावसाकडे पहात होती .  तिच्या डोळ्यात मला उत्सुकता , आनंद , समाधान असे कितीतरी भाव दिसले . भायखळयाला लोकल  आली तेव्हा पावसाचा जोर थोड़ा कमी झाला होता . पण रिमझिम पाऊस पडतच होता  . हे लोकलचे दरवाजे कुठल्या इंजीनियरने तयार केले असतात कुणास ठाऊक ...?  बरोब्बर लोकलच्या दारातून उतरताना बदाबदा पाणी अंगावर  पडतं... आत्ताही तसंच झालं . " ओह ... शीट ...! " डोक्यावर ,  अंगावर पडलेलं पाणी झाडत मी उतरलो . समोर अँटी व्हायरस सुद्धा उतरलेली दिसली . मी लगेच बॅग मधून  माझी छत्री काढली . पहिलाच पाऊस असल्याने फारच थोड्या छत्र्या दिसत होत्या . बाकीची माणसं  पहिल्या पावसात  भिजत चालली होती . मी अँटी व्हायरसकडे पाहिलं , तिच्याकडेही छत्री नव्हती . तिने एकदा माझ्याकडे पाहिलं ती हसली आणि तशीच भिजत निघाली .
" ओ ... हॅलो ... " मी हाक मारल्यावर ती थांबली . रिमझिम पाऊस पडत होता . ती एका दुकानाच्या छपराखाली थांबली . मी छत्री घेऊन तिच्या जवळ गेलो . ,  " तुमच्याकडे छत्री नाही का ? "
" नाही ... पण  तुम्ही आंतर्ज्ञानी  आहात काय ? "  
" म्हणजे ? "
" पाऊस येणार हे तुम्हाला कसं काय माहित ? एकदम छत्री वगैरे ..? "
" ओह ...ही छत्री होय ...  मला नाही आवडत पाऊस ... सगळी चिक चिक  नुसती ... म्हणून आधीच आणली ही छत्री . तुम्ही भिजत जात होता म्हणून हाक मारली तुम्हाला . तुम्ही पाहिजे तर माझ्या छत्रीत येऊ शकता . मी सोडतो तुम्हाला . "
" सॉरी नो थॅंक्स ... मी तशीच जाईन .. "
"  तुम्ही रागवलात का ? "
" नाही ... मी कशाला रागवेन ? "
" ते काल जे झालं ... म्हणजे तुमचे  मिस्टर ... म्हणजे काल  तुम्ही काही न बोलता निघुन गेलात ..." मला काय बोलावं तेच कळेना . गोंधळ उडाला .
" नाही , ते काही नाही ..." तिनेही  उत्तर द्यायचं टाळलं  .
" ते चिडलेत का तुमच्यावर ..?  एक्चुली आय ऍम सॉरी ... हे माझ्यामुळे झालं  ... मीच तुम्हाला काल रेस्टॉरंट मधे यायला सांगितलं होतं . सॉरी ..."
" तसं नाही हो ... तुमचं काही चुकलं नाही . तुम्ही कशाला सॉरी म्हणताय ? "
" नाही म्हणजे तुमचे  मिस्टर काही बोलले का तुम्हाला ...? "

" नाही ... कालपासून फोन नाही . मी पण केला नाही . जाउद्या ... मला उशीर होतोय ... मी जाते...  " असं म्हणून ती तशीच भिजत जाऊ लागली . मला तिला पुन्हा थांबवण्याचा धीर झाला नाही . आधीच ती दुःखी होती ,  माझ्यामुळे आणखी दुःखी झाली . नकळत माझ्या हातून चूक झाली होती . इतका वेळ रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला .  सुड उगावल्यासारखा  पाऊस  पडायला लागला .  मी माझ्या हातातली छत्री मिटवली . पावसाचे अगणित थेंब अंगावर  सुयांसारखे टोचु लागले  . माझ्या चुकीचे निदान तेवढे तरी प्रायश्चित्त मी घेऊ शकत होतो .


माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7