सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

लोकल डायरी



दिनांक - २७ नोव्हेंबर 

   ' पॉ sssss  म '  .....   लोकलचा होर्न वाजला ... तसा मी  सकाळची ८:२६ ची गाडी  पकडण्यासाठी  धावलो  ... आज उशीरच झाला होता .... दरवाज्यावरच्या रवीच्या ग्रुप ने मला आत शिरायला लगेच जागा करून दिली ...
-- " अरे काय  मध्या ...??  काल रात्री जागरण झालं काय...??? " आत शिरता शिरताही  रवीने टोमणा मारायची संधी सोडली नाही . " हा भाई ... काय करणार.... ?? " मीही मजेत त्याला टाळी देत आत शिरलो ....
-- " ओ सावंत ..... आला बघा तुमचा पार्टनर...! " रवीने जोरात सावंतांना हाक मारून सांगितलं....
-- " आला का...?? अरे ये ये मित्रा ... मला वाटलं सुटली आता तुझी लोकल..."
-- " अशी कशी सुटेल मला घेतल्याविना ....?? " मी त्यांच्याशी हात मिळवत म्हणालो... " नायर अंकल कैसे है ?? "..... , " भडकमकर , विंडो काय सुटत नाय हा.... " , " शरद- भरत  , भाय लोग...." म्हणत मी सगळ्याशी हात मिळवले....त्यांनीही मला त्याच उत्साहात प्रतिसाद दिला ... हि वर नावं घेतलेली मंडळी म्हणजे आमचा लोकल मधला ग्रुप ....! आणखी एक जण  पुढच्या स्टेशन वर चढतो , तो जिग्नेश ... पण सगळे त्याला जीग्नेस म्हणतात ....असंच  मजेत ... ! आमची  नेहमीची बसायची जागा फिक्स ... तशी प्रत्येक ग्रुप ची असते ...   आमचा डबा व्हीडिओ कोच आहे , म्हणजे ह्या डब्याचा अर्धा भाग लेडीज आहे ...त्यामुळे ह्या डब्यात इतर डब्यांच्या मानाने जरा जास्तच गर्दी असते ....  बसायची जागाही अगदी लेडीज कम्पार्टमेंट ला खेटूनच ... अर्ध्या भागातून पलीकडच व्यवस्थित दिसतं.... त्यामुळे बऱ्याच सुंदर सुंदर चेहऱ्यांच सकाळी दर्शन होतं. दिवसही चांगला जातो...
-- " अरे , मधु हा घे ' बाबांचा प्रसाद ' ... तूच राहिला होतास... " भडकमकर काल परवाच  शिर्डीला जाऊन आले होते. बाबांवर त्यांची नितांत श्रद्धा .... पण  नावाप्रमाणे त्यांचा  स्वभाव जाम रागीट -  ' पेहेले लाथ फिर बात '.... तोंडावर सगळे त्यांना भडकमकर साहेब म्हणतात , आणि मागून भडकू.....!
-- " आज नेबरिंग कंट्री बहोत शांत शांत दिख राहा है "  नायर अंकल पलीकडच्या लेडीज कम्पार्टमेंटला  नेबरिंग कंट्री आणि मधल्या जाळीच्या डिविजनला बोर्डर म्हणतात....आम्हीही हल्ली बोलायचं झालं  तर ह्याच भाषेत बोलतो... पलीकडच्या भागातही नेहमीचेच चेहरे रोज दिसतात... शरद -भरत पलीकडे बघून कसलीही भाकितं करतात... ' आज अमकी अमकी खुश दिसतेय .... ' ते  ' आज तमकीने अंघोळ केलेली नाही '  इथपर्यंत ...!! हे दोघे सगळ्यात आधी येऊन जागा पकडतात .... आणि नंतर कर्णाचा अवतार घेऊन  इतरांना बसायला देतात ...आपण स्वतः  उभे राहतात , पलीकडे टेहळणी करण्यासाठी .... आज मी गाडी सुटता सुटता आलो होतो तरी मला बसायला व्यवस्थित जागा मिळाली ती त्यांच्यामुळेच.....!  शरद - भरत  हि दोन वेगवेगळी व्यक्तिमत्वे असली तरी त्यांची नावं जुळ्या मुलांसारखीच घेतली जातात... पण ते दोघे शारीरिक जुळे नसून वैचारिक जुळे आहेत ... ग्रुप मध्ये ते नेहमी दुसऱ्यांची खेचत असतात... एक सुरु झाला कि दुसऱ्यालाही लगेच चालना मिळते ...  असं असलं  तरी ग्रुप मध्ये शब्द चालतो तो सावंतांचा ..! ते आणि नायर अंकल आमच्या ग्रुपचे फाउंडर  मेंबर आहेत.... नायर अंकल रिटायरमेंट ला  आले आहेत , त्यांची फारतर १-२ वर्ष राहिली असतील... स्वभाव शांत .... पण मधेच अस काही बोलतात त्याला तोड नसते ...
        पुढच्या स्टेशनला चढणारा जिग्नेश धडपडत आत शिरला... " जीग्नेस आया.... जीग्नेस आया " शरद- भरत ओरडले.... " क्या जीग्नेस ... कल रात सोया नही क्या...?? "  सावंत पण त्याची फिरकी घेत म्हणाले.... त्यावर त्याने लाजून फक्त होकारार्थी मान हलवली.... आणि सगळ्यांनी शिट्या वाजवून आरडाओरडा  केला.....मी त्याला बसायला माझी जागा दिली... जिग्नेश  शांत स्वभावाचा आहे ... त्याला कितीही आणि काहीही बोला तो फक्त एक मंद स्मित करतो... शरद-भरत तर त्याची नेहमीच खेचत असतात.... त्यात त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे ....त्यामुळे त्या दोघांच्या हातात तर आता कोलीतच मिळालंय.... सावंत वाचायला  ३-४ पेपर आणतात . ते  सगळ्या डबाभर फिरून नंतर शेवटी त्यांच्याकडे येतात....
           गेले काही दिवस एक सुंदर चेहरा पलीकडे मला रोज दिसतोय ... गोरा वर्ण ...काळेभोर केस ...तलवारीसारख्या कोरीव भुवया .... हरिणीसारखे डोळे .... धनुष्याकृती ओठ ...आणि ओठांच्या वर डाव्या बाजूला लहानसा पण लक्ष वेधणारा तीळ.... कदाचित कुणाची  नजर लागू नये म्हणून देवाने आधीच तजवीज करून ठेवली असावी... हल्लीच्या टेकनिकल भाषेत सांगायचं म्हणजे लोकांच्या नजरेतून येणाऱ्या व्हायरस साठी  इफेक्टिव्ह  antivirus च जणू ..... तिचं नाव मला माहित नाही पण तिच्याकडे बघत राहायला आवडतं हे मात्र  नक्की..... लोकल ने दररोज गर्दीमध्ये धडपडत येण्याजाण्याचे मिळून ३ --  ३:३० बोरिंग तास आमच्या ग्रुपमुळे  सुसह्य  होतात... प्रवास मजेशीर होतो .... आणि मनोरंजनासाठी व्हीडिओ कोच आहेच ..... एकूणच आनंद आहे .....

   

माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा