Wednesday, November 9, 2011

....आसमाँ ...भाग - १४ ... ( अखेरचा भाग )

                     एखादी गोष्ट किती बिघडू शकते ह्याचा अंदाज कोणीच  बांधू  शकत नाही....ते फक्त नियतीच्या हातात असतं..... तो दिवस नुसता आठवला  तरी अंगावर काटा उभा राहतो.... काय भयानक होता तो दिवस....!!! उम्या थोडक्यात वाचला होता... तो जर वेळेवर  बाजूला झाला नसता तर चाकू त्याच्या पोटातच घुसला असता.... पण नशिबाने थोडक्यात निभावलं.... माझ्या मनात सहज विचार आला , कि फिरोज ने उम्याची हि हालत केली , तिथे त्याच्या बायकोचं त्याने काय केलं असेल...?? कल्पनाच करवत नव्हती...   उम्या व्यवस्थित  व्हायला  ५-६ दिवस लागले ... तरी त्याची हाताची जखम बरी व्हायला अजून बरेच दिवस जाणार होते ... हाताला बँडेज बांधून  त्याला हॉस्पिटलमधून डिश्चार्ज  दिला होता ... पण दिवस आता  पहिल्यासारखे राहिले नव्हते ... ज्या रूम मध्ये पूर्वी आमच्या तिघांचा नुसता धिंगाणा चालू असायचा तिथे आता स्मशानशांतता नांदू लागली... उम्या बोलायचा प्रयत्न करत होता पण मला त्याच्याशी बोलायची इछाच नव्हती...  मी जेवढ्यास तेवढं उत्तर देत होतो ....  नाही म्हणायला आनंद आमच्या मध्ये दुव्याचं काम करत होता.... उम्याने बऱ्याच वेळा झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती.... त्याच्या चुकीची शिक्षा त्याने भोगली होती.... पण मी विचार करत होतो कि मी कोणती चूक केली. ? , कि ज्याचं प्रायश्चित्त मला भोगावं लागत होतं...???  त्या घटनेनंतर मी बऱ्याच वेळा आसमाँ ला फोन आणि मेसेज पाठवले .... पण तिचा फोन बंदच होता.... काय कराव ते मला सुचेना..... ती ठीक असेल ना....??  मला आता तिची काळजी वाटू लागली.... तिच्याशी संपर्काचं कोणतंच साधन आता माझ्याकडे नव्हतं... काय करू...?? तिच्या घरी जाऊया का....?? पण, तो तिचा खवीस भाऊ तिथे असणार... मला बघून तर त्याचं डोकं आणखी फिरायचं ... पण काहीतरी करावंच लागणार होतं.... मला  आसमाँशी बोलायचंच होतं ... ह्यातच २-३ दिवस गेले ... शेवटी मी ठरवलं .... आता तिच्या घरी जायचंच .... काय होईल जास्तीत जास्त... ?? फिरोज भडकेल.... मारायला धावेल..... पण मला आता त्याचं  काही वाटत नव्हतं.... काय व्हायचं ते होऊन जाऊदे ... त्या दिवशी मी संध्याकाळी तिच्या घरी जायला निघालो... मी  पूर्वी एकदा तिचं घर  पाहिलं होतं ....पण आता मला ते नक्की कुठे आहे ते आठवेना ...मी एका घरासमोर येऊन थांबलो... कदाचित हेच घर असावं ... मी असा विचार करत असतानाच एक आवाज आला.... " किसको ढूंड रहे हो आप...?? " मी बघितलं तर ५० - ५५ वयाची एक बाई मला विचारात होती....माझ्या मनात लगेच आसमाँ बद्दल चौकशी करण्याचा विचार  आला ...पण मी तो  झटकला... " इथे फिरोज कुठे राहतो...?? " हे विचारणं  जास्त सहयुक्तिक वाटल मला.....
-- " तुम दोस्त हो उसके.... ??? " ती बाई काहीतरी फालतू चौकशा करायला लागली... ह्या प्रश्नाला उत्तर देताना माझ्या  भलतीच जीवावर आली होती..... मी कसेतरी हो म्हणालो....
-- " वो लोग कही गये है शायद .... फिरोज कि बीबी के हाद्से के बाद तो वो दिखे नही....."
--" फिरोज कि बीबी का  हादसा ...??? " मला काही  कळले नाही...
-- " अरे उसने जेहेर पी कर जान दे दि ...उसका चक्कर था शायद किसी से...."  हे ऐकून माझं डोकं एकदम सुन्नच झालं.... अरे देवा...! आफरीन ने आत्महत्या केली....?? माझा तर विश्वासच बसत नव्हता... म्हणजे फिरोज उम्याला शोधात घरापर्यंत आला तेव्हाच आसमाँच्या भाभी ने विष पिऊन आत्महत्या केली होती तर... आणि तेव्हाच त्याचा तो मित्र त्याला तातडीने घ्यायला आला होता .... तो जर आला नसता तर उम्याचा मृत्यू अटळ होता ... खरंच... आफरीनमुळे उम्या वाचला होता...
-- " हे लोक कधी येतील काही सांगितलं का.....?? " मी सहज त्या बाईंना विचारलं...त्यावर तिने फक्त नकारार्थी मान हलवली ... आता त्या बाईंना जास्त काही विचारून फायदा नाही असं मला वाटू लागलं...मी तिथून निघालो... जड पावलांनी चालत जात असतानाच मागून एका मुलीचा  आवाज आला...  मी मागे वळून पाहिलं तर एक १८-१९ वर्षाची मुलगी मागून पळत येत होती... " रुकीये, आप मकरंद है ना ?? " धावत आल्याने तिला दम लागला होता... मी आश्चर्याने होकारार्थी मान हलवली...
--" मै आसमाँकी दोस्त हूँ ....आप मुझे  नहीं जानते...   आसमाँ अक्सर बातें  करती थी  आपके बारे मै..." ती म्हणाली
-- " कुठे आहे ती  ..??  " मी तिला सरळ विचारून टाकलं....
-- " उसने कुछ बताया नहीं ... लेकिन ये लिफाफा मुजे दिया है आपको देने के लिए...उसने बोला था की उसे ढूंडते हुए आप यहाँ  जरुर आयेंगे..... "  एखादा बॉम्ब पकडावा तसा मी तो लिफाफा हातात घेतला... मला आता कळून चुकलं कि , फोन बंद  .... घराला कुलूप... आणि आता हा लिफाफा....कदाचित तिचा माझ्यासाठीचा शेवटचा निरोप....मला तो लिफाफा उघडायच धाडस होईना... मी तिथून निघालो... आणि पुन्हा तिथेच आलो जिथे मी तिला प्रथम भेटलो होतो....-  मांडवी .....समुद्र शांत होता... लाटाही संथ होत्या ... सूर्याने एका रात्रीपुरता जगाचा निरोप घेतला होता... मी तो लिफाफा थरथरत्या हातांनी उघडला... कागदावर पाणी पडल्यावर त्याचा गुळगुळीत पणा जाऊन जसा थोडासा खडबडीत होतो तसा तो कागद झाला होता .... कदाचित तिने रडता रडता हे पत्र लिहिलं असावं... पत्रावर तारीख लिहिलेली नव्हती.

              प्रिय मकरंद   ,


                     काय  लिहू...?? हे  पत्र  तुला मिळेल त्यावेळी मी इथे नसेन....   
                     जे काही झालं त्याबद्दल मला आता काही बोलायचं नाही....
                     कदाचित ते होणारच होतं.... और होनी को कौन टाल सकता है....
                     पण एक गोष्ट मात्र नक्की कि मी तुला कधीही विसरू शकत नाही.... 
                     तुम्हारे साथ बिताया हुआ हर एक पल मुझे हमेशा याद रहेगा...
                     मांडवीच्या त्या पहिल्या भेटी पासून ते उरुसातल्या शेवटच्या भेटिपर्यंत.... 
                     में जा रही हुं..... कहाँ वो नहीं बता सकती....
                     मुजें भूल जाओ मकरंद ... हमारे नसीब  मैं  शायद  यही लिखा था.... 
                     आसमान कि तरफ तो सबिकी  निगाहें होती है.... 
                     मगर हर किसी की दुआ  कुबूल नहीं होती....   
                                                                         --
                                                                            आसमाँ

तिचं ते पत्र वाचून मला तर एकदम आतून  भडभडून आल्यासारखं वाटू लागलं ... जीवनरूपी पुस्तकातलं एक सुंदर प्रकरण संपलं होतं .... आपलं खूप महत्वाचं असं काहीतरी आपल्यापासून हिरावून घेतल्याची  एक बोचरी जाणीव झाली.... आसमाँ आणि माझी काहीच चूक नसताना आम्हा दोघांना हि शिक्षा का मिळाली तेच कळत नव्हत...   आसमाँ ..... मी वर आकाशाकडे बघितलं ... आकाशात काळे ढग जमा झाले होते .... आता लवकरच पाउस येणार होता  .... पण माझ्या डोळ्यातल्या पावसाला केंव्हाच सुरुवात झाली होती...

                                                       
                                                 (........समाप्त .......)